Thursday, 11 September 2025

 Reflection for the 24th Sunday in Ordinary Time/Feast of the Exaltation of the Holy Cross (14/09/2025) By Fr. Gilbert Fernandes

सामान्य काळातील चोविसावा रविवार / पवित्र क्रूसाचा विजयोत्सव

दिनांक: १४/०९/२०२५.

पहिले वाचन: गणना २१:४-९

दुसरे वाचन: फिलिप्पै २:६-११;

शुभवर्तमान: योहान ३:१३-१७


प्रस्तावना

प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आज आपण सर्वजण आनंदाने पवित्र क्रुसाच्या विजयोत्सवाचा सण साजरा करीत आहोत. जो क्रूस एकेकाळी लज्जा, दु:ख आणि मृत्यूचे चिन्ह होता, तोच येशू ख्रिस्ताच्या मृत्यू व पुनरुत्थानामुळे तारण, विजय आणि अनंत जीवनाचे चिन्ह बनला आहे.

क्रुसाद्वारे देवाने आपल्यावर केलेल्या अपार प्रेमाचे प्रकटीकरण झाले आणि हा क्रुसच आपल्या जीवनातील आशा व सामर्थ्याचा स्रोत आहे. आपले दु:ख आणि संघर्ष जेव्हा ख्रिस्ताशी एकरूप होतात, तेव्हा ते आपल्याला गौरवाकडे नेतात.

म्हणूनच आपण कृतज्ञतेने आणि विश्वासाने प्रभूसमोर हृदय उंचावू या, जेणेकरून तो आपल्याला आपापले दैनंदिन क्रूस प्रेमाने वाहून नेण्याची कृपा देवो आणि त्या ख्रिस्ताजवळ आपल्याला नेवो ज्याने पाप आणि मृत्यूवर क्रूसाद्वारे विजय मिळवला.

बोधकथा

       एकदा एका गावात लोकांना खूपच त्रास होत होता. प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही संकट होते. एक व्यक्ती नेहमी देवाला तक्रार करायची की "देवा, माझा क्रूस खूप जड आहे, मी तो वाहू शकत नाही."

एका रात्री त्याला स्वप्न पडले. त्याने पाहिले की तो एका खोलीत गेला आहे, जिथे अनेक प्रकारचे क्रूस होते मोठे, छोटे, जड, हलके, सरळ, वाकडे. देवाने त्याला सांगितले: "तू तुझा क्रूस इथे ठेव आणि तुला हवा तो निवड." तो प्रत्येक क्रूस उचलून पाहू लागला. एक खूप जड होता, दुसरा खूप मोठा, तिसरा खूप वाकडा. शेवटी त्याला एक क्रूस योग्य वाटला आणि त्याने तो उचलला. देव हसून म्हणाला: "मुला, हा तोच क्रूस आहे जो तू आधी घेऊन आला होतास."

त्याला उमगले की देव प्रत्येकाला त्याच्या क्षमतेप्रमाणे क्रूस देतो न जास्त, न कमी.

मनन चिंतन

क्रूस ही तेरा निशान,

आगे बढ़ ऐ जवान,

पीछे न हटना कभी,

यीशु है तेरी चट्टान

तेरे ख़ातिर आया जगत में,

तुझको बचाने को

तेरे लिए ही, यीशु ने खोला

मुक्ति के द्वार को,

क्रूस हे ख्रिस्ती जीवनाचे एक प्रतिक आहे. हे प्रतिक जगाला ख्रिस्ताच्या अतिमौल्यवान प्रेमी त्यागाची आठवण करून देते. ह्या प्रेमाखातर प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या स्वताःच्या जीवाचा त्याग केला, आणि मृत्यूद्वारे मानवजातीवर आपले प्रेम व्यक्त केले. संत पौल १ करिंथ. १:२३ मध्ये म्हणतात की, “आम्ही तर वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवितो.शिवाय प्रेषित पुढे १ करिंथ १:१८ मध्ये म्हणतो की, “कारण ज्यांचा नाश होत आहे त्यांना वधस्तंभाविषयीचा संदेश मूर्खपणाचा आहे; पण ज्यांना तारण प्राप्त होत आहे अशा आपणांस तो देवाचे सामर्थ्य असा आहे.संत पौलाने हा संदेश यहुदी लोकांना संबोधित केला होता; जे क्रूसाला गुन्हेगारांचे ओझे आणि पापियांसाठी शिक्षा म्हणून पाहत होते (अनुवाद २१:२०-२३). त्यामुळे, क्रूसावर खिळलेल्या एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवणे हे त्यांना योग्य वाटत नसे. तर दुसरीकडे ग्रीक लोकं जी त्या कालीन प्रसिद्ध विचारवंत आणि नामांकित तत्वज्ञांनी होते; त्यांना हा क्रूस म्हणजे मूर्खपणाचे लक्षण म्हणून वाटत होते. त्यांच्या सर्व ज्ञानात त्यांना हेच समजून आले नाही की, देव आपली महानता प्रकट करण्यासाठी एका मूर्ख गोष्टीचाउपयोग कसा काय करू शकतो?

पूर्वेदेशातील ख्रिस्तसभेचे (Eastern Church) मठवासी स्टुडाइटचे संत थिओडोर ह्यांनी जुन्या करारात आपल्याला वधस्तंभ (क्रुस) कुठे आढळतो ह्याविषयी सांगताना ते सांगतात की, पहिल्या प्रथम आपल्याला अब्राहाम आणि इसाकाच्या दृष्टांतात वधस्तंभ (क्रुस) आढळतो; तो म्हणजे अब्राहामाने रचलेल्या लाकडाच्या ढिगाऱ्यावर क्रुसाची पहिली प्रतिमा आपल्याला आढळते (उत्त्पती २२). दुसरे म्हणजे नोहाचे तारू ज्यात त्याचे कुटुंब व सर्व प्राण्यांची प्रजाती प्रलयापासून वाचली गेली (उत्त्पती ६-७). तसेच संत थिओडोर मोशेच्या लाकडी काठीत सुध्दा वधस्तंभाची प्रतिमा पाहतात. ज्या काठीद्वारे नाईल नदीचे पाणी रक्तात बदलले (निर्गम ७:१४-२५), मिसरच्या खोट्या जादूगारांच्या सापांना ज्या काठीने खाऊन टाकले (निर्गम ७:८-१३), इस्त्रायली लोकांच्या तारणासाठी तांबड्या समुद्राचे विभाजन केले (निर्गम १४:२१-३१). शिवाय ते म्हणतात की, आपणाला अहरोनच्या काठीत क्रुसाचे संकेत दिसतात जिथे एकाच दिवशी फुललेल्या काठीत त्याला खरे याजकपण दिसले होते (गणना १७:८).

हा क्रूस आज आपल्याला ख्रिस्ती ह्या नात्याने एक संदेश देत आहे. आपण जे ह्या जगात अनेक अशा जागतिक संकटांना, परीक्षांना सामोरे जातो (तुटलेले नाते, आजारपण, नुकसान, अन्याय, एकाकीपणा, व्यसन इ.), त्यात आपल्याला एक विश्वासी अर्थ म्हणून प्रेमाचे, विजयाचे प्रतिक किंवा दीपस्तंभ म्हणून आपल्या समोर उभे राहते. बेन सिरा यांची बोधवचने २:१ मध्ये आपल्याला सांगण्यात आले आहे की, “माझ्या मुला, परमेश्वराची सेवा करण्यास तू प्रेरित झाला असशील, तर सत्वपरीक्षेस सिद्ध रहा.संकटे आणि परीक्षा ह्या गोष्टी तारणप्राप्ती आणि विजय ह्यांचा एक अपरिहार्य मार्ग आहे. येशू ख्रिस्ताने ही वस्तुस्थिती आपल्या शिष्यांना स्पष्टपणे सांगितली होती जेव्हा त्याने त्याच्या शिष्यांना सांगितले की, “माझ्यामागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर त्याने स्वतःचा त्याग करावा व आपला क्रूस उचलून घेऊन मला अनुसरावे” (मत्तय १६:२४).

क्रूस आपल्याला त्या टांगलेल्या व्यक्तीमध्ये म्हणजेच ख्रिस्तामध्ये त्याच्या त्यागमय प्रेमाची आठवण करून देते. हे त्याच्या प्रेमाचे एक स्पष्ट उदाहरण आहे, आणि एक ऐतिहासिक पुरावा सुद्धा आहे, की त्याने आपल्या पापांसाठी आपले प्राण बहाल केले आणि ह्याद्वारे आपल्याला एक नवीन शिकवण देऊन आव्हान सुद्धा केले आहे की, तुम्ही सुद्धा आपल्या बंधू आणि भगिनींसाठी असेच करा. आपल्या मित्रांकरिता (बंधू आणि भगिनींकरिता) आपला प्राण द्यावा ह्यापेक्षा कोणाची प्रीती मोठी नाही” (योहान १५:१३), “ख्रिस्ताने आपल्याकरिता स्वतःचा प्राण अर्पिला ह्यावरून आपल्याला प्रीतीची जाणीव झाली आहे; तेव्हा आपणही आपल्या बंधू-भगिनींकरिता स्वतःचा प्राण अर्पिला पाहिजे” (१ योहान ३:१६). आजच्या शुभवर्तमानामध्ये ऐकतो की, “देवाने जगावर इतके प्रेम केले की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, जेणेकरून जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवील तो नाश पावणार नाही, तर त्याला अनंत जीवन मिळेल’ (योहान ३:१६). क्रूस हे प्रेमाचे सर्वात मोठे चिन्ह आहे.

ख्रिस्तसभेचे काहि पुरातन धर्मपंडित वधस्तंभाच्या चार बाजूंना ख्रिस्ताच्या प्रेमाचे प्रतिक देत खालीलप्रमाणे त्यांची समज देतांना ते म्हणतात की, “क्रुसाची उभी बाजू ही परमेश्वराच्या आणि ख्रिस्ताच्या प्रेमाची उंची आणि खोली किती आहे हे दर्शवितात. तसेच आडवी बाजू त्याच्या प्रेमाची रुंदी आणि मोठेपणा दर्शवितात.ह्यांचे हे स्पष्टीकरण संत पौलाच्या शब्दांनी सहज जुळले जाते; जेव्हा संत पौल इफिसकरांस प्रार्थनेत सांगतात की, “ख्रिस्ताने तुमच्या अंत:करणामध्ये तुमच्या विश्वासाच्याद्वारे वस्ती करावी; ह्यासाठी की, तुम्ही प्रीतीत मुळावलेले व पाया घातलेले असे असून तिची रुंदी, लांबी, उंची व खोली किती, हे तम्ही सर्व पवित्र जनांसह समजून घ्यावयास व बुद्धीस अगम्य अशी ख्रिस्ताची प्रीती ओळखून घ्यावयास शक्तिमान व्हावे; असे की तुम्ही देवाच्या सर्व पूर्णतेइतके परिपूर्ण व्हावे” (इफिस. ३:१७-१९).

क्रूसाचा संदेश हा एक विरोधाभास आहे. कारण, तो स्वतःला नाकबूल करतो, परंतु ह्याच्या विसंगतात एक अंतर्भूत सत्य आढळते; ते म्हणजे मृत्यूत नवीन जीवन उगवते. ह्याद्वारे आपल्याला समजून येते की, जे नकारात्मक आहे ते सकारात्मकात त्याचे परिवर्तन कसे होत असते. तसेच, दुःख आणि वेदना ह्यात आपल्याला अकल्पनीय आशिर्वाद मिळत असतो. येथे ह्या संदर्भात आपल्याला समजून येते की, क्रूस जो ग्रीक, यहुदी आणि मिसरी लोकांना एक मृत्यूचे झाड वाटत होते ते आता नवजीवन देणारे वृक्ष बनले आहे. उत्पत्तीच्या पुस्तकात आपण वाचतो की, एका निषिद्ध झाडाच्या फळाने आदामाने जगात पाप आणले, परंतु नवीन व्यवस्थामध्ये, एका नवीन झाडाने नवीन आदामाचे वैभव आणले आहे, अर्थात ख्रिस्ताचे वैभव आणले आहे. हे असे झाले कारण, त्याच्या क्रूसाद्वारे त्याने जगाची पूर्तता केली आहे. ह्या वाक्यप्रचाराद्वारे असे समजून येते की, वाईटाने चांगल्यावर तात्पुरता विजय मिळविला आहे परंतु, ख्रिताच्या चांगुलपणात त्याने वाईटावर सार्वकालिक विजय मिळविला आहे. प्रेषितांनी क्रूसावर त्यांच्या यशाचे रहस्य पाहिले आणि म्हणून संत पौल उदगारतो की, “आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या वधस्तंभाच्या अभिमानाशिवाय कशाचाही अभिमान बाळगणे माझ्या हातून न होवो; त्याच्याद्वारे जग मला वधस्तंभावर खिळलेले आहे व मी जगाला वधस्तंभावर खिळलेला आहे” (गलती. ६:१४).

१. क्रूस तारणाचे चिन्ह:

इस्राएली लोक वाळवंटात तक्रार करीत होते. देवाने साप पाठवले. पण जेव्हा त्यांनी पश्चात्ताप केला, देवाने मोशेला तांब्याचा साप उभारायला सांगितला. जो कोणी त्याच्याकडे पाहील, तो वाचेल. येशू म्हणतो: जसा मोशेने वाळवंटात साप उभारला, तसेच मानवपुत्र उभारला जाईल. (योहान 3:14). जसे तांब्याचा साप पाहून इस्राएली लोक वाचले, तसे ख्रिस्ताकडे पाहून आपण वाचतो.

२. क्रूस नम्रतेचा धडा:

येशू देव असूनही स्वतःला रिकामे केले, दासाचे रूप घेतले आणि क्रूसावर मृत्यूपर्यंत आज्ञाधारक राहिला. म्हणून देवाने त्याला सर्वोच्च स्थान दिले. येशू देव असूनही क्रूसावर नम्र झाला. आपणही गर्व सोडून नम्रतेने चालायला हवे.

३. क्रूस प्रेमाचे चिन्ह:

क्रूसावरून येशू म्हणतो: मी तुझ्यासाठी माझे प्राण दिले.हे देवाच्या अपार प्रेमाचे साक्ष आहे.

४. क्रूस आशेचा आधार:

जीवनातील अंधार, आजार, दु:ख हे शेवट नाहीत. क्रूस पुनरुत्थानाकडे नेतो. क्रूस हे आपल्यासाठी एक आशेचे प्रतिक बनले आहे आणि हेच आशेचे प्रतिक आपल्याला आजच्या दिवशी हाच संदेश देत आहे की: क्रूसाशिवाय मुकुट नाही; मुकुटाशिवाय क्रूस नाही; मृत्यूशिवाय जीवन नाही आणि दुःखाशिवाय आनंद नाही. जीवनात वेदना नाहीत तर नवजीवनाला अर्थ नाही. तसेच क्रूस आपल्याला आठवण करून देतो की दुःख म्हणजे शेवट नाही, तर तारणाची सुरुवात आहे. क्रूसाविना पुनरुत्थान नाही. म्हणून आज आपण क्रूसाचा गौरव करीत असताना, आपल्या जीवनातील क्रूस प्रेमाने स्वीकारूया आणि ख्रिस्ताबरोबर चालत आशेच्या आणि विजयाच्या मार्गावर जाऊया.

विश्वासू लोकांची प्रार्थना

धर्मगुरू: बंधूंनो व भगिनींनो, आज आपण क्रूसाच्या गौरवाचा सण साजरा करीत आहोत. क्रूस हे आपल्या तारणाचे चिन्ह आहे. त्याद्वारे देवाचे प्रेम आणि येशूचे बलिदान आपल्यासमोर उघड झाले आहे. चला तर मग, या पवित्र क्रूसाद्वारे आपल्या सर्व गरजा परमेश्वरापुढे ठेवूया.

आपला प्रतिसाद :-  हे प्रभु, क्रुसाच्या सामर्थ्याने आम्हांला ऐक.

१. पवित्र ख्रिस्तसभेसाठी:

हे परमेश्वरा, तुझ्या क्रूसाचे रहस्य जगभरात जाहीर करणारी पवित्र ख्रिस्तसभा सर्व लोकांना तारणाच्या मार्गावर नेवो. आमच्या परमगुरुस्वामीना, सर्व महागुरूस्वामीना, धर्मगुरुधर्मभगिनी व व्रतस्तांना क्रूसाच्या आत्म्यातून धैर्य व प्रामाणिकता दे. म्हणून आपण प्रार्थना करू या.

२. जगातील शांतता व ऐक्यासाठी:

हे प्रभु येशू, क्रूसावर तुझ्या रक्ताने तू सर्वांना एक केलेस. युद्ध, हिंसा व तिरस्कार दूर होवो, व भिन्न धर्म, भाषा व संस्कृतीचे लोक तुझ्या क्रूसाखाली एक कुटुंब म्हणून नांदो. म्हणून आपण प्रार्थना करू या.

३. दुःखी, गरीब व आजारी व्यक्तींसाठी:

हे प्रभु, तुझ्या क्रूसाचा अनुभव घेतलेल्या सर्व दुःखी, एकाकी, शोषित व आजारी लोकांना तुझ्या बलिदानात आशा व शक्ती मिळो. त्यांच्या क्रुसात तुझे प्रेम त्यांना आधार देओ. म्हणून आपण प्रार्थना करू या.

४. आपल्या देश व समाजासाठी:

हे परमेश्वरा, आमच्या देशातील नेत्यांना न्याय, प्रामाणिकपणा व सेवाभाव दे. समाजात शांती, ऐक्य व बंधुभाव नांदो, व प्रत्येकजण एकमेकांची सेवा करीत राहो. म्हणून आपण प्रार्थना करू या.

५. आमच्या धर्मग्रामातील सर्व भक्तांसाठी:

हे प्रभु, आमच्या धर्मग्रामात क्रूसावरील प्रेमाची साक्ष देणारे भक्त निर्माण कर. आम्हा सर्वांना आपापल्या दैनंदिन क्रुसाला विश्वासाने उचलण्याची कृपा दे. म्हणून आपण प्रार्थना करू या.

६. थोडावेळ शांत राहून आपण आपल्या सामाजिक, कौटुंबिक व वैयक्तिक गरजांसाठी प्रार्थना करू या.

धर्मगुरू: हे सर्वशक्तिमान परमेश्वरा, तुझ्या क्रुसात आम्हाला जीवन व तारणाचा मार्ग मिळाला आहे. या सर्व प्रार्थना तुझ्या पुत्र येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुला अर्पण करतो. आमेन.


Thursday, 4 September 2025

Reflection for the 23rd Sunday in Ordinary Time (07/09/2025) By Fr. Glen Fernandes

सामान्य काळातील तेविसावा रविवार

दिनांक: ०७/०९/२०२५

पहिले वाचन: शलमोनाचा ज्ञानग्रंथ ९: १३-१८.

दुसरे वाचन: फिलेमोन ९-१०१२-१७.

शुभवर्तमान: लुक १४: २५-३३.


प्रस्तावना

       आज आपण सामान्य काळातील तेवीसावा रविवार साजरा करीत आहोत. आजची पवित्र उपासना आपल्याला प्रभू येशूची वचनबद्धता व त्याचा आत्मत्याग लक्षात आणून आपल्यालाही वचनबद्धता व आत्मत्यागाचं जीवन जगण्यास आमंत्रित करीत आहे. येशूने  आपल्यासाठी, स्वतःच्या जीवनासह आपलं सर्वस्व त्याग केलं. आपणही आपलं ख्रिस्ती जीवन प्रभूसाठी जगलं पाहिजे. म्हणून, याच मार्गाने आपण ख्रिस्ताचे खरे शिष्य बनू शकतो.

       आजचे पहिले वाचन देवाच्या ज्ञानाच्या खोलीकडे आपले लक्ष वेधते. मानवतेसाठी ख्रिस्तामध्ये प्रकट झालेल्या देवाच्या हेतूचे रहस्य जाणून घेण्यास आपल्याला मदत करणारा ज्ञानाचा आत्मा आपल्याला मदत करतो. अशा प्रकारे, हे रहस्य आपल्यासाठी आत्मा आणि जीवन बनते.

       आजच्या दुसऱ्या वाचनात, संत पौलाने प्रभूच्या नावाने ओनेसिमसला फिलेमोनकडे परत पाठवले असे आपण ऐकतो. जरी पौलाला ओनेसिमसची आवश्यकता होती आणि त्याला ठेवण्याचा पूर्ण अधिकार होता, तरी तो त्याच्या माजी मालक फिलेमोनकडे परत आला ज्याला त्याची तितकीच गरज होती. पौलाने त्याला गुलाम म्हणून न घेता भाऊ म्हणून ओनेसिमसचा स्वीकार करण्यास प्रोत्साहित केले.

       आजच्या शुभवर्तमानात, येशू आपल्याला त्याचे खरे शिष्य होण्यासाठी त्याच्या वचनबद्धतेची आणि त्यागाची भावना आत्मसात करण्याचे आमंत्रण देतो. तो म्हणतो, "जर कोणी माझ्याकडे त्याच्या वडिलांचा, आईचा, पत्नीचा... आणि स्वतःच्या जीवनाचाही द्वेष न करता येतो, तर तो माझा शिष्य होऊ शकत नाही." ख्रिस्ताचा "द्वेष" म्हणजे काय? तो आपल्याला त्याग करण्यास आणि आपल्या ध्येयांसाठी आणि आवाहनांसाठी वचनबद्ध होण्यास शिकवतो आणि बोलावतो.

मनन चिंतन

      “द्वेष” हा शब्द एक शक्तिशाली शब्द आहे म्हणून आपण प्रभूने वापरलेला हा शब्द नीट समजून घेतला पाहिजे. प्रभू येशूने त्या वेळी ज्या भाषेत "द्वेष" हा शब्द वापरला होता ती एक सेमिटिक अभिव्यक्ती होती जी आपण शब्दशः घेऊ नये. आपण समजून घेतलं पाहिजे की प्रभूसाठी देवावर प्रेम करणे हे इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त महत्त्वाचे आहे. प्रभू येशू आपल्या हृदयात प्रथम स्थान मागत आहे. शेवटी ज्या समाजात येशूने लोकांचे संपूर्ण जीवन त्यांच्या कुटुंबांवर केंद्रित केले व एकमेकास प्रीती करण्यास सांगितले त्या समाजात  तो आपल्याला आपल्या कुटुंबांना सोडून देण्यास सांगत नाही. आपले जीवन देखील प्रभूकेंद्रीत असले पाहिजे. येशूने अत्यंत टोकाची भाषा वापरली जेणेकरून लोक तो काय मागत आहे ते विसरू नये, म्हणजे त्याच्या मार्गाचे अनुसरण करण्याची, त्याच्या सत्यात जगण्याची आणि त्याच्यासोबत जीवन जगण्याची आपली पूर्ण मनाची तयारी व वचनबद्धता असली पाहिजे.

       आपल्या सर्वांच्या जबाबदाऱ्या, विशेषतः आपल्या कुटुंबांप्रती, आणि त्या पूर्ण करण्यासाठी वेळ मौल्यवान आहे. आजच्या पहिल्या वाचनात आपण ऐकतो की: "देवाचा सल्ला कोण जाणू शकतो, किंवा प्रभूचा हेतू कोणाला कळू शकतो? कारण नश्वरांचे विचार हे डरपोक असतात आणि आपल्या योजना अनिश्चित असतात. कारण भ्रष्ट शरीर आत्म्याला भारित करते आणि मातीचा आश्रय अनेक चिंता असलेल्या मनावर भार टाकतो." तरीसुद्धा, आपण स्वतःला विचारले पाहिजे की आपले हृदय खरोखर कुठे आहे आणि आपण आपल्या अंतर्मनाचा किती भाग देवाला देत आहोत. आपल्या जीवनात देव कुठे आहे? आपल्या जीवनात देव किती महत्त्वाचा आहे?

       संत लूकलिखित आजचे पवित्र शुभवर्तमान आपल्यासाठी उल्लेखनीय आहे. एकीकडे,येशू त्याचे अनुयायी बनणाऱ्यांवर करत असलेल्या मूलभूत आणि तडजोड न करणाऱ्या मागण्या मांडतो आणि त्याच वेळी, संत लूक पापी आणि दुर्बलांसाठी येशूच्या सौम्यतेवर आणि करुणेवर भर देतो. मी तुम्हाला असे सुचवतो की त्या वचनबद्धता परस्परविरोधी नाहीत.

       आजच्या शुभवर्तमानात आपल्याला येशू लोकांच्या प्रचंड गर्दीने वेढलेला आढळतो. ते उत्साह आणि अपेक्षांनी भरलेले आहेत. परंतु प्रभू येशू त्यांना आव्हान देतो. येशू म्हणतो, जर कोणी माझ्यामागे येईल आणि तो आपल्या वडिलांचा, आईचा, पत्नीचा, मुलांचा, भावांचा आणि बहिणींचा आणि स्वतःचा द्वेष करण्यास तयार नसेल, तर तो माझा शिष्य होऊ शकत नाही. तो आपल्याला आपल्या कुटुंबांचा त्याग करण्यास सांगत नाही. तो आपल्याला देवाच्या प्रेमाला प्रथम स्थान देण्यास सांगत आहे. आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की जर आपण देवावर प्रेम केले तर आपण इतरांवर प्रेम करू आणि त्याच्या प्रेमाने त्यांच्यावर प्रेम करू. आपल्या कुटुंबांचा त्याग करणे किंवा त्यांना आपले सर्वोत्तम प्रेम आणि काळजी देणे हे अत्यंत बेजबाबदारपणाचे आणि त्याच वेळी देवाच्या सार्वत्रिक प्रेमाच्या आज्ञेचे उल्लंघन असेल. परंतु हे देखील स्पष्ट आहे की, ज्यांना येशूच्या कार्याचा भाग व्हायचे आहे, त्यांना स्वतःला मनापासून त्यात समर्पित करावे लागेल. आणि, जिथे या जगाच्या मार्गांचा आणि सुवार्तेच्या स्पष्ट आवाहनाचा पर्याय आहे, त्यांना या जगाच्या आकर्षणांना नकार द्यावा लागेल.

       म्हणून येशू आपल्याला दोन उदाहरणे देतो. एक अशा माणसाबद्दल आहे ज्याची बुरुज बांधण्याची योजना होती. सुरुवात करण्यापूर्वी, त्याने खात्री केली की त्याच्याकडे सर्व आवश्यक संसाधने आहेत. अन्यथा, पाया घातल्यानंतरही तो काम पूर्ण करू शकणार नाही आणि तो इतरांच्या हास्याचे पात्र बनेल. दुसऱ्या उदाहरणात येशू १०,००० सैनिक असलेल्या   एका राजाबद्दल बोलतो जो २०,००० सैनिक असलेल्या दुसऱ्या राजाशी युद्ध करणार आहे असे समजतो. जर त्याला वाटत असेल की तो जिंकू शकत नाही, तर तो मिळवू शकणाऱ्या सर्वोत्तम शांततेच्या अटींवर वाटाघाटी करण्यासाठी दूतावास पाठवेल.

       त्याचप्रमाणे, येशू म्हणतो, जो देवाला बाजूला ठेवून देवाला कमी वेळ आणि लक्ष देण्याइतपत महत्त्वाच्या वाटणाऱ्या प्रत्येक गोष्टीला सोडून देण्यास तयार नाही, असा कोणीही त्याचा शिष्य होऊ शकत नाही. प्रेमाला काही मागण्या असतात. आणि येशूच्या मार्गाने चालण्याच्याही काही मागण्या असतात. आपण पाहू शकतो की प्रभू येशूचे ऐकणाऱ्या गर्दीतील किती जण त्यासाठी तयार होते? आपल्या काळात आपल्यापैकी किती जण त्यासाठी तयार आहेत? मी तयार आहे का? आणि मी कोणत्या गोष्टींच्या बंधनात आहे? मी कोणत्या गोष्टी सोडू शकत नाही? आणि का?

       येशूचा शिष्य होणे म्हणजे पूर्णपणे मुक्त असणे. येशूवर प्रेम करण्यासाठी आणि त्याच्या मार्गांनी चालण्यासाठी आपण इतर अनेक गोष्टींना "नाही" म्हणणे आवश्यक आहे. मला असिसीच्या संत फ्रान्सिसची आठवण येते ज्यांनी आपले कुटुंब सोडून दिले आणि आपले सर्व श्रीमंत आणि महागडे कपडे काढून फक्त भिकाऱ्याचे कपडे घातले. तेव्हा त्यांना आनंद आणि स्वातंत्र्याची एक प्रचंड भावना आली. मला येशूचा शिष्य व्हायचे आहे का? किती प्रमाणात? मी तो मागतो ती किंमत मोजण्यास तयार आहे का? आपल्या सभोवतालच्या जगात अनेक आवाज आपल्याला काय महत्वाचे आहे आणि काय नाही हे सांगण्याचा प्रयत्न करतात. त्यापैकी बरेच आवाज आपल्याला देवाला बाजूला ठेवण्यास किंवा त्याहूनही वाईट म्हणजे, देवावर विश्वास ठेवण्याचे सोडून देण्यास सांगतात. त्या अनेक आवाजांपैकी प्रत्येक आवाज, ते सर्व एकमेकांमध्ये स्पर्धा करत आहेत आणि वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करत आहेत, ते सर्वात महत्वाचे असल्याचा दावा करतात ते सादर करतात. आपल्याला टीकात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. ते फक्त आनंद देत आहेत का? की ते आपल्याला चिरस्थायी आनंद देत आहेत?

मला खात्री आहे की आपण सर्वजण हे समजून घेतो की देव महत्त्वाचा आहे आणि स्वर्गात त्याच्यासोबत कायमचे जीवन जगणे हे आपले ध्येय आहे.  आपण प्रभूवर कसा विश्वास ठेवतो, आपण तो आपल्या जीवनाचा कसा भाग आहे हे महत्त्वाचे आहे. आपण आपल्या जीवनात येशूचे अनुसरण कसे करत आहोत? आणि म्हणूनच ज्ञानाचे पुस्तक आपल्याला सल्ला देते: कारण नश्वरांचे विचार भयभीत असतात आणि आपल्या योजना अनिश्चित असतात. जर आपण आपल्या चिंतांमध्ये मार्ग, सत्य आणि येशूचे जीवन प्रथम ठेवले तर आपल्याला केवळ आनंदाच्या पलीकडे असीम जीवन मिळेल, आपल्याला शाश्वत आनंद मिळेल. येशूच्या जवळ राहिल्याने आपल्याला जीवनाने आपल्याला पाठवलेल्या कोणत्याही गोष्टीला तोंड देण्याची शक्ती मिळेल.


विश्वासू लोकांची प्रार्थना

आपला प्रतिसाद :-  प्रभो आमचा विश्वास दृढ कर

१.  ख्रिस्तसभेत कार्य करणारे आपले पोप लियो, सर्व बिशप्स व इतर सर्व प्रापंचिक लोकांना देवाची सुवार्ता पसरविण्यास कृपा व शक्ती मिळावी, देवाच्या प्रेमाची साक्ष जगजाहीर करण्यासाठी ते तत्पर असावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

२. आज आपल्या ख्रिस्ती बांधवाना समाजात व देशात अनेक संकटाना सामोरे जावे लागत आहे. आपल्या देशातील अन्याय-अत्याचाराचे वातावरण दूर व्हावे व सर्वांनि भेदभाव विसरुन आपल्या कुटुंबात, समाजात आणि देशात शांतीचे वातावरण प्रस्थापित करावे म्हणून आपण प्रार्थना करुया.

३. आपलया सर्व युवक युवतींसाठी आपण प्रार्थना करूया .जे तरुण तरुणी देवापासून दूर गेलेले आहेत, ज्यांना जगण्यात अर्थ उरला नाही व जे इतर वाईट मार्गाला लागले आहेत अश्यांना परमेश्वराने चांगला मार्ग दाखवावा व ते परमेश्वराकडे परत वळावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

४. जे लोक वाईट व्यसनांच्या अधीन झालेले आहेत, अशा सर्व लोकांना वाईट व्यसनांपासून परावृत्त होण्यासाठी प्रभूचे ध्येर्य-सामर्थ्य लाभावे म्हणून आपण प्रार्थना करुया.

५. आपण सर्वांनी आपल्या जीवनात ख्रिस्ताचा शोध एकनिष्टेने करावा व ख्रिस्ताच्या प्रेमाची साक्ष आपल्या दैनंदिन जीवनाद्वारे इतरांना द्यावी म्हणून आपण प्रार्थना करुया.