Thursday 26 September 2019


Reflections for the homily of 26th Sunday in Ordinary Time (29-09-2019) by Br. Brian Motheghar. 







सामान्य काळातील सव्विसावा रविवार




दिनांक: २९/०९/२०१९
पहिले वाचन:  अमोस: ६:१,४-७
दुसरे वाचन: १तीमथि: ६:११-१६
शुभवर्तमान: लूक: १६:१९-३१



प्रस्तावना:

          ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधु आणि भगिनींनो, आज आपण सामान्य काळातील सव्विसावा रविवार मध्ये पदार्पण करत आहोत. आजची उपासना आपल्याला शेजाऱ्या विषयी असणारी आपली आपुलकी याविषयी सांगत आहे.
          आजच्या पहिल्या वाचनात अमोस संदेष्टा आपल्याला अशा व्यक्तीं विषयी सांगत आहे, की जे चैनीचे, मौजमज्जेचे जीवन जगत होते, परंतु आपला शेजारी जो, दुःखात किंवा संकटात आहे त्याच्यावर नजर सुद्धा टाकत नव्हते. त्यांची स्थिती व त्यांचा न्याय त्यांच्या वागण्या प्रमाणे होणार होता. तसेच आजच्या दुसऱ्या वाचनात संत पॉल तिमथिद्वारे आपल्याला निष्कलंक राहण्यास सांगत आहे. जोपर्यंत प्रभू परमेश्वर त्याच्या गौरवात येत नाही, तोपर्यंत निष्कलंक रहा. तर आजच्या शुभवर्तमानात येशू आपल्याला श्रीमंत व गरीब लाजरस ह्यांच्याविषयी दाखला देत आहे. ज्या मापाने आपण  आपल्या शेजाऱ्याला देणार,  त्याच मापाने आपल्याला परत मिळेल.  ह्याचे उत्तम उदाहरण आजच्या शुभवर्तमानात आपल्याला दिलेले आहे. तर मग आपण आपल्या शेजाऱ्याला आपल्या परीने होत असलेल्या कार्यापेक्षा अधिक पटीने देण्याचा प्रयत्न करूया, व देवाकडे देण्याची वृत्ती आपणामध्ये आत्मसात व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

सम्यक विवरण

पहिले वाचन: अमोस:६:१,४-७ 

आजच्या पहिल्या वाचनात आमोस संदेष्टा, श्रीमंत व गरीब यांच्यामधील असलेल्या भेद  बाबत आपल्याला सांगत आहे.  संदेष्टा श्रीमंतांना त्यांच्या वास्तविक स्थितीचे व येणाऱ्या घटनांचे वर्णन करीत आहे. कारण, श्रीमंतांनी गरिबांना मदतीचा हात दिला नाही. याउलट त्यांच्यावर अत्याचार व जुलूम केले.  त्यांना अन्यायाने वागवले.  म्हणून संदेष्टा स्पष्टपणे श्रीमंतांना सांगतो की,  जे तुम्ही हस्तीदंत पलंगावर निजता व मंचकावर ताणून पडतात व कळपातील गुरेढोरे खाता,  त्यांचा नाश होणार.  कारण, योसेफाच्या म्हणजेच येरुसलेमचा नाश झालेला आहे, त्याचा तुम्ही खेद करत नाहीत. संदेष्ट्याने देवाच्या नावाने हा संदेश दिला आहे, ही बाब ध्यानात घेतली पाहिजे. देवाला गरिबांवर केलेला अन्याय मुळीच खपत नाही. यावरून अधोरेखित  केले गेले आहे की, दुर्बल घटकांचे शोषण होत असल्यामुळे, परमेश्वराचा देशावर कोप होईल, परचक्राचे संकट ओढवले जाणार, असा इशारा संदेष्ट्याने दिला आहे.  हिब्रि समाजात देव स्वतः गोरगरिबांचा संरक्षण करता म्हणून उभा राहिला. कारण, देवाने त्यांना न्याय मिळण्याबाबत शाश्वती दिली होती.

दुसरे वाचन: १ तिमथि ६:११-१६ 

 संत पॉल तिमथिस आपले आचरण कसे असावे याबद्दल मार्गदर्शन करत आहे. आपले पत्र लिहून झाल्यावर, संत पॉल शेवटचा मजकूर लिहिताना तिमथिस नीतीमत्व, सुभक्ती, विश्वास, प्रिती, धीर, व सौम्यता बाळगण्याचे आव्हान  करत आहे. विश्वासासंबंधीचे जे  सुयुध्द  ते कर. युगानुयुगाच्या जीवनाला बळकट धर. अशी लाख-मोलाची शिकवण संत पॉल तिमथिस देत आहे. अध्यात्मिक जीवनातील जडणघडण करत असताना संत पॉल ची आपल्या शिष्या संबंधीची तळमळ ही वाखाणण्यासारखी आहे. पॉल क्रांतिकारक, समाज सुधारक नव्हता. तर अध्यात्मिक मार्गदर्शक होता. तिमथिला अधिकाराचे व जबाबदारीचे ओझे जाणवत होते. अनेक संकटांना सामोरे जात असताना पॉल त्याला देवावर श्रद्धा ठेवून हिंमत बाळगण्यास संदेश देत आहे.

शुभवर्तमान:  लुक: १६ १९-३१

आज प्रभू येशू आपणासमोर श्रीमंत मनुष्य व गरीब लाजरस यांचा दाखला ठेवत  आहे. ह्या दाखल्या द्वारे आपल्याला कळून चुकते की, येशूच्या वेळी गरीब व श्रीमंत यांच्यात भेदभाव होता. परंतु, येशू गरिबांची बाजू घ्यायचा. कारण, त्यांचा त्याला कळवळा आला होता. दाखल्यात आपल्याला दिसून येते की, येशूने गरीब लाजरस याचे नाव घेत आहे. परंतु, श्रीमंत व्यक्तीचे नाव कुठेही नोंदविले गेले नाही. समाजात श्रीमंत व गरीब यांच्यामधील असलेल्या भेदभाव हा कार्यरत असला तरी, हा भेदभाव येशूला किंचितही आवडला नाही. म्हणून त्याने समतेचा आग्रह धरला.         
इस्रायली लोकांची अशी समजूत होती की, श्रीमंती हा देवाचा आशीर्वाद, तर गरीबी हा शाप आहे. परंतु येशूने श्रीमंत व गरीब लाजरस ह्यांचा दाखला सांगून, धनवानानंच्या डोळ्यात अंजन घातले आहे. लाजरस या शब्दाचा अर्थ म्हणजे देव मदत करतो (God is my help) असा आहे. दोघांमधील दुभागीता समजून, गरीबांचा छळ होतो याची माहिती येशूला होती म्हणून श्रीमंतांना ह्याची किंमत मोजावी लागेल असे संत लूक भाकीत करतो. ज्यांची जागा वेशी बाहेर होती, तेच लोक स्वर्गात अब्राहामाच्या हृदयापाशी आहेत असा दिलासा या दाखल्यातून आपल्याला मिळतो.

बोधकथा:

 एकदा एक गरीब आंधळा मुलगा रस्त्याच्या कडेला बसून भीक मागत होता. त्याच्यासमोर एक पाटी लिहिलेली होती. त्याच्यावर त्याने असे लिहिले होते, 'मी गरीब, आंधळा आहे. मला मदत करा.'  परंतु त्या वाक्याने त्याच्या दान पात्रात कमी दान पडत असे. असेच काही दिवस लोटल्यानंतर, एक दिवस एक सज्जन मनुष्य येऊन, त्याच्याकडे लक्षपूर्वक बघून, त्याच्या पाटीवरील शब्दांत बदल करून तो परत गेला. त्या वेळेनंतर त्या गरीब, आंधळ्या मुलाच्या दानपात्रात भरपूर असे दान पडू लागले.  हे त्या मुलाला कळून चुकले. काही दिवसानंतर तोच सज्जन मनुष्य परत येऊन त्या मुलाच्या बाजूला उभा राहिला. त्या आंधळ्या मुलाला समजले की, हाच तो व्यक्ती ज्यांनी माझ्या पाठीवर काही शब्दांचा बदल करून माझ्या दान पात्रात दानाचा बदल घडून आणला. तेव्हा त्या मुलाने त्या सज्जन माणसाला विचारले, "अरे, भल्या सज्जन माणसा, तु माझ्या पाटीवर असे काय लिहिले, की त्याद्वारे लोक माझ्याकडे आकर्षिले केले गेले? व माझ्या दान पात्रात जास्त दान येऊ लागले? त्यावर त्या माणसाने त्याला उत्तर दिले, "मी तुझ्या पाटीवरील काही शब्द बदलून टाकले. पूर्वी जे काही लिहिले होते ते असे होते, "मी गरीब, आंधळा मुलगा आहे. मला मदत करा." त्याऐवजी मी असे लिहिले, "आज  सुंदर असा दिवस आहे. तो दिवस पाहण्याचे भाग्य तुम्हाला मिळाले आहे. तेच भाग्य मलापण लाभावे म्हणून, मला मदत करा."

बोध: माझ्यासाठी श्रीमंती म्हणजे काय? पैसा धन-दौलत? ऐषो आराम? की इतरांना मदत करणे?

मनन चिंतन:

          दुसरी व्हॅटिकन परिषद आपल्याला अशी शिकवण देते की, देवाचे राज्य हे सर्वांसाठी आहे. परंतु आजच्या शुभवर्तमानात आपण पाहिले तर असे दिसून येते की, देवाचे राज्य हे फक्त गरिबांसाठी आहे. श्रीमंत हा अधोलोकात यातना भोगत आहे. तर मग, श्रीमंती हे आपले पाप आहे काय? आज समाजात सर्वजण श्रीमंतीकडे ओढले जातात. म्हणजे ते पापाकडे ओढले जातात काय? दाखल्यात दिलेल्या श्रीमंताचे काय पाप होते की, त्याच्यावरून तो नरकात किंवा अधोलोखात यातना भोगत होता? आज ख्रिस्त सभा आपल्याला आगळीवेगळी शिकवण देत आहे. तारण सर्वांचे होणार, परंतु ते आपल्या सत्कृत्यांवर अवलंबून आहे. कुणाचे वाईट कराल तर, आपले वाईट होते. कुणाचं भलं करणार तर, आपलं भलं होतं. दाखल्यात श्रीमंत माणसाने लाजरससाठी काहीही भलं किंवा वाईट केलं नाही. तरीही त्याला नरकात जावे लागले. त्याची ही अशी अवस्था काहीही नाही केलं म्हणून झाली होती.
          समाजात वावरत असताना आपल्या डोळ्यासमोर अन्याय, भ्रष्टाचार, पिळवणूक इत्यादी गोष्टी घडतात, तरीसुद्धा आपण शांत व डोळस नजरेने त्याच्याकडे बघतो. हे सुद्धा एक तऱ्हेचे पाप आहे, असे संत लूक आपल्याला सांगत आहे. गरिबांना मदत करणे म्हणजे, आपल्या विपुलतेतून त्यांच्या उदर निर्वाहासाठी पैसे किंवा साधन सामुग्री देणे हे नाही. तर त्यांच्यामधील असलेल्या कलागुणांना वाव देऊन त्यांच्यामधील असलेली कुवत जाणून, त्यांना त्यांचा हक्काचा हक्क मिळवून देणे, म्हणजेच त्यांना मदत करणे होय. त्यांना पैसे देऊन कमकुवत बनवण्यापेक्षा त्यांना त्यांचा हक्क देऊन ताकदवान  बनवून त्यांना त्यांच्या पायावर उभे राहण्यास मदत करणे होय.
          येशूने आपल्या जीवनात नेहमी सर्वांना समान लेखले. कोणाला उच्च किंवा तुच्छ लेखले नाही. समानता हा धडा येशू आज आपल्याला देत आहे. अन्यायाविरुद्ध वाचा फोडणे किंवा इतरांच्या हक्कासाठी लढणे हा धडा आज आपल्याला देण्यात आला आहे. देवाच्या राज्यात बसायचे असेल तर दुसऱ्याला खाली पाडून बसता येणार नाही. याउलट दुसऱ्याला आपल्या बरोबरीने वागवण्यात देवाच्या राज्यातील मेजवानीत सहभागी होता येईल. पैशाची गाठोडे डोक्यावर घेऊन खाली दाबले जाण्याऐवजी, एकीची, समतेचे नाते जोडून एक भावनेने जीवन जगण्यात आपले सार्थक आहे.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे प्रभू, तुझ्या लेकरांची प्रार्थना ऐक.’

१. आपले परमगुरु, महागुरू, सर्व धर्मगुरू व व्रतस्थ यांच्यात, ऐकीची भावना निर्माण होऊन, ती इतरांना देता यावी व इतरांना त्याप्रमाणे मार्गदर्शन करता यावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. सर्व राजकीय नेत्यांनी प्रभू  येशू ख्रिस्ताचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून, त्यांचे जीवन लोकांच्या सेवेसाठी समर्पित करावे, म्हणून आपण प्रार्थना.
३. "त्यांनी सर्वांनी एक व्हावे" अशी ही प्रभू येशूची भावना आपल्यामध्ये निर्माण व्हावी व आपल्यामधील असलेला भेदभाव नष्ट व्हावा, म्हणून आपण प्रार्थना करू या.
४. जे कोणी देवापासून दुरावलेले आहेत, त्यांनी मागे वळून परत येशूला आपला राजा म्हणुन स्विकारावे व आपले जीवन प्रभूची सुवार्ता पसरविण्यासाठी समर्पित करावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. आपण ख्रिस्ताला स्विकारावे व त्याच्या मुंल्यावर आपले जीवन जगून, तोच ख्रिस्त इतरांच्या जीवनात आणण्याचा सदैव प्रयत्न करावा, म्हणून आपण प्रार्थना करूया.
६. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.

Friday 20 September 2019


Reflection for the Homily of 25th SUNDAY IN ORDINARY TIME (22-09-2019) By Br Suhas Fereira .

सामन्य काळातील पंचविसावा रविवार


दिनांक: २२/०९/२०१९                          
पहिले वाचन:  अमोस ८:४-७
दुसरे वाचन: तीमथ्यीला दुसरे पत्र २: १-८
शुभवर्तमान: लुक १६: १-१३

प्रस्तावना:

          ख्रिस्ताठायी जमलेल्या माझ्या प्रिय बंधू-भगिनीनो आज देऊळ माता सामान्य काळातील पंचविसावा रविवार साजरा करीत आहे. आजची उपासना हि आपल्या प्रत्येकाला देवाशी एकनिष्ठ व सलग्न राहण्यासाठी उपदेश करीत आहे.
          आजचे पहिले वाचन आपणास न्यायाचा धडा शिकवित आहे. प्रवक्ता अॅमोस हा त्या काळी चालत असलेल्या अन्यायाविषयी विशेषतः गरीब आणि गरजवंतावर होणाऱ्या अन्याया विरुध्द लोकांना ताकीद देतो. दुसऱ्या वाचनाद्वारे आपल्याला प्रार्थने विषयी सांगण्यात येते. प्रार्थना हे एक मौल्यवान आणि शक्तिशाली साधन आहे. प्रार्थनेद्वारे आपल्या सर्वांचे जीवना सुखमय बनत असते. देव हा एकच आहे आणि आपण त्याच देवाची प्रार्थना करीत राहिलो पाहिजे. आजचे शुभवर्तमान हा एकच उपदेश देत आहे की, आपण एकाच धन्याची चाकरी करायला हवी. एकाच वेळी आपण दोन धन्याची चाकरी करू शकत नाही.
          परमेश्वर जो स्वर्गीय पिता, एकच महान देव आहे त्याची नित्यनियमित पणे सेवा करण्यासाठी आपण सर्वाना विशेष कृपा लाभावी. तसेच आपण सर्वजण प्रभूची चांगली मुले-मुली बनून एक चांगली  ख्रिस्तीव्यक्ती म्हणून आदर्श जीवन जगावे यासाठी परमेश्वराकडे विशेष प्रार्थना करूया.

सम्यक विवरण:

पहिले वाचन: अमोस ८:४-७

          आजचे पहिले वाचन  हे अमोस ह्या संदेष्टाच्या पुस्तकातून घेतले आहे. ह्या वाचनाद्वारे आपण ऐकतो की, जे धनी, मोठे व्यापारी होते ते गोरगरीबांना फसवत असत. व्यापारी हे मुद्दाम पूर्णिमा संपल्यानंतर म्हणजेच अमावस्येच्या काळामध्ये व्यवहार करोत असत. जेणेकरून त्यांना मालाच्या मोल-तोल करण्यामागे तसेच किमतीमध्ये घोटाळा करण्यात यश येत असे.

दुसरे वाचन: तीमथ्यीला  दुसरे पत्र २: १-८

          दुसऱ्या वाचनामध्ये संत पौल आपणास प्रार्थने विषयी सांगताना म्हणतो की, प्रार्थना हि सर्वांसाठी करायला हवी, जेणेकरून आपण सर्वजण सुखमय आणि चिंताहीन जीवन जगू शकतो. आपण कोठेही असलो तरी आपण आपले दोन्ही हात परमेश्वराकडे उंचावून मनात कोणताही संकोच, राग, मत्सर न ठेवता  प्रार्थना केली पाहिजे.

शुभवर्तमान: लुक १६: १-१३

          आजच्या शुभवर्तमानामध्ये येशू ख्रिस्त आपल्याला ‘बेईमानी’ चाकराचा दाखला सांगत आहे. जो कोणी लहान गोष्टीमध्ये एकनिष्ठ राहू शकत नाही तो मोठ्या गोष्टीमध्ये सुद्धा एकनिष्ठ राहू शकत नाही आणि जो कोणी लहान गोष्टीमध्ये एकनिष्ठ असतो तो मोठ्या गोष्टीमध्ये सुद्धा एकनिष्ठ असतो. तसेच प्रभू येशू सांगत आहे की, आपण एकच वेळी ‘देव’ आणि ‘संपत्ती’ दोघांची सेवा करण्यास असमर्थ आहोत. त्यामुळे एकाच धन्याची चाकरी करा. देवा जो सर्व सामर्थ्याचा परमेश्वर आहे  त्याच्याशी एकनिष्ठ राहा.

मनन चिंतन:

          जर आपल्याला जीवनामध्ये एखादी गोष्ट करायची असेल,  तर त्या गोष्टीची सुरुवात हि लहान कामाद्वारे करावी लागते. उदाहरणार्थ, जर आपल्याला एखाद्या डोंगराचा कळस गाठायचा असल्यास सर्व प्रथम आपल्याला लहान लहान पाउलाद्वारे डोंगराच्या पायथ्याने सुरुवात करावी लागते. तसेच एक-दोन पावलांनी डोंगरचा कळस गाठता येत नसतो. अगदी तसेच आपल्या जीवनात हि घडत असते. आपल्याला जर का एखादी गोष्ट आपल्या जीवनामध्ये घडवायची असेल, उदाहरणार्थ आपल्याला एखाद्या क्षेत्रात करिअर घडवायचे आहे, तर त्यासाठी लहान लहान गोष्टी करून सुरुवात करावी लागते. कुणीही एका रात्रीमधून श्रीमंत होत नसतो.
          मोठ्या मोठ्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी करत असलेल्या लहान-सहान गोष्टीमध्ये आपण नेहमी प्रामाणिक असणे अत्यंत गरजेचे आहे. जर आपण लहान-लहान गोष्टीमध्ये सुद्धा प्रामाणिक नसलो तर मोठ्या गोष्टीमध्ये प्रामाणिक पणाची अपेक्षा करणे व्यर्थ आहे.
          एकदा एक मुलगा एका मुलीच्या प्रेमात पडतो. त्याला ती मुलगी खूप आवडत असते. ती  ही त्याच्या प्रेमाला होकार दर्शविते थोड्याच दिवसात तो मुलगा दुसऱ्या मुलीच्या प्रेमात पडतो. ती ही मुलगी त्याच्या प्रेमाला होकार देते. थोड्याच दिवसात दोन्ही मुलीना आपला  प्रियकर एकच असल्याचे  समजते आणि दोन्ही ही मुली त्याला दिसून येतात .
          ख्रिस्ताठायी जमलेल्या माझ्या प्रिय बंधू-भगिनीनो, आपण एकच वेळी दोन धन्याची नोकरी करू शकत नाही. पाय ठेवायचा असल्यास दोन्ही पाय एकाच बोटीमध्ये ठेवा. एक पाय ऐका बोटीत  आणि दुसरा पाय दुसऱ्या बोटीत  ठेवल्यास त्याचा परिणाम काय होणार आपल्याला ठाउकच आहे.        
          आजच्या शुभवर्तमानात येशू हि आपल्याला तोच बोध देत आहे. येशू म्हणतो, तुम्ही एकाच वेळी देवाला आणि संपत्तीला महत्व देऊ शकत नाही. एकतर देवाला तुमचा वेळ दया नाहीतर संपत्तीच्या मागे जा. आजकालची परिस्थिती अशीच झाली आहे.आपण एकाच वेळी भरपूर गोष्टी करायला शिकलो आहोत. इग्रजी मध्ये म्हणतात कि, (multitasking) आपण चर्च मध्ये दर रविवारी येतो. परंतु आपले थोडे लक्ष फादरांवर थोडे इतरांवर, थोडे घरी काय चालले असेल त्याच्यावर आणि सर्वात जास्त लक्ष म्हणजे जिवलग मित्र मोबाइलवर. वॉटसप, फेसबुक, इंस्टाग्राम, टिक टॉक, हे जणू आपल्या आयुष्याचे अविभाज्य घटक झालेले आहेत. आपण शरीराने देवळामध्ये प्रवेश तर करतो पण मन मात्र इतर गोष्टींवरच वेधलेले असते. आपण आपल्या स्वत:चीच फसवणूक करत असतो.
          आज देऊळ माता आपल्याला कणखरपणे सांगत आहे, जगातील ऐहिक गोष्टीमध्ये गुरफटून आयुष्य कमी बनविण्यापेक्षा आपल्या संपूर्ण हृदयाने, मनाने व शरीराने देवाला समर्पित व्हा. तोच एक परमेश्वर तोच एक आपला तारणकर्ता आहे. आणि त्याच्याद्वारे आपणाला सार्वकालीन जीवन प्राप्त होणार आहे. त्याच एका धन्याची चाकरी करा, त्यालाच शरण जा.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: ‘हे प्रभू मारिया मातेसह आम्ही विनवितो’

(१)  आपले पोप फ्रान्सीस, सर्व बिशप्स, धर्मगुरू, धर्मबंधू, धर्मभगिनी तसेच ख्रिस्ती धर्माची धुरा वाहणारे सर्व मिशनरी कार्यकार्त्यावर प्रभूचा आशिर्वाद नेहमी राहावा, तसेच त्यांना त्याच्या कामामध्ये नेहमी प्रभूचे सामर्थ व शक्ती लाभावी म्हणून प्रार्थना करूया.
(२) आपल्या धर्म ग्रामातील युवक-युवती जे देऊळ माते पासून दूर गेलेले आहेत, ते देवाच्या जवळ यावे, देवाच्या दैवी कृपेचा अनुभव त्यांना यावा व त्यांनी त्यांचे जीवन देऊळमातेच्या नियमाप्रमाणे जगावे आणि इतरांना आदर्श दयावा म्हणून आपण विशेष प्रार्थना करूया.
(३) आपल्या कुटुंबातील आजारी व्यक्तींना प्रभूच्या आत्म्या द्वारे चांगले आरोग्य लाभावे व त्यांचा आजार बरा व्हावा, तसेच त्यांच्या आजारामध्ये त्यांनी नेहमी परमेश्वाचा धावा करून परमेश्वराच्या अधिक जवळ यावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
(४) आज विशेषता प्रार्थना करूया आशा लोकांसाठी ज्यांना पावसाच्या पाण्यामुळे अतिशय हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या आहेत. पुरामध्ये अनेक लोकांची विविध प्रकारची हानी झाली आहे. या सर्व लोकांना योग्य ते सहकार्य लाभावे व इतर सर्व प्रकारच्या आपत्ती पासून त्यांचे रक्षण व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
(५) आज ज्या ज्या लोकांचे वाढदिवस आहेत त्या त्या लोकांना परमेश्वराचा विशेष असा आशिर्वाद मिळावा व अशा प्रकारचा दिवस त्यांच्या जीवनामध्ये नेहमी यावा म्हणून प्रार्थना करूया.
(६) थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक हेतूसाठी प्रार्थना करूया.




                                                   

Thursday 12 September 2019


Reflection for the Homily of 24th SUNDAY IN ORDINARY TIME (15-09-2019) By Br Roshan Rosario.



सामान्यकाळातील चोविसावा रविवार


                                                                                                                              दिनांक: १५/०९/२०१९
पहिले वाचन: निर्गम ३२: ७-११, १३-१४.                                
दुसरे वाचन:  १तिमथी १: १२-१७.
शुभवर्तमान: लूक १५: १-३२.                                                                    

क्षमा व नवजीवनाची आशा

प्रस्तावना:

आज आपण सामान्यकाळातील चोविसावा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना आपणास क्षमा व नवजीवनाची आशा याविषयी सांगत आहे.
परमेश्वर हा दयेचा सागर आहे व तो आपल्या लोकांस त्यांच्या अपराधांची क्षमा करतो. तो त्यांस नवजीवनाची
संजीवनी देतो.  हिच शिकवणूक आजच्या तिन्ही वाचनांत आपणास पहावयास मिळते. निर्गम ह्या पुस्तकातून घेतलेल्या पहिल्या वाचनात आपण ऐकतो कि इस्त्रायली जनतेने देवाच्या पहिल्या म्हणजेच एकाच देवाची पूजा कर मूर्ती पूजा करू नकोह्या आज्ञेचा भंग केला तरीही देवाने त्यांना करुणामयी अंतःकरणाने क्षमा केली.
          दुसऱ्या वाचनात संत पौल मी ख्रिस्ताचा आणि ख्रिस्तीजनांचा जरी छळ केला तरीही परमेश्वराने मला क्षमा केली व त्याचा सुवार्ताप्रचार करण्यास पात्र केले अशी साक्ष देतो. तर लुकलिखीत शुभवर्तमानात येशु करुणामयी परमेश्वराच्या दयेचा आरसा आहे हे तीन दाखल्यांद्वारे स्पष्ट होते.
परमेश्वर केवळ आपल्या चुकांची क्षमा करीत नाही तर तो सर्व पापी लोकांस जे त्याच्यापासून बहकले आहेत अशांना त्याच्या जवळ येण्यास आमंत्रण देत आहे. आपण दैवी करुणेचे वर्ष साजरे करीत असताना परमेश्वराची दया, करुणा, आपल्या जीवनात अनुभवावी व तिच दया, करुणा इतरांपर्यंत पोहचवावी म्हणून ह्या मिस्साबलीदानात प्रार्थना करूया.

सम्यक विवरण

पहिले वाचन: निर्गम ३२: ७-११, १३-१४

          मानवी निष्ठा व भक्ती हे क्षणभंगुर असते हे आजच्या पहिल्या वाचनात दिसून येते. एका क्षणी देव परमेश्वर इस्रायल लोकांमध्ये अदभूत कार्य करून त्यांची मिस्सर राष्ट्रांत सुटका करतो. तर दुसऱ्या क्षणात इस्रायल हे देवाची कृपा विसरून दुसऱ्या देवाची पूजा करतात. इस्रायल लोकांचा हा हट्टीपणा त्यांना देवाची अपार कृपा स्वीकारण्यास एक बाधा निर्माण करते. पण इस्रायल लोक जरी अनिष्ट पणाने वागले तरी देव जो दयाळू आणि नीतिमान आहे, तो मोशेच्या मध्यस्तीद्वारे इस्रायली लोकांस माफ करतो.

दुसरे वाचन: १तिमथी १: १२-१७

संत पौल तिमथीला पहिल्या पत्रात आपल्याला लाभलेल्या परमेश्वरी कृपेबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत आहे. शौलाचा पौल हा केवळ ईश्वरी कृपेमुळेच झाला. शौल हा ख्रिस्ताला अज्ञात होता, त्यामुळे तो ख्रिस्ती जनांचा छळ करीत असे. शौल ख्रिस्ती विश्वासात रमला नव्हता; शौल परमेश्वरापासून जरी दूर असला तरीही परमेश्वराने त्याचा पाठलाग सोडला नाही. परमेश्वराने त्याला आपली दया दाखविली व ख्रिस्तीलोकांचा छळ करणाऱ्या शौलाचे परिवर्तन ख्रिस्ती श्रद्धेचा प्रसार करणाऱ्या पौलमध्ये झाले. त्यामुळे पौल म्हणतो, ‘आपल्याला प्रभूची कृपा विपुल झाली’. पौल पापी असूनही परमेश्वराचा अनुयायी करणारा झाला व ख्रिस्त ह्या पापी लोकांसाठी ह्या जगात आला हि बाब परमेश्वराला आपल्या प्रजेस पटवून द्यावयाची होती म्हणून त्याने पौलाची निवड केली.
                
शुभवर्तमान: लूक : १५: १-३२

          लूकच्या शुभवर्तमानातील अध्याय १५ हा परमेश्वराच्या दयेच्या दाखल्यांनी भरलेला आहे. येशू आपल्या शिकवणुकीत ३ दाखले देतो:  ‘हरवलेल्या कोकराचादाखला, ‘हरवलेल्या नाण्याचादाखला व उधळ्या पुत्राचादाखला. परुशी लोक, ज्यांना समाज्यातील पापी आणि पश्चाताप  न करणारे समजत. आशा लोकांबरोबर येशू मिळून मिसळून राहत असे. त्यामुळे ते त्याच्यावर सतत टीका करत असत. येथे तीन दाखल्यांच्या संदर्भाने येशू हा संदेश देत आहे कि हरवलेला पापी परत पूर्वस्थितीवर आल्याने देवाला मोठा आनंद होतो. म्हणूनच हरवलेल्यांना शोधावे व त्यांचे तारण करावे हीच येशूची सेर्वोच्च इच्छा आहे.   

मनन चिंतन:

आजच्या शुभवर्तमानात देव हा संदेश देतो कि, जरी आम्ही कितीही वाईट मार्गाने भटकून गेलो तरी, देवाचे आमच्यावरील प्रेम कमी होत नाही. जेव्हा येशू हा जकातदार व पापी ह्याच्या संगतीत जात असे तेव्हा परुशी कुरकुर करत असत, ते म्हणत असत कि, हा पाप्यांना जवळ करून त्यांच्याबरोबर, त्यांची ह्या तक्रारीला उत्तर देण्याकरता येशूने तीन दाखले दिले. ते म्हणजे हरवलेल्या मेढराचा, हरवलेल्या नाण्याचा व उधळ्या पुत्राचा. ह्या दाखल्या द्वारे प्रभू येशू आज आम्हाला असा संदेश देतो कि मनुष्याचा पुत्र हरवलेल्यांस शोधण्यास व तारावयास आला आहे. (लुक १९:१०) ह्या तीन दाखल्यांतून आपल्याला देवाच्या प्रेमाचे तीन पुरावे दिसून येतात.
देव आपल्याला निवड करण्याचा व आपल्या इच्छा पूर्ण करण्याचा हक्क देतो. धाकट्या मुलाने बाबाला मालमतेचा आपला भाग विचारला पण बाबाने काहीही न विचारता त्याला त्याचा भाग दिला ह्याच्यातून आम्हाला कळते कि, देव आम्हाला आमचा मार्ग निवडण्यास संधी देतो तो आमच्या राजी कुशीला नाकार न देऊन आमच्या वर कोणत्याहि प्रकारची सक्ती करत नाही. देव आम्हाला आमच्या निवडलेल्या मार्गावर जायला देणार, तो चुकीचा असेल तरी पण, कारण हेच खरे प्रेम आहे.
देव आम्हाला शोधतो:
 हा विषय आपल्याला तिनी दाखल्यांमध्ये दिसून येतो. आपला परमेश्वर आपल्याला सदैव सुधारण्यास त्याच्याजवळ येण्यास व त्याचा प्रेमाचा अनुभव घेण्यास संधी उपलब्ध करीत असतो. पण कित्येकदा आपण ह्या जागतिक मोहमायेत एवढे गुरफटून जातो की, आपणास परमेश्वराची वाणी ऐकुच येत नाही त्यामुळेच पोप जॉन पौल दुसरे म्हणतात की, ‘आज सर्वात मोठे पाप म्हणजे मानवाच्या मनात अपराधीपणाची भावनाच शिल्लक राहिली नाही, त्यास पाप ही भावनाच नकोशी वाटते व त्याने पाप केलेच नाही असे वाटते. देव केवळ आपल्या पापांची क्षमाच करीत नाही तर सर्व पापी लोकांना तो आपणाकडे आमंत्रित करतो, त्यांना क्षमा करतो, फक्त आपण सर्वांनी दु:खी अंतःकरणाने त्याच्यापाशी गेले पाहिजे. हाच आपला ख्रिस्ती विश्वासाचा आकर्षित करणारा गाभा आहे. परमेश्वर आपल्या सर्व अपराधांची आपणास क्षमा करतो. जे लोक अंधकारात गुरफटलेले आहेत एकमेकांविरुद्ध पाप करत आहेत, परमेश्वर अशा लोकांच्या मदतीस सर्वप्रथम धावून येतो. त्यास पश्चाताप करण्यास पुकारीतो व पापक्षमा मिळवून देतो. त्यामुळेच येशू सर्व जकातदार व पापी मनुष्यांबरोबर जेवावयास बसतो, कारण जेवणास एकत्र बसणे म्हणजे, बसलेल्या लोकांशी संलग्न होणे, त्यांस आपले मानून घेणे. येशू हा पाप्याच्या तारणासाठी ह्या भूतलावर आला होता. त्यामुळे शास्त्री व परुशी येशूवर आक्षेप घेतात. ते फक्त कायद्याचे पालक होते, त्यांच्या ठायी दया, करुणा नव्हती. येशू मात्र परमेश्वराची दया, करुणा सर्व लोकांपर्यंत पोहचवत होता, विशेषतः पापी व समाज बहिष्कृत जनांपर्यंत. ख्रिस्त हा पापी लोकांसाठी एक आशेचे किरण होता. व तो आजही आपणा सर्वांसाठी आशास्थान आहे.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
                                                                                                              
प्रतिसाद:     हे परमेश्वरा दया कर आणि तुझ्या लोकांची प्रार्थना ऐक.’        

१. परमगुरुस्वामी, महागुरूस्वामी, धर्मगुरू व सर्व व्रतस्थ ह्यांनी परमेश्वराच्या महान व दैवी दयेचा व करुणेचा आदर्श ठेवून त्याच दयेचा व करुणेचा प्रचार सर्वत्र करावा म्हणून प्रार्थना करूया.
२. जे लोक परमेश्वरापासून दूर गेले आहेत वाईट मार्गाला लागले आहेत, वर्षानुवर्षे पापांत खितपत पडलेले आहेत अशांना परमेश्वराचा अनुभव यावा, त्यांनी कुमार्गांना सोडून परमेश्वरापाशी ते परत यावेत म्हणून प्रार्थना करूया.
३. जगात आज शांती पसरावी, हिंसा, भ्रष्टाचार, द्वेष यांचा विनाश व्हावा म्हणून प्रार्थना करूया.
४. जी कुटुंब दुभंगलेली आहेत अशा कुटुंबात सलोखा निर्माण व्हावा आपापसातील मतभेद बाजूला सारून एकमेकांना क्षमा करावी व ख्रिस्ती जीवनाचा आदर्श व्हावेत म्हणून प्रार्थना करूया.
५. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक गरजांसाठी प्रार्थना करूया.


Friday 6 September 2019



Reflection for the Homily of 21th SUNDAY IN ORDINARY TIME (08-09-2019) By Br David Gudinho 







धन्य कुमारी मरीयेचा जन्म दिवस



दिनांक: ८/९/२०१९
पहिले वाचन: मीखा  ५: १-४
दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ८: २८-३०
शुभवर्तमान: मत्तय १: १-१६, १८-२३

प्रस्तावना:

          प्रिय बंधू- भगिनीनो, आज आपणा सर्वांना खरोखर आनंद होत आहे,  कारण गेले नऊ दिवस मरीया मातेची भक्ती करून आज त्या मातेचा जन्मदिवस मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा करण्यास आपण येथे जमलो आहोत.
          मरीयेचा जन्म दिवस म्हणजे ख्रिस्ताच्या जन्माची घोषणा आहे, हे आपण मिखा प्रवक्ताच्या पुस्तकातून घेतलेल्या वाचनात ऐकणार आहोत. मरीयेच्या आगमनाने इस्त्रायलच्या तारणासाठी केलेली प्रतीक्षा आता संपलेली आहे आणि तारणाची पाहट झालेली आहे.
          आज ह्या मरिया मातेचा आपल्या आईचा जन्मदिवस  साजरा करीत असताना, आपणही आपल्या जीवनात मरीयेप्रमाणे, आपल्या शब्दाद्वारे, कृतीद्वारे परमेश्वराच्या इच्छेला आपल्या जीवनात प्रथम स्थान देवून, परमेश्वराचे कार्य पूणर्त्वास नेण्यास, मारिया मातेच्या मध्यस्तीने, परमेश्वर चरणी मोठ्या श्रद्धेने व विश्वासाने प्रार्थना करूया.

सम्यक विवरण             

पहिले वाचन: मीखा  ५: १-४

          आजचे पहिले वाचन मीखा प्रवक्ताच्या पुस्तकातून घेतले आहे आणि मीखा ५:२ ह्या ओवीत  आपणास मसिहा म्हणजे तारणाऱ्या विषयी सांगतात. यहुदी लोकामध्ये अशी समज होती की मीखा प्रवक्त्याच्या पाचव्या अध्यायात दुसऱ्या ओवी मध्ये तारणाऱ्या विषयी सांगितले आहे. म्हणून जेव्हा हेरोद राजाने विचारपूस केली तेव्हा यहुदी लोकांच्या प्रमुख व्यक्तींनी मीखा प्रवक्त्याच्या पुस्तकातून  ओवी ५: २ हा संदर्भ दिला होता. (मत्तय २:६) म्हणून हा मीखा प्रवक्त्या मधील ५:१-४  हा उतारा विशेष करून ख्रिस्त जो तारणारा आहे त्याच्या आगमना विषयी स्पष्टपणे बोलत आहे.

 दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ८: २८-३०

          रोमकरांस लिहिलेल्या पत्रात संत पौल आपणास सांगतो की, जो मनुष्य देवावर प्रीती करतो आणि त्याच्या योजनेप्रमाणे किंवा संकल्पनेप्रमाणे जीवन जगतो त्या मनुष्याला स्वर्गाच्या राज्याची दारे  उघडलेली असतील, तसेच तो पुढे सांगतो की, परमेश्वराने त्याच्या योजने प्रमाणे आपणा प्रत्येकास पाचारण केलेले आहे. ह्या पाचारणास स्व:खुशीने होकार देण्यास आपणांस आजचे हे दुसरे वाचान प्रोत्साहन करीत आहे. 

शुभवर्तमान: मत्तय:१;१-१६, १८-२३/ १८-२३

          मत्तय लिखित शुभवर्तमानातून घेतलेल्या ह्या उताऱ्यात आपणास येशूच्या वंशावाळीची माहिती दिलेली आहे आणि पवित्र मारिया कशा प्रकारे प्रभू येशूची आई झाली ह्या विषयी सांगण्यात आलेले आहे. वंशावळ सांगण्याचा मागचा हेतू येशू हा अब्राहामाच्या व दाविदाच्या वंशावळीतून जन्मलेला आहे असा आहे. आणि अशाप्रकारे परमेश्वराने केलेली भाकीत आज पूर्ण झाले आहे. ओवी १८-२३ मध्ये आपणास प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माविषयी सांगितलेले आहे. हा उतारा वाचताना आपणास समजेल कि येशूचा जन्म हि दैवी योजना होती आणि ह्या दैवी योजनेला पूर्ण करण्यासाठी योसेफ आणि मारीयेच्या संमतीची अत्यावशक गरज होती. ह्यास्तव परमेश्वराचा दूत प्रभू येशूच्या जन्माबद्दल घोषणा करतो हे  नमूद केले आहे.

मनन चिंतन:

          आज जगभरात कॅथोलिक ख्रिस्तसभा पवित्र मारीयेचा जन्मदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करीत आहे. आपली  देऊळ माता येशूख्रिस्त, मारिया माता व संत योहान बाप्तीस्ता, फक्त ह्या तीन व्यक्तीचा जन्मदिवस साजरा करते. म्हणून आजची उपासना पवित्र मारीयेच्या जन्माविषयी मनन चिंतन करण्यासाठी आपणास बोलावत आहे.
          उत्पतीच्या पुस्तकात ३:१५ मध्ये आधीच पवित्र मारीयेच्या जन्माविषयी लिहून ठेवलेले आहे व भाकीत केले आहे. परमेश्वराने सापाला  सांगितले कि, एक स्त्री तुझे डोके तिच्या पायाने ठेचेल आणि म्हणूनच आपण मारीयेचे चित्र पाहतो जेथे मारिया तिच्या पायाने सापाचे डोके ठेचताना दिसते.
          बायबल मध्ये मारीयेच्या जन्माविषयी आपणास जास्त माहीती मिळत नाही. परंतु, बायबलची पाने जर का आपण चाळली त आपल्या लक्षात येईल कि, मारियेला झालेले पाचारण हे, ख्रिस्ताला किंवा तारणाऱ्याला ह्या जगात आणण्यासाठी होते. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर ख्रिस्ताची आई होण्यासाठी तिचा जन्म झाला होता, आणि मानवजातीला ख्रिस्त देणे आणि ख्रिस्ताकडून देवाकडे  नेणे हा त्या मागचा हेतू होता. म्हणून आपण पाहतो कानागावी लग्नात द्राक्षरसाची कमतरता भासू लागली तेव्हा मारीयेने सेवकांना ख्रिस्ताकडे पाठविले तो सांगेल तसे करा असे त्यांना सांगितले. अशाप्रकारे सतत मारिया पवित्र ख्रिस्त सभेला तिच्या पुत्राकडे आणण्यास  प्रयत्न करीत असते.
          संत अगस्तीन म्हणतात मारीयेचा जन्म परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या तारणाच्या कार्याशी जोडला गेला आहे. तो म्हणतो कि, हे पृथ्वी हर्ष कर आणि मारीयेच्या जन्मात प्रकाशमय हो. तो पुढे म्हणतो कि, ती (मारिया) एका बागेतील फुलासारखी आहे, जिच्यातून अनमोल अशी लिलीची काळी फुललेली आहे. तिच्या जन्माने जो कलंकित मानवी स्वभाव आपल्या पहिल्या आई-वडिलांकडून आपणास मिळाला होता तो आता नष्ट झाला आहे, किव्हा बदललेला आहे.     
          आजच्या मिस्साच्या सुरवातीची प्रार्थना आपणास पवित्र मारीयेचा जन्म हा आपल्या तारणाची पहाट आहे असे सांगत आहे. म्हणजे देवाने मारियेला आपल्या तारण योजनेत एक महत्वाची कामगिरी बजाविण्यासाठी निवडून घेतले, हि तारण योजना कोणती? आदाम-एवा ह्याच्यापापामुळे देव- मानवांचा संबंध तुटला होता. मानव देवापेर्यत पोहचू शकत नव्हता. मानवाला स्वर्गाचे दार बंद झाले होते. मानव देवाकडून कसलीही कृपा मिळवू शकत नव्हता. परंतु मनुष्याला त्याच्या हातून घडलेल्या पापांची क्षमा करून त्याला परत एकदा आपल्याशी जोडण्याचे देवाने वचन दिले होते. त्या वाचनाच्या पूर्ततेसाठी देवाने मानव होण्याचे ठरविले. देव मानव बनून, देव आणि मानव, ह्यामधील दरी बुजून टाकणार होता. आणि त्यासाठी देवाला मानवी आई हवी होती, म्हणून देवाने मारीयेची निवड केली. आपले देवा बरोबरचे संबंध पुनर्स्थापित करणे हि योजना म्हणजे आपल्या तारणाची योजना होय, ह्या योजनेतून देवदूताच्या निरोपाच्या वेळी मारीयेने दिलेल्या होकारात मारीयेचे तारण कार्यातील सारे सहकार्य सामावले आहे. म्हणजेच सुरवातीला सांगितल्याप्रमाणे मारीयेचा जन्म हा तारणाऱ्याला जगात आणण्यासाठी झाला होता.
           मारिया हि कोणी सामर्थ्यवान देवी नाही जी भक्तांच्या मागण्या पूर्ण करते. ती तुम्हा आम्हा सारखी साधे सुधे जीवन जगलेली एक स्त्री होय. मारिया देवाची व आपली आई. तिच्याद्वारे आपल्याला ख्रिस्ताची मैत्री व जीवन लाभते. म्हणून मारीयेची भक्ती देवभक्तीच्या आड येत नाही परंतु तिला सर्व शक्तिमान देवी बनविणे चुकीचे आहे. म्हणून मारीयेची भक्ती योग्य आहे किवा नाही हे पडताळून पाहण्यासाठी पुढील  निकषांचा आपण उपयोग करावा. १) तिच्या भक्तीने आपली ख्रिस्त भक्ती म्हणजेच ख्रीस्तावरची श्रद्धा, आज्ञापालन, दुख, सहनशक्ती हि वाढली पाहिजे. (२) तिच्याठायी आपल्याला देवाचे मातृ हृदय अनुभवायला मिळाले पाहिजे. (३) एक दिवस तिच्या सारखे स्वर्गात सदेह राज्य करण्याची इच्छा व आशा निर्माण झाली पाहिजे.  
          नऊ दिवस मारिया मातेची भक्ती करून आज त्या मारिया मातेचा, आपल्या आईचा वाढदिवस मोठ्या हर्षाने साजरा करीत असताना मारिया आई आपणा प्रत्येकास प्रभू येशूच्या तारण कार्यात आप- आपल्या पद्धतीने हातभार लावण्यास पाचारण करीत आहे. ज्याप्रमाणे तिने आपल्या जीवनात परमेश्वराच्या इच्छेस प्राधन्य दिले त्याच प्रमाणे आम्ही सुद्धा परमेश्वराची हाक एकूण त्या हाकेस स्व:खुशीने होकार देण्यास कृपा व शक्ती मागुया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: मारीयेच्या मध्यस्थिने, हे प्रभू, आमची प्रार्थना ऐक.’

(१) ख्रिस्त सभेचे मेंढपाळ पोप फ्रान्सीस, सर्व बिशप्स, धर्मगुरू व धर्मभगिनी ह्यांनी पवित्र मरिये प्रमाणे देवाच्या हाकेस होकार देवून प्रभू येशूचे कार्य मोठ्या उत्साहाने पूर्ण करण्यास त्यांस कृपा लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
(२) देशाचा देशकारभार  चालविण्यासाठी निवडून आलेल्या सर्व राज्यकर्त्यांनी स्वत:चा स्वार्थ न पाहता निस्वार्थीपणे जनतेच्या हितासाठी झटावे व भारताच्या संविधानानुसार देशाचा कारभार सुरळीतपणे चालविण्यास कृपा लाभावी म्हणून पवित्र मारीयेच्या मध्यस्थिने प्रभूकडे प्रार्थना करूया.
(३) पवित्र मारिया आपली आई, हिचा जन्मदिवस साजरा करीत असतांना आपण सर्व स्त्रीयांसाठी प्रार्थना करूया. आपल्या समाजात त्यांना मानाने व आदराने जगता यावे, सर्व गुलामगिरीतून त्यांची सुटका व्हावी व समाजात त्यांच्यावर होणाऱ्या अन्याया व अत्याच्यारा विरुद्ध झटण्यास मारीयेच्या मध्यस्थिने प्रभूकडे मागुया.
(४) नोव्हेण्याचे नऊ दिवशी असंख्य अशा मारिया भक्तांनी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मारीयेची भक्ती केलेली आहे. ह्या सर्व भाविकांच्या इच्छा-आकांक्षा प्रभू परमेश्वराने त्याच्या इच्छे प्रमाणे पूर्ण कराव्यात  आणि त्यांची श्रद्धा बळकट करावी म्हणून ईश्वर चरणी मारिया मातेच्या मध्यस्थिने प्रार्थना करूया.
(५) आपल्या वैयक्तिक व सामाजिक गरजा थोडा वेळ शांत राहून मारिया मातेच्या प्रभू चरणी ठेऊया.