Reflection for 3rd Sunday of Advent (08/12/2024) By Fr. Brijal Lopes
आगमन काळातील तिसरा रविवार
दिनांक: १५/१२/२०२४
पहिले वाचन: सफन्या ३:१४-१८
दुसरे वाचन: फिलीपौ. ४:४-७
शुभवर्तमान: लुक ३:१०-१८
प्रस्तावना
प्रिय बंधू-भगिनींनो, आज आपण आगमन काळातील तिसरा रविवार साजरा करत आहोत.
"गौदेटे रविवार" हा आनंदाचा व हर्षाचा दिवस आहे. देवाने आपल्या
प्रत्येकावर प्रेम केले आहे. त्याने आपल्या अंतःकरणात शांती, प्रेम, आणि क्षमेचा संदेश दिला आहे. आजचा दिवस “गौदेटे
रविवार” (Gaudete Sunday) म्हणून
ओळखला जातो. आगमनाच्या पुष्पहारात गुलाबी रंगाची मेणबत्ती आज पेटवितो, येशूच्या आगमनाच्या प्रतीक्षेत आनंद व्यक्त करतो.
जीवनातील
संकटे व समस्यांवर लक्ष केंद्रित करताना आपण खचतो किंवा एकटे पडतो. परंतु, या आनंदाच्या रविवारी, आपण पहिल्या वाचनातील संदेश ऐकतो: “भिऊ नका, परमेश्वर तुमच्यासोबत आहे.” परमेश्वर जेव्हा आपल्या
बरोबर असतो, तेव्हा दुःखाच्या क्षणांमध्येही आपल्याला
आनंदी व सुखी राहता येते. आजच्या पवित्र मिस्सात आपण प्रार्थना करूया की, ख्रिस्तामध्ये आनंदाने व विश्वासाने जगण्यासाठी
परमेश्वराची कृपा आपल्यावर सदैव राहो.
मनन चिंतन
आजच्या
वाचनांमधून आपल्याला विविध संदेश मिळतात, जे आपल्याला ख्रिस्ताच्या आगमनासाठी तयार होण्यास प्रेरणा
देतात.
सफन्या
संदेष्ट्याच्या पुस्तकातून घेतलेल्या वाचनात आपणास संदेष्टा सफन्या सांगत आहे की , आपण आनंदी व उत्साही असले पाहिजे. कारण, परमेश्वराने आपली शत्रूपासून सुटका केली आहे आणि
तारणाचा मार्ग आपल्यासाठी खुला केला आहे.
दुसऱ्या
वाचनात संत पौल आपल्याला सांगतात की, परमेश्वराचे आगमन जवळ आले आहे, म्हणून आपल्या हृदयाची तयारी करा. कुठल्याही गोष्टीची
चिंता करू नका, आनंदी व हर्षाने राहा, तुमच्या इच्छा व आकांक्षा प्रभूमध्ये पूर्ण होणार
आहेत. संत पौल आपल्याला आनंद व्यक्त करण्याचे महत्त्व सांगतात.
आजच्या
शुभवर्तमानामध्ये संत योहान बाप्तिस्ता सामान्य लोकांना चिंतात्मक संदेश देऊन
त्यांना त्यांचे जीवन सुधारण्याचे आवाहन करतात. लोकांनी विचारलेल्या प्रश्नांना
ठोस उत्तर देताना योहान बाप्तिस्मा म्हणतात की, ज्यांच्याकडे दोन अंगरखे असतील त्यांनी एक अंगरेख, ज्यांच्याकडे कपडे नाहीत त्यांना दयावा, ख्रिस्ती जीवनाचा आनंद एकमेकांमध्ये वाटून घेण्यात
आहे, दैवी आनंद हा देवाच्या इच्छेला पूर्ण
मनाने बांधिलकी ठेवण्यात आहे.
आपल्या
कर्तव्यात निष्ठा आणि इतरांसाठी चांगले करणे हे ख्रिस्ती जीवनाचे मूलभूत तत्त्व
आहे, पश्चात्तापाने आपल्या जीवनात नवी दिशा मिळते. न्याय, सेवा, आणि प्रामाणिक वर्तनाने इतरांसाठी आदर्श निर्माण करणे
महत्त्वाचे आहे.
आजची
वाचने आपल्याला पुढील आव्हाने जोपासण्यासाठी बोलावत आहेत: आपले नाते आपण इतरांसोबत
कसे ठेवतो, याची तपासणी करणे गरजेचे आहे, प्रामाणिकपणे आपली कामे करून देवाच्या इच्छेनुसार
जीवन जगणे आवश्यक आहे आणि आपले आई-वडील, शिक्षक, धर्मगुरू हे सर्व ख्रिस्ताची सुवार्ता आपल्यापर्यंत
पोहोचवतात अगदी त्याचप्रमाने जीवन जगून, इतरांना ख्रिस्ताकडे आणण्याचा प्रयत्न करूया.
आजची
वाचने आपल्याला तारणाचा मार्ग निवडण्यासाठी आमंत्रण देत आहे. जसेकरून, गरिबांना मदत करा, गरजूंना अन्न व वस्त्र द्या, आजाऱ्यांना भेट द्या, प्रेमाचे कार्य करा व देवाच्या कार्यात सक्रिय
राहा. जर आपण या गोष्टी आपल्या जीवनात
अमलात आणल्या, तर आपण ख्रिस्ताचे स्वागत करण्यासाठी
सज्ज आहोत. देवाचा आनंद अनुभवण्यासाठी आपण प्रार्थना करूया की परमेश्वराची कृपा व
सामर्थ्य आपल्यावर सदैव राहो.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद: “हे प्रभो आमची प्रार्थना
ऐक.”
१.
आपले परमगुरू पोप फ्रान्सिस, सर्व महागुरू, धर्मगुरू, धर्मभगिनी, आणि प्रापंचिकांना परमेश्वराने आशीर्वादित करावे. परमेश्वराचा शब्द त्यांना
त्यांच्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पवित्र आत्म्याची साथ मिळावी, अशी प्रार्थना करूया.
२.
जगातील सर्व अनाथ, भुकेले, आणि
दारिद्र्यात असलेल्या संकटग्रस्त व्यक्तींना पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आणि
कृपेमुळे इतर व्यक्तींनी मदत करावी आणि त्यांचा सांभाळ करावा, यासाठी आपण प्रार्थना करूया.
३.
गुरुदिक्षाविधीला तयारी करत असलेल्या प्रत्येक उपधर्मगुरू बांधवांसाठी तसेच
देवाच्या कार्यासाठी स्वतःला वाहून घेणाऱ्या धर्मभगिनींसाठी परमेश्वराने सहाय्य
करावे. पवित्र आत्म्याद्वारे त्यांची पवित्र वाढ व्हावी, अशी प्रार्थना करूया.
४.
लग्न संस्कार स्वीकारणाऱ्या प्रिय भाविकांना परमेश्वराने कृपा व सामर्थ्य द्यावे.
एकमेकांना सहकार्य करत पवित्र व नैतिक गुणांची जोपासना करण्यासाठी त्यांना प्रेरणा
मिळावी, यासाठी प्रार्थना करूया.
५.
जगातील युद्ध, भांडण, आणि
तंटे नष्ट होऊन लोकांनी शांत व आनंदी जीवन जगावे. यासाठी पवित्र आत्म्याची प्रेरणा
व कृपा लाभावी, अशी
प्रार्थना करूया.
६.
थोडा वेळ शांत राहून, प्रत्येकाने आपल्या वैयक्तिक हेतूसाठी प्रार्थना
करूया.
No comments:
Post a Comment