Wednesday 15 June 2022

Reflection for THE MOST HOLY BODY AND BLOOD OF THE LORD (19/06/2022) by Fr. Baritan Nigrel






 

ख्रिस्ताच्या अतिपवित्र शरीर व रक्ताचा सोहळा



दिनांक: १९-६-२०२२

पहिले वाचन: उत्पत्ती १४: १८-२०

दुसरे वाचन: १ करिंथ ११:२३-२६

शुभवर्तमान: लुक ९:११-१७


प्रस्तावना:

    आज ख्रिस्तसभा प्रभू येशु ख्रिस्ताच्या अतिपवित्र शरीर व रक्ताचा सोहळा साजरा करीत आहे. प्रभू येशु ख्रिस्ताने क्रूसावरील समर्पणाद्वारे स्वतःचे रक्त सांडून, मानव आणि परमेश्वर पिता ह्यांच्यामध्ये नवीन कराराची स्थापना केली. अखिल मानवजातीला सर्व पापांतून मुक्त केले.

संत पौल आपल्याला सांगत आहे की, ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे देवाने पापक्षमेचा नवा करार केला आहे. त्यामुळे देवाच्या सान्निध्यात येण्यास आपण पात्र झालो आहोत. म्हणून ख्रिस्त आपला मध्यस्थ आहे याची आठवण देऊळमाता आज आपल्याला करुन देत आहे.

प्रत्येक दिवशी ख्रिस्तशरीर संस्काराद्वारे आपण ख्रिस्ताबरोबर एकरूप होतो व ख्रिस्त आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनतो. म्हणून या मिस्साबलीदानात भाग घेत असताना, प्रभू येशु ख्रिस्ताच्या पवित्र शरीराने व रक्ताने आपले अंतःकरण पावन बनून आपण ख्रिस्तासारखे व्हावे, म्हणून देवाकडे विशेष प्रार्थना करु या.

 

मनन चिंतन:

आज पवित्र ख्रिस्तसभा जगभरात, "प्रेमाचे रहस्य" व "विश्वासाचे रहस्य" साजरा करीत आहे. आजचा हा सण प्रत्यक्षात आपल्याला विश्वासाबद्दल तीन महत्त्वाच्या बाबींचा सारांश देत आहे: प्रथम, देव मानव झाला. त्याने आम्हामध्ये वसती केली, कारण तो आमचा देव आहे. त्याने आमच्यावर एवढी प्रीती केली की, त्याने त्याचा एकुलता एक पुत्र या जगात पाठविला.. दुसरे म्हणजे, देव त्याच्या लोकांमध्ये उपस्थित राहतो; कारण आपण प्रत्येकजण बाप्तिस्माद्वारे येशू खिस्तामध्ये एक झालो आहोत. आणि तिसरे म्हणजे, भाकर आणि द्राक्षारसाच्या रूपात येशू ख्रिस्ताची उपस्थिती आपल्याला पवित्र वेदीवर उपलब्ध करून दिली जाते. येशू ख्रिस्त स्वतः पवित्र भाकर व पवित्र रक्ताने आपल्याशी एक होतो.

आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल आपल्याला आठवण करून देत आहे की, येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांबरोबर शेवटचे भोजन घेत असताना त्याने पवित्र मिस्साबलिदानाची स्थापना केली. येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील मृत्यूपूर्वी येशूने आपल्या शिष्यांबरोबर शेवटचे भोजन घेतले. या भोजनावेळी त्याने आपल्या हातात भाकर आणि द्राक्षारस घेतला, त्यांना आशीर्वाद दिला आणि आपल्या शिष्यांना देत म्हटले, “हे घ्या आणि आणि खा. हे माझे शरीर आहे…. हे घ्या आणि प्या, हे माझे रक्त आहे… हे माझ्या स्मरणार्थ करा.’

येशू ख्रिस्ताचे क्रूसावरील बलिदान ही त्याच्या प्रेमाची सर्वोच्च कृती होती. येशू ख्रिस्ताने त्याचे आपल्यावरील प्रेम त्याच्या बलिदानाने प्रकट केले. आजही येशू ख्रिस्त प्रत्येक मिस्साबलिदानामध्ये हजर असतो व आपली आध्यात्मिक भूक तृप्त करीत असतो. म्हणून संत पौल दुसऱ्या वाचनाच्या शेवटी सांगत आहे की, “जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मृत्यूची तो येईपर्यंत घोषणा करता.”

पवित्र मिस्साबलिदान हा एक असा संस्कार आहे की, ज्याच्याद्वारे येशू ख्रिस्त स्वतः त्याच्या लोकांसह कायमस्वरूपी उपस्थितीत असतो. पवित्र मिस्साबलिदानामध्ये, येशू ख्रिस्त त्याच्या नावाने एकत्रित जमलेल्या लोकसमुदायामध्ये उपस्थित असतो; परंतु सर्वात महत्त्वाचे म्हणजे, भाकर आणि द्राक्षारस ज्याचे रुपांतर त्याच्या पवित्र शरीर आणि रक्तामध्ये होते त्याच्याद्वारे तो आपल्याशी एकरूप होतो. या संस्काराचे महत्त्व दुसऱ्या व्हॅटिकन कौन्सिलने अधोरेखित केले आहे की, ‘पवित्र मिस्साबलिदान हा ‘ख्रिस्ती जीवनाचा उगम/ केंद्र आणि शिखर आहे’ (LG 11).

जुन्या करारात जेव्हा देवाने इस्राएल लोकांशी करार केला तेव्हा मोशेने धार्मिक रीतीने बळी दिलेल्या प्राण्यांच्या रक्ताने करारावर शिक्कामोर्तब केला. नव्या करारात येशू ख्रिस्ताने कालवरी डोंगरावर रक्त सांडून नवीन करारावर स्वतःच्या रक्ताने शिक्कामोर्तब करून आपल्याला त्याने देवाबरोबर एक केले. पवित्र मिस्साबलिदानामध्ये भाकर आणि द्राक्षरसाच्याच्या रूपात येशू ख्रिस्त आपल्याबरोबर राहण्यास येतो. पवित्र मिस्साबलिदानात आपण आपल्या येशू ख्रिस्ताबरोबर एक होतो. कारण आपण त्याची प्रजा आहोत. येशू ख्रिस्त म्हणतो, “स्वर्गातून खाली उतरलेली जिवंत भाकर मी आहे. ह्या भाकारीतून जो कोणी खाईल तो सर्वकाळ जगेल; जी भाकर मी देईन ती माझा देह असून ती जगाच्या जीवनासाठी आहे.” (योहान ६:५१)

आजचा हा सण आपल्याला येशू ख्रिस्ताच्या त्यागाचा आणि प्रेमाचा संदेश देत आहे. आपण सर्वजण देवाची प्रजा आहोत. येशू ख्रिस्ताने आपल्याला त्याच्या बलिदानाद्वारे एक केले आहे. म्हणून येशू ख्रिस्ताचे पवित्र शरीर व रक्त आपल्याला समुदायाचे महत्त्व शिकवते. ज्याप्रमाणे भाकर बनवण्यासाठी गव्हाचे असंख्य दाणे एकत्र केले जातात आणि वाइन बनवण्यासाठी अनेक द्राक्षे एकत्र चिरडली जातात, त्याचप्रमाणे आपण ख्रिस्ताच्या पवित्र बलिदानात एकरूप होतो. येशू ख्रिस्त मस्तक आहे आणि आपण त्याचे शरीर आहोत. आपण सर्वजण ख्रिस्तामध्ये एक आहोत.

आजचा हा सण आपल्याला आठवण करून देत आहे की, आपण प्रभू येशू ख्रिस्ताचे संदेशवाहक आहोत. येशू ख्रिस्ताचे पवित्र शरीर प्राप्त करून आपण पवित्र मरियेप्रमाणे ख्रिस्त-वाहक बनतो व ख्रिस्ताला आपल्या घरी आणि कामाच्या ठिकाणी इतरांपर्यंत पोहोचवितो.

 

 विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

आपला प्रतिसाद: हे प्रभो तुझ्या शरीर व रक्ताद्वारे आमचा विश्वास दृढ कर.

 

१. ख्रिस्तसभेची धुरा वाहणारे पोप फ्रान्सीस, कार्डिनल्स, बिशप्स, सिस्टर ब्रदर व इतर प्रापंचिक या सर्वावर देवाचा विशेष आशीर्वाद यावा व त्यांना त्यांच्या पवित्र कार्यात प्रभूचे मार्गदर्शन व कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करू या.  

२. आपल्या देशातील सर्व नेत्यांवर व अधिका-यांवर परमेश्वराचा आशिर्वाद असावा, त्यांना सत्याने आणि न्यायाने राज्यकारभार करण्यास परमेश्वराने मदत करावी तसेच सर्व वाईट वृत्तींपासून  त्यांना दूर ठेवून चांगल्या मार्गावर चालण्यास सहकार्य लाभावे म्हणून आपण प्रार्थना करू या.

३. आज आपण प्रभू येशु ख्रिस्ताच्या अतिपवित्र शरीर व रक्ताचा सोहळा साजरा करीत असताना आपण आपल्या शरीररूपी मंदिरात देवाला प्रथम स्थान द्यावे व आपले जीवन त्याच्याठायी समर्पित करावेम्हणून आपण प्रार्थना करू या.

४. आपल्या धर्मग्रामात जे दु:खीतपिडीत आहेततसेच जे असाध्य आजाराने पछाडलेले आहेत त्यांना परमेश्वरी कृपेचा अनुभव यावा व नवजीवनाची वात त्यांना दिसावी म्हणून आपण प्रार्थना करू या. 

५. आपण आपल्या वैयक्तिककौटुंबिक आणि सामाजिक हेतूंसाठी थोडावेळ शांत राहून प्रार्थना करू या.  


No comments:

Post a Comment