Reflection for THE SOLEMNITY OF THE EPIPHANY OF THE LORD (04/01/2026) By Fr. Benjamin Alphonso
प्रभू येशूच्या प्रकटीकरणाचा सण
दिनांक: ०४/०१/२०२६
पहिले वाचन: यशया ६०:१-६
दुसरे वाचन: इफिस ३:२-६
शुभवर्तमान: मत्तय २:१-१२
प्रस्तावना
माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज आपण प्रगटीकरणाचा सण अत्यंत
भक्तीभावाने साजरा करत आहोत.
आजचा दिवस
आपल्याला आठवण करून देतो की, देव हा
गुप्त नाही, तर तो स्वतःला आपल्यासमोर प्रकट करत
असतो. ज्याप्रमाणे आकाशातील एका ताऱ्याने त्या
तीन ज्ञानी राजांना मार्गदर्शन केले आणि त्यांना येशूचरणी आणले, अगदी त्याचप्रमाणे देव आजही, आपल्या जीवनातील अंधार दूर करण्यासाठी देव
आपला प्रकाश पाठवत आहे. आजच्या
सुवार्तेत आणि वाचनात आपण पाहतो की,
ख्रिस्त हा
जगाचा प्रकाश म्हणून आलेला आहे.
मदर तेरेसा आपल्याला
शिकवतात की, जिथे अंधार, एकटेपणा आणि दुःख आहे, तिथे ख्रिस्ताचा प्रकाश घेऊन जाणे हेच
आपले कर्तव्य आहे. आपल्याला फक्त स्वतःसाठी प्रकाश शोधायचा
नाही, तर त्या वृद्धाच्या घरातील दिव्याप्रमाणे
इतरांसाठी उजेड बनायचे आहे.
जेव्हा आपण
अडचणीत असलेल्यांना मदत करतो, तेव्हाच
ख्रिस्ताचा खरा प्रकाश आपल्याद्वारे प्रकट होतो. देव आपल्यापासून दूर नाही, तो आपल्यामध्ये आणि आपल्या सोबतच आहे, हे ओळखण्याची आज गरज आहे. ज्यांनी ख्रिस्ताला ओळखले, त्यांच्या जीवनात नेहमीच आनंद आणि प्रकाश
असतो. तर आजच्या या पवित्र मिस्साबलिदानात आपण
मनापासून सहभागी होऊया. आपण
प्रार्थना करूया की, त्या राजांप्रमाणे आपल्यालाही देवाची ओळख
पटावी आणि ख्रिस्ताचा हा पवित्र प्रकाश आपण
आपल्या कृतीतून सर्वांपर्यंत पोहचावा.
मनन चिंतन
गाईच्या
गोठ्यात ख्रिस्त जन्मला,
पूर्वेच्या
चांदण्यात तारा उगवला.
चला चला हो, पाहू चला;
बाळ येशूला पाहू
चला.
ख्रिस्ताठायी माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, आज पवित्र देऊळमाता ‘प्रगटीकरणाचा सण’
साजरा करत आहे. आपला देव हा नेहमी स्वतःला प्रकट करत असतो. आजची वाचने आणि आजचा सण
प्रामुख्याने आपल्याला हीच गोष्ट सांगू इच्छितो की,
देव
वेळोवेळी स्वतःला प्रकट करत असतो. काही लोक देवाला ओळखतात, तर काही लोक देवाला ओळखत नाहीत. येशू
ख्रिस्त या जगात एक नवीन प्रकाश घेऊन आलेला होता.
आजच्या पहिल्या वाचनात आपण ऐकतो की, यशया संदेष्टा भाकीत करत होता की, एक तारा उगवणार आहे आणि तीन राजे त्या
राजाच्या शोधात येणार आहेत. ते तीन राजे सोनं,
ऊद आणि
गंधरस घेऊन त्या राजाला नमन करण्यासाठी येणार आहेत. आता हे तीन राजे कोण होते? असं म्हणतात की, ते तीन राजे खगोलशास्त्रज्ञ होते.
त्यांनी अंतराळात घडलेल्या घटनांचा अभ्यास केलेला होता आणि त्यांना एक तारा दिसला
होता.
होय,
माझ्या
प्रिय बंधू-भगिनींनो, आजचं दुसरं वाचन, जे संत पौलाने इफिसकरांस लिहिलेल्या
पत्रातून घेतलेलं आहे, ते वाचन आपल्याला सांगत आहे की, देवाचा प्रकाश प्रकट झालेला आहे. देवाची
कृपा आपल्यावर उतरलेली आहे आणि देवाचं बाळ आपल्यामध्ये आलेलं आहे; तारण आपल्यामध्ये प्रकट झालेलं आहे.
तसेच,
आजचे शुभवर्तमान
आपल्याला तीन मागी राजांविषयी सांगत आहे. देव वेळोवेळी आपल्याला प्रकट होत असतो.
त्या तीन राजांनी तारा बघितला—प्रकाश,
‘लाईट’. ह्या
ताऱ्याने त्यांना मार्गदर्शन केलं आणि हे तीन राजे येशू बाळाच्या शोधात आले होते.
ते हेरोद राजाला सुद्धा भेटले; परंतु नंतर
ताऱ्याने त्यांना मार्गदर्शन केलं आणि त्यांना येशू बाळ गव्हाणीत, मरिया आणि जोसेफ यांच्याजवळ भेटलं.
होय,
माझ्या
प्रिय बंधू-भगिनींनो, आपल्या जीवनामध्ये ‘प्रकाश’ किंवा ‘लाईट’
फार महत्त्वाची आहे. ज्यांना देवाचा प्रकाश मिळतो,
त्यांच्या
जीवनात उजेडच उजेड असतो. जेव्हा आपल्याला देव किंवा प्रकाश मिळतो, जेव्हा आपण देवाला ओळखतो, तेव्हा आपल्याला मार्ग सापडतो आणि जीवनात
आनंद येतो.
या संदर्भात एक अतिशय सुंदर घटना आहे.
मदर तेरेसा आणि त्यांच्या सिस्टर्सना मेलबर्नच्या बिशपांनी सेवा करण्यासाठी तिकडे
बोलावलं होतं. जेव्हा मदर तेरेसा आणि त्यांच्या सिस्टर्स मेलबर्न (ऑस्ट्रेलिया)
येथील या शहरात गेल्या, तेव्हा सर्वप्रथम त्यांनी तिकडे घरांना
भेटी देण्याचं ठरवलं. त्या घरांना भेटी देत होत्या. तेव्हा त्या एका घराजवळ गेल्या; तिथे फक्त एक साधी खोली होती आणि त्या
घराचं दार बाहेरून बंद होतं. मदर तेरेसा आणि त्यांच्या सिस्टर्सनी त्या घराचा
दरवाजा ठोठावला. काही वेळ कोणीच उघडलं नाही. नंतर जास्त वेळ दरवाजा ठोठावल्यानंतर, एका वयस्कर गृहस्थाने तो दरवाजा उघडला.
जेव्हा मदर तेरेसा आणि त्यांच्या सिस्टर्सनी आत बघितलं, तेव्हा तिकडे फक्त अंधार आणि जाळी होती.
मदर तेरेसा यांनी त्या व्यक्तीला
सांगितलं, “आम्ही सिस्टर्स आहोत, तुम्हाला मदत करण्यासाठी आलेलो आहोत.”
त्यांनी विचारलं, “तुमच्या घरात अंधार का?” तेव्हा ती व्यक्ती म्हणाली, “मला कोणीच भेटायला येत नाही, मी एकटा आहे. मग मी घर कोणासाठी साफ करू
आणि प्रकाश किंवा दिवा कोणासाठी लावू?”
मदर तेरेसा
यांनी त्या व्यक्तीची परवानगी घेतली आणि मान्यता मिळाल्यानंतर त्यांनी त्यांचं घर
साफ केलं. तेव्हा त्यांना तिथे एक सुंदर असा दिवा मिळाला. मदर तेरेसा यांनी
विचारलं, “तुम्ही हा दिवा का लावत नाही?” तो व्यक्ती म्हणाला, “मी कोणासाठी लावू?”
तेव्हा मदर तेरेसा यांच्या सिस्टर्सनी
सांगितलं, “जर आमच्या दोन सिस्टर्स तुम्हाला रोज
भेटायला आल्या, तर तुम्ही हा दिवा लावाल का?” त्यांनी ‘हो’ म्हटलं. मदर तेरेसा यांच्या
दोन सिस्टर्स रोज त्या व्यक्तीला भेटायला जाऊ लागल्या आणि तो व्यक्ती दिवा लावत
असे. मदर तेरेसा भारतात परत आल्या. त्यानंतर त्या व्यक्तीकडून मदर तेरेसा यांना एक
पत्र आलं. त्यात लिहिलं होतं, “मदर, आता मला तुमची आणि माझी ओळख पटलेली आहे.
आता तुमच्या सिस्टर्स मला भेटायला नाही आल्या तरी चालतील; मी तो दिवा रोज लावीन. कारण ख्रिस्ताचा
प्रकाश मला मिळालेला आहे, मला तो सापडलेला आहे.”
होय,
माझ्या
प्रिय बंधू-भगिनींनो, जी लोकं अंधारात होती, त्यांनी एक प्रकाश बघितला जो त्यांना
मार्गदर्शन करत होता. ख्रिस्त या जगात आला होता, जी लोकं अंधारात होती त्यांना
मार्गदर्शन करण्यासाठी, त्यांचं दुःख दूर करण्यासाठी आणि
त्यांच्यामध्ये एक नवीन आशा उत्पन्न करण्यासाठी.
जेव्हा आपण अडचणीत असतो, दुःखात असतो, तेव्हा देव आपल्या मदतीस धावून येत असतो.
देव नेहमी आपल्याबरोबर आहे. आजचा सोहळा आपल्याला तेच सांगत आहे की, देव आपल्यापासून दूर नाही. देव
आपल्यामध्ये आहे, देव आपल्याबरोबर आहे; परंतु आपण त्या देवाला ओळखलं पाहिजे. जो
कोणी देवाला ओळखतो, त्याच्या जीवनात नेहमीच प्रकाश प्रकट होत
असतो.
तर आजच्या या प्रगटीकरणाच्या सोहळ्याच्या
दिवशी, आपण आपल्यासाठी, स्वतःसाठी आणि सगळ्यांसाठी प्रार्थना
करूया. ज्याप्रमाणे या तीन राजांना,
ह्या तीन
मागी खगोलशास्त्रज्ञांना तारा दिसला आणि प्रकाश मिळाला; अगदी त्याचप्रमाणे, आपल्या सर्वांना सुद्धा आपल्या दररोजच्या
जीवनात येशू देव दिसावा. आपण त्याला ओळखावं आणि तो प्रकाश आपण सर्वांपर्यंत
पोहोचवावा, म्हणून आजच्या या दिवशी आपण विशेष
प्रार्थना करूया.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
धर्मगुरू: माझ्या प्रिय भाविकांनो, देव आपला प्रेमळ पिता
आहे. तो नेहमी आपली वाट पाहत असतो. आपल्या आनंदात, दु:खात,
यशात आणि अपयशात. तर आता मोठ्या विश्वासाने आणि नम्रतेने आपल्या
गरजा, इच्छा व आकांक्षा त्याच्यासमोर मांडूया.
प्रतिसाद: हे प्रभू, आम्हांला तुझा शोध करण्यास मदत कर
१) आपल्या ख्रिस्त सभेची धुरा वाहणारे आपले पोप लियो, सर्व धार्मिक अधिकारी ह्यांना
देव-राज्याची सुवार्ता जगजाहीर करण्यासाठी दैवी कृपा लाभावी म्हणून आपण प्रार्थना
करूया.
२) आपल्या देशातील अन्याय, अत्याचार आणि भेदभाव दूर होऊन सर्वत्र
शांततेचे वातावरण निर्माण व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३) जे तरुण-तरुणी नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना योग्य अशी नोकरी मिळावी व
आपल्या प्रत्येकाच्या काम धंद्यावर परमेश्वराचा आशीर्वाद असावा, म्हणून आपण प्रार्थना करूया.
४) स्नान-संस्काराद्वारे आपल्यावर असलेल्या ख्रिस्ती
जबाबदारीची आपणांस जाणीव व्हावी व स्नान-संस्काराच्या वचनांशी आपण सदैव एकनिष्ठ
राहावे म्हणून प्रार्थना करूया.
५) आपल्या धर्मग्रामातील ज्या व्यक्ती आजारी, निराशित आणि दुःखी-कष्टी आहेत, अशा सर्वांना दैवी-दयेचा स्पर्श होऊन
त्यांचे जीवन प्रभू प्रेमाने प्रफुल्लीत व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
६) थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक व
सामाजिक गरजांसाठी प्रार्थना करूया
धर्मगुरू: हे प्रेमळ पित्या, तू आमचा आधार, आमचा आश्रय आणि आमची शक्ती आहेस. आम्ही या सर्व प्रार्थना तुझ्या चरणी
नम्रतेने अर्पण करतो जेणेकरून आमच्या जीवनात आम्हाला प्रभू परमेश्वराचा प्रकाश मिळावा.
ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन.
No comments:
Post a Comment