Wednesday 30 July 2014











सामान्य काळातील अठरावा रविवार

पहिले वाचन: यशया ५५:१-३

दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ८:३५, ३७-३९

शुभवर्तमान: मत्तय १४:१३-२१


“आमच्याजवळ केवळ पाच भाकरी आणि दोन मासे आहेत.”

प्रस्तावना:
प्रिय भाविकांनो आज आपण सामान्यकाळातील अठरावा रविवार साजरा करीत असताना आजची उपासना आपणास स्वर्गीय मेजवानीसाठी आमंत्रण देत आहे. आजच्या पहिल्या वाचनाद्वारे यशया संदेष्टा ह्याच मेजवानीचे आमंत्रण देत असताना म्हणतो की, ‘माझे लक्षपुर्वक ऐका आणि उत्तम ते खा, तुमचा जीव पौष्टिक पदार्थांचे सेवन करून संतुष्ट होवो’. तर आजच्या दुस-या वाचनात संत पौल, ह्या जगातील कोणतीही दृश्य वा अदृश्य शक्ती आपल्याला देवाच्या प्रेमापासून विभक्त करू शकत नाही असे आपणास सांगत आहे.
यशयाने केलेल्या घोषणेची पूर्तता येशूद्वारे आजच्या शुभवर्तमानामध्ये होताना आपण पाहतो. आजच्या पवित्र मिस्साबलीदानात सहभागी होत असताना आपण आपल्या सर्व इच्छा, आकांक्षा आणि गरजा सर्व सामर्थ्यशाली प्रभूकडे विश्वासाने समर्पित करूया व त्याने दिलेल्या आमंत्रणाला होकार देऊन त्याच्या सार्वकालिक मेजवानीत सहभागी होऊया.
 
सम्यक विवरण:

पहिले वाचन: यशया ५५:१-३
यशया संदेष्टा ह्या अध्यायात लोकांना भव्य पंचपक्वान्नांच्या मेजवानीसाठी आमंत्रण देत आहे, ह्या शब्दांनी यशया जे इस्रायली लोक बंदिवासात होते त्यांना दिलासा देत परमेश्वरामध्ये आनंदोस्तव करण्यासाठी बोलावत आहे कारण तोच त्यांच्या गरजा भागवून त्यांना त्यांच्या होणा-या दु:खातून व वेदनांतून सोडवू शकतो.
हे आमंत्रण गरीब आणि श्रीमंत ह्या सर्वांसाठी आहे. ‘या’, ‘घ्या’ आणि ‘खा’ हे परमेश्वराचे स्वर्गीय भोजनासाठी आमंत्रण करण्यासाठी वापरलेले शब्द आहेत. परमेश्वर त्यांना ‘अन्न’ आणि ‘पाणी’ ह्या मुलभूत गरजांचाच पुरवठा न करता ‘दूध’ आणि ‘द्राक्षरस’ ह्या पदार्थांचे देखील विनामुल्य आनंद घेण्यास बोलावत आहे.

दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ८:३५, ३७-३९
वचन ३५-३९ ख्रिस्ताचे आमच्यावर असलेल्या प्रीतीचे वर्णन करतो. ह्या प्रितीपासून आम्हांला कोणीही वेगळे करू शकत नाही. पृथ्वीवरील कोणत्याही संकटाला अगर आपत्तीला हे करणे शक्य नाही, कारण ज्याने आपणावर प्रीती केली आहे त्याच्यायोगे ह्या सर्व गोष्टीत आपण महाविजयी ठरतो. तसेच देवाच्या प्रितीपासून आम्हांला विभक्त करणे कोणत्याही आत्मिक शक्तीला शक्य नाही (देवदूत, अधिपती ८:३८).

शुभवर्तमान: मत्तय १४:१३-२१
येशूने एकांतात जाण्याचा प्रयत्न केला हे आपण तेराव्या ओवीत वाचतो परंतु येशू आतापर्यंत खूप लोकप्रिय झाला असल्यामुळे असे कोणाला न समजता एकांतात जाणे अशक्य होते. लोकांचे त्याच्या मागे येणे व येशूने पाच हजार हजारांना जेवू घालणे हे येशूच्या दैविपनाचे व त्याच्या आपल्यावर असलेल्या आपलुकीचे चिन्ह आहे.

काही अडचणीवर मात करण्यास देवाच्या मध्यस्तीची गरज असते.
येशूच्या शिष्यांना कल्पना होती की लोक भुकेले आहेत व लोकांची भूक भागवण्याची त्यांना चिंता होती परंतु लोकांची भूक कशी भागवायची ह्या अडचणीवर त्यांनी एकदम साधा मार्ग निवडला आणि तो म्हणजे लोकांना शेजारच्या गावात पाठवून स्वत:साठी अन्न विकत घेण्यास सांगणे. कधी कधी देव आपल्यासाठी काय करू शकतो ह्याची आपल्याला पूर्ण कल्पना नसते. त्या निर्जन जागेत पाच हजारांना जेवू घालणे तसे अशक्यच होते परंतु लोकांची भूक भागवण्यासाठी देवाने या अगोदर मोशे, एलिया व एलीशाचा वापर केला होताच.
     ज्या जागेत सर्व लोक जमले होते त्याचा शेजारी काही गावं होती परंतु ती खूप छोटी गावं होती. ह्या छोट्या गावांना एवढ्या मोठ्या जनसमुदायाची गरज भागवणे जवळ जवळ अशक्य होते. अश्या परिस्थितीत आपल्याला एलीशाच्या शिष्यांनी विचारलेला प्रश्न व त्यावर त्यांना मिळालेल्या उत्तराची आठवण येते.
“शंभर लोकांना हे कसे काय वाढायचे?...लोकांना वाढ तर खरं! प्रभू म्हणतो ते खाऊन देखील काही उरेल!” (२ राजे ४:४३).“एलीयाद्वारे प्रभूने दिलेल्या संदेशानुसार तेचे पीठाचे गाडगे रिकामे झाले नाही किंवा तेलाची बुधली रिकामी पडली नाही”(१राजे १७:१६). येशूचे व एलीयाच्या शिष्यांना आपपल्या गुरूंकडे किती दैवी शक्ती आहे व ते त्या दैवी शक्तीने काय करू शकतात ह्याची कल्पना होतीच व ह्यावेळी इस्रायेलचा देव ज्याने समुद्राचे पाणी दुभंगून त्यात कोरडी जमीन तयार केली(निर्गम १४:२१, २राजे २:८), स्वर्गातून खाण्यास मान्ना दिला (निर्गम १६:१४-१८) तोच देव परत एकदा आपल्या प्रजेसाठी चमत्कार करण्यास तयार झाला होता.

बहुतेकदा प्रभू आपल्याजवळ जे आहे त्यापासून सुरवात करतो.
प्रभू आपल्याजवळ जे आहे ते घेऊन अनेक पटीने वाढवतो हे आपण आजच्या शुभवर्तमानातील १६-१९ व्या ओवीत पाहतो तर जेव्हा देवाने मोशेला यहुदी प्रजेकडे पाठवायचे ठरवले तेव्हा मोशेने देवाकडून त्याच्या प्रजेला दाखवण्यासाठी चिन्ह मागितले अश्यावेळी त्या वेळेला जी काठी मोशेच्या हातात होती त्याच काठीचे रुपांतर देवाने त्याच्या चिन्हात केले हे आपण निर्गमच्या पुस्तकात चौथ्या अध्यायातील एक ते तीन ह्या ओव्यांमध्ये पाहतो. त्याच काठीचा वापर पुढे समुद्राच्या पाण्याचे दोन भाग करण्यास वापर करण्यात आला.(निर्गम१४:१६). जेव्हा एका विधवा बाईने एलीशाकडे मदत मागितली तेव्हा एलीशाने तिला विचारले की ‘तुझ्या घरात काय आहे?’ व तिने उत्तर दिले “फक्त एका भांड्यात तेल आहे’ तेव्हा एलीशाने तिला आपल्या शेजाऱ्यांकडून रिकामी भांडी उसनी म्हणून आणायला सांगितली आणि ते सर्व भांडी भरेपर्यंत तेलाची पटीने वाढ केली.(२राजे ४:१-७).
येशूने भाकरी व मासे पटीने वाढवण्यासाठी प्रार्थना केली नाही कारण त्याचा पूर्ण विश्वास होता की असलेले जेवण पटीने वाढवून जनसमुदायाची भूक भागवणे हीच पित्याची इच्छा आहे. त्याने त्या भाकरी व मासे घेऊन भोजनागोदर फक्त आपल्या पित्याचे आभार मानले कारण यहुदी लोकांत जेवणा अगोदर देवाचे आभार मानण्याची प्रथा होती.

बोध कथा
एका देवाभिरू ख्रिस्ती कुटुंबात दररोज संध्याकाळी प्रार्थना होत असे व त्यांच्या प्रथेनुसार प्रार्थनेच्या वेळेला कुटुंबातील एक व्यक्ती पवित्र बायबल मधील छोटासा उतारा वाचत व त्यावर थोडे मनन-चिंतन करून छोटासा उपदेश देत. त्या ठराविक दिवशी त्या कुटुंबातील जॉनी नावाच्या ८ वर्षाच्या छोट्या मुलाची बायबल मधील उतारा वाचून त्यावर उपदेश करण्याची पाळी होती. त्या दिवशी त्याने मत्तयच्या शुभवर्तमानातील १४वा अध्याय १३-२१ ‘येशूचे पाच हजारांना भोजन’ हा उतारा वाचला. तो उतारा हळुवारपणे वाचत असताना कुटुंबातील सर्वजण विचार करीत होते की येशूच्या ह्या चमत्काराविषयी हा छोटा जॉनीआमाला काय उपदेश देणार?
उतारा वाचून झाल्यानंतर थोडा वेळ शांत राहून जॉनीने उपदेशास सुरवात केली. “येशूकडे पोहोचेपर्यंत त्या पाच भाकरी व दोन मासे तसेच राहिले परंतु जेव्हा त्या भाकरी व मासे येशूकडे पोहचल्या तेव्हाच त्यांची अधिक पटीने वाढ होऊ लागली. त्याचप्रकारे आपल्याकडे जे काही आहे ते आपण देवाच्या हाती सोपविले पाहिजे. ते कितीही साधे अथवा छोटे असले तरी एकदा का ते देवाच्या हाती पोहचले की ते अनेक पटीने वाढण्यास सुरवात होते व इथेच खऱ्या चमत्काराला सुरवात होते.” त्या छोट्या जॉनीचा हा उपदेश ऐकून सर्वांना कुतूहल वाटले व त्यांनी ह्या उपदेशाबद्दल त्याचे अभिनंदन केले.

मनन चिंतन
शुभवर्तमानात आपण पाहतो की, येशूच्या शिष्यांना लोकांची काळजी आहे. प्रभू येशुलासुद्धा लोकांची काळजी आहे. लोकांनी आपआपली गरज भागवावी अशी शिष्यांची  इच्छा आहे. त्यांनी स्वतः आपले जेवण विकत घ्यावे असे शिष्यांना वाटते. त्यांच्यापुढे केवळ आकडेवारी आहे. पाच हजार लोकांना जेऊ कसे घालायचे? हा त्यांना भार करतो. पण येशू निराळ्या तऱ्हेने पाहतो. लोकांची मुलभूत गरज म्हणजे भूक भागवायची आहे. हे कर्तव्य ज्यांना भूक लागली आहे त्यांचेच नाही तर ज्यांची पोट भरली आहेत त्यांचेही आहे. म्हणून येशू त्यांना सांगतो तुम्हीच त्यांना खावयास दया.
येशू ख्रिस्त आपला देव आहे. तो आपल्याला हुसकावून लावणारा देव नाही तर आपल्या गरजात आपल्याबरोबर राहणारा देव आहे. आपण त्याच्या मागे गेलो तर तो आपल्याला टाकून देणार नाही. ही माणसे आपल्या पोटापाण्याचा विचार न करता येशुमागे गेली होती. त्यांना येशू वाऱ्यावर सोडणार नाही हीच श्रद्धा महत्वाची आहे. पण त्याआधी आपण काट्या-कुट्यातून, अडी-अडचणीतून, उन्हा-तान्हातून येशुमागे जाण्यास तयार असावे. येशू आपल्या मुलभूत गरजा भागविल आणि त्या विपुल प्रमाणात भागविल.
येशू या गरजा कसा भागवतो? या प्रसंगी तो पाच भाकरी व दोन मासे घेतो. आशीर्वाद देतो आणि पुन्हा शिष्याकडे वाटण्यासाठी देतो. सर्व पोटभर जेवतात आणि सर्वांना पुरून उरते. चमत्काराचा विचार करण्यापेक्षा ही जी प्रक्रिया आहे तिचा विचार व्हायला हवा. ह्या प्रक्रियेची जगाला विशेषतः विकसनशील देशांना गरज आहे.
आपल्याकडे जे थोडेफार आहे ते देवाच्या नावात देत राहावे. त्यामुळे इतरांनाही उदार होण्याची प्रेरणा मिळेल. या देवाण-घेवनीतून आपल्या गरजा भागत राहतील. असं देण्यासारखं आपल्याकडे काय आहे? माणसाच्या गरजा भागवण्यासारखे सगळेच आहे. काहीकडे पैसा आहे तर काहीकडे धान्य आहे. काहीकडे कपडे आहेत तर काहीकडे इतर गोष्टी आहेत. वेळ तर सर्वांकडे आहे. सहानभूती सर्वांठायी आहे. या गोष्टींचा आपण योग्य प्रकारे वाटप केला तर आपल्या अनेक गरजा भागवल्या जातील. आपण तृप्त होऊ. देवाण-घेवेची नवी वृत्ती यायला हवी. साठवण्याची लपवून ठेवण्याची वृत्ती जायला हवी. यासाठी आपण प्रत्यकाने आजच्या शुभवर्तमानात ऐकल्याप्रमाणे आपल्याकडे जे काही आहे ते देण्यास सदैव पुढे यावे म्हणून देवाकडे विशेष कृपा मागूया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना :
प्रतिसाद: प्रभो आम्हाला तुझी भाकर दे.
  1. धर्मगुरू व प्रापंचिक हृदयाने जवळ यावेत, त्यांच्या एकात्मतेतून ख्रिस्तसभेची वाढ व्हावी व सर्वांमध्ये प्रचंड आत्मविश्वास निर्माण व्हावा, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
  2. ख्रिस्ताबरोबरची आपली एकात्मता, आपल्या एकमेकांवरील प्रेमातून आपण जगाला दाखवून द्यावी व त्यातूनच ख्रिस्तसभेचे मानवी हक्काचे कार्य प्रकट व्हावे, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
  3. आपल्या कार्याचे दर्शन या बलिदानातून दिसावे व कार्याचा उगम कॅथोलिक ख्रिस्तसभेच्या मार्गावरून व्हावा, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
  4. या मिस्साबलिदानाद्वारे आपण केवळ पापापासून दूर न राहता, सकारात्मक विचार करून आपण कार्य करावे, म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
  5. आपल्या वैयक्तिक हेतूंसाठी आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.



Tuesday 22 July 2014



Reflections for homily by: Cajeten Pereira



सामान्य काळातील सतरावा रविवार
पहिले वाचन  :१ राजे ३:५,७-१२   
दुसरे वाचन : रोमकरांस पत्र ८: २८-३०
शुभवर्तमान : मत्तय १३: ४४-५२
दिनांक : २७/०७/२०१४








“स्वर्गाचे राज्य एखाद्या शेतात पुरलेल्या गुप्त खजिन्यासारखे आहे.”

प्रस्तावना :
 देवाचे राज्य भौतिक सुखापेक्षा आणि प्रतिष्ठेपेक्षा महान आहे. आजची उपासना आपणाला स्वर्गाची श्रेष्ठता आणि तारणाचे मोल ह्याविषयी चिंतन करण्यास प्राचारित आहे. आजच्या पहिल्या वाचनात आपण ऐकतो की, शलमोन राजा देवाकडे स्वतःच्या भल्यासाठी वर न मागता लोकांचा योग्य न्याय करता यावा व राज्याची कार्यव्यवस्था प्रामाणिकपणे करता यावी म्हणून विवेकबुद्धी मागतो.
आजच्या दुस-या वाचनात संत पौल आपणास सांगतो की, आपल्या मृत्युनंतर स्वर्गप्राप्तीसाठी देव अहोरात कार्यशील आहे. तथापि जोपर्यंत आपण सहकार्य करीत नाही तोपर्यंत स्वर्ग आपला होणार नाही. आजच्या शुभवर्तमानात स्वर्गराज्याचे महत्व आणि तारणाचे मोल स्पष्ट करून देण्यासाठी येशूने तीन विविध दाखल्यांचा वापर केलेला आहे. तर चौथ्या दाखल्याद्वारे देवाचे राज्य स्विकारलेल्या मनुष्याचे कार्य काय आहे हे समजावून सांगतो.
सर्वप्रकारच्या भौतिक संपत्तीपेक्षा आणि अतिमौल्यवान मोतीपेक्षा स्वर्गराज्य श्रेष्ठ आहे, व ते मिळविण्यासाठी आपण सर्वांनी देवाच्या वचनानुसार नीतिमान जीवन जगावे म्हणून ह्या पवित्र मिसाबलीदानामध्ये प्रार्थना करू या. 
         
पहिले वाचन :
स्वर्गीय नंदनवन प्राप्त करण्यासाठी, २०० वर्ष चैनीचे व ऐष आरामाच्या जीवनाची नव्हे तर दोन दिवस देवासाठी व इतरांसाठी जगण्याची गरज आहे. शलमोनाचा दावीद आपल्या पित्याच्या जागी राज्याभिषेक करण्यात आला. आपल्या पित्याच्या खुर्चीवर बसून राज्यकारभार हाताळण्यास आपण लायक नाही असे शलमोनाला वाटले. म्हणून त्याने देवाकडे मध्यस्थीची प्रार्थना केली. देवाने त्याला स्वप्नात दर्शन देऊन पाहिजे तो वर मागण्यास सांगितले. शलमोन राजाने स्वतःसाठी काहीही न मागता आपल्या प्रजेचा योग्य न्याय करता यावा म्हणून विवेकबुद्धी मागितली.
   
दुसरे वाचन :
 आजच्या दुस-या वाचनात संत पौल रोमकरांस ख्रिस्ती जीवनाचे महत्व व सामर्थ्य स्पष्ट करून देतो. ख्रिस्ताच्या आगमनाने व त्याच्या अस्तित्वापुढे अंधकार व सावली विकोपास पावली आहे. मोशेचा नियमशास्त्र सार्वकालिक जीवन देऊ शकला नाही व देणारही नाही; केवळ ख्रिस्ताचे मरण आणि पुनरुत्थान देऊ शकते. त्यामुळे ख्रिस्ती भाविकांना सार्वकालिक जीवनाची खात्री आहे, जर ते ख्रिस्ताशी एकनिष्ठ राहिले. 

सम्यक विवरण:
शुभवर्तमान :
आजच्या शुभवर्तमानातील तीन दाखल्यांद्वारे असे स्पष्ट होते की, ज्यांनी ख्रिस्ताचा आपला तारणारा म्हणून स्वीकार केला व त्याची वचने आपल्या दैनंदिन जीवनात आचारण्याचा प्रयत्न केला, त्याचा स्वर्गराज्यात समावेश होतो. “देवाने जगावर एवढी प्रीति केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे” (योहान ३:१६). ख्रिस्त स्वर्गाचे वैभव सोडून तारणाची योजना पूर्ण करण्यासाठी या जगात आला व त्याने तारणाची योजना पूर्ण केली. यासाठी त्याला आपल्या प्राणाची किंमत भरावी लागली. जे ख्रिस्तावर विश्वास ठेवतात, ते मोठी किंमत भरून विकत घेतलेले आहेत (१ पेत्र १:१९-१९). म्हणजेच जे ख्रिस्ताचा स्वीकार करतात त्यांना मोलवान ठेवीसारखे, तसेच मोलवान मोत्याप्रमाणे किंमतीचे सार्वकालिक जीवन मिळते (मत्तय १३:४४-४६).
  • जमिनीत लपविलेली संपत्ती:

जरी हा दाखला आपणाला अपरिचित वाटला, तरी येशूच्या काळातील पॅलेस्टाईन लोकांसाठी स्वाभाविक होता. पूर्वीच्या काळी असलेल्या बँकांचा उपयोग सामान्य मनुष्य करू शकत नसे, त्यामुळे सामान्य लोक आपली धन-दौलत राखून ठेवण्यासाठी जमिनीचा उपयोग करीत असे. रुपयांच्या दृष्टांतात आळसी दास पैसे हरवू नयेत म्हणून जमिनीत लपवून ठेवतो (मत्तय २५:२५).
तसेच पॅलेस्टाईन बहुतेककरून जगातील सर्वात जास्त लढाईचा देश होता. जेथे माणसाचे शेत केव्हाही रणांगण बनत असे. जेव्हा युद्धाची लाट लोकांना थमकावत, तेव्हा पळण्याअगोदर आपली संपत्ती ते जमिनीत ठेवीत असत. 
काळात संपत्तीचा मालक किंवा त्याचे संपूर्ण कुटुंब मारले जात अथवा पलायनामुळे कधीही परत येत नसत. ह्या कारणास्तव लपविलेल्या संपत्तीची कुणालाही कल्पना नसे, म्हणून अशी संपत्ती कधी कुणाला नशिबाने मिळत असे. आजच्या दाखल्यातदेखील मनुष्य आनंदाने आपले सर्व विकून शेताबरोबर संपत्तीची मालकी मिळवतो. येशू सांगतो, देवाचे राज्य ह्या विश्वात दडलेल आहे. जेव्हा तुम्हांला ते सापडेल, तेव्हा सर्वस्वाचा त्याग करून किंवा सर्वकाही विकून देव-राज्याची मालकी मिळवा.
  • मौल्यवान मोती:

प्राचीन काळी मोतीला माणसाच्या हृदयात खास जागा होती. एखादा अत्यंत सुंदर मोती जवळ बाळगण्याची लोकांची तीव्र इच्छा होती. कारण सर्व मिळकतीमध्ये मोती हा आल्हाददायक आणि अत्यंत सुंदर वस्तू होती. म्हणजेच स्वर्गराज्यसुद्धा जगातील अत्यंत सुंदर वस्तू आहे.
जगात इतर मोतीसुद्धा आहेत परंतु एकच मोती अति मौल्यवान आहे. त्याचप्रमाणे जगातील विविध गोष्टी माणसाला आनंदमय बनवू शकतात, परंतु केवळ स्वर्गराज्यच माणसाला सार्वकालिक सुख आणि आनंद देऊ शकते. स्वर्गराज्यात असणे म्हणजे देवाच्या इच्छेला प्राधान्य देऊन त्याप्रमाणे वागणे होय. फक्त एकाच मार्गाद्वारे आपल्या हृदयाला शांतता, मनाला आनंद व जीवनाला सौंदर्य देऊ शकतो; आणि तो मार्ग म्हणजे देवाच्या इच्छेप्रमाणे वागणे होय.
मोती शोधणारा व्यापारी अति मौल्यवान मोतीची मालकी मिळविण्यासाठी मागचा-पुढचा विचार न करता त्या क्षणाला आपले सर्व विकून तो मोती विकत घेतो. त्याप्रमाणेच देवाचे राज्य शोधणा-या प्रत्येक शिष्याला आपली मालमत्ता विकून दारिद्र्यास द्यावी लागेल (मत्तय १९:१०), म्हणजेच त्याला स्वर्गातील संपत्तीची मालकी मिळेल.
  • समुद्राकाठी ओढलेले जाळे:

येशूचा उपदेश ऐकण्यासाठी सर्व प्रकारची लोक उपस्थित असायची. पहिले दोन दाखले शेतकरी आणि व्यापारी समुहासाठी होते तर तिसरा दाखला कोळी बांधवांसाठी होता.
किना-यावर ओढलेले जाळे कोणताही भेदभाव न करता आपल्याबरोबर सर्व प्रकारची मासळी आणि इतर वस्तू घेऊन येते. त्याप्रमाणेच स्वर्गराज्यात प्रवेश करण्याचे आमंत्रण सर्वांनाच दिले जाईल, परंतु न्यायाच्या दिवशी ज्यांनी देवाच्या वचनाप्रमाणे आणि येशूच्या शिकवणुकीप्रमाणे जीवन जगले आहे अश्यांचाच स्वर्गराज्यात प्रवेश होईल. इतरांना मात्र जसे निरुपयोगी मासे समुद्रात फेकले गेले तसे न विझणा-या अग्नीच्या भट्टीत फेकून दिले जाईल.

बोधकथा:
१. १९३६ साली एडवर्ड VIII हा इंग्लंडचा राजा होता. त्याला व्हॅलीस सिम्पसन  (Wallis Simpson) विवाह करायचा होता परंतु इंग्रजाच्या कायद्यानुसार राजाला कोणत्याही सामान्य मुलीबरोबर विवाह करता येत नसे. शिवाय सिम्पसन घटस्फोटीत होती. एडवर्ड राजा द्विधावस्थेत होता. त्याला प्रेमिका आणि राज्यपद यामध्ये निवड करायची होती. एकतर सिम्पसनशी विवाह करून राज्यपदाचा त्याग करायचा नाहीतर सिम्पसनला सोडून इंग्लंडचा राजा म्हणून राज्यकारभार सांभाळायचा. इतिहासामध्ये एडवर्डचे स्मरण केले जाते, ज्याने निर्भिडपणे केवळ प्रेमाखातीर राज्यपदाचा त्याग केला.

२.  ही गोष्ट आर्थर टोने ह्याने सांगितलेली आहे.                                 ऑलेरी नावाचा एक वृद्ध आयरिश (Irish) बाई इतकी गरीब होती की, तिचा राहण्याचा व जेवणाचा खर्च पॅरिश बघत असे. खरी वस्तुस्थिती बघता, तिचा मुलगा अमेरिकेला स्थलांतर होऊन श्रीमंत झाला होता. त्याने न्युयॉर्क शहरात किराणा मालाची दुकाने काढली होती. लोक नेहमी धर्मगुरूकडे चौकशी करत, “बॉब कशाला आपल्या आईला मदत करीत नाही?”
एके दिवशी धर्मगुरूने ऑलेरीच्या घरी जाऊन विचारले, “बॉब विषयी तु काही ऐकले आहे का? त्याने तुला कधी पत्र लिहिलेलं का?” ती मोठ्या अभिमानाने उद्गारली, “बॉब माझा मुलगा मला प्रत्येक आठवड्याला पत्र लिहितो व एक फोटोसुद्धा पाठवतो”. “तुम्ही ते जमा करून ठेवले आहेत का?” धर्मगुरूने विचारले. “नक्कीच”, ती बाई उद्गारली, “मी ते सर्व फोटो नवीन करारामध्ये जपून ठेवले आहेत”. धर्मगुरूने नवीन करार तपासाला आणि काय आश्चर्य, बेंजामिन फ्रॅन्कलीनाचे पन्नास फोटो $ १०० नोटावर आरामशीर विश्रांती घेत होते. ऑलेरीच्या हाती संपत्ती असून सुद्धा तिला त्याची जाणीव झाली नाही. त्याचप्रमाणे स्वर्गाची संपत्ती आपल्या हाती असून, आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. 

मनन-चिंतन:
आज जगात इच्छा-आकांक्षा आणि आरोग्य अपेक्षांना जास्त महत्व दिले जात आहे. सर्वत्र संपत्ती, प्रतिष्ठा, नाव-मान, सुख-समाधानासाठी वेडसर, अस्वस्थ आणि असाध्य शोध चालला आहे. ‘भरपूर-भरपूर, ह्या ब्रीद शब्दाद्वारे आज लोकांची मन वळली आहेत. त्यामुळे अफाट संपत्तीची तहान काही केल्या विझत नाही.
शलमोन राजा ह्या सर्व गोष्टींच्या मागे धावला नाही. त्याने देवाकडे राज्यकारभार चालविण्यासाठी विवेकबुद्धी, दूरदृष्टी आणि समजूतदारपणा विचारला. देवाने सढळ हस्ते त्याला ही दाने बहाल केली, त्यामुळे शांतीचे आणि न्यायाचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी शलमोन राजा समर्थ्य होता.
शुभवर्तमानातील दाखल्याचा केंद्रस्थान वर्तमानकाळावर आणि विश्वासू लोकांच्या कृतीवर आहे. दाखल्यात एकाला देवाचे राज्य नशिबाने मिळते तर दुस-याला लक्षपूर्वक शोधाने सापडते आणि इतरांना देवाच्या वचनाप्रमाणे नीतिमान, प्रामाणिक आणि सुसभ्य जीवनाने मिळवावे लागेल.
देवाचे राज्य ही एक जागा नसून न्याय, शांती, प्रेम आणि सत्य यासारख्या मूल्यांसाठी वापरलेले प्रत्यय आहे. तसेच येशू ही मूल्ये (देवाचे राज्य) प्रस्थापित करण्यासाठी आला होता. जर ही मुल्ये आपल्या हृदयात असतील, तर मग आपल्याकडे अति मौल्यवान वस्तूची मालकी आहे. कारण येशू म्हणतो, “देवाचे राज्य तुमच्यामध्ये आहे,” (लूक १७:२१) आणि “तुम्ही प्रथम देवाचे राज्य व त्याची धार्मिकता मिळवावयाची खटपट करा, म्हणजे याबरोबर सर्वकाही तुम्हास मिळेल” (मत्तय ६:३३).
ख्रिस्ती धर्माच्या सुरवातीपासून देवाच्या राज्यासाठी पुष्कळांनी आपले सर्वकाही विकले किंवा सर्वस्वाचा त्याग केला. सर्वप्रथम उदाहरण आहे प्रेषितांचे, ज्यांनी आपले सर्वकाही सोडून येशूचा पाठलाग केला. प्रेषितानंतर पुष्कळ थोर रक्तसाक्षी, संत आणि अध्यात्मवादी आहेत. ह्यामध्ये असिसिकार संत फ्रान्सीसचे उदाहरण सुप्रसिद्ध आणि जगप्रसिद्ध आहे. आजही असिसी आपणाला स्पष्टपणे संत फ्रान्सीसची आठवण करून देते.. तो एका गर्भ-श्रीमंत व्यापा-याचा मुलगा होता, परंतु देवाच्या दर्शनानंतर त्याने आपले सर्व काही गरीबामध्ये वाटले. इतकेच नव्हे, तर बिशपच्या न्यायालयामध्ये तो सर्वांसमोर नग्न उभा राहिला केवळ देवपित्याकडून स्वर्ग सौंदर्याने आच्छादण्यासाठी.
आज आपण संपत्तीला किंवा श्रीमंतीला तुच्छ मानत नाही. पैसा, मालमत्ता गरजेचे आहे, परंतु श्रीमंतीमुळे आपण कोणाला अग्रस्थान देतो हे महत्वाचे आहे. आज लोक सर्वकाही असून अशांत आणि दु:खी आहेत, कारण खरे सुख इतरांना मदत करण्यामध्ये आहे. जर आपली संपत्ती, मालमत्ता, प्रतिष्ठा, मान-सन्मान, सत्ता ह्या सर्वांचा उपयोग आपण इतरांच्या सेवेसाठी केला तर आपण देवाचे राज्य भूतलावर प्रस्थापित करू शकतो.
                    
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसादः  दयावंत येशू आमची प्रार्थना ऐक.
१. प्रभू परमेश्वरा, ख्रिस्तसभेची धुरा सांभाळणारे आमचे पोप महाशय, कार्डीनल्स, बिशप, धर्मगुरू, धर्मबंधू आणि धर्मभगिनी ह्यांच्यावर तुझा आशीर्वाद पाठव. त्यांनी आपल्या वचनाद्वारे व कृत्यांद्वारे तुझ्या न्यायचे, शांतीचे, प्रेमाचे आणि सत्याचे राज्य ह्या भूतलावर प्रस्तापित करावे म्हणून त्यांना तुझ्या कृपेने भर, म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. आपणाला देवाने बहाल केलेल्या देणग्यांचा, कला-गुणांचा आपण आपल्या  स्वार्थासाठी मान-सन्मान, नाव, प्रतिष्ठा व संपत्ती मिळविण्यासाठी न करता; दुस-यांच्या सेवेसाठी व भल्यासाठी, तसेच देवाची सुवार्ता पसरविण्यासाठी उपयोग करावा, म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. सर्व पालकांनी आपल्या मुलांमध्ये चांगले गुणधर्म जोपासावेत, त्यांना देवराज्याविषयी शिकवण द्यावी. परमेश्वराच्या वचनाप्रमाणे व आज्ञेप्रमाणे वागून मुलांपुढे चांगला आदर्श ठेवावा, म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. नोकरी व कामधंदा करण-या लोकांनी आपला व्यवसाय योग्यप्रकारे व प्रामाणिकपणे करावा. त्यांना आपल्या व्यवसायात भरपूर यश मिळावे, त्यांनी आपल्या कामकाजाद्वारे देवाच्या मुल्यांची साक्ष द्यावी, म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. आता आपण आपल्या सर्व गरजा शांतपणे प्रभूचरनाशी अर्पण करूया.        

Tuesday 15 July 2014


Reflections for the homily By: John Mendonca
सामान्य काळातील सोळावा रविवार

दिनांक: २०/०७/२०१४
पहिले वाचन : ज्ञानग्रंथ १२:१३,१६-१९
दुसरे वाचन : रोमकरांस पत्र ८:२६-२७
शुभवर्तमान : मत्तय १३:२४-४३

“कापणीपर्यंत दोन्ही बरोबर वाढू द्या.”


प्रस्तावना:
     शुभप्रभात, आज आपण सामान्य काळातील सोळावा रविवार साजरा करीत असताना, आजची उपासना आपणास प्रभू येशू ख्रिस्ताप्रमाणे सहनशीलता अंगीकरण्यास निमंत्रण देत आहे. ज्ञानग्रंथातून घेतलेले आजचे पहिले वाचन आपणास जाणीव करून देते की, आपला देव हा सर्वाधिकारी असला तरी दयाळू-न्यायाधीश आहे व तो मोठ्या सहनशक्तीने आपणावर राज्य करतो. तर दुस-या वाचनात संत पौल पवित्र आत्म्याचा प्रभाव स्पष्ट करीत म्हणतो की, आत्मा आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो.
            शुभवर्तमानाद्वारे प्रभू येशूख्रिस्त देवाच्या राज्याविषयाची शिकवण निंदनाच्या, मोहरीच्या आणि खमिराच्या दाखल्याद्वारे जनसमुदयास प्रकट करतो. प्रभू येशूख्रिस्ताची देवराज्याविषयी शिकवण आपण आपल्या दैंनदिन जीवनाद्वारे आचारणात आणावी व आपणा प्रत्येकाला देवराज्याचे वारसदार बनता यावे म्हणून ह्या पवित्र मिस्साबलिदानात विशेष प्रार्थना करू या.

सम्यक विवरणः
पहिले वाचन : ज्ञानग्रंथ १२:१३,१६-१९
परमेश्वराच्या न्यायाचे उगमस्थान त्याच्या अधिकारात आहे. परमेश्वर हा सर्वाधिकारी असला तरी तो दयाळू न्यायाधीश आहे व तो मोठ्या सहनशक्तीने ह्या जगावर राज्य करतो. परमेश्वराने त्याच्या लोकांना त्यांच्या पापांबद्दल पश्चाताप करण्याची संधी देऊन त्यांना तारणाची महान आशा दाखविली आहे.

दुसरे वाचन : रोमकरांस पत्र ८:२६-२७
आपण शरीराने, मनाने व आत्म्याने दुर्बल आहोत हे पवित्र आत्म्याला ठाऊक आहे व तो आपला विश्वासू कैवारी असल्यामुळे सहाय्य पुरवितो. आपण कशासाठी प्रार्थना करावी, काय व कसे मागावे हे आपल्याला कळत नाही अशावेळी पवित्र आत्मा देवाच्या इच्छेप्रमाणे प्रार्थना जुळवून ती देवाला सादर करतो व मध्यस्थी करतो.
      
शुभवर्तमान : मत्तय १३:२४-४३
येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र व जगाचा तारणारा होता हे दाखवून देण्याचा उद्देश मत्तयने शुभवर्तमान लिहिताना डोळ्यासमोर ठेवला होता. म्हणूनच मत्तय “स्वर्गाचे राज्य” ह्या शब्दाचा वापर वारंवार करतो व जुन्या करारातील संदर्भ घेतो. उदाः, मत्तय १३:३४-३५.
‘देवाच्या राज्याविषयीचे दाखले’ हे तेराव्या अध्यायाचे महत्वपूर्ण वैशिष्ट आहे. ह्या दाखल्यांद्वारे येशू ख्रिस्ताने सैतान व त्याच्या परिणामकारक घातकस्वरूपी कृतीचे वर्णन केलेले आहे. ही सैतानस्वरूपी कृती देवाच्या राज्याचा नाश करण्यास नेहमीच तत्पर असते. ह्या तेराव्या अध्यायाद्वारे येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना व जनसमुदयास पाप व त्याचे परिणाम ह्याबद्दल नुसते कोरे पाषाण तत्वज्ञान सांगत नाही तर त्याचे व्यवहारातले अस्तित्व तो गृहीत धरून त्याच्यावर तो व्यावहारिक उपाय सांगतो. उदा. अध्याय ७:१५ “खोट्या प्रवक्त्यापासून जपून रहा, मेंढराचा वेष घेऊन ते तुमच्याकडे येतात. पण आतून ते क्रूर लांडगे असतात.” ह्या वचनावरून ख्रिस्ताने त्याच्या वचनाला अनुसरून चालणारे शिष्य व त्याच्या वचनाला अनुसरून चालण्याचे सोंग करणारे शिष्य यांच्यातील भेद स्पष्ट केला आहे. त्याचप्रमाणे अध्याय १३:२४-३० ह्यात तणाच्या दाखल्याव्दारे येशू सिध्द करतो की, सध्या वरकरणी जी गोष्ट नजरेस पडते ती महत्वाची नाही तर अखेरचा न्याय हीच याची अंतिम कसोटी आहे. ह्यास्तव प्रत्येक सत्य स्वरूपी शिष्याने धीर बाळगून संयमाने वागावे.
“तण” हा निंदणाचा एक असा प्रकार आहे की, सुरवातीच्या वाढीला हे निंदण हूबेहूब गव्हाच्या रोपासारखे दिसते म्हणूनच दाखल्यातील मालक म्हणतो, “नको, नको! कदाचित तण खुरपताना तुम्ही गहूही उपटून काढालं?”(मत्तय; १३:२९). पुढे अध्याय १३:३७-४३ द्वारे  येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांस तणाच्या दाखल्याचा अर्थ सविस्तरपणे सु-स्पष्ट करून दिला आहे.
आपल्या खाजगी द्वेषाखातीर दुस-यांच्या शेतात गुप्तपणे तणाचे बी पेरणे ही सूड घेण्याची सर्वसाधारण पध्दत त्यावेळेस पेलेस्टाईन मध्ये अस्तित्वात होती. तणाचे बी जर जेवणामध्ये मिश्रीत केले तर ते विषारी असल्यामूळे खाणा-या व्यक्तीला अस्वस्थपणाचा आणि उलट्याचा असा अनुभव येत असे. ह्यास्तव रोमन कायद्यानुसार हे सैतानी कृत्य करणा-याला अगदी कठोर शिक्षा केली जाई.
अध्याय १३:३१-३५ द्वारे येशू ख्रिस्त मोहरीचे बी आणि खमीर ह्या दोन बोधकथा जमावापुढे प्रस्तुत करतो. मोहरीचे बी व खमीर ह्या दोन्ही बोधकथा अल्प आरंभाविषयी आहेत. त्यावेळेस अगदी लहानश्या वस्तूला मोहरीच्या दाण्याची उपमा देण्याची रीत होती. उदाहरणार्थ “येशूने त्यांना म्हटले, मी तुम्हाला खरच सांगतो, मोहरीच्या दाण्याएवढी जरी तुमची श्रद्धा असली अन या डोंगराला म्हणालात, उठ येथून अन जा तिकडे! तर तो जागचा हलेल! तुम्हांला अशक्य असं काहीच असणार नाही!” (मत्तय १७:२०).
जरी मोहरीचे बी लहान असले तरी त्याचे झाड वाढून तीन मीटरपर्यंत उंच होत असे आणि ज्याप्रमाणे मूठभर खमीर खुपश्या पिठास मिसळून ते फुगवते, त्याचप्रमाणे स्वर्गाच्या राज्याचे आहे. देवाचे कार्य प्रथम अगदी क्षुल्लक भासले तरी दिसते तसे नसते हे लवकरच प्रत्यक्षात येते आणि अखेरीस प्रत्येकाला त्याची दखल घेणे भाग पडते, तो पर्यंत मधल्या काळात शिष्यांनी धीराची व संयमाची पराकाष्ठा जोपासली पाहिजे.

बोध कथाः
  1. रुपेश आणि दिनेश, हे दोघे जीवा-भावाचे मित्र होते. खट्याळकी, चोरी-मारामारी ही तर अगदी त्यांच्या डाव्या हातांचा खेळ असायचा. कॉलेजमध्ये असताना एका सात्विक धर्मगुरूच्या मार्गदर्शनाखाली रूपेशने आपल्या जीवनाचा कायापालट केला, आपल्या सामाजिक नैतीक मुल्यांची व जबाबदारीची जाणीव घेऊन तो एक उत्कृष्ट डॉक्टर बनला. मात्र दिनेशमध्ये तीच सैतानी प्रवृत्ती अजूनपर्यंत जागृत होती; तीच खट्याळकी, चोरी व मारा-मारी ह्या त्याच्या दुष्ट कृत्यांमुळे त्याच्या कुटुंबाला त्रास होतच होता परंतु त्यांच्याबरोबर शेजा-यांना व संपूर्ण समाजाला त्याचा त्रास होत होता.                                                                     एके दिवशी दिनेश अचानक तीव्र (भयानक) अपघातात सापडतो, अगदी मरणाच्या वाटेवर असतानाच त्याला रुपेशच्या हॉस्पीटलमध्ये दाखल केले जाते. दिनेशची अवस्था पाहून रुपेशाला गहिवरून येते, परंतु त्याचवेळी रुपेशच्या मनात विचार येतो, ‘जर का मी दिनेशवर औषध-उपचार केले नाहीत तर दिनेशपासून होणा-या तीव्र त्रासापासून मी त्याच्या कुटुंबाचे, शेजा-यांचे व संपूर्ण समाजाचे संरक्षण करू शकतो’. रुपेशच्या मनात दुष्ट विचारांचे वादळ उठले असतानाच त्याला क्षणातच, भूतकाळातील धर्मगुरूंनी केलेल्या उपदेशाची आठवण झाली व तो स्वतःशीच म्हणाला, ‘जर का पूर्वी माझ्यामध्ये इतका वाईटपणा होता तरीसुद्धा देवाने मला माझा कायापालट होण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली, त्याने माझा सर्वनाश केला नाही, तर दिनेशचा सर्वनाश करण्याचा मला अधिकार कोणी दिला? आज देव माझ्यायोगे दिनेशासाठी एक नवीन शांतीचे जीवन जगण्याची संधी उपलब्ध करून देत आहे आणि मी ती संधी दिनेशला दिलीच पाहिजे’.
  2.  श्री. दालमेत ह्यांच्या कुटुंबाची समाजात उच्च शिक्षित म्हणून ख्याती होती. एक मुलगा इंजिनियर, दुसरा डॉक्टर तर मुलगी सी.ए. परंतु सर्वकाही सुरळीत चालू असतानाच इंजिनिअर मुलगा वाईट व्यसनांच्या आहारी गेला, डॉक्टर मुलाने गैररीत्या गरीब लोकांना फसवून शरीराच्या अवयवांची देवान-घेवाण केल्यामुळे पोलिसांनी त्याला जेलबंध केले तर सी.ए. झालेल्या मुलीने एका युपीच्या मुलाबरोबर पळून लग्न केले.                                                   (आजच्या शुभवर्तमानातदेखील येशू ख्रिस्त दाखल्याद्वारे स्पष्टीकरण देत असताना म्हणतो, “चांगले बी पेरले होते त्यात निंदण कोठून आले”.)         
मनन-चिंतनः
     आजच्या शुभवर्तमानाद्वारे प्रभू येशू आपणा समोर तीन महत्वाचे दाखले सादर करतो;
१)  तण आणि पिक   २) मोहरीचा दाणा   ३) खमीर
हे तिन्ही दाखले स्वर्गाच्या राज्याविषयी घोषणा करून स्वर्गाचे राज्य व सैतानाचे राज्य ह्याच्यांमधला मार्मिक भेद आपणासमोर प्रस्तुत करतात. स्वर्गाचे राज्य हे सार्वकालिक टिकणारे सत्यरूपी देवाचे राज्य आहे तर सैतानाचे राज्य हे क्षणिक सु:खविलासी असत्यरुपी राज्य आहे.
स्वर्गाच्या राज्याला दिवस-रात्र, प्रकाश-अंधकार ह्यांची कधीही भिती नसते परंतु सैतानी राज्याला नेहमीच दिवस व प्रकाश ह्यांची अमर्याद भीती असते. ह्याच कारणास्तव आपण आजच्या शुभवर्तमानात पाहतो की, कश्याप्रकारे शेतक-याने दिवसा गव्हाचे चांगले बी पेरले परंतु वै-याने (सैतानाने) कश्याप्रकारे लोक झोपत असताना रात्रीच्या अंधाराचा लाभ घेऊन गव्हामध्ये निंदण पेरले.
आजच्या पहिल्या वाचनात आपण ऐकले की, आपला देव सर्वांधिकारी असला तरी दयाळू न्यायाधीश आहे, त्याची इच्छा होईल तेव्हा तो कारवाई करू शकतो तरीसुद्धा तो मोठ्या सहनशीलतेने आम्हांवर राज्य करतो. ह्या वचनानुसार आपला देव हा सर्वसामर्थ्य व शक्तिशाली आहे, तो क्षणातच सैतानी राज्य पराभूत करू शकतो. त्याच्या तारण योजनेत सर्वांनी स्वइच्छेने सहभागी व्हावे अशी त्याची इच्छा आहे. तो कधीही कुणाचा विनाश करू पाहत नाही.
ह्या जगामध्ये कुणीही सर्वसंपन्न, परिपूर्ण नाही आणि कुणीही असंपन्न, अपरिपूर्ण नाही; ज्याप्रकारे प्रत्येक चांगल्या माणसात वाईट भावनेचे लवलेश असतातच त्याचप्रकारे प्रत्येक वाईट माणसात चांगल्या भावनेचे लवलेश असतात. ह्या जगामध्ये एकमेव सर्वसंपन्न व परिपूर्ण व्यक्ती म्हणजे आपला तारणारा प्रभू येशू. आपले दैनंदिन जीवन जगत असताना आपण सुद्धा ह्या परिपूर्ण वाटेवर वाटचाल करावी अशी परमेश्वराची दैवी इच्छा आहे.
नैसर्गिक नियमानुसार जरी ‘गव्हाचे रुपांतर निंदणात आणि निंदणाचे रुपांतर गव्हामध्ये कधीच होऊ शकत नाही परंतु नैसर्गिक नियमाविरुद्ध मानवी जीवनात अशा प्रकारचे रुपांतर साध्य आहे’, जर एखादी व्यक्ती आज सैतानी राज्याला प्राधान्य देत असली तरी कदाचित उद्या तीच व्यक्ती सैतानी राज्य नाकारून स्वर्गाचे राज्य स्वीकारू शकते. उदा. संत पौल.
आजच्या आधुनिक काळात सर्वसामर्थ्यशाली व्यक्ती आपल्या वै-याचा प्रतिकार करून त्याचा पराभव करण्यास सदैव तयार असतो. तो अश्या प्रकारच्या संधीची चाहूल लागताच कार्यरत होतो, कारण त्या व्यक्तीस माहित असते की, हा त्याचा सर्वसामर्थ्यशालीपणा हा क्षणिक आहे. आज जरी तो सर्वसामर्थ्यशाली असला तरी उद्या तो सर्वसामर्थ्यशाली असू शकतो ह्याची त्यास खात्री नसते. परंतु ह्या उलट आपला परमेश्वर हा जरी सर्वसामर्थ्यशाली असला तरी तो आपल्या सारखा जागतिक स्वभावानुसार वागत नाही; कारण परमेश्वराचे सामर्थ्य हे क्षणिक नसून ते सार्वकालिक टिकणारे आहे, तरीसुद्धा तो कुणाचाही सर्वनाश करू पाहत नाही. आपला परमेश्वर हा सहनशील व दयाळू आहे, ह्या सहनशीलतेद्वारे व दयाळूपणाने तो आपल्या प्रत्येकाला सैतानी राज्यातून, असत्याच्या वाटेवरून परतण्यासाठी प्रेमाने आमंत्रण करत असतो, जेणेकरून आपण सर्वजण त्याच्या सार्वकालिक राज्याचे वारसदार ठरू.
परमेश्वर जसा सहनशील व दयाळू आहे, त्याचप्रमाणे आपणसुद्धा आपल्या दैनंदिन जीवनात सहनशीलतेचे व दयाळूपणाचे वस्त्र धारण केले पाहिजे तरच ख-या अर्थाने आपण परमेश्वराच्या राज्याची घोषणा करू शकतो, म्हणूनच;
हे देवा दे मज सहनशीलता,
न पेरण्यास निंदण,
अन दे मज एैसी कृपा,
होण्यास तुझा एकमेव गहू,
 तत्क्षणी राहीन मी; सार्वकाली,
तुझ्या कोठारी,
तुझ्या स्वर्गधामी,
तृप्त आणि आनंददायी!
आमेन.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसादः करितो मी याचना, ऐकावी प्रार्थना.
  1. आपल्या धर्माची धुरा वाहणारे आपले परमगुरुस्वामी, महागुरू, धर्मगुरू आणि धर्मभगिनी ह्या सर्वांना देवराज्याची मुल्ये आपल्या शब्दांद्वारे व कृत्यांद्वारे जगजाहीर करता यावी व त्यासाठी त्यांना परमेश्वराची कृपा सामर्थ्य लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
  2. जे लोक असत्याच्या मार्गावर वाटचाल करीत आहेत, अश्या सर्व लोकांना येशू ख्रिस्ताच्या सत्यदायी प्रेमाचा अनुभव यावा व सत्याचा मार्ग त्यांनी अनुसरावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
  3. आपण आपल्या कुटुंबातील व मित्र परिवारातील प्रत्येक व्यक्तीला प्रेमाने व सहनशीलतेने समजून घ्यावे व एक आदर्श ख्रिस्ती जीवन जगावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
  4. जे स्वार्थापायी चांगल्या सामाजिक कार्यात अडथळा आणतात, त्यांना त्यांच्या दुष्ट प्रवृत्तीची जाणीव व्हावी व त्यांनी जनहितासाठी निस्वार्थीपणे कार्य करावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
  5. आता शांतपणे वैयक्तिक आणि सामाजिक गरजा प्रभूचरणी समर्पित करूया.