Friday, 11 July 2025

              Reflection for the 15th Sunday in Ordinary Time by                                                          Dn. Roshan Nato


सामान्य काळातील पंधरावा रविवार

दिनांक :  १३/०७/२०२५

पहिले वाचन: अनुवाद ३०:१०-१४

दुसरे वाचन:  कलस्सेकरांस पत्र १:१५-२०

शुभवर्तमान:  लुक १०:२५-३७


प्रस्तावना

ख्रिस्तात माझ्या प्रिय भाविकांनो आज देऊळ माता सामान्य काळातील पंधरावा रविवार साजरा करीत आहे. आजची उपासना आपणाला परमेश्वरावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जिवाने, संपूर्ण शक्तीने, व संपूर्ण बुद्धीने प्रीती करण्यास आव्हान करीत आहे. जशी प्रीती आपण स्वतःवर करतो, तशी प्रीती शेजाऱ्यांवर केली पाहिजे. चांगल्या शमोरोणीप्रमाणे गरजा आकांताच्या वेळात दया दाखवून, मदत करने हाच खरा शेजारधर्म आहे.

अनुवाद पुस्तकातून घेतलेले आजच्या पहिल्या वाचनात परमेश्वर पित्याची आज्ञा, जी आपल्या मुखात व अंतःकरणात आहे ती पाळून त्याप्रमाणे वागण्यास व संपूर्ण मनाने व जिवाने परमेश्वराकडे वळण्यास सांगत आहे. संत पौलाने कलस्सैकरांस पाठवलेल्या पत्रातून घेतलेले दुसरे वाचन, आपणास प्रभू येशू ख्रिस्ताचे स्वरूप व त्याच्या कार्यबद्दल थोडक्यात सांगते कि, सर्व काही त्याच्याद्वारे व त्याच्यासाठी निर्माण झाले असून, तो सर्वांच्या पूर्वीचा आहे व त्याच्यामध्ये सर्व काही अस्तित्वात आहे. तो शरीराचे म्हणजे मंडळींचे मस्तक असून, वधस्तंभावरील त्याच्या रक्ताद्वारे शांती प्रस्थापित करून सर्व गोष्टींचा स्वतःबरोबर समेट केला आहे. त्याचप्रमाणे लुकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन आपणास, येशू ख्रिस्ताची परीक्षा पाहण्याकरिता, शाश्वत जीवन प्राप्ती कशी करून घ्यावी ह्या कोणी एका शास्त्र्याने विचारलेल्या प्रश्नाबद्दल व चांगल्या शोमरोनाच्या द्रूष्टांताबद्दल  सांगत असता आपल्या देवावर व स्वतःप्रमाणे आपल्या शेजाऱ्यांवर प्रेम करण्यास पाचारण करत आहे.

मनन-चिंतन

प्रिय भाविकांनो, देवावर प्रीती करणे म्हणजे, त्याने आपल्या मानवजातीला दिलेल्या आज्ञा पाळणे, त्याच्या प्रत्येक वचनावर विश्वास ठेवणे, त्याने दिलेल्या सर्व आशीर्वादाबद्दल त्याचे आभार मानणे. तसेच त्याच्या सौंदर्य, पवित्रता आणि महानता ह्याचे प्रार्थनेद्वारे अनुभव घेणे आहे. ह्यातच खरा आनंद दडला आहे. जेव्हा आपण देवात असा आंनद घेतो तेव्हा आपल बाकीचं सर्व वर्तन म्हणजेच आज्ञापालन, विश्वास, कृतज्ञता, हे सर्व अगदी खऱ्या रीतीने त्याच्या गौरवासाठी करत असतो. म्हणून स्तोत्रसंहिता (६३:१-२) मध्ये स्तोत्रकार आपणास त्याच्या देव प्रीतीबद्दल अगदी थोडक्यात सांगतो कि "हे देवा, तू माझा देव आहेस, मी आशेने तुझा शोध करिन; शुष्क, रुक्ष व निर्जीव प्रदेशात माझा जीव तुझ्यासाठी तान्हेला झाला आहे माझ्या देशालाही तुझी उत्कंठा लागली आहे. अशा प्रकारे तुझे बळ व वैभव पाहण्यास पवित्रस्थानी, मी तुझ्याकडे दृष्ठी लावली आहे."

त्याचप्रमाणे शेजऱ्यावर प्रेम करणे म्हणजे, इतरांविषयी संवेदना बाळगणे, त्यांना मदत करणे, त्यांच्या भल्यासाठी विचार करणे आणि त्यांच्याशी आदर, सहकार्य, व दयाळूपणाने वागणे होय.

प्रिय भाविकांनो पवित्र शास्रामध्ये आपल्या शेजाऱ्यावर प्रेम करणे, ही संकल्पना एक मध्यवर्ती व महत्वाचा विषय आहे. जुन्या करारातच नाही तर नवीन करारातसुद्धा अधोरेखित करण्यात आलेला आहे. याचा थेट आणि वारंवार उल्लेक (लेवीय १९:१८) मध्ये आढळतो, जेथे देव इस्राएली लोकांस आज्ञा देतो कि, “सूड उगवू नको, किंवा आपल्या भावबंधांपैकी कोणाचा दावा धरू नको तर तू आपल्या शेजाऱ्यावर स्वाथासारखी प्रीती कर, मी परमेश्वर आहे.” त्याचप्रमाणे नव्याकरारातील, योहानलिखीत पहिल्या पत्रामध्ये (४:२०-२१) आपणास कळते कि, कशाप्रकारे आपले देवावर असलेले प्रेम,आपल्याला  शेजाऱ्यांवर प्रेम करण्यास प्रवृत्त करून आपणास इतरांशी जोडण्यास प्रोत्साहन करताना सांगते कि “मी देवावर प्रीती करतो, असे म्हणून जर कोणी आपल्या बंधूंचा द्वेष करील तर तो लब्बाड आहे. कारण डोळ्यांपुढे असलेल्या आपल्या बंधूवर जो प्रीती करीत नाही त्याला न पाहिलेल्या देवावर प्रीती करीत येणे शक्य नाही तर जो देवावर प्रीती करतो, त्याने आपल्या बंधूवरही प्रीती करावी, हि त्याची आपल्याला आज्ञा आहे.”

प्रिय भाविकांनो, चांगल्या शमोरोनीचा दृष्टांत जो आपण कितीतरी वेळेला आपल्या बायबल वाचनात वाचलेला आहे व ऎकलेला सुद्धा आहे. हा दृष्टांत आपणा सर्वांना खरे ख्रिस्ती प्रेम म्हणजे काय व शेजाऱ्यावर प्रेम कसे करावे, किंवा शेजाऱ्यावर प्रेम करणे म्हणजे नेमके काय हे समजून घेऊन ते आपल्या कृतीत उतरविण्यास प्रोत्साहन देत आहे आणि ह्याच शेजार प्रेमाचं उदहारण आपण एका छोट्याश्या गोष्टीद्वारे समजून घेऊया.

कलकत्याच्या संत मदर तेरेसा एकदा एका गावात गेल्या होत्या. तेथे एका झोपडीत शिरली असता, कुटुंबियांनी पाहून तिला त्यांचा कळवळा आला. ते कुटुंब चार दिवसापासून भुकेलेले होते. मायेच्या ममतेने मदरांनी आपल्या सोबत आणलेले धान्य त्या कुटुंबाला देऊ केल. त्या कुटुंबातील आईने धान्याचे लगेच दोन भाग केले व एक भाग घेऊन ती शेजारच्या घरी गेली. त्या बाईने असे का केले विचारले असता, ती बाई म्हणाली, “जसे आम्ही भुकेलेले आहोत, तसेच ते कुटुंबशुद्धा भुकेलेल व उपाशी आहे. त्यांनासुद्धा धान्याची गरज होती आणि म्हणून मी अर्धा भाग त्यांना दिला.” आपल्या गरजेत दुसऱ्यांच्या गराजांची आठवण ठेवणे व त्यांना मदत करणे हे पाहून मदर तेरेसासुद्धा भारावून गेल्या. ह्यालाच म्हणतात खरी शेजार प्रीती.

 प्रिय भाविकांनो, आज आपल्या धर्मग्रामाला व गावपरिवाराला चांगल्या शोमरोनीची गरज आहे. अनेक लोक वेगवेगळ्या कारणाने त्रस्त आहेत आणि मदतीची आस धरून आहेत. आपण चांगले शोमरोनी आहोत का? किंवा बनू शकतो का? आपला शेजारी कोण हे शोधण्यापेक्षा गरजवंतांना मदत करून आपण त्यांचे शेजारी बनतो का? ह्या प्रश्नांवर मनन-चिंतन करून, आपल्या देव प्रीतीचे रूपांतर आपल्या शेजार प्रीतीमध्ये करून, आपल्या शेजाऱ्यांवर प्रेम करून, मदत करून व शेजारधर्म जोपासण्यास  परमेश्वराची कृपा व शक्ती मिळावी म्हणून प्रार्थना करूया.

विश्वासू लोकांची प्रार्थना

प्रतिसाद :- हे प्रभू आम्हांला प्रेम करण्यास प्रेरणा दे’.

१. ख्रिस्ताची सुवार्ता पसरविणारे आपले पोपबिशप्स धर्मगुरू व धर्मभगिनी ह्या सर्वांना देवाचे कार्य करण्यासाठी शक्ती व प्रेरणा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

२. आपल्या समाजातील व शेजोळातील सर्व लोकांनी एकमेकांवर प्रेम करावे व चांगले आनंदी जीवन जगावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

३. ह्या वर्षी संपूर्ण भारत देशात योग्य प्रमाणात पर्जन्यवृष्टी व्हावी व सर्वत्र हिरवळ पसरून देशाचा विकास व्हावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

४. संपूर्ण जगभरात ज्या लोकांवर अन्याय व अत्याचार होत आहे त्यांना प्रभूची शांती व सामर्थ्य लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

५. थोडावेळ शांत राहून आपल्या वैयक्तिककौटुंबिकसामाजिक गरजा साठी म्हणून आपण प्रार्थना करूया.



Friday, 4 July 2025

            Reflection for the 14th Sunday in Ordinary Time by                                                       Br. Criston B. Marvi

सामान्य काळातील चौदावा रविवार

दिनांक – ०६ /०७/२०२५

पहिले वाचन  यशया ६६:१०-१४

दुसरे वाचन - गलतीकंरास पत्र ६:१४-१८

शुभवर्तमान  लुक १०:१-१२, १७-२०


प्रस्तावना

आज आपण सामान्य काळातील चौदावा रविवार साजरा करत आहोत. त्याचबरोबर आज आपण श्रद्धा बांधणी रविवार सुद्धा साजरा करतो. आजची उपासना हि आपल्याला शांतीत आनंद मिळवण्यास पाचारण करत आहे.

आजच्या पहिल्या वाचनात यशया संदेष्टा परमेश्वराने नदीप्रमाणे शांती आणि पाण्याच्या पुराप्रमाणे वैभव देण्याची वचन दिले आहे. दुसऱ्या वाचनात संत पौल सांगतो की, येशूच्या खुणा धारण करण्यातच खरा आनंद आहे. तसेच शुभवर्तमानात येशू आपल्या शिष्यांना शांती पसरविण्यात गावात व नगरात पाठवतो.

म्हणून या ख्रिस्तयागात सहभागी होत असताना आपल्या ह्या आधुनिक जगात शांती प्रस्तापित व्हावी म्हणून प्रार्थना करूया

मनन-चिंतन

नवनिर्मितीमध्ये आनंद व उल्हास करा

प्रिय बंधू भगिनींनो परमेश्वराचे पीक भरपूर व उत्तम आहे. हे पीक शांतीचे व वैभवाचे आहे. आजच्या पहिल्या वाचनात आपण कले यशया संदेष्टा सांगतो की, परमेश्वराला आपल्यासाठी शांती, वैभव आणि आनंद स्थापित करण्याची इच्छा आहे. दुसऱ्या वाचनात संत पौल सांगतो, आपला खरा आनंद नवी उत्पत्ती हाच होय. कारण आपण आपल्या शरीरावर येशूच्या खुणा धारण करतो. शुभवर्तमानात शांतीचा संदेश घेऊन नगरात व गावात शिष्यांना पाठविण्यात आले.

प्रिय बंधू भगिनींनो नवनिर्मिती आपणा सर्वांना सर्व प्रकारचे चिंता, भीती, अंधश्रद्धा इत्यादी पासून दूर व मोकळे ठेवते.

बहात्तर जनास पाठवले तेव्हा येशून त्यांना जगातील कोणतीही गोष्ट सोबत घेण्यास मनाई केली. कारण परमेश्वराच्या पिकामध्ये काम करण्यास आध्यात्मिक वस्तूंची गरज आहे. जे जखमी आहे त्यांना बरे करण्यास व संकटमय जगात शांतता प्रस्थापित करण्यास शिष्यांना पाठवण्यात आले होते. ते मिशन कार्याला जाताना देवावर असलेला विश्वास सोबत घेऊन गेले.

आज सुद्धा, शिष्य आणि आपणा प्रत्येकाला येशूने, देवाच्या एकाच मिशन कार्यासाठी पाठवले आहेत. परंतु मिशन कार्यासाठी जाताना आणि मिशन कार्यावरून परत येताना आपल्या दोघांचाही अनुभव वेगवेगळा असतो. खरे आणि विश्वासू शिष्य देवाच्या सानिध्यात राहून त्याच्यावर विश्वास ठेऊन त्याच्यावर अवलंबून राहिले. त्यांना कोणत्याही गोष्टीची भीती नव्हती, कारण त्यांचा येशूच्या शिकवणीवर दृढ विश्वास होता. आणि ते फक्त देवाचे  राज्य प्रसविण्याचे काम करत होते. म्हणून, ते सर्व आनंदाने परत आले कारण देवाचा मार्ग आपल्याला अधिक गौरवशाली बनवून आपली शक्ती घोषित करतो आणि ज्यामुळे सुवार्तेची शक्ती अधिक तेजस्वीपणे चमकते.

आजच्या उपासनेत आपण पाहतो की देव आपल्याला अनेकदा गोंधळलेले, कमकुवत पण प्रामाणिक यात्रेकरू म्हणून पाहतो. तो आपल्या शोधासाठी आपल्यावर प्रेम करतो. आणि तो आपल्याला शांती, सुख आणि आनंद देऊ इच्छितो. म्हणून शांतीच्या राज्यावर आणि आनंदावर विश्वास ठेवा. आणि सर्व अंधश्रद्धा सोडून द्या.

येशूने आपल्या शिष्यांना भुते काढण्याचा अधिकार दिला. त्याच प्रकारचा अधिकार आपल्या प्रत्येकाला दिलेला आहे. तथापि, हा अधिकार प्रथम आपण अंगीकारला पाहिजे. कारण बहुतांशी वेळा पक्षपात, द्वेष, क्रोध, मत्सर, हिंसा इत्यादी भुतांनी आपण पछाडलेले असतो. म्हणून प्रथम आपण आपल्या आत असलेल्या भुतांना बाहेर काढले पाहिजे आणि मग आपण शांती निर्माण करणारे साधन बनू शकतो. सैतान फक्त आपल्याला एकच ठिकाणी फसवू शकतो ते म्हणजे स्वातंत्र्याने आपण पापाला आलिंगन मारतो. जेव्हा आपण वाईट कृतींचा त्याग करतो, तेव्हा आपले हृदय नवीन निर्मितीमध्ये आनंदित होईल.

आपण येशूचे शिष्य म्हणून जेव्हा आपल्याला मिशन कार्यासाठी पाठवले जाते, तेव्हा सर्व प्रथम आपण त्या विशिष्ट ठिकाणाबद्दल विचारपूस करतो, ते कुटुंब असू शकते, गाव असू शकते, पॅरिश इत्यादी असू शकते. कारण आपण स्थलांतरित मिशनसाठी नाही तर स्थिरावलेल्या मिशनसाठी जातो. स्थिरावलेले मिशन आपल्यामध्ये भीती, चिंता, स्वाभिमान इत्यादी प्रस्तापित करते.  तर स्थलांतरित मिशन यापैकी काहीही आणत नाही तर ते समाधान, शांती आणि आनंद प्रस्तापित करते. स्थलांतरित मिशन ही एक नवीन निर्मिती आहे ज्यामध्ये आपण आनंद बाळगतो. नदीचे पाणी लोकांना जीवन देते. ते नेहमीच ताजे आणि नवीन असते. आणि  साचलेले पाणी किंवा सांड पाणी आरोग्य आणि पर्यावरणासाठी अनेक धोके निर्माण करते.

मिशन कार्यासाठी पाठवताना येशू त्यांना काहीही देत नाही, पर्स नाही, बॅग नाही, चप्पल नाही तर फक्त प्रेमाचा संदेश देतो. मानवतेच्या सर्व जखमा बरे करणारे प्रेम त्यांच्यासोबत देतो. कारण देव अजूनही आपल्यावर प्रेम करतो जरी आपण कधीकधी देवापासून दूर जातो तरीही देव आपली काळजी वाहतो. म्हणूनच आपण पाहतो की, जगाला ज्याची गरज आहे तेच येशू देतो. तो त्यांना शांतीचे शब्द त्यांच्यासोबत घेऊन जाण्यास सांगतो, “ह्या घरास शांती असो.”

“जेथे प्रेम, दया, शांती तेथे देवाची वसती.” जिथे शांती वसते, तिथे सर्वकाही बरे असते ज्याच्यामध्ये आपण नवीन निर्मितीचा आनंद घेतो.

म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, बायबलमध्ये, शांती हि अभिवादन नसून ती एक आज्ञा आहे: “ह्या घरास शांती असो.” शांती खरी आहे. ती अस्तित्वात आहे. म्हणून आपण शांतीवर विश्वास ठेवून, शांतीत जगूया.

विश्वासू लोकांची प्रार्थना

प्रतिसाद :- हे प्रभो आम्हाला सेवामय जीवन जगण्यास सहाय्य कर.

 १. आपले पोप, कार्डीनल्स, बिशप्स, फादर्स, सिस्टर्स ह्यांना अखिल ख्रिस्त सभेची धुरा सांभाळण्यास व प्रभूच्या प्रेमाचा व सेवेचा संदेश जगभर पसरविण्यास सामर्थ मिळावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

२. सर्व आजारी गरीब,अनाथ व अपंग ह्यांना मानसिक स्वास्थ व आरोग्य प्राप्त व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

३. ख्रिस्त आपल्या प्रत्येक कुटुंबाचा केंद्रबिंदू बनावा, कौटूंबिक प्रार्थनेद्वारे आपले नाते ख्रिस्ताशी अधिक जवळचे व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

४. ह्या वर्षी अधिका अधिक पाऊस पडावा, व आपल्या शेतांची, पिकांची, चांगली वाढ व्हावी. तसेच वातावरण शुद्ध राहावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

५. आपण आता, आपल्या सामाजिक, कौटूंबिक व व्ययक्तिक हेतूसाठी प्रार्थना करूया.