Reflections for the Homily of Fourth
Sunday of Easter (30-04-2023) By Fr. Suhas Pereira.
पुनरुत्थान काळातील चौथा रविवार
दिनांक: ३०/०४/२०२३
पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये २:१४,३६-४२.
दुसरे वाचन: १ पेत्र २:२०-२५.
शुभवर्तमान: योहान १०:१-१०.
प्रस्तावना:
आज पुनरुथानकाळातील चौथ्या रविवारी
आपण गुड शेफर्ड संडे किंव्हा उत्तम मेंढपाळाचा रविवार साजरा करत आहोत. आजचं पाहिलं
वाचन प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनाची शुभवार्ता संक्षिप्त रूपात सांगतं आणि प्रभू-येशू
कोण आहे? तो आपलं तारण कसं करतो आणि आपण सर्वानी त्याच्या तारणकार्याला प्रतिसाद कसा
द्यावा याबद्दल सांगत आहे. आजच्या दुसऱ्या वाचनात संत पेत्र आपल्याला प्रभू-येशू उत्तम
मेंढपाळांच्या त्यागाबद्दल आणि त्याच्या निस्वार्थी जीवनाबद्दल सांगत आहे. "त्याने
स्वत: आमची पापे वाहिली त्याच्या शरीरावर
घेऊन वधस्तंभावर वाहिली, यासाठी की आम्ही आमच्या पापाला मरावे. आणि नीतीमत्त्वासाठी
जगावे. त्याला झालेल्या जखमांमुळे तुम्हाला आरोग्य मिळाले." आजच्या शुभवर्तमानात
प्रभू येशू मेंढपाळ आणि मेंढरांचा दाखला वापरत आहे. प्रभू येशू म्हणतो कि, "मी उत्तम मेंढपाळ आहे आणि मी फक्त माझ्या कळपाच्या
भलेपणाचा विचार करतो आणि त्यासाठी सदैव कार्यक्षम असतो." प्रभू येशू आपला उत्तम
मेंढपाळ आहे आणि त्याने आपल्या सर्वांपुढे निस्वार्थी आणि सेवाभावी जीवनाचा आदर्श ठेवलेला
आहे. त्याच्या आदर्शाचे अनुकरण आपण सर्व ख्रिस्तीजणांनी करावं म्हणून आपण परमेश्वराची
कृपा आणि मदत मागुया. तसेच आज आपण ख्रिस्तसभेच्या सर्व मेंढपाळांसाठी प्रार्थना करू
या आणि ख्रिस्तसभेचे भावी मेंढपाळ बनण्यासाठी परमेश्वराने अनेकानेक तरुणांना प्रेरित
करावं म्हणूनसुद्धा खास प्रार्थना करूया.
मनन चिंतन:
जॉन केलमनने त्याच्या द होली लँड या
पुस्तकात फील्ड पेनचे म्हणजेच मेंढरांना ठेवण्याच्या जागेच/मेंढवाड्याचं वर्णन केले
आहे. हा मेंढवाडा सुमारे चार फूट उंचीच्या गोलाकार दगडी भिंतीचा बनलेला आहे आणि त्यामध्ये
आत आणि बाहेर जाण्याचा एक मार्गसुद्धा आहे.
केलमन म्हणतात की एके दिवशी एका पवित्र भूमीच्या पर्यटकाने हेब्रॉन जवळ शेतातील मेंढरांना ठेवण्याचा असा
एक मेंढवाडा पहिला. त्याने शेजारी बसलेल्या मेंढपाळाला विचारले, "तुझ्या मेंढवाड्यासाठी
दरवाजा कुठे आहे?" मेंढपाळ म्हणाला, "मी दरवाजा आहे." मग मेंढपाळाने
पर्यटकाला तो दररोज रात्री मेंढवाड्यात आपला कळप कसा आणतो आणि मग प्रवेशद्वाराच्या
पलीकडे कसा झोपतो त्याचे त्याने वर्णन केले. कोणतीही मेंढी मेंढवाडा सोडून बाहेर जाऊ शकत नव्हती
आणि कोणताही वन्य प्राणी त्याच्या अंगावर पाऊल टाकून त्याला जागृत केल्याशिवाय मेंढवाड्यात
प्रवेश करू शकत नव्हता.
आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू,
जीवनाकडे जाणाऱ्या दरवाज्याबद्दल/ द्वाराबद्दल बोलत आहे. दरवाजे हे आपल्या दैनंदिन
जीवनातील साहजिक आणि आपल्या जीवनात फारसं महत्व नसणाऱ्या वस्तूंपैकी एक आहेत. तरीसुद्धा
अनेक वेळा बंद दरवाज्यापुढे किंव्हा मागे असणाऱ्या एखाद्या अनोळखी व्यक्तीची आपल्याला भीती वाटत असते.
एखादी व्यक्ती जेव्हा आपली ओळखीची जागा, आपल्या सवयीच्या चार भिंती मधून बाहेर येऊन
एखाद्या नवीन, अपरिचित, अनोळखी अशा जगात पाय टाकते, तेव्हा त्या व्यक्तीला स्वाभाविकच
भीती वाटत असते. कारण हि व्यक्ती आपल्या सुरक्षिततेचं कवच टाकून देऊन अनोळखी जगतास
स्वतःला सोपवून देते. अशा मनुष्याला उद्याची,
भविष्याची, पुढे काय होईल याची चिंता आणि भीतीसुद्धा असते. परंतु ह्या भीतीमुळे खचून ना जाता अनोळखी जगतात, भविष्यात वाटचाल
करण्यासाठी जेव्हा मनुष्य पाऊलं टाकतो, तेव्हाच त्याची भीती नाहीशी होण्यास सुरु होते.
प्रभू येशू आपल्याला सांगत आहे,
कि तोच जीवनाचा दरवाजा आहे. "मी दार आहे. जो माझ्याद्वारे आत जातो त्याचे तारण
होईल (योहान १०:९)." या शब्दांनी
प्रभू येशू आपल्याला त्याच्याकडे येण्यासाठी आणि त्यांच्याद्वारे विपुल प्रमाणात जीवनाचा
अनुभव घेण्यासाठी आमंत्रण देत आहे. त्यासाठी आपल्याला आपलं नेहमीचं जीवन त्यागून त्याच्या(प्रभूच्या) जीवनाचा अनुभव घेतला पाहिजे. या सर्वामध्ये प्रभू येशू
आपल्यासाठी फक्त जीवनाचा दरवाजाच नाही, तर उत्तम मेंढपाळसुद्धा आहे. ज्याप्रमाणे एखादा
मेंढपाळ आपल्या मेंढरांची योग्य निगा राखतो आणि त्यांना हिरव्या कुरणात चारण्यासाठी
नेतो, त्याचप्रमाणे प्रभू येशूला आपल्या
जीवनाचा मेंढपाळ बनून आपली निगा राखायची आहे, आपलं संरक्षण करावयाचं आहे आणि आपल्या
सर्व प्रकारच्या भितींतून मुक्त करून आपल्याला विपुल आणि अनंत जीवनाचं दान बहाल करावयाचं
आहे.
असं असेल तर कदाचित आपल्याला प्रश्न
पडेल कि, फार थोडीशीच लोकं प्रभू येशूच्या ह्या आकर्षक प्रस्तावाचा स्वीकार का करतात? फारच थोडी लोकं आपलं सवयीचं जीवन सोडून देऊन, ह्या जीवनाच्या चार भिंतीबाहेर जाऊन प्रभू येशूने दाखवलेल्या
दरवाजातून आत जाण्याचा प्रयत्न करतात आणि त्याने आपल्यासाठी तयार केलेल्या सार्वकालिक
जीवनाचा उपभोग घेण्याचा प्रयत्न करतात. हे जग आणि ह्या जागतिक गोष्टींना चिकटून बसल्यामुळे
सार्वकालिक जीवनाचा आपल्याला विसर पडत असतो. सार्वकालिक जीवनाकडे नेणाऱ्या दरवाजातून
आत जाण्यासाठी आपल्याकडे धैर्य नसते.
आपलं जग हे ऐहिक गोष्टींवर लक्ष
केंद्रित करते. अशा या जगाला पैसे, संपत्ती, ऐश्वर्य हे सगळंकाही नाही अस बजावून सांगणाऱ्या
हिंमतवान आणि धाडसी व्यक्तींची गरज आहे. अशा लोकांची गरज आहे, जे फक्त परमेश्वर देऊ शकणाऱ्या जीवनाकडे या जगाला नेऊ
शकतात; अशा लोकांची गरज आहे, जे जगाला सांगू शकतात कि जर परमेश्वराला आपल्या जीवनाचा ताबा दिला तर हे ऐहिक
जीवनसुद्धा आपण परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे जगू शकतो. आपल्यापैकी प्रत्येकाला आपापल्या
परीने प्रभू येशूच्या पाठीमागे जाण्यासाठी पाचारण केले गेले आहे आणि आपल्याला सर्वाना
प्रभू येशू आज सांगतो, "जो कोणी माझ्यासाठी आपलं जीवन गमावून बसेल त्यालाच जीवनाचा
खरा लाभ होईल". प्रभू येशू आपल्यापैकी प्रत्येकाला आज सांगत आहे, "मी जीवन
देण्यासाठी आलो. असे जीवन जे भरपूर आणि चांगले आहे."
विश्वासू लोकांच्या
प्रार्थना:
प्रभू येशू हा आपला उत्तम मेंढपाळ आहे आणि तो सदैव आपल्या भल्याचाच विचार करतो.
तो आपल्याला विपुल प्रमाणात जीवनाचे दान देण्यासाठी या पृथ्वीवर आला. त्याच उत्तम मेंढपाळाद्वारे
परमेश्वर आपल्या पित्याचरणी आपल्या विनंत्या आणि गरजा आपण मांडू या.
प्रतिसाद: हे परमेश्वर दया कर आणि तुझ्या कळपाची प्रार्थना ऎक
१) ज्या तरुण तरुणींना परमेश्वर आपल्या मळ्यात कार्य करण्यासाठी पाचारण देत
आहे त्यांनी परमेश्वरी हाकेला योग्य प्रतिसाद देऊन परमेश्वर दाखवत आहे त्या मार्गाने
आपलं जीवन जगण्यासाठी त्यांना प्रेरणा आणि शक्ती मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
२) जी लोक हरवलेल्या मेंढरांप्रमाणे ख्रिस्तसभेपासून दुरावलेली आहेत आणि जिवंत
देवापासून दूर गेलेली आहेत, अशांना आपल्या जीवनात परमेश्वराचा प्रकाश दिसावा आणि प्रभू
येशू ख्रिस्त हाच आपल्या जीवनाचा उत्तम मेंढपाळ म्हणून ओळख आणि जाणीव व्हावी म्हणून
आपण प्रार्थना करू या.
३) आपल्या ख्रिस्तसभेची आणि आपल्या समाजाची धुरा वाहणाऱ्या सर्व नेत्यांनी ख्रिस्तासारखा
निस्वार्थी सेवेचा, त्यागाचा आणि प्रेमाचा ध्यास घेऊन सदैव लोककल्याणासाठी स्वतःला
वाहून घ्यावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
४) आपल्या सर्व आजारी व्यक्तींना परमेश्वरी कृपेचा गुणकारी स्पर्श व्हावा आणि
त्यांना उत्तम मेंढपाळाकडून नवजीवन लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
५) आपल्या कुटुंबातील आणि धर्मग्रामातील सर्व मृत बंधू-भगिनींना परमेश्वराच्या
स्वर्गीय नंदनवनात सार्वकालिक सुखाचा शांतीचा उपभोग घेता यावा म्हणून आपण प्रार्थना
करूया.
हे परमेश्वर आमच्या स्वर्गीय पित्या तुझा पुत्र येशू ख्रिस्त याला तू आमचा उत्तम
मेंढपाळ म्हणून या पृथ्वीवर पाठवले. त्याच्या पावलांवर पाऊल ठेऊन आम्हीसुद्धा निस्वार्थी
आणि त्यागी वृत्तीने जीवन जगावे म्हणून आम्हाला तुझ्या पवित्र आत्म्याने भर. हि प्रार्थना
आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन.
Link for Marathi Hymn-Prabhu Mendhpall Majha