Reflection for the 25th Sunday in Ordinary Time (21/09/2025) By Fr. Rackson Dinis
सामान्य काळातील पंचवीसावा रविवार
दिनांक: २१/०९/२०२५
पहिले वाचन: आमोस ८:४-७
दुसरे वाचन: तीमथ्यीला दुसरे पत्र
२: १-८
शुभवर्तमान: लुक १६: १-१३
प्रस्तावना
प्रिय बंधू आणि
भगिनींनो आज आपण सामान्य काळातील पंचवीसावा रविवार साजरा करीत आहोत व आजची उपासना
आपल्याला, आपल्या
जीवनातील खरा देव “पैसा की परमेश्वर” आहे, या
विषयावर मनन चिंतन करावयास बोलावत आहे.
आजच्या पहिल्या वाचनात
आमोस संदेष्टा, अन्यायी लोकांना, गरिबांना त्रास देणाऱ्यांना, गरीब
लोकांची धान्याच्या मोजमापात फसवणूक करणाऱ्यांना, लोभी व्यापाऱ्यांना, कठोर शिक्षा होईल ह्या विषयीचा संदेश देत आहे.
दुसऱ्या वाचनात संत
पॉल आपल्याला प्रार्थनेच्या शक्तीचे महत्त्व सांगत आहे. प्रार्थना ही फक्त
आपल्यासाठीच नव्हे तर आपल्या वैऱ्यांसाठी, सत्ता
अधिकाऱ्यांसाठी, तसेच इतरांसाठी केली पाहिजे. प्रार्थना ही सार्वत्रिक असावी ती
फक्त स्वतःसाठी नसावी. हा संदेश संत पॉल आपल्याला देत आहे.
आजच्या शुभवर्तमानात
येशू ख्रिस्त आपल्याला अन्यायी चाकराची गोष्ट सांगतो. जो माणूस छोट्या
गोष्टींमध्ये प्रामाणिक नसतो तो मोठ्या गोष्टींमध्ये प्रामाणिक राहू शकत नाही.
तसेच येशू सांगतो आपण एकाच वेळी देवाची व पैशाची सेवा करू शकत नाही त्यामुळे आपण
फक्त देवाचीच निवड करावी कारण तोच आपला तारणारा व निर्माण करणारा आहे.
आजच्या ह्या उपासनेत
भाग घेत असताना, देव आपल्याला सांगतो
की, आपण प्रामाणिक राहावे, न्यायाने वागावे, प्रार्थनेत
सतत राहावे आणि पैशाऐवजी देवाची निवड करावी. कारण जो देवाशी एकनिष्ठ राहतो त्यालाच
खरा शांतीचा व तारणाचा अनुभव मिळतो.
मनन चिंतन
माझ्या प्रिय बंधू आणि
भगिनीनो, एकदा एका गावात एक
श्रीमंत व्यापारी राहत होता. तो फार हुशार आणि कष्टाळू होता. त्याच्याकडे दोन खास
खिसे असलेला जाकीट होते. उजव्या खिशात तो रोज आपले पैसे, नाणी आणि
नफा ठेवायचा तर डाव्या खिशात तो एक छोटासा क्रूस ठेवायचा. एके दिवशी बाजारातून
परतताना तो खूप आनंदी होता कारण त्याला मोठा नफा झाला होता. घरी येऊन त्याने
खिशातील पैसे मोजले, पण त्याचा
हात एकदाही डाव्या खिशात गेला नाही. त्या रात्री त्याला झोपेत स्वप्न पडले. त्याला स्वप्नात देव दिसला
आणि देवाने विचारले: “तू रोज उजव्या खिशात हात घालतोस, पैसा
मोजतोस, पण डाव्या खिशात
असलेला माझा क्रूस विसरतोस. जर उद्या तुझा उजवा खिसा रिकामा झाला तर तू काय करशील?” व्यापारी घाबरून जागा झाला. दुसऱ्या दिवशी
सकाळी त्याने ठरवले “आता पासून दिवसाची सुरुवात मी डाव्या खिशातून करेन, क्रूस हातात घेईन, देवाचे
आभार मानीन आणि माझ्या प्रत्येक व्यवहारात प्रामाणिक राहीन. पैसा मिलो किवा नको
परंतु देव मात्र गमावणार नाही” त्या दिवसानंतर तो फक्त श्रीमंत व्यापारीच राहिला
नाही, तर लोकांसाठी आदर्श
व्यापारी झाला.
माझ्या प्रिय मित्रानो, आपल्या जीवनातही दोन खिसे असतात, एक खिसा
ज्यामध्ये, पैसा, नफा, स्वार्थ, असते. दुसरा खिसा, ज्यामध्ये देवासाठी, प्रार्थनेसाठी, तळमळ असते. प्रश्न हा आहे की आपण दिवसाची सुरुवात कोणत्या
खिशातून करतो? जर आपण देवाच्या
खिशातून सुरुवात केली तर आपले निर्णय योग्य होतील, आपला
व्यवहार प्रामाणिक असेल, आणि
आपल्याला खरी शांती व आनंद मिळेल. पण जर आपण पैशाच्या खिशातून सुरुवात केली, तर आपले मन स्वार्थी होईल, लोभ वाढेल, आणि शेवटी पैसा आपला देव बनेल, पण आनंद
गमावून बसेल.
होय माझ्या प्रिय
मित्रानो, अस म्हणतात पैशाने घर
विकत घेता येते पण घरातील शांती फक्त देव देतो. पैशाने औषध विकत घेता येते पण
आरोग्य फक्त देव देतो. पैशाने मोबाईल विकत घेता येतो पण नाती फक्त प्रेमाने जपता
येतात. म्हणून आपण पैशाला योग्य ठिकाणी ठेवूया व देवाला जीवनात प्रथम स्थान
देवूया.
माझ्या प्रिय बंधू आणि
भगिनींनो, आजच्या पहिल्या वाचनात
आमोस संदेष्टा अन्यायी व्यापाऱ्यांना इशारा देतो, जे गरीबांचे
शोषण करतात, धान्याच्या मोजमापात
फसवणूक करतात आणि लोभाने नफा कमावतात, त्यांना
देवाच्या न्यायाचा सामना करावा लागेल. कथेमध्ये आपण ऐकले, व्यापाऱ्याने
देवाची आठवण ठेवून आपला व्यवहार प्रामाणिकपणे केला, म्हणून तो
यशस्वी झाला. पण जे देवाला विसरतात ते लोभात अडकतात आणि स्वतःचा नाश करून घेतात.
दुसऱ्या वाचनात संत
पॉल आपल्याला सांगतो की प्रार्थना फक्त स्वतःसाठी नव्हे, तर
सर्वांसाठी असावी. हाच तो “डाव्या खिशाचा” जीवनमार्ग आहे. दिवसाची सुरुवात
देवापासून करणे, प्रार्थना करणे आणि
आपल्या प्रत्येक निर्णयात देवाला प्रथम स्थान देणे असा होय. आणि
आजच्या शुभवर्तमानात येशू स्पष्ट सांगतो की आपण एकाच वेळी देव आणि पैशाची सेवा करू
शकत नाही. आपल्याला ठरवावे लागते,आपण
कोणत्या खिशातून सुरुवात करणार. देवाच्या खिशातून की
पैशाच्या खिशातून? जर आपण
देवाच्या खिशातून सुरुवात केली, तर आपले
हृदय शांत राहील, निर्णय
योग्य होतील, व्यवहार प्रामाणिक
होतील, आणि आपल्याला खऱ्या आनंदाचा अनुभव येईल व देव
आपल्या जीवनातील केंद्र बनेल. पण जर आपण पैशाच्या खिशातून सुरुवात केली, तर आपले मन लोभी होईल, स्वार्थ
वाढेल, न्याय विसरला जाईल, आणि शेवटी पैसा आपला देव बनेल. अशावेळी आपण पैसा मिळवू, पण शांती, प्रेम आणि
देवाचा आशीर्वाद गमावून बसू.
माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आजच्या जगात आपण बघतो की पैसा हा अनेक लोकांसाठी “देव” झाला आहे. आज लोक सकाळी उठल्यावर सर्वात आधी मोबाईल उचलतात, प्रार्थनेपेक्षा नोटिफिकेशन्स, मेसेजेस आणि शेअर मार्केट पाहतात. आज लोक पैशासाठी दिवस-रात्र काम करतात, पण प्रार्थनेसाठी वेळ काढत नाहीत. आज नाती तुटत आहेत कारण स्वार्थ आणि अहंकार वाढला आहे. आज आपल्याला बघायला मिळते, काहीजण पैशासाठी खोटे बोलतात, फसवणूक करतात. काही तरुण फक्त करिअर, पगार, स्टेटस याच्याच मागे धावत आहेत, पण देवाला आणि प्रार्थनेला वेळ देत नाहीत. आणि याचा परिणाम म्हणजे, लोकांकडे भरपूर पैसा असेल, पण त्यांना शांत झोप लागणार नाही. मोठे घर असेल, पण घरातील प्रेम मिळणार नाही. सोशल मीडियावर खूप मित्र असतील, पण मनात एकटेपणा असेल. म्हणून, येशू आज आपल्याला सांगत आहे “तू कोणत्या खिशातून सुरुवात करतोस? देवाच्या की पैशाच्या?” जर आपण देवाची निवड केली तर देव, आपला पैसा योग्य ठिकाणी वापरण्यास शिकवेल, आपल्याला न्यायाने जगायला शिकवेल, आणि आपल्याला जीवनात खरा आनंद व सुख भेटेल.
विश्वासू लोकांची प्रार्थना
आपला प्रतिसाद :- हे
प्रभू आमची प्रार्थना ऐक.
(१) आपले पोप लियो, सर्व
बिशप्स, धर्मगुरू, धर्मबंधू, धर्मभगिनी
तसेच ख्रिस्ती धर्माची धुरा वाहणारे सर्व मिशनरी कार्यकर्त्यावर प्रभूचा आशिर्वाद
नेहमी राहावा, तसेच
त्यांना त्याच्या कामामध्ये नेहमी प्रभूचे सामर्थ व शक्ती लाभावी म्हणून प्रार्थना
करूया.
(२) आपल्या धर्म
ग्रामातील युवक-युवती जे देऊळमाते पासून दूर गेलेले आहेत, ते
देवाच्या जवळ यावे, देवाच्या दैवी कृपेचा अनुभव त्यांना यावा व
त्यांनी त्यांचे जीवन देऊळमातेच्या नियमाप्रमाणे जगावे आणि इतरांना आदर्श दयावा
म्हणून आपण विशेष प्रार्थना करूया.
(३) आपल्या कुटुंबातील
आजारी व्यक्तींना प्रभूच्या आत्म्याद्वारे चांगले आरोग्य लाभावे व त्यांचा आजार
बरा व्हावा, तसेच
त्यांच्या आजारामध्ये त्यांनी नेहमी परमेश्वाचा धावा करून परमेश्वराच्या अधिक जवळ
यावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
(४) आज विशेषता
प्रार्थना करूया आशा लोकांसाठी ज्यांना पावसाच्या पाण्यामुळे अतिशय हाल अपेष्टा
सहन कराव्या लागल्या आहेत. पुरामध्ये अनेक लोकांची विविध प्रकारची हानी झाली आहे.
या सर्व लोकांना योग्य ते सहकार्य लाभावे व इतर सर्व प्रकारच्या आपत्ती पासून
त्यांचे रक्षण व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
(५) आज ज्या ज्या
लोकांचे वाढदिवस आहेत त्या त्या लोकांना परमेश्वराचा विशेष असा आशिर्वाद मिळावा व
अशा प्रकारचा दिवस त्यांच्या जीवनामध्ये नेहमी यावा म्हणून प्रार्थना करूया.
(६) थोडा वेळ शांत
राहून आपण आपल्या वैयक्तिक हेतूसाठी प्रार्थना करूया.
No comments:
Post a Comment