आज्ञा
गुरुवार
दिनांक: १४/०४/२०२२
पहिले वाचन:
निर्गम १२:१-८, ११-१४
दुसरे वाचन: १
करिंथ. ११:२३-२६
शुभवर्तमान: योहान
१३:१-१५
प्रस्तावना:
प्रिय बंधुजनहो, आजच्या उपासनेमध्ये तीन
गोष्टी प्रामुख्याने साजऱ्या केल्या जातात. त्या म्हणजे, १) पवित्र मिस्साबलीची स्थापना, २) धर्मगुरूपदाची स्थापना, आणि ३) प्रेमाची नवीन आज्ञा.
आपण पवित्र आठवड्यामध्ये पदार्पण केले आहे. आणि पुढचे तीन दिवस आपण येशूचे
दुःख, मरण, व पुनरुत्थान हे जवळून
अनुभवणार आहोत. आजच्या
पहिल्या वाचनाद्वारे मेंढराचे रक्त शिंपडल्यावर देवाच्या
लोकांची रक्षा कशाप्रकारे होते हे आपण ऐकणार आहोत. तर, दुसरे वाचन आणि शुभवर्तमान ह्याद्वारे आपण पहिल्या वचनातील मेंढराचे स्थान हे प्रभू येशू ख्रिस्त
स्वतः घेऊन आपल्या प्राणाची आहुती देण्यापूर्वी आपल्या बलिदानाची पूर्वकल्पना शिष्यांना देतो. मृत्यूला न डगमगता, धैर्याने व नम्रतेने आपल्या
स्वर्गीय पित्याची इच्छा जाणून घेऊन येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांसमवेत शेवटचे सहभोजन घेतो. या सहभोजनाच्या वेळी प्रेमाची एक
नवीन आज्ञा आज या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त आपल्या समोर ठेवत आहे.
त्याच्या प्रेमाचा स्वीकार करून आपण आपल्या जीवनामध्ये
नेहमी इतरांवर प्रेम करावे आणि देवाच्या आज्ञेमध्ये राहून नेहमी इतरांची सेवा करावी म्हणून आजच्या मिस्साबलिदानामध्ये विशेष प्रार्थना करूया.
मनन चिंतन:
ख्रिस्तामध्ये उपस्थित माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो प्रस्तावनामध्ये वाचल्याप्रमाणे आजच्या उपासनेचे तीन महत्त्वाचे पैलू आपण पाहणार आहोत
१)
पवित्र मिस्साबलीची स्थापना
२)
धर्मगुरूपदाची स्थापना
३)
प्रेमाची नवीन आज्ञा
मत्तय (२६:२६) मार्क (१४:१४) आणि लुक (२२:१४) मध्ये आपण येशूचे त्याच्या बारा शिष्यांबरोबर शेवटचे सहभोजन ह्याविषयी वाचतो. आणि त्याद्वारे
आपणास कळते की, येशूला पूर्वकल्पना होती की, त्याच्या बारा शिष्यांपैकी एक म्हणजेच यहूदा इस्कारियट हा येशूचा विश्वासघात करणार होता. परंतु येशू मरणाला न घाबरता किंवा जुदासाचा धिक्कार न करता, एक आगळे-वेगळे कृत्य करून स्वतःविषयी
आणि स्वर्गीय पित्याविषयी एक अलग ओळख निर्माण करून दाखवतो.
योहानाचे एकमात्र शुभवर्तमान आहे, ज्यामध्ये आपण येशू शेवटच्या
सहभोजनाच्या वेळी आपल्या शिष्यांचे पाय धुतो असे वाचतो. येशूच्या ह्या कृत्याद्वारे येशू
त्याच्या शिष्यांना आणि सर्व जगाला जणूकाही सेवेचा, प्रेमाचा कानमंत्र देत आहे.
आजच्या पहिल्या वाचनामध्ये आपण वाचतो ,की परमेश्वर मोशे आणि अहरोनला परमेश्वराच्या आज्ञेनुसार पालन करणाऱ्या लोकांच्या दारावर कोकरुचे रक्त
शिंपडायला सूचित करतो. जेणेकरून, त्या शिंपडलेल्या रक्ताद्वारे देवाचा आत्मा त्यांचे रक्षण करील व त्यांचे मृत्यूपासून संरक्षण होईल.
दुसरे वाचन आणि शुभवर्तमान हे प्रभू येशू ख्रिस्ताच्या बलिदानाची पूर्वकृत्य आपण समोर ठेवत आहेत. प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या मरणाच्या काही
क्षणापूर्वी स्वतःचे शरीर व रक्त आपणा सर्वांसाठी समर्पित करीत आहे. त्याद्वारे पवित्र मिस्साबलीची स्थापना व धर्मगुरूपदाची स्थापना करून आपणास
त्याप्रमाणे जीवन जगण्यास आमंत्रित करत आहे. पवित्र मिस्सा हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. ख्रिस्ती जीवनाचा उगम आणि शेवट हा पवित्र मिस्साबलिदानाद्वारे अनुभवायला मिळतो. त्यामुळेच आपण आपल्या जीवनामध्ये पवित्र मिस्साबलिदानाला महत्त्वाचे स्थान देणे महत्त्वाचे आहे.
तसेच प्रभू येशू ह्या वेळेला धर्मगुरूपदाची देखील स्थापना करत आहे. धर्मगुरूपद हे वडिलोपर्जित मिळालेला वारसा नसतो. धर्मगुरुपद ही एक देवाची हाक, देवाची योजना आहे. आजची परिस्थिती पाहता आपल्या लक्षात
येते की, पुष्कळ कमी मुलं-मूली ही देवाच्या हाकेला
होकार देण्यासाठी पुढे सरसावत असतात. आजच्या तरुण पिढीला देवाच्या कामासाठी पुढे करणे, आणि पूर्णपणे पाठिंबा देणे हे आपणा सर्वांचे आद्य कर्तव्य आहे. कारण, आजची तरुण पिढी ही ख्रिस्ती धर्माचे महत्त्वाचे स्तंभ आहेत. त्यामुळेच जर स्तंभ मजबूत असतील तर ख्रिस्तसभा मजबूत राहील. नाहीतर, तिला तडा जाऊन विस्कळीत
होण्यासाठी वेळ लागणार नाही.
आजच्या शुभवर्तमानाद्वारे आणखी एक महत्त्वाचा संदेश मिळतो, तो म्हणजे प्रेमाचा. येशू हा गुरू असून आपल्या शिष्यांचे पाय धुवतो. आजवर अनेक असे गुरु होऊन गेले ज्यांनी त्यांच्या शिष्यांकडून स्वतःची सेवा करून घेतली, स्वतःचे पाय धुऊन घेतले. परंतू, येशू ख्रिस्त हा एकमेव असा गुरु होता, ज्याने आपले मस्तक आपल्या
शिष्यांच्या पायाशी ठेवले, आणि सिद्ध करून दाखविले की, जो स्वतःला इतरांसमोर झुकवितो तो उंचावीला जाईल. याद्वारे आपणा सर्वांना हाच उपदेश मिळत आहे की, आपणा सर्वांना जर मोठे व्हायचे असेल तर इतरांपुढे
नम्र होणे हे महत्त्वाचे आहे. आणि जर आपल्याला नम्र व्हायचे
असेल, तर आपल्यामध्ये प्रेम असणे हे महत्त्वाचे आहे. कारण, प्रेमाने सर्व जग जिंकता येते. आजचे जग हे प्रेमासाठी आतुरलेले आहे.
आज सर्वत्र भितीचे वातावरण पसरलेले आहे. एका ठिकाणी कोरोनाची लाट, तर दुसऱ्या दिशेला देशा-देशांतील युद्धे. माणूस हा आपल्या
स्वार्थात इतका वेडा होत चालला आहे की, दुसऱ्यांचा जीव हा जणू एक खेळच झाला आहे. झाडावरील कोमेजलेली पाने जशी गळतात त्याचप्रमाणे लोक
एकमेकांचे जीव घेत आहेत.
अशा या विस्कळीत वातावरणामध्ये शांती प्रस्थापित करण्यासाठी लागणारे धैर्यमय
जीवन जगण्यासाठी आपणा सर्वांना कृपा लाभावी म्हणून परमेश्वराकडे
प्रार्थना करूया.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: “हे प्रभू आमची प्रार्थना ऐक व
तुझी सेवा करण्यास आम्हांला प्रेरित कर.”
१.
ज्या प्रमाणे ख्रिस्ताने आपल्या शिष्यांचे पाय धुवून एक आदर्श सेवेचा महामंत्र
दिला, त्याचप्रमाणे पोप सर्व महागुरू व
धर्मगुरू ख्रिस्तसभेची सेवा करुन आपल्या समोर सेवामय जीवन जगुन एक आदर्श ठेवत
आहेत. ख्रिस्ताप्रमाणे त्यांनी ख्रिस्तसभेची सेवा अखंडित करत असता आपणास
त्यांच्यात ख्रिस्त दिसावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
२.
सर्व जगातील ख्रिस्ती व विविध पंथातील लोकांनी जरी आपण वेगवेगळ्या पंथाचे असलो
तरी ख्रिस्ताने दिलेला सेवेचा मूलमंत्र अंगीकारून तो आपल्या दैनंदिन जीवनात
आत्मसात करावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
३.
आपल्या सर्व भारत देशवासीयांनी ख्रिस्ताप्रमाणे बंधू-प्रेमाची भावना जोपासून
आपापसातील असलेले वाद, गैरसमज
विसरून शांती व सलोख्याने एकत्रीत जीवन जगावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
४.
आपल्या मुलांना ख्रिस्ताने केलेल्या सेवेची ओळख व्हावी व त्यांनीही
प्रभूसेवेसाठी देवाच्या हाकेला प्रतिसाद देऊन त्याच्या लोकांची सेवा करण्यासाठी
स्वखुशीने पुढे यावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
५.
थोडा वेळ शांत राहून आता आपण आपल्या सामाजिक, कौटुंबिक व वैयक्तिक गरजांसाठी प्रार्थना करूया.
No comments:
Post a Comment