Reflections for the homily for Fourth Sunday in the Season of Lent (15/03/2026) by Fr. Trimbak Pardhi
प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज आपण उपवास काळातील चौथा रविवार साजरा
करीत आहोत. आजची उपासना आपल्याला एक अतिशय सुंदर आणि महत्त्वाचा संदेश देत आहे. तो
म्हणजे देव मनुष्याच्या बाह्य रूपाकडे पाहत नाही,
तर त्याच्या
अंतःकरणाकडे पाहतो, आणि येशू हा जगाचा खरा प्रकाश आहे.
आपल्या दैनंदिन जीवनात आपण अनेकदा
माणसांचे मूल्य त्यांच्या दिसण्यावर,
त्यांच्या
संपत्तीवर, पदावर किंवा यशावरून ठरवतो. परंतु देवाची
दृष्टी वेगळी असते. देवाला आपले बाह्य रूप नाही,
तर आपले
प्रेमळ, नम्र आणि विश्वासू हृदय महत्त्वाचे असते.
पहिल्या वाचनात देवाने संदेष्टा Samuel (शमुवेल) याला नवीन राजा निवडण्यासाठी
पाठवले. लोकांच्या दृष्टीने बलवान मुलगे योग्य वाटत होते, पण देवाने सर्वात लहान असलेल्या David (दावीद) याची निवड केली, कारण देव त्याच्या हृदयाकडे पाहत होता.
दुसऱ्या वाचनात संत पौल सांगतो की आपण
अंधारातून प्रकाशाकडे यायला हवे आणि प्रकाशाची मुले म्हणून जगायला हवे.
आजच्या शुभवर्तमानात येशू ख्रिस्त
जन्मतःच आंधळा असलेल्या माणसाला दृष्टी देतात. हा प्रसंग आपल्याला सांगतो की येशू
आपल्या जीवनाचा खरा प्रकाश आहे. आज आपणही त्याच्या प्रकाशात चालण्याचा प्रयत्न
करूया.
एकदा एका छोट्या गावात एक वृद्ध माणूस
राहत होता. तो रोज संध्याकाळी गावाच्या रस्त्यावरून आपल्या शेताकडे चालायला जात
असे. त्या काळात त्या गावात वीज नव्हती,
त्यामुळे
रात्री खूप अंधार असायचा. म्हणून तो वृद्ध माणूस नेहमी आपल्या हातात एक छोटासा दिवा
घेऊन चालत असे.
एके दिवशी एक तरुण त्याला पाहत होता.
त्याला आश्चर्य वाटले. तो हसत त्या वृद्ध माणसाला म्हणाला, "आजोबा,
तुमच्या
हातातील दिवा खूपच छोटा आहे. एवढ्या मोठ्या अंधारात त्याचा काय उपयोग? हा दिवा संपूर्ण रस्ता उजळू शकत
नाही."
वृद्ध माणूस शांतपणे हसला आणि प्रेमाने
म्हणाला, "बाळा,
तू बरोबर
बोलतोस. हा छोटासा दिवा संपूर्ण रस्ता उजळवत नाही. पण तो मला माझी पुढची पावले
स्पष्टपणे दाखवतो. मी ती काही पावले चालतो,
मग पुढचा
रस्ता पुन्हा दिसायला लागतो. अशा प्रकारे हळूहळू मी माझ्या शेताकडे पोहोचतो."
हे ऐकून तो तरुण थोडा विचारात पडला.
त्याला समजले की छोटा प्रकाशसुद्धा अंधारात खूप महत्त्वाचा असतो.
प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आजची तिन्ही वाचने आपल्याला सांगतात की, देव मनुष्याच्या बाह्य रूपाकडे नाही तर
अंतःकरणाकडे पाहतो आणि येशू जगाचा प्रकाश आहे,
हा सुंदर
संदेश मिळतो. देव आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे चालण्याचे आवाहन करतो. पाप, अहंकार आणि अज्ञान हा अंधार आहे, तर प्रेम,
सत्य आणि
विश्वास हा प्रकाश आहे.
पहिल्या वाचनात आपण पाहतो की, देवाने संदेष्टा शमुवेल याला दावीद याला
राजा म्हणून अभिषेक करण्यासाठी पाठवले. जेव्हा यिशयाचे मोठे आणि बलवान मुलगे समोर
आले, तेव्हा शमुवेलाला वाटले की यांच्यापैकी
कोणी राजा होईल. देवाने त्याला सांगितले,
"मनुष्य
बाह्य रूपाकडे पाहतो, पण परमेश्वर हृदयाकडे पाहतो."
शेवटी दाविदाला बोलावले गेले. तो सर्वात
लहान होता, साधा मेंढपाळ होता. बाहेरून पाहता, तो राजा होण्यास योग्य वाटत नव्हता, पण देवाने त्यालाच निवडले कारण त्याचे
हृदय देवावर प्रेम करणारे होते. आणि यावरून आपल्याला समजते की, देवाला संपत्ती, पद किंवा ताकद महत्त्वाची नाही; देवाला आपले प्रेमळ, नम्र आणि विश्वासू हृदय महत्त्वाचे आहे.
दुसऱ्या वाचनात संत पौल आपल्याला सांगतात
की, पूर्वी तुम्ही अंधार होता, पण आता प्रभूमध्ये प्रकाश आहात. म्हणून
प्रकाशाची मुले म्हणून जगा.
अंधार म्हणजे पाप, खोटेपणा,
मत्सर, द्वेष,
लोभ आणि
स्वार्थ. प्रकाश म्हणजे प्रेम, चांगुलपणा, सत्य आणि न्याय. जेव्हा आपण देवापासून दूर
जातो तेव्हा आपले जीवन अंधाराने भरते. पण जेव्हा आपण येशूच्या जवळ येतो तेव्हा
आपल्या जीवनात प्रकाश येतो. म्हणून संत पौल म्हणतात की, "झोपलेल्या माणसा, उठ! आणि ख्रिस्त तुला प्रकाश देईल."
याचा अर्थ असा की, आध्यात्मिक झोपेतून उठून देवाकडे वळणे
आवश्यक आहे.
आजच्या शुभवर्तमानात आपण एका जन्मतः अंध
असलेल्या माणसाची कथा ऐकतो. येशू त्या अंध माणसाला भेटतात. त्याच्या डोळ्यांवर
चिखल लावतात आणि त्याला सिलोह (सिलोहाम) तलावात जाऊन धुवायला सांगतात. तो तसे करतो
आणि त्याला दृष्टी मिळते.
हा चमत्कार फक्त शरीराच्या डोळ्यांचा नव्हता, तो आध्यात्मिक प्रकाशाचा चमत्कार होता.
त्या माणसाला फक्त डोळ्यांची दृष्टी मिळाली नाही,
तर त्याला
येशूवर विश्वासही मिळाला. शेवटी तो म्हणतो,
'प्रभू, मी विश्वास ठेवतो.'
होय माझ्या प्रिय भाविकांनो, आजच्या शुभवर्तमानात दोन प्रकारचे अंधपण
दिसतात:
१) शारीरिक अंधपण - जे त्या माणसाला होते, ते येशूने बरे केले.
२) आध्यात्मिक अंधपण - जे फरीश्यांना
(परुशांना) होते, जे अहंकारामुळे बरे होऊ शकले नाही.
आज आपण स्वतःला विचारूया, मी खरोखर देवाचा प्रकाश पाहतो का? की मीही अहंकार, मत्सर आणि स्वार्थामुळे आध्यात्मिकदृष्ट्या
अंध आहे?
बोधकथेत सांगितल्याप्रमाणे आपल्या
जीवनातही देवाचा प्रकाश हा छोट्याशा दिव्यासारखा असतो. देव आपले पुढचे पाऊल
टाकण्यास दिव्यासारखा पुढचा मार्ग दाखवत असतो. अनेक वेळा आपल्याला संपूर्ण
भविष्याचा मार्ग दिसत नाही. आपल्याला पुढे काय होईल याची चिंता वाटते. पण देव
आपल्याला प्रत्येक वेळी पुढचे योग्य पाऊल टाकण्यासाठी मार्गदर्शन करतो.
चला,
आज आपण
प्रार्थना करूया की, प्रभू आपल्या डोळ्यांना आणि आपल्या
अंतःकरणाला उघडो. आपण सत्य ओळखू शकू,
चांगुलपणाच्या
मार्गाने चालू शकू आणि आपल्या जीवनातून इतरांसाठीही प्रकाश बनू शकू. प्रभूचा
प्रकाश आपल्या जीवनात सदैव चमकत राहो आणि आपण त्या प्रकाशात विश्वासाने आणि
आनंदाने चालत राहू. आमेन.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद: “हे प्रभू, आम्हाला तुझ्या
प्रकाश्याची मुले बनव.”
१. आपण प्रार्थना करूया आपले
पोप महाशय, सर्व धर्मगुरू, धर्मभगिनी
व सर्व धार्मिक पुढाऱ्यांसाठी कि त्यांना परमेश्वराचे राज्य या जगात पसरविण्यासाठी शारीरिक बळ व
पवित्र आत्म्याचे समर्त्य लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. आज जगात तणावाचे वातावरण
पसरत आहे, आर्थिक समस्या व मंदी, युद्ध व नैसर्गिक आपत्तींना सर्व सामान्य माणूस बळी पडत आहे, ह्या सर्वांपासून
आपले रक्षण व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. जगाचा प्रकाश आपणास बनता
यावे व समाजात एकोपा, प्रेम व शांतीचे वातावरण पसरविण्यास आपण कणखर व्हावे
म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. अनेक युवक युवती देवापासून
दुरावलेले आहेत, त्यांना परमेश्वराचे पाचारण लाभावे व
ख्रिस्ताच्या प्रकाशयत त्यांनी त्यांच्या जीवनाची वाटचाल करावी म्हणून आपण
प्रार्थना करुया.
५. आपल्या गाव, वाड्यात,
कुटुंबात शांतीचे वातावरण प्रस्थापित व्हावे व ख्रिस्ताच्या
प्रकाश्याची मुले म्हणून आपण ओळखली जावी म्हणून आपण
प्रार्थना करूया.
No comments:
Post a Comment