Friday 8 October 2021

         Reflection for 28th Sunday in Ordinary Time (10/10/2021) By  Fr. Benher Patil
सामान्य काळातील अठ्ठावीसावा रविवार

दिनांक १०-१०-२०२१

पहिले वाचन :- ज्ञानग्रंथ :- ७:७-११

दुसरे वाचन :- इब्री लोकांस पत्र :- ४:१२-१३

शुभवर्तमान :- मार्क १०:१७—३०


जगातील संपत्तीच्या मागे जाऊन स्वर्गातील संपत्ती गमावू नका


प्रस्तावना

आजची उपासना आपणास देवाने दिलेल्या विवेकबुद्धीचा वापर करून ऐहिक आणि क्षणभंगुर गोष्टींना प्राधान्य न देता, खरे शहाणपण शोधण्याचा किंवा मिळवण्याचा सल्ला देत आहे. शलमोन राजाने सर्व भौतिक गोष्टींपेक्षा विवेकबुद्धी आणि समजशक्ती निवडली. जेव्हा त्याने शहाणपण स्वीकारले, तेव्हा त्याला सर्वकाही मिळाले. येशू ज्ञानाचा अवतार असल्याने, जेव्हा आपण येशूच्या मागे जातो, त्याच्या प्रभावी वचनाचा स्वीकार करतो, तेव्हा आपल्याला येशूसह सर्व काही प्राप्त होते. आजच्या ह्या पवित्र बलिदानाला सहभागी होत असताना, आपल्या जीवनात देवाने योग्य निर्णय आणि निवड करण्यास आपणास शिकवावे, म्हणून विशेष प्रार्थना करू या.

मनन चिंतन

खरा श्रीमंत किंवा धनवान कोण? आपल्याला वाटते की ज्याच्याकडे अमाप संपत्ती पैसा किंवा सोनी आहे, तोच खरा श्रीमंत. ज्याच्याकडे बंगला, गाडी, नोकर-चाकर आहेत तोच शेठमाणूस आहे. पण बायबल मधील वचन आपणास असा उद्देश देतो की, समाजशक्ती आणि विवेकशक्ती ज्याच्याकडे असते, तेच खरे धनवान असतात. शलमोनाने क्षणभंगुर संपत्ती, सत्ता, वैभव यांना प्राधान्य दिले नाही, तर शहाणपणाला आपली सर्वात मोठी मालमत्ता म्हणून ओळखली. ज्ञानाच्या, विवेकाच्या जोरावर तो खरा ज्ञानी, श्रीमंत व यशस्वी राजा बनला. खरे शहाणपण हे देवा कडून येते (बेनसिरा १:१). खरे शहाणपण आपल्याला देव ज्या गोष्टी पाहतो, त्याप्रमाणे पाहण्याची व देव समजतो, त्याप्रमाणे समजून घेण्याची क्षमता देते. केवळ दैवी शहाणपण आपल्याला जीवनात शहाणपणाने व यशस्वीपणे कसे जगायचे हे शिकवू शकते.

येशू सर्व समंजसपणाचा आणि ज्ञानाचा उगम आहे. त्याची वचने आणि आपल्याला यशाचा, महानतेचा तसेच खऱ्या श्रीमंतीच्या मार्ग शिकवतात. आजच्या शुभवर्तमानात एक श्रीमंत तरुणाच्या उदाहरणाद्वारे येशू आपल्याल त्याची सत्यता पटवून देण्याचा प्रयत्न करतो. श्रीमंत तरुण हा धार्मिक होता.तो सर्व आज्ञाचा काटेकोरपणे पाळन करत होता. त्याने कोणावर जुलूम किंवा अत्याचार केला नाही.  पण त्याची शोकांतिका अशी होती कि, त्याला लोकांपेक्षा गोष्टी जास्त आवडतात होत्या. आपली मालमत्ता स्वतःकडे ठेऊन, स्वतःसाठी वापरून आपण देवाची दया मिळवू शकतो,  ह्या  चुकीच्या कल्पनेत अडकलेला होता. त्याच्याकडे अमाप संपत्ती असून सुद्धा तो असमाधानी, बेचेन, अपुरा होता. अशा परिस्थितीत तो येशूला प्रश्न विचारतो, “उत्तम गुरुजी, सार्वकालिक जीवन हे वतन मिळण्यासाठी मी काय केले पाहिजे?” तेव्हा येशू त्याला म्हणतो, “तुझ्यात एका गोष्टीची उणीव आहे, तुझे असेल- नसेल ते विकून गोरगरिबांना देऊन टाक, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल, आणि चल, माझ्यामागे ये”. वचन सांगतं की, ते शब्द ऐकून त्याचे तोंड उघडले,आणि कष्टी होऊन तो निघून गेला कारण तो फार श्रीमंत होतो.

दुर्दैवाने धन किंवा संपत्ती आपल्याला देवाकडे किंवा शाश्वत जीवनाकडे घेऊन जाण्यास असमर्थ ठरतात. श्रीमंत तरुण येशूची कल्पना, आव्हान स्वीकारण्यास अपुरा पडतो. कारण त्याच्या संपत्तीने स्वतःच्या व देवाच्या दरम्यान एक भिंत बांधली होती. त्याच्या मालमत्तेने त्याला ताब्यात घेतले होते. जणू काही तो भौतिक गोष्टी आणि पैशाच्या आसक्तीने बांधला घेला होता. जरी श्रीमंत तरुणाने कधीही कुणाला मारले नाही, चोरी केली नाही, व्यभिचार केला नाही तरीही तो मूर्तीपूजेला मनाई करणारी आज्ञा आणि शेजाऱ्यावर प्रेम करणारी आज्ञा मोडत होता. त्याने आपल्या संपत्तीची देवा पेक्षा जास्त पूजा केली आणि तिला प्राधान्य दिलं. जीवनात परिपूर्ण व्हायचं असेल तर आज्ञा पाळणे पुरेसे नाही. येशू त्याला आव्हान देतो की, त्याने आपली संपत्ती गरिबांना वाटून द्यावी.

संपत्ती श्रीमंती माणसाला देवापर्यंत पोहोचण्यापासून रोखते? प्रथम: संपत्ती स्वातंत्र्याच्या चुकीच्या भावनेला प्रोत्साहन देते. सर्वसामान्यपणे श्रीमंतांना वाटते की, ते त्यांच्या आनंदाचा मार्ग विकत घेऊ शकतात, किंवा दुःखातून मार्ग काढू शकतात आणि म्हणूनच त्यांना देवाची गरज भासत नाही. दुसरे म्हणजे, संपत्ती माणसाला या पृथ्वीवर बांधून ठेवते. एखादा मनुष्य जर पृथ्वीशी व पृथ्वीवरील भौतिक व ऐहिक गोष्टींशी संबंधित असेल, तर तो कधीही परलोकांचा विचार करत नाही. शिवाय श्रीमंती माणसाला स्वार्थी, गर्विष्ठ आणि लोभी बनवते. पैशाचा लोभ मूर्तिपूजा असण्याबरोबर दुःखाचा स्त्रोत देखील आहे.

परंतु येशू किंवा त्याची शिकवण श्रीमंतांच्या विरोधात नाही. येशुने स्वतः संपत्ती किंवा ऐहिक वस्तूंचा कधीही निषेध केला नाही. तो ज्या गोष्टींचा निषेध करतो ती म्हणजे पैशाची आणि मालमत्तेची आसक्ती किंवा लोभ. दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे, येशु संपत्ती बद्दलच्या आपल्या गोष्टीबद्दल बोलत आहे.

जगामध्ये सुदैवाने असे अनेक श्रीमंत आहेत, ज्यांनी आपली संपत्ती प्रामाणिकपणे आणि न्यायपणे मिळवली आहे, आणि जे त्यांच्या संपत्तीचा बराचसा भाग सामाजिक कारणासाठी खर्च करतात. त्यांची संपत्ती त्यांना स्वर्ग गाठण्यास त्यांना कधीच अडथळा आणणार नाही. बायबल असं म्हणत नाही की, पैसा हे सर्व वाईटाचे मूळ आहे, तर ते म्हणते कि, पैशाचे प्रेम व लोभ हे सर्व वाईटाचे मूळ आहे. भौतिक संपत्ती ही देवाच्या आशीर्वादाची चिन्हे आहेत, तर दारिद्र हे त्याच्या नाराजीचे लक्षणं आहेत; ह्या विषयी येशू यहुदी विचारवंतांना आव्हान देतो. येशू येथे अशा मूल्य प्रणालीचा निषेध करतो, जो लोकांपेक्षा अधिक महत्त्व किंवा स्थान ऐहिक गोष्टींना देतो. शेवटी येशू असे प्रतिपादन करतो की, ज्यांनी देवाच्या राज्याला प्राधान्य दिले आहे, त्यांना या जीवनात आशीर्वाद आणि पुढील आयुष्यात सार्वकालिक जीवनासह दोन्हीचे भरपाई दिली जाईल.

मी माझ्या जीवनात कोणाला जास्त प्राधान्य देतो, देवाला की संपत्तीला? माझ्यासाठी संपत्ती वरदान आहे की शाप आहे? देवाने दिलेल्या आशिर्वादाचा किंवा  संपत्तीचा मी सदुपयोगासाठी की दुरुपयोगासाठी वापरतो?

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: हे प्रभू, आमची प्रार्थना ऐक.

. चर्चच्या सर्व पुढाऱ्यांनी आपल्या जीवनात ऐहिक संपत्तीचे गुलाम न बनता, गरिबांचा व सर्वसंघपरीत्यागाचा उत्तम कित्ता दुसऱ्यांसमोर ठेवावा, म्हणून आपण प्रार्थना करू या.

. या जगातील श्रीमंत राजकीय पुढाऱ्यांनी स्वतःच्या हिताचा विचार न करता, निस्वार्थीपणे व उदारपणे देशाच्या विकासासाठी व गरीब व गरजवंतांच्या कल्याणासाठी सर्व राष्ट्रीय संपत्तीचा सदुपयोग करावा, म्हणून आपण प्रार्थना करू या.

. कोरोना महामारीमुळे ज्यांनी नोकऱ्या गमावलेल्या आहेत, आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहे, दारिद्र्यरेषेखाली जीवन जगत आहेत; अशा सामाजिक दुर्बळ घटकांना श्रीमंत लोकांनी योग्य व हवी ती मदत पुरवावी आणि गरिबी हटवण्यासाठी हातभार लावावा, म्हणून आपण प्रार्थना करू या.

. ख्रिस्ती लोकांनी जात-पात किंवा देश आणि वेश अशा चौकटीच्या पलीकडे जाऊन, ख्रिस्ती प्रेमाने व  करुणेने प्रेरित होऊन, रंजल्या-गांजल्यांची सेवा करण्यासाठी, दुःखितांची तिमिर दूर करण्यासाठी परमेश्वरी कृपा मिळावी, म्हणून आपण प्रार्थना करू या.

   

No comments:

Post a Comment