Wednesday, 18 December 2024

Reflection for 4th Sunday of Advent (22/12/2024) By Fr. Pravin Bandya


आगमन काळातील चौथा रविवार

दिनांक: २२/१२/२०२४.

पहिले वाचन: मीखा ०५: ०२ ते ०५अ

दुसरे वाचन: ईब्री लोकांस पत्र १०:०५ ते १०

शुभवर्तमान: लूक ०१:३९ ते ४५

प्रस्तावना

“स्त्रियांमध्ये तू धन्य व तुझ्या पोटचे फळ धन्य”

        आज आपण आगमन काळातील चौथा रविवार साजरा करीत आहोत. आजच्या पहिल्या वाचनामध्ये आपण पाहतो कि मिखा संदेष्ट्याद्वारे परमेश्वर म्हणतो, “हे बेथलेहेम एफ्राथा, यहूदाच्या हजारात तुझी गणना अल्प आहे, कारण तुजमधून एकजण निघेल, तो मजसाठी इस्राएलचा राजा होईल; तो पुरुष आम्हास मूर्तिमंत शांती होईल.” तर दुसऱ्या वाचनामध्ये आपण पाहतो की सुरुवातीच्या काळामध्ये पापक्षमेसाठी कोकराचा बळी दिली जात असे, पण परमेश्वर त्या होमांनी व पापाबद्दल होणाऱ्या अर्पणानी आनंदित नव्हता. म्हणून परमेश्वराने आपला एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ह्याला जगामध्ये पाठवले. तो शरीर धारण करून या जगात आला, त्याने मानव जातीच्या पापांसाठी दुःख सहन केले, आपल्या शरीरावर घाव घेतले, रक्त वाहिले आणि आपलं स्वतःचं बलिदान कालवरी पर्वतावरील क्रुसावर दिले आणि एकदाच झालेल्या देहार्पणाद्वारे सर्व मानवाला पवित्र केले.

        तसेच आजच्या शुभवर्तमानामध्ये पवित्र मरिया डोगराळ प्रदेशात जाते व तिची मावस बहिण एलिझाबेथला भेटते. आणि एलिझाबेथ पवित्र मरियेला पाहते तेव्हा तिला मरीयेच्या उदरामध्ये तारणाऱ्याचे दर्शन घडते. म्हणून ती उंच स्वर काढून मोठ्याने म्हणते, “स्त्रियांमध्ये तू धन्य व तुझ्या पोटचे फळ धन्य; माझ्या प्रभूच्या मातेने माझ्याकडे यावे हा मान मला कुठून?”

        काही दिवसांमध्ये आपण ख्रिस्त जयंती साजरा करणार आहोत. आपण बाळ येशूच्या दर्शनासाठी आणि त्याला आपल्या हृदयामध्ये जन्म देण्यास उत्सुक झाले आहोत. बाळयेशू पुन्हा एकदा आपल्या हृदयामध्ये जन्म घेणार आहे. त्याचा स्वीकार करण्यास आपण पात्र व्हावे म्हणून प्रार्थना करूया.

मनन चिंतन

        अगदी थोड्याच दिवसात आपण नाताळचा सण साजरा करणार आहोत. जशी हरीण पाण्यासाठी तळमळत असते, जसा भुकेला मानव अन्नासाठी तळमळत असतो, जसा मानव तहान लागल्यावर पाण्यासाठी तळमळत असतो आणि गर्भवती स्त्री जशी आपल्या बाळाच्या दर्शनासाठी आस्तुतलेली असते. तशाच प्रकारे आपण प्रत्येक जण त्या बाळयेशूच्या दर्शनासाठी आणि त्याला आपल्या हृदयामध्ये जन्म देण्यासाठी आस्तुतलेले आहोत. कारण तोच आपला मुक्तिदाता परमेश्वर आहे. आपल्याला ठाऊक आहे कि, प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या ७०० वर्षापूर्वी एक संदेष्टा होऊन गेला त्याला “आशेचा संदेष्टा” म्हणून ओळखले जाते आणि तो संदेष्टा म्हणजे “यशया संदेष्टा”. ज्यावेळेस परमेश्वराने निवडलेले इस्त्राएली लोक असिरियाच्या गुलामगिरीत होते, त्यावेळी त्यांना मारहाण केली जात होती; त्यांच्यावर अन्याय-अत्याचार केले जात होते; त्यांचं जिवण दुःखाने भरलेलं होतं; त्यांना कोणतीही आशा नव्हती. तेव्हा यशया संदेष्टा त्यांच्यापुढे उभा राहतो व म्हणतो. “पहा कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल त्याचे नाव ‘इम्मानुएल’ (आमच्यासन्निध देव) असे ठेवतील” ( यशया ०७:१४).

        यशया संदेष्ट्याने इस्त्राएल लोकांना त्यांच्या दुःखामध्ये त्यांना आशा दिली. पण संदेष्टा तेथेच थांबला नाही तर त्याने त्या मुक्तिदात्या परमेश्वराचा, त्या बाळ येशूचा स्वीकार करण्यासाठी त्या बाळाला आपल्या हृदयामध्ये जन्म देण्यासाठी त्यांची हृदय स्वच्छ करण्यास सांगितले तो म्हणाला, “परमेश्वराचा मार्ग सिद्ध करा, आमच्या देवासाठी रानात सरल राजमार्ग करा. प्रत्येक डोंगर व टेकडी सकल होवो; उच्च सकल असलेले ते सपाट होवो व खडकालीचे मैदान होवो” ( यशया ४०:०३:०४).

        त्या बाळ येशूला आपल्या हृदयामध्ये जन्म देण्यासाठी प्रत्येकाला आपल्या हृदयाची, अंतकरणाची तयारी करायची आहे, कारण तो केव्हा प्रगट होईल हे आपणा कुणालाच ठाऊक नाही; म्हणूनच मलाखी संदेष्टा म्हणतो, “पहा मझपुढे मार्ग तयार करण्यासाठी मी आपला निरोप्या पाठवीतो, ज्या प्रभुला तुम्ही शोधीता तो एकाएकी आपल्या मंदिरात येईल; पहा, करार घेऊन येणाऱ्या निरोप्याची तुम्ही अपेक्षा करीत आहा, तो येत आहे, असे सेनादिश परमेश्वर म्हणतो” ( मलाखी ०३:०१).

        आपण बाळ येशूला आपल्या हृदयामध्ये जन्म देण्यासाठी आपल्या मनाची आपल्या अंतकरणाची तयारी केलेली आहे का? आपण बाळ येशूचे स्वागत करण्यासाठी पात्र आहोत का? जर नसेल तर आपण ह्या दिवसांमध्ये आपल्या पापांवर पश्चाताप करूया; धर्मगुरूकडे जाऊन आपल्या पापांची कबुली देऊया आणि बाळ येशूला जन्म देण्यासाठी आपली अंतःकरणे शुद्ध करूया. कारण संत योहान म्हणतो, “जितक्यानी त्याचा स्वीकार केला तितक्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला.” (योहान ०१:१२). आपण देखील बाळ येशूचा स्वीकार करूया आणि आपणास देखील देवाची मुलं होण्याचा अधिकार मिळावा, म्हणून प्रार्थना करूया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: “हे प्रभू तुझ्या स्वागतासाठी, आमची हृदये तयार कर.”

१. आपले पोप फ्रान्सिससर्व कार्डीनल्सबिशप्सधर्मगुरु आणि सर्व व्रतस्थ ह्यांना प्रभूचा विपुल आशीर्वाद मिळावा व त्यांनी देवाच्या वचनाप्रमाणे जीवन जगून जगाला ख्रिस्ताचा शुभसंदेश द्यावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

२. लवकरच आपण ख्रिस्त जयंती साजरी करणार आहोत. म्हणून आपण सर्वांनी योग्यरित्या मनाची व अंतःकरणाची आध्यात्मिक तयारी करावी आणि ख्रिस्त आपला तारणारा ह्याला आपल्या जीवनात स्वीकारावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

३. ‘पिक भरपूर आहे परंतू कामकरी थोडेच आहेत म्हणून मरीयेचा आदर्श डोळ्यांसमोर ठेऊन अनेक तरुण-तरुणींनी ईश्वराच्या हाकेला प्रतिसाद देऊन प्रभूमळ्यात सेवा करण्यास स्व-ईच्छेने पुढे यावेम्हणून आंपण प्रार्थना करूया.

४. आपला सर्वांचा देवावरील विश्वास अधिकाधिक बळकट व्हावा व आपण सर्वांनी देवाच्या वचनाप्रमाणे जीवन जगून ख्रिस्त आपला तारणारा आहे ह्याची साक्ष आपण इतरांना दयावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

५.  थोडा वेळ शांत राहून आपल्या कौटुंबिक व वैयक्तिक गरजा प्रभूचरणी मांडूया. 





No comments:

Post a Comment