Reflection for the 5th SUNDAY IN ORDINARY TIME (07/02/2021) By Dn. David Godinho.
सामान्य
काळातील पाचवा रविवार
दिनांक: ०७/०२/२०२१
पहिले वाचन: ईयोब ७:१-४,६-७
दुसरे वाचन: १ करिंथकरांस पत्र ९:१६-१९, २२-२३
शुभवर्तमान: मार्क १:२९-३९
विषय:
परमेश्वराचे कार्य करण्यात व्यस्त असुया.
प्रस्तावना:
आज आपण
सामान्य काळातील पाचवा रविवार साजरा करीत आहोत. परमेश्वराचे कार्य करण्यात व्यस्त
राहण्यास आजची उपासना आणि प्रभु शब्द आपणास आमंत्रण करीत आहेत. प्रभू येशू ख्रिस्त
स्वतः परमेश्वराने दिलेले कार्य मोठ्या उत्साहाने पार पाडीत होता. संपूर्ण दिवस
आपल्या शब्दाद्वारे आणि कृतीद्वारे परमेश्वराचे कार्य करण्यात व्यस्त होता. इतकेच
नव्हे तर भल्या पहाटे उठून तो आपला वेळ प्रार्थनेमध्ये म्हणजेच परमेश्वराच्या
सहवासात घालवत असे.
‘ह्याच
प्रभू येशूची सुवार्ता सांगणे ही माझी जबाबदारी आहे.’ असे संत पौल आजच्या दुसऱ्या
वाचनात आपणास सांगत आहे. ही जबाबदारी पार पाडण्यात तो सतत व्यस्त होता.
परमेश्वराचे कार्य करणे ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्याचे कार्य करण्यात
आपण सतत मग्न राहण्यास लागणारी कृपा शक्ती आजच्या मिस्साबलिदानात मागूया.
सम्यक विवरण:
पहिले वाचन: ईयोब ७:१-४,६-७
ह्या
उताऱ्यात ईयोब आपले दुःख परमेश्वरासमोर
व्यक्त करतो. प्रत्येक मानवाला दुःख व निराशा ह्या दोन गोष्टीतून जावे लागते. आणि
हे मानवी अस्तित्वाचा एक अंश असल्याचे येथे दाखवले आहे. जीवनात येणारे कष्ट व खडतर
परिश्रम हा मानवी जीवनाचा एक भाग आहे. आपण ह्या कष्टात व दुःखात खचून न जाता ईयोबाप्रमाणे परमेश्वरावरील आपली श्रद्धा दृढ ठेवणे
गरजेचे आहे.
दुसरे वाचन: १ करिंथकरांस पत्र ९:१६-१९, २२-२३
प्रभूची
सुवार्ता इतरांपर्यंत पोहोचवून इतरांबरोबर मी देखील तारणाचा भागीदार व्हावा ह्याच
प्रेरणेने ख्रिस्ताची सुवार्ता जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी संत पौल सतत
कार्यरत राहिला. ‘मी सर्वप्रकारे, अनेकांचे तारण साधावे, म्हणून मी सर्वांकरिता
सर्व काही झालो.’ असे संत पौल ह्या उताऱ्यात आपणास सांगत आहे.
शुभवर्तमान: मार्क १:२९-३९
प्रभू
येशू ख्रिस्त परमेश्वराचे कार्य करण्यात मग्न असल्याचे चित्र संत मार्क आपल्या
समोर ठेवत आहे. आपल्या शब्दाद्वारे आणि कृतीद्वारे परमेश्वराचे राज्य प्रस्थापित
करण्याच्या कार्यात गुंग असलेला प्रभू येशू परमेश्वराच्या सान्निध्यात देखील आपला
वेळ सारून आपणासमोर एक आदर्श ठेवत आहे.
मनन
चिंतन:
बऱ्याच
वेळा आपण ऐकतो की, “मी कामात व्यस्त
आहे. मला वेळ नाही.”
आपणही असे दुसऱ्यांना सांगत असतो. ‘ज्या
व्यक्तीला तुम्ही
कॉल केला आहे, ती आता व्यस्त आहे.’ ह्या
वाक्याचा आपणा प्रत्येकास
अनुभव आलाच असेल.
आजच्या ह्या आधुनिक जगात ‘व्यस्त
असण्याची संस्कृती (Busy Culture)’ आपणास सर्वत्र आढळून येते.
कोणीही आपणास कुठल्याही कामासाठी बोलावले तर, आपण सहज बोलतो, ‘मला
वेळ नाही.’
व्यस्त असणे ह्या विषयावर आज मनन चिंतन, करण्यासाठी आजची उपासना
आपणास आवाहन करीत आहे.
इंग्रजी
मध्ये व्यस्त असणे ह्याला Busy असे
म्हणतात. ह्या Busy
शब्दातील आद्य अक्षरे
आपणास दोन प्रकारच्या व्यस्त व्यक्तीची व्याख्या देतात.
B-
Busy, U- Under, S- Saviour’s, Y- Yoke
B-
Busy, U- Under, S- Satan’s, Y- Yoke.
पहिले
परमेश्वराचे कार्य करण्यात व्यस्त असतात आणि दुसरे जे सैतानाचे
कार्य करण्यात व्यस्त असतात.
आपण कुठल्या प्रकारच्या गटात बसतो हे,
आपण आपणास विचारणे गरजेचे आहे.
आजच्या
शुभवर्तमानावर जर
आपण
आपलं लक्ष केंद्रित केलं तर,
आपणास प्रभू येशूच्या ‘व्यस्त असल्याची जाणीव
होते.’ गेल्या रविवारी आपण ऐकलं की,
प्रभू येशू सभास्थानात जाऊन उपदेश
करतो,
अशुद्ध आत्मा काढतो आणि आजच्या शुभवर्तमानात आपण
ऐकतो
की, येशू सभास्थानातून निघून शिमोनच्या
घरी येतो आणि त्याच्या सासूला बरं
करतो नंतर संध्याकाळी तो नानाप्रकारच्या रोगांनी पीडलेल्या
पुष्कळ लोकांना
बरे करतो. अशाप्रकारे येशूचा
संपूर्ण दिवस परमेश्वराचे कार्य पूर्ण करण्यात आणि त्याचे राज्य प्रस्थापित
करण्यात जात असे.
लुकच्या
शुभवर्तमानात अध्याय ४:१८-१९
मध्ये
ऐकतो
प्रभू
येशू म्हणतो, “परमेश्वराचा आत्मा
माझ्यावर आहे. कारण, दीनांस
सुवार्ता सांगण्यास तसेच, धरून नेलेल्यांची
सुटका करण्यास व आंधळ्यांना
दृष्टी देण्यास मला अभिषिक्त
केले आहे.” आणि याच
सेवेच्या आणि देवाचे राज्य
प्रस्थापित करण्याच्या कार्यात प्रभु येशू
व्यस्त होता, मग्न होता.
आजच्या
शुभवर्तमानाचा आराखडा घेतल्यास आपणास
तीन गोष्टी प्रामुख्याने दिसतात.
१. प्रभू
येशू लोकांची सेवा करण्यात आणि त्यांचे
जीवन आनंदी आणि प्रफुल्लित करण्यात व्यस्त होता:
पहिल्या प्रथम
सभास्थानात परमेश्वराचा शब्द,
उपदेश त्याने लोकांना दिला म्हणून लोक उदगारले
की, ही अधिकारयुक्त नवीन शिकवण
आहे. (मार्क १:२७) एवढेच
नव्हे तर, पुष्कळ माणसांना त्यांने
चांगले आरोग्य दिले. बरेच असे अशुद्ध आत्मे
काढले. आणि अशाप्रकारे आपल्या
शब्दाद्वारे व कृतीद्वारे चांगले
कार्य करून अनेकांना देवाच्या चांगुलपणाचा अनुभव दिला.
२. आपली
वाहवा
किंवा प्रशंसा करून घेतली नाही:
हे सर्व चांगले कार्य करताना अनेक अशुद्ध आत्म्यांनी ‘तु देवाचा पुत्र आहेस.’ असे
येशुबाबत वक्तव्य केले; परंतु येशूने लागलीच त्यांना धमकावले व
बोलू
दिले नाही. अनेक लोक त्याला शोधण्यास
दुसऱ्या दिवशी परत आले परंतु,
येशू एकाच ठिकाणी न राहता संपूर्ण गालीलात
परमेश्वराचा उपदेश
करीत व भुते काढत म्हणजेच;
परमेश्वराचे कार्य करण्यात त्याने
आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत केले.(मार्क १:३९)
३. परमेश्वराचा
सहवास त्याने सोडला नाही: प्रभू येशूला माहित होते की,
चांगले
कार्य करण्यासाठी लागणारी शक्ती परमेश्वराकडून येते.
म्हणून परमेश्वराची साथ त्याने सोडली नाही.
भल्या पहाटे म्हणजे अनेक विद्वानांच्या (scholars) मते
सुमारे तीन ते पाच च्या सुमारास उठून तो आपला वेळ परमेश्वराबरोबर घालवत
असे.
अशाप्रकारे
आपणापुढे प्रभू येशूने स्वतःचा
आदर्श ठेवलेला आहे. हाच
कित्ता
संत
पौलने
आपल्या जीवनात गिरवला.
म्हणून तो परमेश्वराची सुवार्ता पसरवण्यासाठी रात्रंदिवस कार्यरत राहिला.
आपल्यालाही परमेश्वराचे
कार्य करण्यात व्यस्त राहिले पाहिजे.
आपल्या शब्दाद्वारे,
चांगल्या कृतीद्वारे, परमेश्वराचे कार्य आपण
केले पाहिजे. आणि ते
चांगले करण्यासाठी प्रभू येशू
प्रमाणे आपण प्रार्थनेत आपला वेळ घालविला पाहिजे. प्रार्थनेला
आपल्या जीवनात प्रथम स्थान दिले पाहिजे.
तेव्हाच प्रभू येशू प्रमाणे आपण चांगले कार्य किंबहुना परमेश्वराचे
कार्य करण्यात व्यस्त राहू.
विश्वासू
लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद:
“हे प्रभो, तुझे कार्य करण्यास आम्हांला कृपा दे.”
१.
आपले पोप महाशय, कार्डिनल्स,
बिशप्स, सर्व धर्मगुरू व धर्मभगिनी ह्यांनी परमेश्वराचे कार्य करण्यात सतत व्यस्त
असावे व इतरांना परमेश्वराच्या प्रेमाचा व चांगुलपणाचा अनुभव देण्यास त्यांच्यासाठी
पवित्र आत्म्याची कृपा मागूया.
२.
आपल्या धर्मग्रामातील तरुण-तरुणींनी
प्रभू येशूच्या हाकेला होकार देऊन, त्याचे कार्य पुढे नेण्यास त्या सर्वांना
प्रेरणा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
३.
अनेक लोकं वेगवेगळ्या
आजारांनी पिडीत आहेत. अशा सर्व लोकांना प्रभूचा आरोग्यदायी स्पर्श व्हावा व शिमोनच्या
सासू प्रमाणे त्यांनी देखील इतरांची सेवा करावी म्हणून प्रार्थना करूया.
४.
अनेक लोकं जे बेरोजगार आहेत
व नोकरीच्या शोधात आहेत, त्या सर्वांना प्रभुचे मार्गदर्शन लाभावे व वेळीच त्यांना
काम मिळावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
५.
थोडा वेळ शांत राहून
आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक हेतूंसाठी आपण प्रार्थना करूया.
Well written... Thought pattern is very nice... Continue the good work
ReplyDelete