Reflections for the homily for Third Sunday in the Ordinary Time (25-01-2026) by Br. Vinan Souz
पहिले वाचन: यशया ८: २३ - ९: ३
दुसरे वाचन: पौलचे करिंथकरांस पहिले पत्र १: १-३
शुभवर्तमान: मत्तय ४: १२- २३
प्रस्तावना
आज आपण सामान्य
काळातील तिसरा रविवार साजरा करीत
आहोत. आजची उपासना आपल्याला
प्रकाश, एकता आणि पाचारण यांचा संदेश देते. आजच्या
पहिल्या वचनात आपण एकतो की जे लोक अंधारात आणि दुःखात जगत होते,
त्यांच्या जीवनात देवाने
प्रकाश आणला. त्यांचे ओझे
हलके केले आणि त्यांना आनंद दिला. देव आपल्या लोकांचे दु:ख पाहतो आणि त्यांना आशा
देतो. अंधार कितीही मोठा असला तरी देवाचा प्रकाश त्याहून मोठा आहे. आजच्या
दुसऱ्या वाचनात संत पौल आपल्याला एकतेचा संदेश देतात. ते सांगतात
की ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्यांनी भांडण करू नये किंवा गट पाडू नयेत. आपण सगळे
एकाच ख्रिस्ताचे आहोत. देव आपल्याला प्रेम,
शांती आणि एकतेने जगायला बोलावतो.
आजच्या
शुभवर्तमानात येशू अंधारात असलेल्या लोकांमध्ये जाऊन देवाचे राज्य जवळ
आले आहे असे सांगतो. तो
लोकांना पश्चात्ताप करायला बोलावतो. साध्या मच्छिमारांना तो आपले शिष्य बनवतो आणि
म्हणतो, “माझ्यामागे या.”
येशू आजारी लोकांना बरे करतो आणि सर्वांना आशेचा प्रकाश देतो. आजच्या मिस्साबलीदानात भाग घेत असताना
आपण विचार करूया कि, माझ्या जीवनात कोणत्या गोष्टी सोडून येशूच्या मागे
चालण्याची मला गरज आहे? येशू मला आज
कशासाठी बोलावत आहे?
मनन चिंतन
एका छोट्या खेड्यात
एक मच्छीमार राहत होता. रोज पहाटे तो आपल्या जाळ्यांसह नदीकाठी जायचा. कधी मासे
जास्त मिळायचे, कधी फार कमी मिळायचे. एके दिवशी नदीच्या काठी बसून तो जाळे शिवत होता. त्याच्या चेहऱ्यावर
थकवा होता, पण मानात एक प्रश्न होता. आयुष्य असंच चालणार का,
रोज तेच काम, संघर्ष, अनिश्चितता, आणि तरीही काहीतरी आपल्या जीवनात
काहीतर अपूर्ण आहे. तेवढ्यात गावातून जाणारा एक प्रवासी त्याच्याजवळ थांबला. त्याने विचारले, “तू रोज हेच काम करतोस, पण तुझ्या मनात कधी
काही वेगळं करण्याची इच्छा येत नाही का?”
मच्छीमार थोडा हसला आणि म्हणाला,
“इच्छा तर येते, पण मला बोलावणार
कोण?” प्रवासी काही न
बोलता पुढे निघून गेला, पण तो प्रश्न
मच्छीमाराच्या मनात रुतून बसला. “मला बोलावणार कोण.”
आजच्या शुभावार्तमानात
देखील हाच प्रश्न आपल्यासमोर पुन्हा येतो. येशू लोकांना बोलावत आहे. तो
राजवाड्यातून, मंदिरातून किंवा
विद्वानांच्या सभेतून सुरुवात करत नाही. तो सुरुवात करतो गालील प्रांतातून, अंधारात बसलेल्या
लोकांमधून, साध्या
मच्छीमारांपासून. येशूला कळते की देवाचे राज्य मोठ्या शब्दांनी नव्हे तर बदललेल्या
जीवनांनी उभे राहते. येशूचा पहिला संदेश आहे, “पश्चात्ताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.” पश्चात्ताप म्हणजे फक्त वाईट
सवयी सोडणे नाही, तर विचारांची दिशा
बदलणे, जीवनाचा
केंद्रबिंदू बदलणे. माणूस अनेकदा स्वतःभोवती फिरत राहतो. माझं, माझ्यासाठी, माझं भविष्य. पण येशू
म्हणतो, दिशा बदला, देवाकडे वळा, आणि इतरांसाठी जगा.
यानंतर येशू
समुद्रकिनारी चालत असताना दोन भावांना पाहतो,
पेत्र म्हटलेला शिमोन आणि त्याचा भाऊ आंद्रिया. ते मासेमारी करत होते. हे लोक धार्मिक नेते नव्हते,
ते विद्वान नव्हते. ते सामान्य मासे
पकडणारे लोक होते. पण येशू त्यांच्याकडे पाहतो आणि म्हणतो,
“माझ्यामागे या म्हणजे मी तुम्हाला माणसे धरणारे करीन.” ही हाक साधी आहे, पण त्याचा परिणाम फार मोठा आहे. तो त्यांना आधी प्रशिक्षण देत नाही, त्यांच्या
पात्रतेची चौकशी करत नाही. तो त्यांना विश्वास देतो. ते लगेच आपली जाळी
टाकून त्याच्या मागे जातात. लगेच. हा शब्द आपल्याला अस्वस्थ करतो. कारण आपली
प्रतिक्रिया बहुतेक वेळा लगेच नसते. आपण विचार करतो,
योजना करतो, अटी घालतो. पण येथे
आपण पाहतो की देवाची हाक ऐकली की विलंब न करता प्रतिसाद देणे म्हणजेच विश्वास होय.
थोडे पुढे जाऊन
येशू याकोब आणि योहानला पाहतो. ते आपल्या वडिलांबरोबर तारवात आपली जाळी नीट करत होते. येशू त्यांनाही बोलावतो. तेही आपली तारू, जाळी व आपल्या वडिलांना सोडून येशूच्या मागे जातात. याचा अर्थ कुटुंबाचा तिरस्कार नाही, तर देवाच्या
बोलावण्याला सर्वोच्च स्थान देणे. देवाची हाक कधी कधी आपल्याला सुरक्षिततेच्या
चौकटीबाहेर नेते. आज आपण स्वतःला
विचारले पाहिजे, येशू आपल्याला कुठे
बोलावत आहे. येशू म्हणतो, “माझ्या मागे ये.”
आणि आपला प्रश्न असतो, “आत्ता नाही, थोड्या वेळाने.” पण
देवाचा काळ नेहमी आत्ता असतो.
येशू संपूर्ण गालीलमध्ये
फिरतो, सभास्थानांत शिकवतो, राज्याची सुवार्ता
जाहीर करतो, आणि सर्व प्रकारचे
रोग व आजार बरे करतो. त्याची सेवा शब्द आणि कृती दोन्हींची आहे. तो केवळ बोलत नाही, तो करतो. आज आपली
श्रद्धा अनेकदा शब्दांपुरती मर्यादित राहते. आपण प्रार्थना करतो, पण कृती करत नाही.
येशू आपल्याला शिकवतो की खरी श्रद्धा ही प्रेमात व्यक्त होते. आपल्या दैनंदिन
जीवनात येशू आपल्याला भेटतो. कामाच्या ठिकाणी,
कुटुंबात, रस्त्यावर, आजारी व्यक्तीत, उपेक्षितामध्ये.
प्रश्न हा नाही की तो बोलावतो का, प्रश्न हा आहे की आपण ऐकतो का. आणि ऐकल्यावर आपण लगेच प्रतिसाद देतो का.
त्या मच्छीमाराची
गोष्ट आठवा. तो म्हणाला होता, “मला बोलावणार कोण?” आजचे शुभवर्तमान आपल्याला सांगते, येशूच तो आहे जो
आपल्याला बोलावतो. आपल्या जीवनाकडे
पाहत आहे, आणि म्हणत आहे, “माझ्या मागे या.” आपण आपली जाळी टाकून, भीती सोडून, विश्वासाने पुढे
जाणार का. ही सुवार्ता
आपल्याला सुरक्षित ख्रिस्ती बनून राहू देत नाही. ती आपल्याला हालवते, बदलते, पाठवते. कारण जिथे
अंधार आहे तिथे प्रकाश व्हायचे आहे. जिथे निराशा आहे तिथे आशा व्हायचे आहे. जिथे
आजार आहे तिथे करुणा व्हायचे आहे.
आज आपण प्रार्थनेत
हेच मागूया, प्रभु, तुझी हाक ऐकण्याचे
कान दे. लगेच प्रतिसाद देण्याचे धैर्य दे. आणि माणसे धरणारे बनण्यासाठी प्रेमळ
हृदय दे. आमेन.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: “हे प्रभो, तुझ्या
पाचारणास होकार देण्यास आम्हांला शिकव!”
१) आपल्या ख्रिस्तसभेची आध्यात्मिक काळजी घेणारे आपले
पोप महाशय, कार्डीनल्स, बिशप्स, धर्मगुरू-धर्मभगिनी आणि सर्व प्रापंचिक
ह्या सर्वावर देवाच्या कृपेचा वर्षाव व्हावा व त्यांच्या कृतीतून देवाचे प्रेम
लोकांकडे पोहचावे म्हणून आपण प्रार्थना करू या.
२) आपल्या धर्मग्रामात जे कोणी आजारी आहेत. अशा सर्व
आजारी लोकांना परमेश्वरी कृपेचा स्पर्श होऊन त्यांची आजारातून सुटका व्हावी म्हणून
आपण प्रार्थना करू या.
३) आज आपण आपल्या देशासाठी प्रार्थना करूया की, देशभर पसरलेली अशांतता नष्ट व्हावी व
सर्वत्र शांतता व सलोखा नांदावा म्हणून आपण प्रार्थना करू या.
४) आपल्या सर्व राजकीय पुढाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी
आपला स्वार्थ बाजूला ठेऊन सतत देशाच्या उन्नतीसाठी व प्रगतीसाठी झटावे म्हणून आपण
प्रार्थना करू या.
५) येशू ख्रिस्त आपल्या आई-वडीलांच्या आज्ञेत राहिला
व त्यांना मान व सन्मान दिला. आज मुल-मुली आई-वडिलांना अपशब्द बोलतात व दु:खवितात
अशा मुला-मुलींना ईश्वराचे प्रेम मिळावे, जेणेकरून ही मुल-मुली आपल्या
आई-वडिलांचा आदर राखतील म्हणून आपण प्रार्थना करू या.
७) आता थोडा वेळ शांत राहून आपल्या आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक गरजांसाठी
प्रार्थना करूया.
No comments:
Post a Comment