Reflections for the Homily of 17th Sunday in Ordinary Time (26-07-2026) By Br. Vinan Souz
सामान्य काळातील सतरावा रविवार
दिनांक: २६/०७/२०२६
पहिले
वाचन: १ राजे ३:५, ७-१२
दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ८:२८-३०
शुभवर्तमान: मत्तय १३:४४-५२
प्रस्तावना:
आज ख्रिस्तसभा
सामान्य काळातील सतरावा रविवार साजरा करीत आहे. आजची उपासना आपल्याला आपल्या
जीवनातील खरा खजिना कोणता आहे यावर चिंतन करण्यास आमंत्रित करते.
आजच्या पहिल्या वाचनात राजा सोलोमन
संपत्ती, कीर्ती किंवा दीर्घायुष्य न मागता आपल्या लोकांचे योग्य नेतृत्व करण्यासाठी
शहाणपणाची याचना करतो. त्याच्या ह्या नम्र आणि विनंतीवर प्रसन्न होऊन देव त्याला
ज्ञान आणि विवेक बुद्धीचे वरदान देतो. आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल आपल्याला
खात्री देतो की जे देवावर प्रेम करतात त्यांच्या जीवनातील प्रत्येक घटना देव
त्यांच्या चांगुलपणासाठी उपयोगात आणतो. देवाने आपल्याला ख्रिस्तासारखे बनण्यासाठी
बोलावले आहे आणि आपल्या गौरवात सहभागी होण्याचे आमंत्रण दिले आहे. आजच्या
शुभवर्तमानात येशू शेतातील लपविलेल्या खजिन्याचा आणि अनमोल मोत्याचा दृष्टांत ह्याद्वारे सांगू इच्छितो, की देवाचे राज्य जगातील सर्व संपत्तीपेक्षा अधिक मौल्यवान आहे. जो त्याची खरी
किंमत ओळखतो, तो आनंदाने सर्व काही सोडून देवाची निवड करतो.
या मिस्साबलिदानात सहभागी होत असताना, प्रभूकडे प्रार्थना
करूया की प्रभूलाच आपल्या जीवनाचा खरा खजिना मानून त्याच्या इच्छेनुसार जगण्याचे
सामर्थ्य त्याच्याकडे मांगुया.
मनन चिंतन:
आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभु येशू
स्वर्गाच्या राज्याविषयीची शिकवण देत असताना, दोन लहान पण
अतिशय अर्थपूर्ण दृष्टांत सांगतो. पहिला दृष्टांत एका अशा माणसाचा आहे ज्याला
शेतात पुरलेला खजिना सापडतो. तो खजिना पाहिल्यानंतर तो आनंदाने आपल्या जवळ असलेले
सर्व काही विकतो, ते शेत विकत घेतो आणि त्या खजिन्याचा
मालक बनतो. दुसरा दृष्टांत एका व्यापाऱ्याचा आहे जो उत्कृष्ट मोत्यांच्या शोधात
असतो. जेव्हा त्याला अत्यंत मौल्यवान असा एक अनमोल मोती सापडतो, तेव्हा तोही
आपली सर्व संपत्ती विकून तो मोती विकत घेतो.
सर्वप्रथम
आपण हे समजून घेतले पाहिजे की या दृष्टांतांचा अर्थ असा नाही की आपण आपल्या पैशाने
स्वर्गाचे राज्य विकत घेऊ शकतो. देवाचे राज्य अमूल्य आहे; त्याची
किंमत कोणत्याही संपत्तीने मोजता येत नाही. ते देवाकडून पात्र ठरणाऱ्यांना
विनामूल्य मिळणारी देणगी आहे. एखाद्या व्यक्तीकडे जगातील सर्व संपत्ती असली, तरी तो जर
दुष्ट जीवन जगत असेल तर त्याला स्वर्गात प्रवेश मिळणार नाही. स्वर्गात प्रवेश मिळवण्यासाठी
आवश्यक असते ती हृदयाची संपत्ती म्हणजेच सौम्यता, उदारता, करुणा, दया, प्रेम आणि
देवावरील विश्वास.
आजच्या
शुभवर्तमानाशी सर्वांत सुंदरपणे जुळणारे उदाहरण म्हणजे असीसीकर संत फ्रान्सिस.
फ्रान्सिस हा श्रीमंत व्यापाऱ्याचा मुलगा होता. तो ऐश्वर्य, मौजमजा आणि
प्रतिष्ठेत वाढला. त्याच्याकडे पैशाची, मित्रांची
आणि सुखाची कमतरता नव्हती. परंतु त्याच्या अंतःकरणात शांती नव्हती.
एक
दिवस प्रार्थनेत त्याने ख्रिस्ताची हाक ऐकली. कुष्ठरोग्याला मिठी मारताना त्याने
येशूचा चेहरा अनुभवला. नंतर सॅन डॅमियानोच्या चर्चमध्ये क्रूसावरील येशूने त्याला
म्हटले, "फ्रान्सिस, माझे घर
पुन्हा उभे कर." त्या दिवसापासून त्याला ख्रिस्त हा खरा खजिना सापडला.
फ्रान्सिसने
वडिलांची संपत्ती, महागाचे कपडे, व्यवसाय आणि
भविष्यातील सर्व सुखांचा त्याग केला. शहराच्या चौकात त्याने अंगावरचे सर्व कपडे
उतरवून वडिलांना परत दिले आणि म्हटले, "आतापासून
माझा पिता स्वर्गातील परमेश्वर आहे." लोकांनी त्याला वेडा म्हटले, पण
प्रत्यक्षात त्याने शुभवर्तमानातील लपलेला खजिना शोधला होता.
फ्रान्सिसने
गरिबी, प्रार्थना, सेवा आणि
प्रेमाचे जीवन स्वीकारले. त्याने पक्ष्यांनाही सुवार्ता सांगितली, गरिबांची
सेवा केली, कुष्ठरोग्यांना मिठी मारली आणि संपूर्ण
जगाला दाखवून दिले की देव हा सर्वांत मोठा खजिना आहे. आज आठशे वर्षांनंतरही जग
त्यांना संत म्हणून ओळखते. कारण त्यांनी सर्व काही गमावले नाही; उलट त्यांनी
सर्वांत मोठा खजिना मिळवला.
बंधूंनो-भगिनींनो, आपण स्वतःला
विचारूया की, आपल्या जीवनाचा खरा खजिना कोण आहे? पैसा? मोबाईल? प्रतिष्ठा? की येशू?
जर
आपणास निवडण्यास सांगितले, तर आपण काय निवडणार. सोने, पैसा, मोबाईल, प्रतिष्ठा, की येशू? आपण सहज
म्हणू, "आम्ही येशूची निवड करू." परंतु
प्रत्यक्ष जीवनात अनेकदा वेगळेच चित्र दिसते. संपत्ती आणि प्रतिष्ठेच्या मागे
धावताना अनेक लोक आपला बहुतेक वेळ केवळ व्यवसाय, नोकरी आणि
पैसा कमावण्यात घालवतात. आजची संस्कृती आपल्याला सांगते की अधिक पैसा, अधिक यश आणि
अधिक मालमत्ता मिळवली तरच खरे सुख मिळते. म्हणून अनेकजण अधिक पैसे कमावण्यासाठी
आपल्या कुटुंबाला वेळ देत नाहीत. काहीजण प्रतिष्ठा टिकवण्यासाठी किंवा पद
मिळवण्यासाठी आपल्या ख्रिस्ती मूल्यांशी आणि तत्त्वांशी तडजोड करण्यासही धजत नाही.
राजा
सोलोमनची कथा आपल्यासाठी मोठी प्रेरणा आहे. एका स्वप्नात देवाने त्याला विचारले, "तुला जे हवे
आहे ते माग." तरुण असल्यामुळे सोलोमनला संपत्ती, दीर्घायुष्य
किंवा कीर्ती मागण्याची संधी होती. परंतु त्याने स्वतःच्या जबाबदारीचा विचार केला
आणि देवाला अशी प्रार्थना केली: "मला माझ्या लोकांवर न्यायाने राज्य
करण्यासाठी शहाणपण आणि विवेक बुद्धी दे." सोलोमनने संपत्ती नव्हे, तर देवाची
बुद्धी आणि मार्गदर्शन मागितले. देव त्याच्या या निवडीवर इतका प्रसन्न झाला की
त्याने त्याला केवळ शहाणपणच नव्हे, तर संपत्ती, कीर्ती आणि दीर्घायुष्य
यांचाही आशीर्वाद दिला. म्हणूनच आपण आनंदाने गातो: "प्रथम देवाच्या राज्याचा
आणि त्याच्या धार्मिकतेचा शोध घ्या; आणि या सर्व
गोष्टी तुम्हाला अधिक म्हणून दिल्या जातील." (मत्तय ६:३३).
संत
मदर तेरेसा आणि संत पोप जॉन पॉल दुसरे यांचे जीवनही याच सत्याची साक्ष देते.
त्यांनी या जगातून जाताना कोणतीही संपत्ती मागे ठेवली नाही, कारण
त्यांनी पृथ्वीवर खजिना साठवला नव्हता. त्यांचा खरा खजिना म्हणजे देवाची सेवा, देऊळमातेची
सेवा आणि गरिबांवरील प्रेम. त्यांनी आपले संपूर्ण जीवन देवासाठी अर्पण केले आणि
त्यातच त्यांना खरा आनंद मिळाला.
आजच्या
शुभवर्तमानातील दृष्टांत आपल्याला शिकवतात की ज्याला स्वर्गाच्या राज्याचा खरा
खजिना सापडतो, तो येशूच्या अधिक जवळ राहण्यासाठी आणि
त्याचे अनुसरण करण्यासाठी आनंदाने सर्व काही सोडण्यास तयार होतो. कारण जगातील सर्व
संपत्ती क्षणभंगुर आहे, पण देवाचे राज्य आणि त्याच्याबरोबरचे
अनंत जीवन हेच खरे, शाश्वत आणि अमूल्य धन आहे.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद: हे प्रभू आम्हाला तुझे राज्य पाहण्यास
मदत कर.
१) आपले परमगुरु लियो सर्व बिशप्स धर्मगुरू आणि व्रतस्थ बंधू भगिनी
ह्याच्याद्वारे प्रभू येशूची सुवार्ता जगाच्या कानाकोपऱ्यात पसरवताना त्यांना
देवाचा अनुभव यावा व जे लोक देवाचा शोध
करत आहेत त्यांना योग्य मार्गदर्शन देण्यास प्रभू येशूची कृपा त्यांना लाभावी
म्हणून प्रार्थना करूया.
२) आपल्या सर्व राजकीय पुढार्यांनी व नेत्यांनी जनकल्याणासाठी झटावे व
जनतेला सेवा कार्याद्वारे मदत करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
३) जे लोक देवाला मानत नाहीत व जे लोक देवापासून दूर गेले आहेत अशा लोकांना
पवित्र आत्म्याचा स्पर्श व्हावा, व त्याच्या जीवनाचे परिवर्तन होऊन त्यांना देवाच्या अस्तित्वाची जाणीव
व्हावी म्हणून प्रभुजवळ प्रार्थना करूया.
४) या मिस्साबळीदानात सहभाग घेत असलेल्या आम्हा सर्व बंधू-भगिनीवर देवाचा
आशीर्वाद असावा, की त्याद्वारे देवाने आम्हाला स्वर्गाचे
राज्य पाहण्याचे भाग्य द्यावे म्हणून प्रार्थना करूया.
५) थोडा वेळ शांत राहून आपल्या सर्व वैयक्तिक व सामुदायिक हेतूसाठी प्रभू
चरणी प्रार्थना करूया.
No comments:
Post a Comment