Thursday, 13 February 2025

 Reflection for the 6th Sunday in Ordinary Time (16/02/2025) By Br. Reon Andrades

सामान्य काळातील सहावा रविवार

दिनांक: १६/०२/२०२५

पहिले वाचन - यिर्मया १७५ - ८

दूसरे वाचन - १ करिथ १५१२, १६ - २०

शुभवर्तमान - लूक ६१७, २० – २६


प्रस्तावना

    आपण सामान्य काळातील सहाव्या रविवारात पदार्पण करत आहोत. आजची उपासना आपणास देवावर विश्वास/ भरवसा ठेवण्यास आमंत्रण करत आहे. आजच्या पहिल्या वाचनात आपणास कळून येते की, जो देवावर व त्याच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवतो तो मनुष्य जलाशयाजवळ लावलेल्या वृक्षासारखा हिरवागार व फलद्रूप होईल. तर दुसऱ्या वाचनात संत पौल आपणास संदेश देतो की, येशूचे पुनरुत्थान झाले आहे, हेच सार्वकालिक सत्य आहे आणि त्यावरती आपला विश्वास उभारलेला आहे.

     आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त धन्यवाद व दुःख उद्गार आपल्या समोर मांडत आहे. जे दिन, भुकेलेले, रडणारे व येशू खातीर छळलेले ते धन्य कारण देवाचे राज्य त्यांचे आहे. परंतु जे धनवान आहेत, जे तृप्त आहेत , जे आज हसत व ज्यांची आज वाहवा होत आहे यांच्याविरुद्ध प्रभू येशू ख्रिस्त दुःख उद्गार काढत आहे. आपण देखील प्रभूच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवावा व आपण देखील आपल्या शेजाऱ्यांना सहानुभूती व गरजवंतांना मदत करण्याची प्रवृत्ती आपणामध्ये रुजावी म्हणून ह्या मिस्साबलीदानात प्रार्थना करूया. 

मनन चिंतन

      मनुष्याला आपली स्तुती करायला आवडते. दुसऱ्यावरती वर्चस्व गाजवायला त्याला आनंद वाटतो. तो कमजोर आहे हे मानण्यास किंवा इतरांना आपली कमजोरी दाखवण्यास त्याला हेवा वाटतो. ह्या कारणास्तव तो आपल्या ताकदीचे प्रदर्शन करत असतो व त्याच्यामध्ये आनंद व गर्व करत असतो. आजच्या पहिल्या वाचनामध्ये आपणासमोर यिर्मया या संदेष्टाने दोन प्रकारची माणसे ठेवली आहेत.

    पहिल्या प्रकारची माणसे म्हणजेच जे मनुष्यबळावर भिस्त धरतात. ती अशी माणसे मनुष्याच्या बळावर विश्वास ठेवतात व स्वतःच्या बळाने विजय मिळवण्याचा प्रयत्न करतात. अशा माणसांची अंतःकरणे परमेश्वरापासून दूर असतात. ह्यास्तव त्यांची परिस्थिती वैराण्यातल्या झुडूपासारखी होईल.

      आपल्या समाजात अशा प्रकारची अनेक माणसे आहेत. अनेक देश स्वतःला श्रेष्ठ मानतात व कमजोर देशाला दाबण्याचा प्रयत्न करतात. आज आंतरराष्ट्रीय राजनीतीत आपणास  (Geo Politics)  पहावयास मिळतो. एक राष्ट्र आपल्या विरोधी राष्ट्राला चारी बाजूंनी आपल्या सैन्याने घेरा घालतात, जेणेकरून युद्धाच्या वेळी चारीबाजूने त्या राष्ट्रावर वार करता येईल.

    दुसऱ्या प्रकारची माणसे म्हणजेच देवावर व त्याच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवणारी. मानवी बळ व योजना परमेश्वरी सामर्थ्यासमोर काहीही नाहीत. परमेश्वर अशा लोकांचे स्वतः रक्षण करतो व त्यांना गरजेचे ते पुरवतो. म्हणून आपण वाचतो की, ही माणसे जलाशयाजवळ लावलेल्या झाडाप्रमाणे बहरतील. ही माणसे सदैव फळे देतील. त्यांना परमेश्वर असताना चिंता करण्याची गरज भासणार नाही.

    अनेक वेळेस आपण आपल्या शक्तीवर विश्वास ठेवून आपली व आपल्या भविष्याची काळजी करत असतो. आपण आपल्या जीवनाचा ताबा परमेश्वराच्या हाती देत नाही.

    दुसऱ्या वाचनामध्ये संत पौल आपल्याला ख्रिस्तामध्ये असलेल्या आपला विश्वास किती अचूक व खरा हे त्याच्या पुनरुत्थानाद्वारे हे सिद्ध झाले आहे. ह्याची साक्ष आपणास मिळते. तो म्हणतो, जर का ख्रिस्त मरणातून उठला नसता, तर आपला विश्वास व्यर्थ असता. पण आता त्याचे खरोखर पुनरुत्थान झाल्याने आपला विश्वास ख्रिस्तामध्ये निशंकोच व १००% खरा आहे. येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाने आपल्या विश्वासाला शिक्कामोहर्त्तक केला आहे.

    आजच्या शुभवर्तमानात प्रभु येशू गरिबांना, भुकेल्यांना व दु:खी लोकांना उंचावित आहे, तर श्रीमंत व तृप्त लोकांचा तिरस्कार करत आहे/सावध करत आहे. लुक शुभवर्तमानकार परराष्ट्रीय लोकांसाठी प्रभुची सुवार्ता लिहित आहे. आजच्या वाचनात आपण पाहिलं, तर आपणास कळून चुकेल की, १० व्या ओवीत आपण वाचतो की, येशू त्यांच्याबरोबर खाली उतरला. ह्याचा अर्थ असा की, इस्रायेली लोक स्वतःला उंच मानायचे कारण ते देवाची निवडलेली प्रजा होती. परंतु शुभवर्तमानकार आपणास सांगतो आहे की, येशू खाली उतरला, म्हणजेच परराष्ट्रीय लोकांमध्ये उतरला. येशू इस्रायेली लोकांसाठी नव्हे, तर सर्वांसाठी आला आहे. त्याचे राज्य सर्वांसाठी खुले आहे.

    पुढे आपण वाचतो की, “येशू आपल्या शिष्यांकडे दृष्टी लावून म्हणतो,” म्हणजेच खालील उपदेश येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना देत आहे. आपणही आज त्याचे शिष्य आहोत. हा उपदेश/उद्गार आपणा सर्वांना लागू पडत आहे.

     प्रभु म्हणतो, "जे दीन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे." दीन म्हणजे जे आर्थिक व आध्यात्मिकदृष्ट्या गरीब आहेत, जे स्वतःला नम्र मानतात, ते दीन.

      आज प्रभु येशू ख्रिस्त भुकेलेले व दुःखी लोक धन्य घोषित करत आहे. त्यांना आशीर्वाद देत आहे, त्यांचे सांत्वन करत आहे व त्यांना जीवनाची आशा देत आहे. त्यांना स्वर्गराज्यात प्रवेश देत आहे.

       ज्यांचा छळ होत आहे, येशूच्या नावाने ज्यांची चेष्टा उडवली जात आहे, ते धन्य, कारण ख्रिस्ताला प्रत्यक्ष पाहण्याचे भाग्य त्यांचे आहे. आज आपल्या समाजात अशा लोकांची संख्या वाढत आहे. आज श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत आणि गरीब अधिक गरीब होत चालले आहेत. आपण ख्रिस्ती लोकांचे कर्तव्य आहे की, आपण ह्या सर्व गोष्टीविषयी संवेदनशील असणे गरजेचे आहे. आपण दीन असल्यास, भुकेलेले असल्यास व दुःखी असता आशावादी जीवन जगले पाहिजे. परंतु जर आपण श्रीमंत, आनंदी व तृप्त असल्यास, आपली श्रीमंती दुसऱ्यांसोबत वाटप करून, गरिबांना मदत करून एक संवेदनशील जीवन जगले पाहिजे.

       आपली श्रीमंती, अहंकार व स्वार्थ आपल्याला देव व त्याची प्रजा ह्यांच्यापासून दूर नेता कामा नये. जर का श्रीमंतीमुळे आपल्याला देवापासून दूर जावे लागत असेल, तर आपण आपली मर्यादा ओळखली पाहिजे.

विश्वासू लोकांची प्रार्थना

प्रतिसाद: हे परमेश्वरातुझ्या लोकांची प्रार्थना ऐक.

१) आपले पोप फ्रान्सिससर्व बिशप्सधर्मगुरू व व्रतस्थ ह्यांना देवाच्या वचनानुसार जीवन जगण्यास व प्रापंचिकांना मार्गदर्शन करण्यास परमेश्वराने विवेकबुध्दी द्यावीम्हणून आपण प्रार्थना करूया.

२) प्रत्येक ख्रिस्ती कुटुंबात शांती नांदावीघरातील वातावरण खेळीमेळीचे राहूनप्रार्थनेला अधिक महत्त्व द्यावेजेणेकरून ख्रिस्त हाच आपल्या कुटुंबाचा केंद्रबिंदू होईलह्यासाठी आपण प्रभू चरणी प्रार्थना करूया.

३) मादक पेये व मद्य यांच्या आहारी गेलेल्या तरुण पिढीने व कुटुंबाच्या प्रमुखाने केवळ क्षणिक सुखाचा विचार करू नयेतर आपल्या जीवनाला नवे वळण लावण्याचा विचार करावाम्हणून आपण प्रार्थना  करूया.

४) सुखी जीवनाचा महामंत्र परमेश्वराने आपणा सर्वांना आज दिला आहे. त्याने दिलेल्या वचनांवर आपले जीवन विसंबून ठेवावे आणि जीवनांत आनंद उपभोगावाम्हणून आपण प्रार्थना करूया.

५) आपल्या धर्मग्रामातील जे कोणी शारीरिक व मानसिक आजाराने त्रस्त झाले आहेतत्यांनी प्रार्थनेबरोबर औषधोपचार व मानसोपचारही करावेतम्हणून आपण प्रार्थना करूया.

६) आता आपल्या वैयक्तिक व सामुहिक गरजांसाठी शांतपणे प्रार्थना करूया.


Wednesday, 5 February 2025

 Reflection for the 5th Sunday in Ordinary Time (09/02/2025) By Br. Jostin Pereira

सामान्य काळातील पाचवा रविवार

दिनांक: ०९/०२/२०२५

पहिले वाचन:  यशया ६: १-२, ३-८.

दुसरे वाचन:  १ करिंथ १५: १-११.

शुभवर्तमान:  लुक ५: १-११.


प्रस्तावना

      आज आपण सामान्य काळातील पाचवा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना आपल्याला परमेश्वराचे सानिध्य, त्याचा अनुभव, त्याने केलेले पाचारण आणि मानवाचा प्रतिसाद याविषयी बोध करत आहे. यशया संदेष्टा, संत पौल व प्रेषित पेत्र प्रभूच्या सेवेसाठी स्वत:ला अपात्र समजतात. पण परमेश्वर त्यांना दयेने स्पर्श करतो. देवदूत यशयाच्या ओठांना विस्तवाने स्पर्श करतो. पौलाच्या डोळ्यावरील झापड काढतो,  तर येशू पेत्राला स्पर्श करतो. अशा प्रकारे देव त्याच्या सेवेसाठी त्यांना पात्र करतो. त्यांना पाचारण करून प्रत्येकाला मिशन कार्य देतो. देवाच्या द्राक्षमळ्यात कार्य करण्यासाठी देव प्रत्येकाला निवडत असतो त्याचे माणसाच्या निकषांपेक्षा वेगळे असतात. माणसे बाह्य अंग बघतात तर देव अंत:करण बघत असतो.

       प्रत्येक बाप्तिस्मा झालेल्या व्यक्तीला देव पाचारण करत असतो. येथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला देवाने पाचारण केले आहे. प्रत्येकाने आपल्या योग्यतेनुसार देवाला प्रतिसाद द्यायला हवा. स्वत:चे परिवर्तन करत देवाच्या हाकेला सकारात्मक प्रतिसाद देण्यासाठी प्रयत्न करायला हवा. आज आ[पण स्वतःला प्रश्न विचारूया कि, मी देवाला योग्य प्रतिसाद दिला आहे का? यावर आज मनन चिंतन करूया आणि परमेश्वराच्या हाकेला प्रतिसाद देण्यासाठी कृपा मागू या.

 

मनन चिंतन

      आजची तिन्ही वाचणे आपणास देवाचे पाचारण आणि परिपूर्ण जीवन जगण्यास बोलावीत आहे. आजच्या तिन्ही वाचनात आपल्याला पहायला मिळते की यशया, पौल व पेत्र यांना देवाने निवडले. जरी ते देवाच्या सेवेस अपात्र होते तरीसुद्धा देवाने त्यांना पात्र केले. देवासाठी काहीच अशक्य नाही तर सर्व काही शक्य आहे.

       आजच्या पहिल्या वाचनात यशया संदेष्टा परमेश्वराच्या दैवी दर्शनाचा अनुभव घेतो. तो परमेश्वराला सिंहासनावर बसलेला पाहतो, तेथे तेजस्वी आणि पवित्र सराफिम त्याच्याभोवती असतात. स्वतःच्या पापी जीवनाने तो व्याकुळ होतो आणि म्हणतो, मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे आणि मी अशुद्ध ओठांच्या लोकात राहतो, तरीसुद्धा (तुम्ही) परमेश्वराने तुमचे कार्य करण्यासाठी आणि तुमचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मला पाचारण केले आहे.

       आपल्याला सुद्धा देवाचे कार्य करण्यासाठी पाचारण केले आहे. आपण सुद्धा यशयाप्रमाणे पापामध्ये बुडालेलो आहोत आणि आपण सुद्धा देवापासून दूर जात असतो. तसेच ज्याप्रमाणे यशयाने देवाच्या शब्दाला प्राधान्य देऊन देवाची आज्ञा पाळली, त्याचप्रमाणे आपण सुद्धा देवाच्या हाकेला प्रतिसाद दिला पाहिजे आणि देवाच्या इच्छेप्रमाणे वागलो पाहिजे.

       दुसऱ्या वाचनात संत पौल १ करिंथ १५:१-११ मध्ये सांगतो की, त्याला देवाची दया मिळाल्यामुळेच तो प्रेषित होऊ शकला. त्याने स्वतःला कमी लेखले, कारण त्याने देवाच्या लोकांचा छळ केला होता, परंतु देवाच्या दयेने तो आपले कार्य सुरू करू शकला. त्याने जितके काम केले, त्यामध्ये त्याचे स्वतःचे प्रयत्न नाहीत, तर देवाची कृपा आणि मार्गदर्शन होते. तो सांगतो की, "मी जो आहे, ते देवाच्या दयेनेच आहे." त्याच्या जीवनातील यश, काम, आणि प्रेषिताचे कार्य देवाच्या कृपेनेच साधले गेले आहे.

       संत पौल आपल्याला देवावरील विश्वास आणि येशू ख्रिस्ताचे पुनरुत्थान याविषयी सांगत आहे. ख्रिस्त आपल्या पापांसाठी मरण पावला आणि तिसऱ्या दिवशी मरणातून पुन्हा उठला. प्रभूचे पुनरुत्थान आपल्यासाठी केवळ एक ऐतिहासिक घटना नाही तर आपल्या संपूर्ण ख्रिस्ती जीवनाचा आधार आहे. येशूने मृत्यूवर विजय मिळवला आणि आपल्याला आशेचे जीवन दिले आहे याचा अर्थ असा आहे की मृत्यू हा शेवट नसून त्याद्वारे ख्रिस्तामध्ये आपल्याला नवे आणि अनंतकाळाचे जीवन मिळाले आहे.  

       संत पौल याच्या उदाहरणावरून आपल्याला शिकता येते की, आपल्याला देवाने दिलेल्या दयेसोबतच आपले कार्य, सेवा आणि जीवन समर्पित करणे आवश्यक आहे. देवाच्या मार्गदर्शनाशिवाय काहीही शक्य नाही, आणि त्याच्याशी जोडल्यानेच व त्याच्या  अधिक जवळ राहण्याने आपले पाचारण ओळखू शकतो.

       आजच्या शुभवर्तमानात आपण प्रेषित पेत्र ह्याच्या पाचारणाविषयी ऐकतो. पेत्र हा अनुभवी कोळी होता. त्याला मासेमारीच्या जाळ्यांची, जागेची आणि वेळेची संपूर्ण माहिती होती. परंतु एका संध्याकाळी तो आणि त्याचे साथीदार संपूर्ण रात्र कष्ट करून सुद्धा त्यांना काहीच मासळी मिळाली नव्हती, त्यावेळी येशु त्यांच्या होडीत बसतो आणि त्यांना पुन्हा जाळे टाकण्यास सांगतो. पेत्राने येशूच्या शब्दावर विश्वास ठेऊन तो जाळी टाकतो. आणि पेत्राच्या येशुवरील विश्वासामुळे त्यांची जाळी माशांनी इतके भरते की ते तुटायला लागते. हा एक चमत्कार पेत्राच्या विश्वासामुळे साध्य होऊ शकला. शिमोन पेत्राने जेव्हा हे पाहिले तेव्हा तो येशूच्या पाया पडला आणि म्हणाला, “प्रभु, माझ्यापासून दूर जा कारण मी पापी मनुष्य आहे!” परंतु प्रभू येशूने शिमोनाला म्हणाला, “भिऊ नको. कारण येथून पुढे तू माणसे धरशील.” त्यांनी त्यांच्या होड्या किनाऱ्याला आणल्या, नंतर त्यानी सर्व काही सोडले आणि त्याच्यामागे गेले.

       हा चमत्कार फक्त मासेमारीचा नव्हे, तर श्रद्धा आणि आज्ञाधारकपणाचा आहे. पेत्राप्रमाणे आपल्यालाही येशूवर पूर्ण विश्वास ठेवण्यास आणि आपल्या योजना बाजूला ठेवून देवाच्या मार्गावर चालण्यास पाचारण केले आहे. जेव्हा आपण स्वतःला देवाच्या हाती देतो, तेव्हा तो आपले आयुष्य बदलतो आणि आपल्याला महान कार्यांसाठी वापरतो.

       ही सर्व वाचने आपल्याला विचार करायला लावतात की, देव आपल्याला कुठे बोलावत आहे? आपण त्याच्या हाकेला  होकार देतो का? आपण त्याच्या योजनेवर पूर्ण विश्वास ठेवतो का?

       चला, आपणही पेत्रासारखे बनुया, विश्वास ठेवूया, जाळे खोल पाण्यात टाकूया आणि देवाच्या अद्भुत कृपेचा अनुभव घेऊया. तो आपले जीवन बदलून, आपले दुःख दूर करणार व आपल्या अं:तकरणात  प्रेमाची ज्योत पेव्णार. अशाप्रकारे ख्रिस्ताचे खरे अनुयायी आपल्याला बनायचे असेल तर त्याचे पाचारण स्वीकारुया व याच ख्रिस्ताचा शुभसंदेश सगळीकडे पसरूया!

 

विश्वासू लोकांची प्रार्थना

प्रतिसाद: “हे प्रभोतुझी सुवार्ता प्रकट करण्यास आम्हाला कृपा दे.”

१. ख्रिस्तसभेची धुरा वाहणारे पोप फ्रान्सीसकार्डीनल्समहागुरूधर्मगुरू व सर्व व्रतस्थ या सर्वांनी त्यांच्या कार्याद्वारे व शुभसंदेशाद्वारे येशु ख्रिस्ताची ओळख इतरांना पटवून द्यावी व देवाची सुवार्ता इतरांपर्यंत पोहचवण्यास त्यांना शक्ती-सामर्थ्य मिळावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

२.    ‘पिक फार आहे परंतु कामकरी थोडे आहेत’ म्हणून अनेक तरुण तरुणींनी प्रभूच्या मळ्यात कार्य करण्यासाठी स्वखुशीने पुढे यावेतसेच ज्या तरुण तरुणींनी देवाच्या पाचारणाला होकार दिला आहे अशा सर्वांना ऐहिक मोहांपासून परमेश्वराने अलिप्त ठेवावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

३.    जे युवक युवती देवापासून दूर गेलेले आहेतत्यांना प्रभूचा स्पर्श व्हावा व त्यांचे मनपरिवर्तन होऊन त्यांनी नैतिक मार्गावर चालावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

४.    ह्या पवित्र मंदिरामध्ये जमलेल्या आपल्या सर्वांना प्रभूने चांगले आरोग्य द्यावे व ख्रिस्ताचे शिष्य खरे सेवक बनून देवाच्या इच्छेला प्राधान्य द्यावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

५.    थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.