Friday 24 February 2023

 



Reflections for the homily of the First Sunday in The Season of Lent (26/02/2023) by Br. Justin Dhavade.



प्रायश्चित काळातील पहिला रविवार

दिनांक: २६/०२/२०२३

पहिले वाचन: उत्पती २:७-९; ३:१-७

दुसरे वाचन: रोमकरांस पत्र: ५:१२-१९

शुभवर्तमान: मत्तय ४:१-११


“तुझे वचन माझ्या पावलांकरिता दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे” (स्तोत्र ११९:१०५).



प्रस्तावना:

प्रायश्चित काळ हा देवाजवळ येण्याचा काळ आहे. तसेच हा काळ आपल्याला पापापासून परावृत्त करून देवाकडे वळवण्याचा मंत्र देतो. संत पौल फी ६:१० मध्ये म्हणतो, प्रभुमध्ये व त्याच्या सामर्थ्यामध्ये बलवंत होत जा. सैतानाच्या डावपेचा तुम्हाला टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्र सामग्री धारण करा. आजच्या युगात जगताना सैतान त्याच्या शब्दांद्वारे व विचाराने आम्हाला आमिष दाखवून मोहाला बळी पाडतो. पण जर आपल्या जवळ देवाच्या वचनाची शस्त्रसामग्री धारण केलेली असेल तर सैतानाचा प्रतिकार करण्यास आपणाला सामर्थ्य मिळते. देवाचें वचन पाळणारा मनुष्य कधीच विनाशाकडे जात नाही; तर त्याचे तारण होते व त्याला सर्वकालिक जीवनाचा आनंद मिळतो. परंतु देवाच्या वचनांनी आपण सक्षम नसू तर आपण देखील पदासाठी, पैशांसाठी, संपत्तीसाठी किंवा नावासाठी देवाला धिक्कारून सैतानाच्या अधीन होऊ शकतो. त्याच्या मोबदल्यात आपल्याला अशांती, असमाधान व दुख अशा प्रकारच्या नकारात्मक प्रसंगांना बळी पडावे लागते. म्हणून देवाची वचने आम्हामध्ये व आम्ही देवाबरोबर रहावे.

मनन चिंतन:

ख्रिस्ताठायी जमलेल्या माझ्या प्रिय बंधुंनो आणि भगिनींनो, आज आपण प्रायश्चित काळातील पहिला रविवार साजरा करीत आहोत आणि आजची उपासना आपणास, ‘देव शब्दाचे महत्व व त्याद्वारे होणारे फायदे व लाभ ह्याविषयी सांगत आहे.

      आपण आपल्या दैनंदिन जीवनात देवाचा शब्द ऐकतो; मग तो बायबल वाचून किंवा पवित्र मिस्साच्या वेळेला किंवा सोशल मीडिया म्हणजे व्हॉट्सअप द्वारे असो. अशा अनेक माध्यमातून आज आपणास ईश्वरी शब्द उपलब्ध आहे. परंतु आपण ते वचन आपल्या हृदयात आत्मसात करतो का? किंवा त्याचे पालन करतो का?

      आजचे शुभवर्तमान आपण अनेक वेळा ऐकलं असेल किंवा वाचले असेल. आपण पाहतो कि, प्रभू येशूला तीन प्रकारे मोह झाले. पहिला मोह म्हणजे शारीरिक मोह. दुसरे म्हणजे सत्ता-संपत्तीचे मोह व तिसरे मोह म्हणजे वैभव आणि गौरव. आणि हेच आपण दरवर्षी आजच्या पहिल्या रविवारी आपण ऐकतो. आणि हे सर्व मोह आपल्याही दैनंदिन जीवनात आपण अनुभवत असतो. परंतु ह्या मोहांचा सामना कसा करावा? त्यावर विजय कसा मिळवावा? हे आपणा कित्येकांना कदाचित ठाऊक नसेल. आज ह्या प्रवचनाद्वारे मी तुम्हांला सध्या शब्दांत सांगणार आहे.

      ह्या मोहांवर विजय मिळविण्यासाठी एकमेव मार्ग आहे आणि तो म्हणजे ‘प्रभू शब्द’. होय ख्रिस्ताठायी जमलेल्या माझ्या प्रिय बंधुंनो आणि भगिनींनो, जर आपण प्रभू शब्दाला महत्व दिले, त्याचे पालन करून आचरणात आणले तर आपण कोणत्याही मोहाला बळी पडणार नाही.  

      आजच्या पहिल्या वाचनात आपण वाचतो कि, परमेश्वराने आदाम व एवेला निर्माण केले; ज्यांना आपण पहिले आई-वडील म्हणतो. त्यांना परमेश्वराने एदेन बागेत ठेवेले व सर्व चराचारावर अधिकार दिला. परंतु बागेच्या मध्यभागी असलेले फळ खाण्यास त्यांना मनाई केली. नंतर आपण वाचतो कि, सैतान सापाच्या रुपात येऊन त्यांना मोहात पाडले व म्हटले कि, जर तुम्ही ह्या झाडाचे फळ खाल्ले तर तुम्ही देवासारखे व्हाल.

      माझ्या प्रिय बंधुनो आणि भगिनींनो, हे होते वैभव आणि गौरवाचे मोह. त्यांना देवासारखे बनायचे होते म्हणून सैतानाने सांगितल्या प्रमाणे त्यांनी फळा खाल्ले व मोहाला बळी पडले. कारण त्यांनी तेथे प्रभू शब्दाचा वापर केला नाही. कदाचित तुमच्या मनात शंका किंवा प्रश्न निर्माण झाले असतील.कि, त्यावेळेला बायबल किंवा देव शब्द नव्हते परंतु माझ्या प्रिय बंधुंनो आणि भगिनींनो परमेश्वराने स्वतः त्यांना सांगितले होते जे आपण उत्पत्तीच्या पुस्तकात अध्याय २:१७ मध्ये वाचतो कि, परमेश्वराने त्यांना म्हटले बागेतील पाहिजे त्या झाडाचे फळ तुम्ही खा, परंतु बागेच्या मध्यभागी असलेल्या म्हणजे बऱ्या-वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ मात्र तुम्ही खाऊ नका. आणि जेव्हा सैतान त्यांना मोह घालण्यास आला तेव्हा जर त्यांनी देवाचा शब्द किंवा त्याची आज्ञा पाळली असती तर ते मोहाला बळी पडले नसते.  

      तसेच आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल आपणास सांगतो कि, एका माणसाच्या द्वारे जगात पाप शिरले आणि पपाच्या द्वारे मरण शिरले; आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशाप्रकारे मरण शिरले.

      परंतु आजच्या शुभवर्तमानात आपण वाचतो कि, कशाप्रकारे प्रभू येशू ईश्वरी शब्दाद्वारे सैतानाच्या तिन्ही मोहांवर मात करतो किंवा विजय मिळवतो.

      जेव्हा सैतान येशूची परीक्षा पाहतो, त्याला मोहात पाडतो कि, जर तू खरोखर देवाचा पुत्र असशील तर ह्या दगडाच्या भाकरी कर. तेव्हा येशू अनुवाद ह्या पुस्तकातील ८: ३ मधील देव शब्दाचा वापर करून सैतानाला म्हणतो कि, “मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल”.

      पुढे आपण वाचतो कि सैतान ही येशूची परीक्षा पाहण्या करिता स्तोत्रसंहिता ८:३ मधील वचनाचा आधार घेऊन येशूला दुसऱ्यांदा मोहात पडण्याचा प्रयत्न करतो कि, तू देवाचा पुत्र असशील तर उंचा वरून खाली उडी टाक, म्हणजे देव त्याच्या दूतांना आज्ञा करील व ते येऊन तुझा हातांवर झेलून धरतील व तुझा पाय धोंड्यावर आपटू देणार नाहीत. तेव्हा येशू त्याला प्रतिउत्तर म्हणून पुन्हा अनुवाद पुस्तकातील ६:१६ मधील ईश्वरी शब्द वापरतो कि, “परमेश्वर जो तुझा देव ह्याची परीक्षा पाहू नकोस”.

      इतपर्यंत सैतान थांबत नाही, तर तिसऱ्यांदा येशूला मोहात पाडण्यासाठी सैतान जगातील सर्व वैभव आणि गौरव त्याला दाखवतो व म्हणतो कि, जर तू मला नमन करशील तर हे सर्व तुझे होणार. तेव्हा पुन्हा येशू अनुवाद पुस्तकातील ६:१३ ह्या वचनाचा वापर करून सैतानाला तेथून चालते करतो कि, “अरे, सैताना चालता हो कारण परमेश्वर तुझा देव ह्याला नमन कर व केवळ त्याचीच उपासना करा. आणि आपण पाहतो कि सैतान तेथून निघून जातो कारण त्याला ठाऊक होते कि आपल्याने काही होणार नाही कारण येशूकडे देव शब्द आहे. किंबहुना तोच ईश्वरी शब्द आहे. जर आपल्यामध्ये देव शब्द असेल; जर आपण देव शब्दाचे पालन करत असेल तर आपण जगातील कोणत्याही मोहावर मात करू शकतो; विजय मिळवू शकतो.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: “हे प्रभू आम्हाला तुझ्याशी एकनिष्ठ ठेव.”

१. ख्रिस्ताची शिकवण जगाला देऊन त्याद्वारे जगाला ख्रिस्ताशी एकनिष्ठ करण्यास आपले पोप महाशय, सर्व धर्मगुरू, धर्म भगिनी व प्रापंचिक सतत प्रयत्न करत असतात. हे कार्य चालू ठेवण्यास त्यांना चांगले आरोग्य व योग्य ती कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

२. आज आपल्या देशात धर्माच्या नावाने कल्लोळ माजला आहे. सत्तेच्या नावाने हुकूमशाहीला जन्म घालण्याचा प्रयत्न चालू आहे. अशा ह्या घटनांना काढून लावून, समता व बंधुता या मूल्यांना प्राधान्य दिले जावे व त्याद्वारे देशाची सामाजिक,  शैक्षणिक व आर्थिक पातळीवर प्रगती व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

३. उपवास काळ हा परमेश्वराचे प्रेम सर्व गोष्टीहून महान आहे हे ओळखण्याचा काळ. ह्या काळात आपण पापा पासून दूर रहावे व देवाजवळ यावे हयासाठी लागणारी कृपा आपणास मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

४. जे तरुण-तरुणी देवापासून दूर गेलेले आहेत, त्यांना प्रभू प्रेमाचा स्पर्श होऊन येशू ख्रिस्त हाच खरा मार्ग, प्रकाश, व जीवन आहे हे सत्य त्यांनीस्वीकारावे म्हणून आपण प्रार्थना करू या.

५. थोडावेळ शांत राहून आपल्या सामाजिककौटुंबिकव वैयक्तिक गरजांसाठी प्रार्थना करू या.

Wednesday 15 February 2023

 




Reflections for the homily of the Seventh Sunday In Ordinary Time (19/02/2023) by Br. Reon Andrades.



सामान्य काळातील सातवा रविवार

पहिले वाचन: लेवीय १९: १-२,१७-१८

दुसरे वाचन: १ करिंथकरांस ३: १६-२३

शुभवर्तमान: मत्तय: ५: ३८- ४८


विषय: “तुम्ही पवित्र असा, कारण मी प्रभू तुमचा देव पवित्र आहे.” (लेवी १९:२)


प्रस्तावना:

आजची उपासना आपणास एक पावित्र्यमय जीवन जगण्याचा उपदेश करत आहे. जागतिक जीवन जगत अस्ताना आपण अनेक मोहांना, आव्हानांना सामोरे जात असतो व आपल्या जीवनातील पावित्र्य हरवून बसतो. आजची उपासना आपणास पावित्र्याचे, प्रेमाचे व ख्रिस्ताला अनुरूप असे जीवन जगण्यास पाचारण करत आहे. आजच्या पहिल्या वाचनात परमेश्वर इस्राएली लोकांना त्यांचें पावित्र्य जपण्यास सांगत आहे. तसेच दुसऱ्या वाचनात संत पौल आपल्याला स्वतःचे पावित्र्य जपण्यास सांगत आहे. आपले शरीर देवाचे मंदिर आहे व त्या मंदिराचे पावित्र्य आपणास जपले पाहिजे. शुभवर्तमानात प्रभू येशू आपणास दानशूर बनण्यास तसेच वैर्यांवर प्रेम करण्याचा उपदेश आपल्या समोर मांडत आहे.


मनन चिंतन:

सामान्य काळातील सातव्या रविवारी देवमाता आज आपल्या समोर प्रत्येकाच्या जीवना अनुरूप/सलग असलेला ठळक मुद्दा आपल्यापुढे सादर करत आहे. आजच्या युगात पावित्र्याचे जीवन जगणे म्हणजे एक मोठे आव्हान आहे. पहायला गेलं तर सर्वात जास्त घटस्फोटाचे कारण म्हणजे अनैतिक नातेसंबंध होय. आज तरुण तरुणी, वैवाहिक लोक, जेष्ठ नागरीक ह्या मोहाला बळी पडत आहेत. इतकेच नव्हे तर देऊळमातेला सलग असलेले अनेक धर्मगुरू व धर्मभगिनी सुद्धा या मोहाच्या जाळयात गुरफटलेले आहेत. आदल्या काळात धर्मगुरू म्हणजे सगळ्यांसाठी सगळेच होय कारण तेव्हा लोक अशिक्षित होते म्हणून हे सर्व गुण एका धर्मगुरूमध्ये असणे गरजेचे होते. धर्मगुरु एक आध्यात्मिक गुरु, एक शिक्षक एक चिकित्सक इत्यादि इत्यादि होय.  परंतु आज लोकं शिक्षित आहेत त्यांचा सांभाळ ते स्वतः करू शकता. त्यांना आज धर्मागुरुंमध्ये फक्त एकच गुण पाहावयाचा आहे तो म्हणजे पवित्रमय जीवन जगणारा व्यक्ती जो ध्याद्त्माने परिपूर्ण आहे. अनेकांना हे पावित्र्यमय जीवन जगणे एक मोठे आव्हान आहे. आज वैवाहिक जीवन जगणारेसुद्धा एकाच व्यक्तीशी एकनिष्ठ रहाण्यास कुठेतरी कमी पडत आहेत. संगणक, प्रसारमाध्यम व ब्रम्हणध्वनी (mobile) या सर्व गोष्टी एक अपवित्र जीवनाचे वाहक आहेत.

आजचे पहिले वाचन आपणास बजावून सांगत आहे की जसा तुमचा देव पवित्र आहे तसे तुम्हिही पवित्र बना. ह्यास्तव आपण आपल्या शरीराची काळजी घ्यायला हवी व त्याचे पावित्र्य राखायला हवे. दुसऱ्या वाचनात संत पौल बोध करून सांगतो की तुमचे शरीर हे एक देवाचे मंदिर आहे, जर कोण या देवाच्या मंदिराला अपवित्र करील त्याचा परमेश्वर नाश करील.

आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला एक जगावेगळी शिकवण देत आहे. आजपर्यंत आपण आपल्या प्रियजनांवर प्रेम केले आहे. पण आज ख्रिस्त आपणास वैऱ्यावरही प्रेम करण्यास सांगत आहे. आजची सर्व वाचने आपल्याला इतरांवर प्रेम करण्यास प्रेरित करत आहेत. ज्या प्रमाणे परमेश्वर कोणाबरोबर भेदभाव करत नाही व त्याचा सूर्य व पाऊस सर्वावर एकसारखा पडतो, त्याचप्रमाणे आपलेही प्रेम हे निस्वार्थीपणाने कोणताही भेदभाव न करता केले पाहिजे. हे करण्यासाठी पवित्रतेची जोड असणे अगत्याचे आहे. ह्यास्तव प्रभु म्हणतो की, जसा तुमचा परमेश्वर पित्याचा चांगुलपणा अमर्यादित आहे तसा तुमचाही चांगुलपणा अमर्यादित असू द्या. जर का ह्या प्रेमाचा व पवित्रतेच्या मार्गावर वाटचाल केल्याने आपण खरे ख्रिस्तमय बनू शकू. आमेन.....


विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: “हे प्रभू आम्हाला तुझ्यासारखे प्रेम व क्षमा करण्यास धैर्य दे.”

१. आपले पोप महाशय, बिशप, धर्मगुरू, धर्मबंधू व भगिनी ह्यांनी सतत ख्रिस्ताच्या प्रेमाची, क्षमेची शिकवण जगाला द्यावी म्हणून आपण प्रार्थना करू या.

२. धर्मगुरू, राज्यकर्ते, कलाकार, अभिनेते, व प्रशासकीय अधिकारी ह्यांनी ख्रिस्ताच्या शांतीचे साधन बनावे व ख्रिस्ताचा प्रेमाचा संदेश आपल्या शब्दाद्वारे व कृतीद्वारे जगजाहीर करावा म्हणून आपण प्रार्थना करू या.

३. आज जगभर लोकांच्या मनात जातीयतेचा वणवा पेटला आहे. एक-दुसऱ्या बद्दल तिरस्कार मनात बाळगला जात आहे. हा वणवा विझून त्यांच्या मनात प्रेम भावना वसावी म्हणून आपण प्रार्थना करू या.

४. जे तरुण-तरुणी देवापासून दूर गेलेले आहेत, त्यांना प्रभू प्रेमाचा स्पर्श होऊन येशू ख्रिस्त हाच खरा मार्ग, प्रकाश, व जीवन आहे हे सत्य त्यांनीस्वीकारावे म्हणून आपण प्रार्थना करू या.

५. आपण आपली दैनंदिन जीवन जगत असताना ख्रिस्ताचे उदाहरण समोर ठेवून आपण आपल्या अपराध्यांना क्षमा करावी व ख्रिस्ती धर्माची क्षमेची शिकवण आपण अंगीकारावी म्हणून प्रार्थना करू या.

६. थोडा वेळ शांत राहून आपल्या सामाजिक, कौटुंबिक, व वैयक्तिक हेतूंसाठी प्रार्थना करू या.

Wednesday 8 February 2023

 




Reflections for the homily of the Sixth Sunday In Ordinary Time (12/02/2023) by Br. Rockson Dinis.



सामान्य काळातील सहावा रविवार

दिनांक : १२/०२/२०२३

पहिले वाचन: बेनसिरा १५:१५-२०

दुसरे वाचन: १ करिंथकरांस २:६-१०

शुभवर्तमान: मत्तय ५:१७-३७

नियमशास्त्र किंवा संदेश्ट्याचे ग्रंथ रद्द करावयास मी आलो आहे असे समजू नका; मी रद्द करावयास नव्हे तर पूर्ण करावयास आलो आहे


प्रस्तावना:

आज आपण सामान्य काळातील सहावा रविवार साजरा करीत आहोत. आजच्या उपासनेत आपण वचन, कायदा आणि आज्ञांवर लक्ष केंद्रित करणार आहोत.  आजचे पहिले वाचन आपल्याला देवाच्या आज्ञांचे पालन करून जीवन निवडण्यास सांगते.  दुसऱ्या वाचनात संत पौल आपल्याला आठवण करून देतो की देवाचे ज्ञान हे  मनुष्यापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे.  तसेच आजच्या शुभवर्तमानात  येशू आपल्याला सांगतो कीनियमशास्त्र किंवा संदेश्ट्याचे ग्रंथ रद्द करावयास मी आलो आहे असे समजू नका; मी रद्द करावयास नव्हे तर पूर्ण करावयास आलो आहे याचे स्पष्टीकरण देत आहे. येशू ह्या  आठवड्यात आपल्याला, आपल्या  आवडी – निवडी आणि भावनांवर प्रभुत्व मिळविण्यासाठी बोलावतो. तसेच आपण प्रत्येकाने आपल्या अंतकरणाचा आवाज ऐकला पाहिजे आणि त्याप्रमाणे आपल्या जीवनात उतरविण्याचा प्रयत्न केला पाहिजे ह्याची शिकवण देत आहे.

मनन चिंतन:

माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला आजच्या वाचनात नियमाचे महत्त्व सांगत आहे. नियम हे मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचा पाठ शिकवत असतात. कदाचित आपल्याला प्रश्न पडेल की खरोखरच नियमांची आपल्या जीवनात गरज आहे का? होय, नियम हे भरपूर महत्त्वाचे आहेत. जुन्या करारात आपल्याला दिसून येते की देवाने सुद्धा इस्रायेल लोकांना मोशेद्वारे दहा आज्ञा  दिल्या, जेणेकरून इस्रायेल लोक देवाच्या आज्ञांचे पालन करून त्याच्या योजनेनुसार पवित्र जीवन जगू शकतील.  देवाचे हे नियमशास्त्र मानवाला देवापासून दूर नेणाऱ्या सैतानी प्रवृत्ती आणि वाईट मार्गा पासून  सावधानतेचा इशारा देत असतात, जेणेकरून प्रत्येक व्यक्ती देवाच्या सहवासात टिकून राहील.

आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण ऐकतो की प्रभू येशू ख्रिस्त, जुन्या नियमशास्त्राची पूर्तता करतो. जुन्या नियमाला शुद्ध करतो आणि माणसाला जुन्या नियमाच्या पलीकडे पाहण्यास शिकवितो. म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो कि “नियमशास्त्र किंवा संदेश्ट्याचे ग्रंथ रद्द करावयास मी आलो आहे असे समजू नका; मी रद्द करावयास नव्हे; तर पूर्ण करावयास आलो आहे. आपण पाहतो की नव्या नियमशास्त्रात जुन्या करारातील आज्ञांची पूर्णता करण्यात आलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्त, जुने नितीनियम नष्ट किंवा तुच्छ मानित नाही, तर त्यांच्यामध्ये दडलेले सामर्थ्य/अर्थ प्रगट करून दाखवतो. त्याच्यातून डोकावणारी नवीन आव्हाने आपल्यापुढे सादर करतो. ह्या विषयीचे चांगले असे उदाहरण आपल्याला पहिल्या वाचनात ऐकावयास मिळते; देवाने मनुष्या समोर जीवन आणि मरण ठेवले आहे, तो जे पसंत करील, ते त्याला दिले जाईल. जर मनुष्याने देवाच्या आज्ञा  आचरणात आणल्या तर सार्वकालीन जीवन त्याला प्राप्त होईल. परंतु, जर का त्यांनी त्या पाळल्या नाहीत, तर नाश व मरण हे खात्रीचे आहे ह्यामध्ये काही शंका नाही.
बायबलमधील संपूर्ण नियमशास्त्र, येशू ख्रिस्ताने केवळ एका आज्ञेमध्ये समाविष्ट केली आहेत, ती ही कि "जशी मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्हीही एकमेकांवर प्रीती करा". नव्या नियमशास्त्राला प्रीतीचे नियमशास्त्र किंवा मुक्तीचे नियमशास्त्र असेही संबोधले जाते कारण, ते आपल्याला कायद्याचे शुल्क पालन करण्यापासून मुक्त करते, आणि प्रीती-भावनेने स्वातंत्र्याची जोड असलेले चांगले जीवन जगण्यास प्रोत्साहित करत असते. प्रीती हाच शुभवर्तमानाचा मुख्य विषय/गाभा/ आत्मा आहे. ही प्रीती (प्रेम) दिल्यानेही न संपणारी आहे, ती अनादी अनंत आहे. शेजार प्रीती आणि देव प्रीतीच्या नियमांमध्ये नव्या नियमशास्त्राची पूर्तता सामावलेली आपल्याला दिसून येते. दहा आज्ञाचा सारांश, संपूर्ण नियमशास्त्र आणि व्यक्तीला विशिष्ट दर्जा प्राप्त करून देणाऱ्या ख्रिस्ती कृत्याचे मूळ हे "प्रीती" मध्ये आहे. म्हणूनच ख्रिस्त हा संपूर्ण नियमशास्त्राचे अंतिम धैर्य आहे. केवळ तोच आपल्याला देवाच्या न्यायीपणाविषयी शिकवू शकतो. आमेन...


विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद : हे दयाळू परमेश्वरा, तुझ्या लोकांची प्रार्थना ऐक.

१. आपले पोपमहाशयव सर्व धार्मिक पुढार्यांना,देऊळमातेची व जागतिक समाजाची सेवा करण्यास, त्यांना परमेश्वरी आशीर्वाद मिळावा व पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन तसेच अध्यात्मिक बाळ लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

२. सर्व ख्रिस्ती लोकांची परमेश्वरी कृपेत वाढ व्हावी व त्यांनी ख्रिस्ती मुल्ये अंगीकारावीत. त्यांच्या आचरणातून जगात ख्रिस्ताचा संदेश त्यांनी पसरवा व एक आदर्श ख्रिस्ती जीवन जगण्यास त्यांना ख्रिस्ताची कृपा लाभावी, म्हणून आपण प्रार्थना करूया.

३. जगात युध्दाचे वातावरण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हे विनाशकारी वातावरण बदलावे व जगात शांततेचे वातावरण प्रस्थापित व्हावे व सर्वसामान्य लोकांच्या हिताकडे जागतिक पुढाऱ्यांनी त्यांचे लक्ष केंद्रित करावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

४. अलीकडे सिरीया व तुर्कीत झालेल्या नैसर्गिक आपत्तीत बळी पडलेल्या लोकांना मदत मिळावी व त्यांचे पुनर्वसन लवकरात लवकर व्हावे तसेच त्यांना वैधकिय मदत मिळून ते लवकरात लवकर बरे व्हावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.

५. आपल्या कुटुंबात ऐक्याचे, प्रेमाचे व जिव्हाळ्याचे वातावरण प्रस्थापित व्हावे व परमेश्वरी कृपेने आपला सर्व आजारांपासून बचाव व्हावा, म्हणून आपण प्रार्थना करूया.