Friday 28 July 2023

Reflections for the 17th Sunday in Ordinary Time (30/07/2023) by Fr. Rakesh                                                                                                                   Ghavtya.




                          सामान्य काळातील सतरावा रविवार

दिनांक :३०/०७/२०२३

पहिले वाचन: १ राजे ३:५, ७-१२

दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ८:२८-३०

शुभवर्तमान: मत्तय १३:४४-५२




प्रस्तावना:

आज ख्रिस्तसभा सामान्य काळातील सतरावा रविवार साजरा करीत असताना आजच्या उपासनेद्वारे आम्हाला स्वर्गाचे राज्य हे देवाचे अमूल्य दान व मौल्यवान वरदान आहे या रहस्यावर मनन चिंतन करण्यास पाचारण करत आहे. प्रभू येशूने आम्हाला स्वर्गाचे राज्य प्रकट केले.

आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू स्वर्गाच्या राज्याची तुलना ठेव, मोती व जाळे यांच्याशी करतो. या तिन्ही दृष्टांताद्वारे प्रभू येशूने स्वर्गाच्या राज्याचे महत्त्व व मूल्य आम्हासमोर ठेवले आहे. पहिले दोन दृष्टांत: ठेव व मोती हे वर्तमान काळात नमूद करण्यात आले आहेत. जेथे मनुष्यांसमोर प्रस्ताव ठेवण्यात आला असून स्वर्ग राज्य मिळविण्यासाठी त्यांनी अतोनात प्रयत्न करावे. तिसरा दृष्टांत: जाळे, हा भविष्यकाळात नमूद करण्यात आला असून येथे देव आमच्या कृत्यानुसार आम्हाला स्वर्गाचे राज्य बहाल करणार असा उल्लेख करण्यात आला आहे.

या स्वर्ग राज्याच्या राज्यात जर आपल्याला प्रवेश करायचा असेल व ते मिळवायचे असेल तर प्रथम आम्ही देवाचा शोध करावा, देवाचा धावा करावा. जो देव आमच्या प्रत्येकाच्या अंतकरणात वास करतो त्याचा अनुभव घ्यावा व देवच आपली दैवी संपत्ती आहे हे स्वीकारावे. जर आपल्याबरोबर देव आहे तर मग आपल्याला कशाचीही कमतरता वाटणार नाही. म्हणून आम्ही इतर गोष्टी सोडून देवाला चिकटून राहावे. जागतिक गोष्टींना लाथ मारून आमच्या देवाला आलिंगन मारावे. म्हणजे आम्हाला स्वर्गाचे वारस बनण्यास देवच लायक बनवेल. या मिस्साबलिदानात भाग घेताना देवाकडे हीच प्रार्थना करूया की, हे देवा आम्हाला तुझ्या सानिध्यात ठेव व आम्हाला स्वर्गाच्या राज्याचे सभासद होण्यास तुझ्या आशीर्वादाने भर.

मनन चिंतन

 

शोधीशी मानवा राउळी मंदिरी

नांदतो देव हा आपुल्या अंतरी

भेटतो देव का पूजनी अर्चनी?

पुण्य का लाभते दानधर्मातूनी?

शोध रे दिव्यता आपुल्या जीवनी

आंधळा खेळ हा खेळशी कुठवरी

 

एकदा एका मनुष्याने देवाचा शोध करायचा मनात विचार केला. त्यासाठी तो वेगवेगळ्या ठिकाणी गेला. सुरुवातीला तो मनुष्य एका मंदिरात गेला तेथे त्यांनी पूजा अर्चना केली परंतु तेथे त्याला देवाचा शोध झाला नाही, तेथे त्याला देव सापडला नाही.

मग तो एका जवळच्या मस्जीत मध्ये गेला तेथे त्याने नमाज केली, परंतु तेथे सुद्धा त्याला देवाचा शोध झाला नाही, देव त्याला सापडला नाही. नंतर तो एका चर्चमध्ये गेला तेथे त्यांनी प्रार्थना केली. पण त्याला तेथे सुद्धा देवाचा शोध लागला नाही. त्याला देव सापडला नाही. अशा परिस्थितीत हा मनुष्य एकांकी जागेत गेला व तेथे बसून तो विचार करू लागला की, मी मस्जीत मध्ये गेलो, चर्चमध्ये गेलो, परंतु मला देवाचा शोध झाला नाही. मला देव सापडला नाही. मग मी देवाचा शोध कुठे करावा? असा विचार मनात असताना त्यांनी कुणाचा तरी आवाज ऐकला तो घाबरला कारण त्या ठिकाणी कोणीच नव्हते. तो म्हणाला कोण आहे तेथे. तेव्हा देव उदगारला मी आहे, तुझा देव. तू माझा शोध बऱ्याच ठिकाणी केला पण मी तुझ्या अंतकरणात आहे. माझा शोध तुझ्या अंतकरणात कर. मी तुझ्याबरोबर आहे याची जाणीव कर.

या छोट्याशा गोष्टीचे तात्पर्य हेच आहे की, हा मनुष्य देवाच्या शोधात होता, परंतु खुद्द देवानेच त्याचा शोध केला देवानेच त्याला आपल्या अस्तित्वाची जाणीव करून दिली. जरी देव सर्वव्यापी असला तरी तू आमच्या अंतकरणात वास करतो हे आम्ही विसरू नये.

आज आम्ही प्रत्येकाने स्वतःला प्रश्न विचारावा; देव मानवाच्या शोधात आहे की मानव देवाच्या शोधात आहे? किंवा देव मानवाचा शोध करतो की मानव देवाचा शोध करतो?

सहाजिकच आपण तारणप्राप्तीच्या इतिहासात ऐकले आहे की सुरुवातीपासून देव मानवाच्या शोधात आहे. कारण देवाचा एकमेव उद्देश हाच होता की मानवाची पापांच्या बंधनातून मुक्तता व्हावी. त्याचं तारण व्हावं. हे देवाने प्रत्यक्षात करून दाखवलं. आजही देव मानवाच्या शोधात आहे. हाच देव तुमच्या आणि माझ्या शोधात आहे. हाच देव आम्हा बरोबर आहे. ह्याच देवाला आम्हा प्रत्येकाची काळजी आहे. तो आम्हाला कधीच सांडू देणार नाही. हाच प्रभू परमेश्वर म्हणतो; पहा मी स्वतः आपल्या कळपाचा शोध करीन त्यास मी हुडकीन (यहेज्केल ३४-११). तसेच लूकलिखित शुभवर्तमानात प्रभू येशू म्हणतो; मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधावयास व तारावयास आला आहे (लुक 19 -१०).

आज देवाने मानवावर असंख्य असे उपकार केले आहेत. जरी या उपकाराची मानवाला परतफेड करता आली नाही तरी मानवाने देवाच्या तारणप्राप्तीच्या मार्गात सहकार्य दाखवावे. ज्याप्रमाणे देव मानवाच्या शोधात आहे त्याचप्रमाणे आजच्या घडीला प्रत्येक मानवाला देवाची गरज भासत आहे. देवाशिवाय मनुष्य काहीच करू शकत नाही. प्रत्येक व्यक्तीला वाटते की मला देवाचा साक्षात्कार व्हावा, देवाचा जवळून अनुभव व्हावा, म्हणून आजही मानव देवाच्या शोधात आहे. प्रत्येकाला वाटते की देवाला प्रत्यक्षरीत्या पहावे.

ख्रिस्त सभेच्या इतिहासात अनेक असे संत होऊन गेले की ज्यांना देवाचा जवळून अनुभव आला त्यांना देवाचा साक्षात्कार झाला व अशा प्रकारे त्यांच्या जीवनाच्या नौकेला नवीन दिशा मिळाली. या अनेक संतांपैकी जर आपण असीसिकर संत फ्रान्सिस यांच्या जीवनावर प्रकाश टाकला तर असे दिसून येईल की त्यांनी ख्रिस्तासाठी सर्वस्वाचा त्याग केला. त्यांनी ख्रिस्ताला मिठी मारून जगाला लाथ मारली व ख्रिस्ताचा तो खरा अनुयायी बनला. अशाप्रकारे असिसिकर संत फ्रान्सिसने आत्मत्याग करून देव हा त्याच्या जीवनातील सर्वात मोठी संपत्ती आहे असे मानून घेतले व आपले सर्वस्व देवाला समर्पिले. म्हणूनच संत फ्रान्सिसला स्वर्गाच्या राज्याचे वतन मिळाले.

आपल्याला जे काही लाभले आहे ते देवाचेच कृपा आशीर्वाद आम्हावर आहेत. ज्याला देवाचा अनुभव आला आहे त्याला जीवनात उत्तम आणि श्रेष्ठ खजिना सापडला आहे. होय आपला देव आपली दैवी संपत्ती आहे. आम्ही प्रत्येकाने या देवाचा शोध करावा म्हणजे तो आम्हाला स्वर्गाच्या राज्यात योग्य असे स्थान देईल. म्हणूनच परमेश्वराने म्हटले आहे; तुम्ही माझा धावा कराल. तुम्ही जाऊन माझी प्रार्थना कराल व मी तुमचे ऐकेन. तुम्ही मला शरण याल आणि पूर्ण जिवेभावे माझ्या शोधास लागाल तेव्हा मी तुम्हास पावेन(यिर्मया २९: १२-१३).

खरे पाहिले तर देवाला जाणीव आहे की मानव हा त्याचा शोध करतो. ज्यांनी देवाचा शोध केला त्यांना देवाने प्रकट केले. खुद्द देवाने प्रभू येशूद्वारे स्वतःला प्रकट केले, याविषयी पवित्र शास्त्र साक्ष देते. प्रभू येशू म्हणतो; मार्ग सत्य व जीवन मीच आहे. माझ्या द्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणी येत नाही (योहान१४:६) हाच ख्रिस्त देवाकडे जाण्याचा उत्तम मार्ग होईल. जो कोणी त्याच्या मागे जाईल त्याला स्वर्गीय निवासस्थान लाभेल.

आजच्या शुभवर्तमानातील तिन्ही दृष्टांताद्वारे: ठेव, मोती व जाळे आपल्याला प्रभू येशू हाच संदेश देत आहे की स्वर्गाचे राज्य ही देवाने मानवाला बहाल केलेली अनमोल भेट आहे, की जी मिळवायची असेल तर परमेश्वर पित्याला आपल्या जीवनात पहिले स्थान देऊन देवाशिवाय जीवन व्यर्थ आहे असे मानून देवाच्या सानिध्यात राहण्यास त्याचा जवळून अनुभव घेऊया.

आज जर आपल्याला देवाचा अनुभव झाला असेल, त्याचा साक्षात्कार झाला असेल, तर खरंच आपण म्हणू शकतो की आम्हाला देवाला पाहण्याच भाग्य लाभल आहे.

परंतु आज मानव देवाचा शोध करताना समाधानी आहे का? मानवाच्या अनेक गरजा आहेत, त्याच्या विविध भावना आहेत, त्याचे  निरनिराळे संकल्प, योजना आहेत. आज मानवाला जीवनात खरी मन शांती, खरा आनंद, सुख समाधानाची गरज आहे. या सर्व गरजा फक्त देव पूर्ण करू शकतो. कारण देवाला सर्व काही शक्य आहे. अशक्य असे काहीही नाही.

या आधुनिक युगात माणसाने फक्त देवावर अवलंबून राहावे. कारण जो देव आमचा शोध करतो तो आपल्याला कधीच टाकणार नाही, नाकारणार नाही, तर आमच्या जीवनात नवीन दिशा देण्यास मदत करतो. हाच देव आम्हासमोर हेच आव्हान ठेवत आहे की, आम्ही आमचे ख्रिस्ती जीवन जगताना नीतिमानाने जगावे, व जे चांगले आहे, योग्य आहे, ते निवडावे म्हणजे आपला देव आम्हाला स्वर्गाच्या राज्याचे इनाम देईल.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे प्रभू आम्हाला तुझे राज्य पाहण्यास मदत कर.

१) आपले परमगुरु फ्रान्सिस पहिले सर्व बिशप्स धर्मगुरू आणि व्रतस्थ बंधू भगिनी ह्याच्याद्वारे प्रभू येशूची सुवार्ता जगाच्या कानाकोपऱ्यात पसरवताना त्यांना देवाचा अनुभव यावा व जे  लोक देवाचा शोध करत आहेत त्यांना योग्य मार्गदर्शन देण्यास प्रभू येशूची कृपा त्यांना लाभावी म्हणून प्रार्थना करूया.

२) आपल्या सर्व राजकीय पुढार्‍यांनी व नेत्यांनी जनकल्याणासाठी झटावे व जनतेला सेवा कार्याद्वारे मदत करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

३) आज आपण मणिपूर मधील सर्व बंधू-भगिनींसाठी विशेष प्रार्थना करूया की, त्यांच्यावर होणारा अन्याय अत्याचार व छळ नष्ट व्हावा, व तेथे शांतीचे वातावरण प्रस्थापित व्हावे. तसेच तेथील गरजू लोकांना न्याय मिळावा म्हणून प्रभुकडे प्रार्थना करूया.

४) जे लोक देवाला मानत नाहीत व जे लोक देवापासून दूर गेले आहेत अशा लोकांना पवित्र आत्म्याचा स्पर्श व्हावा, व त्याच्या जीवनाचे परिवर्तन होऊन त्यांना देवाच्या अस्तित्वाची जाणीव व्हावी म्हणून प्रभुजवळ प्रार्थना करूया.

५) या मिस्साबळीदानात सहभाग घेत असलेल्या आम्हा सर्व बंधू-भगिनी वरती देवाचा आशीर्वाद असावा, की त्याद्वारे देवाने आम्हाला स्वर्गाचे राज्य पाहण्याचे भाग्य द्यावे म्हणून प्रार्थना करूया.

६) थोडा वेळ शांत राहून आपल्या सर्व वैयक्तिक व सामुदायिक हेतूसाठी प्रभू चरणी प्रार्थना करूया.


Friday 21 July 2023

 Reflections for the 16th Sunday in Ordinary Time (23/07/2023) by Br. Reon

 


सामान्यकाळातील सोळावा रविवार

 

दिनांक: २३/०७/२०२३

पहिले वाचन: ज्ञान ग्रंथ १२:१३,१६-१९

दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ८:२६-२७

शुभवर्तमान: मत्तय १३:२४-४३





प्रस्तावना

        आज आपण सामान्यकाळातील सोळावा रविवार साजरा करत आहोत. आजची उपासना आपणास देवाच्या राज्याची प्रचीती देत आहे. अनेक वेळेस आपण ख्रिस्ती आदर्श इतरांना देण्यास कमी पडत असतो. अनेक वेळेस आपल्याला हे ख्रिस्ती जीवन जगणे, लाजिरवाणी वाटत असते. हे सर्व करत असतांना आपण ख्रिस्ताचे राज्य ह्या भूतलावर आणण्यास मागे जात असतो. लहान-मोठी सत्कार्ये करण्यास आपणास लाज वाटते व आपण इतरांपर्यंत ख्रिस्त पोहोचवीत नाही. देवाचे राज्य ह्या जगात यावे व ते प्रस्थापित करण्यास आपला हातभार लाभावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

मनन चिंतन

        सामान्यकाळातील सोळाव्या रविवारी ख्रिस्तसभा आपणास स्वर्गाच्या राज्याविषयी उलघडा करत आहे. आजच्या शुभवर्तमानात आपल्या समोर देऊळमाता तीन दाखले सादर करीत आहे. ते म्हणजे गहू आणि निन्दन, मोहरीच्या दाण्याचा व खमिराचा. ह्या तिन्ही दाखल्यांमधून आपणास देऊळमाता व खुद्द प्रभू येशुख्रिस्त काय सांगू इच्छितोय. आजची तिन्ही वाचने आपल्याला देवाचे राज्य कसे आहे ते कसे वाटते ह्याची माहिती आपणास देण्याचा प्रयत्न करत आहेत. इतिहास पाहिला तर आपणास कळून चुकेल कि, जगातील सर्व राज्ये भौतिक पार्श्वभूमीवर दाखवले जातात अथवा जिंकली जातात. हि राज्ये जिंकण्यासाठी अथवा विस्तारकार्ण्यासाठी अनेक महान कृत्ये व शौर्याची कामे अनेक राजे व त्यांचे सैनिकांना करावी लागली. जेव्हा आपण देवाचे राज्य म्हणतो ते भौतिकरित्या आपण दर्शवू शकत नाही कारण ते राज्य लोकांमध्ये आहे, लोकांच्या हृदयामध्ये आहे.

        ज्या प्रमाणे एखाद्या बी मध्ये फळ देण्याचे, मोहरीच्या दाण्यामध्ये झाड व इवलेशे खमिरात पीठ फुगवण्याचे सामर्थ्य आहे; त्याप्रमाणे आपणातही देवाचे राज्य विस्तारित करण्याचे सामर्थ्य आहे. ह्या सामर्थ्याची जाणीव आपणास नसली तरीही देवाला त्याची ओळख आहे. म्हणूनच परमेश्वर आपणास संधी देत आहेतो, वेळ देत असतो; जेणेकरून आपणात बदल होईल व आपण देखील देवाच्या राज्यास योग्य बनू. सर्वात प्रथम आपण देवाच्या राज्याची वैशिष्टे पाहूया. आजच्या पहिल्या वाचनात आपणास कळून येते कि, देवाच्या राज्यात न्याय मिळतो, ह्या राज्यात आपणास दया अनुभवण्यास मिळते, देवाच्या सामर्थ्याचे दर्शन देखील मिळते; देव सहनशीलतेने आम्हावर राज्य करतो, देव आपल्या वर्तनाने आपल्या लोकांना शिकवतो व पश्चातापाची संधी आपणास देत असतो. ही काही वैशिष्टे आपणास कळून चुकतात. हे देवाचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी काही गोष्टी आपल्या निदर्शनास आणणे गरजेचे आहे ; त्या म्हणजे

१.                        छोटी सुरवात: - ज्या प्रकारे मोहरीचा दाणा सर्वात लहान असून देखील त्याचे एका मोठ्या वृक्षात रुपांतर होते त्याच प्रकारे आपणही देवाच्या राज्यासाठी लहान गोष्ठी करण्यास मागे पडू नये. अनेक वेळेस आपण विचार करतो कि, माझ्या ह्या लहान वर्तनाने अथवा कृत्याने काय फरक पडणार आहे? परंतु आपल्या ह्या लहान सत्कृत्याने महान अशा देवाच्या राज्याला ह्या भूतलावर प्रस्थापित करण्यास मदत होईल.

२.                        विश्वास: - स्वत:वर तसेच परमेश्वराच्या सामर्थ्यावर व त्याच्या योजनेवर  आपला विश्वास असणे गरजेचे आहे. पवित्र शास्त्र विश्वासाच्या अनेक उदाहरणांनी भरलेले आहे. जर का आपला विश्वास त्या परमेश्वरावर व त्याच्या सामर्थ्यावर असला तर आपण देवाचे कार्य करण्यास कधीच कमकुवत पडणार नाही.

३.                        वेळ: - गहू आणि निन्दानाच्या दाखल्यांमध्ये देव त्यास वाढण्यास वेळ देत आहे. त्याच प्रकारे तो आपणालाही आपली दुभावाची वर्तणूक बदलण्यास वेळा देत आहे. दुसऱ्या बाजूने पाहिलं तर, आपल्याला अनेक अनैतिक लोकं, दुराचार करणारे लोकं ह्या जगात आढळतात व त्यांची प्रगतीही तितक्याच वेगाने होत असते. अनेक वेळेस आपणास प्रश्न उद्भवतो कि देव त्यांचा न्याय का करत नाही? कारण देवाच्या राज्याचे वैशिष्ट आहे कि देव दयाळू आहे. तो पश्चातापास वेळ देत असतो.

४.                        आसरा देणे: - ज्या प्रकारे मोहरीचे झाड पक्षांना आसरा देते त्या प्रकारे आपणही गरजू व्यक्तींना आसरा देणे; त्यांच्या मदतीस धावणे गरजेचे आहे. देवाचे राज्य हे लोकांनी बनवलेले असल्या कारणाने एक दुसऱ्यांची काळजी घेणे त्याच्या राज्याचा नियम आहे.

५.                        बदल घडवणे: - ज्या प्रकारे मोहरीचा दाणा व मापभर खमिराने बदल घडवून आणला त्या प्रकारे आपणही आपल्या कार्याने, वर्तणुकीने समाजात बदल घडून आणायला पाहिजे. आपल्या वागण्याने व व्यवहाराने आपण इतरांना नेहमी प्रेरित करावे म्हणून आपला जन्म ह्या भूतलावर झाला आहे.

        प्रश्न असा उभा राहतो कि, हे सर्व माझ्याने होईल का? मी तर अशक्त, निर्बल, व पापवासनांना आहारी गेलेला मनुष्य आहे. परंतु संत पॉल आजच्या दुसऱ्या वाचनात आपणास सांगत आहे कि, “आत्मा आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो”. म्हणूनच संत पॉल म्हणतो, “जेव्हा मी अशक्त तेव्हा मी सशक्त आहे (When I am Weak, then I am Strong).

        आपणा सर्वांस देवाचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी देवाचे सामर्थ्य व मदद मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

 

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: हे प्रभू आमची प्रार्थना ऐक.

१. विश्वव्यापी ख्रिस्त सभेची धुरा वाहणारे आपले परमचार्य पोप फ्रान्सिस सर्व व कार्डिनल, बिशप्स धर्मगुरु, धर्म-भगिनी यांना चांगले स्वास्थ्य लाभावे व परमेश्वराचा शब्द लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी व त्याद्वारे परमेश्‍वराचे राज्य प्रस्थापित व्हावे म्हणून प्रार्थना करूया.

२. स्वर्गीय पित्या, आम्ही येशूच्या नावाने तुझ्याकडे आलो आहोत, मणिपूर राज्यावर तुझी दया दाखव. व  या प्रदेशात शांतता आणि एकत्रितपणा यावा , व  हिंसाचार आणि जातीय संघर्ष थांबावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

२. आपल्याला या वर्षी भरपूर प्रमाणात पाऊस मिळावा व आपल्या शेतकरी बांधवांना चांगले पीक मिळावे आणि आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण व्हाव्यात म्हणून आपण प्रार्थना करूया.

३. जे लोक निस्वार्थीपणे देवाची सेवा करत आहेत व जे लोक या जीवघेण्या आजारात लोकांना अत्यावश्यक सेवांचा पुरवठा करत आहेत, त्याचप्रमाणे सर्व डॉक्टर्स, नर्सेस, शासकीय कर्मचारी यामध्ये सहभागी असलेली इतर सर्व लोक यांना परमेश्वराचे मार्गदर्शन लाभावे, तसेच त्यांना निरोगी स्वास्थ्य लाभावे म्हणून प्रार्थना करूया.

४. जे लोक बेघर आहेत अन्न-पाण्याविना जीवन जगत आहेत. जे आजारी आहेत अशा सर्वांना योग्य वेळी मदत मिळावी व त्यांच्या ही गरज पूर्ण व्हाव्यात म्हणून आपण प्रार्थना करूया.

५. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक घरासाठी प्रार्थना करूया.


Friday 14 July 2023

                                     



 Reflection for 15th SUNDAY IN ORDINARY TIME (16/07/2023) By Dn. Pravin Bandya



सामान्यकाळातील पंधरावा रविवार

दिनांक: १६-०७-२०२३

पहिले वाचन: यशया ५५:१०-११

दुसरे वाचन: रोमकरांस पत्र :१८-२३

शुभवर्तमान: मत्तय १३:-२३


"पेरणाऱ्याचा दाखला"



प्रस्तावना

परंतु जो कोणी माझे वचन ऐकून, ते समजून घेतो तो पुष्कळ फळ देतो.”

            आज अखिल ख्रिस्तसभा सामान्यकाळातील पंधरावा रविवार साजरा करीत आहे. आणि आजची उपासना आपणास परमेश्वराचे वचन ऐकून ते आत्मसात करण्यास बोलावत आहे. आपण सर्वांनी देवाचा शब्द ऐकून त्याचे आचरण केले पाहिजे. परमेश्वराचे वचन हे दुधारी तलवारीसारखे तीक्ष्ण आहे.

          आजच्या पहिल्या वाचनात यशया संदेष्टा आपणास सांगतो कि, परमेश्वराचे वचन हे सामर्थ्यशाली आहे. आणि ते आपले कार्य केल्याशिवाय पुन्हा परमेश्वराकडे जात नाही. तेसेच आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल आपणास सांगतो कि, आपण जर देवाच्या वचनानुसार जीवन जगलो तर आपणास दुःखे सोसावी लागणार परंतु हे सगळ कमीच आहे; कारण परमेश्वराने आपणास पवित्र आत्म्याची देणगी दिली आहे. आणि आजच्या शुभवर्तमानात आपण पेरणाऱ्याचा दाखला ऐकतो; ज्यामध्ये आपण सुपीक जमिनीत पडलेल्या बियांसारखे जास्त प्रमाणात पिक द्यावे म्हणून प्रभू येशूख्रिस्त आपणास सांगत आहे.  

          आज ह्या पवित्र मिस्साबलिदानात सहभागी होत असता. त्याचे वचन वाचून ते आचारणात आणण्यास आपणास त्याची कृपा शक्ती मिळावी म्हणून प्रार्थना करूया.

मनन चिंतन

            आज आपण परमेश्वराचे वचन वाचून त्यावर मनन चिंतन करूया. आजच्या शुभवर्तमानातील दाखला आपणास महत्वाचा संदेश देत आहे.

          आजच्या पहिल्या वाचनात यशया संदेष्टा देवाच्या शब्दांची तुलना पाऊस आणि बर्फ ह्यांच्याशी केला आहे. जसे पाऊस आणि बर्फ हे आकाशातून पडतात आणि पृथ्वी भिजून तिला फलदायी किंवा सफल हिरवगार करता; त्याच प्रमाणे देवाचे वचन हे त्याचं कार्य केल्याशिवाय म्हणजे आपल्या जीवनात बदल आणल्याशिवाय पुन्हा देवाकडे जात नाही.

          आजच्या शुभवर्तमानातील पेरणाऱ्याच्या दाखल्यात पेरणारा हा येशू आहे आणि बी देवाचा शब्द आहे, तर वाट, खडकाळ जमीन, काटेरी झुडूप चांगली जमीन हे लोकं आहेत, जे देवाचा शब्द ऐकतात. काही लोक देवाचा शब्द ऐकून लगेच नकार देतात. काही त्याचा स्वीकार करतात आणि नकार देता. त्याहून काही त्याचा स्वीकार करतात परंतु जर त्यांना इतर गोष्टींमध्ये रस वाटायला लागला तर तो लगेच सोडून देतात. परंतु काही ऐकून, त्याचा स्वीकार करतात आणि एखाद्या मौल्यवान वस्तूप्रमाणे त्याचा वापर करतात.

ह्या दाखल्यातील तीन महत्वाच्या मुद्यांवर आज आपण मनन चिंतन करूया.

१.   पहिला मुद्दा म्हणजे; शब्द आणि बी:

            ह्या दाखल्यात येशू प्रभू शब्दाची तुलना एका बी बरोबर करतो. बी हे आकाराने लहान असते पण त्यामध्ये एक उंच झा होण्याची क्षमता असते. आणि त्याची क्षमता आपणास तेव्हा कळते जेव्हा ते बी आपण जमिनीत पेरतो. जर का आपण ते पिशवीत ठेवले तर ते तसेच राहणार. त्याच प्रमाणे देवाचे वचन जर आपण वाचले नाही तर ते आपणास केवळ लिखित शब्द वाटू शकतात. कारण जसं बी पेराल्याने त्यापासून झाड होते त्याच प्रमाणे प्रभू शब्दाचे वाचन केल्याने आपणही आपल्या जीवनात फळ देऊ शकतो. इब्री लोकांस पाठवलेल्या पत्रातदेव शब्द हादुधारी तलवारीसारखा आहे’. स्तोत्रकार म्हणतो, “तुझे वचन माझ्या पावलांकरीता दिव्यासारखे आहे”. आणि आजच्या पहिल्या वाचनात यशया संदेष्टा प्रभू शब्दालाबर्फ आणि पाण्याचीउपमा देतो. जसं बी जर आपण पिशवीत फक्त ठेवले तर ते तसेच राहते त्याच प्रमाणे जर देव शब्द वाचल्याने तो पवित्र शास्त्रात तसाच राहतो. जेव्हा आपण देवशब्दाचे वाचन करतो किंवा ते ऐकतो, तेव्हाच ते आपल्या जीवनात कार्यरत असते. आपना सर्वांकडे बियाणे आहे म्हणजे देव शब्द आहे; आपणास गरज आहे ती फक्त पेरायची म्हणजे वाचायची आणि ऐकायची.

२.   दुसरा मुद्दा म्हणजे; पेरणारा आणि विनाशक:

            ह्या दाखल्यात फक्त एकच पेरणारा आहे, पण अनेक विना आहेत. पहिल्या प्रकरणात पक्षी येऊन बी खाऊन टाकतात. दुसऱ्या प्रकरणात सूर्य बियाणे जाळून टाकतात आणि तिसऱ्या प्रकरणात काटेरी झुडूप त्याची वाट खुंटतात. त्याच प्रमाणे आज अनेक परिणामकारक घटक किंवा धोके आहेत; ज्याद्वारे देवाच्या वचनाची फळ देण्याची क्षमता कमी होते. उदाहरणार्थ: - मोबाईल फोन हा सर्वात मोठा धोका आहे. आज आपल्या हाताची बोटं बायबलच्या पानांपेक्षा मोबाईलच्या  स्क्रीनवर जास्त जातात. आज शुभवर्तमान घोषविण्यापेक्षा सोशल मिडीयावर जास्त वेळ आपण घालवतो. आज प्रभू शब्दावर मनन चिंतन करण्याएवजी मेसेजेस, सेल्फीस, विडेओस हे वायरल करण्यामागे जास्त वेळ आपण घालवतो. आज आपण जुन्या आणि नवीन करारांतील पुस्तकांपेक्षा म्हणजे बायबल मधील पुस्तकांपेक्षा, मोबाईल मधील अप्सचा वापर जास्त करतो. म्हणून प्रभू शब्द वाचून, त्याच्या वचनाचे बी नष्ट होऊ देता, ते वाढवून चांगले फळ देऊया.

३.   तिसरा मुद्दा म्हणजे; फळ देण्यामधिल फरक:

            चांगल्या जमिनीवर पडलेल्या बियाण्यांबद्दलही आपण काहीतरी विचित्र पाहतो. कारण कोणी शंभर पट तर कोणी साठ पट तर कोणी तीस पट फळ दिले, असे आपण पहिले. जर त्या चांगल्या जमिनीत एकाच प्रकारचे बी पेरले होते, तर फळ देण्यामध्ये फरक का होता? आपणास ठाऊक आहे कि, बियाणे आणि माती व्यतिरिक्त इतर गोष्टी देखील आहेत, ज्या बियाणांच्या वाढीसाठी महत्वपूर्ण भूमिका बजावतात; जसे कि पाणी, सूर्यप्रकाश आणि खत याचा परिणाम देखील या घटकांवर अवलंबून असतो. म्हणून आपण वेगळेपण पाहतो. त्याच प्रमाणे देवाचे वचन सर्वांसाठी सारखेच आहे. परंतु आपण ते कसे वाचतो, त्यावर कशाप्रकारे चिंतन करतो आणि ते कशाप्रकारे आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो, हे देखील अवलंबून आहे. ह्या सर्व घटकांवर अवलंबून देवाचे वचन आपल्या जीवनात फळ देते.

          परमेश्वराचे वचन वाचून, ते आत्मसात करून शंभर पटीने फळ द्यावे म्हणून आपण विशेष प्रार्थना करूया.

 

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसादहे प्रभो तुझ्या लोकांची प्रार्थना ऐक.

. ख्रिस्तसभेची धुरा वाहणारे आपले पोप महाशय, बिशप्स, धर्मबंधू-भगिनी आणि सर्व प्रापंचिक लोक ह्या सर्वांना, देवाच्या प्रेमाची साक्ष जगजाहीर करण्यासाठी परमेश्वराची कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करू या.

. सर्व ख्रिस्ती लोकांनी सदैव देवाचा शब्द आपल्या जीवनी स्वीकारून चांगल ख्रिस्ती जीवन जगावे आपल्या कृतीद्वारे इतरांना ख्रिस्त प्रकट करावा म्हणून आपण प्रार्थना करू या.

. जे तरुण तरुणी देवापासून दूर गेलेले आहेत, ज्यांना जगण्यात अर्थ उरला नाही जे इतर वाईट मार्गाला लागले आहेत अशांना परमेश्वराने चांगला मार्ग दाखवावा ते परमेश्वराकडे परत वळावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.

. ज्या कोणाची लग्न झाली आहेत परंतु ज्या जोडप्यांना अजून मुल-बाळ झाले नाही त्या सर्वांना प्रभूने आशीर्वादित करावे त्यांच्या जीवनरूपी वेलीवर पुष्प फुलवावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.

. आता आपण थोडावेळ शांत राहून, आपल्या सर्व सामाजिक आणि कौठूबिंक हेतूसाठी प्रार्थना करूया.