Reflections for the homily for Fifth Sunday in the Season of Lent (22/03/2026) by Fr. Roshan Nato
ख्रिस्ताठायी जमलेल्या माझ्या प्रिय
भाविकांनो, आज आपण प्रायश्चित्त काळातील पाचवा
रविवार साजरा करत आहोत. आजची उपासना आपल्याला एक अतिशय सुंदर आणि नवीन आशेचा किरण
देणारा संदेश देते. अनेकदा जीवनात येणाऱ्या अडचणी,
दुःख, अपयश आणि आपल्या काही वाईट सवयींमुळे आपण
आतून खचून जातो. अशा वेळी आपल्याला वाटते की आता सगळं संपलंय आणि आपण जणू एका
अंधाऱ्या गर्तेत किंवा निराशेच्या कबरेत अडकलो आहोत.
पण आजची तिन्ही वाचने आपल्याला मोठा
दिलासा देतात की आपला देव हा आपल्याला नवीन जीवन देणारा देव आहे. पहिल्या वाचनात
देव आपल्याला आश्वासन देतो की, "मी तुमच्या
नैराश्याच्या कबरा उघडून तुम्हाला बाहेर काढेन." तर आजच्या शुभवर्तमानात येशू
ख्रिस्त मृत लाजरसाला पुन्हा जिवंत करून दाखवून देतो की तोच खऱ्या अर्थाने 'पुनरुत्थान आणि जीवन' आहे. येशू जसा लाजरसाच्या आणि त्याच्या
बहिणींच्या दुःखात सहभागी झाला आणि रडला,
तसाच तो
आपल्याही प्रत्येक दुःखात आपल्यासोबत असतो. आपली परिस्थिती कितीही कठीण असली किंवा
ती बदलणं अशक्य वाटत असलं, तरी देवाचा आत्मा आपल्या जीवनात परिवर्तन
घडवून आणू शकतो. त्यासाठी फक्त येशूवर आपला खंबीर विश्वास असायला हवा, अगदी जसा मार्थाचा होता.
तर आजच्या ह्या पवित्र मिस्सामध्ये आपण
देवाला विनंती करूया की त्याने आपल्यालाही आपल्या पापांतून आणि दुःखातून बाहेर
काढावं. देवाचा आत्मा आपल्यात वस्ती करो आणि आपल्याला एक नवीन, आनंदी आणि शांतीचं जीवन जगण्याची कृपा
मिळो, हीच प्रार्थना आपण या मिस्सा बलीदानात
करूया.
मनन चिंतन
ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, आज आपण प्रायश्चित्त काळातील पाचवा
रविवार साजरा करत आहोत. आजच्या दिवसाची उपासना आपण सर्वांना एक आशादायी संदेश देत
असताना सांगते की, आपला देव येशू ख्रिस्त हा मृत्यूवरही
सत्ता गाजवतो आणि आपल्या लोकांना नवीन जीवन बहाल करतो.
होय माझ्या
प्रिय भाविकांनो, अनेक वेळा आपल्या जीवनात आलेल्या निराशा, दुःख,
अपयश आणि
पाप ह्या प्रसंगांमुळे आपल्याला अंधारात अडकल्यासारखे वाटते. आणि ह्या सर्व प्रसंगांमुळे
आपल्याला कधी-कधी वाटते की आता आपल्या जीवनात काहीच बदल होऊ शकत नाही. परंतु आज
देवाचे वचन आपणास अगदी समजावून देत आहे की,
जिथे
आपल्याला सर्वकाही संपल्यासारखे वाटते,
तिथूनच देव
आपल्यासाठी एक नवीन जीवनाची सुरुवात करतो.
आजची तिन्ही वाचने हाच वरील संदेश
अधोरेखित करून आपणास सांगतात की, देवाचा
आत्मा आपल्या जीवनात नेहमी कार्य करत असतो,
आणि तोच
देवाचा आत्मा आपल्याला आपल्या पापांतून,
निराशेतून
आणि मृत्यूच्या अंधारातून आपणास बाहेर काढत असतो.
आजचे पहिले वाचन हे संदेष्टा एजेकीएल
(यहेज्केल) ह्या पुस्तकातून घेतलेले असून,
ह्या
वाचनाच्या माध्यमातून देव आपल्या इस्राएली लोकांना सांगतो की, "पाहा,
मी तुमच्या
कबरा उघडीन, आणि तुम्हास तुमच्या कबरांतून बाहेर
काढून इस्राएल देशात आणीन."
त्याकाळात
इस्राएली लोक, आपल्या परमेश्वराची निवडलेली प्रजा ही
निर्वासित अवस्थेत होती. त्यांना वाटत होते की,
आता त्यांचे
भविष्य संपले आहे. परंतु परमेश्वर ह्या आपल्या जनतेला आश्वासन देत एक नवीन आशा देत
सांगतो की, "मी माझा आत्मा तुमच्यात ओतीन आणि
तुम्हाला नवीन जीवन देईन."
होय माझ्या
प्रिय भाविकांनो, आपल्याही जीवनात कधी-कधी अशाच प्रकारची परिस्थिती उद्भवत असते.
आपल्या कुटुंबात होणारी भांडणं, त्यामुळे
आपण पारखे, आहारी जाऊन आपल्याला लागलेल्या वाईट सवयी
आणि त्यामुळे आपला विश्वास कमकुवत होऊन आपल्याला असे वाटू लागते की, आपल्याला या समस्येतून बाहेर पडणे अशक्य
आहे.
आज खुद्द परमेश्वर आपणास त्याच्या कृपेचे
दर्शन घडवीत आपणास सांगतो की, "मी तुमच्या
कबरा उघडीन" आणि तुम्हाला तुमच्या प्रत्येक समस्येतून बाहेर काढीन. म्हणून
देवाची कृपा कोणतीही अशक्य गोष्ट देखील शक्य करू शकते. ह्या सत्य वचनावर आपण आज
विश्वास ठेवणे हे खूप-खूप महत्त्वाचे आहे.
तसेच,
आजचे दुसरे
वाचन संत पौलाने रोमकारांस पाठवलेल्या पत्रातून घेतलेले असून, संत पौल या पत्राद्वारे आपणास सांगत आहे
की, जे लोक केवळ देहाच्या इच्छेनुसार जगतात, ते देवाला संतुष्ट करू शकत नाहीत. परंतु
जेव्हा देवाचा आत्मा आपल्या जीवनात वास करतो,
तेव्हा त्या
आत्म्याच्या सहाय्याने आपले जीवन बदलते. आणि ज्या आत्म्याने येशू ख्रिस्ताला
सुद्धा मृत्यूतून उठवले, तोच देवाचा आत्मा आपल्यालाही नवीन जीवन
देण्यास समर्थ आहे. आणि याचा अर्थ केवळ भविष्यातील पुनरुत्थान नव्हे, तर आपले आत्ताच्या जीवनातील बदल होय.
आणि म्हणून, जेव्हा आपण प्रार्थना करतो, इतरांना क्षमा करतो, गरजू व्यक्तींना मदत करतो आणि देवाच्या
मार्गाने चालतो, तेव्हा देवाचा आत्मा आपल्या जीवनात कार्य
करून आपल्याला नवीन जीवनाची आशा देत आपले जीवन बदलत असतो.
आजच्या
दिवसाचे शुभवर्तमान हे योहान लिखित शुभवर्तमानातून घेतलेले असून, ते आपणास मृत लाजरसाला मरणातून उठवल्याचा
संदर्भ आपणास सांगत आहे. जेव्हा लाजरस मरण पावला होता आणि त्याच्या बहिणी, मार्था आणि मेरी ह्या आपल्या बंधूच्या
जाण्याने दुःख व्यक्त करत होत्या. तेव्हा येशू ख्रिस्त सुद्धा त्यांचे दुःख पाहून, आपल्या मित्रासाठी रडताना आपण आजच्या
शुभवर्तमानामध्ये ऐकतो.
ह्या
शोकाकुल संदर्भावरून आपणास समजून येते की,
येशू
ख्रिस्त हा आपल्या सुद्धा दुःखात नेहमी सहभागी होत असतो.
तदनंतर येशू ख्रिस्त आपल्या एका महान
सत्याचा उलगडा करून सांगतो की, "पुनरुत्थान
आणि जीवन मीच आहे; आणि जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो तो
जरी मेला तरी जगेल."
आणि ह्याच एका सत्यावर विश्वास ठेऊन
मार्था उत्तर देताना सांगते की, "हो प्रभू, माझा विश्वास आहे." आणि पुढे येशू
लाजरसाला मोठ्याने हाक देऊन कबरेतून बाहेर बोलावतो,
आणि लागलीच
तो उठून उभा राहतो. हा चमत्कार आपणास दाखवून देतो की, कशाप्रकारे येशू ख्रिस्त मृत्यूवर सुद्धा
आपले प्रभुत्व गाजवतो.
एका गावात जॉन नावाचा एक व्यक्ती राहत
होता. तो अनेक वाईट सवयींच्या आहारी जाऊन त्याच्या त्या सवयींमध्ये तो अगदी अडकून
किंवा गुरफटून गेला होता. त्याच्या ह्या विचित्र सवयींमुळे त्याचे चांगले असे
कुटुंब विस्कळीत होऊन तुटण्याच्या मार्गावर होते. आणि म्हणून आपले कुटुंब
तुटण्याच्या मार्गावर पाहून त्याची स्वतःला लाज वाटत होती. आणि आपलं कुटुंब
तुटण्याची त्याला भीती देखील होती. तेव्हा तो एके दिवशी आपल्या मनावर ताबा ठेवून
आपल्या देवळात जातो. तेथे तो आपलं मन शांत ठेवून एकदम हृदयातून प्रार्थना करतो. तो
देवाकडे आपले मन परिवर्तन होऊन आपल्या सर्व वाईट सवयींतून आपली सुटका व्हावी
म्हणून तो देवाकडे मदतीची प्रार्थना करतो आणि थोड्या वेळात तो तिथून निघून जातो.
काही दिवसांनी हळूहळू त्याचे जीवन अगदी
बदलून जाते. त्याच्या वाईट सवयी पूर्णपणे बंद होतात. त्याचे मोडकळीस आलेले कुटुंब
पुन्हा आनंदी होते.
आणि हे सर्व दृश्य बघून, त्या गावातील लोक सुद्धा आश्चर्य व्यक्त
करतात. आणि तेव्हा जॉन सर्व गावातील लोकांना आपली साक्ष देत सांगतो की, "देवाने मला माझ्या वाईट सवयींच्या
अंधारातून बाहेर काढले आहे."
ह्या बोधकथेच्या गोष्टीवरून आपणास समजून
येते की, देव कोणत्याही व्यक्तीला नवीन जीवन
देण्यास समर्थ आहे.
होय माझ्या प्रिय भाविकांनो, आजच्या ह्या
उपासनेद्वारे आपणास तीन महत्त्वाचे संदेश मिळतात:
पहिला म्हणजे, देव आपल्याला आपल्या निराशेच्या कबरेतून
बाहेर काढत असतो.
दुसरा म्हणजे, देवाचा आत्मा आपल्या जीवनात नवीन
परिवर्तन घडवून आणतो.
आणि तिसरा व महत्त्वाचा संदेश म्हणजे,
येशू
ख्रिस्त हाच खरे पुनरुत्थान व जीवन आहे.
म्हणून त्याच ख्रिस्तावर पूर्ण विश्वास
ठेऊन, आपल्या निराशेच्या अंधारातून मुक्त
होण्यास, व देवाचा आत्मा जो आपल्या मध्ये वस्ती
करतो त्याच्या सामर्थ्याने प्रेम, क्षमा, आणि शांतीचे जीवन जगून, येशू ख्रिस्तामधील नवीन जीवन जगण्यास
कृपा मिळावी म्हणून प्रार्थना करूया. नवीन जीवनाचा आस्वाद व अनुभव घेण्यास कृपा
मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद: “हे दयावंत प्रभू आमची प्रार्थना ऐक.”
१. आपण आपले परमगुरु पोप लियो, सर्व बिशप्स, धर्मगुरु, धर्मभगिनी, धर्मबंधू
यांच्यासाठी विशेष प्रार्थना करूया की, प्रभू परमेश्वराची सुवार्ता प्रचाराचे कार्य त्यांनी आनंदाने व धैर्याने करावे
व त्यांचा विश्वास नेहमी मजबूत राहावा म्हणून प्रार्थना करूया.
२. आपण सर्व ख्रिस्ती लोकांसाठी विशेष प्रार्थना करूया, त्यांचा विश्वास मजबूत व्हावा व धैर्याने, आनंदाने
येशूची सुवार्ता त्यांनी सर्वत्र पसरवावी
म्हणून त्यांच्यासाठी विशेष
प्रार्थना करूया.
३. आपण सर्वांनी ऐहिक सुखाच्या मागे न लागता, परमेश्वराच्या सानिध्यात थोडा वेळ घालवावा व येशूप्रमाणे
आपलेही रूपांतर व्हावे म्हणून आपण प्रार्थना करू या.
४. आपण जे आजारी आहेत, जें दु:खी आहेत, अडचणीत आहेत यांसाठी प्रार्थना करूया, प्रभू येशूने त्यांना स्पर्श करून त्यांना बरे करावे व
त्यांना चांगले आरोग्य लाभावे व त्यांच्या अडचणी दूर व्हाव्या म्हणून विशेष
प्रार्थना करूया.
५. आपण
आपल्या सामाजिक व वैयक्तिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.
No comments:
Post a Comment