Friday 26 May 2023

 




Reflections for the Homily of Pentecost Sunday        (28-05-2023) By Br. Trimbak Pardhi.



पवित्र आत्म्याचा सण (पेन्टेकॅास्टचा सण)

दिनांक: २८/०५/२०२३

पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये २:१-११

दुसरे वाचन: १ करिंथ १२:३ब-७, १२-१३

शुभवर्तमान: योहान २०:१९-२३




प्रस्तावना:

आज आपण पुनरुत्थान काळातील शेवटचा रविवार, म्हणजे पेंटेकॉस्ट हा सण साजरा करत आहोत. आजच्या दिवशी प्रभु ख्रिस्ताने आपल्या अती प्रिय शिष्याना एका महान व महत्त्वपूर्ण गोष्टीची देणगी दिली, ती म्हणजे पवित्र आत्मा होय. ह्या सणाला पेंटेकॉस्ट असे देखील म्हणतात. पेंटेकॉस्ट म्हणजे पन्नासावा दिवस. ह्या सणाला ख्रिस्तसभेचा वाढदिवस म्हणून संबोधला जाते.

आजची तीनही वाचने आपणास पवित्र आत्म्याद्वारे प्रेषिताना मिळालेल्या सामर्थ्यचे वर्णन करीत आहे. आजचे पहिले वाचन प्रेषितांची कृत्ये यातून घेतले आहे. ह्या वाचनात आपल्याला कळून येते की, ख्रिस्ताचे प्रेषित व त्यांच्यासोबत असलेली लोकं पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन, त्यांना वाचा दिली तेव्हा ते निरनिराळ्या भाषांतून बोलू लागले. आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल आपणास सांगत आहे की, पवित्र आत्मा हा एक आहे. हा आत्मा प्रभू व देव याच्याकडून विविध प्रकारची कृपादाने, देणग्या व सेवाकार्य घेऊन येत असतो. कृपादाने विविध आहेत, तरी ती एका आत्म्यापासून मिळतात.

आजच्या शुभवर्तमानात संत योहान आपणास सांगत आहे कि, जेव्हा ख्रिस्ताचे शिष्य आणि मरिया माता वरच्या खोलीत एकांतात होते, तेव्हा ख्रिस्त ला आणि त्याच्यामध्ये उभा राहून पवित्र आत्मा देऊन सुवार्तेचा प्रचाराचे आदर्श देतो. पवित्र आत्मा हा आपणा प्रत्येकामध्ये बाप्तिस्मा संस्काराद्वारे  संचारित आहे. हा पवित्र आत्मा फक्त शिष्यांनाच नव्हे तर आपणा सर्वांना दिलेला आहे. त्यामुळे शिष्याप्रमाणे आपला देखील पवित्र आत्म्यावरील विश्वास दृढ व्हावा आपणास ख्रिस्ताची सुवार्ता इतरांपर्यंत  पोहचविण्यास पवित्र आत्म्याचे सामर्थ्य मागुया.


बोध-कथा:

एका सुंदर शहरात अत्यंत धार्मिक मध्यमवर्गीय कुटुंबातील एक मोहन नावाचा भक्त राहत होता. रोज सकाळी उठून तो देवाची भक्ति करायचा देवाचे नाव घेतल्याशिवाय तो कोणतेही कार्य करत नव्हता. जीवनाचा संसार सुखाचा चालत असताना, एके वर्षी खूप पाऊस पडला. दोन-तीन दिवस पाऊस चालूच होता व नद्या तुडूंब भरून वाहू लागल्या. गावात पाणी भरला व लोकांची घरे बुडायला लागली. मोहाचे घरसुद्धा बुडायला लागले होते. तेव्हा त्यांनी आपल्या देवाकडे प्रार्थना केली की, देवा मला वाचव. देवाने त्याची प्रार्थना ऐकली व त्याला वाचवण्यासाठी देवाने एका उत्तम पोहणाऱ्या मनुष्याला पाठविले. परंतु मोहन त्या मनुष्याला म्हणाला, माझा देव मला वाचवील मला तुझी गरज नाही म्हणून तो मनुष्य तेथून निघून गेला. थोड्या वेळाने त्याला वाचविण्यास देवाने एक छोटी नाव पाठवली. तरीदेखील त्याने नकार देऊन ती मदद फेटाळली.

थोड्या वेळानंतर पाणी दुसऱ्या मजल्या पर्यंत पोहोचले, हे पाहून मोहन घाबरला व त्याने देवाला हाक मारली देवा मला वाचव”. देवाने परत त्याच व्यक्तीला विमानाद्वारे पाठविले परंतु मोहनने परत नकार दिला आणि सांगितले की, माझा देव मला वाचवायला येईल. त्यामुळे ती व्यक्ती आपलं विमान घेऊन निघून गेली. थोड्या वेळानंतर सगळीकडे पाणी भरून गेले व मोहनचें घर पाण्याखाली बुडाले. त्यामध्ये मोहनसुद्धा बुडून मरण पावला.

मरण पावल्यानंतर मोहन देवाघरी गेला आणि देवाला भेटला. त्यांनी देवाला म्हटले मी तुझी भक्ति रात्र आणि दिवस केलीं. मी तुझ्या आज्ञेत राहिलो तरी पण तु मला वाचवण्यास आला नाही. तेव्हां देव मोहनला म्हणाला की, मी तुला वाचवण्यास आलो नाही परंतु मी एका मनुष्या द्वारे तीन वेळा आलो होतो परंतु तू मला ओळखले नाही. तू मला नकार दिलास. देव कोणत्याही रुपात येत असतो त्याला आपण ओळखले पाहिजे आज आपण अशाच एका पवित्र आत्म्याविषयी आजच्या उपासने पाहणार आहोत.


मनन चिंतन:

आज देऊळमाता पवित्र आत्म्याचा सण साजरा करीत आहे. ह्या सणाला पेंटेकोस्ट असेही म्हणतात. पेंटेकोस्ट म्हणजे ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा पन्नासावा दिवस, आजच्या दिवशी प्रेषितांवर पवित्र आत्मा उतरला. वल्हांडण सणानंतर पन्नासाव्या दिवशी पिकांच्या कापणीचा सण यहूदी लोक साजरा करत असत. ह्या सणाचा उद्देश म्हणजे धान्याच्या पिकाची समाप्ती झाली आहे, ह्याची आठवण करणे व त्याबद्दल देवाला धन्यवाद देणे असा होतो.

पहिल्या वाचनात सांगितल्या प्रमाणे आपणास पेंटेकॉस्टची ओळख पिकाच्या कापणीच्या सणाबरोबर  झाली व तो दिवस पवित्र आत्म्याशी जोडला गेला. पवित्र आत्मा हा त्रैक्यामधील तिसरा व्यक्ती आहे. प्रभू येशू ख्रिस्त अनेक वेळा पवित्र आत्मा पाठविण्याचे वचन देतो. विशेषकरून दृढीकरण संस्काराद्वारे आपण पवित्र आत्मा स्वीकारत असतो. या संस्काराद्वारे आपण पवित्र आत्म्याने भरून जातो व आपण ख्रिस्ताचे साक्षीदार बनतो. पवित्र आत्म्यासाठी अनेक प्रतीके वापरण्यात येतात ती म्हणजे पाणी, वारा, अग्नि व कबूतर. अशी प्रतीके बायबलमध्ये पवित्र आत्म्यासाठी देखील वापरण्यात आली आहेत.

देवाने पाठविलेला पवित्र आत्मा अनेक व्यक्तीमध्ये वस्ती करून राहत आहे. पेंटेकॉस्टच्या दिवशी म्हणजे पन्नासाव्या दिवशी, जेव्हा सर्व शिष्य व लोक एकत्र जमले असताना स्वर्गातून आवाज आला व सोसाट्याच्या वाऱ्यासारखा खाली आला. शिष्यांना अग्नीच्या जीभा सारखा खाली अवतरताना दिसल्या व त्या वेगवेगळ्या होऊन प्रत्येकावर त्या वसल्या. ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले. तद्नंतर ते निरनिराळ्या भाषा बोलू लागले. ह्याचा अर्थ हा की ख्रिस्तसभेचे मिशनकार्य एका विशिष्ठ भागासाठी अथवा जातीसाठी अथवा देशासाठी अथवा भाविकांसाठी नसून ते अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी आहे.

तसेच दुसऱ्या वाचनात पवित्र आत्म्याची दाने ख्रिस्ती लोकांच्या जीवनात उघडताना आपणास दिसत आहे. संत पौल आपणास सांगत आहे की, देव एकच आहे. आपणा सर्वांना जीवनदान देवाकडून मिळालेली आहे. त्याचा वापर कसा करावा व कुठे काय करावे हे प्रत्येकाच्या जीवनावर अवलंबून आहे. ही दाने स्वतःच्या गौरवासाठी नव्हे तर समाजाच्या व ख्रिस्तसभेच्या बांधीलकीसाठी दिली गेली आहे.

बोधकथेत सांगितल्याप्रमाणे देव, पवित्र आत्मा आपल्या समोर कोणत्याही रूपामध्ये पाठवू शकतो. त्या पवित्र आत्म्याला आपण ओळखले पाहिजे. पवित्र आत्मा आपणास पाप करण्यास सांगत नाही, तर तो पापांपासून दूर राहण्यास आपणास मार्गदर्शन करत असतो. आपणास मार्ग तो दाखवत असतो. पवित्र आत्मा आपल्याला देवाबरोबरचे आपले प्रेमाचे संबंध कायमचे टिकवून ठेवण्यास मदत करतो. आपल्या वाईट प्रसंगी किंवा दु:ख संकटात पवित्र आत्मा आपल्याला लख्ख प्रकाशासारखा वाट दाखवत असतो.

पवित्र आत्मा हा जगाच्या निर्मितीपासून जगाच्या अंतापर्यंत आपल्या जोडीला व आपल्या बरोबर आहे. सांगायचे तात्पर्य एवढेच की, देव प्रत्येक क्षणी, प्रत्येक पावलो-पावली आपल्या जोडीला असतो. परंतु प्रश्न असा आहे कि, आपण देवाबरोबर आहोत का? देव कधीच त्याच्या निर्मितिची साथ सोडत नाही परंतु निर्मिती देवाची सात क्षणोक्षणी सोडत असते. आज येशु ख्रिस्त शिष्याजवळ व आपल्या प्रत्येकाच्या जवळ येऊन, त्याचा पवित्र आत्मा देव आपणास मिशनकार्य करण्यास पाठवत आहे. पवित्र आत्मा हा दुसरा तिसरा कोणी नसून पुनरुत्थित ख्रिस्ताचा श्वास आहे.

ज्या लोकांने पवित्र आत्मा स्वीकारला आहे ते लोक आत्म्याच्या नावाने कार्य करत आहेत. त्यामुळे जर आपल्या मनात इतरांबद्दल राग द्वेष हेवा, मत्सर, स्वार्थ किंवा लोभ असेल तर सर्वप्रथम आपल्याला या सर्व गोष्टींपासून आपले मन रिकामे करावे लागेल व पवित्र आत्म्याचा स्वीकार करण्यासाठी सज्ज रहावे लागेल.


विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: “हे प्रभो तुझ्या आत्म्याचे दान आम्हाला दे.”

१. ख्रिस्त प्रेमाचा दिवा तेवत ठेवण्यास हातभार लावणारे आपले परमगुरूस्वामी फ्रान्सिससर्व महागुरूधर्मगुरूव्रतस्थ व प्रापंचिक ह्यांना चांगले आरोग्य मिळावे व हे कार्य अखंड चालू ठेवण्यास पवित्र आत्म्याने त्यांना प्रेरणा द्यावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करू या.

२. जे वासनाव्यसन यांच्या आधीन गेले आहेतजे मृत जीवन जगत आहेत त्यांना आमच्या सेवेद्वारे नवजीवन प्राप्त व्हावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.

३. आजच्या तरूण पिढीला जीवघेण्या स्पर्धेला तोंड दयावे लागत आहे. प्रसंगी ते निराश होत आहेत. या तरूण पिढीत असलेला उत्साह कायम टिकून राहावाम्हणून आपण प्रार्थना करू या.

४. इकडे आड तिकडे विहीर अशा परिस्थितीत असलेला आपला देश अनेक नैसर्गिक आपत्तीशी सामना करत आहे, हे आपत्ती दूर व्हाव्या व उद्ध्वस्त झालेले त्यांची घरे व जीवन पुनर्स्थापित व्हावीत यासाठी आपण विशेष प्रार्थना करू या.

५. थोडावेळ शांत राहून आपल्या सामाजिक, कौटुंबिक, व वयक्तिक गरजा प्रभूकडे मांडू या.


Friday 19 May 2023

 




Reflections for the Homily of Ascension of Our Lord      (21-05-2023) By Br. Reon Andrades.




प्रभूच्या स्वर्गारोहणाचा सोहळा


दिनांक: २१/०५/२०२३

पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये १:१-११

दुसरे वाचन: इफिसकरांस पत्र १:१७-२३

शुभवर्तमान: मत्तय २८:१६-२०.


प्रस्तावना:

आज आपण ख्रिस्ताचा स्वर्गरोहणाचा सण साजरा करीत आहोत. ख्रिस्ताचे स्वर्गरोहण आपणास एक नवा आशेचा किरण घेऊन येत आहे. आजच्या दिवशी शिष्य दुःखी झाले कारण त्यांचा मसीहा/ प्रभु त्यांच्यापासून निघून गेला आणि स्वर्गात विराजमान झाला. तर दुसरीकडे ते आनंदीही झाले, कारण त्याने दिलेले वचन पूर्ण करावयास तो गेला आहे, ते म्हणजे पवित्र आत्म्याचे दान. आजची तीनही वाचने आपणास प्रभू येशूच्या स्वर्गरोहणाची साक्ष व पवित्र आत्म्याचा वर्षाव यांची प्रचिती देत आहे. आपणही प्रभूच्या स्वर्गरोहणाचे साक्षीदार बनावेत व आपणासही पवित्र आत्म्याचे दान लाभावे म्हणून आपण या मिस्साबलिदानात प्रार्थना करूया.


मनन चिंतन:

स्वर्गरोहण हा ख्रिस्ती श्रद्धेच्या सहा घटका मधला एक घटक आहे. हे सहा घटक म्हणजे ख्रिस्तजन्म (देहधारण), मरण, पुनरुत्थान, स्वर्गारोहण, पेंटेकॉस्ट व पुनरागमन. आजच्या पहिल्या वाचनात व शुभवर्तमानामध्ये प्रभू येशूचे स्वर्गरोहण व त्याने दिलेल्या आज्ञा याची प्रचिती आपणास येते. संत पौल, पवित्र आत्म्याच्या ज्ञानाविषयी तसेच त्याचे ज्ञान व शहाणपण आपल्याला आशेचं जीवन जगण्यास किती महत्त्वाचं आहे याची आपणास आठवण करून देत आहे. आपल्या आध्यात्मिक जीवनासाठी आवश्यक आणि ख्रिस्ताच्या स्वर्गरोहणाशी संबंधीत असलेल्या तीन मुद्यावर विचार करूया.


१. स्वर्गरोहाणाचे तथ्य

पुनरुत्थानानंतर प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना ४० दिवस आपले दर्शन देत राहिला. त्या काळात त्यांनी त्यांना स्वर्गराज्याविषयीची शिकवण दिली.  चाळीस दिवसानंतर जेव्हा त्याची स्वर्गात जाण्याची वेळ आली तेव्हा त्याने त्यांना त्याची सुवार्ता इतरापर्यंत पोहचविण्याची जबाबदारी सोपविली.  शिष्याने व तेथे हजर असलेल्या अनेकांनी येशूला स्वर्गात चढताना पाहिले. अनेकांनी ह्याची  ग्वाही दिली आहे आणि त्यांची ही साक्ष खरी आहे. येशूचे स्वर्गारोहण ही एक काल्पनिक गोष्ट नसून, ती सत्य घटना आहे. तो स्वर्गात चढून पित्याच्या उजव्या बाजूला विराजमान झाला आहे. सर्व दूत व संतगण त्याची महिमा व गौरव गात आहेत. तो मेला नाही, तर तो जिवंत आहे. तो दूर देखील नाही, तर तो आपणामध्ये आहे, कारण त्याने नमूद केल्याप्रमाणे तो आपणाबरोबर जगाच्या अंतापर्यंत आहे.

 

२. स्वर्गरोहणाचे फळ

स्वर्गरोहणाची घटना आपणास दोन गोष्टींकडे लक्ष केंद्रित करावयास भाग पाडते, त्या म्हणजे पवित्र आत्म्याचे दान व ख्रिस्ताचे पुनरागमन.

अ. पवित्र आत्म्याचे दान

पवित्र आत्म्याची देणगी विषयी बोलताना प्रभु म्हणतो मी जातो हे तुमच्या हिताचे आहे. कारण मी गेलो नाही तर कैवारी तुमच्याकडे येणार नाही. मी गेलो तर त्याला तुमच्याकडे पाठवून देईल” (योहान १६:७). प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेले हे वचन त्याने पेंटेकॉस्टच्या दिवशी पूर्ण केले. कारण तो म्हणाला होता की, मी तुम्हाला अनाथ सोडणार नाही. पवित्र आत्म्याचे दान मिळता शिष्य निर्भीडपणे अथवा कोणाला न घाबरता ख्रिस्ताची सुवार्ता जगाला पसरवू लागले. ते अन्य भाषा देखील बोलू लागले. पेत्राच्या एका प्रवचनाने हजारो माणसांनी ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा घेतला. पवित्र आत्म्याच्या सहाय्याने शिष्यांनी अनेक लोकांना आरोग्याचे दान दिले व चमत्कार देखील केले. परंतु त्यांनी तो आत्मा त्यांच्यापूर्ती ठेवला नाही तर इतरांना देखील तो दिला. आज शिष्यां प्रमाणे आपण त्या आत्म्याची वाट पाहत नाही, कारण तो आपणास आपल्या बाप्तिस्माच्या वेळेस दिलेला आहे. पण आपण त्याचा वापर चांगल्या कामासाठी करतो का? आपण तो आत्मा इतरांना देतो का? आपल्याला त्या आत्म्याची जाणीव आहे का?

ब. पुनरागमन

जेव्हा शिष्य आकाशात टक लावून पाहत होते, तेव्हा शुभ्र वस्त्रे परिधान केलेले दोन माणसे त्यांच्याजवळ येऊन उभी राहिली. ती त्यांना विचारू लागली गालीलच्या नागरीकांनो इथे तुम्ही आकाशाकडे काय पाहत उभे राहिलात? येशू स्वर्गात गेला आहे. ज्याप्रमाणे तो वर गेला आहे त्याचप्रमाणे तो परत येणार आहे (प्रेषितांची कृत्ये १:११). येशू ख्रिस्त आपणास जागा तयार करावयास गेला आहे. तो म्हणतो, माझ्या पित्याकडे भरपूर जागा आहे जर ती नसती तर मी तसे तुम्हाला सांगितले असते. म्हणून आपणास खात्री आहे की एके दिवशी, जेव्हा तो पुन्हा जगाचा न्याय करावयास येणार आहे तेव्हा आपण त्याच्या बरोबर स्वर्गराज्यामध्ये असू. यासाठी आपण नेहमीच तयारीत असणे गरजेचे आहे, कारण आपणास ठाऊक नसलेल्या वेळेस तो येणार आहे.


३. ख्रिस्ताचा आदेश

वर स्वर्गात जाण्यापूर्वी ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना आदेश दिला की, जेव्हा तुमच्यावर पवित्र आत्मा उतरेल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. मग पृथ्वीच्या कानाकोपर्यात माझी साक्ष तुम्ही लोकांना सांगाल (प्रेषितांची कृत्ये १:८). आज आपणास वर आकाशाकडे पाहण्यास बोलावले नाही, तर ख्रिस्ताची साक्ष इतरांना देण्यास व त्याचा प्रचार करण्यास, आपणास पाचारण केले आहे. मत्तय लिखित शुभवर्तमान अध्याय २८ ओवी १८-१९ मध्ये आपण ऐकतो की, स्वर्गात आणि पृथ्वीवर मला सर्व अधिकार दिला आहे, तेव्हा साऱ्या राष्ट्रांना माझे शिष्य करा. अनेक वेळेस आपण आपल्या आरामदायी जीवनातून बाहेर पडायला कमी पडतो. ख्रिस्तासाठी आपण आव्हान स्वीकारत नाही. याप्रकारे आपण ख्रिस्तानी दिलेला आदेशाचे पालन करत नाही. ज्या प्रकारे शिष्यांनी सुवार्ता प्रचाराची भूमिका पार पाडली, त्याच प्रकारे आज आपणही सुवार्ता प्रचाराचे कार्य जोमाने सुरू ठेवूया.


विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: “हे प्रभू, स्वर्गीय सुख प्राप्त करण्यास आम्हांस साहाय्य कर.”

१. ख्रिस्तसभेचे अधिकारी पोप महाशयबिशप्सधर्मगुरूधर्मभगिनी व सर्व प्रापंचिक ह्या सर्वांना पुनरूत्थित प्रभू येशू ख्रिस्ताने चांगले आरोग्य बहाल करावे व त्यांच्या कार्यावर प्रभूचा आर्शिवाद असावाम्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.

२. हे प्रभू येशू ख्रिस्ता तुझी कृपा दृष्टी आमच्या देशांच्या सर्व नेत्यांवर आणि अधिकाऱ्यांवर असू दे. त्यांना सत्याने आणि न्यायाने राज्यकारभार करण्यास मदत कर व त्यांना सर्व वाईट वृत्तीपासून दूर ठेव व चांगल्या मार्गांवर चालण्यास मदत करम्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करू या.

३. आपणा सर्वाना पवित्र आत्म्याचे दान लाभावे व देवास अनुरूप असे जीवन आपण जगावे व ख्रिस्ताची साक्ष इतरांस आपण आपल्या वर्तणुकीतून द्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

४. हे प्रभू परमेश्वरा आज आम्ही विशेष करून सर्व आजारी माणसांसाठी प्रार्थना करितोत्यांच्या कुटुंबावर तुझा आर्शिवाद असू दे व सर्व सकंटानां सामोरे जाण्यास त्यांना शक्ती दे. पुनरूत्थित प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना चांगले आरोग्य द्यावे व सर्व आजारातून त्यांची सुटका करावीम्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करू या.

५. थोडावेळ शांत राहून आपण आपल्या सामाजिककौटुंबिक व वयक्तिक हेतूंसाठी प्रार्थना करू या.