Monday, 4 April 2022

Reflection for the Good Friday (15/04/2022) By: Dn. Brian Motheghar.



शुभ-शुक्रवार




दिनांक: १५/०४/२०२२

पहिले वाचन: यशया ५२:१३-५३:१२.

दुसरे वाचन: इब्रीलोकांस पत्र ४:१४-१६, ५:७-९.

शुभवर्तमान: योहान १८:१-१९:४२.




प्रस्तावना:

आज शुभ शुक्रवार! येशूच्या दु:खसहनाचा दिवस! आजच्या दिवशी येशूने मानवजातीला पापमुक्त करण्यासाठी दु:खदायक यातना सोसून क्रुसावर प्राणार्पण केले, म्हणूनच शुभ-शुक्रवार हा महान आणि अतिपवित्र दिवस म्हणून गणला जातो. आजच्या पहिल्या वाचनात यशया संदेष्टा सेवक गीताद्वारे ख्रिस्ताच्या दु:खप्राय यातना व मरणाचे भाकीत करतो. आपणा सर्वांचे पाप अंगीकारून, तो आपल्या अपराधांमुळे घायाळ झाला, आपल्या दुष्कर्मांमुळे ठेचला गेला व त्याला बसलेल्या फटक्यांनी आपणास जीवन प्राप्त झाले. प्रभू येशूने आपल्या पापांचे ओझे स्वतःवर लादून आपणाला पापातून मुक्त केले.

आजचे दुसरे वाचन आपणास जाणीव करून देते की, प्रभू येशू ख्रिस्त हा उत्कृष्ट प्रमुख याजक आहे, कारण तो परीपूर्ण आणि पूर्णपणे मानव आहे. येशूने क्रुसावरील वेदनादायक मृत्यूद्वारे अनंतकालीक तारण आणले. त्याद्वारे त्याने देवाला आपल्याजवळ आणिले व आपणाला देवाजवळ नेले.

शुभवर्तमानातील येशूचे दु:खसहन आणि यातनादायक मरण फार प्रभावी आणि प्रेरणादायी आहे. काळाच्या पूर्णतेस जगाचा तारणारा वधस्तंभी खिळला गेला. देवाचा पुत्र पापी मनुष्यासाठी मरण पावला आणि देवाची बिनशर्त क्षमा बहाल केली. आज आपण प्रभू येशूचे दु:खसहन व मरण ह्यावर चिंतन करीत असताना आपल्यालाही येशूप्रमाणे क्षमा करता यावी म्हणून आजच्या उपासनेमध्ये आपण येशूकडे प्रेरणा व कृपा मागूया.

 



मनन चिंतन:

|| ओ क्रुसा सलाम तुला

वंदन अमुचे हे तुला

भजतो पापी मी तुला ||

वधस्तंभ हे ख्रिस्ती जीवनाचे एक प्रतिक आहे. हे प्रतिक जगाला ख्रिस्ताच्या अतिमौल्यवान प्रेमी त्यागाची आठवण करून देते. ह्या प्रेमाखातर प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या स्वताःच्या जीवाचा त्याग केला, आणि मृत्यूद्वारे मानवजातीवर आपले प्रेम व्यक्त केले. संत पौल १ करिंथ. १:२३ मध्ये म्हणतात की, “आम्ही तर वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवितो.” शिवाय प्रेषित पुढे १ करिंथ १:१८ मध्ये म्हणतो की, “कारण ज्यांचा नाश होत आहे त्यांना वधस्तंभाविषयीचा संदेश मूर्खपणाचा आहे; पण ज्यांना तारण प्राप्त होत आहे अशा आपणांस तो देवाचे सामर्थ्य असा आहे.” संत पौलाने हा संदेश यहुदी लोकांना संबोधित केला होता; जे वधस्तंभाला गुन्हेगारांचे ओझे आणि पापियांसाठी शिक्षा म्हणून पाहत होते (अनुवाद २१:२०-२३). त्यामुळे, वधस्तंभावर खिळलेल्या एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवणे हे त्यांना योग्य वाटत नसे. तर दुसरीकडे ग्रीक लोकं जी त्या कालीन प्रसिद्ध विचारवंत आणि नामांकित तत्वज्ञांनी होते; त्यांना हा वधस्तंभ म्हणजे मूर्खपणाचे लक्षण म्हणून वाटत होते. त्यांच्या सर्व ज्ञानात त्यांना हेच समजून आले नाही की, देव आपली महानता प्रकट करण्यासाठी एका ‘मूर्ख गोष्टीचा’ उपयोग कसा काय करू शकतो?

पूर्वेदेशातील ख्रिस्तसभेचे (Eastern Church) मठवासी स्टुडाइटचे संत थिओडोर ह्यांनी जुन्या करारात आपल्याला वधस्तंभ (क्रुस) कुठे आढळतो ह्याविषयी सांगतांना ते सांगतात की, पहिल्या प्रथम आपल्याला अब्राहम आणि इसाकाच्या दृष्टांतात वधस्तंभ (क्रुस) आढळतो; तो म्हणजे अब्राहामाने रचलेल्या लाकडाच्या ढिगाऱ्यावर क्रुसाची पहिली प्रतिमा आपल्याला आढळते (उत्त्पती २२). दुसरे म्हणजे नोहाचे तारू ज्यात त्याचे कुटुंब व सर्व प्राण्यांची प्रजाती प्रलयापासून वाचली गेली (उत्त्पती ६-७). तसेच संत थिओडोर मोशेच्या लाकडी काठीत सुध्दा वधस्तंभाची प्रतिमा पाहतात. ज्या काठीद्वारे नाईल नदीचे पाणी रक्तात बदलले (निर्गम ७:१४-२५), मिसारच्या खोट्या जादूगारांच्या सापांना ज्या काठीने खाऊन टाकले (निर्गम ७:८-१३), इस्त्रायली लीकांच्या तारणासाठी तांबड्या समुद्राचे विभाजन केले (निर्गम १४:२१-३१). शिवाय ते म्हणतात की, आपणाला अहरोनच्या काठीत क्रुसाचे संकेत दिसतात जिथे एकाच दिवशी फुललेल्या काठीत त्याला खरे याजकपण दिसले होते (गणना १७:८).

हा वधस्तंभ आज आपल्याला ख्रिस्ती ह्या नात्याने एक संदेश देत आहे. आपण जे ह्या जगात अनेक अशा जागतिक संकटांना, परीक्षांना सामोरे जातो, त्यात आपल्याला एक विश्वासी अर्थ म्हणून प्रेमाचे, विजयाचे प्रतिक किंवा दीपस्तंभ म्हणून आपल्या सामोर उभे राहते. बेन सिरा यांची बोधवचने २:१ मध्ये आपल्याला सांगण्यात आले आहे की, “माझ्या मुला, परमेश्वराची सेवा करण्यास तू प्रेरित झाला असशील, तर सत्वपरीक्षेस सिद्ध रहा.” संकटे आणि परीक्षा ह्या गोष्टी तारणप्राप्ती आणि विजय ह्यांचा एक अपरिहार्य मार्ग आहे. येशू ख्रिस्ताने ही वस्तुस्थिती आपल्या शिषांना स्पष्टपणे सांगितली होती जेव्हा त्याने त्याच्या शिषांना सांगितले की, “माझ्यामागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर त्याने स्वतःचा त्याग करावा व आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे” (मत्तय १६:२४).

वधस्तंभ आपल्याला त्या टांगलेल्या व्यक्तीमध्ये म्हणजेच ख्रिस्तामध्ये त्याच्या त्यागमय प्रेमाची आठवण करून देते. हे त्याच्या प्रेमाचे एक स्पष्ट उदाहरण आहे, आणि एक ऐतिहासिक पुरावा सुद्धा आहे, की त्याने आपल्या पापांसाठी आपले प्राण बहाल केले, आणि ह्याद्वारे आपल्याला एक नवीन शिकवण देऊन आव्हान सुद्धा केले आहे की, तुम्ही सुद्धा आपल्या बंधू आणि भगिनींसाठी असेच करा. “आपल्या मित्रांकरिता (बंधू आणि भगिनींकरिता) आपला प्राण द्यावा ह्यापेक्षा कोणाची प्रीती मोठी नाही” (योहान १५:१३), “ख्रिस्ताने आपल्याकरिता स्वतःचा प्राण अर्पिला ह्यावरून आपल्याला प्रीतीची जाणीव झाली आहे; तेव्हा आपणही आपल्या बंधू-भगिनींकरिता स्वतःचा प्राण अर्पिला पाहिजे” (१ योहान ३:१६).

ख्रिस्तसभेचे काहि पुरातन धर्मपंडित वधस्तंभाच्या चार बाजूंना ख्रिस्ताच्या प्रेमाचे प्रतिक देत खालीलप्रमाणे त्यांची समज देतांना ते म्हणतात की, “वधस्तंभाची उभी बाजू ही परमेश्वराच्या आणि ख्रिस्ताच्या प्रेमाची उंची आणि खोली किती आहे हे दर्शवितात. तसेच आडवी बाजू त्याच्या प्रेमाची रुंदी आणि मोठेपणा दर्शवितात.” ह्यांचे हे स्पष्टीकरण संत पौलाच्या शब्दांनी सहज जुळले जाते; जेव्हा संत पौल इफिसकरांस प्रार्थनेत सांगतात की, “ख्रिस्ताने तुमच्या अंत:करणामध्ये तुमच्या विश्वासाच्याद्वारे वस्ती करावी; ह्यासाठी की, तुम्ही प्रीतीत मुळावलेले व पाया घातलेले असे असून तिची रुंदी, लांबी, उंची व खोली किती, हे तम्ही सर्व पवित्र जनांसह समजून घ्यावयास व बुद्धीस अगम्य अशी ख्रिस्ताची प्रीती ओळखून घ्यावयास शक्तिमान व्हावे; असे की तुम्ही देवाच्या सर्व पूर्णतेइतके परिपूर्ण व्हावे” (इफिस. ३:१७-१९).

वधस्तंभाचा संदेश हा एक विरोधाभास आहे. कारण, तो स्वतःला नाकबूल करतो, परंतु ह्याच्या विसंगतात एक अंतर्भूत सत्य आढळते; ते म्हणजे मृत्यूत नवीन जीवन उगवते. ह्याद्वारे आपल्याला समजून येते की, जे नकारात्मक आहे ते सकारात्मकात त्याचे परिवर्तन कसे होत असते. तसेच, दुःख आणि वेदना ह्यात आपल्याला अकल्पनीय आशिर्वाद मिळत असतो. येथे ह्या संदर्भात आपल्याला समजून येते की, वधस्तंभ जो ग्रीक, यहुदी आणि मिसरी लोकांना एक मृत्यूचे झाड वाटत होते ते आता नवजीवन देणारे वृक्ष बनले आहे. उत्पत्तीच्या पुस्तकात आपण वाचतो की, एका निषिद्ध झाडाच्या फळाने आदामाने जगात पाप आणले, परंतु नवीन व्यवस्थामध्ये, एका नवीन झाडाने नवीन आदामाचे वैभव आणले आहे, अर्थात ख्रिस्ताचे वैभव आणले आहे. हे असे झाले कारण, त्याच्या वधस्तंभाद्वारे त्याने जगाची पूर्तता केली आहे. ह्या वाक्यप्रचाराद्वारे असे समजून येते की, वाईटाने चांगल्यावर तात्पुरता विजय मिळविला आहे परंतु, ख्रिताच्या चांगुलपणात त्याने वाईटावर सार्वकालिक विजय मिळविला आहे. प्रेषितांनी वधस्तंभावर त्यांच्या यशाचे रहस्य पाहिले आणि म्हणून संत पौल उद्गारतो की, “आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या वधस्तंभाच्या अभिमानाशिवाय कशाचाही अभिमान बाळगणे माझ्या हातून न होवो; त्याच्याद्वारे जग मला वधस्तंभावर खिळलेले आहे व मी जगाला वधस्तंभावर खिळलेला आहे” (गलती. ६:१४).

शुभ-शुक्रवार हा येशू ख्रिस्ताच्या अतोनात यातनादायक दुःखसहन आणि मृत्यूवर विचार करून आपल्या जीवनाला नवीन अर्थ प्राप्त करण्याचा दिवस आहे. हा दिवस सुद्धा आपल्याला ख्रिस्ताच्या घायांवर किंवा जखमांद्वारे आपल्याला कशा प्रकारे आरोग्य प्राप्त झाले आहे, आणि तसेच ख्रिस्ताच्या मरणाने आपल्या सर्वांना सार्वकालिक जीवनाचे वतन कसे प्राप्त झाले आहे ह्यावर सुद्धा मनन चिंतन करण्यासाठी ख्रिस्तसभा ही वेळ आपल्याला देत आहे. ज्याप्रमाणे ख्रिस्ताचे मानवी देहधारण आणि पुनरुत्थान ह्यांना ख्रिस्ती तारण प्राप्तीच्या इतिहासाच्या अर्थव्यवस्थेत महत्वाचे मार्गदर्शकतेची खूण म्हणून समजले जाते, त्याचप्रमाणे ख्रिस्तसभेत वधस्तंभाला अभिमानाचे स्थान दिले गेले आहे. पुनरुत्थानाची आशा ही ख्रिस्ताच्या यातनादायक दुःखसहन आणि मरणाला अर्थ देत असतात आणि हेच आपण आजच्या शुभ-शुक्रवारी स्मरण करत असतो. म्हणूनच वधस्तंभ हे आपल्यासाठी एक आशेचे प्रतिक बनले आहे आणि हेच आशेचे प्रतिक आपल्याला आजच्या दिवशी हाच संदेश देत आहे की: क्रूसाशिवाय मुकुट नाही; मुकुटाशिवाय क्रूस नाही; मृत्यूशिवाय जीवन नाही आणि दुःखाशिवाय आनंद नाही. जीवनात वेदना नाहीत तर नवजीवनाला अर्थ नाही.

|| दिशा दिशांतुनी येशू पहातो,

क्रुरसावरी पुन्हा, क्रुरसावरी उभा,

आनंद उजळीतो भास्कर देतो प्राचीवरी जसा,

प्रभूची माया कृपेची छाया पथिक सुखावतो || 




No comments:

Post a Comment