Wednesday 20 October 2021

                         

                           
Reflection for
30th Sunday in Ordinary Time (World Mission Sunday) (24/10/2021) By Fr. Benjamin Alphonso



सामान्य काळातील तिसावा रविवार (जागतिक मिशन रविवार)

दिनांक: २४/१०/२०२१

पहिले वाचन: यिर्मया ३१: ७-९

दुसरे वाचन: इब्री ५: १-६

शुभवर्तमान: मार्क १०: ४६-५२

तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.

प्रस्तावना

         आज आपण सामान्य काळातील तिसावा रविवार साजरा करीत आहोत. आपल्या दररोजच्या ख्रिस्ती जीवनात ‘विश्वास’ फार महत्वाचा असतो. जर आपल्याला देवाकडून काही हवं असेल, तर देवावरील विश्वास फार महत्वाचा आहे. आजच्या पहिल्या वाचनात आपण ऐकतो कि, यिर्मया संदेष्टा इस्त्राएली लोकांना सांगत आहे कि, आपण देवाला नाही तर देव आपल्याला निवडत असतो व सर्व काही त्याच्या इच्छेप्रमाणे होत असते. देव पिता आपल्याला सुखात आणि आनंदात ठेवण्याचे वचन देत असतो. तर दुसऱ्या वाचनात आपण ऐकतो कि, देव आपल्याला त्याचा अनुयायी व शिष्य म्हणून निवडतो व ह्यावरून देवाचे आपणावरील प्रेम दिसून येते. शुभवर्तमानात आपण शारीरिक दृष्ट्या आंधळा असलेल्या बार्तीमय याला त्याच्या विश्वासामुळे येशुकडून आध्यात्मिक दृष्टी प्राप्त होत असण्याचा वृत्तांत ऐकतो.

        आजच्या ह्या मिस्साबलिदानात बार्तीमय सारखा विश्वास दृढ करण्यासाठी व ज्या प्रमाणे बार्तीमय येशूला दाविद पुत्र म्हणू ओळखले तसे देवाला पूर्णपणे ओळखण्यास लागणारी कृपा व शक्ती आपण देवाकडे मागुया. आज पवित्र देऊळ माता मिशन रविवार साजरा करीत आहे. आजच्या ह्या मिस्साबलीदानात सर्व मिशनरी बंधू-भगिणिंसाठी खास प्रार्थना करूया.

मनन चिंतन

        आज जगात आपण नजर फिरवली तर आपल्याला आढळते कि, आजच्या ह्या आधुनिक युगात लोकांचा देवावरील विश्वास कमी होत चाललेला आहे. लोकं देवापासून दूर होत आहेत. जेव्हा आपल्या जीवनात अडचणी किंवा संकटे येतात, तेव्हा आपल्या मनात एक प्रश्न येतो कि, खरोखर देव आहे का? देव असेल तर जगात संकटे व दुखे का येतात? ह्या कोरोना महामारीच्या काळात लोक गोंधळून गेले आहेत. देवाच्या अस्तित्वावर लोकांच्या मनात नानाविविध प्रश्न येत आहेत. असे म्हणतात कि, ‘विश्वास ही देवाने मानवाला दिलेली फार मोठी देणगी आहे’. ही देणगी मिळावी म्हणून आपण नियमित प्रार्थना केली पाहिजे, २०१३ साली पोप फ्रान्सिस ह्यांनी ‘लुमेन फिदेई’ (Lumen Fidae- विश्वासचा प्रकाश) हे परिपत्रक काढले. ह्या परिपत्रकाद्वारे पोप महाशय आपल्या सांगू इच्छितात कि, आपणास विश्वासाची देणगी मिळावी म्हणून आपण नियमित प्रार्थना केली पाहिजे. आपण आपल्या विश्वासात खंभीर असणे फार महत्वाचे आहे.

बोधकधा

एकदा एक मोठी बोटी समुद्रातून जात होती, तेव्हा अचानक वादळ सुरु झाले. वादळामुळे ती बोट धक्के खाऊ लागली व बुडू लागली. तेव्हा बोटीच्या कप्तानाने लोकांना इशारा दिला कि आपण संकटात आहोत कारण वादळामुळे बोट बुडू शकते. बोटीवरील सर्व लोकं एकत्र आली व देवाजवळ प्रार्थना करू लागली कि, देवा आम्हाला वाचव. त्यावेळी बोटीवर एक छोटा मुलगा होता, जो खेळत आणि हसत होता. तेव्हा बोटीवरील लोकांनी त्या मुलाला विचारले, तू घाबरत नाही का? आपली बोट बोडणार आहे. आम्ही प्रार्थना करीत आहोत कि देवाने आपल्याला वाचवावे. तेव्हा तो लहान मुलगा म्हणाला कि, मी घाबरत नाही, कारण ह्या बोटीचा कप्तान आहे, ते माझे वडील आहेत आणि जो पर्यंत मी बोटीवर आहे, तो पर्यंत माझे वडील कधीच ही बोट बुडवू देणार नाही. होय त्या छोट्या मुलाचा आपल्या पित्यावरील विश्वास दृढ होता.

        आजचे शुभवर्तमान आपल्याला बार्तीमयच्या दृढ विश्वासाची साक्ष देत आहे. बार्तीमय चा विश्वास एखाद्या रहस्यावर अथवा शिकवणुकीवर आधारित नसून, येशुख्रिस्त मला बरे करील व मला नवीन जीवन देईल ह्या विश्वासामध्ये सामावलेला होता व त्याचा विश्वास आजच्या शुभवर्तमानातील त्याच्या प्रत्येक कृत्यामधून दिसून येतो.

येशूला तो पूर्णपणे ओळखतो. आपल्याला शुभवर्तमानाद्वारे समजते कि, बार्तीमयने येशूला ‘दाविद पुत्र येशू’ म्हणून ओळखले. बार्तीमयसाठी ‘दाविद पुत्र’ हे नाव येशू देवाकडून आलेला आहे हे दर्शविते व येशू एक राजा आहे, अशी येशूची प्रतिमा उभी करते.

मार्कच्या शुभवर्तमानात एक विशेष गोष्ट दिसून येते ती म्हणजे फक्त विश्वासाने पाहिजे असलेले दान मिळत नाही, तर विश्वासाबरोबर त्यासाठी श्रम सुद्धा करावे लागतात (उदारणार्थ मार्क २:४ – ५:२७). बार्तीमयचा विश्वास होता कि, येशू त्याला पूर्णपणे बरे करील. त्याचे शारीरिक व्यंग (आंधळेपणा) आणि त्याची आर्थिक परिस्थिती (भिकारी) ह्याचे प्रतिक ते वस्त्र होते व जेव्हा तो ते वस्त्र फेकतो तेव्हा त्याद्वारे जणू तो सांगतो कि, आता हे वस्त्र घेऊन दुसऱ्यांच्या भिकेवर अवलंबून राहावे लागणार नाही, कारण माझा येशू आता मला बरा करणार आहे. जेव्हा येशू बार्तीमयला म्हणतो कि, ‘मी तुझासाठी काय करावे आशी तुझी इच्छा आहे? तेव्हा बार्तीमय साध्या सोप्या भाषेत फक्त एवढेच म्हणतो कि मला दृष्टी हवी आहे. बार्तीमयचा विश्वास हा त्याच्या जीवनाचा सुकाणू होता. जरी तो आंधळा होता तरी खरे काय आहे हे त्याने पहिले होते. जेव्हा त्याला दृष्टी मिळाली तेव्हा तो बहकून न जाता त्याने त्याचा वापर येशूला अनुसरण्यास केला व आपला विश्वास अधिक दृढ केला.

आज पवित्र देऊळमाता ‘मिशन रविवार’ साजरा करीत आहे. आजच्या दिनी आपण जे मिशनरी लोकांचा विश्वास दृढ करण्यासाठी आपल्या प्रयत्नांची पराकाष्टा करतात त्यांच्यासाठी देवाजवळ प्रार्थना करूया. त्यांना त्याच्या कार्यात यश यावं, तसेच बार्तीमयप्रमाणे आपणा सर्वांचा विश्वास ह्या अडचणीच्या काळात दृढ व्हावा, म्हणून विशेष प्रयत्न व प्रार्थना करूया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे प्रभू, आमची प्रार्थना ऐक.

१. आपल्या धार्मिक नेत्यांनी, देऊळ मातेची शिकवणूक सर्व ख्रिस्ती लोकांपर्यंत पोहचवावी व त्यांना ती योग्यरीतीने आचरणात आणण्यासाठी मदत करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

२. ज्या धर्मगुरुनी, धर्मभगिनींनी व प्रापंचीकांनी स्वत:ला मिशन कार्यासाठी वाहून घेतलेले आहे अशा निष्ठावंतांवर परमेश्वराच्या कृपेचा वरदहस्त सदैव असावा व त्यांना त्यांच्या कृत्यातून प्रभूची सुवार्ता पसरविण्यास धैर्य लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

३. आपल्या धर्मग्रामातील आजारी व्यक्तींना चांगले आरोग्य, बेरोजगारांना रोजगार आणि दुःख-संकटात सापडलेल्यांना प्रभूचे दैवीसामर्थ्य प्रदान व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

४. ख्रिस्ती श्रद्धेमुळे ज्या ज्या लोकांवर अन्याय, अत्याचार होत आहेत, त्यांना ख्रिस्ती श्रद्धेशी एकनिष्ठ राहण्यासाठी प्रभूचा कृपाशिर्वाद मिळावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

५. सर्व पत्रकारांनी त्यांचे कार्य करीत असता नैतिकता व सत्यता ह्यांनी प्रेरित व्हावे आणि सामान्य शोषित जनतेसाठी ते प्रवक्ते बनावेत म्हणून प्रार्थना करूया.

६. थोडावेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.



No comments:

Post a Comment