Wednesday, 13 April 2022

 Reflection for the Sunday of Easter (Morning Mass) (17/04/2022) By: Br. Aaron Lobo.




पास्काचा सण 

(सकाळची मिस्सा)




दिनांक: १७/०४/२०२२.

पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये १०:३४अ, ३७-४३.

दुसरे वाचन: कलस्सैकरांस पत्र ३:१-४.

शुभवर्तमान: योहान २०:१-९.




प्रस्तावना:

|| ख्रिस्त आज विजयी झाला,

मरणा जिंकुनी या उठला.||

ह्या विजयी-तुताऱ्याच्या गीताद्वारे, पवित्र ख्रिस्तसभा आज पास्काचा सण साजरा करीत आहे. ह्या दिवशी आपण प्रभू येशू ख्रिस्ताने, मरणावर मिळविलेल्या विजयात आणि त्याच्या आनंदात सहभागी होत आहोत. आपल्या पुनरुत्थानाद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या स्वतःच्या मृत्यूवर विजय प्राप्त केला, आणि आपल्याला सार्वकालिक जीवनाचे वारसदार बनविले. ख्रिस्ताचे पुनरुत्थान म्हणजे अंधकारावर, अन्यायावर, व जगातील सर्व वाईट गोष्टींवर येशूने मिळविलेला विजय होय.

प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकातून घेतलेल्या आजच्या पहिल्या वाचनात, प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला आहे ह्या शुभवार्तेची साक्ष संत पेत्र देत आहे. तसेच, येशूने दिलेल्या आज्ञे प्रमाणे आपणास पुनरुत्थित ख्रिस्ताचे साक्षीदार होण्यास व त्याच्यावर विश्वास ठेवण्यास संत पेत्र आपल्याला सांगत आहे. ह्याच विश्वासाद्वारे आपल्याला आपल्या पापांची क्षमा मिळाली आहे.

आजच्या दुसऱ्या वाचनात, आपणाला, या जगातील गोष्टी क्षणभंगुर व व्यर्थ आहेत असा संदेश संत पौल देत आहे. ख्रिस्तावरील आपला विश्वास हा सर्व श्रेष्ठ आहे. जो ख्रिस्तावर आपले संपूर्ण जीवन केंद्रित करतो, तो मेला तरी जगेल व त्याच्या गौरवात प्रगट होईल असे संत पौल आपल्याला सांगत आहे.

आजच्या शुभवर्तमानात संत योहान पुनरुत्थानाविषयेच्या घटनेचे वर्णन करीत आहे. पास्काच्या रविवारी, पहाटे मरीया मग्दलीया, प्रभू येशूच्या कबरेजवळ पोहचते व ती रीकामी पाहून आश्चर्यचकित होते. ती रीकामी कबर व येशू ख्रिस्ताचे व्यवस्थीत गुंडाळलेली प्रेतवस्त्रे पाहून, पेत्र व येशूचा प्रिय शिष्य येशूच्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवतात.

पुनरुत्थानाद्वारे प्रभू येशू, आत्म्याने भरलेल्या, नवजीवनात उठला. ह्या मिस्साबलिदानात सहभाग घेत असताना, आपण सुद्धा आपल्या परमेश्वराबरोबर मरणास तयार असावे व त्याद्वारे त्याच्या पुनरुत्थानात सहभागी व्हावे, म्हणून प्रार्थना करूया.

 


मनन चिंतन:

पास्काचा सण हा ख्रिस्ती धर्मात साजरा केल्या जाणाऱ्या सर्व सणांपैकी सर्वात श्रेष्ठ व अत्यंत महत्वाचा सण आहे. खर पाहिले तर, आपला ख्रिस्ती धर्म म्हणजे, प्रभू येशू ख्रिस्ताचे पुनरुत्थान आहे. आणि हाच आपल्या ख्रिस्ती धर्माचा पाया आहे. आपल्या देशात इतर दुसरे धर्म सुद्धा उपस्थित आहेत. परंतु, त्या सर्वांपैकी आपल्या ख्रिस्ती धर्माची जी गोष्ट विलक्षणीय ठरते ती म्हणजे, आपल्या प्रभू ख्रिस्ताचे दुखःसहन, त्याचे मरण व त्याचे पुनरुत्थान.

सर्व धर्म आपआपल्या देवाला श्रेष्ठ मानतात, व महानतेची पदवी देतात. परंतु, आपला प्रभू येशू एकुलता-एक असा देव आहे, जो आमच्या तारणासाठी ह्या भूतलावर, आपल्या प्राणाचे बलिदान करण्यासाठी जन्माला आला. आपल्या प्रेमासाठी त्याने अतिशय कष्ट सहन केले. तेच प्रेम जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचवण्यासाठी पुनरुत्थित होऊन आपल्या शिष्यांमध्ये उपस्थित झाला. आज सुद्धा तो आपल्या सर्वां बरोबर हजर आहे.

गेले चाळीस दिवस आपण सर्वांनी अनेक प्रकारचे पथ्य, त्याग व उपवास केले असतील. ते आपण आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या, दुःखात व मरणात, त्याला साथ देण्यासाठी केले आहेत. तेच त्याग व उपवास आज आपल्याला फळदायक ठरले आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताचे पुनरुत्थान आपल्या सर्वांच्या जीवनात, आत्म्याने भरलेली एक नवजीवनाची भेट आहे.

ख्रिस्ताचे पुनरुत्थान, ही पवित्र शास्त्रात लिहलेली एक बोधकथा नाही. तर, पुनरुत्थान हे एक ऐतिहासिक सत्य आहे. परंतु ह्या सत्याची खरी समज व ओळख प्राप्त करण्यासाठी, सर्व प्रथम आपल्याला आपल्या पापांची जाणीव झाली पाहिजे व त्यांच्यावर पश्चाताप करून  एक नूतनीकरणाचे जीवन आपण जगलो पाहिजे. पापांच्या सहवासात राहण्याची निवड, म्हणजेच ख्रिस्ताच्या प्रेमाचा अज्ञानपणा व त्याचा बहिष्कार करणे. पुनरुत्थानाचा खरा अर्थ हाच की, आपण आपल्या पापी जीवनाचा त्याग करणे, वाईट मार्ग सोडून देणे, आणि ख्रिस्ताने शिकविलेल्या प्रेमरुपी जीवनाचे अवलंबन करणे.

आज जर आपण जगात पाहिले तर, सर्वठिकाणी संघर्ष, युध्द, अन्याय, दुःख, पीडा, रोगराई व इतर सामाजिक दुर्दैव दिसून येते. युक्रेन व रशिया मधली युध्द, श्रीलंकेवर पडलेले आर्थिक संकट, व आपल्याच देशात चालेले चढ-उतार, इत्यादी ह्या सर्व समस्यांवर येशू आपल्या पुनरुत्थानाद्वारे, आपल्या प्रेमाद्वारे विजय मिळवतो, आणि सर्वांसाठी एक आशेचा किरण बनून चमकत राहतो. परिस्थिती कितीही अवघड असली, तरीही, आपला देव सदैव आपल्या बरोबर आहे. तो आपणाला त्याच्या पुनरुत्थित जीवनाकडे वाटचाल करण्यास मार्गदर्शन करत असतो.

जेव्हा येशूला वधस्तंभावर खिळले होते, त्या वेळेस त्याच्या अवती-भवती तीन प्रकारच्या व्यक्ती हजर होत्या. पहिल्या प्रकारची व्यक्ती म्हणजे, जे बेपर्वा करणारे, निव्वळ प्रेक्षक म्हणून हजर होते. ह्या प्रकारच्या व्यक्ती फक्त कालवरी डोंगरावर चाललेला प्रसंग मनोरंजनस्पर पाहण्यास आले होते. दुसऱ्या प्रकारची व्यक्ती जी हजर होती ती म्हणजे, येशू ख्रिस्ताच्या दुःखात त्याचे सहभागीदार होते. विशेषतः त्याच्या बरोबर खिळलेले ते दोन चोर. या व्यक्तींना येशू ख्रिस्ताच्या दुःखाचे, निर्दोषीपणाचे व त्याच्या दैविपनाची जाणीव झाली होती. तिसऱ्या प्रकारची व्यक्ती जी हजर होती ती म्हणजे, जे त्याच्या प्रेमात गुंतलेले होते, आणि ह्या व्यक्ती शेवटपर्यंत म्हणजेच, त्याच्या मरणाच्या आगदी शेवटच्या क्षणा पर्यंत त्याच्या सोबत होत्या. विशेषकरून माता मरिया, मरिया मग्दलीया व संत योहान. ह्या शेवटच्या व्यक्ती ख्रिस्तावरील असलेल्या त्यांच्या विश्वासात शेवट पर्यंत दृढ राहिल्या. ज्या प्रकारे त्यांनी ख्रिस्ताच्या दुःखाचा व मरणाचा अनुभव घेतला, त्याच प्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना आपल्या पुनरूत्थानाचा अनुभव दिला.

आज आपण पास्काचा सण साजरा करीत असताना, आपल्या समोर सुद्धा ह्या तीन प्रकारच्या व्यक्तींची स्थिती ठेवण्यात आली आहे, आणि त्याच्यातून आपल्याला कोणा एकाची निवड करणे गरजेचे आहे. ज्या प्रकारे आपण आपले जीवन जगतो, त्याद्वारे आपल्याला दिसून येते की, आपण कुठला पर्याय निवडला आहे. पाप करत राहणे व त्यावर पश्चाताप न करणे, म्हणजे ख्रिस्ताच्या बालीदानाविषयी फक्त एक प्रेक्षक म्हणून त्याच्या मरणाची थट्टा-मस्करी करणे होय. ह्या पर्यायात अशा व्यक्तींना ख्रिस्ताच्या पुनरूत्थानाचा अनुभव लाभणे अशक्य आहे. त्याच्या पुनरूत्थानाचा खरा अनुभव त्यांनाचं प्राप्त होतो, जे त्याच्यावरील असलेल्या आपल्या विश्वासात दृढ राहतात आणि त्याच्यावरील आपला विश्वास दिवसेंदिवस बळकट करत असतात. अशा प्रकारे ह्या व्यक्ती ख्रिस्ताच्या दुःखात सहभागी राहतात, आणि त्याच्या प्रेमाद्वारे आपल्या वाईट जीवनाला तिलांजली देत असतात.

ह्या मिस्साबलिदानात सहभागी होत असतांना आपण विशेषकरून प्रार्थना करूया की, आपण सुध्दा प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखात, त्याच्या मरणात, व त्याच्या पुनरुत्थानात सदैव त्याचे सहभागी बनू आणि आपल्या विश्वासात वाढत राहू.

 

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: “हे परमेश्वरा दया कर, आणि तुझ्या लोकांची प्रार्थना ऐक.”

१.     आपले पोप महाशय फ्रान्सिस, बिशप्स, धर्मगुरू, धर्मबंधू-भगिनी आपल्या कार्याद्वारे आपल्या लोकांना आणि स्वतःच्या जीवनात नवजीवनाचा अनुभव यावा म्हणून कष्ट घेतात. त्यांच्या कार्यात पुनरुत्थित येशू ख्रिस्ताच्या कृपेने यश लाभावे म्हणून प्रार्थना करूया.

२.     ख्रिस्ताच्या मळ्यात काम करण्यास तरूण-तरुणींनी पुनरुत्थित ख्रिस्ताच्या आदर्शातून पाचारण घडावे म्हणून आपण प्रभूचरणी प्रार्थना करूया.

३.     आपल्या धर्मग्रामातील गरजवंत, आजारी व एकाकी लोकांना पुनरुत्थित ख्रिस्ताचा आधार मिळावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

४.     राष्ट्रा-राष्ट्रांमधील, देशांतर्गत विशेष करून रशिया आणी युक्रेन मध्ये चाललेले वाद व हिंसाचार निवळावे, आपण सर्व एकाच देवाची लेकेरे आहोत ही ऐक्य भावना वाढीस लागावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

५.     आता आपण आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजीक हेतूसाठी प्रार्थना करूया. 




“पास्काच्या सणाच्या तुम्हांस आणि तुमच्या कुटुंबियांस हार्दिक शुभेच्छा!!!”


No comments:

Post a Comment