Wednesday, 12 October 2022

 Reflection for the Homily of Mission Sunday (16-10-2022) By Fr. Suhas Pereira.
 

सामान्य काळातील एकोणतिसावा रविवार




मिशन रविवार


दिनांक: १६/१०/२०२२

वाचन: निर्गम १७:८-१३ 

दुसरे वाचन: २ तिमथी  ३:१४-४:२

शुभवर्तमान: लूक १८: १-८

प्रस्तावना

       आजची उपासना आपल्याला चिकाटीने, अचलतेने आणि विश्वासाने भरलेल्या हृदयाने प्रार्थना करण्यास शिकण्याचे आमंत्रण देत आहे. त्याचप्रमाणे आजची तिन्ही वाचने देवाची विश्वसनीयता आणि गरीब, दुर्बल लोकांपर्यंत पोहोचून त्यांना अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी सक्षम बनवणाऱ्या दैवी न्यायाबद्दल आपल्याला सांगत आहेत.

          आजच्या पहिल्या वाचनात आपण वाचतो कि, यहोशवा आपल्या सैन्याबरोबर अमालेकी लोकांविरुद्ध लढत असताना मोशे हा परमेश्वराकडे इस्रायली सैन्यासाठी अविश्रांत प्रार्थना करत होता. आजच्या दुसऱ्या वाचनात तिमथ्याला पाठवलेल्या दुसऱ्या पत्रात संत पौल तीमथ्याला त्याचे मिशनकार्य पुढे चालू ठेवण्यास, सर्व परिस्थितीत देवाचे वचन चिकाटीने गाजवण्यास आणि देवाचा शब्द सत्य समजण्यास, वाईटाचा निषेध करण्यास, चुका सुधारण्यास योग्य जीवन जगण्याचे मार्गदर्शन करण्यास वापरण्याचे आवाहन करत आहे. आजच्या शुभवर्तमानात विधवा स्त्री आणि न्यायाधीशाच्या दृष्टांताद्वारे प्रभू येशू आपल्याला दैनंदिन आणि नियमित प्रार्थनेचे महत्व समजावून देत आहे. प्रभू येशू आपल्याला निराश होता, विश्वासात डळमळता सतत प्रार्थना करण्यास सांगत आहे. प्रार्थनेमध्ये दाखवलेली चिकाटी आपल्या जीवनामध्ये किंव्हा कृत्यांमध्ये उतरवलेल्या आपल्या विश्वासाची आपल्याला जाणीव करून देते. आपणसुद्धा चिकाटीने प्रार्थना करतो का? देवाकडून शांती, क्षमा आणि आनंदाचे दान मिळवण्यासाठी आपण नेटाने प्रयत्न करतो का? अनेक वेळा परमेश्वराने आपल्या प्रार्थना ताबडतोब ऐकाव्यात असं आपल्याला वाटते. आणि जर आपल्या प्रार्थना ऐकल्या गेल्या नाहीत तर आपण हताश होतो आपला देवावरील विश्वास कमी होतो. आपण प्रार्थना करणे सोडून देतो. परंतु परमेश्वर हा काही अल्लाद्दिनच्या जादुई दिव्यातील दूत नाही जो आपल्या सर्व इच्छा चुटकीसरशी पूर्ण करतो. देव हा आपला प्रेमळ पिता आहे. आणि आपल्याला कधी आणि काय द्यावं हे त्याला माहिती आहे.

मनन-चिंतन

        मनुष्य हा सदैव चिन्हे, प्रतीके, आणि सूचनांवर अवलंबून असतो, आपल्याला मार्गदर्शनासाठी एखाद्या गोष्टीची माहिती करून घेण्यासाठी, एखादी गोष्ट नीट समजून घेण्यासाठी उदाहरणांची गरज भासते. असंच एक अप्रतिम उदाहरण आपल्याला आजच्या पहिल्या वाचनात पाहावयास मिळते. हे उदाहरण आहे, प्रार्थना करणाऱ्या किंव्हा प्रार्थनेत असणाऱ्या मोशेचे. वाळवंटातून प्रवास करत असताना इस्रायली लोकांचा अशा लोकांबरोबर सामना होतो ज्यांच्यावर इस्रायली लोकं फक्त देवाच्या मदतीने आणि मध्यस्थीद्वारेच विजय मिळवू शकत होते. म्हणून युद्धाच्या दिवशी मोशे टेकडीच्या माथ्यावर जाऊन आपले हात वेळ उंचावून उभा राहिला. "जेव्हा मोशे हात वर करी तेव्हा लढाईत इस्राएलाची सरशी होई; परंतु जेव्हा तो हात खाली करी तेव्हा पिछेहाट होई." मोशेचे वर उंचावलेले हात हे फक्त विश्वासाचेच नव्हे तर आदर्श आणि अनुकरणीय अशा प्रार्थनामय वृत्तीचे चिन्ह आहेत. मोशेकडून आपण आज काय शिकू शकतो? इस्रायली लोकांसाठी प्रार्थना करणाऱ्या मोशेकडून आपण खऱ्या प्रार्थनेचे तीन पैलू किंव्हा दृष्टिकोन शिकू शकतो:

) खऱ्या प्रार्थनेचा पहिला पैलू आहे प्रतिनिधित्व. खऱ्या प्रार्थनेचा अर्थ एकट वैयक्तिक रीतीने देवापुढे उभं राहून फक्त स्वतःसाठी प्रार्थना करणे नव्हे. तर खऱ्या रीतीने प्रार्थना करणे म्हणजे अखिल मानवसमाजाचा मी एक भाग आहे हि भावना मनात बाळगून सर्वांसाठी प्रार्थना करणे: जी लोकं देवापासून दूर गेलेली आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करणे; जी लोकं प्रार्थना करू शकत नाहीत आणि ज्या लोकांची प्रार्थना करावयाची इच्छा नाही, देवाबरोबर संभाषण करावयाची इच्छा नाही अशांसाठी प्रार्थना करणे, त्यांच्या नावाने देवापुढे उभा राहणे, त्यांचं प्रतिनिधित्व करणे, अशा लोकांसाठी मध्यस्थी मागणे आणि देवापुढे साकडे घालणे.

) खऱ्या प्रार्थनेचा दुसरा पैलू आहे चिकाटी. ज्या चिकाटीने मोशे इस्रायली लोकांसाठी हात वर करून प्रार्थना करत राहिला, तीच चिकाटी आपल्याला आजच्या शुभवर्तमानात विधवेमध्ये आपल्याला दिसून येते. हि चिकाटी अशी चिकाटी आहे जी प्रार्थनेद्वारे चांगला मार्ग मिळवल्याशिवाय किंव्हा शोधल्याशिवाय थांबत नाही. याचीच चिकाटी आपल्या प्रार्थनेमध्ये वाढावी म्हणून संत पौल आपल्याला आवाहन थेसलोणीकाकरांना पाठवलेल्या पहिल्या पत्रात आपल्याला करतो: "नेहमी प्रार्थना करा. सर्व परिस्थितीत देवाची उपकारस्तुती करा."आणि अशीच चिकाटी प्रार्थनेमध्ये आपल्या अंगी बाणवण्यासाठी प्रभू येशूसुद्धा आपल्याला बोलावतो: "मागा, म्हणजे तुम्हाला मिळेल."

) श्रद्धा किंव्हा देवावरील विश्वास: मोशेच्या  प्रार्थनाशीलतेमध्ये आपण खऱ्या प्रार्थनेचा अजून एक पैलू ओळखू शकतो, जो चिकाटी या पैलूच्या खूप जवळचा आहे. तो पैलू आहे श्रद्धा किंव्हा देवावरील विश्वास. अनेक वेळा प्रार्थनेबद्दलची आपली कल्पना फारच आगळी-वेगळी असते. आपल्याला वाटते कि प्रार्थना हा देवाबरोबर केलेला सौदा आहे, ज्यात देव आपल्याला प्रार्थनेच्या बदल्यात आपल्याला जे काही हवं आहे ते देतो. परंतु प्रार्थना म्हणजे सौदा नाही. प्रार्थनेचा अर्थ हा सुद्धा नाही कि, फक्त आपण गरजेच्या असतो तेव्हाच आपण परमेश्वराकडे जावे आणि त्याच्यापुढे हात जोडावेत. प्रार्थना म्हणजे संवाद. प्रार्थना म्हणजे विश्वासाने भरलेल्या हृदयाने आणि जीवनाने परमेश्वरापुढे उभं राहणे. आपल्या गरजेच्या देवाकडे जाणारा मनुष्य हा खऱ्या अर्थाने प्रार्थनाशील मनुष्य नाही. तर प्रार्थनाशील मनुष्य हा आपलं संपूर्ण जीवन हे दैवी दृष्टिकोनातून पाहू शकतो आणि तसं जगतो.

प्रार्थना आणि काम हे दोन्ही एक आदर्श आणि यशस्वी विश्वासू जीवनाचा भाग आहेत. परमेश्वरावरील विश्वास आणि त्याच विश्वासाच्या आधारे केलेलं कृत्य या दोन्ही गोष्टी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आणि आजच्या पहिल्या वाचनात या दोन्ही गोष्टी आपल्याला पाहावयास मिळतात: प्रार्थनाशील मोशे आणि शत्रूंशी झुंजणारा यहोशवा. या दोन वस्तुस्थिती आपण एकमेकांपासून वेगळ्या करू शकत नाहीत. मी फक्त प्रार्थनाच करिन किंव्हा मी फक्त काम करिन, कष्ट करिन असं आपण सांगू शकत नाहीत. आपल्या जीवनात असे क्षण अशी वेळसुद्धा असली पाहिजे जेव्हा आपण देवाबरोबर प्रार्थनेत संवाद साधतो, त्याच्याबरोबर बोलतो, त्याला आपलं सुख-दुःख सांगतो. आणि याच प्रार्थनेद्वारे परमेश्वरसुद्धा आपल्या संपूर्ण जीवनाचा आणि आपल्या सर्व कार्याचा ताबा घेऊ शकला पाहिजे. प्रार्थनाशील मोशे आणि झुंजणारा यहोशवा, प्रार्थना आणि जीवनात लढण्याची जिद्द, शक्ती आणि पुढे जाण्याची तयारी. दोन्ही गोष्टी  आपल्या मानवी जीवनात महत्वाच्या आहेत. तेव्हाच आपण जीवनात यशस्वी आणि विजयी होऊ शकतो आणि आपलं ध्येय गाठू शकतो.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना 

प्रभू येशू म्हणतो, "मागा म्हणजे मिळेल". आणि आजच्या शुभवर्तमानातील विधवेचं उदाहरण घेऊन आणि तिच्याकडून प्रेरणा घेऊन मोठ्या विश्वासाने आपण आपल्या विनंत्या आणि गरज प्रभुचरणी आणू या.

प्रतिसाद: हे प्रभो आमची प्रार्थना ऐकून घे.

) आपल्या ख्रिस्तसभेच्या सर्व मेंढपाळांनी तसेच सर्व धर्मगुरू, धर्मबंधू आणि व्रतस्थ बंधू-भगिनींनी प्रार्थनेद्वारे परमेश्वराशी असलेल्या नात्यात मजबूत व्हावे आणि देवावरील विश्वासाने जीवन जागून संपूर्ण ख्रिस्तसभेला आणि संपूर्ण जगाला ख्रिस्तावरील विश्वासाची साक्ष द्यावी म्हणून आपण प्रार्थना करू या.

) आपल्या समाजात आज प्रेम, दया, शांती या मूल्यांचा अभाव आहे आणि त्याऐवजी द्वेष, सूडभावना आणि हिंसाचार वाढत आहे. आज सर्व लोकांनी देवावर विश्वास ठेवावा आणि परमेश्वरमध्ये आपल्या सर्वांच्या निर्मात्याला आणि स्वर्गीय पित्याला ओळखावे आणि त्याच्यावरील विश्वासात दृढ होऊन प्रेम, क्षमा, शांतीच बीज आपल्या समाजात पसरवावे. म्हणून आपण प्रार्थना करूया.

) आपल्या कुटुंबातील आणि समाजातील ज्या व्यक्ती आजाराने पछाडलेल्या आहेत. त्यांना आपल्या करुणामय प्रभुने  प्रेमाचा स्पर्श करून त्यांना नवजीवनाचा निभाव द्यावा, म्हणून आपण प्रार्थना करू या.

) आपल्या धर्मग्रामातील आणि धर्मप्रांतातील सर्व ख्रिस्ती लोकांना प्रार्थनेमध्ये देवाचं अनुभव यावा आणि तोच अनुभ आपल्या जीवनाद्वारे त्यांनी इतरांना द्यावा आणि इतरांना परमेश्वराची गोडी लावावी, म्हणून आपण प्रार्थना करूया.

) आपल्या हृदयाच्या शांततेमध्ये आपण आपल्या वैयक्तिक आणि खाजगी गरजांसाठी  प्रार्थना करूया.

Friday, 7 October 2022

 Reflections for the homily for 28th Sunday in Ordinary Time (9-10-22) by Fr. Benher Patil
सामन्य काळातील अठ्ठावीसावा रविवार 



दिनांक:  ०९/१०/२०२२

पहिले वाचन: २ राजे ५:१४-१७

दुसरे वाचन: २ तीमथी २:८-१३

शुभवर्तमान: लूक १७:११-१९


प्रस्तावना: 

    असं म्हणतात कि, “कृतज्ञता हे उन्नत आत्म्याचे लक्षण आहे आणि तो शिष्टाचाराचा सर्वोत्तम प्रकार आहे.” आजच्या वाचनाचा मुख्य विषय “कृतज्ञता” आहे. विशेषत: देव आपल्याकडून कृतज्ञतेच्या अभिव्यक्तीची अपेक्षा करतो. आपल्या दैनदिन जीवनात, देव आपणावर नेहमीच त्याच्या असंख्य आणि अनंत आशीवार्दाचा आणि कृपेचा वर्षाव करत असतो. आजची तिन्हीही वाचणे देवाच्या आपल्यावरील अपार प्रेमाचं दर्शन घडवतात. त्याबद्दल आपण त्याचे रास्तपणे आणि उदारपणे आभार मानने, हे आपलं आद्यकर्त्यव आहे आणि तशी त्याची इच्छाही आहे. जर आपल्या कृतघ्नतेमुळे आपण आपल्या प्रेमळ परमेश्वराला दुखवले असेल तर पश्चातापी अंत:करणाने त्याची आपण क्षमा मागुया.

मनन-चिंतन: 

    कलकत्त्याच्या मदर तेरेसा, नेहमीप्रमाणे एके दिवशी तिच्या अत्यंत गरीब शहरातील गरीब वस्तीमध्ये जात असताना, त्यांना एक वृद्ध माणूस रस्त्यावर पडलेला आढळला. तो आजाराने आणि दुखाने त्रस्त झालेला होता आणि मरणाची घटका मोजत होता. मदर तेरेसाने त्याला आपल्या खांद्यावर उचलले, तिने गरीबांसाठी स्वतः स्थापन केलेल्या रुग्णालयात नेले आणि तेथे एका स्वच्छ पलंगावर झोपवले. मग त्यानी त्याच्या सुकलेल्या ओठांवर पाण्याचा प्याला धरून, त्याची तहान भागवण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याला दुर्दैवाने एक घोटही घेता आला नाही; पण अचानक त्याचा चेहरा उजळला आणि स्मितहास्य करत तिला म्हणाला: "धन्यवाद". त्यानंतर लगेचच तो कालबाह्य झाला.

    फक्त “आभारी किवा धन्यवाद” ह्या एका शब्दाने, त्या मरणासन्न झालेल्या म्हाताऱ्याने, मदर तेरेसांनी त्याच्यावर केलेल्या उपकाराची परतफेड तर केलीच, पण कृतज्ञतेची भावना ही प्रेमाची एक शक्तिशाली अभिव्यक्ती आहे हेही दर्शवून दिले. आजच्या प्रभू शब्दाविधीत हेच सत्य नमूद केलेलं आढळते. सिरीयाचा नामान आणि शमरोनी, हे दोघेही कुष्टरोगी होते. त्यांना देवाने चमत्कारीकरित्या आजारातून बर केलं आणि त्यांना शुध्द केलं. ह्या महान चमत्कारास त्यांनी आपल्या ऋणी हृदयाने प्रतिसाद दिला आणि देवाने दर्शवलेल्या प्रेमाची परतफेड आपल्या विश्वासाद्वारे आणि उपकारी भावनेने व्यक्त केली.

    बायबलमधील दोन परिच्छेदांची रचना एकसारखी आहे; ते दोघेही दोन भाग आणि दोन नायक ठळक करतात: देवाचा भाग, जो मनुष्याच्या बाजूने चमत्कारिकपणे हस्तक्षेप करतो, त्याचे आरोग्य आणि आनंद पुनर्संचयित करतो; आणि मनुष्याचा भाग, ज्याला देवाचे अगणित उपकार आठवणे, त्याचे आभार मानणे आणि त्याची स्तुती करणे ह्याची गरज भासते. सीरियाच्या नामानाने, स्वतःला कुष्ठरोगातून बरे झालेले पाहून, इस्रायलच्या देवाची महानता आणि वैभव ओळखले, त्याचे आभार मानले आणि परमेश्वराशिवाय इतर देवांना यज्ञ न करण्याचे वचन दिले. त्याचप्रमाणे आजच्या शुभवर्तमानात संत लूक सांगतो की, येशूने बरे केलेल्या दहा कुष्ठरोग्यांपैकी, फक्त शमरोनी हा असा एकमेव मनुष्य होता कि, ज्याने स्वतःला बरे झालेले पाहून, तो हर्षाने आणि कृतज्ञतेने येशूकडे परत आला आणि मोठ्या आवाजात स्तुती करून त्याचे आभार मानण्यासाठी येशूच्या चरणी लोटांगण घातले. येशूने त्याच्या मनपूर्वक आभाराचा स्वीकार केला, त्याची वाहवा केली आणि आशीर्वाद देऊन त्याला पाठवून दिले.

    साधारणत: इतरांनी आपण त्यांच्यासाठी केलेल्या कामाची नोंद घ्यावी आणि त्याबद्दल कृतज्ञ असावे, ही इच्छा बहुतांश लोकांच्या मनात असते. काहींच्या मनात सुप्तपणे, तर काहींच्या अगदी उघडपणे. पण समोरच्या व्यक्तीला केलेल्याची कदर नाही, हा अनुभव आपल्यापैकी बऱ्याचजणांचा असतो. असं म्हणतात की, “ज्या गोष्टी आपल्या कृतज्ञतेला पात्र आहेत त्या गोष्टी आपण अनेकदा गृहीत धरतो.” कृतज्ञतेचा अभाव तेव्हाच प्रत्ययास येतो- जेव्हा आपण आपले आयुष्य, त्यातल्या घडामोडी, व्यक्ती आणि वस्तू गृहीत धरतो. मला मार्गक्रमण शक्य करून देणारे पाय, सुंदर कलाकृती निर्माण करू देणारे हात, हे सुंदर जग दाखवणारे डोळे, चविष्ट पदार्थाचा आस्वाद घेण्यासाठी जिव्हा, सुरक्षित राहण्यासाठी छत, प्रेमभावाची माणसे या व इतर गोष्टी रोजच्या सवयीच्या झाल्यामुळे गृहीत धरल्या जातात.

    बायबल उताऱ्यातील येशूचा प्रश्न: “दहाचे दहा शुध्द झाले होते ना? मग नऊ जण कोठे आहेत?”, ही बाब स्पष्टपणे अधोलेखीत करते. दहाही कुष्ठरोग्यांवर येशूने दया केली, त्यांची याचना ऐकली, त्याचं दुख जाणलं आणि त्यांना भयानक अश्या आजारातून मुक्त केलं. तरीपण ते कृतज्ञतेने वागले नाही आणि उपकाराची परतफेड करायचे विसरून गेले. अश्याप्रकारे त्यांनी येशूने दयाळूपणे, कनवाळूपणे आणि उदारपणे केलेला चमत्कार ते गृहीत धरतात.

    आजची वाचणे आपणास स्पष्टपणे कृतघ्न न राहता, देवाबरोबर, इतराबरोबर कृतज्ञतेने वागण्यास आमंत्रण देतात. आपण जे काही आहोत आणि आपल्याकडे जे काही आहे ते सर्व देवाचे आणि केवळ देवामुलेच शक्य आहे. तोच आपला निर्माता, दाता, पोषणकर्ता, आणि तारणारा आहे. म्हणूनच देवाच्या महानतेची घोषणा करणे आणि त्याचे आभार मानणे हे खऱ्या ख्रिस्ती जीवनाचे सार आहे. तथापि, आपला अनुभव सांगतो की, इतर नऊ कुष्ठ रोग्याप्रमाणे, आम्हांलाही कृतज्ञता व्यक्त करणे कठीण जाते. जगात कृतज्ञतेची गोडी असणारे लोक खूप कमी आहेत. त्यांना फक्त गरज असेल तेव्हाच धन्यवाद कसे म्हणायचे हे माहित आहे; परंतु हृदयातून आणि मनोभावे आभार कसे मानावे ह्याची कल्पनाच नसते. तर, “धन्यवाद” हे शब्द काहींच्या फक्त तोंडीच असतात, परंतु  हृदयात अजिबात नसतात.

    ख्रिस्त प्रत्येक कृतीपूर्वी परमेश्वर पित्याला धन्यवाद देतो. संत पौल म्हणतो, कि प्रत्येक गोष्टीत देवाचे आभार मानात. तर आज प्रभूच्या वचनावर मनन-चिंतन करताना, आपल्या जीवनात नेहमीच देवाचे सदैव गौरव गाता यावे, त्याची उपकार-स्तुती करता यावी, आणि मनोभावे त्याचे आभार-स्तवन करता यावे, यासाठी विशेष प्राथना करूया.

विशासू लोकांच्या प्रार्थना:

हे प्रभू, आम्हाला कृतज्ञ व्हायला शिकव.

१. देवाने निवडलेले सर्व धार्मिक पुढारी: आपले परमगुरु पोप फ्रान्सीस, सर्व महागुरू, धर्मगुरू आणि धर्म-भगिनींनी, देवाने त्यांना दिलेल्या सर्व देणग्यांचा, कृपादानांचा वापर त्यांनी  उदारपणे व प्रेमाने, देवाच्या गौरवासाठी आणि मानवी समाजाच्या उन्नतीसाठी आणि कल्याणासाठी करण्यास ईश्वरी मदत मिळावी म्हणून प्रार्थना करूया.

२. देवाने आपल्याला प्रेमळ आई-वडील, बहिण-भाऊ, नातेवाहिक आणि मित्र-परिवार दिलेले आहेत. त्यांच्या देणगीबद्दल आणि त्यांच्याद्वार आपल्यावर केलेल्या उपकाराबद्दल देवाचे आभार मानूया. त्यांच्या बरोबर शांतीने, सौख्याने, प्रेमाने जगण्यास आपणास कृपा मिळावी म्हणून प्रार्थना करूया.

३. देवाने उत्पन्न केलेली सुंदर सृष्टी हे देवाचे महान वरदान आहे. त्याद्वारे देव आपल्या जीवनासाठी आवश्यक ते आपल्याला पुरवतो आणि आपल्या सर्व गरजा भागवत असतो. तिच्या अमूल्य देणगीबद्दल देवाची स्तुती करूया आणि त्या धरती मातेची सर्व प्रदूषणापासून मुक्ती करून, तिची चांगली निगा राखून, ती अधिक सुंदर आणि लाभदायक करण्यास सर्वांनी झटावे म्हणून प्रार्थना करूया.

४. ह्या जगात सर्व सेवाभावी आणि मिशनरी संस्था, निस्वार्थीपणे, समर्पितपणे आणि तन्मयतेने समाजातील गरजू, आजारी, अनाथ, अपंग आणि गरीब लोकांची सेवा करतात, त्यांना परमेश्वराने चांगलं स्वास्थ्य द्याव, ईश्वरी सहाय्य त्यांना मिळावं तसेच उदार लोकांनी  त्याचं हे पवित्र कार्य पुढे नेण्यास हातभार लावावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

५. ह्या उपासनेत सहभागी झालेल्या सर्व बंधू-भगिनींना, भाकररूपी ख्रिस्ताने अभिषिक्त करून, त्यांना पवित्र आत्म्याने भरून, आपलं दैनंदिन जीवन, ख्रीस्ताप्रमाणे प्रेमाने, उदारतेने, उत्साहाने, आणि कृतज्ञतेच्या भावनेने जगण्यास, त्यांना सुबुद्धी आणि कृपा मिळावी म्हणून प्रार्थना करूया.


    











.

Monday, 3 October 2022

 Reflection for the Feast of St Francis of Assisi (04/10/2022) By Bro. Elias Itur.




संत फ्रान्सिस असिसिकर ह्यांचा सण


दिनांक: ०४ /१० /२०२

पहिले वाचन: बेनसिरा ५०: १,३-४,६-७

दुसरे वाचन: गलतीकारास पत्र -६:१४-१८

शुभवर्तमान: मत्तय ११:२५-३०

प्रस्तावना:

    आजची उपासना आपल्याला देवा विषयी लक्षपूर्वक ऐकणे व "आपल्या हृदयाच्या कानाने ऐकणे" ह्यासाठी पाचारण करीत आहे. आज सर्व जगभर फ्रान्सिकन कुटुंब त्यांचा संस्थापक फ्रान्सिक ह्यांचा सण साजरा करीत आहे. संत फ्रान्सिस हे प्रामाणिक आणि देवाचे वचन ऐकणारे साधारण शिष्य होते. ते देवाच्या पावलावर पाय टाकून चालले. आजच्या पहिल्या वाचनात आपण एकतो की, आपण किती दूर गेलो येशू ख्रिस्तापासून तरी तो आपल्या बरोबर सदासर्वकाळ असतो. तसेच आजचे शुभवर्तमान आपल्या सर्वांना देवाचे वचन ऐकण्यास पाचारण करीत आहे. मेरीने चांगला भाग निवडून देवाचे वचन एकेत होती परंतु मार्था तिच्या कामात व्यस्त होती. तेव्हा आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्वना देवाचे वचन म्हणजे (word of God) ह्यावार मनन चिंतन करण्यात बोलावत आहे.

बोधकथा

असिसीकर संत फ्रांसिस ह्याचा जन्म ११८१ साली झाला. तरूण असताना तो फार उधळ्या माणसासारखा वागला. कारण तो राजघराण्यात जन्मला होता. पण त्यानंतर येशूची कृपा त्याच्यावर झाली आणि त्याने आपला वारसा सोडून दिला. येशूच्या शुभवर्तमानातली गरीबी त्याने स्वीकारली आणि तो खिस्ती वैराग्याचे जीवन जगू लागला. तो प्राणी मात्रांचा मित्र बनला. असीसीचा फ्रांसिस पूर्णपणे आध्यत्मिक बनला होता. तो व्रतस्थ जीवन जगला व तो शब्दांपेक्षा प्रत्यक्ष कृतीने प्रवचन दयायला लागला. एकदा तो हाताखालच्या सहकारी बंधुंना म्हणाला, आज आपण दिवसभर गावागावात फिरू आणि लोकांना प्रवचन देऊ. दिवसभराची सामग्री व शिदोरी घेऊन फ्रांसिस व त्यांचे सवंगडी पायीपायीच निघाले. वाटेमध्ये एक विधवा रडतरडत शोक करताना त्यांना सापडली. दोनच दिवसांपूर्वी तिचा एकुलता मुलगा मरण पावला होता. सर्वजण तेथे थांबले. तिच्याशी सांत्वनपर बोलले. तिचं दुःख हलकं केलं. मुलाच्या आत्म्यासाठी प्रार्थना केली. फ्रांसिसने तिला काही पैसे दिले आणि तिचा निरोप घेऊन ते पुढे वाटचाल करू लागले. अर्धा मैलभर पुढे गेल्यावर त्यांना एक म्हातारा भिकारी थंडीमध्ये कुडकडत शिक्षा मागताना दिसला. सर्वजण त्याच्यापाशी थांबले. त्याची विचारपूस केली. फ्रांसिसने अंगावरचं कपडे  काढून त्याच्या अंगात घातलं आणि त्याच्या पिशवीत काही बिस्कीटं आणि पाव घालून ते पुढे चालत राहिले.

    दुपारचा एक वाजला होता. फ्रांसिस साथीदारांना म्हणाला आता आपण आपल्या घरी परतु या. ते सर्व एकत्र म्हणाले, 'तुम्हाला लोकांना प्रवचन दयायचं होतं त्याचं काय ?' फ्रांसिस म्हणाला, 'वेड्यांनो, प्रवचन फक्त शब्दाने नव्हे तर प्रत्यक्ष कृतीने सुद्धा देता येते. आपण सर्वांनी सकाळपासून ज्या चार प्रत्यक्ष कृती केल्या आहेत त्या सर्वात मोठं प्रवचन दुसरं कोणतं असू शकते ! येशूचं शुभवर्तमान जे शिकवते तेच आपण आज केला नाही काय ? जे जे काही बरं वाईट तुम्ही माझ्या ह्या जगातील कनिष्ठ बंधु-भगिनींसाठी कराल, ते तुम्ही मलाच कराल.

    खिस्ताठायी माझ्या बंधुनो आपल्याला ठाऊक आहे की सध्याच्या ख्रिस्तसभेचे सर्वच महागुरू आपल्या धर्मगुरूना सांगतात की त्यांनी अधूनमधून सर्व लोकांना प्रत्यक्ष घरी जाऊन त्यांना भेटी द्याव्यात आणि त्यांच्या गरजा, समस्या जाणून घ्याव्यात. धर्मगुरू जेव्हा अशाप्रकारे भेटी देतात, तेव्हा लोकाची धावपळ होऊन तारांबळ उडते त्यांचा पाहुणचार करण्याकरता. ते घरात चुलीपुढे धावतात त्यांच्यासाठी चहा- कॉफी किंवा थंड पेय आणण्यासाठी व त्यांना काही खायला देण्यासाठी. मग भेट दयायला आलेले धर्मगुरू बराच वेळ एकटे बसलेले असतात. वास्तविक धर्मगुरू आलेले असतात संवाद साधण्यासाठी, चौकशी करण्यासाठी, अडचणी, समस्या जाणून घेण्यासाठी किंवा मार्गदर्शन करण्यासाठी. परंतु बऱ्याचदा असा उदात्त हेतु बाजूला राहतो व चहापाण्याला व पाहुणचाराला जास्त प्राधान्य दिलं जाते. वाचनात आपल्या दारी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत कसे करावे ह्याचे प्रबोधन करण्यात आले आहे. शुभवर्तमानात आपण पाहातो की येशू मार्था आणि मेरी ह्यांच्या घरी जायचा. दोघीही त्याचं स्वागत करतात व मेरी त्याच्या पायांसी बसून त्याचे दिव्य शब्द ऐकत बसायची. त्याला काही प्रश्न विचारून आपल्या शंकांचं ती निरसन करून दयायची. तर मार्था ख्रिस्त आपल्या घरी आल्याबद्दल त्याला चांगलं जेवण तयार करायला गुंतायची. ते करताना तिची एकटीची तारांबळ उडायची. ती येशूकडे येऊन तक्रारही करायची. मी तुला जेवण तयार करणार आहे परंतु कामाचा भार माझ्या एकटीवर आहे म्हणून माझ्या बहिणीला मला मदत करायला सांग. तेव्हा येशू तिला म्हणतो मार्था, मार्था, मी केवल खाण्यापिण्यासाठी आलेलो नाही. मी तुमच्याशी बोलायला आलोय. येशूला स्पष्टपणे सांगायचंय की तुम्ही कोणत्या भेटीला किती प्राधान्य देता हे महत्वाचं आहे. मरीयेला आत्मिक भूक होती. ती प्रभूचे ऐकण्यास व त्याची महानता ओळखण्यास उत्सुक होती. यापासून तो तिला दूर करणार नव्हता. तिने आपली आत्मिक गरज ओळखली होती. प्रभूचे भाषण ऐकून तिचे अंत:करण प्रफुल्लित झाले. तिने चांगला वाटा निवडला होता. अशासप्रकारे संत फ्रान्सिस ने त्याच्या जीवनात चांगला वाटा निवडून, तो येशूचा साथीदार बनला. तो प्रभूच्या शब्दाप्रमाणे वागला आणि दुसयाना पण शिकवण दिली. त्याने त्याचे अंतकरण प्रभूसाठी आणि दुसऱ्यानसाठी अर्पण केले.

जेव्हा प्रभूचा प्रश्न येतो, तेव्हा आपण त्याच्यासाठी काहीही तयार करण्यात जास्त काळजी करू नये. तयारी आवश्यक आहे फक्त तुमची उपस्थिती आणि अध्यात्मिक उपस्थिती कारण अशा प्रकारे परमेश्वर तुमच्यावर आधीच संतुष्ट आहे. तुम्हाला फारशी तयारी करण्याची गरज नाही किंवा परमेश्वराच्या आगमनासाठी ते भव्य असण्याची गरज नाही कारण तो साधा आहे आणि तो आधीच आनंदी/समाधानी असेल. तुम्हाला फक्त प्राधान्य द्यायचे आहे किंवा महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करायचे आहे किंवा इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा कोणते चांगले आहे आणि तो परमेश्वर आहे. तोच आपल्या चिंता कमी करणारा असेल, म्हणूनच आपण प्रभूशिवाय इतर कशातही गुंतून राहू नये कारण तो नेहमी आपल्यासाठी प्रथम येतो.

विनंत्या

प्रतिसाद:  हे प्रभू, तुझ्या लोकांची प्रार्थना ऐक.

१) ख्रिस्तसभेचा कारभार पाहणारे पोप, कार्डीनल्स, बिशप्स, धर्मगुरू- धर्मभगिनी व व्रतस्त लोकांना पवित्र आत्म्याची प्रेरणा मिळावी व ख्रिस्तासारखे जीवना जगून त्यांनी जगाला ख्रिस्ताकडे आणावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

२) सर्व फ्रान्सिसकन बंधू भगिनींनी देवाच्या कार्यासाठी व त्याच्या गौरवासाठी अविरत झटत राहावे, असिसीकर संत फ्रान्सिसद्वारे त्यांनी जगाला प्रेमाचा, शांतीचा व बंधुत्वाचा संदेश द्यावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

३) पर्यावारण व मानव ह्यात नात अतूट आहे परंतु स्वार्थासाठी पर्यावरणाची ऱ्हास होत आहे. ह्या पर्यावरणाची जोपासना करण्यासाठी व तिचे रक्षण करण्यासाठी अधिकाधिक लोकांनी व नेत्यांनी पुढाकार घ्यावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

४) जे लोक आजारी आहेत थकलेले, उदासीन आहेत अशाना परमेश्वराने सत्कार्य लाभावे व पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने ते लवकरात लवकर बरे व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

५) शेतकरी व मासेमारी बंधू-भांगिनीसाठी त्यांच्या ह्या काळात परमेश्वराने रक्षण करावे व त्यांना त्याच्या कामात भरपूर यश मिळावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

६) थोडा वेळ शांत राहून आपल्या व्यक्तिक गरजासाठी प्रार्थना करूया.