Tuesday, 26 March 2024

 Reflection for the Homily of Maundy Thursday (28-03-2024) by Brother.




दिनांक: /३/२०२४

पहिले वाचन: गनणा १२:१-८, १२-१५

दुसरे वाचन: करिंथकरास पहिले पत्र ११:२८-३६

शुभवर्तमान: योहान १३:१-१५



·       “आज्ञा गुरुवार”






प्रस्तावना:

     ख्रिस्ताठायी माझ्या प्रिय बंधू-भगिनिंनो आज आपण “आज्ञा गुरुवार” साजरा करीत आहोत. आजची उपासना चार प्रमुख गोष्टींवर मनन चिंतन करण्यास बोलावत आहे; त्या म्हणजे वल्हांडण सण, पवित्र ख्रिस्त बलिदानाची स्थापना, याजकपद आणि ‘पायधुणी’. ह्या चार गोष्टी आपल्याला प्रेमाचा संदेश देतात.

     आजचे पहिले वाचन आपल्याला इस्रायल लोकांनी मिसर देशात केलेले वल्हांडणाचे भोजन व त्यानंतर देवाने त्यांची मिसरी लोकांच्या गुलामगिरीतून केलेली सुटका ह्याविषयी सांगत आहे. आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल ख्रिस्ती जीवनात ख्रिस्त शरीर विधीला आपले कितपर्यंत महत्त्वाचे स्थान आहे ह्या बद्दल उद्देश करतो. आजचे शुभवर्तमान आपल्याला प्रेमाचा कित्ता घालून देत आहे. जसे येशूने आपल्यावर प्रेम केले त्याप्रमाणे आपणसुद्धा प्रेमाची साक्ष द्यावी; जेणेकरून खऱ्या ख्रिस्ती जीवनाची ओळख जगाला होईल. हे प्रेम जगाला देण्यास आपणास कृपा मिळावी म्हणून ह्या मिस्सा बलिदानात आपण प्रार्थना करूया.

 

मनन चिंतन:

     चंदन हे मुळातून सुगंधी असते पण तोच सुगंध दुसऱ्या वस्तुत उतरविण्यासाठी चंदनाला झिजावे लागते. मेणबत्ती ही प्रकाश देण्यासाठी असते पण तोच प्रकाश दुसऱ्यांना देण्यासाठी तिला स्वतः जळावे लागते. मिठाचा वापर चवीसाठी केला जातो पण ती चव देण्यासाठी मिठाला स्वतःचे अस्तित्व गमवावे लागते. त्याच प्रमाणे दुसऱ्यांचे जीवन आनंदीत बनविण्यासाठी मनुष्याला स्वतःच्या आनंदाचा सौदा करावा लागतो कारण आनंद मिळविण्यासाठी किंवा आनंदी होण्यासाठी सर्वजण जगतात. पण दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू पाहण्यासाठी, त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी खूप कमी जगतात. ह्या कमी लोकांमध्ये आपण सुद्धा गणले जावे म्हणून आज्ञा गुरुवारी येशू ख्रिस्त आपल्याला ‘सेवा व प्रेम’ करण्यास बोलावत आहे.

     आजचे शुभवर्तमान म्हणजे येशूच्या संपूर्ण शिकवणीचा सारांश. ‘सेवा व प्रेम’ हा आजच्या शुभवर्तमानाचा संदेश ओतप्रेम भरलेला आहे. भोजन झाल्यावर येशू आपली बाह्यवस्त्र काढून शिष्यांचे पाय धुवू लागला. ह्याद्वारे त्याने आपणास सेवेचा मंत्र दिला. एका गुरूने शिष्यांचे पाय धुवावे म्हणजे स्वतःस नम्र करावे. नम्रता हा सेवाकरण्यासाठी लागणारा मुलभूत गुण आहे. नम्रतेशिवाय खरी सेवा होणे अत्यंत कठीण असते. कारण सेवा करताना आपण कुठल्याप्रकारचा संकोच मनात व बाळगता स्वतःस पूर्णपणे झोकून द्यावे लागते.

     येशूने शिष्यांचे पाय धुतले. पाय हा शरीराचा तळभाग जो सतत जमिनीच्या सानिध्यात असतो. त्यामुळे त्यावर खूप धूळ जमते. पायाने लाथ मारणे किंवा कुठलाही गोष्टीस स्पर्श करणे ह्यास आपण मोठा अपमान समजतो म्हणून जेव्हा येशू पाय धुवू लागला तेव्हा शिष्यांना संकोच वाटला. त्यातल्या त्यात पेत्राने येशूला पायास स्पर्श करण्यास नकार दिला. कारण गुरूने त्यांचे पाय धुवावे ह्यास ते पात्र नव्हते. पण येशूचे हे कृत्ये त्यांना सांगते की मनुष्याची महानता ही त्यांच्या पदावर नव्हे तर त्यांच्या नम्रतेवर अवलंबून असते. झाड किती मजबूत आहे ह्याचा निष्कर्ष उंचीवर नव्हे तर त्याच्या खोलीवरून लावला जातो.

     आजच्या शुभवर्तमानाचा दुसरा भाग म्हणजे ‘प्रेम’. जेव्हा येशू भोजनास बसला तेव्हा त्याने भाकर घेतली व ती मोडली आणि शिष्यांना म्हणाला, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. पुढे प्याला घेऊन तो म्हणाला, “हे माझे रक्त आहे, हे तुमच्यासाठी सांडण्यात येईल.” एखादा मनुष्य आपल्या स्वकीयावर कितपर्यंत प्रेम करु शकतो ह्याचे जीवंत उदाहरण. एखादया मनुष्याने दुसऱ्या खेरीज स्वतःचे रक्त सांडणे ह्याशिवाय प्रेमाची व्याख्या अजून कुठली असू शकते? येशूने भाकर मोडणे व द्राक्षरस वाटणे हे त्याच्या शरीराचे व रक्ताचे प्रतिक होते जे त्याने क्रुसावर अर्पण केले. कुणासाठी तर दुसऱ्यांसाठी म्हणजे आपल्यासाठी. आपल्या पापांच्या गुलामगीरीतून सुटका व्हावी म्हणून तो आपल्यासाठी वल्हांडणाचे कोकरू बनला. त्याने स्वतःचा त्याग केला, कारण त्याने आपल्यावर प्रेम केले. प्रेमाची परीक्षा त्यागात होते. प्रेम करणारा त्याग करतो व त्यागास तो प्रेम पाहतो ही परीक्षा येशूने आपल्या मरणाने पास केली व तो अमर झाला.

     पायधुवून झाल्यानंतर येशू शिष्यांस कित्ता घालुन देतो की मी जसे तुम्हास केले तसे तुम्ही सुद्धा दुसऱ्यांस करावे. ह्याचा अर्थ असा की आपणसुद्धा आपले जीवन दुसऱ्यांच्या सेवेत अर्पण करावे. एकमेकांवर प्रेम करावे. कारण ख्रिस्ती म्हणून ‘प्रेम व सेवा’ ही आपली ओळख आहे ते करताना आपल्याला त्यागाचा मार्ग अवलंबावा लागेल. आणि हा मार्ग कितीही खडतर असला तरी तो चालण्यास आपली तयारी असली पाहिजे कारण जर आपण त्याग सोडून स्वत:साठी जगलो तर आपण मेलेल्यांत जमा होऊ, पण जर दुसऱ्यांसाठी जगलो तर आपण मेलो तरी जगणार. कारण सेवा व प्रेमाने आपण कित्येक लोकांच्या जीवनातील मेलेल्यांस पुर्नजीवन देतो आणि ह्यातच आपला आनंद आहे.

पवित्र याजकपद

     आजच्या दिवशी येशूने पवित्र याजकपद व ख्रिस्त शरीर विधीची स्थापना केली. येशू हा स्वत: याजक झाला व त्याच्या शिष्यांना याजक कसा असावा ह्याचे उदाहरण दिले. धर्मगुरु आपल्या ख्रिस्ती जीवनात महत्वाचा भाग आहे. त्याचे जीवन म्हणजे त्यागमय जीवन. ते आपल्या सर्व सुखाचा त्याग करून दुसऱ्यांच्या सेवेसाठी आपले संपूर्ण जीवन अर्पण करतात. स्वत:चे सुख बाजूला सारून दुसऱ्यांच्या दु:खात समाधान करणे व त्यांस आनंदी करणे हे त्यांचे आद्य कर्तव्य समजतात. प्रभूने भाकर मोडली व ती दुसऱ्यांना दिली ह्याच आज्ञाप्रमाणे ते स्वत:चे जीवन मोडतात व दुसऱ्यांबरोबर वाटतात व गरज पडली तर रक्त सांडण्यास स्वखुशीने तयार असतात. स्वकीयांनपासून ते परके होतात व परक्यांस आपलं करतात कारण पवित्र याजकपद त्यांस त्याग करण्यास बोलावते व पवित्र मिस्साद्वारे दुसऱ्यांना येशू ख्रिस्त देतात.

मिस्साबलिदानाची स्थापना

     पवित्र मिस्साबलिदान अर्पण करण्याचा अधिकार फक्त धर्मगुरूंना आहे. हे मिस्साबलिदान येशूने शेवटच्या भोजनावेळी स्थापित केला व आपणासाठी नवीन वल्हांडण झाला. शेवटचे भोजन व वल्हांडणामध्ये खूप जवळेचे साम्य आहे. वल्हांडण म्हणजे एका बाजूने दुसऱ्या बाजूला ओलांडण करणे. वल्हांडणाच्या दिवशी कोकराचा वध करावा व त्याचे रक्त घराच्या चौकटीवर शिंपडावे ही आज्ञा देवाने इब्री लोकांना दिली जेणेकरून जेव्हा देव त्यांच्या दारा समोरून जाईल तेव्हा त्या घराचे मरणापासून तारण होईल. त्याचप्रकारे शेवटच्या भोजनास स्वत: कोकरू होऊन त्याच्या रक्ताने आमचे तारण केले. देवाने इब्री लोकांची मिसरांच्या गुलामगिरीतून सुटका केली. त्याचप्रमाणे शेवटच्या भोजनाद्वारे आमचे पापांच्या गुलामगिरीतून तारण केले. आपण प्रत्येक मिस्साबलीदानाद्वारे त्या शेवटच्या भोजनात सहभागी होतो व आपणास तारण प्राप्त होते.

     येशूने हे सर्व आपणासाठी केले कारण त्याने आपल्यावर प्रेम केले. हाच प्रेमाचा व सेवेचा धडा आपल्या जीवनात गिरविण्यास कृपा मिळावी म्हणून आज आपण प्रार्थना करूया. 

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे प्रभू आमची प्रार्थना ऐक व आम्हांला तुझ्या सारखे नम्र बनव.

१. ख्रिस्ताचा संदेश संपूर्ण जगात पोहचविणारे आपले पोप, बिशप्स, कार्डीनल्स, धर्मगुरु, व्रतस्थबंधू-भगिनी ह्या सर्वाना शारिरीक व मानसिक तन-मनाचे चांगले आरोग्य लाभावे व सेवेचा संदेश अंगीकारून तो जगाला देण्यास कृपा मिळावी म्हणून आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करूया.

२. जगातील सर्व ख्रिस्ती पंथानी एकत्र यावे व खिस्त हा आपला एकच मेंढपाळ आहे ह्याची साक्ष द्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

३. जगातील सर्व लोकांनी आपापसातील मतभेद, द्वेष, हेवा विसरून एकत्र यावे आपण सर्व एकाच देवाची मुले आहोत ह्या नात्याने एक दुसऱ्यांची सेवा व प्रेम करण्यास पावले उचलावीत म्हणून आपण प्रार्थना करूया.

४. जगभर जी जी लोक गरिबांची, अनाथांची, रोगी व दिन दुबळ्यांची सेवा करत आहेत, हे कार्य पुढे नेण्यास त्यांना शक्ती मिळावी व अधिकाधिक लोकांनी अशा सेवाकार्यात सहभागी व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

५. आता आपण आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजीक हेतूसाठी प्रार्थना करूया.

No comments:

Post a Comment