Thursday, 1 December 2022

 



Reflections for the homily of Second Sunday of Advent 

(04-12-2022) by: Br Rockson Dinis





आगमन काळातील दुसरा रविवार


दिनांक : ०४/१२/२०२२

पहिले वाचन : यशया ११:१-१०

दुसरे वाचन : रोमकरांस पत्र: १५:४-९

शुभवर्तमान : मत्तय: ३:१-१२


"परमेश्वराचा मार्ग सिद्ध करात्याच्या वाटा नीट करा"


प्रस्तावना:

आज देऊळ माता आगमन काळातील दुसरा रविवार साजरा करीत आहे. आगमन काळ म्हणजे स्मरणाचा काळ, एखाद्या दृश्याला पूर्ण भेट देण्याचा काळ, पुन्हा एकदा बक्षीस मिळाल्याचा मौज मजेचा काळ. आज आपल्याला यशया संदेष्टा सांगत आहे की, जेसेच्या जखमी झालेल्या बुंध्यातून एक नवीन जीवन उगवेल, आणि त्याच्या मुळातून फुटलेली फांदी फळ देईल. तसेच आजच्या दुसऱ्या वाचनामध्ये संत पॉल म्हणतो "शास्त्रा पासून मिळणाऱ्या उत्तेजनाच्या योगे आपण आशा  व धीर धरावा. कारण जे शास्त्रात पूर्वी लिहिलेले ते सर्व आपल्या शिक्षणाकरिता लिहिले. तसेच आजच्या शुभवर्तमानात बाप्तिस्मा करणारा योहान पश्चतापाचे आव्हान करीत आहे. जुन्या करारात आपण वाचतो, कि देवाचे लोक या नात्याने इस्रायल आपल्या पाचारणाशी विश्वासू राहिले नाही. त्याचे वर्तन जसे मागे होते तसे आताही राहिले त्यात बदल झाला नाही. असा स्पष्ट इशारा योहान बाप्तिस्मा लोकांना देत आहे.


मनन चिंतन :

आज आपण आगमन काळातील दुसरा रविवार साजरा करीत असताना आपल्याला शुभवर्तमानामध्ये एक आकर्षक वाणी ऐकायला मिळते. "परमेश्वराचा मार्ग सिद्ध करात्याच्या वाटा नीट करा". आपल्या सर्वांनाच ठाऊकच आहे की योहान बाप्तिस्माप्रभू येशू ख्रिस्ताचा चुलत भाऊ म्हणून ओळखला जातो. योहान बाप्तिस्माने त्याच्या आयुष्याच्या अगदी सुरुवातीस घर सोडून यार्देन नदीच्या काठावर राहणाऱ्या वाळवंटी समुदायात तो सामील झाला. त्यांने त्याचे संपूर्ण जीवन प्रार्थनेत व उपवासामध्ये घालवलेव  स्वतःला देवाच्या कार्यात समर्पित केले. अशाप्रकारे तो  प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमनाची मोठ्या उत्कंठेने वाट पाहत राहिला.

देवाने प्रत्येक मनुष्याला कुठल्या नी कुठल्या कार्यासाठी या धर्तीवर पाठविलेले आहे. अशाच प्रकारे योहान बाप्तिस्माला, "परमेश्वराचा मार्ग सिद्ध करण्यासाठी व त्याच्या वाटा नीट करण्यासाठी पाठविलेले आहे". योहान बाप्तिस्मा हा वाळवंटात राहत असे. योहानाचे वस्त्र उंटांच्या केसाचे होते त्याच्या कमरेत कातड्याचा कमर बंद होता. त्याने त्याचे  संपूर्ण जीवन वाळवंटात घालवले. वाळवंट ही एक अशी जागा आहे जेथे संदेष्ट्ये देवाच्या सानिध्यात राहून जीवन जगत असत. जेथे “देव स्वतःच” एकमात्र आवाज आहे आणि दूसरे कोणी नाही, ज्याला सर्वात खोलवर स्पष्टपणे ऐकू येईल. ह्याच वाळवंटात योहानाने देवाचा आवाज ऐकला.  “जा आणि परमेश्वराच्या वाटा नीट कर”. मसीहाच्या आगमनाची वेळ जवळ आली आहे, तुमचे अंतकरण उघडा, पश्चाताप करा, त्याचे मार्ग सरळ करा.

आता प्रत्येक दरी भरली जाईल, प्रत्येक डोंगर आणि टेकडी खाली केली जाईल. वळणाचे रस्ते सरळ व गुळगुळीत केले जावेत". असा देवाचा संदेश योहान  जोरजोराने लोकांपर्यंत पोहोचवत होता, कारण इजरायली लोकांच्या आयुष्याला वळण देण्याची वेळ जवळ आली होती. 

जेव्हा योहान संदेष्टा रस्ते गुळगुळीत व सरळ करण्याविषयी बोलतो व  प्रत्येक उंच पर्वत कमी होऊ दे, आणि  प्रत्येक खड्डे भरून सपाट होऊ दे, ते म्हणजे आपल्या  जीवनात सुधारणा करण्याबद्दल आणि आपल्या अपयशातील खड्डे दुरुस्त करण्याबद्दल बोलतो. म्हणूनच आपण  आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्वागतासाठी आपले मार्ग  सरळ व गुळगुळीत करण्यासाठी उपस्थित राहिलो पाहिजे. कारण प्रभू येशू ख्रिस्त देवाचा पुत्र हेच सर्वात मोठे बक्षीस आपल्याला देव ख्रिसमस च्या दिवशी देणार आहे. आणि जर आपण योहाना च्या शब्दाचे पालन केले ते म्हणजे  जीवनाचे वाईट मार्ग  बदलून व अंतकरणे सरळ करून. मग आपण येणाऱ्या ख्रिसमसच्या दिवशी येशू ख्रिस्ताला आपल्या हृदयात, आपल्या घरामध्ये प्रवेश करण्यासाठी एक गुळगुळीत आणि सोपा रस्ता तयार करू शकू . जेथे प्रत्येक घरात, गावात, नगरात, शांतीचे वातावरण  पसरेल.

आज आपण पाहतो कि, शांती हे शब्द पुष्कळ  लोकाच्या च्या ओठावर असतात परंतु कमी लोकांच्या हृदयात असतात. ही शांती प्राप्त करण्यासाठी आपल्याला आगमन काल पश्चाताप करण्यासाठी योहान संदेष्टाच्याद्वारे बोलावत आहे. ज्याप्रमाणे माशाचं सुख पाण्यात असते व पाण्याबाहेर काढल्यास तो तडफडतो आणि मरतो, त्याप्रमाणे आपले खरे सुख देवाच्या सानिध्यात देवाच्या सहवासात आहे  आणि जेव्हा आपण देवापासून दूर जातो तेव्हा आपण माशाप्रमाणे तडफडतो आणि अस्वस्थ होतो. म्हणूनच संत ऑगस्तीन म्हणतो, हे देवा, आमची हृदय तुझ्यासाठी निर्माण झाली आहेत आणि जोपर्यंत मी तुझ्या मध्ये विसावल्याशिवाय त्यांना खरी शांती मिळणार नाही. म्हणूनच आज देऊळ माता योहानाच्या संदेशट्या द्वारे आपणा सर्वांना पश्चाताप करण्यासाठी, अंतकरणे शुद्ध करण्यासाठी व देवाच्या अधिक जवळ जाण्यासाठी बोलावत आहे.


विश्वासू लोकांच्या प्रार्थना :

प्रतिसाद : ‘हे प्रभू आमची प्रार्थना स्विकार’

१. आपले परमगुरु फ्रान्सिस,  धर्मगुरू आणि सर्व व्रतस्थ बंधू-भगिनी ह्यांच्याद्वारे प्रभूची सुवार्ता जगाच्या कानाकोपऱ्यात पसरावी म्हणून प्रभु कडे प्रार्थना करूया.

२. आपल्या जीवनातील स्वार्थीपणा, गर्व अहंकार या सैतानी वृत्तींमुळे आपण परमेश्वरापासून दुरावलो जातो . ख्रिस्ताच्या दयेची, प्रेमाची जाणीव सर्वाना व्हावी व ख्रिस्ता जवळ सर्वांनी वळावे म्हणून प्रभुचरणी प्रार्थना करूया.

३. या आगमन काळात आपण प्रभूच्या स्वागतासाठी स्वतःच्या हृदयाची व मनाची तयारी करावी व स्वतःच्या जीवनात योग्य अशी जागा तयार करावी म्हणून प्रभु चरणी प्रार्थना करूया.

४. जे कोणी आजारी व हॉस्पिटलमध्ये आहेत त्यांना परमेश्वराचा गुणकारी स्पर्श व्हावा व त्यांच्या जीवनामध्ये प्रभूचा अनुभव यावा म्हणून प्रार्थना करूया.

५. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक. सामाजिक व कौटुंबिक गरजांसाठी प्रभु कडे प्रार्थना करूया.

 

No comments:

Post a Comment