Wednesday, 8 February 2017

Reflection for the Homily of Sixth Sunday in the ordinary Time (12-02-17) By Dominic Brahmane.




सामान्य काळातील सहावा रविवार

दिनांक: १२/०२/२०१७.
पहिले वाचन: बेनसिराची बोधवचने १५:१५-२०.
दुसरे वाचन: करींथकरांस पहिले पत्र २:६-१०.
शुभवर्तमान: मत्तय ५:१७-३७.



मी नियमशास्त्र किंवा संदेष्ट्याचे लिखाण रद्द करायला नाही तर परिपूर्ण करायला आलो आहे 



प्रस्तावना:

आज आपण सामान्य काळातील सहावा रविवार साजरा करत आहोत. आजच्या उपासनेत येशुख्रिस्त त्याचा 'दैवी अधिकार' सिद्ध करत आहे.
     बेनसिराची बोधवचने ह्या पुस्तकातून घेतलेल्या पहिल्या वाचनात प्रत्येक मानवाला देवाने स्वातंत्र्य दिले आहे असे लेखक म्हणतो. आणि त्या स्वातंत्र्यातून त्याने चांगले आणि वाईट यांमधील योग्य ते निवडावे. दुसऱ्या वाचनात संत पौल येशू ख्रिस्ताच्या ज्ञानाचे श्रेष्ठत्व जगातील ज्ञानाच्या तुलनेत अधिक आहे असे म्हणतो. तर शुभवर्तमानात येशू नियमशास्र व संदेष्ट्ये ह्यांची परिपूर्ती आहे हे स्पष्ट होते.
अंत:करणाचे काही गहन नियम असतात जे तर्कशक्तीच्या समजण्यापलीकडे असतात. म्हणून ह्या मिस्साबलीत भाग घेत असतांना परमेश्वराने घालून दिलेल्या नियमांचे पालन आत्मियतेने करण्यास कृपा मागुया.

सम्यक विवरण:
पहिले वाचन: बेनसिराची बोधवचने १५:१५-२०.

     हे पुस्तक बुद्धी प्रामाण्यवादाचे एक पुस्तक म्हणून गणले गेले आहे (जुन्या करारातील शहाणपण). हे नैतिकता आणि धार्मिक तत्वज्ञान जपण्यास व अंगीकारण्यास मदत करते. १८० इ. स. पूर्व सालात हे पुस्तक हिब्रू ह्या भाषेत लिहिले होते. ह्या पुस्तकाचा लेखक म्हणून यहोशवा बेन एलीयाझ/ बेनसिरा ह्यास संबोधण्यात येते. असे म्हटले जाते कि ह्या पुस्तकाचे भाषांतर ग्रीक भाषेत लेखकाच्या नातेवाईकाने केले होते. त्याचा उद्देश हाच होता कि, जे ज्यू-पंथीय आपली मातृभाषा (हिब्रू) विसरले होते, त्यांना परत एकदा मोशेने दिलेल्या नियमांचे पालन करता यावे आणि त्याद्वारे व्यावहारिक ज्ञान प्राप्त व्हावे.
     ह्या वाचनाचा संदर्भ आजही ख्रिस्ती लोकांच्या व्यावहारिक ज्ञानासाठी उपयुक्त ठरतो म्हणून त्यास कालबाह्य म्हणता येणार नाही. ह्या पुस्तकाचा मतितार्थ आपणास सांगू इच्छितो कि, मानव हा स्वतंत्र प्राणी आहे, म्हणूनच तो त्याच्या स्वत:च्या कृत्यांना कारणीभूत ठरतो. देवाने मोशेद्वारे दहा आज्ञा दिल्या. ह्या दहा आज्ञा कोणावर लादल्या गेल्या नव्हत्या. परंतु ज्यांना त्या माहित होत्या त्यांच्या त्या भल्यासाठी होत्या. जे ह्या आज्ञा व नियम पाळत त्यांस देवाचे एकनिष्ठ असे गणले जाई. म्हणून देवाशी एकनिष्ठ राहायचे कि नाही हे त्यांच्या स्वत:वर अवलंबून होते.  
     परमेश्वराने स्वेच्छेने केलेली सेवा पसंत पडते. ‘पाणी’ आणि ‘अग्नी’ हे विध्वंस, विनाशाचे प्रतिक मानले जाते. पाप आणि जे चांगले व उपयुक्त असे आहे; सद्गुण. देव प्रत्येकाला योग्य ते निवडण्याचे स्वातंत्र्य देतो.
     ‘जीवन’ आणि ‘मरण’ हि एक उपमा येथे वापरण्यात आली आहे. जीवन हे अस्तित्वाचे प्रतिक तर मरण हे सर्वनाशाचे प्रतिक मानले जाते. येथे लेखक कदाचित सार्वकालिक जीवन व अनंतकाळाचे मरण ह्यास संबोधत नसून पृथ्वीतलावर स्वेच्छेने केलेली निस्वार्थी सेवा होय. आणि ह्याच्याविरुद्ध देवाशी एकनिष्ठ न राहणे म्हणजे मरण होय. व्यर्थ गेलेले जीवन. देवाशी शहाणपण हे मानवी आकलनापलीकडे आहे. त्याद्वारे त्यास सर्वकाही शक्य करण्याचे सामर्थ्य आहे. देवभिरू व्यक्तींवर त्याच्या करुणामय दृष्टी असते. देवभिरू असणे (जुन्याकारारात) म्हणजे देवाच्या बुद्धीचातुर्याचा (शहाणपणाचा) आदर सन्मान करते. देवापासून काहीही लपून राहत नाही तो सर्वकाही जाणतो; त्यामुळे कोणीही अनैतिकतेने वागावे अशी देवाची इच्छा मुळीच नाही. किंवा त्यासाठी देवाला जबाबदारही ठरवता येणार नाही. देवाला ते कदापि पसंत नाही. देवाने कोणालाही पाप किंवा पापात मुक्तविहार करण्याची मुभा दिलेली नाही. प्रत्येक पाप्याने त्याच्या         गैरवर्तुणूकीसाठी स्वत:ला दोषी धरावे/मानावे. देवही त्यालाच दोषी मानील कारण देवाने त्याला पाप व पुण्य असे दोन पर्याय त्याच्यापुढे ठेवलेले आहेत आणि योग्य ते निवडण्याची संधी त्याला दिली होती.

दुसरे वाचन: करींथकरांस पहिले पत्र २:६-१०.

हा प्रस्तुत उतारा गेल्या रविवारच्या वाचनाचा उर्वरित भाग आहे. ह्यात संत पौल त्याच्या करिंथ येथील अनुयायांना सांगतो कि, ‘तुम्हाला मिळालेला विश्वास हि ख्रिस्ताकडून प्राप्त झालेली एक देणगी होय’. त्यांनी स्वीकारलेला ख्रिस्ती धर्म पौलाच्या प्रवचनामुळे किंवा मानवी बुद्धी प्रमाण्यावादामुळे किंवा त्यांच्या तत्वाज्ञानांमुळे नव्हता, तर एक दैवी दयेचा आविष्कार होता. देव त्याचे खरे शहाणपण, बुद्धी हि त्यांनाच देतो जे त्यासाठी लायक किंवा योग्य असतात. दैवी शहाणपण त्यांनाच लाभते जे ते शिकण्यासाठी स्वेच्छेने तयारी दर्शवितात.
     ह्या उताऱ्यात आलेली ‘प्रगल्भता’ म्हणजे फक्त वयोमानाच्या दृष्टीकोनातून नव्हे तर ख्रिस्ती विश्वासात झालेली वाढ व धार्मिक व्यक्ती भौतिकवादाच्या, चंगळवादाच्या मोहातून बाहेर पडणे असे होय. हा संदेश त्या काळातील विधर्मी आणि ज्यू धर्माधिकाऱ्यांना उद्देशून लिहिण्यात आला आहे. त्यांचे बुद्धिचातुर्य (शहाणपण) हे ह्या जगाचे आहे त्यांच्या ह्या जागतिक प्रामाण्यवादामुळे ते तारणारा देव येशु ख्रिस्त ह्याला ओळखू शकले नाहीत. म्हणून संत पौल म्हणतो त्यांच्या शहाणपणाचा, अधिकाराचा सर्वनाश होईल (इ.स. ७० मध्ये ज्यू साम्राज्य लयास गेले आणि रोमन साम्राज्याचा देखील खातमा झाला).
देवाची मानवाच्या गौरवासाठी असलेली सार्वकालिक योजना आणि त्यांचे वारस होण्याचे भाग्य, येशु ख्रिस्ताच्या मानवी रूपाने पूर्णत्वास आली आहे. हि दैवी योजना ख्रिस्ती धर्मामध्ये ख्रिस्ताद्वारे उलगडण्यात आली. आणि हे संत पौल व त्याच्या साथीदारांनी त्यांच्या प्रवचनातून सर्वश्रुत केले.

शुभवर्तमान: मत्तय ५:१७-३७.

शुभवर्तमानातील उतारा प्रभू येशूने पर्वतावरील दिलेल्या प्रवचनातील एक आहे. ह्यात आपण पाहतो कि, येशु जुन्या करारात मोशेने दिलेल्या आज्ञांचा संदर्भ देतो आणि त्यालाच जोडून नवीन स्पष्टीकरण देतो. हे तो त्याच्या स्वत:स प्राप्त झालेल्या अधिकाराने करतो: “मी तुम्हांस  सांगतो”. ह्यावरून तो देव आहे हे स्पष्ट करु इच्छितो. कारण नियम देण्याचा आणि बदलण्याचा अधिकार फक्त देवालाच होता.
     शास्री आणि परुशी हे बाह्यांगातील नियम पाळण्यास अगदी कठोर होते. जे त्यांना मोशेने घालून दिले होते. परंतु ह्यात अंतःकरणातील प्रामाणिकपणाची आणि सेवा करण्याची उमेद ह्याची उणीव भासत होती. स्वत:ची इतरांकडून स्तुती करवून घ्यावी किंवा इतरांनी त्यांच्यासमोर नतमस्तक व्हावे हा ह्यामागचा हेतू होता. म्हणून ख्रिस्त त्याच्या अनुयायांना सक्त ताकीद देऊन सांगतो कि, त्यांची वर्तणूक, नियमांचे पालन आणि त्यांचा धर्म हा शास्री-परुशांसारखा नसावा तर त्याहूनही अधिक प्रामाणिक सत्य अंत:करणातून यावे; फक्त बाह्यांगातील फुशारकी नसावी. तरच ते स्वर्गराज्यासाठी पात्र ठरतील. येशु मोशेने दिलेल्या आज्ञेची पुर्नुजाळणी करत नाही तर त्यालाच जोडून नवीन आज्ञाही मांडतो.
खुनाचा सूड प्रथमत: मनामध्ये चालू होतो. अशा ह्या वाईट विचारांना बंधन घातले नाही तर त्याचे रुपांतर वास्तविक खुनामध्ये होते. येशु मनावर संयम ठेवण्यास सांगत आहे. संभोगात्मक विचार, नजर आणि कामवासना हे प्रत्यक्षात कृतीत उतरलेच असे नाही परंतु ख्रिस्तानुमते हे विचारच पाप करण्याबरोबर आहेत. म्हणून पापकृती करण्यापेक्षा त्याचा विचार मनात आणने देखील पाप आहे असे येशु सांगतो. ह्यात नियमशास्राचा अचूक, काटेकोरपणा शब्दशः पाळण्यावर नव्हे तर नियमशास्रामध्ये अभिप्रेत असलेली देवाची खरी इच्छा मार्मिकपणे जाणून घेण्यावर भर दिला आहे. ह्या बाह्यकृत्यांच्या मागे द्वेष व कामवासना या मुलभूत प्रवृत्ती अंतःकरणात घर करून बसल्या आहेत. अंतःकरण योग्य नसेल तर त्यातून पापाचे फळ बाहेर पडण्यापूर्वीच ते सुधारण्यासाठी कृती केली पाहिजे.

बोधकथा:

साने गुरुजी ह्यांनी लिहिलेल्या ‘श्यामची आई’ ह्या पुस्तकातील ही एक सुप्रसिद्ध कथा आहे.
लहान असताना स्नानगृहातून बाहेर येण्यापूर्वी साने गुरुजींनी अचानक आईला हाक मारली व तिला तिचा साडीचा पदर त्यांच्यासमोर पसरावायला सांगितले. ह्या सर्वाचे कारण विचारले असता ते उत्तरले, कि, ‘मी माझ्या स्वच्छ धुतलेल्या पायांना घाण लागू नये म्हणून तुला असे करावयास सांगितले’. त्यावर स्मितहास्य करत आई म्हणाली, ‘छान, पण बाळा आज जसे तू तुझे पाय मलीन होण्यापासून वाचवतोस, अगदी तशाच प्रकारे तुझ्या अंतःकरणाला देखील घाण लागणार नाही ह्याची काळजी घे’.

मनन चिंतन:

ख्रिस्ती धर्मानुसार जर ‘हृद्य’ ह्या शब्दाची व्याख्या सांगायची झाली, तर, ती पुढीलप्रमाणे असू शकेल. ‘हृद्य’ म्हणजे जेथे ज्ञानाच्या तुलनेत प्रेम, स्वतंत्रता किंवा मुक्त विचारांना अधिक वाव दिला जातो. कदाचित हीच समजूत जुन्या करारातही असावी जेंव्हा परमेश्वर म्हणतो, ‘मी माझ्या आज्ञा तुमच्या ह्र्दयपटलावर कोरील’. म्हणजेच परमेश्वराच्या आज्ञा पाळताना त्यात स्वातंत्र्य व प्रिती ह्यांचा अंतर्भाव असणे अगदी गरजेचे आहे. त्याला फक्त कर्मठपणाची किनार असून जमणार नाही.
आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू शास्री, परुशी ह्यांच्या कर्मठपणाचा निषेध करतो व मोशेद्वारे देवाने दिलेल्या आज्ञांची पुर्नुजळणी करतो. तो त्यांस ममतेची झालर देत आहे. शास्री लोक जे नियमावली व आज्ञांचे काटेकोरपणे पालन करण्यात पटाईत होते, त्यांना ‘नियमशास्र’ आणि ‘संदेष्ट्ये’ ह्याबद्दल फार लगाव होता. ह्या दोन शब्दांतच त्यांचा संपूर्ण जुना करार सामावलेला होता. परंतु येशुमध्ये ह्या दोनही (नियमशास्र आणि संदेष्ट्ये) गोष्टींचा कळस गाठला होता. तरीही शास्री-परुशी ह्यावर विश्वास ठेवण्यास असमर्थ होते. म्हणून येशू त्याच्या ‘दैवी अधिकाराने’ त्यांना नवीन अर्थ प्राप्त करून देतो. उदा. ‘तुम्ही जुन्या करारात असे ऐकले होते... पण आता मी तुम्हांस हे सांगतो...’.
‘येशू नियमशास्राचे उल्लंघन करावयास नव्हे, तर त्याची पूर्तता करावयास आला होता’. त्याने शास्री परुशी ह्यांनी धर्माच्या नावाखाली मांडलेला बाजार मोडकळीस आणला. येशूने बाह्यांगापेक्षा आंतरिक शुद्धीला प्राधान्य दिले. कारण देव चेहऱ्याची सुंदरता नाही तर अंत:करणाची शुद्धता पारखतो. पापकृती हृद्यातून येते; आणि तेच शरीराला पाप करण्यास भाग पाडते; हेच पाप आपल्याला देवापासून, शेजारप्रीतीपासून दूर ठेवत असते.
पहिल्या वाचनात बेनसिराची बोधवचने आपल्याला देवाने स्वातंत्र्य दिले आहे असे सांगते. ह्याच स्वातंत्र्यात देव आपल्याला बरे आणि वाईट ह्यामधून योग्य ते निवडण्यास सांगतो. जे आपण निवडतो त्यावरच आपले भविष्य ठरते. म्हणून त्याबद्दल देवाला दोष देणे अयोग्य आहे. कारण आपण ते स्वेच्छेने निवडलेले असते. येथेही आंतरिक शुद्ध गुणांवर भर दिला गेला आहे. येशू त्याच्या वक्तव्यातून पापाचा समूळ नाश करू इच्छितो असे स्पष्ट दिसून येते. खून, कामवासना ह्यांची सुरुवात हृदयात/ अंत:करणात होत असते. म्हणून बाह्यकृतींपेक्षा त्यांचा समूळ नाश करणे येशूला योग्य वाटले. येशू त्याच्या अधिकाराने व परिपूर्ण ज्ञानाने जुन्या नियमशास्राची वर्तमान काळाच्या गरजेनुसार अंशत: सांगड घालण्याचा प्रयत्न करतो.
     येशु सांगतो कि, नियमशास्र हे मुळातच आपल्या पंचांद्रियांना मार्गदर्शक असे होते. येथे येशूला लोकांच्या अंत:करणाबरोबरच मानसिकतेचाही विकास करायचा आहे. अशाप्रकारे येशू आपल्याला प्रत्येक विधी-नियम पाळत असता करुणामयतेची जाणीव ठेवण्यास सांगत आहे. फक्त बाह्यांगच स्वच्छ न ठेवता हृदयाची मलीनता दररोजच्या प्रार्थनेने, बंधूप्रीतीने आणि शेजारप्रीतीने शुद्ध केली जावी अशी आजची उपासना आपणास आवर्जून सांगू इच्छिते. कारण देव आपली अंत:करणे पारखतो.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे प्रभो, तुझ्या कृपेचे वरदान दे.

१. ख्रिस्ताने स्थापन केलेली ख्रिस्तमंडळी, संत पेत्राचे उत्तराधिकारी व तिचे इतर धर्माधिकारी, ह्यांना परमद्यामयी परमेश्वराचा आशिर्वाद लाभावा व त्यांना त्यांच्या कार्यातून ख्रिस्त प्रकट करता यावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. नियमावली, अटी हे समाजाच्या उन्नतीसाठी व भल्यासाठी असतात, परंतु त्यांना आंतरिक ममतेची झालर असावी; त्यांनी आपल्याला कर्मठ बनण्यास प्रवृत्त करू नये म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. आपल्या भावी ख्रिस्ती समाजाचे भक्कम आधारस्तंभ असणारे युवक-युवती ह्यांनी देवाच्या अधिकाधिक सानिध्यात राहून ख्रिस्ती समाजबांधणी करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. वयोवृद्ध, अबाल, विधवा, अनाथ अशा ह्या समाजातील अन्यायाची झळ सोसत असणाऱ्या व्यक्तींच्या उन्नतीसाठी, उदार व्यक्तीमत्वांनी हातभार लावावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. वैयक्तिक व कौटुंबिक हेतूंसाठी थोडावेळ शांत राहून प्रार्थना करूया.

Tuesday, 31 January 2017

Reflection for the Homily of 5th Sunday in Ordinary Time (05-02-2017) by Br. Glen Fernandes.




सामान्य काळातील पाचवा रविवार

दिनांक: ०५/०२/२०१७.
पहिले वाचन: यशया ५८:७-१०.
दुसरे वाचन: करिंथकरास पहिले पत्र २:१-५.
शुभवर्तमान: मत्तय ५:१३-१६.



तुम्ही पृथ्वीचे मीठ जगाचा प्रकाश आहात



प्रस्तावना:
आज आपण सामान्यकाळातील पाचवा रविवार साजरा करीत आहोत. जीवनात सदैव सत्कर्म करून इतरांच्या जीवनात आनंद पसरवण्यासाठी आजची उपासना आपल्याला बोलावत आहे.
यशया पुस्तकातून घेतलेल्या पहिल्या वाचनात उपवासाचे महत्व पटवून दिले गेले आहे. दुसऱ्या वाचनात संत पौल करिंथकरास आपला विश्वास प्रभूमध्ये दृढ ठेवण्यास आवाहन देत आहे. देवाच्या सामर्थ्यावर अढळ श्रद्धा ठेवण्यास तो प्रोत्साहान देत आहे. तर शुभवर्तमानात प्रभू येशु पर्वतावरील दिलेल्या प्रवचनात शिष्यांना मीठ व प्रकाश अशा उपमा देत आहे.
ख्रिस्ती जीवन म्हणजे काय? ख्रिस्ती जीवनाचे ओळखपत्र काय? मी खरोखर ख्रिस्ती मूल्यावर जीवन जगतो का? ह्या पवित्र मिस्सा बलिदानात सहभागी होता असताना आपल्या पापांची आठवण करूया व दैवी दयेसाठी परमेश्वराची याचना करूया.

सम्यक विवरण
पहिले वाचन: यशया ५८:७-१०.

यशया प्रवक्ता आपले नैतिक जीवन अढळ राहण्यासाठी चांगुलपणा अंगीकारण्यासाठी बोध करत आहे. चांगले जीवन जगण्यास प्रोत्साहन करण्यासाठी तो उपवासाचे महत्व सांगत आहे. उपवासाचे योग्य पालन म्हणून अन्न भुकेल्यांस वाटायला हवे; लाचारांस व निराश्रीतांस घरी न्यायला हवे असे तो पटवून देत आहे.  
उपवसाबाद्द्ल प्रबोधन करताना यशया सांगतो जर आपण प्रभूच्या वचनाप्रमाणे आपले जीवन जगलो तर आपल्या दैनंदिन जीवनाचा प्रकाश प्रभातीप्रमाणे फाकेल, आपल्या जखमा लवकर भरतील, आपली धार्मिकता आपल्या पुढे चालेल व परमेश्वराचा गौरव आपला पाठीराखा होईल. ह्या शब्दांत प्रभूमय जीवन जगण्यास यशया सांगत आहे.

दुसरे वाचन: करिंथकरास पहिले पत्र २:१-५.

ह्या उताऱ्यात संत पौल वधस्तंभावरील ख्रिस्ताविषयी बोध करत आहे. तसेच आपला विश्वास मनुष्याच्या बुद्धीमत्तेवर नव्हे, तर देवाच्या सामर्थ्यावर उभारण्यास सांगतो. देवाची कृपा हि कोणत्याही परिस्थितीत आपल्यासाठी पुरेशी असते. संत पौलाला त्याच्या जीवनात नेहमीच हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. परंतु तरीही संत पौल नम्रतेचा आदर्श त्याच्या शब्दांनी सर्वांसमोर पत्राद्वारे व्यक्त करतो. संत पौल लोकांसमोर नम्र होऊन सांगतो कि, आपले तारण हे परमेश्वराच्या कृपेने होते. तसेच संत पौल लीनतेचे उदाहरण म्हणून वधस्तंभावर खिळलेल्या येशू ख्रिस्ताबद्दल लोकांस मार्गदर्शन करतो. व त्यांचा विश्वास दृढ व मजबूत ठेवून देवाच्या वचनावर जीवन आधारण्यास बोध करतो.

शुभवर्तमान:

येशू पर्वतावरील प्रवचनात लोकांना जीवनावश्यक उपदेश करीत आहे. समाजात अन्यायाला किळस आलेल्या दारिद्र्याला वैतागलेल्या परंतु प्रभूच्या वचनांसाठी आतुर झालेल्या जनसमुहाला प्रभू ‘मीठ’ व ‘प्रकाश’ ह्या दोन उपमा देत आहे. मत्तय लिखित शुभवर्तमानात येशू ख्रिस्त ह्या दोन्ही उपमांचा वापर करून सांगतो कि, ‘तुम्ही पृथ्वीचे मीठ आहा पण जर मिठाचा खारटपणाच गेला तर तो खारटपणा त्याला कशाने आणता येईल’? पुढे ख्रिस्त म्हणतो, ‘डोंगरावर वसलेले नगर लपू शकत नाही. दिवा लावून मापाखालाई ठेवीत नसतात तर दिवठणीवर ठेवतात म्हणजे तो घरातल्या सर्वाना प्रकाश देतो’.

बोधकथा:

पारसी लोक जेव्हा ईराण व पर्शिया देशामधून भारतात आले तेव्हा त्यांनी भारतातील राजाला विनंती केली कि, ‘हे महाराज आम्ही संख्येने जरी कमी असलो तरी खूप मेहनती व विश्वासू आहोत, म्हणून तुमच्या साम्राज्यात आम्हांला समाविष्ट करा. राजा उत्तरला, ‘मी तुम्हाला समाविष्ट केले असते परंतु माझ्या साम्राज्यात सर्व लोक अगोदरच समाविष्ट आहेत; माझे साम्राज्य म्हणजे दुधाने भरलेले भांडे आहे, तर तुम्हांला कुठे स्थान देऊ?’ त्या लोकांच्या प्रमुखाने उत्तर दिले, ‘हे राजा जरी तुमचे साम्राज्य भरलेले आहे तरी आम्हांला थोडेसे स्थान द्या , दुधाने भरलेल्या भांड्यात आम्ही साखर म्हणून राहू व आपल्या साम्राज्यासाठी झटू’. अशा प्रकारे पारसी लोकांचा भारतात प्रवेश झाला. आज जेथे जेथे पारसी लोक आहेत ते धन्य; ते देशाच्या उन्नतीसाठी झटत आहेत.

२. एका राजाला तीन मुली होत्या. आपल्या मुलीचे प्रेम जाणून घेण्यासाठी त्याने त्यांची परीक्षा घेतली. मोठी म्हणाली, ‘माझे तुमच्यावर जगाच्या सर्व सोने, हिरे, मोती यापेक्षाही जास्त प्रेम आहे.’ दुसरी म्हणाली, ‘जगातील सर्व हुशारी व ज्ञानापेक्षा माझं तुमच्यावर अधिक प्रेम आहे.’ लहान मुलगी म्हणाली, ‘माझं तुमच्यावर मीठप्रीय तसे प्रेम आहे.’ राजा लहान मुलीचे उत्तर ऐकून रागावला व तिला हद्दपार करण्याचे व तिचे तोंड न पाहण्याचे आदेश दिले. प्रधानाने जेव्हा हि गोष्ट ऐकली, तेव्हा त्याने राजाला आपली चूक कळवून देण्यासाठी राजाच्या सर्व मेजवानीतील मिठ न टाकण्याची आज्ञा दिली. जेव्हा राजाने जेवण चाखले तेव्हा तो विस्मयीत झाला व स्पष्टीकरण विचारल्यावर प्रधानाने राजाला त्याची चूक निदर्शनास आणून दिली. राजाला आपल्या मुलीची खरी ओळख पटली व तिच्या कृतीची जाण झाली. मीठ जरी साधारण व कमी किमतीचे असले तरी, मिठाशिवाय जेवणाला अर्थ नाही. प्रभू शिष्यांना मिठ व प्रकाश म्हणून त्यांना नवी जबाबदारी देतो कि, ‘दुसऱ्याच्या जीवनाला रुचकरपणा आणा व त्यांचे अंधारमय जीवन प्रकाशीत करा’.

मनन चिंतन:

आपण कोण आहोत कोठून आलो आहोत आपण कोठे जाणार आहोत हे तीन प्रश्न मानवापुढे अगदी प्राचीन काळापासून पुन्हा पुन्हा उभे राहिले आहेत. फक्त विचारवंत व्यक्तींनाच नाही, तर संस्थाना समाजांना आणि देशांना देखील ह्या तीन मुलभूत मानवी प्रश्नांचा वेळोवेळी सामना करावा लागला आहे.  
     हल्लीच्या काळात मात्र ‘मी कोण आहे?’ ह्या प्रश्नांचे उत्तर केवळ उच्च वैचारिक पातळीवर नाही, तर रोजच्या सामान्य व्यवहारात अनेकदा द्यावं लागते. निवडणुकीत मत नोंदवायला, बँकेत खाते उघडायला, गाडीसाठी कर्ज काढायला, रेल्वेचे आरक्षण करायला, आपण कोठेही काहीही करायला गेलो तरी मी कोण आहे ह्याचा दाखला सादर करावा लागतो. मग प्रश्न असा उभा राहतो कि, ख्रिस्ती म्हणजे कोण? ख्रिस्ती लोकांचे ओळखपत्र काय आहे? ख्रिस्ती कोणाला म्हणायचे? विधर्मी आणि ख्रिस्ती ह्यात काय फरक आहे?
येरुशलेमाच्या मंदिरात परमेश्वराची पूजा-अर्चा घेत असताना, देवाविषयी ऐकण्यासाठी प्रचंड जनसमुदाय पर्वतावर येशू जवळ आला होता. येशूने फक्त शब्दाने उपदेशच केला नाही तर त्यांना नवीन ओळखपत्रही दिले. नाव व सन्मान दिला. त्याचबरोबर जबाबदारीची जाणीव करून दिली. प्रभूने त्यांना मीठ व प्रकाश ह्यांची उपमा दिली. मीठ व प्रकाश ह्या दोन्ही आपल्याला दररोजच्या जीवनात महत्वाच्या आहेत. ज्याप्रमाणे मीठ आणि प्रकाश उपयोगी वस्तू आहेत त्याप्रमाणे आपल्या जीवनाची सुद्धा उपयोगिता असावी. जर मिठाला खारटपणाच नसेल तर ते पायाखाली वाया जाते. आपल्या जीवनाला, राहणीमानाला अर्थ नसेल तर आपलेही जीवन व्यर्थ ठरते. ख्रिस्त आज प्रत्येक मनुष्याला दुसऱ्यांच्या जीवनात प्रकाश, रुची किंवा चव आणण्यासाठी पाचारण करीत आहे. जिथे दु:ख आहे, तिथे आनंद; ज्यांच्या जीवनात निबिड अंधार आहे, तिथे प्रकाशाचा दिप व गरिबांच्या जीवनात रुचकरपणा टिकवून ठेवण्यासाठी ह्या पाचारणाचा उपयोग करायला हवा. येशूचे ठाम अनुयायी बनण्यास जीवनात मीठ व प्रकाश बनायला हवे.
     एके काळी ख्रिस्ती शाळा, कॉलेज आणि दवाखाने ह्या पथदर्शक संस्था होत्या. त्यांचे कार्य पाहून त्यांच्या सेवाभावाने प्रेरित होऊन इतर धर्मांतील समाजसुधारकांनी अशा प्रकारच्या संस्था उभारल्या. ख्रिस्ती लोक जनसेवा करतात ती प्रभू सेवा समजून करतात असे आपण भूतकाळात म्हणत असू आणि तेही काहीशा अभिमानानेच. पण तेच आजच्या काळात म्हणण्यासारखी परिस्थिती राहिलेली नाही. आपल्यापेक्षा अतिशय चांगल्या दर्जाची सेवा ख्रिस्तीतर लोक आणि संस्था करत असल्याचे आपण सभोवती पाहतो.
आपल्याला ख्रिस्तासारखे व्हायचे असेल तर ख्रिस्त कसा होता हे आपल्याला आधी पूर्णपणे माहित असले पाहिजे. ख्रिस्त आपल्या अंतरंगातून प्रकट झाला पाहिजे. म्हणून खिस्ती जीवनात ख्रिस्ती सेवेस आपण अग्रक्रम दिला पाहिजे. प्रत्येक कामात ख्रिस्ताला पुढे स्थान दिले पाहिजे. ख्रिस्त धर्म काय आहे? त्याची मुलतत्वे काय आहेत? हे आपण जाणून घेतले पाहिजे.
आपल्या धर्माची मुल्ये इतर धर्मांहून निराळी आहेत. तसेच आपल्या प्रभूने दिलेल्या आज्ञेचे पालन करीत राहायचे असेल आणि ख्रिस्ताची लोकांना ओळख करून द्यायची असेल तर त्यासाठी आतापासूनच प्रयत्न केले पहिजेत आणि ते आपण सर्वांनी केले पाहिजे.
येशू ख्रिस्त त्याच्या प्रकाशात आपणा सर्वांना एकत्र करून घेतो व आपणास प्रती-ख्रिस्त होण्यास पाचारण करतो. आपल्या व दुसऱ्यांच्या जीवनातील अंधार नाहीसा करण्यासाठी सत्कृत्ये करावी लागतात तरच ख्रिस्ताप्रमाणे आपण सुद्धा जगाचे प्रकाश होऊ. येशूच्या अनुयायांनी प्रथम स्वतःच्या जीवनातील अंधकार दूर करायला हवा. कदाचित आपणास फार मोठा प्रकाश होणे शक्य नाही पण मिणमिणता प्रकाश होता येते. म्हणूनच जीवनातील ख्रिस्ताचा प्रकाश न विझविता; आपल्या छोट्याश्या प्रकाशाने इतरांना साथ देऊन त्यांच्या जीवनात तेजमय व आनंदमय प्रकाश झळकवण्यासाठी मदत करावी; हीच गरज आजच्या जगाची व समाजाची आहे हे आपण समजून घेऊया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे प्रभो द्या कर आणि आमची प्रार्थना ऐक.

१. आपले परमगुरु फ्रान्सिस, महागुरू, धर्मगुरू व व्रतस्थ यांनी त्यांच्यावर सोपवलेल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात व लोकांना दैवीदयेचा अनुभव घेण्यास मदत करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. जे निराश होऊन देवापासून दूर गेले आहेत त्यांना प्रभूने स्पर्श करावा, त्यांच्या जीवनात परिवर्तन व्हावे व त्यांनी परत एकदा प्रभूने दाखवलेल्या मार्गावर चालावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३.आपल्या देशाचा कारभार सांभाळण्यासाठी जे राज्यकर्ते नेमले आहेत त्यांनी आपल्या विवेकबुद्धीला जागवून सामाजीक बांधिलकीच्या दृष्टीकोनातून जनतेचे प्रश्न व अडचणी जाणून घ्याव्यात व देशाच्या प्रगतीसाठी झटावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. आज जगात अनेक गरीब राष्ट्रांतील लोकांना तसेच आपल्या समाजात अनेकांना वेगवेगळ्या प्रकारे अन्याय व छळ सहन करावा लागत आहे, अशा सर्व लोकांना त्यांच्यावर होत असलेला अन्याय व छळ सहन करण्यास प्रभूने शक्ती व सामर्थ्य प्रदान करावे तसेच जुलूम करणाऱ्यांस क्षमा करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. येथे जमलेल्या भाविकांनी निस्वार्थीपणे जीवन जगावे; आपल्या जीवनात प्रार्थनेला प्राधान्य द्यावे आणि उदार मनाने आपल्या शेजाऱ्यांची सेवा करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
६. थोडावेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.


Thursday, 26 January 2017

Reflection for the Homily of 4th Sunday in the ordinary Time (29-01-17) By Br Amit D’Britto




सामान्य काळातील चौथा रविवार

दिनांक: २९/०१/२०१७.
पहिले वाचन: सफन्या २:३,३:१२-१३.
दुसरे वाचन: करिंथकरांस पहिले पत्र १:२६-३१.
शुभवर्तमान: मत्तय ५:१-१२.


"जे आत्म्याने दीन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे."



प्रस्तावना:

     आज देऊळमाता सामान्य काळातील चौथा रविवार साजरा करीत आहे. प्रत्येक मनुष्य हा सुख व आनंदाच्या शोधात असतो. प्रभू येशु ख्रिस्त आज शुभवर्तमानात आनंदी व सुख-समाधानी होण्यासाठी योग्य असा मार्ग दाखवत आहे.
     आजच्या पहिल्या वाचनात संदेष्टा सफन्या लोकांस चांगुलपणाचा मार्ग निवडण्यास विनवणी करतो. कारण त्यामुळेच त्यांचे देवाच्या रागापासून संरक्षण होईल. प्रभू येशु ख्रिस्तामध्ये आपल्याला नवीन अस्तित्व प्राप्त होते असे संत पौल करिंथकरांस दुसऱ्या वाचनात सांगतो.
ह्या मिसाबलिदानात सहभागी होत असताना आपण आत्म्याने नम्र व लीन होऊन स्वर्गाचे राज्य मिळवण्यासाठी प्रयत्न करुया.

सम्यक विवरण

पहिले वाचन: सफन्या २:३,३:१२-१३

यिर्मया संदेष्टा येण्याच्या काही वर्षांपूर्वी संदेष्टा सफन्या ह्यांनी यरुशलेमेत उपदेश केला. प्रस्तुत उताऱ्याद्वारे संदेष्टा सफान्या लोकांना देवाने दाखवल्याप्रमाणे योग्य मार्गाचे आचारण करण्यास सांगत आहे. तसेच स्वत:ला शून्यवत करणारी नम्रतेची जीवनशैली स्वीकारण्यास आवाहन करतो. तो म्हणतो कि, ‘जे लोक आत्म्याने दिन आहेत व आज्ञा पालन करतात त्यांना कराराची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी आणखी एक संधी मिळेल. तसेच जे गरीब व दिन-दुबळे आहेत त्यांना देवामध्ये सामर्थ्य मिळेल’.

दुसरे वाचन: करिंथकरांस पहिले पत्र १:२६-३१

आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल करिंथकरांस सांगतो कि देवाने ज्ञानी व शहाणे ह्यांच्या तुलनेत साध्या व भोळ्या लोकांना निवडले आहे. तसेच शक्तिमान लोकांच्या तुलनेत त्याने दुर्बलांची निवड केली आहे. जगातील ऐहिक प्रतिष्ठेची तोरा कोणाला मिरवता येऊ नये याच उद्देशाने देवाने हे केले आहे. तसेच आपल्या सर्वांना ख्रिस्त येशु मध्येच राहणे योग्य आहे असे संत पौल सांगत आहे.



शुभवर्तमान: मत्तय ५:१-१२

मत्तयने नमूद केलेल्या महान प्रवचनापैकी हे पहिले प्रवचन होय. सामान्यतः हे ‘डोंगरावरील प्रवचन’ या नावाने प्रसिद्ध आहे. त्याची रूपरेषा सर्वसाधारणपणे लूक ६:२०-४९ मध्ये दिलेल्या प्रवचनासारखी असली तरी हे प्रवचन खूपच दीर्घ आहे. ‘शिष्यपण’ किंवा ‘स्वर्गाच्या राज्यातील जीवन’ असा मध्यवर्ती मुद्दा घेऊन त्या भोवती संपूर्ण विषयाची मांडणी केली आहे. प्रवचनाच्या आरंभीच धन्यतेच्या आठ उदगारातून खऱ्या शिष्याचे अष्टपैलू-पूर्ण चित्रण केले आहे. ह्या सर्वांमुळे आपले जीवन चांगले होईल असे प्रभू येशू ख्रिस्त आपणास पटवून देत आहे. जीवनात अशा मार्गाने चालल्याने कोणाचीदेखील हानी होणार नाही असे ह्यातून स्पष्ट होते. “स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे” ह्या महत्वपूर्ण शब्दांनी या वाचन मालिकेचा आरंभ व शेवट झाला आहे. जे देवाला ‘राजा’ म्हणून मान्य करतात, त्यांच्या संदर्भात हे शब्द आहेत, आणि त्यांच्या जीवनात त्याचा हेतू परिपूर्ण व्हावा यासाठी ते निश्चयाने प्रतीक्षा करतात.

बोधकथा

एकदा एक श्रीमंत माणूस मदर तेरेजाच्या आश्रमाला भेट देण्यासाठी जातो. जेव्हा तो तेथे पोहचतो तेव्हा मदर तेरेजा ह्या एका अत्यंत आजारी व कुष्टरोगाने ग्रासलेल्या व्यक्तीच्या जखमा साफ करत होत्या. जेव्हा तो श्रीमंत व्यक्ती हे सर्व दृश्य पाहतो तेव्हा तो मदर तेरेजाला म्हणतो, “जर मला लाखो रुपये जरी मिळाले तरी सुद्धा मी हे काम करणार नाही.”  तेव्हा त्याला प्रतिउत्तर देत मदर तेरेजा म्हणाल्या, “मी सुद्धा हे काम कितीही पैसे मिळाले तरी करणार नाही, परंतु हे सर्व मी त्या व्यक्ती मध्ये दिसणाऱ्या प्रभूसाठी आणि त्याने दिलेल्या शिकवणुकीचे योग्य असे पालन करण्यासाठी करत आहे.” आज शुभवर्तमानात प्रभू येशु आपणास हाच मार्ग दाखवत आहे.


मनन चिंतन:

आज जगात सर्वजण सुखाच्या शोधात आहेत. प्रभू येशू ख्रिस्त आजच्या शुभवर्तमानात आपल्याला आनंदाचा व सुखाचा मार्ग दाखवत आहे. आपण सुख हे पैसा, संपत्ती, अधिकार, व प्रतिष्ठा ह्या सारख्या गोष्टींमध्ये शोधत असतो. परंतु आपण खूप वेळा हरतो व फसतो. आपल्याला आवश्यक व समाधानकारक सुख मिळत नाही.
आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू जो सुखाचा मार्ग दाखवत आहे तो ह्या सर्व मार्गापासून खूप वेगळा आहे. ह्या जगात जे सुख आपल्याला संपत्ती, अधिकार किंवा प्रतिष्ठेने मिळते ते क्षणिक असते, परंतु आपल्याला जर चिरकाळ आनंद हवा असेल तर आपण प्रभू येशूच्या शिकवणूकीचा मार्ग अवलंबला पाहिजे.
आपण सर्वांनी आत्म्याने ‘दीन’ झाले पाहिजे. आपण ‘सौम्य’ व्हायला हवे कारण आपणास पृथ्वीचे वतन भोगायला मिळेल. तसेच जर आपल्याला तृप्त व्हायचे असेल तर आपण नितीमत्वाचा मार्ग अवलंबला पाहिजे. आपण दयाळू होणे खूप गरजेचे आहे व आपले अंतःकरण शुद्ध ठेवणे गरजेचे आहे; त्यामुळे आपल्याला देवाला पहावयास मिळेल. तसेच आपण हिंसेचा अवलंब न करता शांतीचा मार्ग पत्करला पाहिजे. जर आपला नितीमत्वासाठी छळ झाला तर आपण त्यासाठी तयार असावे कारण स्वर्गाचे राज्य अशाच लोकांचे आहे असे येशु म्हणतो. जर आपणास प्रभूच्या नावाने निंदा किंवा छळ सहन करावा लागला तर तो आपण आनंदाने स्वीकारला पाहिजे कारण ह्याकरीता स्वर्गात आपले प्रतिफळ मोठे असणार आहे.
मोशे ‘सिनाय’ पर्वतावरून खाली येतो आणि लोकांना ‘दहा आज्ञा’ देतो. ह्या दहा आज्ञेद्वारे तो लोकांना योग्य असा मार्ग दाखवून देवाच्या अधिक जवळ आणत असे. आपला प्रभू येशु ख्रिस्त हा ‘नवीन मोशे’ आहे. कारण त्याने सुद्धा लोकांना नवीन आज्ञा दिल्या. आज शुभवर्तमानात आपणा पाहतो कि, ह्या नवीन आज्ञेद्वारे तो लोकांना सार्वकालिक जीवन प्राप्त करण्यासाठी व देवाच्या अधिक जवळ येण्यासाठी लोकांना मार्ग दाखवत होता.
कदाचित आपल्याला असे वाटेल कि आज शुभवर्तमान येशु ख्रिस्त ज्या आज्ञा आपणास देत आहे त्या पाळण्यास खूप कठीण आहे. परंतु आपल्या असे लक्षात येते कि, प्रभू येशु ख्रिस्ताने प्रथम शिकवण्या अगोदर हे सर्व कृतीत उतरवले व त्यामुळेच त्याने आपणास योग्य असा आदर्श दिला आहे.
आज  शुभवर्तमानात प्रभू येशु ख्रिस्त ज्या काही पूर्वसूचना देत आहे त्याचे योग्य असे पालन केल्याने आपणास सुखाचा अनुभव ह्या भौतिक जगातच नव्हे तर चिरकाळचा आनंद लाभणार आहे. कदाचित त्यांचे पालन करणे हे कठीण असेल परंतु ते अशक्य नाही. कारण ह्या सर्व आज्ञा कृतीत उतरवणाऱ्या अनेक संतांचे सोदाहरण आपल्या डोळ्यांसमोर आहेत.
आज आपण जगावर जास्त परिणाम घडवणारे व्यक्ती येशु ख्रिस्त, गांधीजी, मदर तेरेजा व मार्टीन लुथर किंग ह्यांच्या जीवनात पाहिले तर असे लक्षात येते कि, हे सर्व व्यक्ती अतिशय लीन, नम्र व प्रेमळ होते. परंतु जे कोणी फार अभिमानी व गर्विष्ठ असतात त्यांचा द्वेष किंवा तिरस्कार केला जातो. प्रभू येशु ख्रिस्ताच्या शब्दात खूप सामर्थ्य आहे. तो म्हणाला, “आकाश व पृथ्वी नष्ट होतील परंतु माझी वचने नष्ट होणार नाहीत” (मार्क १३:३१). जर आपण प्रभूच्या शब्दाचा मान राखून त्याची वचने आपल्या आचरणात आणली तर नक्कीच आपल्याला स्वर्गीय सुखाचा अनुभव येईल.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद: हे देवा आम्हाला तुझा आशीर्वाद दे.

१.आपले परमगुरु , महागुरू, सर्व धर्मगुरू व व्रतस्थांनी ख्रिस्ताच्या श्रद्धेत दृढ होऊन आपल्याला प्रभूच्या राज्यात प्रवेश करण्यास मार्गदर्शन करावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
२.जे निराश होऊन देवापासून दूर गेले आहेत, त्यांना प्रभूने स्पर्श करावा व त्यांच्या जीवनात परिवर्तन व्हावे; त्यांनी परत एकदा प्रभूने दाखवलेल्या मार्गावर चालावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३.आपल्या समाजातील व धर्मग्रामातील जी कुटुंब दुरावलेली आहेत त्यांना प्रभू परमेश्वराच्या प्रेमाचा अनुभव यावा व त्यांनी परमेश्वराच्या कृपेने एकत्र येऊन पुन्हा आपल्या कुटुंबात प्रेमाने, एकजुटीने रहावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करुया.
४.ख्रिस्ताला स्वीकारण्यासाठी आपल्यामधील असलेला अहंकार, स्वार्थ व राग दूर  सारून एकजुटीने समाज बांधणीचे कार्य करावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
५.आपल्या वैयक्तिक आणि कौटुंबिक हेतूंसाठी आपण प्रार्थना करूया.