Friday 30 June 2023

                       Reflections for the 13th Sunday in Ordinary Time                                             (02/07/2023) by Br. Benher Patil








सामान्य काळातील तेरावा रविवार

 

पहिले वाचन- २ राजे ४:८-११, १४-१६अ

दुसरे वाचन - रोमकरांस पत्र ६:३-४, ८-११

शुभवर्तमान - मत्तय - १०:३७-४२


अतिथी देवो भव!



प्रस्तावना:

आज आपण सामान्यकाळातील तेरावा रविवार साजरा करत आहोत. आजच्या वाचनाचा मुख्य विषय म्हणजे ख्रिस्ताठायी नवजीवन. जो मनुष्य ख्रिस्ताबरोबर उठवला गेला आहे त्याने आपल्या जीवनात देवाला आणि देवाप्रितीला प्राधान्य देण आवश्यक आहे. जो कोणी ख्रिस्ताच्या जीवनात सहभागी होतो त्याने आपलं जीवन आणि आचरण ख्रिस्ताप्रमाणे, शेजारप्रीती, आदरातिथ्य, औदार्यता, आणि सेवा अश्या गुणांनी सजवण्याचा आटोकाट प्रयत्न केला पाहिजे. ह्या मिस्साबलीत अश्याप्रकारच ख्रिस्तीय जीवन जगण्यास आपल्याला देवाची भरपूर कृपा आणि शक्ती मिळावी म्हणून प्रार्थना करूया.

 

मनन-चिंतन:  “अतिथी देवो भव!’, अर्थात अतिथी हा देवाप्रमाणे असतो. देव कोण कोणत्या स्वरुपात, केव्हा तुमच्या दारात येईल हे सांगता येत नाही. म्हणून जो आपल्या दारात येतो त्याचे यथाशक्ती आदरातिथ्य करणे हि हिब्रू लोकांची परंपरा होती. आजच्या पहिल्या वाचनात आपण पाहतो कि शुनेममध्ये राहणाऱ्या एका वृद्ध, निपुत्रिक जोडप्याने संदेष्टा एलीशाचे स्वागत केले. पत्नीने एलीशाचे पावित्र्य ओळखले. त्याच्यासाठी राहायची, खाण्या-पिण्याची व्यवस्था करून त्याचा मान-सन्मान केला आणि प्रेमळ आदरातिथ्य दाखवले. प्रत्युत्तरादाखल, एलीशाने तिला वचन दिले, “पुढच्या वर्षी या वेळी तू एका बाळाला जन्म देशील आणि हे वचन देवाने पूर्ण केले.

        ह्यावरून आपणास असा बोध मिळतो कि तुम्ही कीती देता याला महत्व नाही, परंतु किती भक्तीभावनेने, निस्वार्थीपणे देता, हे ईश्वर पाहत असतो. दुसऱ्याबद्दल तुमच्या मनात किती दया आणि प्रेम उत्पन्न होते, हे तो पाहतो. व त्याच प्रतिफळ अनंत हस्ते देत असतो.  त्या दाम्पत्याने केलेल्या आदरातिथ्यामुळे त्यांनी आपल्या पदरात पुण्य मिळविले आणि ते शुभाशीर्वादाचे धनी झाले.

आजच्या शुभवर्तमानात येशू आपल्या महान "मिशनरी प्रवचनाचा" समारोप करतो, ज्यामध्ये तो बारा प्रेषितांना, शिष्यासाठी आवश्यक असलेल्या वचनबद्धतेची किंमत आणि प्रतिफळ याविषयी सूचना देतो. शुभवर्तमानाच्या पहिल्या भागात ख्रिस्त ठामपणे सांगतो कि जो कोणी, येशूला आणि देवप्रितीला प्राधान्य देत नाही,व जी व्यक्ती आपला वधस्तंभ उचलून येशूच्या मागे जाण्यास नाकारते, तसेच जे कोणी ख्रिस्तासाठी आपला प्राण देण्यास मागे सरतात ते त्याचे खरे शिष्य बनण्यास योग्य नाहीत. ख्रिस्ती जीवनाचा मुख्य विरोधाभास हा आहे की जीवन शोधण्यासाठी आपण जीवन गमावले पाहिजे आणि प्रेम मिळविण्यासाठी आपण देवावरील प्रीतीने प्रेरित होऊन आपल्या बंधू-भगिनींवर प्रेम केलं पाहिजे.

        तर, शुभवर्तमानाच्या दुसऱ्या भागात येशू इतरांकडून आपल्या शिष्यांना मिळणाऱ्या वागणुकीबद्दल बोलतो. जे लोक ख्रिस्ताला त्याच्या शिष्यामध्ये तसेच दिन, दरिद्री, आणि गरजवंतामध्ये ओळखतात, पाहतात, त्याचा प्रेमभावनेने, औदार्याने पाहुणचार करतात ते प्रतीफलाला मुकणार नाही ह्याची हमी देताना खुद येशू म्हणतो कि “जी व्यक्ती तुम्हाला स्वीकारते ती मला स्वीकारते. जो कोणी संदेष्ट्यांचा स्वीकार त्याच्या संदेशाच्या सेवेमुळे करतात, त्याला संदेष्ट्यांचे प्रतिफळ मिळेल. तसेच, जो कोणी शिष्याच्या नावाने या लहानातील एकाला केवळ प्यालाभर थंड पाणी प्यायला देईल तो आपल्या प्रतीफाळला मुळीच मुकणार नाही.”

        ह्यावरून आपणास कळते कि येशू औदार्याच्या, अतिथीप्रेम, आणि आदरातिथ्याच्या या मानवी हावभावाला खूप महत्त्व देतो आणि एक महान वचन देतो आणि म्हणूनच बांधवाचे स्वागत करणे म्हणजे काय हे चांगले जाणून घेणे आवश्यक आहे. आपल्या भावाचे/बहिणीचे चांगले स्वागत करणे म्हणजे आपल्या स्वार्थातून बाहेर पडून त्याला/तिला आपला थोडासा वेळ, आपली एकता आणि आदर आणि त्याआधीही धीराने त्याचे ऐकण्यासाठी त्याच्यामध्ये सक्रिय रस घेणे होय. भुकेल्यांना अन्न देणे, आजारी लोकांना भेटणे, पीडितांचे सांत्वन करणे. ही दयाळूपणाची कार्ये आहेत, जी स्वीकृतीचे ठोस प्रकटीकरण बनवतात.

        ख्रिस्ताचे खरे शिष्य बनण्यासाठी आपण आदरातिथ्य आणि उदार असणे आवश्यक आहे: आदरातिथ्य म्हणजे इतरांमध्ये देवाची उपस्थिती मान्य करणे आणि त्यांच्यामध्ये त्याची सेवा करणे, विशेषत: ज्यांच्यामध्ये आपण त्याला शोधण्याची किमान अपेक्षा करतो. आम्ही, व्यक्ती म्हणून आणि एक समुदाय म्हणून, हर एक गरजवंतामध्ये “अतिथी देवो भव” ह्या भावनेने त्यांची सेवा, आदर, आणि सन्मान मोठ्या हृदयाने, आनंदाने आणि निस्वार्थीपणे करण्याचा निश्चय करूया आणि परमेश्वरी कृपा मागुया. आमेन.

 

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

 प्रभु, तुझ्या नावाच्या गौरवासाठी, आमचे ऐक.

 

1. ख्रिस्तसभेत कार्य करणारे आपले परमगुरु, आणि सर्व महागुरू, धर्मगुरू आणि धर्माभागीनि, ह्यांना ख्रिस्ताच्या प्रेमाच्या आणि सेवेच्या सुवार्तेचा प्रकाश ह्या जगात पसरविण्यास पवित्र आत्म्याची शक्ती आणि कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

2. आपल्या देशात जे बेघर, बेकार आहेत, तसेच जे रंजले गांजले बंधू भगिनी मुलभूत गोष्टीपासून वंचित आहेत अश्या सर्वाच्या कल्याणासाठी आणि प्रगतीसाठी राजकीय पुढाऱ्यांनी प्रामाणिकपणाने आणि शहाणपणाने आपले राजकीय कार्य करावे आणि, समाजात न्याय आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी सुबुद्धी मिळावी म्हणून प्रार्थना करूया.

३. आपल्या समाजातील आणि धर्माग्रमातील जे लोक वेगवेगळ्या शारीरिक, मानसिक आणि अध्यात्मिक आजारांनी त्रस्त आहेत आणि संकटांनी ग्रासलेले आहेत, त्यांना आरोग्यदायी ईश्वरी स्पर्श मिळावा आणि त्यांची संकटे दूर करण्यास सहाय्य मिळावे म्हणून प्रार्थना करूया.

४. ह्या जगात जे ख्रिस्ती बांधव छळ, द्वेष, अन्यायाला बळी पाडले आहेत, त्यांना न्याय मिळावा, ख्रिस्ती बंधू-भगिनींकडून त्यांना आर्थिक मदत मिळावी, मानसिक सांत्वन लाभावं आणि परमेश्वराने त्याचं सर्व वाईटापासून आणि शत्रूपासून सर्वक्षण करावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

५. येथे मिस्साबलीत सहभागी झालेल्या सर्वांनी आपल्या कुटुंबात आणि धर्मग्रामात जे वयस्कर, आजारी आणि गरजवंत आहेत त्यांची प्रेमाने सेवा करावी, त्यांना आदराने, आणि दयेने वागवण्यास ईश्वरी सहाय्य आणि कृपा मिळावी म्हणून प्रार्थना करूया.

Friday 23 June 2023

 Reflection for the Homily of 12th Sunday in Ordinary Time (25-6-2023 by Br. Roshan Nato.




सामान्य काळातील बारावा रविवार

दिनांक: २५/०६/२०२३

पहिले वाचन: यिर्मया २०:१०-१३

दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ५:१२-१५

शुभवर्तमान: मत्तय १०: २६-३३







प्रस्तावना: 

प्रिय भाविकानो आज देऊळ माता सामान्य काळातील बारावा रविवार साजरा करत आहे, आणि आजच्या दिवसाची उपासना आपल्याला निर्भयपणे येशू ख्रिस्ताची सुवार्ता सर्व जगभर पसरविण्यास आव्हानात्म्क आमंत्रण करत आहे. आज येशू खिस्त आपणा सर्वाना त्याच्या वचनावर विश्वास ठेवून तीच वचने आपल्या विरोधकाला, छळाला किवा मरणाला ण घाबरता सर्व लोकांजवळ पोहचवण्यास व येशू ख्रिस्ताच्या तारणदायी कार्याचे साक्षी होण्यास व परमेश्वराच्या कृपेने येशू ख्रिस्ताला सर्वांसमोर आपला प्रभू म्हणून स्वीकारण्यास आमंत्रण करीत आहे.

मनन चिंतन:

“परमेश्वर मेंढपाळ माझा,  मजला कसली भीती

दिवसरात्र माझ्या सांगाती, मजवर त्याची प्रीती". Ps २३

आज देऊळ माता सामान्य काळातील बारावा रविवार साजरा करत आहे आणि आजच्या दिवसाची उपासना आपणा प्रत्येकाला एकच संदेश देते कि “ भिऊ नका” कारण परमेश्वर आपल्या बरोबर आहे भीती! भीती म्हणजे काय? जर मानशास्त्राच्या व्याख्यानातून सागांयचे झाले तर भीती  हा एक फोबिया आहे. फोबिया म्हणजे एक मानसिक आजार ज्या मध्ये एखाद्या व्यक्तीला, एका वस्तू बद्दल, एका प्रसंगाबद्दल, एका व्यक्तीबद्दल किवा एखाद्या उंच ठिकाणाबद्दल, अचानक भीती वाटणे, आणि अशा ह्या भीती पोटी त्य्हा व्यक्तीचे प्राण सुद्धा धोक्यात असतात.

भीती हि आपणा प्रत्येकाच्या जीवनातील एक अविभाज्य भाग आहे. आपण प्रत्येक जण आपल्या जीवनात कोणत्या नी कोणत्या गोष्टी बद्दल भीती बाळगत असतो, उदा: अपयशाबद्दलची भीती, हिंसेबद्दलची भीती वाढत्या दहशतवादाबद्दलची भीती तसेच धार्मिक असहिष्णूतेबद्दलची भीती,

भीती बद्दल बोलत असताना, पोप फ्रान्सिस आपल्या अशाच एका मुलाखातीत सांगतात कि, भीती हि काही माझ्यापासून लांब नाही.  भीती ह्या भावनेच माझ्या जीवनात एक जवळच नात आहे. भीती हे आपल्या जीवनात एक पूर्वसंकेता प्रमाणे कार्य करते. कधी तर भीती हि समोर येणाऱ्या प्रत्येक आव्ह्नाबद्दल आपल्याला सावध करते. कधी तर भीती ही आपल्याला  समजूतदारपणाच्या क्षमतेची सोबती असू शकते. ज्यामुळे आपल्याला भविष्यात अपेक्षित असलेल्या गोष्टी पाहण्यास मदत होते. परंतु पोप फ्रान्सिस पुढे आपल्या मुलाखती सांगतात कि “भीती तर कधी एखाद्याला कोंडून घेवू शकते किंवा अपंग करू शकते. अमर्यादित भीतीची वृत्ती एखाद्या व्यक्तीला अशाप्रकारे गुलाम बनवून सोडते कि ती व्यक्ती आपल्या जींवनात भीती पोटी काहीही करू शकत नाही. म्हणून पोप फ्रान्सिस सांगतात कि, अमार्यादित भीती हि ख्रिस्ती वृत्ती नाही कारण ती एखाद्याला फक्त स्वतापासून किवा स्व:त बद्दल विचार करायला भाग पाडते.एखाद्याच्या जीवनात काहीतरी चागलं कण्याची क्षमता त्या व्यक्तीकडून  हिरावून घेते.

आजची उपासना आपणा प्रत्येकाला अमर्यादित भीती नाही तर “प्रार्थनामय भीती” अंगीकारण्यास आव्हान करीत आहे. कारण जेव्हा आपण प्रार्थनांमय भीती अगीकारतो तेव्हा आपण कशाचे गुलाम नाही. तर परमेश्वराच्या कृपेने एक स्वातंत्र्यच जीवन जगतो, नितीसुत्रे ९:१० मध्ये सांगितल्या प्रमाणे “परमेश्वराचे भय  हा ज्ञानाचा आरंभ होय.” आणि नितीसुत्रे १९:२३ मध्ये आपणास सांगण्यात येते की, “परमेश्वराचे भय जीवन प्राप्तीचा मार्ग होय,  आणि जो कोणी ते धरितो तो सुखाने नांदतो , आणि  त्याचे कधी वाईट होत नाही”. म्हणूनच आज खुद्द येशू ख्रिस्त आपल्या प्रत्येकाला आजच्या शुभवर्तमानातून उपदेशून सागतो कि “जे शरीराच घात करतात त्यांना भिऊ नका.” तर आत्मा आणि शरीर ह्या दोघाचा नरकात नाश करण्यास जो समर्थ आहे त्याला भ्या.

आजच्या पहिल्या वाचनात यिर्मया संदेष्टा आपल्या जीवनात देवाची सुवार्ता पसरवित असताना आलेल्या कठीण व खडतर परिस्थिती बद्दल व आपल्या विरोधकाबद्दल तक्रार करीत असताना आपली फिर्याद सादर करीत म्हणतो कि हे सेनादिश परमेश्वरा तू माझा छळ करणार्याचा सूड घेशील तो मला पाहू दे. अशा ह्या फिर्यादीवरून यिर्मया संदेष्ट्याचा जीवनात देवावरील असलेला विश्वास आणि देवाची सुवार्ता निर्भितपणे सर्व जगभर पसरविण्याची तयारी दिसून येते.

     आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल आपल्याला आदामाच्या आज्ञा उलंघणामुळे जगात पापाचा संचार होवून मनुष्याचा मरणा बद्दल  सागतो कि, आदामापासून मोशेपर्यत मरणाने राज्य केले. परंतु एका मनुष्याचा म्हणजेच येशू ख्रिस्ताच्या आगमनाने व त्याच्या बलिदानाने सर्वाना अनंत जीवनाचे व कृपेचे दान भरभरून मिळाले.

     तर आजच्या शुभवर्तमानात येशू ख्रिस्त आपल्या बारा शिष्यांना प्रोस्तान देत सांगतो कि, भिवू नका माझी वचने जी मी तुम्हाला सागितली आहेत ती सर्व जगापुढे सादर करत असता, तुम्हाला पुष्कळ अशा विरोधाना, छळाला सामोरे जावे लागेल. परंतु प्रभू येशू ख्रिस्त सांगतो कि ह्यास सर्वाना तुम्ही भिवू नका. तुम्ही प्रत्येक जण माझ्या करिता मौल्यवान आहात, परंतु जो कोणी मला माणसासमोर पत्करील मीही त्याला माझ्या स्वर्गीय पित्यासमोर पत्करीन परन्तु जो कोणी माझ्यासमोर मला नाकारील मीही त्याला आपल्या स्वर्गीय पित्यासमोर नाकारीन.

     आज येशुख्रिस्त आपणा प्रत्येकाला आपल्या दैनंदिन जीवनात त्याची सुवार्ता निडरपणे सर्व जगभर, पसरविण्यात आव्हान करीत आहे. नुकताच आम्ही अनुभवलेल्या मणिपूर मधील धार्मिक असहिष्णूतेबद्दल साक्षी आहोत. ज्या प्रकारे आपले ख्रिस्ती लोकं आज ह्या छळाला आणि मारहाणीला जरी सामोरे गेले असले तरी त्याच्यातील जी श्रद्धा आहे, देवावरचा त्याचा जो विश्वास आहे तो आज वाढलेला आहे. आज खऱ्या अर्थाने त्याच्या विश्वासाला कलाटणी आलेली आहे. कारण ज्या अर्थी ते ह्या छळ प्रकरणाला किवा विरीधाला न घाबरता खंबीर पने आपण ख्रिस्ती व येशू ख्रिस्ताचे अनुयायी असल्या साक्ष दिली त्या अर्थी त्याचा देवावरचा विश्वास सुद्धा भक्कम झाला आहे.

     आज खऱ्या अर्थाने येशू खिस्ताच्या वाचनाची पूर्णता मणिपूर मधील ह्या ख्रिस्ती पिडीतामध्ये झाली आहे. कारण आज आपल्या ह्या बांधवानी आपल्या जीवाची परवा न कर्ता आपला विश्वास जपण्यास जो त्याग केलेला आहे त्या त्यागाची कीर्ती आज सर्व जगभर पसरत आहे. म्हणून येशू ख्रीसाचे वचन आपणास सागते कि “ जो कोणी माझ्यासमोर मला पत्करील ,मीही त्याला आपल्या स्वर्गीय पित्यासमोर पत्करीन.

ह्याच वचनावर विश्वास ठेवून आपण सुद्धा आपल्या मणिपुरमधील बांधवाप्रमाणे धार्मिक असहिष्णूतेला, छळाला, विरोधांना घाबरता येशू ख्रिस्ताची सुवार्ता सर्व जगभर पसरविण्यास तत्पर राहावे म्हणून आपण आपल्या सेनाधिश परमेश्वराकडे प्रार्थना करूया.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: हे प्रभू, आम्हला धैर्य दे.

१. पवित्र देऊळमातेचे सेवक पोप फ्रान्सिस, सर्व महागुरू, धर्मगुरू, धर्मबंधू, धर्म-भगिनी, धर्म-शिक्षक व सर्व ख्रिस्ती प्रापंचिक ह्यांच्याद्वारे तुझी व तुझ्या प्रजेची सेवा करण्यास आणि प्रत्येक कठीण परीस्थितीत तू आम्हा बरोबर आहेस ही जाणीव करून देण्यास लागणारी कृपा त्यांस मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

२. आपल्या देशाचा कारभार सांभाळण्यासाठी जे राज्यकर्ते नेमले गेले आहेत, विशेषकरून आपले राष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रीमंडळ व इतर अधिकारी यांनी भारताच्या संविधानातील नियम पाळून देशाचा कारभार चालवावा व निःस्वार्थीपणे देशाची सेवा करावी तसेच नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण नव्हे, तर आशेचे आणि आपलेपणाची भावना उत्पन्न करावयास ते सतत कार्यरत राहण्यास त्यांना आशीर्वादाने भर म्हणून आपण प्रार्थना करूया.

३. पवित्र शास्त्राला अनुसरून देऊळमातेच्या शिकवणीप्रमाणे आम्ही खरे ख्रिस्ती जीवन जगावे. आई-वडिलांचा सन्मान, आजारी भाऊ-बहिणींची सेवा, शेजारप्रीती, रंजल्या गांजल्यांना मदत अशी सेवादायी कृत्ये आपल्या हातून घडावीत म्हणून आपण प्रार्थना करूया.

४. ह्या वर्षी चांगला पाऊस व्हावा व परमेश्वराने आपल्याला अतिवर्षण व दुष्काळापासून मुक्त करावे म्हणून आपण प्रार्थना करु या.       

६. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक व सामाजिक गरजा प्रभूसमोर ठेवूया.





Friday 16 June 2023

Reflection for the 11th Sunday in Ordinary Time (18-06-2023) By Br. Gilbert Fernandes



  सामान्य काळातील अकरावा रविवार



दिनांक: १८/०६/२०२३

पहिले वाचन: निर्गम १९:२-६

दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ५:६-११

शुभवर्तमान: मत्तय ९:३६-१०:८

 

प्रस्तावना:

      आज आपण सामान्य काळातील अकरावा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना आपल्याला परमेश्वर आपल्या जीवनात कशाप्रकारे कार्य करतो हे अनुभवण्यासाठी पाचारण करीत आहे. निर्गम पुस्तकातून घेतलेल्या पहिल्या वाचनात, परमेश्वर आपल्याला त्याच्या आज्ञांचे आणि कराराचे पालन करण्यासाठी आमंत्रित करीत आहे. जर आपण त्याच्या आज्ञांचे आणि कराराचे पालन केले तर आपल्याला परमेश्वराचा भरघोस असा आशीर्वाद प्राप्त होईल, याविषयी परमेश्वर आपल्याला वचन देतो. आजच्या दुसऱ्या वाचनात आपण ऐकतो कि, येशू ख्रिस्ताने त्याच्या मृत्यू आणि पुनरुत्थानाद्वारे मानवतेचा परमेश्वराशी समेट केला आणि आणि आपल्याला अनंतकाळाचे जीवन प्राप्त करून दिले. तसेच येशू ख्रिस्तावरील विश्वासाने आपण पाप आणि मृत्युच्या छायेपासून वाचू शकतो. तर आजच्या शुभवर्तमानात येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांना इतरांची सेवा करण्यासाठी आणि स्वर्गीय राज्याची सुवार्ता घोषविण्यासाठी पाठवतो. येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांना सांगतो कि तुम्हाला फुकट मिळाले आहे ते तुम्ही फुकट द्या आणि प्रेम व उदारतेने इतरांची सेवा करण्यास त्यांना प्रोत्साहित करतो. आज येशू ख्रिस्त आपल्यालासुद्धा प्रेमाने आणि उदारतेने इतरांची सेवा करण्यास आमंत्रित करीत आहे तर त्यासाठी लागणारी कृपा आपल्याला मिळावी म्हणून या मिस्साबलीदानात प्रार्थना करू या.

मनन-चिंतन:

     ख्रिस्ताठायी माझ्या प्रिय बंधुंनो आणि भगिनींनो, आज आपण सामान्य काळातील अकरावा रविवार साजरा करीत असताना, ख्रिस्तसभा आपल्याला परमेश्वराच्या हाकेची किंवा पाचारणाची आठवण करून देते. हे पाचारण आपण दोन प्रकारे समजू शकतो. सर्वप्रथम, परमेश्वराने इस्त्रायल लोकांशी केलेल्या कराराद्वारे. परमेश्वराने आपल्याला त्याचे पवित्र असे राष्ट्र व त्याची मुले होण्यासाठी निवडले आणि बोलावले आहे. दुसरं म्हणजे येशू ख्रिस्ताद्वारे केलेला नवीन करार. परमेश्वराने आपल्याला त्याचे शिष्य होण्यासाठी बोलाविले आहे. परमेश्वराने आपल्याला त्याची प्रजा बनविली आहे. परमेश्वराने आम्हा प्रत्येकाला, त्याच्यासाठी पवित्र केलेले लोकं होण्यासाठी नावाने बोलाविले आहे.

     आजच्या पहिल्या वाचनात, आपण आपल्या पहिल्या पाचारणाविषयी ऐकतो. हे वाचन आपल्याला जुन्या करारातील परमेश्वराने त्याच्या लोकांसोबत केलेल्या सर्वात प्रसिध्द सिनाई कराराबद्दल सांगते. ह्या कराराद्वारे परमेश्वराने इस्त्रायलला आपली प्रजा बनविली व सदैव त्यांच्याबरोबर राहिला.

     जर लोकं परमेश्वराच्या वचनाप्रमाणे वागतील तर ते कायमचे पवित्र व परमेश्वराच्या मालकीचे लोकं होतील. जर ते त्यांच्या मानवी स्वार्थामुळे परमेश्वरापासून दूर जातील तरीही परमेश्वर त्यांना सोडणार नाही तर त्यांचा शोध घेत राहील. हि परमेश्वराची वागण्याची पद्धत आहे. आपण परमेश्वरापासून कितीही दूर गेलो तरीही परमेश्वर आपल्याला सोडत नाही. म्हणून असं म्हणतात, चूक करणे हे मानवी आहे आणि क्षमा करणे हे दैवी आहे.

     मानव या नात्याने, आपण परमेश्वरासोबत केलेल्या आपल्या करारात नेहमी अपयशी ठरतो. आपणही त्या जुन्या करारातील इस्त्रायली लोकांप्रमाणे ‘परमेश्वराने सांगितलेले सर्व आम्ही करू.’ म्हणायला घाई करतो. आपण आपल्या करारावर विश्वासू राहू असे म्हणतो परंतु बहुतेक वेळा आपण अविश्वासू होतो किंवा परमेश्वरापासून दूर जातो. असे असूनही परमेश्वर आपल्याला कधीही सोडत नाही. तो त्याच्या कराराशी सतत विश्वासू राहतो.

     आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल, आपल्याला आपल्या तारणासाठी आपला एकलुता एक पुत्र, प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे परमेश्वर आपल्याशी कसा विश्वासू राहिला याची आठवण करून देतो. आपण पापी असूनही येशू ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला. याद्वारे परमेश्वराने आपल्यावर केलेले प्रेम सिद्ध होते. ख्रिस्ताच्या बलीदानाद्वारे आपण सतत परमेश्वराशी समेट करतो. म्हणून, परमेश्वर आपल्याला कधीही सोडत नाही कारण त्याने आपल्याला त्याची मुले होण्यासाठी निवडिले आणि बोलाविले आहे.

     आपल्या पाचारणाचा दुसरा पैलू म्हणजे जीवनाचा अर्थ त्वरित गमावून बसलेल्या जगात येशू ख्रिस्ताचे शिष्य बनणे. ज्या ठिकाणी अनेकांना बेबंद, असहाय्य आणि निराश वाटते त्या ठिकाणी येशूचे शिष्य बनणे. हे पाचारण व मिशनकार्य, निराश आणि बेबंद जगासाठी दया आणि करुणेतून जन्माला आले आहे. म्हणून, आजचे शुभवर्तमान आपल्याला सांगते कि “लोकसमुदायांना पाहून येशूला त्यांचा कळवळा आला; कारण ते मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे, कष्टी आणि पांगलेले होते.” ज्याप्रमाणे येशूने आपल्या बारा प्रेषितांना बोलाविले त्याप्रमाणे परमेश्वराने आम्हा प्रत्येकाला आपल्या बाप्तीस्म्याद्वारे, आपल्या नवीन नावाने निवडिले आणि बोलाविले आहे. आपल्या उदासीन जगाला उध्वस्त होण्यापासून वाचविण्यासाठी तो आपल्याला विशेष आवाहन आणि आमंत्रण देत आहे. आपल्याला एकमेकांचे विश्वासू मेंढपाळ होण्याचे आवाहन करीत आहे. जसा परमेश्वर आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त आपल्यावर दया व करुणा दाखवत आहे तसेच आपणही एकमेकांना दया व क्षमा दाखविली पाहिजे.

     आपल्या पाचारणाला अजून एक अनोखा उद्देश आणि संदेश आहे. आज येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना विशिष्ट सूचना देऊन पाठविले, “यहूदीतर लोकांमध्ये जाऊ नका व शोमरोनी लोकांच्या कोणत्याही नगरात प्रवेश करू नका. तर त्याऐवजी इस्राएलच्या हरवलेल्या मेंढरांकडे जा. तुम्ही जाल तेव्हा हा संदेश जाहीर करा. स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. रोग्यांना बरे करा, मृतांना उठवा. कुष्ठरोग्यांना शुद्ध करा. भुते काढा, तुम्हांला फुकट मिळाले आहे म्हणून फुकट द्या.” याद्वारे ख्रिस्त भेदभाव करत आहे का? नाही. येशू ख्रिस्त जगाला वाचविण्यासाठी व त्यावर प्रेम करण्यासाठी आला होता. आपले पाचारण आणि मिशनकार्य कुठूनतरी सुरु झाले पाहिजे. या मिशनकार्याची सुरुवात आपण स्वतःपासून सुरु केली पाहिजे. त्याची सुरुवात आपण आपल्या घरांमध्ये, कुटुंबांमध्ये आणि समुदायांमध्ये झाली पाहिजे. आणि त्यानंतर ते इतरांपर्यंत पाहोचविले पाहिजे. परमेश्वराचे शिष्य बनण्यापूर्वी आपण प्रथम परमेश्वराची लेकरे बनणे खूप महत्वाचे आहे. अविलाच्या संत तेरेसा म्हणतात, “येशू ख्रिस्ताला शरीर नाही, तुम्ही त्याचे शरीर व्हा; येशू ख्रिस्ताला हात नाहीत, तुम्ही त्याचे हात व्हा; येशू ख्रिस्ताला पाय नाहीत, तुम्ही त्याचे पाय व्हा; येशू ख्रिस्ताला मस्तक नाही, तुम्ही त्याचे मस्तक व्हा.” येशू ख्रिस्ताचे कार्य पुढे नेण्यासाठी परमेश्वराने आपल्या प्रत्येकाची निर्मिती केली आहे.    

प्रतिसाद: हे प्रभो आमची प्रार्थना ऐकून घे.

१) हे प्रभो, देऊळमातेच्या सर्व सेवकांनी नम्र बनून प्रभूची सुवार्ता पुढे ठेवत असलेल्या आव्हानांचा स्वीकार करावा आणि प्रभूच्या सुवार्तेचे निष्ठावंत सेवक बनावे, म्हणून आम्ही आज प्रार्थना करतो.

२) हे प्रभो, दुःख, अन्याय, हिंसा आणि भ्रष्टाचाराने भरलेलं आमचं जग, या सर्व गुलामगिरीतून मुक्त व्हावं आणि आमच्या जगात तुझ्याकडून येणारी शांती प्रस्थापित व्हावी म्हणून आम्ही आज प्रार्थना करतो.

३) हे प्रभो, शारीरिक आणि मानसिक आजाराने ग्रासलेल्या आमच्या सर्व बंधू-भगिनींना तुझ्या कृपेचा गुणकारी स्पर्श व्हावा आणि त्यांना नवीन आरोग्य आणि जीवन लाभावे, म्हणून आम्ही प्रार्थना करतो.

४) हे प्रभो तुझ्यावरील विश्वासात जीवन जगून, हे जग सोडून गेलेल्या आमच्या बंधू-भगिनींना स्वर्गाचे सुख लाभावे म्हणून आम्ही आज प्रार्थना करतो.

) थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक गरजा प्रभूचरणी मांडूया.

Friday 9 June 2023

 Reflections for the Homily of 

THE MOST HOLY BODY AND BLOOD OF CHRIST (11-06-2023) by Br. Justin Dhavade










दिनांक: ११-०६-२०२३

पहिले वाचन: अनुवाद ८:२-३१४-१६

दुसरे वाचन: करिंथकरास पहिले पत्र १०:१६-१७

शुभवर्तमान: योहान ६:५१-५८

.


 येशूच्या अतिपवित्र शरीर व रक्ताचा सोहळा


   प्रस्तावना:

सामान्य काळातील १० व्या आठवड्यात आज आपण पदार्पण करत आहोत, आज संपूर्ण ख्रिस्तसभा ख्रिस्ताच्या अतिपवित्र शरीराचा व रक्ताचा सोहळा साजरा करीत आहे.  मनुष्य स्वतःवर अवलंबून राहिला तर तो संपुष्टात येईल, त्याचा नाश होईल परंतु जर त्याची ओढ परमेश्वरावर असेल तर जगेल असे  आपणास परमेश्वर खुद्द सांगत आहे.  तो पुढे म्हणतोय, ‘जो माझा देह खातो आणि माझे रक्त पितो, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल.’

           प्रत्येक दिवशी ख्रिस्तशरीर संस्कारद्वारे आपण ख्रिस्ता बरोबर एकरूप होतो व ख्रिस्त आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनतो म्हणून या मिस्सा बलिदानात भाग घेत असताना प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र शरीराने व रक्ताने आपले अंतःकरण व जीवन निर्मळ बनावे आणि आपण देखील त्या ख्रिस्तसारखे व्हावे म्हणून देवाकडे प्रार्थना करूया.

मनन चिंतन

प्रिय मित्रांनो, मला मदर तेरेसा आठवतात ज्यांनी एकदा त्याच्या भाषणात त्यांनी म्हटले होते "जेव्हा तुम्ही क्रुसाकडे पाहता तेव्हा तुम्हाला समजते की त्याचे तुमच्यावर किती प्रेम आहे आणि जेव्हा तुम्ही पवित्र भाकर पाहता तेव्हा तुम्हाला समजते की येशू आता तुमच्यावर किती प्रेम करतो".

पवित्र मिस्साबलीदानात ख्रिती जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. प्रत्येक ख्रिस्तीव्यक्तीला ख्रिस्तासारखे होण्यासाठी बोलावले आहे. हे तेव्हाच घडेल जेव्हा आपण पवित्र जनसमुदायाला उपस्थित राहू आणि त्याचे शरीर आणि रक्त स्वीकार करू. दुसऱ्या व्हॅटिकन परिषदे नुसार "पवित्र मिस्साबली” हा आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू आणि शिखर आहे". भाकर आणि द्राक्षरस या पदार्थात उपस्थित असलेला येशू आहे.

प्रत्येक गोष्ट पवित्र मिस्साबलीदानात सुरू होते आणि संपते. आज आपल्याला असे अनेक मिस्साबलीदानाचे चमत्कार आढळतात जे आपल्याला प्रेरणा देतात. असाच एक चमत्कार म्हणजे लाचिओ ही कथा काही नसून इटलीमध्ये घडलेले वास्तव्य आहे. एक धर्मगुरू जो भाकर आणि रक्तामध्ये ख्रिस्ताच्या उपस्थितीवर विश्वास ठेवत नव्हता. ख्रिस्ताच्या देह आणि रक्तावर त्याचा विश्वास साकारला. येथे या परिस्थितीत आपल्याला असे देखील दिसून येते की एखाद्याच्या विश्वासाची चाचणी देवावरील विश्वासात बदलली जाते.

प्रत्येक बाप्तिस्मा घेतलेल्या ख्रिस्तीव्यक्तीसाठी आजचा दिवस शुभ आहे. आज चर्च कॉर्पस ख्रिस्ती (ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त) ह्याचा उत्सव साजरा करते. आपल्यापैकी बरेच जण गोंधळून गेलेले असावेत जिथून मिस्सा बलिदान किंवा ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त सुरू होते. अर्थात, हे सर्व आज्ञा गुरुवारपासून सुरू होते. येशू हाच आहे ज्याने शेवटच्या जेवणाच्या वेळी पवित्र मिस्साबलीदानाची स्थापना केली, आपल्या प्रेषितांना त्याचे शरीर आणि रक्त, अन्न आणि पेय म्हणून दिले. ख्रिस्ताने त्यांना आपल्या प्रेमाचे आणि मृत्यूचे स्मारक म्हणून अर्पण करण्याची आणि शेवटपर्यंत भोजन म्हणून खाण्याची आज्ञा दिली. त्याच वेळी, चर्च दुहेरी उद्देश देते, प्रथम आपल्या प्रभूची स्तुती करण्यासाठी पवित्र मिस्साबलीदानात आपले आध्यात्मिक अन्न आणि पेय म्हणून दिले आहे आणि दुसरे म्हणजे आपल्या ख्रिस्ती जीवनासाठी पवित्र मिस्साबलीदानाची पूर्ण महत्व समजण्यास मदत करते. जेव्हा आपण ही मेजवानी बघतो तेव्हा आपण केवळ पवित्र सहभोजनाच्या केंद्र्बिन्धुसारखे साजरे करत नाही तर स्वतःला ख्रिस्ताच्या शरीराचे सदस्य बनवतो.

जर आपण सर्व चार शुभवर्तमानांचे विश्लेषण केले. ते सर्व ख्रिस्ताच्या शरीराशी आणि रक्ताशी जोडलेले आहेत. विशेषतः, योहानाच्या शुभवर्तमानाचा अध्याय सहा ख्रिस्ताच्या शरीराचा आणि रक्ताचा अधिक तपशीलवार अभ्यास करतो. या अध्यायात, येशू स्वत: ला जिवंत भाकर म्हणून संबोधतो. तसेच आजचे वाचन कॉर्पस ख्रिस्तीचे महत्व समजावून देते.

येथे मी तीन महत्त्वाच्या मुद्यांवर स्पर्श करू इच्छितो. ते खालीलप्रमाणे आहेत.

1) इस्राएल लोकांचा संघर्ष आणि भूक

गणना पुस्तकातून पहिल्या वाचनात. आपण पाहतो की देव इस्राएल लोकांवर त्याचा चमत्कार करत होता. हे दोन प्रकारे आयोजित केले गेले होते म्हणजे आज्ञांचे पालन करून आणि त्यांना मान्ना खाऊ घालणे. हे दुसरे संकेत आपल्याला दाखवतात की देवाला त्याच्या लोकांनी नम्रता दाखवावी अशी इच्छा होती. त्याच वेळी, आपण हे देखील ऐकतो की माणूस केवळ भाकरीने जगत नाही तर परमेश्वराच्या मुखातून आलेल्या प्रत्येक शब्दाने माणूस जगतो. यामुळे मोशेने आपल्या लोकांना गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळवून दिले.

२) ख्रिस्ताच्या शरीरावर आणि रक्तावरील एकता

पहिल्या करिंथकरांना पौलाच्या पत्रात. ख्रिस्ताच्या शरीरात आणि रक्तामध्ये आपल्याला महत्त्व पटवून देते. हि भाकर आणि प्याला हा सहभाग नसून येशू आणि आपल्यामध्ये निर्माण झालेला एक संघ आहे. ख्रिस्त हा मुख्य आहे आणि आपण त्याचे सदस्य आहोत. तर इथे, एका भाकरीचा पैलू आपल्यापैकी अनेकांना एक शरीर मानतो. त्याऐवजी, आपण सर्व एकाच भाकरीमध्ये भाग घेतो.

3) येशू जिवंत भाकरीचे प्रतिनिधित्व करतो

योहान ६: ५१-५८ हि आजची सुवार्ता ख्रिस्ताच्या शरीराचे आणि रक्ताचे महत्त्व अधोरेखित करते. येथे आपल्याला आढळते की भाकर हे त्याचे मांस म्हणून प्रस्तुत केले जाते. तसेच, द्राक्षरस हे त्याचे रक्त म्हणून दर्शविले जाते. येथे येशू सांगतो, जे माझे मांस खातात आणि जे माझे रक्त पितात त्यांना अनंतकाळचे जीवन मिळेल. ख्रिस्ताचे हे मांस खरे अन्न आहे आणि रक्त हे खरे पेय आहे. शिवाय, हे फक्त एखाद्याच्या विश्वासावर आहे. जो विश्वास ठेवतो तो खऱ्या अर्थाने ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त समजेल. जो विश्वास ठेवत नाही त्याला ख्रिस्तामध्ये जीवन नाही.

म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, आजच्या काळातील एक तरुण धन्यवादीत म्हणजे कार्लो अक्युटिस म्हणतात, "आपल्याला जितके जास्त पवित्र मिस्साबलीदान मिळेल तितके आपण येशूसारखे बनू जेणेकरून पृथ्वीवर आपल्याला स्वर्गाची पूर्वकल्पना मिळेल." आपण ख्रिस्तावर विश्वास ठेवूया, की आपली पवित्र मिस्सा आध्यात्मिक पोषणाचा स्रोत आणि शक्ती बनतो.

 

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: हे प्रभो तुझ्या शरीर व रक्ताद्वारे आमचा विश्वास दृढ कर.

१. ख्रिस्तसभेची धुरा वाहणारे पोप फ्रान्सीस, कार्डीनल्स, बिशप्स, फादर्स, सिस्टर्स, ब्रदर्स व इतर प्रापंचिक या सर्वांवर देवाचा विशेष आशीर्वाद यावा व त्यांना त्यांच्या पवित्र कार्यात प्रभूचे मार्गदर्शन व कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

२. आपल्या देशातील सर्व नेत्यांवर व अधिकाऱ्यांवर परमेश्वराचा आशिर्वाद असावा, त्यांना सत्याने आणि न्यायाने राज्यकारभार करण्यास परमेश्वराने मदत करावी, तसेच सर्व वाईट वृत्तींपासून त्यांना दूर ठेवून चांगल्या मार्गावर चालण्यास सहकार्य लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

३. आज आपण प्रभू येशु ख्रिस्ताच्या अतिपवित्र शरीर व रक्ताचा सोहळा साजरा करीत असताना आपण आपल्या शरीररूपी मंदिरात देवाला प्रथम स्थान द्यावे व आपले जीवन त्याच्याठायी समर्पित करावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.

४. आपल्या धर्मग्रामात जे दुखित, पिडीत आहेत, तसेच जे असाध्य आजाराने पछाडलेले आहेत त्यांना परमेश्वरी कृपेचा अनुभव यावा व नवजीवनाची वात त्यांना दिसावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

५. आपण आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक हेतूंसाठी थोडावेळ शांत राहून प्रार्थना