Thursday, 22 October 2026

Reflections for the Homily of 30th Sunday in Ordinary Time (25-10-2026) By Br. Criston Marvi

सामान्य काळातील तिसावा रविवार

दिनांक: २५/१०/२०२६
पहिले वाचन: निर्गम २२:२०-२६
दुसरे वाचन: १ थेस्सलनीकाकरांस १:५-१०
शुभवर्तमान: मत्तय २२:३४-४०
 

 
प्रस्तावना:

प्रिय भाविकानो, आज देऊळ माता सामान्य काळातील तिसावा रविवार साजरा करत आहे. आजची उपासना हि आपल्याला “संपूर्ण मनाने देवावर प्रेम आणि शेजाऱ्यावर खरे प्रेम करण्यास बोलावत आहे. येशू ख्रिस्ताने दिलेल्या ह्या नवीन आज्ञातून आपल्याला दिसून येते की, येशू ख्रिस्ताने कोणालाही तुच्छ मानले नाही तर सारखाच मान- सन्मान दिला. आपल्या देवावर व शेजाऱ्यावर प्रेम कर म्हणजे नैतिक नियम आणि विधी विषयक नियम नियमितपणे पाल.

पहिल्या वाचनात देव इस्राएली लोकांस मांगणी करून सांगत आहे कि आपल्या उपऱ्यास योग्य तो न्याय दे. आणि दुसऱ्या वाचनात संत पौल थेस्सलनीकर लोकांची त्यांच्या कामामुळे व श्रध्येमुळे त्यांची प्रशंसा करात आहे. आणि शुभवर्तमान प्रेमाचा संदेश देत आहे. ह्या मिस्सा बलीदानात सहभागी होत असताना प्रार्थना करूया कि, देवावर व शेजाऱ्यावर प्रेम करण्यास योग्य ती कृपा मिळावी जेणेकरून आपल्याला पावित्र्याचे जीवन मोकळ्या मानाने जगता येईल.

बोधकथा : खरी पवित्र मिस्सा

एक धर्मगुरू चर्चमध्ये नेहमी शिकवन देत असताना म्हणत असत की, देवावर प्रेम करणे आणि शेजाऱ्यावर प्रेम करणे हे एकमेकांपासून वेगळे होऊच शकत नाही. एका गावातील जोसेफ नावाचा एक श्रद्धाळू ख्रिस्ती माणूस तासनतास चर्चमध्ये परमेश्वराची आराधना करायचा. आपल्यासाठी हेच ईश्वरावरचे सर्वोच्च प्रेम आहे असे त्याला नेहमी वाटत असे.

एका रविवारी त्याच्या गावात प्रचंड वादळी पाऊस सुरू झाला. जोसेफ पवित्र मिस्सा बळीदानासाठी घाईघाईने चर्चकडे निघाला. चर्चच्या दाराजवळ पोहोचताच त्यांला एका बाजूला कण्हण्याचा आवाज आला. त्यांनी पाहिले तर त्यांचा शेजारी सायमन, चिखलात पडला होता आणि तापाने थरथरत होता.

जोसेफ क्षणभर रेंगाळला, “जर मी थांबलो, तर माझी मिस्सा चुकेल.” पण लगेचच त्यांला बायबलमधील येशूचे वचन आठवले: “ज्याअर्थी तुम्ही ह्या माझ्या कनिष्ट बंधुपैकी एकाला केले, त्याअर्थी ते मला केले आहे” (मत्तय २५:४०). जोसेफने  दयेचा मार्ग निवडला. त्यांनी सायमनला उचलले, त्याच्या घरी नेले, उबदार कपडे दिले आणि बरे वाटेपर्यंत त्याची सेवा केली.

त्या रात्री प्रार्थना करताना जोसेफच्या मनाला अथांग शांती लाभली. त्यांनी जणू प्रभू येशूचा आवाजच एकाला: “जोसेफ, आज तुझी मिस्सा चुकली नाही. संकटात सापडलेल्या शेजाऱ्यावर प्रेम करून तू माझ्यावरच प्रेम केलेस. हेच तुझे खरे देवपूजन आहे.”

मनन चिंतन:

“प्रेमाने भरलेले आयुष्य हे संपत्तीच्या भंडारापेक्षा अधिक समृद्ध असते”. परमेश्वराचे प्रेम अनुभवण्यासाठी एकत्रित जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो. आजची उपासना ही आपल्याला प्रेम हा आपल्या नात्यासंबंधित महत्त्वाचा गाभा आहे याविषयी सांगत आहे. दुसरे व्हॅटिकन विश्व परिषद ल्युमन जन्शीम्य या विश्व पत्रकामध्ये अध्याय पाच मध्ये आपणास ऐकावयास मिळते की “पावित्र्यता ही देवावर व शेजाऱ्यावर प्रेम करण्यामध्ये आहे”.

देवावर प्रेम व शेजाऱ्यांवर प्रेम हे दोन्ही घटक आपण वेगळे करूच शकत नाही. कारण की देवावर असलेले खरे प्रेम हे आपल्याला शेजाऱ्यांवर प्रेम करण्यास पुढे सरसावत असते. बहुतेक वेळा आपण देवावर प्रेम करत असताना जास्त महत्त्व हे आपण नियम आणि विधीसंबंधीत यावर देऊन बाहेर देखावा करून शेजारी धर्म विसरतो व शेजाऱ्यांचा आपल्याला कधीच कळवला येत नाही.

शुभवर्तमानामध्ये विचारण्यात आलेला प्रश्न नियमशास्त्रातील सर्वात मोठी आज्ञा. सर्वात मोठी आज्ञा हि की प्रेमाने आपल्या अंतकरणाचे झालेले परिवर्तन. पहिल्या वाचनात आपण ऐकले की परमेश्वर हा स्वतः करुणामय आहे. म्हणून तो फक्त त्याच्याच इस्राएली लोकांची करुणा जाणत नाही तर त्याचे इस्राएली लोक ज्या ठिकाणी राहत आहेत त्या लोकांची सुद्धा तो करुणा जाणत आहे. परमेश्वर त्यांना उपऱ्यास योग्य तो न्याय देण्यास सांगत आहे. आणि अन्याय करणाऱ्यास चेतावणी देत आहे. परमेश्वर त्या उपऱ्या विषयी संवेदनशील होता. आजच्या ह्या आधुनिक युगात सुद्धा आपण आपल्या आजूबाजूला पाहतो की अनेक स्थलांतरित लोक राहत आहेत. येशू ख्रिस्ताचे खरे शिष्य म्हणून अशा लोकांवर लक्ष केंद्रित करून त्यांचे स्वागत करणे, त्यांच्यासाठी त्यांच्या हक्कासाठी झटणे, त्यांचे संरक्षण करणे ही आपली एक धार्मिक जबाबदारी आहे. म्हणून स्वर्गीय पोप फ्रान्सिस यांनी दिलेले एक पत्र “सर्व बंधू आणि भगिनी” या विश्वकोशात पोपसाहेब सांगतात की, "जगात अस्तित्वात असलेल्या असमानतेबाबत कोणीही असमवेदनशील राहू शकत नाही” (FT 125).

तसेच आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौलाचे  थेस्सलनिकरांस पाठवलेल्या पत्रात दिसून येते की परमेश्वरावर असलेली श्रद्धा ही केवळ शब्दापूरती किंवा वैयक्तिक धार्मिकतापुरतीच मर्यादित नव्हे तर नातेसंबंध आणि दैनंदिन परस्परास संवाद सुद्धा आहे. हाच खरा शेजार धर्म होय.

देवावर आणि शेजाऱ्यावर प्रेम करणे म्हणजे देवाचा शब्द ऐकून, तो आत्मसात करून, आपल्या मुखातून व कृतीतून इतरापर्यंत पोहोचला पाहिजे. आपले शेजारी म्हणजे फक्त आपल्या जवळचेच नातेवाईक नव्हे तर प्रत्येक व्यक्ती, गरजवंत, असुरक्षित, इत्यादी होय. प्रेम हे पवित्र आत्म्याच्या फळांपैकी पहिले फळ आहे. संत पौल करंथीकरास पहिल्या पत्रात सांगतात की “प्रेम हे श्रद्धा आणि आशा ह्यापेक्षा अधिक महान आहे. येशू ख्रिस्ताने ही फक्त एक आज्ञा दिली नाही तर त्या आज्ञाचे पालन सुद्धा केले आणि स्वतः भुकेल्यास अन्न देऊन, आजारास निरोगी देऊन, बुडणाऱ्यास जीवदान देऊन, शेवटी स्वतःचा प्राण अर्पण करून प्रेमाचे देव आणि त्याच्या लोकांबरोबर हरवलेले नाते पुन्हा मिळवून दिले.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: हे प्रेमळ परमेश्वरा आमची प्रार्थना ऐक.

१. हे प्रभू परमेश्वरा, ख्रिस्त सभेचा कारभार सांभाळणारे आमचे पोप लिओ चौदावे, सर्व कार्डीनल्स, बिशप्स, धर्मगुरू, धर्म भगिनी व सर्व श्रद्धावंतांना तुझ्या पवित्र आत्म्याच्या दानाने भरून काढ. जेणेकरून आम्ही सर्वजण तुझे प्रेम दैनंदिन जीवनात अनुभवू. त्याचप्रमाणे तुझे प्रेम इतरांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला कृपा दे. म्हणून आपण प्रभु परमेश्वराकडे प्रार्थना करूया.

२. हे प्रभू परमेश्वरा, शाळा - कॉलेजात शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आम्ही प्रार्थना करतो की लवकरच त्यांच्या सुरू होणाऱ्या प्रथम सत्रांत परीक्षेला सामोरे जाण्यास त्यांना पवित्र आत्म्याने आशीर्वादित कर. अभ्यास करण्यासाठी त्यांच्या मध्ये गोडी निर्माण कर. तसेच परीक्षेच्या काळात त्यांना आनंदी व निरोगी ठेव. म्हणून आपण प्रभु परमेश्वराकडे प्रार्थना करूया.

३. हे प्रभू परमेश्वरा तुझ्या आज्ञा पाळण्यास आम्हाला तुझी कृपा दे. जेणेकरून पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्ही एकमेकांमध्ये वस्ती करू. आम्हाला संवेदनशील व दयाळू बनव. व ज्या व्यक्ती संपर्कात येतील त्यांना आम्ही दुःख न देता नेहमी प्रेम व आनंद देऊ शकू. म्हणून आपण प्रभु परमेश्वराकडे प्रार्थना करूया.

४. हे प्रभू परमेश्वरा सर्व शेतकरी बांधवांसाठी आम्ही प्रार्थना करतो की, ह्या त्यांच्या कापणीच्या हंगामात त्यांना योग्य ते त्यांच्या मेहनतीचे फळ दे. नैसर्गिक आपत्तीपासून त्यांचे रक्षण कर. व हवे असलेल्या कृपेचा व दानांचा त्यांच्यावर वर्षाव कर. म्हणून आपण प्रभु परमेश्वराकडे प्रार्थना करूया.

५. हे शाश्वत जीवनाच्या प्रभु परमेश्वरा, मृत्यी पावलेल्या सर्व मृत्यू आत्म्यावर तुझी दया दृष्टी वळवा. व त्यांच्या पापांची क्षमा करून त्यांना स्वर्गीय नंदनवनात सहभागी कर. म्हणून आपण प्रभु परमेश्वराकडे प्रार्थना करूया.



No comments:

Post a Comment