Wednesday 24 January 2024

 


Reflection for the 4th SUNDAY IN ORDINARY TIME (28/01/2024) By Fr. Benjamin Alphonso.




दिनांक: २८/०१/२०२४

पहिले वाचन: अनुवाद १८:१५-२०

दुसरे वाचन: १ करिंथकरांस पत्र ७:३२-३५

शुभवर्तमान: मार्क १:२१-२२


सामान्य काळातील चौथा रविवार



प्रस्तावना:

आज पवित्र देउळमाता सामान्य काळातील चौथा रविवार साजरा करीत आहे. आजच्या चिंतनाचा मुख्य विषय म्हणजे, येशु ख्रिस्ताचा त्याच्या शब्दांवर आणि कृत्यांवर असलेला अधिकार होय. आजच्या पहिल्या वाचनात अनुवादक मोशेद्वारे देवाचा संदेश लोकांना सांगत आहे. देव लोकांमधून संदेष्ट्याची निवड करणार याची जाणीव आपल्याला या वाचनातून दिसून येते. दुसऱ्या वाचनात संत पौल, विवाह म्हणजे काय, त्यांनी त्यांचे वैवाहिक जीवन कसे जगावे ह्याबद्दल बोध करत आहे. तसेच विवाहित स्त्री आणि पुरुषाने जीवनात प्रभू येशूला अधिकाधिक महत्त्व देऊन, ख्रिस्ताची सेवा करावी म्हणून सांगत आहे. शुभवर्तमानात येशू ख्रिस्त सभास्थानात अधिकाराने शिकवण देत आहे असे आपण ऐकतो: ह्याच अधिकाराने येशू ख्रिस्त अशुद्ध आत्मा लागलेल्या मनुष्याला मुक्त करतो, त्यामुळे सर्वलोक याविषयी थक्क होता.

आपण सर्वजण बाप्तीस्म्याद्वारे देवाचें निवडलेले लोक आहोत. येशू आपल्याला त्याची सुवार्ता प्रसारित करण्यासाठी आमंत्रित करत आहे. आपण ते कार्य प्रामाणिकपणाने व विश्वासाने करतो का? हा प्रश्न या मिसाबलिदानात स्वतःला विचारूया.


मनन चिंतन:

आपल्या दररोजच्या जीवनात  आपण अनेक पुढारी/नेते पाहत असतो. परंतु काही ठराविक नेते आपल्या जीवनावर छाप पाडत असतात, कारण त्यांची शिकवण्याची पद्धत वेगळ्या प्रकारची असते. ते अधिकारवाणीने व अनुभवाने त्यांची मते व शिकवण आपल्या समोर मांडत असतात. आपण मराठीत म्हणतो बोले तैसा चाले त्याची वंदावे पाऊले. होय, आपल्याकडे फार थोड्या नेत्यानी अशी उदाहरणे आपणासमोर ठेवली आहेत, व त्यांनी आपल्या शिकवणीद्वारे समाजात मोठा बदल घडवून आणला आहे. त्यापैकीं काही प्रसिद्ध व पवित्र लोक म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त, मदर तेरेसा, महात्मा गांधी व नेल्सन मंडेला हे होय. आपण नेल्सन मंडेला ह्यांचे जीवन पडताळून पाहूया.

नेल्सन मंडेला यांचा जन्म दक्षिण आफ्रिकेतील मेव्झो या भागात झाला. त्याचे वडील ठेंबू जमातीचे प्रमुख होते. ते नेल्सन मंडेला ह्यांना धाडसी कथा सांगायचे, आपल्या लोकांच्या हक्कासाठी, स्वातंत्र्यासाठी लढण्याची प्रवृत्ती त्यांना ह्या संस्कृतीच्या प्रेमातून झाली. गोऱ्या लोकांनी काळ्या लोकांवर कुठे-कुठे अन्याय केले आहेत ह्याची जाणीव त्यांना होती. आपल्या जाती जमातीच्या नेतृत्वाची कल्पना त्याच्या संस्कृतीनिष्ठेतून त्यांना प्राप्त झाली. त्यांचे शिक्षण कॅथोलिक शाळेत झाले. तेथे त्याचे नाव नेल्सन मंडेला हें देण्यात आले. ते जेव्हा जोहान्सबर्गला आले व त्यांनी काळ्या लोकांवर होत असलेला अन्याय बघितला व त्यांच्यातील क्रांतिकारक जागा झाला. त्यांनी आपल्या लोकांच्या हक्कासाठी स्वतः कायद्याचा अभ्यास केला होता. त्यांनी इतर फ्रिकन देशांचा प्रवास केला. १९५२ साली त्यांनी आपल्या लोकांचे नेतृत्व करायला सुरुवात केली.

मंडेलाची वाणी अधिकारवाणी होती. त्याने आपल्या काळ्या लोकांच्या स्वातंत्र्यासाठी लढा स्वीकारला व ते गोऱ्या लोकांविरुद्ध उभे राहिले. त्यांना जवळ जवळ २७ वर्षाचा कारावास झाला, परंतु ते डगमगले नाही. १९९७ साली काळ्या लोकांना स्वातंत्र्य मिळाले, त्यांना त्यांचे हक्क अधिकार नेल्सन मंडेला ह्यांनी मिळवून दिले. नेल्सन मंडेला फ्रीकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. नेल्सन मंडेला याच्या  यशाविषयी ते म्हणतात दृष्टीकोण सकारात्मक असला म्हणजे यश धावून येते, मी आशावादी असून यशाचे स्वप्न पाहून अखंड कष्ट करतो.

येशू ख्रिस्त अधिकारवाणीने शिकवतो आणि भूत लागलेल्या माणसाला मोकळे करतो. येशूच्या शब्दामध्ये शक्ती आहे. ह्या शक्तीचा अनुभव लोकांच्या दृष्टीने नवीनच आहे. येशू आपल्याला गुलामगिरीतून मुक्त करतो. आपल्या चुकीच्या कल्पना, सवयी किंवा अंधप्रथा यांच्यातून आपल्याला तो सोडवतो. तो आपले विचार सुधारतो.

आपण देव राज्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्याला समाजात असलेला भेदभाव, अनिष्ट रूढी व पद्धती दूर केल्या पाहिजेत. ह्यासाठी प्रभू येशू प्रमाणे अधिकारवाणीने बोलण्याचे व वागण्याचे गरजेचे आहे. आपल्याला न्यायची व देवाच्या प्रेमाची प्रस्थापना करण्याची काळाची गरज आहे. आपण संपूर्ण जीवन युद्ध करायला हवं. माणसे या युगात विशेषकरून मोबाइल, अनिष्ट पद्धती गुरफटलेले आहेत, त्यामुळे कुटुंबसंस्था, विवाह अडचणीत आले आहेत. ह्यापासून मनुष्याला मुक्त केले पाहिजे. ख्रिस्ताचे जीवनमूल्ये आपल्याला नवीन जीवन देऊ शकतात. ख्रिस्ताची अधिकारवाणी त्याच्या निर्मल जीवनातून तयार झाली होती. त्यांची मुळे स्वर्गात होती. आपल्या बाप्तीस्म्याद्वारे आपण देवाची मुले बनलो आहोत. आपलासुद्धा येशू ख्रिस्ता प्रमाणे महान देणग्या भेटल्या आहेत. आपण खऱ्या संदेष्ट्या प्रमाणे धाडसी बनण्याचा प्रयत्न करूया व अधिकाराने देवाचे राज्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करू या.


विश्वासू लोकांच्या प्रार्थना:


प्रतिसाद: हे प्रभू तुझा शब्द कृतीत आणण्यासाठी आम्हाला            शक्ती दे.


१. सर्व जगाला सेवेचा आदर्श देण्यासाठी ख्रिस्ती महामंडळाच्या पदाधिकार्यानी विशेषकरून पोप फ्रांसिस, सर्व महागुरुनी आपल्या अधिकाराचा वापर केवळ सेवेसाठी करावा म्हणून प्रार्थना करूया.

२. आपल्या राष्ट्राच्या सर्व राजकर्त्यांनी आपल्या जनतेची न्यायाने सेवा करून आपल्या राष्ट्राची प्रगती करावी म्हणून आपण प्रार्थना करू या.

३. आपल्या धर्मग्रामाच्या बंधू-भगिनीनी आपल्या प्रभु ख्रिस्ताच्या शुभवर्तमानाची घोषणा गर्विष्ठपणे आणि स्वाभीमानाने न करता ती नम्रपणाने करावी म्हणून प्रार्थना करूया.

४. आपल्या देशात शांततेचे, हिंसेचे आणि माणुसकीचे वातावरण निर्माण करून सर्वांनी इतरांच्या सेवेसाठी प्रयत्न करावे म्हणून आपण प्रार्थना करू या.

५. वैयक्तिक गरजांसाठी आपण प्रार्थना करू या.


Wednesday 17 January 2024

 


Reflections for the Third Sunday In Ordinary Time (21/01/2024) by Br. Trimbak Pardhi.



दिनांक: /०१/२०२

पहिले वाचन: योना ३:१-५, १०

दुसरे वाचन: १ करिंथ ७:२९-३१

शुभवर्तमान: मार्क १:१४-२०


सामान्य काळातील तिसरा रविवार




प्रस्तावना:

आज ख्रिस्तसभा सामान्य काळातील तिसरा रविवार साजरा करीत आहे. आज येशु ख्रिस्त मिशन कार्याला सुरुवात करताना आढळतो. आज पुन्हा एकदा आपणास पाचारणाची आठवण करून दिली जात आहे. आजच्या उपासनेतील महत्त्वाची गोष्ट म्हणजे, प्रभू ख्रिस्त आपल्या पहिल्या शिष्यांना कसे पाचारण करतो ह्याविषयी आपण ऐकतो.

आजच्या पहिल्या वाचनात परमेश्वर योनाला पाचारण करत आहे त्याला परमेश्वराचा प्रवक्ता बनण्यास पाचारण करत आहे. परमेश्वर योनाला निनवेच्या  पापी लोकांना त्यांच्या पापांचा पश्चात्ताप करायला सांगत आहे. देवाच्या शब्दावर विश्वास ठेवून तो तिथे चमत्कार घडवतो.

आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल आपल्याला सांगत आहे कि, शेवट अगदी जवळ आला आहे, तो कोणत्याही क्षणी येईल म्हणून देवाच्या सानिध्यात राहण्यास आपणास आव्हान करत आहे.

आजच्या शुभवर्तमानात आपण पाचारणविषयी ऐकणार आहोत. येशु ख्रिस्त आपल्या मिशन कार्यासाठी किंवा देवाची सुवार्ता गाजवण्यासाठी, शिष्यांची निवड करतो. शिष्य मागे-पुढे न पाहता अगदी मनापासून त्याच्या हाकेला सकारात्मकरित्या प्रतिसाद देता.

आपल्यालाही देवाने तसच पाचारण केलं आहे. देवाला आपल्या सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा असते. त्यासाठी आपल्याला आपली वाईट वर्तणूक सोडून दिली पाहिजे. परमेश्वर आपल्याला बोलावित आहे त्याचं कार्य करण्यासाठी. आपण सर्वांनी देवाने दिलेली ही जबाबदारी पार पाडावी. शुभवर्तमानात सांगितल्या प्रमाणे आपण देखील मासे धरणारे नसून माणसे धरणारे बनूया.


मनन चिंतन:

आजची उपासना आपणाला पाचारणविषयी सांगत आहे. जर एखाद्या माणसाने तुम्हाला सांगितले की, ही चाकू घे आणि त्या चाकूच्या साह्याने समोरचे झाड काप, तर ते ऐकून तुम्हाला हसू येईल व तुम्ही म्हणाल, “ह्याला वेड तर नाही ना लागलं? कारण झाड तोडायला कुराड पाहिजे चाकू नव्हे.” परंतु परमेश्वर मात्र कधी-कधी आपणाबरोबर असाच वागतो आणि अशक्य वाटणाऱ्या गोष्टी आपल्याला करायला सांगतो. कस ते आपण पाहूया....

 जुन्या करारातला मोशे हा त्याच्या सासर्याच्या शेळ्या पाळत असे. परमेश्वर त्याला दर्शन देतो आणि इजरायेली लोकांचे, फेरो राज्याच्या तावडीतून सुटका करण्या सांगतो. परंतु मोशेला ते अशक्य वाटले कारण कुठे तो मोठा बलवान फेरो व त्याचे सैन्य आणि कुठे हा निर्बल व्यक्ती. म्हणून मोशे देवाला म्हणतो कि, मला ते शक्य होणार नाही. तेव्हां परमेश्वर मोशेला म्हणतो कि, मी तुझा बरोबर आहे”. तेव्हा देवावर विश्वास ठेवून मोशे इजरायेली लोकांची फेरो राजाच्या गुलामगिरीतून मुक्तता करतो.

पहिल्या वाचनानुसार योना नावाच्या माणसाला परमेश्वर म्हणतो, “निनव्हेच्या पापी लोकांना त्यांच्या पापांचा पश्चाताप करायला जाऊन सांग. तेव्हा योना घाबरतो व म्हणतो, तिथली लोकं माझं ऐकतील का? ते माझी चेष्टा नाही का करणार? मला ते ठार नाही का मारणार? योनाला हि अशक्य वाटणारी गोष्ट होती, म्हणून योना घाबरतो व पळून जातो. परमेश्वर त्याला पुन्हा सांगतो, तु जा आणि निनव्हेच्या लोकांना पश्चातापाचा संदेश दे. आता मात्र योना देवाच्या शब्दावर विश्वास ठेवतो आणि जातो. तेथे तो देवाच्या सहाय्याने चमत्कार घडवतो. योना निनव्हेत जाऊन लोकांना उपदेश करतो व त्याचा उपदेश ते मानतात.

दुसऱ्या वाचनात पौल आपल्याला आठवण करून देतो की, आपली वेळ कमी होत आहे म्हणून आपण सर्वांनी तयार असले पाहिजे, कारण पौलच्या चेतावणीचा प्रत्येकाव परिणाम होतो. विवाहित, अविवाहित ते शो करणारे, आनंद करणारे, श्रीमंत आणि गरीब, नेते आणि अनुयायी इत्यादि. हा इशारा योग्य वेळी येतो. त्याद्वारे पौल आपल्याला देव आणि आपल्या जगाशी असलेल्या आपल्या नातेसंबंधाचे पुनरमूल्याकन करण्यासाठी बोलावतो. सुवार्तेचा स्वीकार करणे आणि त्याबद्दल साक्ष देणे हे एक आव्हान आहे.

शुभवर्तमानात आपण ऐकतो की, प्रभु ख्रिस्ताचे शुभकार्य पुढे चालू ठेवण्यासाठी तो अक्षीक्षित मच्छीमारांची निवड करतो. त्या काळातले लोक येशूला हे कृत्य करताना पाहून हसले असतील व म्हणाले असतील, ही अशिक्षित कोळी काय मदत करणार? तरी पण आपल्याला ठाऊक आहे की, या अडाणी अशिक्षित लोकांनी येशूची शुभवार्ता जगाचा कानाकोपऱ्यात पोहचवण्याचे महान कार्य केले आहे. अशा प्रकारे परमेश्वर अशक्य गोष्टी शक्य करून दाखवतो.

तर माझ्या प्रिय भाविकांनो, ज्याचा देवावर विश्वास आहे किंवा देवाच्या शब्दावर विश्वास आहे त्यांना सर्व काही शक्य आहे. आज प्रभू येशू आपणाला त्याच्या मिशन कार्यामध्ये सहभागी होण्याचे आमंत्रण देत आहे. हेच मिशनरी कार्य करण्यासाठी आपल्याला आपलं घरदार अथवा वैयक्तिक कामकाज सोडून देण्याची गरज नाही. फार मोठा त्याग करण्याची आवश्यकता नाही, मात्र आपल्याला आपल्या दररोजच्या जीवनात आपल्या परीने प्रामाणिकपणे जीवन जगून गरजवंतांना मदत करून आपण देवाची सुवार्ता गाजू शकतो. खरं म्हणजे कार्य देव करतो आपण फक्त त्याला सहकार्य केलं पाहिजे. असं म्हणतात की, फक्त आपल्याला आवड असावी कारण आवड असली सवड आपोआप निर्माण होते.


विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: “हे परमेश्वरा आम्हांला आशीर्वादित कर.”


१. ख्रिस्त मंडळाची धुरा वाहणारे आपले पोप, कार्डीनल्स, बिशप, व इतर सर्व ह्यांना संपूर्ण जगास आध्यात्मतेच्यामार्गावर नेण्यास मार्गदर्शन व प्रेरणा लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

२. प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने आपले जीवन परमेश्वराकडे वळवावे, वाईटाचा त्याग करावा म्हणून त्यासाठी  लागणारी कृपा  परमेश्वराने द्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

३.  वेगवेगळ्या संघटना आपल्या धर्मग्रामात कार्यरत आहेत. परमेश्वराचे शब्द व प्रेम त्यांच्या विविध कार्याद्वारे घडून येवोत व त्यांना त्यासाठी परमेश्वराचे बळ मिळो म्हणून आपण प्रार्थना करूया.

४. ख्रिस्त सभेची सेवा करण्यास आपल्या धर्मग्रामातून अधिका-अधिक तरुण-तरुणींना पाचारण व्हावे व देवाचे प्रेम त्यांनी अनुभवावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

५. आपल्या धर्मग्रामात जे लोक आजारी आहेत, मृत्यूशी झुंजत आहेत, आर्थिक अडचणींना सामोरे जात आहेत अश्या सर्व लोकांना प्रभूचे धैर्य व त्याची शक्ती मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

६. थोडावेळ शांत राहून आपल्या सामाजिककौटुंबिक व वैयक्तिक गरजांसाठी प्रार्थना करूया.