Tuesday, 19 November 2013

Leon D’Britto hails from St. Joseph Church, Umrala, Vasai. He belongs to the St. Bonaventure Capuchin Province, Maharashtra. Presently, he is pursuing his theological studies at JDV, Pune. As he is passionate reader and creative thinker he likes to venture in the new field of knowledge. This homily comes to us with Theological reflection with a biblical perspective.





सामान्य काळातील चौतिसावा रविवार
ख्रिस्तराजाचा  सण
२४/११/२०१३
पहिले वाचन - २ शमुवेल ५:१-३
दुसरे वाचन – कलस्सेंकरांस पत्र १:१२-२०
शुभवर्तमान - लूक २३:३५-४३

प्रस्तावना
आज ख्रिस्तसभा ख्रिस्तराजाचा सण साजरा करीत आहे आपणा सर्वांस पुन्हा एकदा आठवण करून देत आहे कि ख्रिस्त हाच खरा राजा आहे. तो राजांचा राजा आहे. तो फक्त ह्या विश्वाचा राजा नसून तो आपल्या कुटुंबाचा, आपल्या शरिराचा, आत्म्याचा प्रत्येक इंद्रियांचा राजा आहे. आजच्या पहिल्या वाचनात इस्रायली प्रजा दावीद राज्याकडे कशी येते दावीद राजा हा एक अखंड इस्राएलचा राजा कसा बनतो ह्याचे वर्णन ऐकतो. आजच्या शुभवर्तमानात राजांचा राजा येशूख्रिस्त ह्याची वधस्तंभावर कश्या प्रकारे चेष्टा मस्करी हाल करण्यात येतात आणि अश्या प्रसंगात सुद्धा येशू एका चोराला कश्या प्रकारे त्याच्या तारणाचे आश्वासन देतो हे आपण पाहतो .
आज हा ख्रिस्तराजाचा सण साजरा करित असताना ज्याप्रकारे इस्राएल प्रजेने दावीद राज्याकडे येऊन 'आमचा राजा बना' अशी विनवणी केली त्याचप्रमाणे आपणदेखील ह्या मिस्साबलीदानात सहभागी होत असताना राजांचा राजा प्रभू येशूकडे विनंती करूया की त्याने आपल्याला त्याची प्रजा म्हणून स्विकार करावा त्याच्या राज्यात प्रवेश द्यावा.
पहिले वाचन = २ शमुवेल :-.
दाविद ह्याला यहुद्याचा राजा म्हणून अभिषिक्त केले होते वरील वाचनात आपण ऐकतो की उत्तरेकडील राजे सुद्धा दावीद राजाकडे येतात त्याला आपला राजा मानतात . अश्याप्रकारे यहुदा इस्राएल हि राज्य एकत्रित झाल्यामुळे दावीद राजाचे राज्य खऱ्या अर्थाने पूर्ण होते. कारण यहुदा इस्राएल ह्यांच्या एकत्र येण्याने याकोबाच्या बारा मुलांचे, बारा वंश एका छत्राखाली आले  त्यामुळे एक राष्ट्र ,एक राजा आणि एक प्रजा असे ऐक्य साधले गेले.
शुभवर्तमान = लूक २३:३५-४३
एकाबाजूला सर्व येशू हा यहूद्यांचा राजा आहे असे म्हणत त्याची थट्टा मस्करी करतात तर दुसऱ्याबाजूला येशूबरोबर वधस्तंभी खिळलेल्या दोन चोरांपैकी एक चोर त्या वधस्तंभावर खिळलेल्या त्या  राजांच्या राजाची  त्याच्या राज्यांची मस्करी करता त्यावर विश्वास ठेवतो येशूला म्हणतो "तू आपल्या राजाधीकाराने येशील तेव्हा माझी आठवण कर". तेव्हा येशु त्या चोराला म्हणतो "तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील". अश्याप्रकारे त्या चोराने येशूवर दाखवलेल्या विश्वासाचे फळ म्हणून  त्याला येशूच्या राज्यांत प्रवेश मिळतो .

सम्यक विवरण
सणाची पाश्वभूमी- ख्रिस्तराजाचा सण हा विसाव्या शतकात सुरु झाला. पोप पायस अकरावे ह्यांनी हा सण १९२५ पासून सुरु केला. त्या वेळेस संपूर्ण युरोपमध्ये सेक्युलरिसम हुकुमशाहीचा प्रभाव वाढत होता. बहुतेक ख्रिस्ती भाविक ह्या सेक्युलरिसम हुकुमशाहीला बळी पडत होते तसेच ह्या वाईट प्रभावामुळे लोकांनी ख्रिस्ताच्या अधिकारावर चर्चच्या नेत्यांच्या अधिकारावर प्रश्नचिन्ह उभे करण्यास सुरुवात केली होती. अशावेळी :
. ख्रिस्तसभा ही पूर्णपणे स्वतंत्र आहे ती कुणाच्या गुलामगिरीत नाही.
. इतर देशांनी त्यांच्या नेत्यांनी ख्रिस्ताला योग्य असा आदर दयावा.
. सर्व भाविकांनी समजावे की ख्रिस्त हा आपल्या सर्वांचा खरा राजा आहे त्याचा आपल्यावर पूर्णपणे अधिकार आहे, आपण त्याच्या अधिपत्याखाली येतो. हे समजावून देण्यासाठी  ह्या सणाची सुरवात करण्यात आली.
जरी ख्रिस्तराजाचा सण साजरा करण्यास विसाव्या शतकात सुरवात झाली तरी येशू हा आपला राजा आहे, तो सर्व राजांचा राजा आहे हे नव्या करारात विविध ठिकाणी विविध प्रकारे नमुद करण्यात आले आहे. उदा:- "तू राजा आहेस काय ?" (योहान १८:३६-३७), "सनातन, अविनाशी, अदृश्य राजा " (१तिमथि :१७), "आपण इस्रायेलाचा राजे आहा " (योहान :४९,मत्तय २७:४२,मार्क १५:३२), "यहुद्यांचा राजा जन्मास आला तो कोठे आहे?" (मत्तय :,मत्तय २७:११,योहान १८:३३-३७), "राजांचा राजा प्रभूचा प्रभू" (१ तिमथि :१५,प्रकटीकरण १९:१६) , " विश्वसनीय साक्षीमेलेल्यांतून प्रथम जन्मलेला पृथ्वीवरील राज्यांचा अधिपती" (प्रकटीकरण१:).
पहिले ख्रिस्ती लोक येशूची बरोबरी किंवा तुलना भाकीत केलेल्या यहुद्यांच्या तारणाऱ्याशी (मसीहा ) करत. मसीहा किंवा ख्रिस्त ह्या शब्दाचा अर्थ 'अभिषिक्त केलेला' जो इस्राएली प्रजेला भाकीत केल्याप्रमाणे रोमन गुलामगिरीतून बाहेर काढणारा त्यांचे तारण करणारा असा होतो. लोकांचा विश्वास होता की येशू त्यांची रोमन अधिपत्यातून सुटका करील, परंतु येशू लोकांना रोमन गुलामगिरीतून नाही तर पापांच्या व मृत्युच्या गुलामगिरीतून काढण्यासाठी सर्वांना स्वातंत्र देण्यासाठी आला होता.  
आजच्या एकविसाव्या शतकात जरी रोमन केथोलिक चर्च बरोबर इतर पंथ ख्रिस्तराजाचा सण साजरा करतात तरी बहुतेक ख्रिस्ती पंथ हा सण साजरा करत नाही. कारण त्यांचे मत असे आहे कि एखाद्याचे राजेपद स्विकारणे म्हणजेच त्याच्या गुलामगिरीचा स्वीकार करणे. जेव्हा आपण ख्रिस्त हा आपला राजा आहे असे म्हणू तेव्हा आपल्याला स्वतंत्र नाही आपण आपले जीवन गुलामगिरीत जगत आहोत असे होईल.(बहुतेकसे राजे क्रूर असल्यामुळे गुलामगिरीत असताना अथवा एखाद्या राजाच्या अधिपत्याखाली असताना लोकांचा छळ पिळवणूक होत असे.) परंतु येशूख्रिस्त त्याचे राज्य ह्या जगातील राज्यांपेक्षा वेगळे आहे. येशूचे राजेपद हे सौम्यता, नम्रता, प्रेम सेवा ह्या मुल्यावर आधारीत आहे. "परराष्ट्रीयांत सत्ताधारी म्हणून जे मानलेले आहेत ते त्यांच्यावर जुलूम करितात त्यांचे वरिष्ठ लोक त्यांच्यावर अधिकार चालवितात, हे तुम्हाला ठाऊक आहे; परंतु तुमची गोष्ट तशी नाही; तर जो तुम्हामध्ये मोठा होऊ पाहतो त्याने तुमचा सेवक झाला पाहिजे; आणि जो कोणी तुम्हामध्ये पहिला होऊ पाहतो त्याने सर्वांचा सेवक झाला पाहिजे कारण मनुष्याचा पुत्रही सेवा करून घ्यावयास नाही तर सेवा करावयास अनेकांच्या मुक्तीसाठी आपला जीव खंडणी म्हणून अर्पण करावयास आला आहे."(मार्क १०:४२-४५). "तू यहुद्यांचा राजा आहेस काय? येशूने उत्तर दिले, माझे राज्य ह्या जगाचे नाही, माझे राज्य ह्या जगाचे असते तर मी यहुद्यांच्या स्वाधीन केला जाऊ नये म्हणून माझ्या सेवकांनी लढाई केली असती; परंतु आता माझे राज्य येथले नाही . ह्यावरून पिलात त्यास म्हणाला, तर तू राजा आहेस काय? येशूने उत्तर दिले, मी राजा आहे असे आपण म्हणता. मी ह्यासाठी जल्मलो आहे ह्यासाठी जगात आलो आहे की, मी सत्याविषयी साक्ष द्यावी."(योहान १८:३३b,३६-३७). येशूख्रिस्ताला माहीत होते की ह्या जगाचे राजे लोकांना छळतात त्यांची पिळवणूक करतात. अश्यावेळी येशु स्वतःच्या राजेपदाने एक राजा कसा असावा ह्याचा आदर्श आपल्यासमोर मांडतो. नम्रता, सौम्यता, सेवा, प्रेम हे मुल्ये त्याच्या राजेपदाची अविभाज्य भाग होती. त्याने आपल्या अनुयायांना दुसऱ्यावर आपला हक्क चालवता त्यांची सेवा करण्याची आज्ञा दिली. जेव्हा आपण ख्रिस्तराजाचा सण साजरा करतो तेव्हा आपण जो त्याच्या लोकांना गुलामगिरीत ठेवतो  अश्या राजांचा नव्हे तर जो त्याच्या प्रजेला स्वातंत्र देतो, त्यांच्यासाठी मरण पत्करण्यासाठी तयार असतो त्यांच्या सेवेसाठी तत्पर असतो अश्या राजाचा सण साजरा करतो.

बोध कथा=
.     एकदा एक राजा एका गरीब शेतकऱ्याच्या मुलीच्या प्रेमात पडला. त्याला माहित होते की त्या मुलीशी लग्न करणे हे जवळ जवळ अशक्य आहे कारण राजाचे लग्न शाही कुटुंबात होत असे ते साध्या गरीब मुलीशी लग्न करत नसत. परंतु राजाला ह्याचीसुद्धा कल्पना होती की समजा त्याला पाहिजेच असेल तर तो त्याच्या अधिकाराने त्या मुलीशी लग्न करू शकतो.
परंतु आता प्रश्न असा होता की जर राजाने त्या मुलीशी लग्न केले तर ते दोघे सुखी जीवन जगु शकतील का? त्या मुलीसाठी तो राजा असल्यामुळे तीने  त्याच्याकडे आदराने पाहिले असते एक प्रियकर ह्या नात्याने पहिले नसते. दोघांच्या राहणीमानात सुद्धा जमीन आसमानाचा फरक असल्या कारणांने एकमेकांशी जुळवून घेणे कठीण झाले असते. ह्या समस्येवर मात करण्यासाठी राजाला एक युक्ती सुचली. त्याने ठरवले: 'मी माझे राजेपद सोडून एक साधा शेतकरी बनेन त्या मुलीचे प्रेम जिंकीन'. असा विचार करत असताना त्याला चांगलेच ठाऊक होते की एका गरीब, साध्या मुलीसाठी राजेपद सोडून शेतकरी बनण्याचा निर्णय त्याला संकटात टाकू शकतो. एका बाजूला त्याचे राजेपद जाईल तर दुसऱ्या बाजूला ती मुलगी राजाच्या प्रेमाचा स्विकार करेलच ह्याची हमी नव्हती. परंतु त्याचे त्या मुलीवर इतके प्रेम होते की तो तिच्याविना राहू शकला नाही त्याने आपले राजेपद सोडून त्या मुलीचे प्रेम जिंकण्यासाठी एक शेतकरी बनला. (ह्या गोष्टीत तो राजा आपला देव आहे तर ती मुलगी आपण सर्व आहोत .)

.     १९६५च्या एप्रिल महिन्यात अमेरिकेचे अध्यक्ष अब्राहम लिंकन ह्यांना मारण्यात आले त्यानंतर  त्यांचा मृतदेह Washington ला नेत असताना Giorgione शहरात काही तासांसाठी ठेवला होता. अब्राहम लिंकन ह्यांचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी बरेचशे लोक येत होते. त्या लोकांत एक गरीब बाई तिच्या मुलासोबत आली होती. ती बाई जेव्हा त्या मृतदेहापाशी येते तेव्हा ती आपल्या मुलाला वर उचलते म्हणते 'माझ्या मुला ह्या माणसाला नीट पाहा ह्या भल्या माणसाने आपला प्राण तुझ्या माझ्यासाठी अर्पण केला.

मनन चिंतन
.            जेव्हा येशूला वधस्तंभावर खिळले गेले तेव्हा  येशूच्या दोन्ही बाजूला दोन  चोरांनासुद्धा वधस्तंभावर खिळले गेले होते. प्रत्येकाचा पाहण्याचा दृष्टीकोन जसा वेगळा असतो तसाच ह्या दोन चोरांचासुद्धा येशूकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा होता. त्यातील एक चोर येशूला डीवचत त्याची निंदा करत म्हणत होता, "तू ख्रिस्त आहेस ना? तर स्वताला आम्हाला वाचव". परंतु दुसरा चोर त्याचा निषेध करीत म्हणतो, "तुलाही तीच शिक्षा झाली असता तु देवाला सुद्धा भीत नाहीस काय? आपली शिक्षा तर यथानायक आहे; कारण आपण आपल्या कृत्यांचे फळ भोगीत आहोत; परंतु ह्यांनी काहीच अयोग्य केले नाही". (लूक २३:३९-४१).
दोघे चोर होते, दोघांना सारखीच शिक्षा झाली होती. ह्याचबरोबर त्यांनी येशूविषयी काय बोलवे ह्याचे पूर्ण स्वतंत्र त्यांच्याकडे होते परंतु दोघांच्या मुखातून येशूविषयी निघालेले उदगार पूर्णपणे वेगळे होते. देवाने आपल्याला स्वतंत्र दिले आहे तो त्या स्वतंत्र्याचा पूर्णपणे आदर राखतो. आपला देव आपल्या सर्वांना  पापाबद्दल  पश्चाताप करण्याचा त्याच्या राज्यात प्रवेष करण्याचा आवाहन करतो. परंतु ह्या आवाहनावर दुर्लक्ष करून आपण ज्याप्रकारे जीवन जगत आहोत त्याचप्रकारे जीवन जगण्याचेही स्वतंत्र देतो. त्यामुळे प्रभूने दिलेल्या कृपेचा दानाचा स्वीकार करून येशूच्या राज्यात प्रवेश करावा कि नाही? येशूला आपला राजा म्हणून स्वीकारावा कि नाही? हे आपल्यावर  अवलंबून आहे .
.            येशूख्रिस्ताविषयी पिलाताने वधस्तंभावर लिहीले "यहुद्यांचा राजा नासोरी येशू" परंतु येशू केवळ यहुद्यांचा राजा नसून तो साऱ्या विश्वाचा सर्व राजांचा राजा आहेलोक सोन्याला धातूंचा राजा म्हणतात कारण सोने सर्व धातूंपेक्षा मौल्यवान आहे. तसेच सिंहाला प्राण्यांचा राजा म्हणतात कारण तो सर्वापेक्षा बेडर शूर आहे तसेच सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा राजा म्हणतात कारण त्याने ह्या खेळावर वर्चस्व गाजवले. थोडक्यात जो एखाद्या क्षेत्रात त्याचा सर्वश्रेष्ठपणा सिद्ध करतो त्याला आपण त्या क्षेत्रातला 'राजा' ही पदवी देतो. त्याचप्रमाणे ह्या विश्वाचा राजा येशूख्रिस्तच आहे कारण तो सर्व बाबतीत सर्वश्रेष्ठ आहे. तो पापांपासून अलिप्त आहे, तो निर्माणकर्ता आहे ह्या विश्वात जे काही आहे त्यावर त्याचा अधिकार आहे त्यामुळे तो ह्या विश्वाचा राजा आहे तसेच सर्व राजांचा राजा आहे.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद = हे राजांच्या राजा आमची प्रार्थना  ऐक
  आपण परमगुरुस्वामी, महागुरुस्वामी, सर्व धर्मगुरू धर्म भगिनींसाठी प्रार्थना करू या, जेणेकरून त्यांनी आपल्या श्रध्येत दृढ होऊन आपल्याला प्रभूच्या राज्यात प्रवेश करण्यास मार्गदर्शन करावे.   
  आपण सर्व राजकीय नेत्यांसाठी प्रार्थना करू या जेणेकरून त्यांनी राजांच्या राजा प्रभू येशू ख्रिस्त ह्याचा आदर्श घेऊन त्यांचे जीवन लोकांच्या सेवेसाठी समर्पित करावे .   
आज आपण श्रद्धा वर्षाचा  सांगता करत असताना आपण आपला राजा प्रभू येशू ख्रिस्तावरील  श्रद्येत अधिक दृढ व्हावे आपल्या जीवनात त्याला पूर्णपणे अनुसरावे .   
  जे कोणी देवापासून दूर गेले आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करू या, जेणेकरून त्यांनी मागे वळून परत एकदा येशूला आपला राजा म्हणून स्वीकारावे आपले जीवन प्रभूची सुवार्ता पसरविण्यासाठी  समर्पित करावे.   
  आपण आपल्या वयक्तिक गरजांसाठी प्रार्थना करू या .

Wednesday, 13 November 2013



Chris Jude Bandya hails from Our Lady of Sea Church, Uttan, Bhayander. He belongs to the St. Bonaventure Capuchin Province of Maharashtra.Presently, he is pursuing his Theological studies in Jnana Deepa Vidyapeeth, Pune. Man of creativity and spontaneity, this homily comes to us with creative and biblical reflections.


सामान्य काळातील तेहत्तीसावा रविवार
१७/११/२०१३
वर्ष-क
मलाखी;३:१९-२०.
२ थेस्सलनीकाकरांस;३:७-१२.
लूक;२१:५ -१९.
"सेनाधीश परमेश्वराचा दिवस

प्रस्तावना:
आजच्या उपासनेची मध्यवर्ती कल्पना आहे:'सेनाधीश परमेश्वराचा दिवस.' आजच्या तिन्ही वाचनात आपणास प्रभूच्या दिवसाबद्दल सूचित करण्यात येते. संदेष्टा मलाखी, संत पौल व स्वत: येशू ख्रिस्त आपणास प्रभूच्या दिवसाची भविष्यवाणी सांगतात आणि त्याच बरोबर आपल्याला सज्ज होण्यास आवाहन करतात. आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशु ख्रिस्त यरुशलेमेचा विध्वंस व युगाची समाप्ति ह्याविषयीचे भविष्य सांगतो. प्रभूचा दिवस जेव्हा येईल तेव्हा राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल; मोठेमोठे भूकंप होतील व दुष्काळ पडतील तसेच आईबाप, भाऊबंद, नातलग व मित्र हे देखील एकमेकांना धरून देतील; कित्येकांना जिवे मारतील आणि येशूच्या नावामुळे सर्व आपला द्वेष करतील असे असले तरी आपल्या डोक्याच्या एका केसाचाही नाश होणार नाही. ह्याच प्रभूच्या अभिवचनावर विश्वास ठेवून आजच्या पवित्र मिसाबलीदानात सह्भागी होत असताना प्रभूच्या राज्यात प्रवेश मिळविण्यासाठी आपण विशेष कृपा-शक्ती मागु या.  
पहिले वाचन:
पहिल्या वाचनात संदेष्टा मलाखी आपणास सुचित करतो की, " पाहा, भट्टीसारखा तप्त दिवस येत आहे; सर्व गर्विष्ठ व सर्व दुराचारी बनतील; तो येणारा दिवस त्यांस जाळून टाकील." संदेष्टा मलाखी आपणास सज्ज होण्यास पाचारण करतो व सेनाधीश परमेश्वराच्या त्या दिवसाचे स्वागत करण्यास व तयारीत राहण्यास आवाहन करतो.
दुसरे वाचन:
आजच्या दुस-या वाचनात संत पौल थेस्सलनीकाकरांस बोध करितो की, "ज्या कोणाला काम करण्याची इच्छा नसेल तर त्यांने खाऊही नये." पुढे तो सांगतो की, "आम्ही स्वत: कोणाचे अन्न फुकट खाल्ले नाही, परंतू तुम्हापैकी कोणावरही भार घालू नये म्हणून आम्ही रात्रंदिवस श्रम व कष्ट करून काम केले" संत पौल आम्हास त्याचे अनुकरण करण्यास आवाहन करतो.
सम्यक विवरण:
लूकलिखीत शुभवर्तमानात अध्याय २१:५-१९ हा येशूचा शिष्याबरोबर शेवटचा संवाद; म्हणजे येशूच्या दुःखसहना अगोदरचे शब्द. ह्या संवादाचे रूप ह्यापुढे लूकच्या शुभवर्तमानात आपणास कुठेही आढळत नाही. ह्यावेळेस येशू फक्त त्याच्या सभोवती जमा झालेल्या त्याच्या शिष्यांबरोबर संवाद साधत होता. येशूचे शब्द त्याच्या शिष्यांना जीवनात येणा-या समस्या व अडचणीबद्दल सुचीत करत आहे; हे शब्द फक्त शिष्यांनाच नव्हे तर इस्रायल राष्ट्राला तसेच तेथे उभे असलेल्या मंदिराबद्दल होते. आपल्या अति-सुंदर मंदिराचा नाश होणार हे जाणून त्यांना खूप दुःख झाले असलेच तरीपण जुन्या मंदिराचा नाश म्हणजे नवीन मंदिराचे आगमन होणार हे ऐकून ते आनंदित झाले. हे नवीन मंदिर म्हणजे 'मसीहा' होय व तो मसीहा आपला गुरुजी येशुख्रिस्त आहे हे जाणून त्यांच्या आनंदाला पारा उरला नाही आणि आपण येशूचे अनुयायी आहोत व आपण परमपित्याचे लोक म्हणून ओळखले जाऊ व आपणास स्वर्गाचे दरवाजे उघडले जातील ह्या भाग्यामुळे ते आनंदात रमून गेले होते. परंतु ह्या सर्व गोष्टी कधी कश्या घडतील अश्या घडतील अश्या अनेक प्रश्नांनी व विचारांनी त्यांना चिंतित केले होते. पुढे येशू आपल्या शिष्यांना सावध रहावयास सांगून म्हणतो की अनेक व्यक्ती येऊन सांगतील, 'मी देवाने पाठवलेला मसीहा आहे परंतु तुम्ही फसवले जावू नका आणि ह्या क्षणी सर्वत्र दुष्काळ, भूकंप, पूर, युद्ध व धरणीकंप होतील आणि जुन्या करारात सांगितल्याप्रमाणे आपणा सर्वांस देवाच्या न्यायास सामोरे जावे लागेल.' 
येशू जेव्हा येणा-या  काळा (वेळ) विषयी चर्चा करतो तेव्हा तो दोन काळाबद्दल बोलतो:
१) वर्तमान काळ  (Present Age) म्हणजे आता चालू असलेला काळ. 
२) प्रभूचा काळ (Age to come) म्हणजे भविष्यात येणारा काळ.
येशू जेव्हा आपल्या सभोवतीच्या लोकांबद्दल विचार करतो तेव्हा ह्या वर्तमान काळाविषयी म्हणतो की हा काळ खुप वाईट गोष्टींनी भरून गेलेला आहे. म्हणून सैतानी गोष्टी सुद्धा घडून येत आहेत आणि त्यांच्या ह्या वाईट संगती व वाईट गोष्टी त्यांच्यापासून दूर करणे अती कठीण जाईल. वर्तमानकाळाविरुद्ध म्हणजे प्रभूच्या काळात सैतानाला जागा नसणार ह्या काळाला सोन्याचा काळ म्हणून संभोधिले जाईल व ह्या काळात जगात सर्वत्र शांतीचा प्रसार होईल. परंतु ह्या दोन्ही काळा-दरम्यान जो दिवस येईल तो म्हणजे 'सेनाधीश परमेश्वराचा दिवस'. हा दिवस ह्या जगात दहशतवाद घडवून आणील. "पाहा, रोष व तीव्र क्रोध यांनी दुःखकर झालेला असा परमेश्वराचा दिवस येत आहे; तो देश उजाड करून सोडील, त्यातील पातक्यांचा संहार करील" (यशया १३:९ ; योएल २:२ ; आमोस ५:१८-२०; सफ़न्या १:१४-१८ ). हा दिवस अचानक येईल, "कारण तुम्हाला स्वत:ला पक्के माहीत आहे की, जसा रात्री चोर येतो, तसाच प्रभूचा दिवस येतो"(१ थेस्सलनिका ५:२; २ पेत्र ३:१०), आणि ह्याच त्या प्रभूच्या दिवशी संपूर्ण जग अंधारात बुडून जाईल. तसेच आकाशातील तारे प्रकाशीत होणार नाहीत आणि सूर्य त्याच्या सूर्योदय आणि सूर्यास्तापर्यंत अंधारात माखून जाईल, आणि चंद्राकडून सुद्धा आपल्याला प्रकाश मिळणार नाही (यशया १३:१०-१३; योएल २:३०-३१; २ पेत्र ३:१०).
अनेक अश्या भयानक गोष्टी लोकांच्या मनात सुरवातीपासून होत्या; विशेष म्हणजे:
१) येशूच्या वेळेस जगणा-या सर्व यहुदी लोकांच्या मनात प्रभूच्या दिवसाबद्दल चिंता.
२) जुन्या करारातील संदेष्टयांनी सांगितल्याप्रमाणे रोमन सैनिकांच्या हातून इसवी सन ७० मध्ये यरुशलेमेच्या मंदिराचा  विध्वंस.
. प्रभू येशूच्या परत येण्याची सुवार्ता.
४. आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे भविष्यात होणा-या छळाची सुध्दा त्यांना जाणीव होती.
येशूख्रिस्ताने ह्याबद्दल त्याच्या शिष्यांना प्रथमच जागृत केले होते, येशू त्यांच्या शिष्यांना सांगतो, "परंतू हे सर्व होण्यापूर्वी ते तुमच्यावर हात टाकतील व तुमचा छळ करतील; तुम्हाला सभास्थाने व तुरुंग ह्यांच्या स्वाधीन करतील, आणि राजे व अधिकारी ह्यांच्यापुढे माझ्या नांवासाठी नेतिल… (लुक; २१: १२-१९). जसे येशूने आपल्या शिष्यांना अधिकाराने बोध केला त्याच ख्रिस्ताच्या अनुभवाद्वारे पौलाने थेस्सलनीकाकरांस अधिकाराने आज्ञा दिली की, कोणाला काम करण्याची इच्छा नसेल तर त्याने खाऊ हि नये(२ थेस्सलनीका; ३:१०). संत पौलाला हा अधिकार येशूख्रिस्ताच्या नावात व ते नाव उच्चारण्यात मिळतो. एकूण वीस वेळेस पौल थेस्सलनीकाच्या पत्रामध्ये येशूसाठी 'तारणारा' (savior) शीर्षक वापरतो, आणि ह्याच मानवी नावाने येशू ओळखला जात असे(मत्तय;१:२१). ख्रिस्त हे येशूचे दैविक नाव आहे ह्याचा अर्थ: मसिहा, म्हणजे देवाने अभिषेक केलेला होय; आणि ह्याच नावाच्या अधिकाराने पौल थेस्सलनीकाकरांस बोध व आज्ञा देतो. पौल आजच्या वाचनात जीवनातील दैनंदिन कामाबद्द्ल मार्गदर्शन करतो. देवाने आदामाला बागेची राखण व देखरेख करावयास सांगितले होते(उत्पती; २:१५). स्वत:च्या परिपूर्णतेकरिता मानवाला दररोज काम करावे लागते. आपण जर पवित्र शास्त्राच्या इतिहासाचा अभ्यास बारकाईने केला तर आपणास कळते की, देवाने जेव्हा शास्त्रामधल्या महान व्यक्तींना बोलावले होते तेव्हा त्या सर्व व्यक्ती त्यांच्या कामात गुंग होत्या.
- मोशे शेळ्या व मेंढ-याचा कळप चारत होता(निर्गम; ३).
- यहोशवा मोशेचा उत्तराधिकारी होण्याअगोदर, तो मोशेचा सेवक होता(निर्गम; ३३:११). 
- गिदोन गव्हाची झोडणी करीत होता(शास्त्रे; ६:११).
- दावीद राणात शेळी-मेंढरी राखीत होता(१ शमुवेल; १६: ११).
- येशूने अनेक कोळी(fisherman) लोकांना त्याचे अनुयायी होण्यास पाचारण केले.
- येशूख्रिस्त स्वत: सुताराचे काम करीत होता.
- संत पौल राहूट्या(tent) करण्याचा व्यवसाय करत होता(प्रेषितांची कृत्ये; १८:३).
आणि ह्या व्यवसायाच्या माध्यामाद्वारे येशू ख्रिस्ताची सुर्वाता पसरविण्यास त्यास खूप मदत झाली. आजच्या वाचनाद्वारे संत पौल आपणा सर्वांस कठीण मार्गाबद्दल व त्याच्यावर येशूच्या नावाने चालण्यास मार्गदर्शन करतो.
बोध कथा:
एकदा एक मुलगा विहिरीमध्ये डोकावून पाहत असताना त्याचा तोल जातो व तो विहिरीत पडून बुडायला लागतो. तो बुडत असल्यामुळे आपला प्राण वाचवण्यासाठी जोरजोरात ओरडायला लागतो, "मला वाचवा! मला वाचवा!" इतक्यात बाजूने जाणा-या एक व्यक्तीने त्याचा आवाज ऐकला व आपल्या जीवाची पर्वा न करता विहिरीत उडी मारून त्या मुलाला वाचवले. अनेक वर्ष होतात, दोघे त्यांच्या जीवनात पुढे जातात परंतु तो मुलगा एक गुंड बनतो, चोरी करणे, लोकांचा छळ करणे, लुबाडणे हे त्याचे जीवन बनते.
एक दिवस अशीच चोरी करताना तो पकडला जातो आणि त्याला तुरूंगवास होतो. त्याला न्यायधीश्यासमोर उभे केले जाते व जेव्हा तो न्यायाधीशाकडे बघतो तेव्हा तो खूप आनंदीत होतो कारण न्यायाधीश दुसरा कोणी नसून ज्याने त्याला लहानपणी बुडताना वाचवले होते तोच व्यक्ती असतो. न्यायाधीश त्याचा न्याय करतो व सांगतो, "तुला मरण दंडाची शिक्षा सुनावली जाते, कारण तू खूप गुन्हे केले आहेत."
तो मुलगा हे सर्व ऐकून जोरजोरात ओरडत न्यायाधीशाला सांगतो, "मी तोच मुलगा आहे ज्याला आपण वाचवले होते आणि आज तुम्ही मला मरण दंडाची शिक्षा देता?" तेव्हा न्यायाधीश त्या मुलाला सांगतो "जेव्हा मी तुला वाचवले होते तेव्हा मी तुझ्याकडे मसिहा बनून आलो होतो व आज तुझा न्याय करावयास एक न्यायाधीश म्हणून तुझ्यापुढे बसलेलो आहे; आजचा दिवस हा तुझ्या न्यायाचा दिवस आहे(Judgment Day). तू केलेल्या कृत्यांचा अशाप्रकारे न्याय होणे हे माझ्या दुष्टीनेच नव्हे तर परमेश्वराच्या व समाज्याच्या दुष्टीने योग्य आहे."
मनन चिंतन:
जगात जन्माला आलेल्या सर्व गोष्टींचा कधी तरी अंत होतोच. जरी आपल्याला  जगाचा अंत किंवा शेवट माहित नसला तरी एका दिवशी आपल्याला  ह्या जीवनाचा अंत जरूर होणार आहे आणि धरतीवरील आपल्या  ह्या जीवनाचा शेवट होणार आहे ह्याची मला खात्री आहे. मनुष्याला जेव्हा स्वत:च्या जीवनाच्या अंताची जाणीव होते तेव्हा मरणाव्यतिरिक्त आपल्या मनात दुसरे कोणतेही विचार येत नसतात. आपण मरणास घाबरतो; कारण आपण प्रभूच्या वचनाप्रमाणे जगत नसतो. आजची उपासना आपल्यास ह्या दिवसाची आठवण देते कारण आजच्या उपासनेत आपण सेनाधीश प्रभूच्या दिवसाबद्दल ऐकतो. येशुख्रिस्त आपल्या समोर दोन काळाचे वर्णन करतो. ह्या दोन्ही काळामुळे आपल्या जीवनात एक नवीन वळण (U-Turn) येते.
येशूख्रिस्ताने सांगितल्याप्रमाणे आपणा सर्वांच्या जीवनात हे दोन्ही काळ अनुभवण्यास मिळतात. दैनंदिन जीवनात आपण वर्तमान काळात जगत असतो प्रत्येक दिवशी सुर्यादयापासून ते सूर्यास्तापर्यत आपण अनेक अडी-अडचणीना, समस्यांना किवा वाईट विचारांना बळी पडत असतो. अशावेळी आपण स्वत: आपले जीवन निवडत असतो. मानवी जीवन हे पापांमुळे विध्वंस होत असते; म्हणूनच अनेक ठिकाणी किंवा आपल्या जीवनात आपणास सर्वत्र अंधकार सापडतो, जीवन नकोसे होते, ह्या सर्व गोष्टींचा नाश प्रभुने सांगितल्याप्रमाणे प्रभूच्या दिवशी होईल. आपल्या कृत्याप्रमाणे आपण तोळले जाऊ आणि जर आपल्या पापांचे पारडे जड झाले तर आपल्याला ह्या दिवसात आगीच्या भट्टीला सामोरे जावे लागणार. ह्या न्यायाच्या दिवसानंतर प्रभूचा काळ ह्या सृष्टीवर राज्य करील. ह्या काळात सर्वत्र शांती, प्रेम व समेट ह्या गुणांच्या बागा फुलतील. सर्व लोक शांतीच्या मार्गावर चालतील; परंतु ह्या गोष्टीचा अनुभव घेण्यासाठी आपणास आतापासूनच कष्ट करायला लागतील. आपल्याला आजच आपल्या कामास सुरवात करायला लागेल. असिसीकर संत फ्रान्सिस म्हणतात, "अजूनपर्यत आपण काहीच केलेले नाही, आता लागलीच सुरवात करुया." संत पौल व असिसीकर संत फ्रान्सिस ह्यांचा आदर्श घेऊन आपण आपल्या वाटयाचे काम करून प्रभूच्या दिवसाचे स्वागत करण्यास सज्ज व्हायला पाहिजे म्हणजे जेव्हा हा दिवस येणार तेव्हा प्रभूच्या काळाचा अनुभव घेण्यास व प्रभूचा काळ आत्मसात करण्यास आपण सर्वदा पात्र ठरू.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे प्रभू, तुझ्या शांतीचा काळ पाहण्यास आम्हाला पात्र कर.
1. आपले परमगुरुस्वामी, महागुरुस्वामी, सर्व धर्मगुरू, धर्मबंधू व धर्मभगिनी ह्यांच्यावर प्रभूचा आशिर्वाद सतत राहावा व प्रभूचे कार्य करण्यास त्यांची  श्रध्देत वाढ व्हावी; तसेच प्रभूच्या काळासाठी त्यांनी सर्व प्रापंचिकांना सज्ज होण्यास सहाय्य करावे म्हणून आपण प्रार्थना करू या.
2. दु:ख, कष्ट, आजारपण, कठीण कसोटीच्या प्रसंगांनी त्रस्त झालेल्या लोकांना त्यांचे दु:ख सहन करण्यासाठी धैर्य आणि सहनशक्ती दे. जेणेकरून ते सदैव तुझ्या काळाचे आगमन करण्यास जागृत राहतील म्हणून आपण प्रार्थना करू या.
. आमच्या धर्मग्रामातील सर्व लोकांनी पदोपदी, क्षणोक्षणी त्यांच्या जीवनातील तुझे अस्तित्व ओळखावे व तुझ्या मार्गावर तसेच तुझ्या शब्दाप्रमाणे जीवन जगण्यास प्रयत्त्न करावे म्हणून आपण प्रार्थना करू या.
. जगातील सर्व मिशनरी बंधु भगिनींना कृपा, आशिर्वाद आणि मार्गदर्शन मिळावे व देवाने त्यांचे सर्व वाईटापासून आणि अडीअडचणी पासून रक्षण करावे तसेच प्रभूच्या प्रेमाचे बीज त्यांनी सर्वत्र पेरावे म्हणून आपण प्रार्थना करुया.
. आपल्या वैयक्तिक व सामाजिक हेतूंसाठी प्रार्थना करूया

Tuesday, 5 November 2013




Amol Gonsalves hails from St. Gonsalo Gracia Church, Gass, Vasai. He belongs to the St. Bonaventure Capuchin Province, Maharashtra. Presently, he is pursuing his theological studies at JDV, Pune. He is passionate about music and singing. This homily appears with his faith and theological insights.  





सामान्यकाळातील बत्तीसावा रविवार
१०/११/२०१३
वर्ष-क
मक्काबीचा दुसरा ग्रंथ;  ७:१-२,९-१४.
थेस्सलनीकाकरांस पत्र; २:१६-३:५.
लूक; २०:२७-३८.

"तो मेलेल्यांचा देव नसून जिवतांचा देव आहे."
प्रस्तावना:
आयुष्याची सुरवात जन्माने तर अंत मरणाने होतो. या घटना सत्य आहेत. पण अनेकदा त्यांना सामोरे जाणे किंवा त्यांचे आव्हान स्विकारणे आपल्याला कठीण जाते. असे म्हणतात की; "मरण हे अटळ आहे." "जीवनाच्या पुस्तकात लिहिलेला तो एक अखेरचा धडा आहे." परंतु आपला ख्रिस्ती विश्वास व श्रद्धा आपल्याला शिकवतात की, "मरणात माणसाच्या जीवनाचा अंत सामावलेला नाही!." आजच्या उपासनेतील तिन्ही वाचने मरण व विशेषता पुनरूत्थान ह्या दोन महत्त्वपूर्ण पैलूवर प्रकाश-झोत टाकत आहेत. बायबल आपल्याला आवर्जून सांगत आहे की,"आपला देव हा मृतांचा देव नसून तो जिवंताचा देव आहे." आजच्या उपासनेद्वारे आपण जीविताचा प्रभू येशू ख्रिस्ताकडे मरणावर विजय मिळविण्यासाठी प्रार्थना करू या.

पहिले वाचन:
आजच्या पहिल्या वाचनात आपण सात भावांची व त्यांच्या आईची बंदिवासात असताना घेण्यात आलेल्या परिक्षेविषयी ऎकत आहोत. बंदिवासात असताना त्यांना चाबकांनी आणि आसुडांनी मारून निषिद्ध असलेले  डुकराचे मांस त्यांना खावयास राजा प्रवृत्त करतो. राजाने दिलेल्या आदेशाचे पालन त्यांना त्यांच्या वाड-वडिलांनी दिलेल्या नियमांचे आज्ञाभंग करण्यास भाग पाडणार होते. पण, त्यांनी तसे न करता मरण पत्कारण्यास सज्ज झाले कारण "जीवनाच्या अंनत नुतनीकरणासाठी विश्वाचा राजा आम्हाला उठवील" ह्यावर त्यांच्या घनिष्ठ विश्वास होता.

दुसरे वाचन:
आजच्या दुस-या वाचनात संत पौल प्रार्थनेची विनवणी करत असताना म्हणतो की, "आम्हासाठी प्रार्थना करीत जा की तुम्हामध्ये झाल्याप्रमाणे ख्रिस्ताच्या वचनाची प्रगती त्वरेने व जोमाने इतरांमध्ये व्हावी व प्रभूचा गौरव व महिमा सर्वत्र पसरावा. कारण, सर्वाच्या ठायी श्रद्धा आहे असे गृहीत धरून चालणार नाही." संत पौलाचा देखील ठाम विश्वास होता की, "आपला ख्रिस्त प्रभू आपल्या सर्व दुष्टापासून आपल्याला राखील व श्रद्धेत आपल्याला स्थिर करील."

शुभवर्तमान:
संत लुकलिखित शुभवर्तमानात आपण ऐकतो की, "परमेश्वर हा मृतांचा देव नसून जिवंताचा देव आहे." नव्या करारात आपल्याला अनेक ठिकाणी दिसून येते की ख्रिस्ताला पकडण्यासाठी ख्रिस्ताचे शत्रू - सदूकी, शास्त्री व परुशी - योग्य वेळेची वाट पाहत होते आणि संभ्रमात टाकणारे प्रश्न विचारत होते. पुनरूत्थानाच्या प्रश्नावरून येशूला संभ्रमात  टाकण्याचा प्रयत्न आपण आजच्या शुभवर्तमानामध्ये पाहत आहोत. 

बोध कथा:
एकदा बिशप फुल्टन शिन एका गावात भेट देण्यासाठी गेले होते. असेच घरांना भेटी देत असताना ते एका छोट्याश्या झोपडीसमोर आले तेव्हा त्या गावाच्या अधिका-याने बिशप महाशयांना सांगितले की कृपया त्या घरात जाऊ नका कारण त्या घरात एक क्रुष्टरोगी स्त्री राहत आहे. तिचे संपूर्ण शरीर घायाने भरलेले असून त्यातून दुर्गंधी व रक्त येत आहे. ते ऐकून बिशप फुल्टन शिन ह्यांनी निर्धार केला की ते त्या क्रुष्टरोगी स्त्रीला भेट देणारच. थोड्या वेळेतच बिशप महाशय त्या स्त्रीच्या दारात हजर होते. तिच्या शरीरातील घायातून रक्त वाहत होते व संपूर्ण घराला दुर्गंधी पसरली होती परंतु ह्या परिस्थितीत सुद्धा तिच्या चेहऱ्यावर स्मितहास्य व एक वेगळाच आनंद होता. हे पाहून बिशप महाशयांना आश्चर्य वाटले आणि बिशप महाशयांनी त्या स्त्रीला विचारले "तुमचे शरीर इतके घायांनी भरले असून  त्यातून रक्त वाहत आहे, तरीसुद्धा तुमच्या चेह-यावर हे स्मितहास्य कसे?"  ह्यावर त्या स्त्रीने उत्तर दिले "जरी माझे शरीर घायाने भरलेले असले व त्यांतून रक्त वाहत असले तरी मला प्रभू येशु ख्रिस्ताच्या शब्दावर पूर्ण विश्वास आहे.  मला तो शेवटच्या दिवशी पुन्हा उठवील व ह्या क्रुष्टरोगी शरीराचे रुपांतर अविनाशी, निरोगी शरीरात करील आणि मी प्रभू येशूच्या पुनरूत्थानाच्या विजयामध्ये सहभागी होईन."

सम्यक विवरण:
शुभवर्तमानात आपण पुनरूत्थानाविषयी विचारलेल्या प्रश्नाविषयी ऐकतो. सदूकी हा यहुदी लोकांचाच एक गट होता. हे लोक याजकांच्या घराण्यातील श्रीमंत व प्रतिष्ठीत वर्गातील होते. रोमन शासनाच्या राजवटीत ते अगदी सुखी-समाधानी होते. ते पारंपारिक सनातनी मोशेच्या पाच पुस्तकावर आधारित धर्माचे आचारण करीत परंतु त्यांचा हा धर्म व आचरण केवळ पोकळ व औपचारिक होता. त्यांची विचारसरणी व मते परुश्याहून भिन्न होती. पुनरुत्थान, दूत व आत्मे ह्या गोष्टीवर त्यांचा मुळीच विश्वास नव्हता (प्रेषिताचे कृत्ये;२३:८).
पुनरुत्थानाविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना येशूने प्रथमच सांगितले की, पुनरुत्थानातील  ख्रिस्ती व्यक्ती पृथ्वीवरल्या अवस्थेप्रमाणे नाही. तेथे मरण नाही, वंश-सातत्य राखण्याची गरज नाही. म्हणून प्रजोत्पादन करण्याची गरज नाही. विवाहासारखी पार्थीव नातीगोती स्वर्गात उरणार नाहीत. पण, स्वर्गात सर्वच मानवी नाती एवढी उन्नत व उच्च केली जातील की विवाह्सबंधाचे नाते जेवढे पृथ्वीवर महत्त्वाचे आहेत तसे ते स्वर्गात असणार नाहीत. म्हणूनच, संत पौलने थेस्सलनीकरांस पाठविलेल्या पहिल्या पत्रातील ४:१७ मध्ये म्हणतो, "जिवंत उरलेले आपण त्यांच्याबरोबर प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघारूढ असे अंतराळात घेतले जाऊ, तसेच सदासर्वदा प्रभूजवळ राहू." 
आजचे शुभवर्तमान आपल्यासमोर अजून एका सत्याची आठवण करून देते. आपण जरी शरीराने मरण पावलो तरी आत्म्याने मरत नाही. आत्मा अमर आहे. शारिरिक मृत्युनंतर आत्म्याला विवाहाची किंवा वैवाहिक सुखाची आवश्यकता राहत नाही. मृत्युनंतर आपला आत्मा परमात्म्याशी एकरूप होतो. आत्म्याला मरण नाही आणि आत्म्याला वैवाहिक सुखाची आवश्यकता नसते हे सत्य जर आपण मान्य केले तर आजच्या पहिल्या वाचनातील सात भाऊ व त्यांच्या आईप्रमाणे आपण देखील प्रभुने दिलेल्या आज्ञाचे पालन करू व त्यांचा स्वीकार करण्यास सैदव तत्पर असू.
परमेश्वराची आज्ञा मोडण्यापेक्षा त्यांनी मरण का पत्करले असावे? याचे उत्तर आपण आजच्या प्रतिसाद स्तोत्रात एकतो. "हे प्रभो, मला तुझ्या दर्शनाने तृप्त कर." परंतू, असे ठामपणे उत्तर देण्यास आपल्या परमेश्वर पित्याच्या "सांत्वनाची आणि चांगल्या आशेची आपणाला आवश्यकता आहे. आजच्या दुस-या वाचनात संत पौल थेस्सलनीकरांस म्हणतो की, "प्रभू विश्वसनीय आहे, तो तुमच्या मनाचे सांत्वन करील, तो तुम्हाला स्थिर करील व सर्व शत्रूपासून राखील."

जीवन बोध:
                              ख्रिस्ती व्यक्ती असूनही कधी-कधी ज्या गोष्टी आपल्या आकलेनेच्या पलिकडे आहेत त्यावर विश्वास ठेवण्यास आपण दचकून जातो. आपल्याला "पुनरूत्थानाविषयी" अनेक प्रश्न भेडसावत असतात. जसे, मला शाश्वत जीवनाचे वरदान मिळेल का? शाश्वत जीवन म्हणजे काय? तेथे कोण असणार व आपण काय करणार?
संत पौल कंरिथकरास लिहिलेल्या पहिल्या पत्रात १५:१२ मध्ये म्हणतो की, "ख्रिस्त जो मेलेल्यांतून उठविला गेला आहे अशी त्याच्याविषयी घोषणा होत आहे, तर मेलेल्यांचे पुनरूत्थान  नाही, असे तुमच्यापैकी कित्येक जण म्हणतात हे कसे? जर मेलेल्यांचे पुनरूत्थान  नाही तर ख्रिस्त हि उठविला गेला नाही; आणि ख्रिस्त उठविला गेला नसेल तर तुमचा विश्वास निष्फळ आहे." पुनरूत्थान  म्हणजे नव-जीवनाचा अनुभव. जो मनुष्य विचाराने, भावनेने, हृदयाने शुद्ध असतो, तो पुनरूत्थानाचा अनुभव घेत असतो. ख्रिस्तामधील जीवनालाच पुनरूत्थान  म्हटले आहे.
ख्रिस्तच मानवी जीवनाचा आंनद आणि सुख आहे. मानवी जीवनाचे तारण करण्यासाठी ख्रिस्त ह्या जगात आला व अदृश्य देवबापाची ओळख आम्हाला करून दिली. मार्ग, सत्य व जीवन मीच आहे, हे आम्हाला पटवून दिले. येशूच्या जीवनातील दु:खसहन, मरण व पुनरूत्थान  या प्रमुख रहस्यावर आज ख्रिस्तसभा कार्य करीत आहे. प्रभुने लाजरसाला मेलेल्यातून उठण्यापूर्वी मार्था व मरीयेच्या घरी असताना म्हटले,"पुनरूत्थान  व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी तो जगेल आणि जीवंत असलेला प्रत्येक जण जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही."
मानवी जीवनाला श्रध्दा ही आवश्यक असते. श्रध्देत महान शक्ति आहे. पवित्र आचरणातून श्रध्दा निर्माण होते. म्हणूनच पवित्र मिस्सा बलिदानामध्ये आपण आभार घोषणेत येशू ख्रिस्ताच्या पुनरूत्थानाची श्रध्दापूर्वक अंत:करणाने आठवण करतो. जर आम्ही परमेश्वरावर पूर्ण मनाने श्रध्दा ठेवली; त्याला पूर्णपणे शरण गेलो तर तो आमचेसुध्दा सांत्वन व तारण करील आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे, आज्ञेप्रमाणे वागण्यास आवश्यक शक्ती, कृपा आणि धैय तो आम्हांस नक्कीच देईल.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: प्रभू आमची श्रध्दा बळकट कर.
१. आपले पोप महाशय, सर्व कार्डिनल्स, बिशप्स, धर्मगुरू व व्रतस्थ बंधू-भगिनी, जे ख्रिस्ताच्या मळ्यात कार्य करतात त्यांची श्रध्दा बळकट व्हावी व इतरांची श्रध्दा त्यांनी आपल्या कार्यद्वारे बळकट करावी म्हणून आपण प्रार्थना करू या.
२. आपण आज अंधारलेल्या जगात राहत आहोत. निराशेने वैफल्यग्रस्त झालो आहोत. ख्रिस्ताच्या आशेचा संदेश सर्व जगभर पोहोचवावा म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करू या. 
३. आपण इतरांना चांगले कार्य करण्यासाठी प्रवृत्त करावे व परमेश्वराने आपणांस स्वर्गसुखाचा अनुभव दयावा म्हणून आपण प्रार्थना करू या.
४. परमेश्वराने आपल्याला दिलेल्या सर्व देणग्याचा आपण योग्य प्रकारे वापर करावा व इतरांची सेवा करून नव-जीवनाचा व पुनरूत्थानाचा अनुभव आपल्या जीवनात घ्यावा; म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करू या.
. आता थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक गरजा ईश्वर चरणी समर्पित करू या.