Friday 26 August 2022

           Reflection for
22nd Sunday in Ordinary Time (27/8/2022) By Bro. Rockson Dinis 

सामान्य काळातील बाविसावा रविवार

दिनांक: २८ /०८ /२०२२

पहिले वाचन: बेनसिरा ३: १९२१३०३१

दुसरे वाचन: इब्री लोकांस पत्र १२: १८१९२२२८

शुभवर्तमान: लूक १४ : १,१४.



प्रस्तावना:

 आज देऊळ माता सामान्य काळातील बाविसावा रविवार साजरा करत आहे. आजची उपासना आपल्याला नम्रतेचा उत्तम असा धडा शिकवत आहे. नम्रता म्हणजे काय, व ती आपण आपल्या जीवनात कशा प्रकारे आचरणात आणावी, नम्र कसे बनावे व त्याचे होणारे फायदे याबद्दल आज आपल्याला आजच्या उपासनेतून ऐकावयास मिळत आहे.

बेनसिराच्या पुस्तकातून घेतलेल्या आजच्या पहिल्या वाचनात सांगण्यात येत आहे कि या धरतीवरती पुष्कळ असे नामांकित लोक आहेत, जे जगामध्ये खूप प्रसिद्ध आहेत परंतु अशा लोकांना प्रभू येशूचे रहस्य प्रकट होत नाही. तर ती रहस्ये विनयशील व नम्र जनांस प्रकट होतात. दुसरे वाचन हे इब्री लोकांस पत्र यातून घेतलेले आहे. हे वाचन आपल्याला जीवनात येणारे दुःख आणि छळ ह्यांना ख्रिस्ताच्या शिकवणुकीप्रमाणे फायद्याच्या प्रकाशात कसे पाहिले पाहिजे हे स्पष्ट करते. लुककृत शुभवर्तमानात प्रभू येशू आपल्याला  नम्रता ह्या गुणाचे होणारे फायदे ह्या विषयी सांगत आहे. अशीच नम्रता आपण आपल्या जीवनात अनुसरून ख्रिस्ताची शिकवण जगभरात पसरावी म्हणून ह्या मिस्साबलिदानात प्रार्थना करूया.

 

मनन चिंतन :

जो ऐकतो व ते आचरणात आणतो त्याचे जीवन किती आनंदी आहे. कारण आपले ऐकणे हे बीज पेरणे आहे, आणि आपली कृती हे त्या बीजाचे फळ आहे”. (संत ऑगस्टीन)

            ख्रिस्ताठायी माझ्या प्रिय भाविकांनो, आज आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त नम्रतेचा धडा शिकवत आहे. येशू म्हणतो “जो कोणी स्व:ताला उंच करतो, तो नमवला जाईल आणि जो कोणी स्व:ताला  नमवतो तो उंच केला जाईल”. ह्याचे स्पष्ट उदाहरण म्हणजेच पौलाचे  फिलीप्पेकरांस पत्र २;६-७: तो  देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे  त्याने मानले नाही, तर त्याने स्व:ताला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतीरूपाचे होऊन  दासाचे स्वरूप धारण केले”. आपन नवीन करारात पहिले तर आपल्याला कळून चुकेल कि परुशी नियमशास्त्रात चांगले हुशार होते व देवाचे योग्य असे त्यांना ज्ञान होते. आजचे शुभवर्तमान वाचल्यानंतर आपल्याला कळणार कि परुशी जे येशूचा विरोध करत होते त्यांनीच  येशूला भोजनासाठी आमंत्रण दिले होते. परंतु प्रभू येशूने परुशाचे आमंत्रण नाकारले नाही. कारण तो सर्वांसाठी तारण आणण्यासाठी या धरतीवर आला होता. परुशाच्या भोजनाच्या वेळी पाहुण्यांना वयोमानानुसार नव्हे तर त्यांच्या मानाने व दर्जानुसार बसवण्याची प्रथा त्या काळी होती. येशूने पाहिले की सर्व पाहुण्यांनी प्रथम स्थान घेण्याचा कसा प्रयत्न केला. विशेष करून परुशी, कारण त्यांना खात्री होती की त्यांचा प्रथम स्थानांवर अधिकार आहे  व त्यांच्या  मानानुसार  व दर्जानुसार देवाच्या राज्यात प्रवेश होणे हे  खात्रीचे आहे. एक प्राचीन म्हण आहे. “महत्त्वाच्या व्यक्तींसाठी ठेवलेली राखीव जागा केव्हा घेऊ नका”. अशीच शिकवण आपण नितीसुत्रे पुस्तकात वाचतो. (नितीसुत्रे २५:७) “तुला खालच्या जागी बसविण्यात यावे, त्यापेक्षा वर येवून बैस असे तुला म्हणावे हे बरे”.

            आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला संदेश देत आहे कि गर्व आपल्याला स्वार्थी बनवतो. कोण कोणापेक्षा  महान, हुशार, अशी आपण एकमेकाबरोबर तुलना करायला लागतो. आपण नैसर्गिकरित्या इतरांकडून ओळख आणि सन्मान मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि याचा परिणाम म्हणून आपण आपल्या जीवनात अपयशआणतो. परंतु येशू म्हणतो की जे स्वत:ची प्रशंसा शोधतात त्यांना नम्र केले जाईल, तर जे इतरांना प्रथम स्थान देतात ते उच्च केले जातात. ख्रिस्त धर्माची सर्वोच्च शिकवण किंवा आवाहन म्हणजे प्रथम इतरांना, स्वतःहून अधिक महत्त्व देणे, व लोकांना त्यांच्या जीवनात प्रोत्साहित करणे. म्हणूनच शास्त्र म्हणते, (याकोबाचे पत्र ४:६) देव गर्विष्टांना विरोध करितो, आणि लीनांवर कृपा करितो. आजचे शुभवर्तमान आपल्याला सांगते, देवाच्या शक्तिशाली हाथाखाली स्वतःला नम्र करा, जेणेकरून तो तुम्हाला योग्य वेळी उंच करेल. करुणा, दयाळूपणा, नम्रता, सौम्यता आणि संयम धारण करा. कारण जेव्हा जीवनात गर्विष्ठपणा येतो तेव्हा त्याच्याबरोबर बदनामी सुद्धा येते. प्रभू येशूच्या शिकवणुकीत प्रेम आणि नम्रपणा ह्यांना सर्वात उच्च स्थान आहे. म्हणून आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला नम्र होण्यासाठी बोलावत आहे. नम्र माणूस कधीही उतावीळ, किंवा अस्वस्थ नसतो, परंतु नेहमी शांत असतो. नम्र मनुष्य नेहमी निश्चिंत असतो कारण असे काहीही नाही जे त्याचे मन हलवू शकेल.

 

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद:  ‘हे परमेश्वरा, आमची प्रार्थना ऐक’

 

१)    आपले पोप फ्रान्सीस, सर्व बिशप्स, धर्मगुरू व व्रतस्थ बंधुभगिनी यांना त्यांच्या प्रेषितीय कार्य करण्यासाठी तुझी कृपा दे त्याच प्रमाणे त्यांना नम्र हृद्य दे.

२)    आपल्या समाज्यात, कुटुंबात व धर्मग्रामात प्रत्येक व्यक्तीला समानतेची व सन्मानाची वागणूक मिळावी म्हणून प्रार्थना करूया.

३)    समाजात वावरत असताना, आपण ख्रिस्ती म्हणून इतरापर्यंत नम्रतेची शिकवण आपल्या वागन्याद्वारे द्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

४)    आपल्या धर्मग्रामात जे कोणी आजारी असतील, त्यांना परमेश्वराने स्पर्श करावा, त्यांना चांगले आरोग्य द्यावे म्हणून प्रार्थना करूया.

५)    अति पावसामुळे कितेकांची  घरे उद्वस्त झाली आहेत, परमेश्वराने त्याच्या सांभाळ करावा आणि त्याच्या गरजा पुरवाव्यात म्हणून आपण प्रार्थना करूया.

६)      थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.



Thursday 18 August 2022

 Reflections for the homily of 21st Sunday in Ordinary Time (21-08-2022) by Br. Justin Dhavade.


सामान्य काळातील एकविसावा रविवार






 दिनांक: २१/८/२०२२

पहिले वाचन: यशया ६६:१८-२१

दुसरे वाचन: ईब्री लोकांस पत्र १२:०५-१३

शुभवर्तमान: लूक १३:२२-३०


प्रस्तावना

            आज देऊमाता सामान्य काळातील एकविसावा रविवार साजरा करीत आहे. आज आपण न्याय रविवार सुद्धा साजरा करीत आहोत. आजच्या पहिल्या वाचनामध्ये परमेश्वर म्हणतो कि सर्व राष्ट्रांनी आणि भिन्नभिन्न भाषा बोलणाऱ्यांनी माझे वैभव पहावे म्हणून मी त्यांस एकत्र करीन अशी वेळ आली आहे. तर दुसऱ्या वाचनामध्ये आपण वाचतो कि परमेश्वर ज्याच्यावर प्रीती करतो त्याला तो शिक्षा करतो आणि ज्या पुत्रांना तो स्वीकारतो त्या प्रत्येकाना फटके मारतो. कारण कोणतीही शिक्षा खेदाची वाटते पण तिच्याद्वारेच प्रत्येक मानवाला आध्यात्मिक जीवन जगण्याचे वळण लागते. शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, अरुंद दरवाजाने आत जाण्याचा नेटाने प्रयत्न करा कारण मी तुम्हास सांगतो पुष्कळ लोक आत जाण्यास पाहतील परंतु त्यांना जाता येणार नाही”.

आपल्या प्रत्येकाच्या मरणानंतर न्याय होणार आहे, आणि त्या न्यायाद्वारे आपण स्वर्गात जावे अशी प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा आहे म्हणूनच ख्रिस्त आजच्या वाचनामध्ये आपल्या प्रत्येकाला अरुंद दरवाजाने आज जाण्यास सांगत आहे तो अरुंद दरवाजा म्हणजे नीतीचा आणि पवित्रतेचा मार्ग आहे. तो मार्ग स्वीकारण्यास आणि त्याद्वारे वाटचाल करण्यास प्रभू येशूने आपणाला कृपाशक्ती व सामर्थ्य द्यावं म्हणून ह्या पवित्र मिस्साबलिदानामध्ये आपण प्रार्थना करूया.

 

मनन चिंतन

येशूचे अनुरण करणे सोपे नाही. परंतु त्याच्या कार्यासाठी मजबूत होण्यासाठी आपण स्वतःला प्रशिक्षित केले पाहिजे. जर आपण येशूच्या काळात त्याचे अनुसरण करणाऱ्या लोकांकडे पाहिले तर आपणास कळून चुकेल कि, त्याच्या प्रेमाच्या संदेशाकडे आकर्षित झालेल्या अनेक लोकांना त्याने बरे केले आणि एका नवीन जीवनाची आशा त्यांच्यामध्ये निर्माण केली. परंतु जेव्हा त्यांनी येशू ख्रिस्ताची कठीण शिकवण ऐकली, विशेष करून स्वतःचा क्रूस उचलून त्याला अनुसरणे, तेव्हा अनेकजणांनी त्याच्या शिक्षणाला सकारात्मक उत्तर दिले नाही तर त्याच्या पासून दूर गेले. कारण खऱ्या शिष्यत्वाची शिकवण कठीण आहे असे त्यांना वाटले. जे त्याला खरोखर ओळखतात आणि प्रेम करतात तेच त्याच्या आजूबाजूला राहिले.

          जे लोक येशूला सोडून गेले किंवा विरोध करून गेले, त्यांना खरोखर त्याचे शिष्य व्हायचे नव्हते. येशूने पित्याची इच्छा पूर्ण करणे हे त्याचे ध्येय आणि त्याच्या शिष्यांचे कार्य म्हणून प्रचार केला. परंतु काहीजणांच्या स्वतःच्या इच्छा आकांशा होत्या. अनेकजण येशूच्या मागे फक्त काहीतरी मिळवण्याच्या इच्छेने आले होते, तर काहीजण त्यांच्या वाईट परिस्थितीतून सुटका मिळावी म्हणून.

          आजच्या लुकलिखित शुभवर्तमानात १३ व्या अध्यायातील तीन बोधकथांपैकी तिसरी बोधकथा म्हणजे अरुंद मार्ग. जी देवाच्या राज्याद्वारे आणलेल्या अनपेक्षित बदलांच्या विषयाशी संबंधित आहे. इतर दोन बोधकथा मोठ्या झाडात वाढणारया मोहरीच्या छोट्याश्या दाण्याबद्दल आणि थोड्या प्रमाणात  पीठ वाढवणाऱ्या खमिराबद्दल आहेत. ह्या तिन्ही बोधकथा देवाच्या राज्याबद्दल आहेत.

आजच्या शुभवर्तमानातील कथेद्वारे आपणाला कळून चुकते की येशू जेरुसलेमला जात असताना लोकांना शिकवत आहे. आणि तिथेच जमावाच्या एका प्रश्नामुळे येशूला भविष्यसूचक विधान करण्याची संधी मिळते. संत लुक आपल्या शुभवर्तमानात या प्रश्नाचे साधन अनेक वेळा वापरतो. उदाहरणार्थ, एक व्यक्ती जी येशूला विचारते, “सार्वकालिक जीवनाचा वारसा मिळण्यासाठी मी काय केले पाहिजे?” तेव्हा त्याला येशू चांगल्या  शमरोनीची कथा सांगतो आणि म्हणतो कि, जाऊन तुही तसेच कर.

प्रभू येशूला आपणास एवढेच सांगायचे आहे की, अरुंद दरवाजातून आत जाण्यासाठी उरलेल्या वेळेत प्रयत्न करणे आवश्यक आहे कारण बरेच लोक आत जाण्याचा प्रयत्न करतील. परंतु ते पुरेसे मजबूत नसतील. त्यानंतर तो दुसर्‍या दरवाजाबद्दलच्या दृष्टांताविषयी सांगतो कि, एकदा घर मालकाने घरात प्रवेश करून जर आतून दार लावले की इतरांना आत जाण्याचा कोणताही मार्ग राहणार नाही आणि जर तुम्ही दार ठोठावले तरी तो आतून म्हणेल की , “मी तुम्हांला ओळखत नाही.

पोप फ्रान्सिस यांनी एका मुलाच्या संमतीने त्याचा प्रश्न प्रेक्षकांसोबत मांडला, “मुलगा म्हणाला, ‘थोड्या वेळापूर्वी माझे वडील मरण पावले. माझे वडील अविश्वासू होते. परंतु त्यांनी चारही मुलांचा बाप्तिस्मा करून घेतला. ते चांगले होते. तर माझे वडील स्वर्गात आहेत का?’’ पोप साहेबांनी त्या मुलाला उत्तर दिले कि, जो स्वर्गात जातो तो देव आहे. पोप साहेब पुढे मुलांना म्हणाला, “देव कसा आहे याचा विचार करा. विशेषतः देवाचे हृदय कोणत्या प्रकारचे आहे: तुम्हाला काय वाटते? देवाला वडिलाचे हृदय आहे का? आणि तुमचा पिता जो विश्वास ठेवणारा नव्हता, परंतु त्याने आपल्या मुलांचा बाप्तिस्मा केला आणि एक चांगला माणूस बनला. देव त्याला स्वतःपासून दूर सोडू शकेल, असे तुम्हाला वाटते का? आपली मुले चांगली असताना देव सोडून देतो का?” तेव्हा सर्व मुले ओरडली, “नाही”. तेव्हा पोपने मुलाला सांगितले, ‘तेथे, इमॅन्युएल, हेच उत्तर आहे,’ म्हणजे आम्हा बारोबर देव. देवाला तुमच्या वडिलांचा नक्कीच अभिमान होता आणि तुम्हालाही असायला पाहिजे, कारण तो एक चांगला माणूस होता ज्याने आपल्या मुलांसाठी काय चांगले हवे होते ते केले.’

पोप फ्रान्सिस आपल्याला आठवण करून देतात की, स्वर्गात कोण जाणार हा प्रश्न आपण देवावर सोडला पाहिजे. हा आमच्यासाठी उत्तर देण्याचा प्रश्न नाही. देवाला आपल्याकडून काय हवे आहे याची आपल्याला काळजी वाटली पाहिजे. तो आपल्यासमोर कोणता प्रवेशद्वार ठेवत आहे हे आपल्याला जाणून घेतले पाहिजे.

आपण स्वतःस प्रश्न विचारू या: मी माझ्या विश्वासाच्या जीवनात जाणीवपूर्वक प्रयत्न कसे करत आहे? येशूचे अनुसरण करताना मला कोणत्या अडचणी आल्या? माझ्या आयुष्यात असे कोणी आहे की ज्याला त्याच्या विश्वासाच्या प्रवासात काही प्रोत्साहनाची गरज आहे?  

 

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे प्रभू आमची प्रार्थना ऐक.

१. हे प्रभू ख्रिस्तसभेचे अधिकारी पोप महाशय, बिशप्स व सर्व धर्मगुरू ह्यांना तुझ्या पवित्र हृदयी सुरक्षित ठेव. आध्यात्मिक व शारीरिक अशा सर्व आपत्तीपासून तू त्यांचे संरक्षण कर व सर्वांशी प्रेमाने, नम्रतेने व आपुलकीने वागण्यासाठी तू त्यांना आध्यात्मिक शक्ती दे.

२. हे दयावंत परमेश्वरा, तुझा चांगुलपणा अमर्याद आहे, आज आम्ही जे लोक आजारी, दुखी कष्टी, निराशी व संकटग्रस्त आहेत अशा सर्व लोकांना परमेश्वरी कृपेचा अनुभव यावा त्यांचे जीवन पुन्हा एकदा प्रभू प्रेमाने बहरावे म्हणून प्रार्थना करतो.

३. हे येशू तू कामगारांचा मित्र व सोबती आहेस म्हणून जे सर्व प्रकारच्या शारीरिक व बौद्धिक कामात गुंतलेले आहेत त्यांच्या सर्व गरजा व योजना पूर्णत्वास नेण्यास त्यांना मदत कर, व जे लोक वैफल्य, नैराश्य आणि संघर्ष ह्यांनी ग्रस्त झालेले आहेत त्यांना तुझ्या सार्वकालिक शांतीचे वरदान दे.

४. हे प्रभू स्वर्गाकडे जाणारा अरुंद मार्ग जरी कठीण असला तरी त्यावर चालण्यास आम्हां सर्वाना तुझी कृपाशक्ती आणि सामर्थ्य दे जेणेकरून आम्हाला तारणप्राप्ती  होईल.

५.आता आपण थोडावेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक हेतूंसाठी ईश्वरचरणी प्रार्थना करूया.
















Friday 12 August 2022

Reflections for the Homily of 20th Sunday in Ordinary time 

(14-08-2022) By, Bro. Jeoff Patil 





सामान्य काळातील विसावा रविवार

दिनांक : /०८/२०२२

पहिले वाचन: यिर्मया ३८: ४-६,८-१०

दुसरे वाचन: हिब्री लोकांस पत्र : १२:१-४

शुभवर्तमान:  लुक १२:४९-५३






प्रस्तावना:                                              

        “जर तुम्हांला इतराच्या उपयोगी पडायचे असेल तर प्रथम  स्वतासाठी त्रास घेण्याची सवय लावा”. ख्रिस्ताठायी माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो आजची उपासना आपल्याला ख्रिस्ताचे अनुयायी बनून त्याच्या प्रेमाग्नी इतरापर्यत पोहचविण्यास सांगत आहे. परमेश्वरचे राज्य हे प्रेमाचे आहे आणि ते जगाच्या कायद्यानुसार अवघड आहे. म्हणून  हे पसरवित असताना प्रत्येकाला त्रासाला सामोरे जावे लागते.

        पहिल्या वाचनात आपणास पाहण्यास मिळते की परमेश्वराचा शब्द प्रकट केल्यामुळे यिर्मयास  विहिरीत टाकण्यात आले. दुसऱ्या वाचनात लेखक आपल्याला ह्या जगातील त्रासासमोर ध्येर्याने उभे राहण्यास सांगत आहे. जेणेकरून आपणास स्वर्गीय मुकुट  प्राप्त होईल तसेच आजच्या शुभवर्तमानात येशू त्याच्या कार्याबदल उल्लेख करत आहे.आणि न्यायाचा दिवस कसा असणार ह्या विषयी भाकीत करीत आहे. ख्रिस्ताचे अनुयायी म्हणून जीवन जगत असताना आपण ख्रिस्ताच्या प्रेमात परिपूर्ण व्हावे व तेच प्रेम संपूर्ण जगाला देण्यास व येणाऱ्या संकटाना सामोरे जाण्यास आपणास कृपा मिळावी म्हणून ह्या पवित्र मिस्साबलिदानामध्ये आपण विशेष प्रार्थना करूया.

मनन चिंतन: काट्यावरून चालताना ते बोचतात, ह्याची जाणीवही ठेवू नका आणि देवाचे कार्य करण्यास त्रासाला  सामोरे जाण्यास विसरू नका. प्रिय भाविकानो आजची उपासना येशू ख्रिस्त परमेश्वराचे  राज्य पसरविण्यासाठी आला  ह्याबद्ल सांगत आहे. परमेश्वराचे राज्य हे प्रेमाचे आहे हे पसरवित असताना प्रत्येकाला त्रासाला सामोरे जावे लागते.

आजच्या पहिल्या वाचनात यिर्मया संदेष्टाला, सुबुधीने केलेल्या मार्गदर्शनाविषयी झालेल्या शिक्षेविषयी ऐकतो. कारण यिर्मया संदेष्टा आतापर्यत होवू गेलेल्या राज्यांनी कशा प्रकारे स्वखुशीसाठी व स्वार्थासाठी दुसऱ्या देशांबरोबर चुकीचे करार केले होते  व त्याचा परिणाम  म्हणजे यहुदी लोक परमेश्वरापासून  दूर गेले होते ह्याबद्ल राजाला व लोकांना संदेश देत होता. यिर्मयाच्या मार्गदर्शना प्रमाणे होवू नये म्हणून राजकुमारीने राज्याचे कान भरले व यिर्मयास शिक्षेस पात्र ठरवले. अशाप्रकारे यिर्मयाला कोरड्या विहिरीत टाकण्यात आले जेणेकरून उपासमारीने तो मरणास बळी पडेल. पण राजाचा सेवक अविदमेलेय ह्याने राजाची कान उघडणी केली व यिर्मयास विहिरीतून बाहेर काढले. आपल्याही  जीवनात असच होत असते जेव्हा आपण सत्याचा मार्ग निवडतो तेव्हा आपलिही टीका केली जाते.

        आजचे दुसरे वाचन आपल्याला ख्रिस्ती पाचारनाशी एकनिष्ठ राहण्यास आमंत्रण करत आहे. आबेलापासून ख्रिस्तापर्यंत जेवढे पवित्र लोक होवून गेले ते सर्व परमेश्वराची एकनिष्ठ राहिले. त्यांना झालेल्या त्रासाची व विरोधाची पर्वा त्यांनी केली नाही म्हणून आपण ख्रिस्ती ह्या नात्याने अधिक जोमाने देवाशी एकनिष्ठ राहीले पाहिजे. ज्याप्रमाणे ख्रिस्ताने पर्वा न करता क्रूसावरील मरण सोसले व परमेश्वराच्या उजव्या हाताशी आपले स्थान कायम केले. त्याचप्रमाणे आपण सुद्धा होणाऱ्या त्रासाला न घाबरता न कंटाळता येशूचे कार्य पुढे नेले पाहिजे. जेणेकरून आपले प्रतिफळ आपण प्राप्त करू.

        ख्रिस्ताठायी माझ्या भाविकांना आजचे शुभवर्तमान वाचल्यानंतर आपल्या मनात एक प्रकारची भीती निर्माण होते. पायाखालची जमीन हल्ल्यासारखे वाटते. कारण येशू स्वतः म्हणतो की मी आग पेटवण्यास व फुट पाडण्यासाठी आलो आहे. हे विधान येशूच्या शिकवणुकीशी जुळत नाही, कारण येशूच्या जन्मापासून तर त्याच्या मृत्यूपर्यंत पाहिले की येशू शांतीचा संदेश पसरविण्यास आला होता. येशूच्या जन्माच्या वेळी ग्रब्रीयल दुताने शांतीचा राजा जन्मास आला आहे, हा संदेश दुसऱ्यांना पोहोचविला. क्रुसावर स्वतःच्या मारेकरयाना क्षमा व्हावी म्हणून प्रार्थना केली. अशाप्रकारे आपण पाहतो की येशूने शांती पसरविण्यास प्राधान्य दिले. पण आजच्या शुभवर्तमानात शांतीचा राजा हे चिन्ह आपल्याला दिसून येते पण वास्तविक रूपात हे सत्य नाही. कारण येशूच्या शब्दाने तो देवराज्याची घोषणा करण्यासाठी आला आहे. हा संदेश दडलेला आहे. ही आग आहे अन्यायासाठी ही फूट आहे. मानावे स्वार्थाची ही अशांती आहे. मानवी सुराची जरी येशूच्या शब्दांनी अशांतीचा वस्त्र परिधान केला तरी त्या वस्त्रामागे शांतीचा संदेश आहे. येशू ख्रिस्त जेव्हा म्हणतो की मी पृथ्वीवर आग लावण्यासाठी आलो आहे. याचा अर्थ असा होत नाही की ख्रिस्त हा पृथ्वीवर खरोखर आग लावण्यासाठी व पृथ्वी भस्म करण्यासाठी किंवा दोघांमध्ये फूट पाडण्यास आला आहे. तर तो प्रेमाची ज्वाला किंवा प्रेमाची अग्नी घेऊन प्रत्येकाच्या हृदयात व जीवनात ती पेटवण्यासाठी आला होता. ख्रिस्ताची अग्नी ही प्रामाणिकपणाची, सत्याची, करुणीची आणि सलोख्याची आहे. जे ख्रिस्ताचा स्वीकार करतात त्यांच्या जीवनात ती अग्नी नूतनीकरण घडवून आनणारी व जीवनाला नवीन प्राधान्य मिळवून देणारी असते. ख्रिस्ताची अग्नी सर्वांनाश करत नसून ती, हृदयांना पाजर फोडण्याचे कार्य करत असते.

         काट्यावरून चालणारी व्यक्ती ध्येयापर्यंत लवकर पोहोचते कारण रुतणारे काटे पायाचा वेग वाढवतात. होय माझ्या प्रिय भाविकांना जेव्हा आपण येशूची सुवार्ता इतरांना सांगत असतो तेव्हा आपल्याही जीवनात खूप संकट व त्रास ह्यांना आपला सामोरे जावे लागते. तेव्हा येशूने आपल्या शिष्यांना आपल्या मागे येण्यासाठी आमंत्रण दिले. तेव्हा तो त्यांच्याकडून काय विचारत होता हे त्यांना समजले होते. दुसऱ्या शब्दात येशूची असलेल्या वचनबद्धता ही इतर सर्व गोष्टींपेक्षा मोठी आहे व आपण त्याला प्राधान्य दिले पाहिजे. आपण सर्व काही सोडून येशूसाठी आपला प्राण अर्पण करण्यास आपण तयार असले पाहिजे.

आजच्या शुभवर्तमानात येशूच्या मरणानंतर ख्रिस्ती लोकांचा होत असलेला छळ आपल्यापुढे कुटुंबाच्या उदाहरणाद्वारे सादर करीत आहे. त्याकाळी असलेली ख्रिस्ती आजही आपणास आपल्या काळात बघावयास मिळते. आज तर आपल्या समाजात पाहिलं तर प्रत्येकाच्या कुटुंबात वादविवाद, भांडणे, बळी किंवा घराची विभागणी करणे ही परिस्थिती आढळून येते. येशु आजच्या कुटुंबातील झालेल्या परिस्थितीत पाहून आपणा प्रत्येकाला सांगत आहे की तुम्ही पृथ्वीवर एकमेकांत इतरांना किंवा कुणाच्याही कुटुंबात आग लावू नका. तर येशूच्या प्रेमाची ज्योत आपल्यात व इतरांत पेटती ठेवा. इतरांची भले करा आणि इतरांना प्रेमाच्या अग्नीने जिंका. असिसिकर संत फ्रान्सिस म्हणतात: की हे प्रभू मला तुझ्या शांतीचे साधन बनव. आज प्रत्येकाने जर असीसिकर संत फ्रान्सिस ने म्हटल्याप्रमाणे केले तर सर्व ठिकाणी आपणास प्रेमाची व दयेची अग्नी दिसून येईल. आपले दैनंदिन जीवन जगत असताना ख्रिस्तासाठी व ख्रिस्त विरोधी लोकांच्या संपर्कात येणे सहाजिकच आहे.  अशा वेळी आपण ख्रिस्त निवडावा व शेवटपर्यंत त्याच्याबरोबर राहून त्याचे प्रेम इतरांना द्यावे म्हणून त्यासाठी लागणारी कृपा व शक्ती मिळावी म्हणून प्रार्थना करूया.

  

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: ‘ हे प्रभू आमची प्रार्थना ऐक’.

    १. ख्रिस्त प्रेमाचा संदेश जगाला देण्यास झटणारे आपले पोप फ्रान्सीस कार्डीनल्स, बिशप्स, फादर्स, सिस्टर्स व सर्व व्रतस्त बंधूभगिनींवर परमेश्वराचा वरदहस्त असावा व ह्या प्रेमाचा अनुभव अधिकाधिक लोकांना यावा म्हणून लागणारी कृपा शक्ती त्यांना प्राप्त व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

    २. आज संपूर्ण जगात वेगवेगळ्या ठिकाणी अशांतता पसरली आहे ह्या अशांततेचे कारण समजून घेऊन त्याजागी शांती प्रस्तापित करण्यास राजकीय व धर्मिक नेत्यांनी पुढाकार घ्यावा म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.

    ३. नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक लोकांची घरे व निवारा उद्वस्थ झालेली आहेत ह्या सर्व लोकांना परमेश्वराचा आश्रय मिळावा व त्यांचे निवास पुन्हा उभे करण्यास अनेक मदतीचे हाथ पुढे यावेत म्हणून आपण प्रार्थना करूया.

    ४. आज शिक्षण हि मानवाची मुलभूत गरज निर्माण झाली आहे. ज्यांना शिक्षांना पासून वंचित रहावे लागत आहे अशा सर्वांना चांगले शिक्षण मिळावे व त्याद्वारे त्यांनी समाजातील वाईट गोष्टींचा समूळ नाश करावा म्हणून आपण प्रार्थना करूया.    

    ५. आता थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक गरजा प्रभूकडे मांडूया. 








 

Friday 5 August 2022

 Reflection for the Homily of 19th SUNDAY IN ORDINARY TIME (07-08-22) By Br. Gilbert Fernandes
सामन्य काळातील एकोणिसावा रविवार

“जेथे तुमचे धन आहे तेथे तुमचे मनही लागेल.”



दिनांक: ०७ /०८/२२ 
पहिले वाचन: शालमोनाचा ज्ञानग्रंथ १८: ६-९
दुसरे वाचन: इब्रीलोकांस पत्र ११: १-२ ; ८-१०
शुभवर्तमान: लुक १२: ३२-४८ 

प्रस्तावना:

          आज आपण सामान्यकाळातील एकोणिसावा रविवार आणि संत जॉन मेरी व्हियानी यांचा सण साजरा करीत आहोत. आजची उपासना आपल्याला नेहमी तत्पर व तयार राहून देवाच्या सेवेत मग्न राहण्यास आमंत्रण करीत आहे.

          आजच्या पहिल्या वाचनात आपण ऐकतो की, परमेश्वर आपले शत्रूपासून तारण करतो जेणेकरून आपण त्याच्या आनंदात सहभागी होऊ शकू. दुसऱ्या वाचानात इब्रीलोकांस पत्र ह्यात आपल्याला विश्वासाच्या दोन बाजू आहेत असे सांगण्यात येते आणि त्या म्हणजे, आशा आणि भरवसा. हि गोष्ट प्रत्येक श्रद्धावंतासाठी अतिशय आनंददायक व आशादायक  आहे असे आपणास सांगण्यात आले आहे. तर शुभवर्तमानात प्रभू येशू म्हणतो, नेहमी चांगल्या सेवकाप्रमाणे आपल्या धन्याची सेवा करा व पुढे येशू म्हणतो, “ज्या कोणाला पुष्कळ दिले आहे त्याच्याकडून पुष्कळाची अपेक्षा केली जाईल.

          आज आपण धर्मगुरूंचा दिवस साजरा करीत असताना, ह्या पवित्र मिस्साबलीदानात आपल्या ख्रिस्ती जीवनाला स्पर्श करणाऱ्या सर्व धर्मगुरुंसाठी आणि विशेष करून आपले प्रेमळ प्रमुख धर्मगुरू फा......... आणि त्यांचे सहाय्यक धर्मगुरू फा........ ह्यांना देवाने त्याच्या प्रेमाचा, शांतीचा आणि क्षमेचा संदेश जगजाहीर करण्यासाठी व देवाच्या वैभवात सहभागी होण्यासाठी कृपाशक्ती तसेच मानसिक व शारीरिक आरोग्य प्रदान करावे म्हणून प्रार्थना करूया.

मनन चिंतन:

          आफ्रिकेत उबंतू नावाची एक प्रथा आहे व त्या मागचे प्ररेणास्थान ही त्यांची उबंतू संस्कृती आहे. एकदा एका मानववंशशास्त्रज्ञानी आफ्रिकन मुलांसाठी खेळ ठेवला. त्याने झाडाजवळ मिठाईची एक टोपली ठेवली आणि मुलांना १०० मीटर अंतरावर उभे केले. मग घोषित केले की जो प्रथम पोहोचेल त्याला टोपलीतील सर्व मिठाई मिळेल. जेव्हा त्या व्यक्तीने त्यांना जा म्हटले तेव्हा माहिती आहे काय झाले असेल? त्या सर्व मुलांनी एक दुसऱ्याचे हात पकडले व सर्व एकत्र त्या मिठाई जवळ पळाले व सर्वानी बरोबरीने वाटून आनंदाने ती मिठाई खाल्ली. जेव्हा त्या महाशयाने विचारले त्यांनी असे का केले तेव्हा ते म्हणाले ‘उबंतू’ म्हणजेच इतर जेव्हा दुःखी असतील तेव्हा मी कसा काय आनंदी राहू शकतो?

          त्यांच्या भाषेत उबंतू म्हणजे, “मी आहे कारण आम्ही आहोत.”

          प्रिय बंधू-भगिनींनो, नेहमी प्रमाणे आजही प्रभू येशू आपल्या शिष्यांसमोर एक नवीन आव्हान व कठिण असा पर्याय ठेवत आहे. ख्रिस्ताने त्यांच्याकडून एक मुलभूत जीवन शैली  निवडण्याची अपेक्षा केली. कारण आजकाल समाज्यात पाहतो प्रत्येक व्यक्ती जीवनात अल्प कालावधीत, शक्य तितकी संपती मिळविण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा येशूने आपले शिष्य निवडले तेव्हा त्याने त्यांच्या समोर कठीण पर्यायच ठेवले होते. लोकांचा पैश्यासाठी, संपत्तीसाठी, अधिकार गाजवण्यासाठी चाललेली धडपड पाहून ख्रिस्त आपल्या शिष्यांना सर्व काही त्याग करावयास सांगतो व गरिबांना द्यावयास सांगतो. “तुमच्याकडे असलेले सर्व विका आणि गरिबांना पैसे दया. जुन्या न होणाऱ्या व स्वर्गातही न संपणाऱ्या अशा थैल्या स्वतःसाठी करा कारण तेथे चोर जाऊ शकणार नाही व कसर ही त्याचा नाश करू शकणार नाही.” (लुक १२: ३३).                     

          असिसिकार संत फ्रान्सिस ह्यांनी येशूचे तंतोतंत अनुकरण केले व त्यामुळेच त्यांना आज आपण आलतेर ख्रिस्तूस किंवा दुसरा ख्रिस्त म्हणून संबोधतो. त्याने आपले सर्व कपडे काडून फेकून दिले व आपले जे काही होते नव्हते ते गोर गरिबांना देऊन टाकले. इतकेच नव्हे तर त्याने आपले आई-वडील, घरदार सोडून येशूची सुवार्ता लोकांना सांगितली व इतरांची सेवा केली. महात्मा गांधी ह्यांनी सुद्धा आपले चांगले कपडे टाकून धोतीचा स्वीकार केला. कारण भारतात असंख्य लोक गरिब आहेत व त्यांच्याकडे घालावयास पुरेसे कपडे नाहीत म्हणून त्यांच्याशी एकरूप होऊन त्यांच्या बरोबरीने जीवन जगण्यास त्यांनी धोती परिधान केले.

          येशू ख्रिस्त म्हणतो, जे तुमचे आहे ते विकून दानधर्म करा. कारण ज्या कोणाला पुष्कळ दिले आहे त्याच्याजवळून पुष्कळ मागण्यात येईल.

          आपले जीवन हे परमेश्वराकडून आपल्याला मिळालेले दान आहे. परमेश्वराने आपल्याला त्याच्या गौरवासाठी आणि इतरांच्या सेवेसाठी निर्माण केलेलं आहे. आपल्याला अनेक वरदाने, कलागुण, बुद्धिमत्ता वैगेरे देऊन देवाने आपणास सर्वगुण संपन्न केले आहे. आपल्या बुद्धीचा, कलागुणांचा योग्य तो वापर करून आपण आपले जीवन घडविणे रास्तच आहे. देव आपल्या जीवनाद्वारे इतरांच्या जीवनात सुख समाधान असावे म्हणून योजना तयार करीत असतो. आपल्या जीवनाद्वारे अनेकांच्या जीवनात आनंद निर्माण व्हावा हीच ईश्वराची इच्छा आहे.

          जी व्यक्ती आपल्याला मिळालेल्या दानांचा वापर इतरांच्या भल्यासाठी करते, त्या व्यक्तीला परमेश्वर भरपूर कृपादाने देऊन वैभवसंपन्न करीत असतो. आपण ज्या मापाने द्याल त्याच मापाने आपल्याला परमेश्वराकडून त्याची परतफेड मिळत असते. प्रभू येशू आज म्हणतो, ‘ज्याच्याजवळ पुष्कळ आहे त्याला पुष्कळ दिले जाईल’ म्हणजेच जो आपल्या कलागुणांचा विकास करून त्याचा सदुपयोग करील त्याला जास्त कृपादाने प्राप्त होतील. आपण ज्यांना सहाय्य करतो व ज्यांच्या जीवनात आनंद निर्माण करतो, त्यांच्या प्रार्थनेद्वारे आपल्याला देवाकडून प्रतिफळ मिळत असते. आपले जीवन हे आपले नाहीच ते परमेश्वराने त्याची योजना पूर्णत्वास नेण्यासाठी दिलेले जणू उसने ‘दान’ आहे म्हणूनच दु:खी, कष्टी, असहाय्य व संकटग्रस्त अशा सर्वांच्या मदतीला धावून जाणे आपले परमकर्तव्य आहे.

          येशूने शिष्यांस नेहमी सावध व जागृत राहण्यास सांगितले. कायम सज्ज व तयारीने राहा ज्या प्रमाणे एखादा नोकर आपल्या मालकाच्या परत येण्याची वाट पाहत असतो. देव कुठल्याही वेळी आपल्या भेटीला येऊ शकतो. ज्याप्रमाणे येशू आपल्या शिष्यांना म्हणतो, “मनुष्याचा पुत्र कुठल्याही वेळी येईल, जेव्हा तुम्ही त्याची अपेक्षा करीत नाही.” आध्यात्मिक मनुष्य नेहमी तत्पर व देवाच्या येण्यासाठी तयार असतो. तो देवाला प्रत्येक गोष्टीमध्ये स्वीकारतो.

          आजच्या शुभवर्तमाना धनी व दासाचा दाखला देऊन प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला आपल्या कर्तव्याची व जबाबदारीची जाणीव करून देत आहे. आपण आजच्या शुभवर्तमानावर मनन-चिंतन करीत असता आपल्याला परमेश्वराने कोणकोणत्या देणग्या दिलेल्या आहेत हे तपासून पाहूया. त्या देणग्यांच्या आधारे स्वत:चे कुटुंब व समाज या संबंधाने आपण आपली कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडतो का? परमेश्वराने प्रत्येकाला जीवनाचे वरदान देऊन ते समृद्धपणे जगता यावे म्हणून अनेक देणग्या बहाल केलेल्या आहेत. त्या देणग्यांचा योग्य तो वापर करून आपण आपले स्वत:चे तसेच इतरांचे जीवन सुखकर समृद्ध बनवायला हवे. परमेश्वर आपल्याला ह्या दिलेल्या जबाबदारीबद्दल जाब विचारणार आहे व त्याप्रमाणे आपणास योग्य ते बक्षीस देऊन त्याच्या आनंदात सहभागी करणार आहे.

          आज आपण ह्या पवित्र मिस्साबालीदानात सहभागी होत असताना प्रार्थना करूया कि, हे सर्वसमर्थ परमेश्वरा, आमची कर्तव्ये व जबाबदाऱ्या योग्य रीतीने पार पाडण्यास व सर्वकाळच्या आनंदात सहभागी होण्यास आम्हाला पात्र बनव.

 विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे प्रभो, तुझ्या लोकांची प्रार्थना ऐक.

१. ख्रिस्त सभेची धुरा वाहणारे आपले परमगुरुस्वामी, महागुरूस्वामी, धर्मगुरु–धर्मभगिनी व व्रतस्त ह्या सर्वांनी प्रभूच्या आनंदात सहभागी होऊन, त्याच्या सेवेची घोषणा करून लोकांना मार्ग तयार करण्यासाठी मदत करावी म्हणून आपण प्रार्थना करू या.

२. आपल्या धर्मग्रामात जे कोणी आजारी व पिडीत आहेत, खाटेला खिळलेले आहेत त्यांना प्रभूचा प्रेमदायी स्पर्श व्हावा व त्यांचे दुःख सहन करण्यास त्यांना प्रभूची कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करू या.

३. आज बरीचसी युवक पीडी वाम मार्गाला जात आहे, बेरोजगारी वाढत आहे अश्यांना प्रभूचा आशीर्वाद लाभावा आणि त्यांनी त्यांच्या आयुष्यात चांगले कार्य करून आपला व समाजाचा विकास करावा म्हणून आपण प्रार्थना करू या.

४. आजच्या उपासनेमध्ये सहभागी झालेल्या सर्व भाविकांनी परमेश्वराने दिलेल्या दानांचा योग्य वापर स्वत:साठी न करता इतरांसाठी करावा व परमेश्वराचा आनंद इतरांना द्यावा म्हणून आपण प्रार्थना करू या.

५. थोडावेळ शांत राहून आपण आपल्या सामाजिक, कौटुंबिक व वैयक्तिक गरजांसाठी प्रार्थना करू या.