Thursday, 8 January 2026

Reflections for the homily of the Baptism of the Lord (11-01-2026) by Br. Oliver Munis

प्रभूच्या बाप्तीस्माचा सण

पहिले वाचन: यशया  ४२:१-४, ६-७
दुसरे वाचन: प्रेषितांची कृत्ये १०:३४-४८
शुभवर्तमान: मत्तय ३:१३-१७


प्रस्तावना

ख्रिस्ताच्या सहवासात जमलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज आपण ‘प्रभू येशूच्या बाप्तिस्म्याचा सण’ साजरा करत आहोत. आजचा दिवस आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर देतो: “मी नक्की कोण आहे? जेव्हा येशूने यार्देन नदीत बाप्तिस्मा घेतला, तेव्हा स्वर्गातून देवाने त्यांची ओळख करून दिली: “हा माझा प्रिय पुत्र आहे.” जसा तो दिवस येशूसाठी महत्त्वाचा होता, तसाच आपला बाप्तिस्म्याचा दिवस आपल्यासाठीसुद्धा महत्त्वाचा आहे.

आपला बाप्तिस्मा म्हणजे केवळ एक जुना विधी नाही, तर ते आपल्या ख्रिस्ती जीवनाचे 'आयडेंटिटी कार्ड' (ओळखपत्र) आहे. तसेच आजची उपासना आपल्याला देवाने दिलेला प्रकाश आपण जगात कसा पसरवतोय, ह्याच्यावर विचारविनिमय करण्यास पाचारण करत आहे.

तर या पवित्र मिस्साबलिदानात सहभागी होताना, आपण आपल्या बाप्तिस्म्याच्या वचनांची आठवण करूया आणि देवाकडे प्रार्थना करूया की, त्याचे 'प्रिय लेकरू' म्हणून जगण्याचे बळ त्याने आपल्याला द्यावे म्हणून विशेष कृपा मांगुया.

चिंतन

विषय: आपली खरी ओळख आणि जबाबदारी

माझ्या प्रिय मित्रांनो, आजची वाचने ऐकताना जरा डोळे मिटून त्या दृश्याची कल्पना करा. यार्देन नदीचा काठ आहे. आजूबाजूला लोकांची गर्दी आहे आणि नदीच्या प्रवाहाचा आवाज येतोय. ह्या गर्दीत एक साधा माणूस म्हणून येशू उभा आहे. तो पुढे येतो आणि बाप्तिस्मा घेण्यासाठी पाण्यात उतरतो.

आणि तिथेच सर्व काही बदलते! येशू पाण्यातून वर येताच आकाश उघडते, पवित्र आत्मा त्याच्यावर उतरतो आणि देवाची वाणी घुमते: “हा माझा प्रिय पुत्र आहे, ज्याच्यावर मी प्रसन्न आहे.”  त्या एका क्षणाने येशूची खरी ओळख जगासमोर आली. तोपर्यंत लोक त्यांना फक्त एका ‘सुताराचा मुलगा’ म्हणून ओळखत होते, पण आता समजले की ते साक्षात ‘देवाचे पुत्र’ आहेत.

देवाने फक्त येशूची ओळखच करून दिली नाही, तर तिथूनच येशूच्या ‘कार्याची’ (Mission) सुरुवात झाली. त्यानंतर येशू शांत बसला नाही. तो गावोगावी गेला, त्यानी आजारी लोकांना बरे केले, तुटलेल्या मनांना आधार दिला आणि देवाचे प्रेम सर्वांपर्यंत पोहोचवले.

प्रिय बंधू-भगिनींनो, हे फक्त येशूच्या बाबतीत घडले असे नाही, तर बाप्तिस्म्याच्या दिवशी तुमच्या आणि माझ्या बाबतीतही हेच घडले आहे. आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आपल्याला ते आठवत नसेल, पण त्या दिवशी देवाने आपल्यावरही तेच प्रेम केले. देवाने तुमच्याकडे पाहून म्हटले: “तू माझे प्रिय लेकरू आहेस.” ही आपली खरी ओळख आहे. ही ओळख मिळवण्यासाठी आपल्याला काही कष्ट करावे लागले नाहीत किंवा परीक्षा द्यावी लागली नाही; हे देवाने दिलेले फुकट आणि अनमोल बक्षिश आहे. आपण कितीही मोठे झालो, कितीही चुका केल्या, तरी आपली ही ओळख कधीच पुसली जात नाही कारण आपण देवाचे आहोत!

परंतु बाप्तिस्मा म्हणजे फक्त ‘ख्रिस्ती’ हे नाव लावणे नव्हे. जसे येशू बाप्तिस्म्यानंतर सेवेसाठी बाहेर पडले, तसेच आपल्यालाही एक ‘मिशन’ मिळाले आहे. तुम्ही म्हणाल, “अहो, पण आम्ही काय करायचे? आम्ही काय धर्मगुरू किंवा सिस्टर्स नाही आहोत.” खरे मिशनरी कार्य हे चर्चच्या बाहेर, आपल्या रोजच्या साध्या जीवनात असते.

  • जेव्हा तुम्ही घरातल्या भांडणात शांतता आणता.
  • जेव्हा तुम्ही ऑफिसमध्ये किंवा कामावर योग्य प्रकारे वागता व व्यवहार करता.
  • जेव्हा तुम्ही एखाद्या गरजूला प्रेमाने मदत करता किंवा एखाद्याला मनापासून क्षमा करता. तेव्हा तुम्ही तुमचा बाप्तिस्मा जगत असता!

संत पोप जॉन पॉल (दुसरे) यांचे उदाहरण खूप प्रेरणादायी आहे. त्यांना एकदा कोणीतरी विचारले, “तुम्ही कोण आहात? तुमची सर्वात मोठी ओळख काय? ते म्हणाले नाहीत की “मी पोप आहे” किंवा “मी जगाचा नेता आहे.” पण त्यांनी अतिशय सुंदर उत्तर दिले. ते म्हणाले: “मी एक बाप्तिस्मा घेतलेला ख्रिस्ती माणूस आहे. माझ्या आयुष्यात मी जे काही चांगले केले, ते सर्व त्या एका गोष्टीमुळेच शक्य झाले.”

बाप्तिस्म्याच्या वेळी आपल्याला एक पेटती मेणबत्ती दिली जाते आणि सांगितले जाते, “ख्रिस्ताचा प्रकाश स्वीकारा.” हा प्रकाश कपाटात जपून ठेवण्यासाठी नाही, तर तो इतरांना देण्यासाठी आहे. सुप्रसिद्ध फ्लॉरेन्स नाईटिंगेल ह्यांनी हेच केले. त्यांनी रुग्णांची सेवा हे फक्त एक काम म्हणून केले नाही, तर देवाने दिलेली जबाबदारी म्हणून केले.

आज घरी गेल्यावर किंवा उद्या सकाळी जेव्हा तुम्ही आरशात बघाल, तेव्हा स्वतःला फक्त एक सामान्य माणूस समजू नका. स्वतःला सांगा: “मी देवाचे प्रिय लेकरू आहे.” आणि जेव्हा तुम्हाला प्रश्न पडेल की “माझ्या आयुष्याचे ध्येय काय? तेव्हा तुमचे उत्तर हेच असेल: “जिथे अंधार आहे, तिथे येशूच्या प्रेमाचा प्रकाश होणे.”

देव तुम्हा सर्वांना आपला बाप्तिस्मा आनंदाने जगण्याची शक्ती देवो.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

धर्मगुरू: माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, बाप्तिस्म्याद्वारे आपण सर्वजण देवाची लाडकी मुले झालो आहोत. ज्याप्रमाणे येशूच्या बाप्तिस्म्याच्या वेळी आकाश उघडले आणि देवाने आपली प्रसन्नता दर्शवली, त्याचप्रमाणे आज आपणही, पूर्ण विश्वासाने आणि आशेने आपल्या गरजा, आपल्या स्वर्गीय पित्याच्या चरणी अर्पण करूया.

प्रतिसाद: हे प्रभू, आमची प्रार्थना ऐक.

१. आपले परमगुरु पोप लियो, सर्व बिशप्स, धर्मगुरू आणि व्रतस्थ ह्यांच्यासाठी  प्रार्थना करूया की, जसे यार्देन नदीवर पवित्र आत्म्याने येशूला मार्गदर्शन केले, तसेच मार्गदर्शन त्यांना लाभावे. त्यांनी आपल्या बाप्तिस्म्याचे कार्य निष्ठेने पार पाडून, लोकांना देवाच्या प्रकाशाकडे आणि सत्याकडे घेऊन जावे. ही प्रार्थना आपण प्रभूचरणी करूया.

२. जगातील सर्व राष्ट्रनेत्यांसाठी आणि राज्यकर्त्यांसाठी प्रार्थना करूया की त्यांनी आपल्या अधिकाराचा वापर स्वतःच्या स्वार्थासाठी न करता, गरिबांच्या आणि शोषितांच्या हितासाठी करावा. प्रभू येशूने जसा न्यायाचा आणि दयेचा मार्ग दाखवला, त्या मार्गावर चालून त्यांनी जगात शांतता प्रस्थापित करावी. ही प्रार्थना आपण प्रभूचरणी करूया.

३. जे लोक आजारी आहेत, एकटे आहेत किंवा निराशेच्या अंधारात आहेत, त्यांच्यासाठी प्रार्थना करूया की, आजच्या सुवार्तेत सांगितल्याप्रमाणे, येशूने कोणालाही नाकारले नाही, तर सर्वांना बरे केले. त्याचप्रमाणे आपल्या समाजात जे उपेक्षित आहेत, त्यांना प्रभूच्या स्पर्शाने बरे वाटावे आणि आपल्या सेवेद्वारे त्यांना आशेचा किरण दिसावा. ही प्रार्थना आपण प्रभूचरणी करूया.

४. येथे जमलेल्या आपल्या सर्वांसाठी आणि आपल्या कुटुंबांसाठी प्रार्थना करूया की, बाप्तिस्म्याच्या दिवशी देवाने आपल्याला दिलेली त्याचे प्रिय लेकरू ही ओळख आपण जपावी. आपल्या रोजच्या जीवनात, घरात, कामावर आणि समाजात, आपण एकमेकांवर प्रेम करून ख्रिस्ताचे खरे साक्षीदार बनावे. ही प्रार्थना आपण प्रभूचरणी करूया.

५. थोडा वेळ शांत राहून आपल्या वयक्तिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.

धर्मगुरू : हे सर्वसमर्थ आणि प्रेमळ पित्या, तू तुझा पुत्र येशू याच्यावर प्रसन्न झालास आणि त्याला तुझा प्रिय पुत्र म्हटले. आज आम्ही तुझी मुले म्हणून केलेल्या या विनंत्यांचा दयाळूपणे स्वीकार कर. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आम्हाला भरून टाक, जेणेकरून आम्ही जगात तुझे प्रेम पसरवू शकू. ही प्रार्थना आम्ही आमचा प्रभू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन.


No comments:

Post a Comment