Thursday 25 February 2021

       Reflection for the Homily of 2nd Sunday of Lent (28/02/2021) By Br. Aaron Lobo


प्रायश्चित काळातील दुसरा रविवार

दिनांक: २८/०२/२०२१

पहिले वाचन: उत्पत्ती २२:१-२,९-१३,१५-१८

दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ८:३१-३४

शुभवर्तमान: मार्क ९:२-१०





“देवाची वाणी ऐकणे आणि त्याच्या इच्छेप्रमाणे जगणे.”

प्रस्तावना:

          आज आपण प्रायश्चित्त काळातील दुसरा रविवार साजरा करीत आहोत. आजच्या पहिल्या वाचनात आब्राहमला, देव स्वदेश सोडून एका अनोळखी, नव्या जागेवर जायला सांगतो. जेणेकरून तो सर्वांसाठी देवाशीर्वाद बनेल. त्याच्याद्वारे इतरांचे कल्याण होईल. आजच्या शुभवर्तमानात आपण वाचतो की प्रभूच्या रुपांतरणाच्या वेळेस दैवी वाणी झाली, “हा माझा परमप्रिय पुत्र आहे, त्याचे तुम्ही ऐका.” आज आपणाला ख्रिस्तसभा प्रभूची वाणी ऐकून त्याचे अनुकरण करण्यास पाचारण करत आहे. कारण जो कोणी त्याची वाणी ऐकतो तो खडकावर घर बांधणाऱ्यासारखा आहे, असे खुद्द प्रभू येशूख्रिस्त आपणास सांगतो (मत्तय ७:२४). याकोबाचे पत्र १:२२ मध्ये संत याकोब म्हणतो, “त्याची वाणी फक्त ऐकू नका तर अनुकरण करा.” जशी संत फ्रान्सिस असिसीकराने देवाला विचारलं की, “प्रभू मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे?”  आणि प्रभूची वाणी ऐकून त्याप्रमाणे आपलं जीवनाचारण ठेवलं, त्याच प्रमाणे आपण ही प्रभूची वाणी ऐकुया आणि त्याचे अनुकरण करू या.

पहिले वाचन: उत्पत्ती २२:१-२,९-१३,१५-१८

आजच्या पहिल्या वाचनात आपण वाचतो कि, परमेश्वर आब्राहामास इसाकाचा बळी देण्यास सांगतो. आब्राहाम देवाची आज्ञा पाळतो आणि त्याने सांगितल्या प्रमाणे इसाकाचा बळी देण्यास तयार होतो. परमेश्वर आब्राहामाची महान निष्ठा व विश्वास पाहून प्रसन्न होतो व देवदूताला पाठवून आब्राहामाला त्याच्या मुलाचा त्याग करण्यापासून थांबवितो व वचन देतो कि, तुझी संतती आकाशातील ताऱ्यांइतकी व समुद्रातील वाळू इतकी मी करीन.

दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ८:३१-३४

आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल आपणास परमेश्वराचे प्रेम हे ख्रिस्तामध्ये आहे, असे सुचवतो. परमेश्वराचे दैवी प्रेम हे येशू ख्रिस्ताच्या मानवी रुपात आपणास दिसून येते. दैवी प्रेमाचे हे नाते अतूट आहे व कुठली ही शक्ती आपल्याला त्याच्यापासून दूर करू शकत नाही.

शुभवर्तमान: मार्क ९:२-१०

आजच्या शुभवर्तमानात आपण येशू ख्रिस्ताच्या रुपांतराबद्दल ऐकतो. ह्या घटनेद्वारे येशू ख्रिस्ताची खरी ओळख, त्याची पवित्रता व त्याचा महिमा जाहीर होतो. ख्रिस्ताचे रुपांतर त्याचे भावी दुःख व त्याचा गौरव ह्या दोघांमधील दुवा आहे.

मनन चिंतन:

इस्त्राएल लोकांना समजले की बलिदान करणाऱ्याच्या रक्ताने पापांबद्दल प्रायश्चित करून आणि अपराध्याला किंवा पाप्याला शुद्ध करून तुटलेला दैवी-मानवी नातेसंबंध पुनर्वसीत होतो. देवाने अब्राहामाला महान बलिदान देण्यासाठी सांगून त्याची परीक्षा घेतली, परंतु तो खचून नं जाता, देवाला शरण जाऊन, त्याचा विश्वास  दृढ व्हावा यासाठी प्रयत्न करतो. आब्राहामाच्या विश्वासाला आणि आज्ञाधारकपणाला उत्तर म्हणून देवाने त्याला इसाहाकाचा त्याग करण्यापासून रोखले. देवाने येशूला ताबोर पर्वतावर एक भव्य बळी म्हणून सादर केले. येशू असहाय्य व दयनीय पीडित नाही, तर देवाने पाठविलेला, दैवी वस्त्र परिधान केलेला, वचन दिलेला आणि भविष्यवाणी केलेला मसीहा आहे, हे त्याने आपणास कळवावे अशी त्याची इच्छा आहे. येशू हा देवाचा प्रिय पुत्र आहे. इसाहाकाच्या जागी वेदीवर अर्पण केलेला कोकरा ख्रिस्तामध्ये वधस्तंभावर चढलेला आहे. त्याचे रक्त आणि त्याचे मरण हे आपल्या शुद्धीचे आणि पुनरूत्थानाचे प्रवेशद्वार बनले. आज, येशू ‘देवासमोर आपल्यासाठी मध्यस्थी करतो’. तो परमेश्वराने आपल्या पापांसाठी दिलेला यज्ञ आहे. परमेश्वर आपल्यासाठी आहे आणि येशू आपल्या बाजूने आहे या जाणिवेपासून शक्ती व धैर्य मिळविण्यासाठी संत पौल आपणास आमंत्रित करतो. आपण देवाचे निवडलेले या नात्याने त्याच्याशी  विश्वासू राहिल्यास, तो आपल्या सर्व शत्रूंचा नाश करील. प्रायश्चित्त, काळ हा आपणा स्वतःला वधस्तंभावर खिळून प्रभू येशूच्या बलिदानाची फळे परिपूर्ण प्रमाणात प्राप्त करण्यास योग्य काळ आहे, कारण जेव्हा तो आपल्याला निरागस किंवा निर्दोष ठरवितो तेव्हा कोणीही आपल्याला दोषी ठरवू शकत नाही.

          गेल्या रविवारच्या उपासनेत आपण प्रभू येशूच्या मोहांविषयी ऐकलं. आपल्याला झालेल्या सर्व मोहांवर प्रभू येशूने मात केली. त्याच्या ह्या विजयाने आज आपण त्याचे ताबोर पर्वतावर रुपांतर पाहतो. प्रायश्चित काळ आपल्यालाही प्रभू येशू ख्रिस्ताचे अनुकरण करण्यास आमंत्रण करत आहे. प्रार्थना, उपवास व दान-धर्म ह्या शस्त्रांद्वारे आपण सुद्धा आपल्या जीवनातल्या मोहांवर मात केली पाहिजे व पापांच्या मार्गावर न चालता आपल्याही जीवनाचे रुपांतर केले पाहिजे.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे प्रभो तुझ्या जवळ येण्यास आम्हांला सहाय्य कर.

१. आपले पोप फ्रान्सिस, बिशप्स, धर्मगुरु व धर्म-भगिनी व सर्व प्रापंचिक ह्यांनी त्यांच्या कार्याद्वारे प्रभू येशूची खरी ओळख संपूर्ण जगाला करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

२. ह्या उपवास काळात सर्व भाविकांनी अतिशय पवित्र जीवन जगावे व प्रभूच्या अधिक जवळ यावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

३. दयाळू प्रभो आजच्या प्रभूरुपांतर सणाच्या दिवशी आमच्या हृदयाचे व मनाचे परिवर्तन कर. जेणेकरून, आम्ही तुझे कार्य पसरविण्यासाठी सदैव झटावे म्हणून आम्ही तुजकडे प्रार्थना करतो.

४. आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबात शांती, प्रेम, ऐक्य सदैव नांदत रहावे व आपण प्रभूच्या प्रेमाने भरून जावे म्हणून प्रभूचरणी प्रार्थना करूया.

५. आता थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक हेतूंसाठी प्रार्थना करूया. 

No comments:

Post a Comment