Reflections for the homily for Palm Sunday (29/03/2026) by Fr. Reon Andrades
झावळ्यांचा रविवार
दिनांक: २९/०३/२०२६
पहिले वाचन: यशया
५०:४-७
दुसरे वाचन: फिलिपिकरांस पत्र २:६-११
शुभवर्तमान: मत्तय
२६:१४-२७:६६
प्रस्तावना
प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो,
आजचा झावळ्यांचा रविवार आपल्याला एक
अतिशय महत्त्वाचा संदेश देतो. निवडणुकीच्या काळात जसे आपण विविध पक्ष, त्यांचे नेते आणि त्यांचा जाहीरनामा
पाहून विचारपूर्वक निर्णय घेतो, तसेच आज आपल्या जीवनाबद्दल एक खोल निर्णय
घ्यायची वेळ आली आहे. हा निर्णय फक्त बाह्य गोष्टींबद्दल नाही, तर आपल्या विश्वासाचा, आपल्या जीवनमार्गाचा आणि आपण कोणाच्या
मागे चालतो याचा आहे.
आज आपण आनंदाने “होसान्ना” म्हणत येशूचे
स्वागत करतो. आपण झावळ्या हलवत त्याच्या मिरवणुकीत सहभागी होतो. पण त्याच वेळी
आपल्याला आठवण करून दिली जाते की येरुसलेममध्ये त्या दिवशी दोन वेगळ्या मिरवणुका
होत्या – एक सत्तेची, ताकदीची आणि
भीतीची; आणि दुसरी
नम्रतेची, प्रेमाची
आणि सेवाभावाची.
येशूची मिरवणूक ही आपल्याला जवळ घेणारी, आपल्याला देवाची मुले बनवणारी मिरवणूक
आहे. तो आपल्यावर काहीही लादत नाही, तर प्रेमाने आपल्याला आमंत्रण देतो. पण
त्याच वेळी आपल्याला हेही लक्षात ठेवावे लागते की “होसान्ना” म्हणणारेच लोक पुढे
“क्रूसावर खिळा” असेही ओरडले. म्हणूनच आज आपल्याला फक्त बाह्य सहभाग नको, तर अंत:करणातून आलेला ठाम निर्णय हवा
आहे.
म्हणून या पवित्र मिस्साच्या सुरुवातीला
आपण स्वतःला विचारूया कि, मी खरोखर येशूच्या मार्गाने चालतो आहे का? मी त्याच्या प्रेमाचा, क्षमेचा आणि सेवाभावाचा स्वीकार करतो आहे
का? या सर्व
भावनांसह, आपल्या
अंत:करणात नवा निर्णय घेऊन, आपण ही पवित्र मिस्सा भक्तीभावाने आणि
एकाग्रतेने सहभाग घेऊया.
मनन चिंतन
निवडणुकीची वेळ आली की आपण एक वेगळंच
चित्र पाहतो. विविध पक्षांच्या मिरवणुका निघतात, घोषणा दिल्या जातात, लोक मोठ्या संख्येने सहभागी होतात. आपणही
कधी ना कधी अशा मिरवणुकांचा भाग होतो. पण त्याआधी आपण विचार करतो कि हा उम्मेद्वार
कोणाचा माणूस आहे, आपला ओळखीचा
आहे का, ह्याला मत
दिल तर मला काही फायदा होईल का? अनेक वेळा आपण त्याच्या पक्षाचा जाहीरनामा पाहतो व
तो आपल्याला पटतो का? असा विचार करतो. काहीजण नातेसंबंधामुळे सहभागी होतात, काहीजण पैशासाठी, तर काहीजण विचारपूर्वक निर्णय घेतात.
शेवटी, कोणत्या
पक्षाला समर्थन द्यायचे हा निर्णय आपलाच असतो. आजचा हा झावळ्यांचा रविवार आपल्याला
हाच प्रश्न विचारतो – आजही एक निर्णय घ्यायचा आहे. पण हा निर्णय फक्त बाह्य किंवा
राजकीय नाही, तर आपल्या
जीवनाचा, आपल्या
विश्वासाचा निर्णय आहे.
आज आपण मिरवणुकीने चर्चमध्ये आलो, “होसान्ना” म्हणत येशूचे स्वागत केले. पण
जर आपण थोडं खोलात जाऊन पाहिलं तर आपल्याला कळून चुकेलकि, येरुसलेममध्ये त्या दिवशी / काळात फक्त
एकच मिरवणूक नव्हती, तर दोन
मिरवणुका निघाल्या होत्या.
अ. पहिली मिरवणूक
होती पिलाताची. ही सत्ता, ताकद, भीती आणि नियंत्रण यांची मिरवणूक होती.
घोडेस्वार सैनिक, शस्त्रांनी
सज्ज सैन्य, शक्तीचे
प्रदर्शन. सामान्य, गरीब आणि
दुर्बल लोक फक्त दूरून पाहू शकत होते; त्यांना त्यात सहभागी होता येत नव्हतं.
वल्हांडण सणाच्या काळात लाखो यात्रेकरू येरुसलेममध्ये येत असत, त्यामुळे शिस्त राखण्यासाठी आणि बंडखोरी
टाळण्यासाठी पिलात आपले सैन्य घेऊन शहरात येत असे. तो हेरोदाच्या राजमहालात राहत
असे, जिथे
सत्तेच्या योजना आखल्या जात होत्या. ही मिरवणूक लोकांना जवळ आणत नव्हती, तर त्यांना घाबरवत होती, दूर ठेवत होती.
ब. दुसरी
मिरवणूक होती येशूची. तो घोड्यावर किंवा हत्तीवर नाही, तर गाढवीच्या शिंगरावर बसून येतो.
संदेष्टा झकरया सांगतो, “पाहा, तुमचा राजा
तुमच्याकडे येतो; तो विजयी आहे, पण विनम्र
आहे.” येशूची ही
मिरवणूक नम्रतेची, प्रेमाची
आणि शांतीची आहे. येथे लोक फक्त प्रेक्षक नाहीत, तर सहभाग घेताना आपणास दिसतात. ते आपली
वस्त्रे पसरवतात, झावळ्या
हलवतात आणि आनंदाने “होसान्ना” म्हणतात.
येशूचाही एक जाहीरनामा आहे – “देवाचे
राज्य.” या राज्यात सत्ता नाही, तर सेवा आहे; द्वेष नाही, तर प्रेम आहे; नाकारलेल्यांना स्थान आहे; पाप्यांना क्षमा आहे; आणि प्रत्येकाला नव्याने सुरुवात
करण्याची संधी आहे. योहान सांगतो, “जितक्यांनी त्याचा स्वीकार केला, त्यांना
देवाची मुले होण्याचा अधिकार मिळाला.” म्हणजेच, या देवाच्या राज्यात आपण परके किंवा
गुलाम नसून, देवाची मुले
बनतो.
पिलात सत्तेच्या राजवाड्यात प्रवेश करतो, पण येशू देवाच्या मंदिरात प्रवेश करतो.
कारण त्याचा उद्देश सत्ता मिळवणे नाही, तर माणसाला देवाशी जोडणे आहे. तो
आपल्याला शांती, प्रेम, क्षमा आणि सन्मान देण्यासाठी येतो. पण
इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी. ज्यांनी त्या दिवशी “होसान्ना”
म्हटलं, त्याच
लोकांनी काही दिवसांनी “क्रूसावर खिळा” असंही ओरडलं. याचा अर्थ, फक्त मिरवणुकीत चालणं पुरेसं नाही. आपला
निर्णय स्थिर, खरा आणि
अंत:करणातून आलेला असायला हवा.
म्हणून आज
आपण स्वतःला विचारूया – मी कोणत्या मिरवणुकीत सहभागी आहे? अ. पिलाताच्या मिरवणुकीत ब. येशूच्या मिरवणुकीत
अ. मी
पिलाताच्या मिरवणुकीत आहे का, जिथे सत्ता, स्वार्थ आणि भीती आहे?
ब. की
येशूच्या मिरवणुकीत आहे, जिथे नम्रता, सेवा आणि प्रेम आहे?
अ. पिलाताच्या
मिरवणुकीत लोकांचा सहभाग निष्क्रिय आहे – ते फक्त बघतात.
ब. येशूच्या मिरवणुकीत
सहभाग सक्रिय आहे – लोक स्वतःहून पुढे येतात, सहभागी होतात.
अ. पिलाताच्या
मार्गावर आपण सेवक किंवा गुलाम बनतो.
ब. येशूच्या
मार्गावर आपण देवाची मुले बनतो.
देव आपल्यावर काहीही लादत नाही. तो
आपल्या स्वातंत्र्याचा आदर करतो. तो जबरदस्ती करत नाही. तो फक्त आपल्याला आमंत्रण
देतो. निर्णय आपला आहे… आणि त्या निर्णयाची जबाबदारीही आपलीच आहे. आजचा हा
झावळ्यांचा रविवार आपल्याला स्पष्ट आवाहन करतो कि, फक्त “होसान्ना” म्हणणारे न
राहता, येशूच्या
मार्गाने खऱ्या अर्थाने चालणारे बनूया. त्याच्या प्रेमाचा, सेवाभावाचा आणि क्षमेचा साक्षीदार बनूया आणि
या पवित्र आठवड्यात, त्याच्या
दु:खातही त्याच्यासोबत निष्ठेने राहूया.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद: ‘हे दयावंत पिता
आमची प्रार्थना ऐकून घे.’
१. ख्रिस्त सभेची धुरा वाहणारे, पोप महाशय, बिशप्स, कार्डीनल्स, सर्व धर्मगुरु व व्रतस्त जे ख्रिस्ताच्या मळ्यात कार्यरत आहेत, ह्या सर्वाना परमेश्वराचा आशीर्वाद लाभावा व त्यांनी देवाचे
कार्य अखंडित चालू ठेऊन एक उत्तम जीवनाचा धडा लोकांपर्यंत पोहचवावा म्हणून आपण
प्रार्थना करुया.
२. जे लोक देऊळ मातेपासून दुरावलेले आहेत त्यांनी जगाची पापे
दूर करणाऱ्या देवाच्या कोकराला ओळखावे व ख्रिस्ताच्या प्रकाशात त्यांचे मनपरिवर्तन
व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. हा पवित्र आठवडा चांगल्या रीतीने व्यतीत करावा व येशूच्या
दुःखसहनात सहभागी होऊन दुसऱ्यांना येश्याच्या जवळ बोलावून घ्यावे म्हणून प्रार्थना
करूया.
४. जे लोक दुःखी, कष्टी व आजारी आहेत त्यांना प्रभूच्या स्पर्शाने चांगले आरोग्य लाभावे व
त्यांचे जीवन सुखी व समाधानी बनावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. आपण आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक गरजांसाठी प्रार्थना करूया.
No comments:
Post a Comment