Friday 28 April 2023

 

Reflections for the Homily of Fourth Sunday of Easter (30-04-2023) By Fr. Suhas Pereira.

पुनरुत्थान काळातील चौथा रविवार




दिनांक: ३०/०४/२०२३

पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये २:१४,३६-४२.

दुसरे वाचन: १ पेत्र २:२०-२५.

शुभवर्तमान: योहान १०:१-१०.

 

प्रस्तावना:

      आज पुनरुथानकाळातील चौथ्या रविवारी आपण गुड शेफर्ड संडे किंव्हा उत्तम मेंढपाळाचा रविवार साजरा करत आहोत. आजचं पाहिलं वाचन प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनाची शुभवार्ता संक्षिप्त रूपात सांगतं आणि प्रभू-येशू कोण आहे? तो आपलं तारण कसं करतो आणि आपण सर्वानी त्याच्या तारणकार्याला प्रतिसाद कसा द्यावा याबद्दल सांगत आहे. आजच्या दुसऱ्या वाचनात संत पेत्र आपल्याला प्रभू-येशू उत्तम मेंढपाळांच्या त्यागाबद्दल आणि त्याच्या निस्वार्थी जीवनाबद्दल सांगत आहे. "त्याने स्वत: आमची पापे वाहिली त्याच्या शरीरावर घेऊन वधस्तंभावर वाहिली, यासाठी की आम्ही आमच्या पापाला मरावे. आणि नीतीमत्त्वासाठी जगावे. त्याला झालेल्या जखमांमुळे तुम्हाला आरोग्य मिळाले." आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू मेंढपाळ आणि मेंढरांचा दाखला वापरत आहे.  प्रभू येशू म्हणतो कि, "मी उत्तम मेंढपाळ आहे आणि मी फक्त माझ्या कळपाच्या भलेपणाचा विचार करतो आणि त्यासाठी सदैव कार्यक्षम असतो." प्रभू येशू आपला उत्तम मेंढपाळ आहे आणि त्याने आपल्या सर्वांपुढे निस्वार्थी आणि सेवाभावी जीवनाचा आदर्श ठेवलेला आहे. त्याच्या आदर्शाचे अनुकरण आपण सर्व ख्रिस्तीजणांनी करावं म्हणून आपण परमेश्वराची कृपा आणि मदत मागुया. तसेच आज आपण ख्रिस्तसभेच्या सर्व मेंढपाळांसाठी प्रार्थना करू या आणि ख्रिस्तसभेचे भावी मेंढपाळ बनण्यासाठी परमेश्वराने अनेकानेक तरुणांना प्रेरित करावं म्हणूनसुद्धा खास प्रार्थना करूया.

 

मनन चिंतन:

      जॉन केलमनने त्याच्या द होली लँड या पुस्तकात फील्ड पेनचे म्हणजेच मेंढरांना ठेवण्याच्या जागेच/मेंढवाड्याचं वर्णन केले आहे. हा मेंढवाडा सुमारे चार फूट उंचीच्या गोलाकार दगडी भिंतीचा बनलेला आहे आणि त्यामध्ये आत आणि बाहेर जाण्याचा एक मार्गसुद्धा आहे.  केलमन म्हणतात की एके दिवशी एका पवित्र भूमीच्या पर्यटकाने हेब्रॉन जवळ शेतातील मेंढरांना ठेवण्याचा असा एक मेंढवाडा पहिला. त्याने शेजारी बसलेल्या मेंढपाळाला विचारले, "तुझ्या मेंढवाड्यासाठी दरवाजा कुठे आहे?" मेंढपाळ म्हणाला, "मी दरवाजा आहे." मग मेंढपाळाने पर्यटकाला तो दररोज रात्री मेंढवाड्यात आपला कळप कसा आणतो आणि मग प्रवेशद्वाराच्या पलीकडे कसा झोपतो त्याचे त्याने वर्णन केले.  कोणतीही मेंढी मेंढवाडा सोडून बाहेर जाऊ शकत नव्हती आणि कोणताही वन्य प्राणी त्याच्या अंगावर पाऊल टाकून त्याला जागृत केल्याशिवाय मेंढवाड्यात प्रवेश करू शकत नव्हता.

      आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू, जीवनाकडे जाणाऱ्या दरवाज्याबद्दल/ द्वाराबद्दल बोलत आहे. दरवाजे हे आपल्या दैनंदिन जीवनातील साहजिक आणि आपल्या जीवनात फारसं महत्व नसणाऱ्या वस्तूंपैकी एक आहेत. तरीसुद्धा अनेक वेळा बंद दरवाज्यापुढे किंव्हा मागे असणाऱ्या एखाद्या अनोळखी व्यक्तीची आपल्याला भीती वाटत असते. एखादी व्यक्ती जेव्हा आपली ओळखीची जागा, आपल्या सवयीच्या चार भिंती मधून बाहेर येऊन एखाद्या नवीन, अपरिचित, अनोळखी अशा जगात पाय टाकते, तेव्हा त्या व्यक्तीला स्वाभाविकच भीती वाटत असते. कारण हि व्यक्ती आपल्या सुरक्षिततेचं कवच टाकून देऊन अनोळखी जगतास स्वतःला सोपवून देते. अशा मनुष्याला उद्याची, भविष्याची, पुढे काय होईल याची चिंता आणि भीतीसुद्धा असते. परंतु ह्या भीतीमुळे खचून ना जाता अनोळखी जगतात, भविष्यात वाटचाल करण्यासाठी जेव्हा मनुष्य पाऊलं टाकतो, तेव्हाच त्याची भीती नाहीशी होण्यास सुरु होते.

      प्रभू येशू आपल्याला सांगत आहे, कि तोच जीवनाचा दरवाजा आहे. "मी दार आहे. जो माझ्याद्वारे आत जातो त्याचे तारण होईल (योहान १०:९)." या शब्दांनी प्रभू येशू आपल्याला त्याच्याकडे येण्यासाठी आणि त्यांच्याद्वारे विपुल प्रमाणात जीवनाचा अनुभव घेण्यासाठी आमंत्रण देत आहे. त्यासाठी आपल्याला आपलं नेहमीचं जीवन त्यागून त्याच्या(प्रभूच्या) जीवनाचा अनुभव घेतला पाहिजे. या सर्वामध्ये प्रभू येशू आपल्यासाठी फक्त जीवनाचा दरवाजाच नाही, तर उत्तम मेंढपाळसुद्धा आहे. ज्याप्रमाणे एखादा मेंढपाळ आपल्या मेंढरांची योग्य निगा राखतो आणि त्यांना हिरव्या कुरणात चारण्यासाठी नेतो, त्याप्रमाणे प्रभू येशूला आपल्या जीवनाचा मेंढपाळ बनून आपली निगा राखायची आहे, आपलं संरक्षण करावयाचं आहे आणि आपल्या सर्व प्रकारच्या भितींतून मुक्त करून आपल्याला विपुल आणि अनंत जीवनाचं दान बहाल करावयाचं आहे.

      असं असेल तर कदाचित आपल्याला प्रश्न पडेल कि, फार थोडीशीच लोकं प्रभू येशूच्या ह्या आकर्षक प्रस्तावाचा स्वीकार का करतात? फारच थोडी लोकं आपलं सवयीचं जीवन सोडून देऊन, ह्या जीवनाच्या चार भिंतीबाहेर जाऊन प्रभू येशूने दाखवलेल्या दरवाजातून आत जाण्याचा प्रयत्न करतात आणि त्याने आपल्यासाठी तयार केलेल्या सार्वकालिक जीवनाचा उपभोग घेण्याचा प्रयत्न करतात. हे जग आणि ह्या जागतिक गोष्टींना चिकटून बसल्यामुळे सार्वकालिक जीवनाचा आपल्याला विसर पडत असतो. सार्वकालिक जीवनाकडे नेणाऱ्या दरवाजातून आत जाण्यासाठी आपल्याकडे धैर्य नसते.

      आपलं जग हे ऐहिक गोष्टींवर लक्ष केंद्रित करते. अशा या जगाला पैसे, संपत्ती, ऐश्वर्य हे सगळंकाही नाही अस बजावून सांगणाऱ्या हिंमतवान आणि धाडसी व्यक्तींची गरज आहे. अशा लोकांची गरज आहे, जे फक्त परमेश्वर देऊ शकणाऱ्या जीवनाकडे या जगाला नेऊ शकतात; अशा लोकांची गरज आहे, जे जगाला सांगू शकतात कि जर परमेश्वराला आपल्या जीवनाचा ताबा दिला तर हे ऐहिक जीवनसुद्धा आपण परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे जगू शकतो. आपल्यापैकी प्रत्येकाला आपापल्या परीने प्रभू येशूच्या पाठीमागे जाण्यासाठी पाचारण केले गेले आहे आणि आपल्याला सर्वाना प्रभू येशू आज सांगतो, "जो कोणी माझ्यासाठी आपलं जीवन गमावून बसेल त्यालाच जीवनाचा खरा लाभ होईल". प्रभू येशू आपल्यापैकी प्रत्येकाला आज सांगत आहे, "मी जीवन देण्यासाठी आलो. असे जीवन जे भरपूर आणि चांगले आहे."

 

 

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रभू येशू हा आपला उत्तम मेंढपाळ आहे आणि तो सदैव आपल्या भल्याचाच विचार करतो. तो आपल्याला विपुल प्रमाणात जीवनाचे दान देण्यासाठी या पृथ्वीवर आला. त्याच उत्तम मेंढपाळाद्वारे परमेश्वर आपल्या पित्याचरणी आपल्या विनंत्या आणि गरजा आपण मांडू या.

 

प्रतिसाद: हे परमेश्वर दया कर आणि तुझ्या कळपाची प्रार्थना ऎक

 

१) ज्या तरुण तरुणींना परमेश्वर आपल्या मळ्यात कार्य करण्यासाठी पाचारण देत आहे त्यांनी परमेश्वरी हाकेला योग्य प्रतिसाद देऊन परमेश्वर दाखवत आहे त्या मार्गाने आपलं जीवन जगण्यासाठी त्यांना प्रेरणा आणि शक्ती मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

 

२) जी लोक हरवलेल्या मेंढरांप्रमाणे ख्रिस्तसभेपासून दुरावलेली आहेत आणि जिवंत देवापासून दूर गेलेली आहेत, अशांना आपल्या जीवनात परमेश्वराचा प्रकाश दिसावा आणि प्रभू येशू ख्रिस्त हाच आपल्या जीवनाचा उत्तम मेंढपाळ म्हणून ओळख आणि जाणीव व्हावी म्हणून आपण प्रार्थना करू या.

 

३) आपल्या ख्रिस्तसभेची आणि आपल्या समाजाची धुरा वाहणाऱ्या सर्व नेत्यांनी ख्रिस्तासारखा निस्वार्थी सेवेचा, त्यागाचा आणि प्रेमाचा ध्यास घेऊन सदैव लोककल्याणासाठी स्वतःला वाहून घ्यावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

 

४) आपल्या सर्व आजारी व्यक्तींना परमेश्वरी कृपेचा गुणकारी स्पर्श व्हावा आणि त्यांना उत्तम मेंढपाळाकडून नवजीवन लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

 

५) आपल्या कुटुंबातील आणि धर्मग्रामातील सर्व मृत बंधू-भगिनींना परमेश्वराच्या स्वर्गीय नंदनवनात सार्वकालिक सुखाचा शांतीचा उपभोग घेता यावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

 

हे परमेश्वर आमच्या स्वर्गीय पित्या तुझा पुत्र येशू ख्रिस्त याला तू आमचा उत्तम मेंढपाळ म्हणून या पृथ्वीवर पाठवले. त्याच्या पावलांवर पाऊल ठेऊन आम्हीसुद्धा निस्वार्थी आणि त्यागी वृत्तीने जीवन जगावे म्हणून आम्हाला तुझ्या पवित्र आत्म्याने भर. हि प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन.


Link for Marathi Hymn-Prabhu Mendhpall Majha

https://youtu.be/LFL-lR1_lcM



 

Tuesday 18 April 2023

 



Reflections for the Homily of Third Sunday of Easter (23-04-2023) By Br. Pravin Bandya.




पुनरुत्थान काळातील तिसरा रविवार


दिनांक: २३/०४/२०२३

पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये २:१४,२२-३३.

दुसरे वाचन: १ पेत्र १:१७-२१.

शुभवर्तमान: लुक २४:१३-३५.



प्रस्तावना:

      आज अखिल ख्रिस्तसभा पुनरुत्थान काळातील तिसरा रविवार साजरा करीत आहे. आजची उपासना आपणास प्रभूचे साक्षीदार बनण्यास पाचारण करीत आहे. अनेक वेळा आपण सत्य लपवीण्याचा प्रयत्न करतो किंवा सत्याकडून दूर जाण्याचा प्रयत्न करतो, परंतु असं म्हणतात कि आपण सत्य कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी सत्य हे नेहमी सत्यच राहत.

      आजच्या शुभवर्तमानात आपण असेच काहीतरी पाहतो. प्रभू येशूच्या मरणानंतर त्याचे दोन अनुयायी यहुद्यांच्या भीतीमुळे अम्माउसला जात होते. जणूकाही ते सत्याकडून पळत होते किंवा सत्य उघडपणे जाहीर करण्यास रुजू नव्हते. परंतु खुद्द येशू त्यांच्या मध्ये येतो आणि त्यांना जुन्या करारापासून ज्या गोष्टी त्याच्याविषयी सांगण्यात आल्या होत्या त्या सर्वांचा खुलासा करतो व त्यांना सत्याची ओळख पटवून देतो. म्हणून ते अनुयायी पुन्हा शिष्यांजवळ जातात व वाटेत जे काही घडलं त्या विषयी ते त्यांना सांगतात व प्रभूच्या पुनरूत्थानाचे साक्षीदार बनतात.

      आज ह्या पवित्र मिस्साबलीदानात सहभागी होत असतात आपणही ख्रिस्ताच्या पुनरूत्थानाचे साक्षीदार बनावे म्हणून प्रार्थना करूया.


मनन चिंतन:

                   “जगाला संजीवनाची मानव नवजीवनाची  सुवार्ता येशूची”.

सुप्रसिद्ध ब्रिटिश अँग्लिकन दैवी, भजनवादक आणि कवी, हेन्री फ्रान्सिस लाइट ह्यांनी “Abide with me…” हे भक्तीपर गीत रचले आहे. ह्या गीतामध्ये ते अम्माउसच्या वाटेने जाणाऱ्या येशूच्या दोन अनुयायांविषयी सांगतात कि, कशाप्रकारे ते प्रभू येशूला (अनोळखी व्यक्तीला) विनंती करतात कि आमच्या बरोबर रहा कारण, आता रात्र होत आली आहे. हे गीत हृदय स्पर्श करणारे गीत आहे. गीतातील प्रत्येक शब्द हा मन शांत करणारा आहे. जेव्हा एखादी व्यक्ती जीवनात सर्व काही हरवून बसते, जेव्हा त्याला कुठेच मार्ग सापडत नाही, जेव्हा जीवन नकोस वाटतं, तेव्हा ह्या गीताचे बोल अशा लोकांना अशा देणारे ठरतात. “हे प्रभू, माझ्या बरोबर राहा. मला सहाय्य करणारे सर्व पळून गेले आहेत; मला मदत कर. हे प्रभू, माझ्या बरोबर राहा.

      आजच्या पहिल्या वाचनात पेत्र उभा राहून सर्व यहुदी लोकांससमोर कबुली देतो कि, ‘येशू जिवंत आहे, तो मसीहा आहे, तो देवाला मान्य असलेला व देवाला संतोष देणारा आहे. येशूच्या अनेक सामर्थ्यशाली व अद्भुत गोष्टी तुमच्या समोर केल्या. परंतु वडील मंडळीने त्याला दुःख भोगण्यास लावले व क्रुसी खिळले. परंतु परमेश्वराने त्याला मरणातून उठवले. मरण त्याला बांधून ठेऊ शकले नाही;’ अशा प्रकारे पेत्राने ख्रिस्ताविषयी साक्ष दिली.

      तसेच दुसऱ्या वाचनात जेव्हा घाबरलेल्या ख्रिस्ती यहूदी लोकांचा येशूवरील विश्वासामुळे छळ होत होता तेव्हा त्यांना उत्तेजन आणि धीर देण्यासाठी पेत्र म्हणतो कि, ‘सोने देऊन नव्हे, तर ख्रिस्ताच्या मौल्यवान रक्ताने तुम्ही व्यर्थ वागणुकीपासून मोकळे झाला आहात. कारण कसलाही डाग किंवा दोष नसलेल्या कोकरासारख्या ख्रिस्ताच्या बहुमोल रक्ताने तुमची सुटका केली आहे.’ पेत्राची ही साक्ष व येशू विषयीचा हा दिलासा यहुदी लोकांना प्रेरणादायक ठरला.

      आजच्या शुभवर्तमानात, ‘अम्माउसच्या वाटेवर येशूच्या शिष्यांना येशूची भेट’ ह्या घटने विषयी आपण वाचतो. ही घटना एका साध्या प्रसंगापेक्षा अधिक महत्वाची आहे. ही घटना आपल्याला येशूचे जीवन, मरण व पुनरुत्थानाविषयी माहिती देते. ज्याप्रकारे भाकर मोडल्याने त्यांचे डोळे उघडले तसेच मिस्साबलिदानामध्ये आपल्याला येशूचे पूर्ण अस्तित्व जाणवते. परंतु मिस्साबलिदान अथवा आपली उपासना ही येशूला त्या पवित्र भाकारीद्वारे स्विकारल्याने पूर्ण होत नाही तर, जेव्हा आपण मिस्साबलिदानात ख्रिस्ताला सेवन करतो तेव्हा आपण आपल्या प्रभुशी व शेजाऱ्यांशी एकरूप झाल्याची भावना आपल्यात निर्माण झाली पाहिजे. तसेच ज्याप्रकारे शिष्यांना पुनरुत्थित ख्रिस्ताची ओळख पडताच ते ख्रिस्ताची सुवार्ता पसरविण्यासाठी येरुशलेमात परतले तसेच; प्रत्येक उपासनेत अथवा मिस्साबलिदानात आपण अनुभवलेल्या ख्रिस्ताची सुवार्ता इतरांपर्यंत पोहोचविण्यास आपण प्रयत्न केला पाहिजे.

      आपण स्वःतास प्रश्न विचारूया कि, आपण ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाची साक्ष इतरांना देतो का? दैनंदिन जीवनात ख्रिस्त मला साक्षीदार होण्यासाठी बोलावत आहे. मी जे पाहिले, बोलले व केले त्याचा साक्षीदार होतो का? पुनरुत्थानकाळ हा ख्रिस्तासाठी साक्षीदार बनण्याचा काळ आहे. त्याचे खरेखुरे साक्षीदार होण्यासाठी आपण आजच्या उपासना विधीत विशेष प्रार्थना करूया.


विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: “करितो मी याचना ऐकावी प्रार्थना.”

१. आज आपण आपल्या ख्रिस्त सभेसाठी प्रार्थना करूया की, देवाने आपले परमगुरु फ्रान्सिस, कार्डिनल्स, महागुरू, धर्मगुरू, तसेच सर्व श्रद्धावंतांना आशीर्वादित करून, सुखी-समाधानी व नीरोगी ठेवावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.

२. आपण आपल्या सार्वजनिक हितासाठी कार्य करणाऱ्या लोकांसाठी प्रार्थना करुया की, विशेष म्हणजे पोलीस अधिकारी, साफसफाई करणारे कामगार, रोजचा आहार पुरवणारे सेवक-सेविका, इत्यादी ह्यांना परमेश्वर सदोदित त्यांच्या बरोबर राहू दे, त्याचप्रमाणे आम्ही सर्वांनी त्यांना सहकार्य करावे, उदार हस्ते मदत करण्याची सुबुद्धी आम्हाला प्राप्त व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

३. आपण आपल्या राजकीय पुढाऱ्यांसाठी प्रार्थना करूया की, त्यांनी लोकहितासाठी निर्णय घेऊन जनतेच्या प्रगतीस अनुरूप अशी धोरणं बनवावीत व त्या मुळे गोरगरिबांचा उद्धार होऊन, त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना सदोदित तुझ्या प्रेमाच्या मायेखाली ठेवावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

४. हे प्रभू आम्ही सर्वजण राजनीतिक व आर्थिक महामारीत अडकलेलो आहोत. आमच्या मनात अनेक शंका-कुशंका निर्माण होतात. आमच्या विश्वासाला तडा जाण्याची शंका नाकारता येत नाही. तुझ्या अधिकाधिक जवळ येऊन तुझ्यावरच आमची श्रद्धा वाढव हा वरदहस्त आम्ही तुझ्याकडे मागतो म्हणून आपण प्रार्थना करूया.

५. थोडावेळ शांत राहून आपण आपल्या सामाजिक, कौटुंबिक आणि व्ययक्तिक हेतूंसाठी आपण प्रार्थना करूया.


Friday 14 April 2023

      Reflections for the Second Sunday of Easter (16-04-2023) By Fr. Benjamin Alphonso


पुनरुत्थान काळातील दुसरा रविवार

दैवी दयेचा रविवार



दिनांक: १६/०४/२०२३

पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये २:४२-४७

दुसरे वाचन: १ पेत्र १:३-९

शुभवर्तमान: योहान २०:१९-३१

 

विषय: तेव्हा प्रभूला पाहून त्यांना आनंद झाला.


प्रस्तावना:

          ख्रिस्तसभा आज दैवी दयेचा रविवार साजरा करीत आहे. प्रभू येशू दयेचा व करुणेचा महासागर आहे. त्याच्या हृदयातून दयावंत कृपेचा झरा वाहत असतो. प्रभूची दैवी दया आपणास त्याच्यावर श्रद्धा ठेवण्यास आवाहन करीत आहे.

          आजच्या उपासनेतील पहिले वाचन आपल्याला आठवण करून देते कि, ज्यांनी ख्रिस्ताच्या सुवार्तेचा स्वीकार केला, ते एका मनाचे व हृदयाचे होते. ख्रिस्तावरील त्यांच्या श्रद्धेमुळे त्यांनी ख्रिस्तामध्ये पुर्नजन्म स्वीकारला.

          दुसऱ्या वाचनात पेत्र आपल्याला सांगतो कि, देवाच्या दयेत आपला नवीन जन्म झाला आहे. आणि जो देवावर श्रद्धा ठेवतो त्याला स्वर्गातील वतन प्राप्त होईल.

         शुभवर्तमानात संत थोमा त्याच्या ख्रिस्तावरील श्रद्धेची कबुली करून म्हणतो, “माझ्या देवा! माझ्या प्रभो”.

          आपणही आपल्या जीवनात पुनरुत्थित ख्रिस्तावर विश्वास ठेऊन त्याच्यावर असलेली श्रद्धेची कबुली करावी व त्याची दैवी दया आपल्या जीवनात अनुभवावी म्हणून ह्या मिस्साबलीदानात प्रार्थना करू या.

मनन चिंतन:

आजच्या शुभवर्तमानात थोमाचा अविश्वास आणि मग विश्वास ठेवणे या दोन गोष्टींचा उल्लेख केला आहे. येशूच्या शिष्यांनी त्याचे शरीर कबरेतून चोरून नेले होते अशी खोटी बातमी शत्रूंनी गावात पसरविली होती. शिष्य घाबरलेले होते ते एका खोलीत दारे बंद करून बसलेले होते. अकस्मात प्रभू त्यांच्यामध्ये आला आणि त्यांना म्हणाला, “तुम्हास शांती असो.त्यांनी आपल्या जिवंत प्रभूला ओळखले तेव्हा प्रभूला पाहून त्यांना आनंद झाला.

थोमाने प्रत्यक्ष ख्रिस्ताला पाहिले नव्हते म्हणून त्याने शिष्यावर विश्वास ठेवला नाही. आठ दिवसानंतर पुन्हा येशू त्यांच्यामध्ये आला. तुम्हास शांती असो असे म्हटल्यावर प्रभू थोमाकडे वळून त्याला आपले हात दाखविले. त्याची शंका दूर केली. तेव्हा थोमाने, “माझ्या प्रभू माझ्या देवाअशी कबुली केली. तेव्हा येशूने म्हटले, तू मला पाहिले आहेस म्हणून विश्वास ठेवला आहेस, पाहिल्यावाचून विश्वास ठेवणारे ते धन्य.

          येशूचे पुनरुत्थान म्हणजे मरणावर विजय. तो सार्वकालिक जीवनाचा प्रभू आहे ह्याची प्रचीती पटविणारे सत्य म्हणजे त्याचे पुनरुत्थान.

          भूतलावर असा चमत्कार कधी झाला नाही. पण त्या चमत्काराचे जीवनाच्या नवीकरणाचे आपण भागीदार झालो आहोत हे अभिवचन त्याने आपल्याला दिले आहे. मी तुम्हास खचित सांगतो, जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठविले त्याजवर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि त्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही तो मरणातून जिवनात पार गेला आहे.

येशूचे पुनरुत्थान व त्याचा मरणावर विजय आपण प्रतिवर्षी साजरा करतो, कारण येशू ख्रिस्ताने हा विजय मिळवून त्यांत आपल्याला भागीदार केले आहे. आपल्याला ठाऊक आहे कि, जगात अनेक थिर व्यक्तींनी आपले सर्व आयुष्य वेचले परंतु ते परत आले नाही. पण आपला प्रभू येशू त्याच्या अनुयायांना जीवन देण्यासाठी मरणातून जिवंत झाला. येशू ख्रिस्ताच्या मरणानंतर येशूचे शिष्य यहूद्यांच्या भीतीमुळे दार लावून घाबरून बसले होते. त्यांचे चेहरे दुःखी होते व हृदयात आशा नव्हती. त्यांच्या आयुष्यात सर्वत्र अंधार पसरला होता. येशूला पुरताना त्यांनी आपल्या आकांक्षाही पुरल्या होत्या. पण येशू मरणावर विजय मिळवतो व आपल्याला नवीन आशा व नवीन विश्वास देतो. घाबरलेल्या शिष्यांना येशू म्हणतो, “तुम्हास शांती असो.”  आपला प्रभू जिवंत आहे हे पाहून त्यांना भरपूर आनंद होतो.

          येशू ख्रिस्ताचा जन्म झाला त्यावेळी व पुनरुत्थान झाले त्यावेळी उच्चारलेले पहिले वाक्य भिऊ नकाहे होते. थोमाला जिवंत येशू ख्रिस्ताचे दर्शन झाले नव्हते म्हणून थोमाने ख्रिस्तावर विश्वास ठेवला नाही. त्याने ख्रिस्ताचे भिऊ नकाहे शब्द ऐकले नव्हते. म्हणून जेव्हा येशू त्याचा मध्ये येतो तेव्हा आपल्या हातातील व पायातील जखमा थोमाला दाखवितो व बोट घालून पाहण्यास सांगतो. थोमाचा विश्वास भक्कम होतो व तो लगेच म्हणतो, “माझ्या देवा! माझ्या प्रभो!

          प्रभू येशू त्यांना शांती देतो व त्याच्या शुभवार्तेचा प्रचार करण्यासाठी त्यांना पाठवितो. ख्रिस्ताचे कार्य आता हे त्याचे शिष्य चालू ठेवतात. म्हणून पहिल्या वाचनात आपण ऐकले कि, अनेकांनी ख्रिस्ताच्या संदेशाचा स्वीकार करून बाप्तिस्मा स्वीकारला.

          आज आपण दैवी दयेचा सण साजरा करीत आहोत. प्रभू त्याची दया आपल्याला देतो, म्हणून तो जिवंत झाला आहे. देवाने आपल्यावर केलेली दया त्याचे आपल्यावरील प्रेम दर्शविते. म्हणून देवाची दया व त्याचे प्रेम सदा आपल्या हृदयात, मनात व घरात असावे म्हणून आजच्या या पवित्र मिस्साबलीदानात प्रार्थना करूया.

 

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद : हे प्रभू आमची श्रध्दा दृढ कर.

   १.आपले परमगुरु पोप फ्रान्सिस, बिशप्स आणि व्रतस्थ लोकांनी त्यांच्यावर सोपवलेल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात व लोकांना दैवी दयेचा अनुभव घेण्यास मदत करावी म्हणून प्रार्थना करू या.

२. ख्रिस्ताच्या दैवी दयेचा अनुभव घेऊन आपण सर्वांनी प्रभूच्या सहवासात एका हृदयाचे व्हावे म्हणून आपण प्रार्थना करू या.

३. जे देवापासून दूर गेले आहेत त्यांची देवावरची श्रध्दा वाढावी  व त्यांचा ख्रिस्ताच्या पुनरुत्थानात नवीन जन्म व्हावा म्हणून आपण प्रार्थना करू या.

४. प्रभूची शांती सदैव आपल्या कुटुंबात नांदावी व आपण सर्वांनी ख्रिस्ताच्या शांतीचे साधन व्हावे म्हणून प्रार्थना करू या.

५. पुनरुत्थित ख्रिस्तावरील आपला विश्वास दृढ व्हावा व संत थोमाप्रमाणे आपणही आपल्या श्रध्देची कबुली करावी म्हणून प्रार्थना करू या.