Thursday 14 October 2021

                                            

        Reflection for 29th Sunday in Ordinary Time (17/10/2021) By Fr. Suhas Pereira

सामान्य काळातील एकोणतिसावा रविवार

 

दिनांक: १७/१०/२०२१

पहिले वाचन : यशया ५३: १०-११

दुसरे वाचन : इब्री. ४: १४-१६

शुभवर्तमान : मार्क १०: ३५-४५

 

"सेवेसाठी अधिकार "



प्रस्तावना

        प्रिय बंधू-भगिनींनो, आज आपण सामान्य काळातील एकोणतिसावा रविवार साजरा करतो. आजच्या उपासनेची वाचने खऱ्या नेतृत्वाचा सार सांगताना म्हणतात कि, खरा नेता हा सत्तेचा हव्यास धरत नाही, इतरांवर सत्ता किंव्हा हुकूमत गाजवत नाही तर आपल्या सत्तेचा/ अधिकाराचा उपयोग इतरांची सेवा करण्यासाठी करत असतो. खरं श्रेष्ठत्व हे सेवेमध्येच असतं. आजची उपासना प्रभू येशू ख्रिस्ताच जीवन आपल्यापुढे उदाहरण म्हणून ठेवते. प्रभू येशू हा देवपुत्र असूनसुद्धा तो सेवक बनला त्याने जनसेवेला स्वतःला वाहून घेतले. जो प्रभू येशूप्रमाणे सेवा आणि समर्पणाचा ध्यास घेतो आणि त्याप्रमाणे जगतो, तोच  ख्रिस्ताच्या राज्यात उच्च आणि श्रेष्ठ बनू शकतो. यशया संदेष्ट्याच्या पुस्तकातून घेतलेल्या आजच्या पहिल्या वाचनात आपण परमेश्वराच्या सेवकाबद्दल वाचतो. हा सेवक परमेश्वराकडे लोकांसाठी मध्यस्थी करतो त्यांच्या पापांचे ओझे स्वतःच्या खांद्यावर घेतो आणि त्यांच्या पापांबद्दल स्वतःच्या प्राणाने  भरपाई देतो. परमेश्वराचा सेवक इतरांच्या पापासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती देतो. हि भविष्यवाणी प्रभू ख्रिस्ताबद्दलची भविष्यवाणी होती. प्रभू येशू इतरांसाठी जगला आणि मेला.

        दुसऱ्या वाचनात आपण ऐकतो कि, प्रभू येशू हा लोकांसाठी स्वर्गाकडे मध्यस्थी करणारा परमेश्वराचा महान असा मुख्य याजक होता. प्रभू येशू असा महान याजक आहे "जो आमच्यासारखाच सर्व प्रकारच्या मोहाच्या अनुभवातून गेला. तरीही तो पूर्णपणे निष्पाप राहिला. म्हणून आपण त्याच्या कृपेच्या सिंहासनाजवळ ठाम निर्धाराने जाऊ या. यासाठी की, आमच्या गरजेच्या वेळी साहाय्य मिळावे म्हणून आम्हाला दया व कृपा प्राप्त व्हावी." आजचं शुभवर्तमान आपल्याला प्रभू येशूने देवाचा व्यथित सेवक बनून  आणि आपल्या शिष्यांना सेवेद्वारे श्रेष्ठ होण्याचा कानमंत्र देऊन आपलं तारणकार्य कसं सिद्धीस नेलं त्याबद्दल सांगते.

        “तुम्हांपैकी जो कोणी श्रेष्ठ बनू पाहतो, त्याने स्वतःला नम्र बनवले पाहिजे आणि इतरांची सेवा-चाकरी केली पाहिजे.” खरा श्रेष्ठपणा हा आपल्याकडे किती आणि काय आहे किंव्हा आपल्याला इतरांकडून काय मिळू शकते ह्यात नाही, तर खरा श्रेष्ठपणा आपण इतरांना काय देऊ शकतो ह्यात आहे.

 

मनन -चिंतन

        प्रिय बंधु-भगिनींनो, कलकत्त्याची संत मदर तेरेसा हि एक लहान आणि साधी स्त्री होती. आपल्या इतर व्रतस्थ भगिनींना बरोबर घेऊन समाजातील गोरगरीब, आजारी आणि उपेक्षितांची सेवा करून त्यांची योग्य काळजी घेणारी हि गटाराची संत देवप्रिती आणि शेजारप्रितीने ओतप्रोत भरलेल्या हृदयाची व्यक्ती होती. गोरगरिबांना आणि इतरांनी टाकून दिलेल्या लोकांना निवारा मिळावा, त्यांना प्रेम मिळावं, त्यांना कमीतकमी चांगलं आणि मानवी प्रतिष्ठेला साजेसं असं मरण यावं आणि त्यांच्या देवावरील विश्वासाद्वारे त्यांना स्वर्गाचे सुख लाभण्यासाठी त्यांच्या जीवनाची तयारी करावी या महत्वाच्या हेतुने मदर तेरेसांनी गरिबांच्या आणि आजाऱ्यांच्या सेवेचे हे व्रत घेतलेले होते.

        आपण जेव्हा मदर तेरेसा ह्यांच्या जीवनाकडे पाहतो आणि आजच्या शुभवर्तमानात शिष्यांकडे पाहतो तेव्हा आपल्याला त्यांच्यामध्ये प्रचंड फरक आणि विरोधाभास  आढळून येतो. मदर तेरेसा इतरांना देवाच्या स्वर्गराज्यात आणण्यासाठी, त्यांना स्वर्गात स्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत होत्या. तर प्रभू येशूचे शिष्य मात्र येशूच्या राज्यात स्वतःसाठी मानाची जागा, उच्च पद मिळवण्यासाठी टपून बसलेले आणि एकमेकांशी झगडत होते. प्रभू येशू हा खरोखरच एक उत्तम गुरु होता. मात्र त्याचे शिष्य हे वेगळे होते. शिष्यांमध्ये काही मदर तेरेसांसारखे होते, तर काही अतिमहत्वकांक्षी होते. आपण लक्षात घेतलं पाहिजे, कि आजच्या शुभवर्तमानात नावानिशी उल्लेख केलेल्या याकोब आणि योहान हे नंतर प्रभू येशूकडून खूप काही शिकले आणि प्रभू येशूच्या सानिध्यात राहून त्यांचं पूर्णपणे जीवन आणि हृदयपरिवर्तनसुद्धा झालं. याकोब हा ख्रिस्तासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या शिष्यांपैकी पहिला रक्तसाक्षी झाला आणि योहान हा ख्रिस्ताचा प्रिय शिष्य बनून त्यानेसुद्धा पुढे रक्तसाक्ष्याचं मरण पत्करलं. या सर्अवागोदर शिष्यांना एक सत्य समजलं नव्हत आणि त्यांच्या कल्पनेपलीकडेसुद्धा जात होतं, ते म्हणजे: प्रभूच्या राज्यात मानाचे स्थान मिळविण्याचं जे स्वप्न ते बघत होते, ते स्वप्न केवळ परिपूर्ण समर्पणाद्वारेच पूर्ण होणे शक्य होईल.

         मध्यंतरीच्या वेळात शिष्य जाणून चुकले होते, कि सत्ताधाऱ्यांप्रमाणे भविष्याची आणि कारकिर्दीची चिंता आणि त्यांचा विचार हे पूर्णपणे प्रभू येशूच्या शिकवणुकीविरुद्ध आहेत. "तुम्ही सत्ताधाऱ्यांप्रमाणे नाहीत", प्रभू येशूने त्यांना सांगितलं होतं, “तर तुमच्यातील जो कोणी मोठा होऊ पाहतो त्याने तुमचा सेवक झाले पाहिजे. आणि जो कोणी पाहिला होऊ इच्छितो त्याने सर्वांचा सेवक झाले पाहिजे” (मार्क १०, ४३-४४). प्रभू येशूच्या राज्यात श्रेष्ठ मनुष्य तो नाही ज्याच्याकडे सत्ता, ताकद आहे. प्रभूच्या राज्यात श्रेष्ठ आणि उच्च मनुष्य तोच ज्याला सत्तेचा गर्व आणि सत्तेची हाव नाही तर जो नम्र आणि सत्ता असूनसुद्धा  नम्र बनतो, सेवाभावी  बनतो.

        प्रभूने त्यांना विचारलं, “मी जो प्याला पिणार आहे, तो तुमच्याने पिणे शक्य आहे काय?. म्हणजेच, माझ्याबरोबर आणि माझ्यासारखं दुःख सहन करणे तुम्हाला शक्य आहे का? प्रभू येशूने एक गोष्ट स्पष्टपणे सांगितली, ती म्हणजे, त्याच्या उजवीकडे किंवा डावीकडे बसण्याचा अधिकार मिळविण्यासाठी शिष्यांना दुहेरी समर्पणासाठी तयार असणे गरजेचे आहे. हे दुहेरी समर्पण आहे: निस्वार्थी सेवा करण्याची आणि सेवा करताना दुःख आणि प्रसंगी मरणसुद्धा स्वीकारण्याची तयारी. आणि या शिकवणुकीचा अवलंब येशूने प्रथम स्वतःच्या जीवनाद्वारे केला. त्याचं जीवन हे अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी निस्वार्थी सेवेमध्ये व्यतीत केलेलं जीवन होतं. आपल्या शिष्यांबरोबर शेवटचे भोजन घेत असताना येशूने आपल्या शिष्यांचे पाय धुण्याचा प्रसंग आपल्याला सेवेचा खरा अर्थ सांगतो. सेवा करणे म्हणजे, दुसऱ्यांसमोर  स्वतःला नम्र बनवणे, वाकणे, कि जेणेकरून इतरांना अपमानाला सामोरे न जाता, मानाचे आणि प्रतिष्ठेचे जीवन जगता येईल. दुःख सहनाची तयारी म्हणजे, प्रभू येशूप्रमाणे समाजाने नाकारलेल्या आणि वाळीत टाकलेल्या लोकांप्रती सहानुभूती दाखविणे, समाजातील तळागाळातील लोकांना आधार देणे. प्रभू ख्रिस्त स्वतः अशा लोकांच्या बाजूने होता, त्यांच्या जीवनात आणि दुःखात तो सहभागी झाला; अशा लोकांबरोबर असलेल्या त्याच्या जवळीकतेमुळे त्याला समाजाची निंदा-नालस्ती, थट्टा-मस्करी, शिव्या-शाप सहन करावे लागले, क्रुसावरील मरण स्वीकारावं लागलं. हाच तो दुःखाचा प्याला आहे जो प्रभू येशूने प्राशन केला.

        सेवाकार्य करण्याची तयारी आणि दुःख सहन करण्याची तयारी:  गोरगरीब आणि गरजवंत लोकांकडे दुर्लक्ष न करता त्यांची सेवा करण्यास आजचं शुभवर्तमान आपल्याला बोलावत आहे. एक ख्रिस्ती या नात्याने आपण ख्रिस्ताप्रमाणे सेवामय जीवन जगण्यास तयार आहोत का? कि आपलं जीवन फक्त आपण, आपलं  कुटुंब, आपलं काम, आपलं भविष्य यापुरताच मर्यादित आहे? आपल्या जीवनात इतरांसाठी वेळ आणि जागा आहे का? आपल्या स्वतःच्या जीवनाचा क्रूस वाहने आणि त्याचबरोबर इतरांच्या जीवनाचा क्रूस वाहण्यास त्यांना साहाय्य करणे हे खूप कठीण, मेहनतीचं, जोखमीचं  आणि कष्टाचं काम असू शकतं. परंतु हे सगळं त्याच प्याल्याचा भाग आहे, जो प्याला पिण्यासाठी प्रभू येशू आपल्याला आव्हान आणि आमंत्रण देत आहे.

        सेवाकार्य फक्त तेव्हाच घडत नाही, जेव्हा एखादी व्यक्ती मदर तेरेसांसारखं जीवन जगते. सेवाकार्याला वेगवेगळ्या बाजू, वेगवेगळे पैलू आहेत. परंतु या सर्व बाजूंचा आणि पैलूंचा एकच सामाईक हेतू आहे: दुसऱ्याचं बरेपण, दुसऱ्यांचा आनंद, त्यांचं अध्यात्मिक आणि शारीरिक बरेपण आणि त्यांचं सार्वकालिक तारण. सेवा करणे म्हणजे इतरांना परमेश्वराचं प्रेम, त्याची दया आणि त्याच्या  चांगुलपणाचा अनुभव देणे.

        आजची उपासना आपल्याला नम्र होऊन सेवाभावी जीवन जगण्यास आमंत्रण देत आहे आणि ख्रिस्ताचा आदर्श आपल्यापुढे ठेवत आहे. ख्रिस्त हा देवाचा पुत्र असूनसुद्धा नम्र मानव झाला. तो सेवा करून घेण्यासाठी नव्हे तर सेवा करण्यासाठी या जगतामध्ये आला; तो या पृथ्वीचा न्याय करण्यासाठी नव्हे तर आपल्याला स्वर्गीय पित्याकडून सार्वकालिक जीवन देण्यासाठी या पृथवीवर आला. त्याच्या या सेवाकार्यात त्याने देवपुत्र असूनसुद्धा स्वतःला इतके नम्र आणि लीन केले, कि त्याने क्रुसावर एखाद्या गुन्हेगाराचे, एका दासाचे मरण स्वीकारले. प्रभू ख्रिस्ताप्रमाणे आपणसुद्धा नम्र होऊया आणि सेवेचं व्रत घेऊ या कारण नम्र होऊन सेवा करण्यातच खरं  श्रेष्ठत्व आहे.

 

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

हे परमेश्वरा तू कृपेचा सागर आहेस. आज आम्ही आमच्या सर्व विनंत्या आणि गरजा घेऊन श्रद्धेने आणि मोठ्या आत्मविश्वासाने तुजकडे येत आहोत.

आपला प्रतिसाद: हे परमेश्वरा आमची प्रार्थना ऐक.

१) हे परमेश्वरा तुझा पुत्र आमचा प्रभू येशू हा या जगात सेवा करून घेण्यासाठी नव्हे, तर सेवा करण्यासाठी आला होता. या जगातील तुझ्या कुटुंबाला, तुझ्या ख्रिस्तसभेला  ख्रिस्तासारखे बनण्यास आणि जगण्यास उत्कट इच्छा आणि तुझी कृपा प्रदान कर.

२) जे लोक स्वतःचा जीव धोक्यात घालून, स्वतःची पर्वा न करता इतरांच्या मदतीला धावून जातात अशांसाठी आम्ही प्रार्थना करतो. अन्याय आणि दडपशाहीविरुद्ध आवाज उठवताना तूच त्यांचा मार्गदर्शक आणि साथीदार हो.

३) आमच्या देशाच्या सर्व राजकीय नेत्यांनी ख्रिस्ताच्या आदर्शाप्रमाणे त्यांना सोपवलेल्या अधिकाराचा आणि सत्तेचा वापर लोकांच्या भल्यासाठी आणि देशाच्या प्रगतीसाठी करावा, म्हणून आपण प्रार्थना करू या.

४) आमचे परमगुरु फ्रान्सिस, सर्व महागुरू, धर्मगुरू आणि ख्रिस्तसभेच्या सर्व पुढाऱ्यांनी प्रभू ख्रिस्ताप्रमाणे सेवेचा ध्यास घ्यावा आणि त्यांच्या सेवेद्वारे देवाचे प्रेम समाजाला अर्पावे, म्हणून प्रार्थना करू या. 

५) थोडा वेळ शांत राहून आपल्या सर्व वैयक्तिक गरजांसाठी आणि त्याचबरोबर आपल्या परमगुरु स्वामींच्या हेतूंसाठी खास प्रार्थना करू या.

3 comments: