Reflection for the PENTECOST SUNDAY (05/06/2022) by Fr. Suhas Pereira
पवित्र आत्म्याचा सण
(पेंटेकॅास्टचा सण)
दिनांक:
०५/०६/२०२२
पहिले
वाचन: प्रेषितांची कृत्ये २:१-११
दुसरे
वाचन: १ करिंथ १२:३ब-७, १२-१३
शुभवर्तमान:
योहान २०:१९-२३
प्रस्तावना:
आज आपण पेंटेकॉस्ट म्हणजेच पवित्र आत्म्याच्या येण्याचा रविवार साजरा करत आहोत. आजच्या पहिल्या वाचनात आपण ऐकतो कि पन्नासाव्या दिवशी
प्रेषित एकत्र प्रार्थना करत असताना पवित्र आत्मा अग्नीच्या ज्वालांप्रमाणें त्यांच्यावर उतरला. प्रेषित आणि त्यांच्याबरोबरचे सर्वजण पवित्र आत्म्याने भरून गेले. आणि चमत्कार झाला. पवित्र आत्म्याद्वारे नवीन हिम्मत प्रेषीतांमध्ये संचारली आणि ते वेगवेगळ्या भाषांमध्ये पुनरुत्थित ख्रिस्ताची सुवार्ता नव्या जोमाने समाजाला देऊ लागले. ज्यांनी हि सुवार्ता ऐकली त्यांनीदेखील पवित्र आत्म्याचा अनुभव घेतला. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे ख्रिस्ती श्रद्धावंत ख्रिस्ताचे साक्षीदार बनले.
पवित्र आत्म्याद्वारे मिळणाऱ्या विविध दानांद्वारे ख्रिस्तसभा समृद्ध आणि संपन्न कशी होते याबद्दल संत पौल आपल्याला दुसऱ्या वाचनात सांगतो. देवाचा पवित्र आत्माच संपूर्ण ख्रिस्तसभेला विविध दानांनी आणि गुणांनी नटवतो आणि त्याद्वारे देऊळमातेची वृद्धी होत असते.
आजच्या शुभवर्तमानात आपण ऐकतो कि पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्त यहुद्यांच्या भीतीमुळे लपून बसलेल्या शिष्यांमध्ये आला आणि त्यांना त्याने पवित्र आत्म्याचा पूर्वानुभव दिला. स्वर्गराज्याची सुवार्ता संपूर्ण जगाला देण्याचे मिशनकार्य त्यांच्यावर सोपवले आणि पवित्र आत्मा त्यांच्यावर फुंकून त्यांना मिशनकार्यासाठी सक्षम केले आणि म्हणाला: “पवित्र
आत्मा स्विकारा”.
प्रभू येशूने प्रेषितांना आपल्या पित्याकडे जाण्यानंतर पवित्र आत्मा पाठवण्याचे जे वचन दिले होते. त्या वचनाची पूर्तता आज म्हणजेच पेंटेकॉस्ट या दिवशी पवित्र आत्म्याच्या येण्याने झाली. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेद्वारे शिष्य या जगात जीवन जगले. आपणसुद्धा आपलं जीवन प्रेम, क्षमाशीलता, बंधुभाव, सेवा या भावनेने जगण्यासाठी पवित्र आत्म्याचे सामर्थ्य आणि त्याची कृपा आणि सहवास आपल्याला सदोदित लाभावा म्हणून या पवित्र मिस्साबलीमध्ये खास प्रार्थना करू या.
मनन-चिंतन:
एक भिकारी आपल्या आयुष्याच्या शेवटच्या घटका मोजत होता आणि मृत्युशय्येवर असताना त्याने आपल्या एकुलत्या एका मुलाला आपणाकडे बोलावले आणि त्याला म्हणाला, “बाळा
माझ्याकडे तुला देण्यासाठी मौल्यवान असे काहीच नाही. माझ्याकडे फक्त एक कास्य भिक्षापात्र आहे जे मला एक श्रीमंत विधवेच्या घराच्या गोदामात मिळालेले होते. ते मी तुला देत आहे”.
आपल्या बापाच्या मृत्यूनंतर त्या मुलाने आपल्या बापाने दिलेल्या भिक्षापात्रातून भिक्षा मागणे चालू ठेवले. एके दिवशी एका सोन्याच्या व्यापाऱ्याने त्याच्या भिक्षापात्रात एक नाणे टाकले तेव्हा त्या पात्राचा आवाज ऐकून त्या व्यापाऱ्याने त्या भिक्षापात्राचं बारकाईने निरीक्षण केलं आणि त्या भिकाऱ्याला म्हणाला, “तुला
आता भिक्षा मागायची गरज नाही. कारण तुझ्या हातात असलेलं भिक्षापात्र हे सोन्याचं आहे. तू भिक्षा मागण्यात आपला वेळ आणि आपली शक्ती वाया का घालवतोस? तू तर श्रीमंत मनुष्य आहेस. कारण तुझ्या हातातील भिक्षापात्र हे कोट्यावधी रुपयांचं आहे.”
प्रिय बंधू-भगिनींनो त्या तरुण भिकाऱ्याप्रमाणे अनेक वेळा आपण ख्रिस्तीजनसुद्धा देवाने आपल्याला दिलेल्या आणि आपल्या हृदयात आणि जीवनात असलेल्या पवित्र आत्म्याचं अमर्याद आणि महान मूल्य जाणत नाहीत. म्हणूनच आजच्या या पावित्र आत्म्याच्या सणाच्या दिवशी पवित्र ख्रिस्तसभा आपल्याला बदलणाऱ्या, सामर्थ्याने भरणाऱ्या आणि पवित्र करणाऱ्या पवित्र आत्म्याच्या आपल्यातील उपस्थितीचा अनुभव घेण्यासाठी आमंत्रण देत आहे.
पहिल्या वाचनात आपण पावित्र आत्मा शिष्यांवर उतरला त्याविषयीचा वृत्तांत ऐकला. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे प्रेषित यहुदी असूनसुद्धा पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे ते विविध भाषांमध्ये बोलू शकत होते आणि त्या ठिकाणी जमलेला प्रत्येक जण प्रेषितांना स्वतःच्या भाषेत बोलताना ऐकत होता. जुन्या करारात उत्पत्तीच्या पुस्तकात आपण बाबेलच्या बुरुजविषयी ऐकतो. पृथ्वीवरील जलप्रलयानंतर सर्व लोक एकाच भाषा बोलत होते. बाबेल येथे लोकांना एकत्रित आणि संघटित होऊन स्वर्गात जाईल एवढा उंच आणि मोठा बुरुज बांधावयाचा होता. त्यांना देवापेक्षा उंच व्हायचं होत. ते गर्वाने भरलेले होते आणि देवाला मात्र त्यांनी आपल्या जीवनातून बाहेर टाकलेलं होत. परंतु देवाने मात्र त्यांच्या भाषेचा घोटाळा करून त्यांची पांगापांग केली, त्यांची भाषा एक असूनसुद्धा ते एकमेकांना समजू शकले नाहीत, आणि त्यामुळे बाबेलच्या बुरुज बांधायचा राहून गेला. जेथे जेथे आणि जेव्हा जेव्हा मनुष्य देवाला विसरून जातो आणि स्वतःला उंचावू पाहतो, जेव्हा मनुष्य देवाला आपल्या जीवनातून बाहेर टाकू पाहतो आणि स्वतःलाच देव मानू लागतो तेव्हा मनुष्याच्या जीवनात फक्त गोंधळच निर्माण होतात आणि मनुष्य
स्वतःला आणि इतरांनासुद्धा समजू शकत नाही. परंतु
आजच्या पहिल्या वाचनात मात्र आपण ऐकले कि विभिन्न भाषा बोलणारी लोके प्रेषितांचा उपदेश समजू शकत होते, कारण तो पवित्र आत्म्याचा चमत्कार होता. प्रेषितांनी आपली हृदये उघडली आणि पवित्र आत्म्याच्या दानाचा स्वीकार केला. त्यामुळे त्यांच्या जीवनाचा कायापालट झाला. प्रभू ख्रिस्ताने या जगात असताना त्यांना सांगितलेल्या सर्व गोष्टींचा उलगडा त्यांना होऊ लागला. आणि देवाने केलेल्या महत्कृत्यांचे त्यांना ज्ञान झाले.
जो मनुष्य पवित्र आत्म्याची आपलं जीवन आणि आपलं हृदय उघडतो तो मनुष्य देवाचा शब्द आणि त्याची योजना समजू शकतो. तो मनुष्य स्वतःला आणि इतरांना सुद्धा नीट समजू शकतो. जेव्हा आपण पवित्र आत्म्यासाठी आपल्या हृदयाचे द्वार उघडतो आणि त्याचा स्वीकार करतो तेव्हाच आपलं नूतनीकरण होत असते आणि ख्रिस्ताच मिशनकार्य या जगात पुढे चालू ठेवण्यासाठी आपण समर्थ बनत असतो. परंतु त्यासाठी पवित्र आत्मा आपल्या जीवनातसुद्धा सोसाट्याच्या वाऱ्यासारखा आणि अग्नीसारखा आला पाहिजे. म्हणजेच पवित्र आत्म्याच्या आपल्या जीवनातील उपस्थितीने आपण खडबडून जागे झालो पाहिजेत, आपल्या जीवनाचं नूतनीकरण आणि शुद्धीकरण झालं पाहिजे. म्हणूनच
आज आपण प्रार्थना करूया:
हे ईश्वरा, आमच्या जगाचे, आमच्या ख्रिस्तसभेचं नूतनीकरण कर, परंतु सुरुवात माझ्यापासून कर.
हे ईश्वरा आमच्या कुटुंबाची बांधणी कर, परंतु सुरुवात माझ्यापासून कर.
हे ईश्वरा तुझी शांती आमच्या पृथ्वीवर नंदू दे, परंतु सुरुवात माझ्याने कर.
हे परमेश्वरा तुझ्या प्रेमाचा आणि सत्याचा अनुभव संपूर्ण मानवजातीला येऊ दे, आणि त्याची सुरुवात माझ्यापासून होऊ दे. आमेन.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद: हे परमेश्वरा तुझा पवित्र आत्मा पाठव आणि आमचे नूतनीकरण कर
१)
हे परमेश्वरा तुझ्या ख्रिस्तसभेचं आणि ख्रिस्तीजणांचं नूतनीकरण कर आणि आम्हामधील प्रेमाची आणि श्रद्धेची भावना वाढीस लागू दे.
२)
आमच्या जगातून हिंसा आणि सुडाची भावना नष्ट कर आणि तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आमच्यातील अविश्वास आणि द्वेषाचं रूपांतर समेट आणि शांतीमध्ये होऊदे.
३)
आमच्या धर्मग्रामात, आमच्या कुटुंबात ज्या व्यक्ती आजारी आहेत त्यांना तुझ्या पवित्र आत्म्याच्या कृपेने स्पर्श कर आणि बरे कर.
४)आमच्या धर्मग्रामातील, आमच्या कुटुंबातील मरण पावलेल्या सर्व व्यक्तींना तुझ्या स्वर्गराज्यात चिरंतन शांती दे आणि अनंत तेजाने त्यांना प्रकाशित कर.
५) थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक,
कौटुंबिक व सामाजिक हेतूसाठी प्रार्थना करू या.
No comments:
Post a Comment