Wednesday, 18 December 2024

Reflection for 4th Sunday of Advent (22/12/2024) By Fr. Pravin Bandya


आगमन काळातील चौथा रविवार

दिनांक: २२/१२/२०२४.

पहिले वाचन: मीखा ०५: ०२ ते ०५अ

दुसरे वाचन: ईब्री लोकांस पत्र १०:०५ ते १०

शुभवर्तमान: लूक ०१:३९ ते ४५

प्रस्तावना

“स्त्रियांमध्ये तू धन्य व तुझ्या पोटचे फळ धन्य”

        आज आपण आगमन काळातील चौथा रविवार साजरा करीत आहोत. आजच्या पहिल्या वाचनामध्ये आपण पाहतो कि मिखा संदेष्ट्याद्वारे परमेश्वर म्हणतो, “हे बेथलेहेम एफ्राथा, यहूदाच्या हजारात तुझी गणना अल्प आहे, कारण तुजमधून एकजण निघेल, तो मजसाठी इस्राएलचा राजा होईल; तो पुरुष आम्हास मूर्तिमंत शांती होईल.” तर दुसऱ्या वाचनामध्ये आपण पाहतो की सुरुवातीच्या काळामध्ये पापक्षमेसाठी कोकराचा बळी दिली जात असे, पण परमेश्वर त्या होमांनी व पापाबद्दल होणाऱ्या अर्पणानी आनंदित नव्हता. म्हणून परमेश्वराने आपला एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ह्याला जगामध्ये पाठवले. तो शरीर धारण करून या जगात आला, त्याने मानव जातीच्या पापांसाठी दुःख सहन केले, आपल्या शरीरावर घाव घेतले, रक्त वाहिले आणि आपलं स्वतःचं बलिदान कालवरी पर्वतावरील क्रुसावर दिले आणि एकदाच झालेल्या देहार्पणाद्वारे सर्व मानवाला पवित्र केले.

        तसेच आजच्या शुभवर्तमानामध्ये पवित्र मरिया डोगराळ प्रदेशात जाते व तिची मावस बहिण एलिझाबेथला भेटते. आणि एलिझाबेथ पवित्र मरियेला पाहते तेव्हा तिला मरीयेच्या उदरामध्ये तारणाऱ्याचे दर्शन घडते. म्हणून ती उंच स्वर काढून मोठ्याने म्हणते, “स्त्रियांमध्ये तू धन्य व तुझ्या पोटचे फळ धन्य; माझ्या प्रभूच्या मातेने माझ्याकडे यावे हा मान मला कुठून?”

        काही दिवसांमध्ये आपण ख्रिस्त जयंती साजरा करणार आहोत. आपण बाळ येशूच्या दर्शनासाठी आणि त्याला आपल्या हृदयामध्ये जन्म देण्यास उत्सुक झाले आहोत. बाळयेशू पुन्हा एकदा आपल्या हृदयामध्ये जन्म घेणार आहे. त्याचा स्वीकार करण्यास आपण पात्र व्हावे म्हणून प्रार्थना करूया.

मनन चिंतन

        अगदी थोड्याच दिवसात आपण नाताळचा सण साजरा करणार आहोत. जशी हरीण पाण्यासाठी तळमळत असते, जसा भुकेला मानव अन्नासाठी तळमळत असतो, जसा मानव तहान लागल्यावर पाण्यासाठी तळमळत असतो आणि गर्भवती स्त्री जशी आपल्या बाळाच्या दर्शनासाठी आस्तुतलेली असते. तशाच प्रकारे आपण प्रत्येक जण त्या बाळयेशूच्या दर्शनासाठी आणि त्याला आपल्या हृदयामध्ये जन्म देण्यासाठी आस्तुतलेले आहोत. कारण तोच आपला मुक्तिदाता परमेश्वर आहे. आपल्याला ठाऊक आहे कि, प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या ७०० वर्षापूर्वी एक संदेष्टा होऊन गेला त्याला “आशेचा संदेष्टा” म्हणून ओळखले जाते आणि तो संदेष्टा म्हणजे “यशया संदेष्टा”. ज्यावेळेस परमेश्वराने निवडलेले इस्त्राएली लोक असिरियाच्या गुलामगिरीत होते, त्यावेळी त्यांना मारहाण केली जात होती; त्यांच्यावर अन्याय-अत्याचार केले जात होते; त्यांचं जिवण दुःखाने भरलेलं होतं; त्यांना कोणतीही आशा नव्हती. तेव्हा यशया संदेष्टा त्यांच्यापुढे उभा राहतो व म्हणतो. “पहा कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल त्याचे नाव ‘इम्मानुएल’ (आमच्यासन्निध देव) असे ठेवतील” ( यशया ०७:१४).

        यशया संदेष्ट्याने इस्त्राएल लोकांना त्यांच्या दुःखामध्ये त्यांना आशा दिली. पण संदेष्टा तेथेच थांबला नाही तर त्याने त्या मुक्तिदात्या परमेश्वराचा, त्या बाळ येशूचा स्वीकार करण्यासाठी त्या बाळाला आपल्या हृदयामध्ये जन्म देण्यासाठी त्यांची हृदय स्वच्छ करण्यास सांगितले तो म्हणाला, “परमेश्वराचा मार्ग सिद्ध करा, आमच्या देवासाठी रानात सरल राजमार्ग करा. प्रत्येक डोंगर व टेकडी सकल होवो; उच्च सकल असलेले ते सपाट होवो व खडकालीचे मैदान होवो” ( यशया ४०:०३:०४).

        त्या बाळ येशूला आपल्या हृदयामध्ये जन्म देण्यासाठी प्रत्येकाला आपल्या हृदयाची, अंतकरणाची तयारी करायची आहे, कारण तो केव्हा प्रगट होईल हे आपणा कुणालाच ठाऊक नाही; म्हणूनच मलाखी संदेष्टा म्हणतो, “पहा मझपुढे मार्ग तयार करण्यासाठी मी आपला निरोप्या पाठवीतो, ज्या प्रभुला तुम्ही शोधीता तो एकाएकी आपल्या मंदिरात येईल; पहा, करार घेऊन येणाऱ्या निरोप्याची तुम्ही अपेक्षा करीत आहा, तो येत आहे, असे सेनादिश परमेश्वर म्हणतो” ( मलाखी ०३:०१).

        आपण बाळ येशूला आपल्या हृदयामध्ये जन्म देण्यासाठी आपल्या मनाची आपल्या अंतकरणाची तयारी केलेली आहे का? आपण बाळ येशूचे स्वागत करण्यासाठी पात्र आहोत का? जर नसेल तर आपण ह्या दिवसांमध्ये आपल्या पापांवर पश्चाताप करूया; धर्मगुरूकडे जाऊन आपल्या पापांची कबुली देऊया आणि बाळ येशूला जन्म देण्यासाठी आपली अंतःकरणे शुद्ध करूया. कारण संत योहान म्हणतो, “जितक्यानी त्याचा स्वीकार केला तितक्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला.” (योहान ०१:१२). आपण देखील बाळ येशूचा स्वीकार करूया आणि आपणास देखील देवाची मुलं होण्याचा अधिकार मिळावा, म्हणून प्रार्थना करूया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: “हे प्रभू तुझ्या स्वागतासाठी, आमची हृदये तयार कर.”

१. आपले पोप फ्रान्सिससर्व कार्डीनल्सबिशप्सधर्मगुरु आणि सर्व व्रतस्थ ह्यांना प्रभूचा विपुल आशीर्वाद मिळावा व त्यांनी देवाच्या वचनाप्रमाणे जीवन जगून जगाला ख्रिस्ताचा शुभसंदेश द्यावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

२. लवकरच आपण ख्रिस्त जयंती साजरी करणार आहोत. म्हणून आपण सर्वांनी योग्यरित्या मनाची व अंतःकरणाची आध्यात्मिक तयारी करावी आणि ख्रिस्त आपला तारणारा ह्याला आपल्या जीवनात स्वीकारावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

३. ‘पिक भरपूर आहे परंतू कामकरी थोडेच आहेत म्हणून मरीयेचा आदर्श डोळ्यांसमोर ठेऊन अनेक तरुण-तरुणींनी ईश्वराच्या हाकेला प्रतिसाद देऊन प्रभूमळ्यात सेवा करण्यास स्व-ईच्छेने पुढे यावेम्हणून आंपण प्रार्थना करूया.

४. आपला सर्वांचा देवावरील विश्वास अधिकाधिक बळकट व्हावा व आपण सर्वांनी देवाच्या वचनाप्रमाणे जीवन जगून ख्रिस्त आपला तारणारा आहे ह्याची साक्ष आपण इतरांना दयावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

५.  थोडा वेळ शांत राहून आपल्या कौटुंबिक व वैयक्तिक गरजा प्रभूचरणी मांडूया. 





Thursday, 12 December 2024

 Reflection for 3rd Sunday of Advent (08/12/2024) By Fr. Brijal Lopes



आगमन काळातील तिसरा रविवार

दिनांक: १५/१२/२०२४

पहिले वाचन: सफन्या ३:१४-१८

दुसरे वाचन: फिलीपौ. ४:४-७

शुभवर्तमान: लुक ३:१०-१८


प्रस्तावना

        प्रिय बंधू-भगिनींनो, आज आपण आगमन काळातील तिसरा रविवार साजरा करत आहोत. "गौदेटे रविवार" हा आनंदाचा व हर्षाचा दिवस आहे. देवाने आपल्या प्रत्येकावर प्रेम केले आहे. त्याने आपल्या अंतःकरणात शांती, प्रेम, आणि क्षमेचा संदेश दिला आहे. आजचा दिवस “गौदेटे रविवार” (Gaudete Sunday) म्हणून ओळखला जातो. आगमनाच्या पुष्पहारात गुलाबी रंगाची मेणबत्ती आज पेटवितो, येशूच्या आगमनाच्या प्रतीक्षेत आनंद व्यक्त करतो.

        जीवनातील संकटे व समस्यांवर लक्ष केंद्रित करताना आपण खचतो किंवा एकटे पडतो. परंतु, या आनंदाच्या रविवारी, आपण पहिल्या वाचनातील संदेश ऐकतो: “भिऊ नका, परमेश्वर तुमच्यासोबत आहे.” परमेश्वर जेव्हा आपल्या बरोबर असतो, तेव्हा दुःखाच्या क्षणांमध्येही आपल्याला आनंदी व सुखी राहता येते. आजच्या पवित्र मिस्सात आपण प्रार्थना करूया की, ख्रिस्तामध्ये आनंदाने व विश्वासाने जगण्यासाठी परमेश्वराची कृपा आपल्यावर सदैव राहो.

 

मनन चिंतन

        आजच्या वाचनांमधून आपल्याला विविध संदेश मिळतात, जे आपल्याला ख्रिस्ताच्या आगमनासाठी तयार होण्यास प्रेरणा देतात.

        सफन्या संदेष्ट्याच्या पुस्तकातून घेतलेल्या वाचनात आपणास संदेष्टा सफन्या सांगत आहे की , आपण आनंदी व उत्साही असले पाहिजे. कारण, परमेश्वराने आपली शत्रूपासून सुटका केली आहे आणि तारणाचा मार्ग आपल्यासाठी खुला केला आहे.

        दुसऱ्या वाचनात संत पौल आपल्याला सांगतात की, परमेश्वराचे आगमन जवळ आले आहे, म्हणून आपल्या हृदयाची तयारी करा. कुठल्याही गोष्टीची चिंता करू नका, आनंदी व हर्षाने राहा, तुमच्या इच्छा व आकांक्षा प्रभूमध्ये पूर्ण होणार आहेत. संत पौल आपल्याला आनंद व्यक्त करण्याचे महत्त्व सांगतात.

        आजच्या शुभवर्तमानामध्ये संत योहान बाप्तिस्ता सामान्य लोकांना चिंतात्मक संदेश देऊन त्यांना त्यांचे जीवन सुधारण्याचे आवाहन करतात. लोकांनी विचारलेल्या प्रश्नांना ठोस उत्तर देताना योहान बाप्तिस्मा म्हणतात की, ज्यांच्याकडे दोन अंगरखे असतील त्यांनी एक अंगरेख, ज्यांच्याकडे कपडे नाहीत त्यांना दयावा, ख्रिस्ती जीवनाचा आनंद एकमेकांमध्ये वाटून घेण्यात आहे, दैवी आनंद हा देवाच्या इच्छेला पूर्ण मनाने बांधिलकी ठेवण्यात आहे.

        आपल्या कर्तव्यात निष्ठा आणि इतरांसाठी चांगले करणे हे ख्रिस्ती जीवनाचे मूलभूत तत्त्व आहेपश्चात्तापाने आपल्या जीवनात नवी दिशा मिळते. न्याय, सेवा, आणि प्रामाणिक वर्तनाने इतरांसाठी आदर्श निर्माण करणे महत्त्वाचे आहे.

        आजची वाचने आपल्याला पुढील आव्हाने जोपासण्यासाठी बोलावत आहेत: आपले नाते आपण इतरांसोबत कसे ठेवतो, याची तपासणी करणे गरजेचे आहे, प्रामाणिकपणे आपली कामे करून देवाच्या इच्छेनुसार जीवन जगणे आवश्यक आहे आणि आपले आई-वडील, शिक्षक, धर्मगुरू हे सर्व ख्रिस्ताची सुवार्ता आपल्यापर्यंत पोहोचवतात अगदी त्याचप्रमाने जीवन जगून, इतरांना ख्रिस्ताकडे आणण्याचा प्रयत्न करूया. 

        आजची वाचने आपल्याला तारणाचा मार्ग निवडण्यासाठी आमंत्रण देत आहे. जसेकरून, गरिबांना मदत करा, गरजूंना अन्न व वस्त्र द्या, आजाऱ्यांना भेट द्या, प्रेमाचे कार्य करा व देवाच्या कार्यात सक्रिय राहा.  जर आपण या गोष्टी आपल्या जीवनात अमलात आणल्या, तर आपण ख्रिस्ताचे स्वागत करण्यासाठी सज्ज आहोत. देवाचा आनंद अनुभवण्यासाठी आपण प्रार्थना करूया की परमेश्वराची कृपा व सामर्थ्य आपल्यावर सदैव राहो.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: “हे प्रभो आमची प्रार्थना ऐक.”

१.   आपले परमगुरू पोप फ्रान्सिस, सर्व महागुरू, धर्मगुरू, धर्मभगिनी, आणि प्रापंचिकांना परमेश्वराने आशीर्वादित करावे. परमेश्वराचा शब्द त्यांना त्यांच्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पवित्र आत्म्याची साथ मिळावी, अशी प्रार्थना करूया.

२.   जगातील सर्व अनाथ, भुकेले, आणि दारिद्र्यात असलेल्या संकटग्रस्त व्यक्तींना पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आणि कृपेमुळे इतर व्यक्तींनी मदत करावी आणि त्यांचा सांभाळ करावा, यासाठी आपण प्रार्थना करूया. 

३.   गुरुदिक्षाविधीला तयारी करत असलेल्या प्रत्येक उपधर्मगुरू बांधवांसाठी तसेच देवाच्या कार्यासाठी स्वतःला वाहून घेणाऱ्या धर्मभगिनींसाठी परमेश्वराने सहाय्य करावे. पवित्र आत्म्याद्वारे त्यांची पवित्र वाढ व्हावी, अशी प्रार्थना करूया.

४.   लग्न संस्कार स्वीकारणाऱ्या प्रिय भाविकांना परमेश्वराने कृपा व सामर्थ्य द्यावे. एकमेकांना सहकार्य करत पवित्र व नैतिक गुणांची जोपासना करण्यासाठी त्यांना प्रेरणा मिळावी, यासाठी प्रार्थना करूया.

५.   जगातील युद्ध, भांडण, आणि तंटे नष्ट होऊन लोकांनी शांत व आनंदी जीवन जगावे. यासाठी पवित्र आत्म्याची प्रेरणा व कृपा लाभावी, अशी प्रार्थना करूया.

६.    थोडा वेळ शांत राहून, प्रत्येकाने आपल्या वैयक्तिक हेतूसाठी प्रार्थना करूया.




Thursday, 5 December 2024

 Reflection for 2nd Sunday of Advent (08/12/2024) By Fr. Brian Motheghar

आगमन काळातील दुसरा रविवार 

दिनांक: ०८/१२/२०२४.

पहिले वाचन: बारुख ५:१-९.

दुसरे वाचन: फिलीप्पीकरांस पत्र १:४-६, ८-११.

शुभवर्तमान: लूक ३:१-६.




प्रस्तावना

        आज आपण आगमन काळातील दुसरा रविवार साजरा करीत आहोत. आगमन काळ म्हणजे प्रभूच्या येण्याचा काळ. आजची तिन्ही वाचने आपल्याला न्यायाचे पालन करा, धर्माचे आचरण करा, कारण तुमच्या मुक्तीची वेळ जवळ आली आहे हा संदेश देत आहेत.

        बारुख ह्या पुस्तकातून घेतलेल्या पहिल्या वाचनात आपण ऐकतो की, शत्रूने केलेल्या स्वारीमुळे जेरुसलेमचा पाडाव झाल्यामुळे, लोक हवालदिल झाले होते. देव अशा लोकांना संदेष्टा बारुख ह्याच्याद्वारे आशेचा किरण दाखवत आहे, तो त्यांचे सांत्वन करीत आहे. संत पौलाने फिलीप्पीकरांस लिहिलेल्या पत्रातून घेतलेल्या दुसऱ्या वाचनात, संत पौल फिलीप्पीकरांच्या विश्वासाबद्दल, कृतज्ञता व आनंद व्यक्त करत आहे. तर संत लूक लिखित शुभवर्तमानात, योहान बाप्तिस्टा, जे लोक परमेश्वराचा मार्ग तयार करतील ते सर्व देवाने केलेलं तारण पाहतील अशी घोषणा करत आहे.

        परमेश्वराचा स्वीकार करण्यासाठी आपले आचरण बदलावे असा संदेश आजची उपासना आपल्याला देत आहे. ह्या हेतूसाठी लागणारी कृपा आपल्याला लाभावी म्हणून ह्या मिस्साबलीदानात आपण विशेष प्रार्थना करूया.करूया.

मनन चिंतन

        एक क्रिस नावाचा व्यक्ती होता. प्रत्येक वर्षी क्रिस, त्याला मिळवता येईल अशी सर्वात सुंदर आणि मोठ नाताळच झाड शोधायला जात असे. तो झाड घरी आणत असे आणि ते त्याच्या प्रांगणात कसे सजवता येईल ते पाहत असे, कोणत्या कोपऱ्यात ठेवावे, याचे विचार करत असे. प्रत्येक वर्षी, क्रिस झाडाला प्रांगणामधील एका वेगळ्या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न करत असे. हे करण्यासाठी तो तासनतास त्याच्या दोन मुलांसोबत प्रांगणात व्यवस्था करत असत. केवळ त्याच्या सुंदर आणि मोठ्या नाताळ झाडासाठी योग्य ठिकाण तयार करण्यासाठी. पत्नी, जी यापासून कंटाळलेली होती, प्रांगणादारात उभी राहून म्हणाली, “तुम्ही खरंच वेडे आहात.” त्यांच्या मुलांना धक्काच बसला की, ते पहिल्यांदाच त्यांच्या आईने अशा कठोर शब्दांत त्यांच्या वडिलांना संबोधले. ती पुढे म्हणाली, “का तुम्ही फक्त लहान फांदी तोडून घराच्या रिकाम्या कोपऱ्यात ठेऊ नये? क्रिसने ऐकले नाही, तो त्याच्या सुपर साइज नाताळ झाडासह उभा राहिला. त्याने इतर साहित्य हलवण्याचा आग्रह केला, जेणेकरून त्या वर्षी नाताळ झाडासाठी जागा तयार होईल. पत्नी पुन्हा रडत म्हणाली, “तुम्ही खरंच वेडे आणि त्रासदायक आहात. का तुम्ही ते झाड बाहेर ठेवत, जिथून जे आले आहे? ज्याची जागा जिथे आहे? झाडाकडे आणि आपल्या कुटुंबाकडे पाहून क्रिस म्हणाला, "माझ्या मनात असे होते की नाताळ म्हणजे आपल्या आत बदल घडवून आणणे. अर्थातच, काहीतरी सुंदर असावे तर त्यासाठी आतून बदल करणे आणि त्यासाठी जागा तयार करणे आवश्यक आहे."

        प्रिय बंधू आणि भगिनींनो, मला वाटते क्रिस ने जे म्हटले ते अगदी खरं आहे, “माझ्या मनात असे होते की नाताळचा खरा अर्थ म्हणजे आपल्या अंत:करणात बदल घडवून आणणे.” हे नाताळ झाडासाठीच नाही, तर नाताळ संदेशासाठी सुद्धा खरे आहे – “प्रभूचा मार्ग तयार करा, त्याचे रस्ते सरळ करा. प्रत्येक खोली भरून टाका, प्रत्येक पर्वत आणि टेकडी समतल करा...” (यशया ४:४). नाताळ एक सुंदर आणि खूपच अपेक्षित काळ आहे, ज्यासाठी आतून तयारी करणे महत्वाचे आहे. क्रिससारखे, आपल्याला आपल्या हृदयात काही गोष्टी हलवायला हव्यात, आपल्या प्राधान्यांची योग्यरित्या मांडणी केली पाहिजे.

        आपण सर्व आशेवर जगतो. हे जग विश्वासावर जगते. काहीतरी चांगले घडेल, घडले पाहिजे हि आपल्या सर्वाची अपेक्षा असते. आजची तिन्ही वाचने ख्रिस्ताच्या येण्याच्या दिवसाबद्दल आपणास उपदेश करीत आहे. आगमन काळ म्हणजे परमेश्वराचा येण्याचा काळ. जेंव्हा तो येईल, तो दिवस कसा असेल?  ह्या आशयाची वाचने आपण ह्या काळात ऐकतो.

        आजच्या शुभवर्तमानात आपण ऐकतो कि, प्रभू समाजातील सर्व विषमता दूर करणार आहे. ‘त्यादिवशी, प्रत्येक खोरे भरेल, डोंगर व टेकडी सपाट होईल, वाकडी वळणे सरळ होतील; जो मोठा आहे, तो नमविला जाईल व जो छोटा आहे, तो उंचावला जाईल. सर्वजण एक होतील सर्व माणसे देवाने केलेले तारण पाहतील; हे तारणाचे आमंत्रण अखिल मानवजातीसाठी आहे. परंतु त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. आपण परमेश्वराचे राज्य ह्या धरतीवर येण्यासाठी झटले पाहिजे. ‘अरण्यात घोषणा करणाऱ्याची वाणी झाली ती अशी की, “वाटा निट करा.” अशी मोठी जबाबदारी आपणावर आहे.

        आजच्या पहिल्या वाचनात सुद्धा आपण ऐकल्याप्रमाणे, ‘परमेश्वर नेहमी सर्वांवर प्रीती करत असताना गरीबांबरोबर तो ठामपणे उभा राहतो, त्यांचा तो आधार होतो’. धर्म नेहमीच गरिबांना आसरा देतो व आशेचा किरण निर्माण करतो. भारत हि एक महासत्ता होणार आहे अशी स्वप्ने रंगविली जात आहेत. ते स्वप्न साकार होणार असेल तर आनंदच आहे. दुर्दैवाने ते दिवास्वप्नच ठरण्याची मोठी शक्यता आहे. उद्योगपतींचे जीवन सुखकर होईल अशी हमी भारताच्या अर्थमंत्र्यांनी जगाला दिली आहे! गोरगरिबांचे जीवन हालाकीचे करूनच श्रीमंतांचे जीवन सुखी करता येते अशी समजूत आहे.

        परमेश्वराचे राज्य हे सर्वांसाठी आहे व त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. एक दिवस मार्टीन ल्युथर किंग(Jr) रस्त्यावरून जात असताना त्यांनी एक कृष्णवर्णीय व्यक्ती रस्त्यावर पडलेला पाहिला. अपघात झाल्यामुळे रक्तबंबाळ अवस्थेत आपली अखेरची घटका तो मोजत होता. त्यांनी दवाखाण्यात फोन केला. काही क्षणातच रुग्णवाहिका आली व रुग्णवाहिकेतील व्यक्तींनी त्या दु:खात विव्हळत पडलेल्या कृष्णवर्णीय व्यक्तीस पाहिले तरीही त्याक्षणी त्यांनी तेथून निर्गमन केले. हा धक्कादायक अनुभव पाहून मार्टीन ल्युथर किंग ह्यांना फार वाईट वाटले. आपण सर्व एका परमेश्वराची लेकरे असताना असा भेदभाव का? मार्टीन ल्युथर किंग ह्यांनी एक स्वप्न पहिले व त्यासाठी ते जगले. ‘I Have a Dream’. त्यांच्या भाषणात त्यांनी परमेश्वराचा दिवस येण्याचे स्वप्न पाहिले. माणसाच्या शरीराचा रंग न पाहता माणसातील देव पाहण्यासाठी त्यांनी आव्हान केले. एक दिवस सर्व काही ठीक होईल अशी आशा त्यांनी बाळगली व त्यासाठी लढत असताना, त्यांनी आपला प्राण गमावला. परंतु त्यांचे स्वप्न सत्यात उतरले. आज कृष्णवर्णीय असलेले बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होऊन गेले व लॅटिन अमेरिकेत सर्वांना समान अधिकार मिळाले. विश्वाच्या समाप्तीच्या वेळी इडा-पिडा टळेल आणि देवाचे राज्य साकार होईल. मग सर्व संघर्ष, वैमनस्य, शत्रुत्व विलयास जाईल. असा आशावाद पवित्र बायबल मध्ये व्यक्त केलेला आहे. भावी सुखी-काळाचे वर्णन करताना, संदेष्टा यशया म्हणतो, ‘तेव्हा लांडगा आणि कोंकरू, चित्ता आणि करडू एकत्र बागडतील, तान्हे बाळ नागाच्या बिळात हात घालतील, अर्भक सापाच्या बुबुळावरून हात फिरवतील, कुणी कुणाला उपद्रव देणार नाही, त्रास देणार नाही वैराचा मागमूस उरणार नाही’ (यशया ११:६-८).

        मानवी जीवन सुखकर होण्यासाठी समाजात शांतीचे वातावरण असणे अनिवार्य आहे. शस्त्राच्या धाकामुळे कायमस्वरूपी शांती निर्माण होणे अशक्यप्राय बाब आहे. आज जगात शस्त्र स्पर्धा चालू आहे. शस्त्रास्त्र निर्मितीवर होणारा खर्च शेतीकडे वळविला, तर जगातील सर्व लोकांना पुरेसे अन्न मिळेल. कुणीही उपाशीपोटी जाणार नाही. सर्वच राष्ट्रांनी तलवारी मोडून त्यांचे नांगराचे फाळ बनविले तर शांतीचे स्वप्न साकार होऊ शकेल.

        जगातील सारेच धर्म शांतीच्या मंत्राचा घोष करतात. ह्या धरतीवर शांतीचे राज्य अवतरावे अशी सर्व धर्मांची प्रार्थना आहे. धर्माची नाळ सामाजिक, राजकीय आणि आर्थिक न्यायाबरोबर जोडली गेली नाही, तर ‘धर्माचे रुपांतर’ ‘अफूच्या गोळीत’ होण्यास वेळ लागत नाही. उच्चनिय भाव, वंश आणि वर्णश्रेष्ठता, स्री-पुरुष भेदभाव, जातीभेद, आर्थिक विषमता ह्यांचे समूळ निर्मुलन झाल्याशिवाय शांतीची पहाट होऊ शकत नाही. शांतीसाठी समता अनिवार्य आहे.

        न्यायाशिवाय शांती नाही आणि शांतीशिवाय समृद्धी नाही. मोक्ष, मुक्ती किंवा निर्वाणपण साधायचे असेल तर न्याय व शांतीसाठी झटणे आवश्यक आहे. परमेश्वराचे राज्य या धरतीवर यावे म्हणून आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. म्हणून हवी असणारी कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.


विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: हे प्रभो आमची प्रार्थना ऐक.

१. आपले परमगुरु, महागुरू, धर्मगुरू व व्रतस्थ ह्यांनी त्यांचे मिशनकार्य चालू असताना सामाजिक व आर्थिक पातळीवर आधारित, श्रद्धावंतांमध्ये भेदभाव न करता सर्वांना एकत्र करून त्यांची आध्यात्मिक काळजी घ्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

२. आज मोठया संख्येने लोक आपल्या मायभूमीतून स्थलांतर करीत आहेत, अनेक अडचणींना व संकटांना तोंड देत आहेत, ते हालाकीचे जीवन जगत आहेत. त्यांनी नेहमी त्यांच्या प्रियजनांच्या संपर्कात असावे व जेथे ते स्थायिक होतात, तेथे त्यांना सुरक्षित वाटावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

३. जे शेतकरी पिके घेण्यासाठी सर्व गोष्टींची गुंतवणूक करतात व अचानकपणे उदभवलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे अपयशी ठरतात, अशा शेतकऱ्यांनी आत्महत्येस बळी पडू नये, ह्यासाठी त्यांना सर्वोपरीने मदत मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

४. जिवंत व मेलेल्यांचा न्याय करण्याकरिता अचानकपणे येणाऱ्या स्वर्गीय न्यायकर्त्या प्रभूसाठी आपण सदैव जागृत असावे म्हणून प्रार्थना करूया.

५. जे लोक येशूला त्यांचा तारणारा आणि राजा म्हणून स्वीकारीत नाहीत, अशांनी त्याचे व त्याच्या राज्याचे आपल्या जीवनात स्वागत करावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.