Reflections for Homily By: Wicky Bhavigar
उपवास काळातील चौथा रविवार
दिनांक: १५/०३/२०१५
पहिले वाचन: २ इतिहास: ३६: १४-१६, १९-२३
दुसरे वाचन: इफिसिकारंस पत्र: २:३-१०
शुभवर्तमान: योहान ३:१४-२१
प्रस्तावना :
आज आपण उपवासकाळातील चौथा रविवार
साजरा करत आहोत. प्रभू येशु हा विश्वाचा तारणकर्ता आहे हे आजच्या वाचनांतून स्पष्ट
होते. विश्वास जरी परमेश्वराच्या कृपेमुळे येत असला तरी तो दृढ होण्यास मनुष्याच्या
सहकार्याची गरज असते.
येरुशलेमातील मुख्य याजकांनी अमंगळ राष्ट्रांचे अनुकरण
केल्यामुळे परमेश्वराचा कोप त्याच्या लोकांवर झाला परंतु देवाने परत एकदा
प्रेमाखातर त्याच्या लोकांना गुलामगिरीतून बाहेर पडण्याची संधी दिल्याचे आपण
पहिल्या वाचनात पाहतो. दुसऱ्या वाचनात संत पौल इफिसिकारंस पाठवलेल्या पत्रात,
ख्रिस्ताच्या कृपेने व विश्वासाद्वारे इफिसिकरांचे तारण झाले आहे आणि हे देवाचे
दान आहे असे सांगतो. तर शुभवर्तमानात आपण, ‘देवाने मानवाच्या ताराणाकरिता आपल्या एकुलत्या
एका पुत्रास या धरतीवरती पाठविले आणि त्यावर जो विश्वास ठेवतो, त्यास सार्वकालिक
जीवन प्राप्त होईल’ असे ऐकतो.
देवाची आपल्यावरील असलेल्या
प्रीतीचा अनुभव आपल्याला येऊन आपला देवावरील विश्वास अधिकाधिक दृढ व्हावा व येशूला
आपला तारणकर्ता म्हणून स्वीकारण्यास आपल्याला विशेष कृपा लाभावी म्हणून या
मिस्साबलीदानात प्रार्थना करूया.
सम्यक विवरण:
पहिले वाचन : २ इतिहास: ३६:१४-१६,१९-२३
परमेश्वराची आपल्या लोकांवर करुणा होती, परंतु येरुशलेमातील
लोकांनी अमंगळ कृत्याचे अनुकरण करून घोर पातक केले होते आणि जे मंदिर परमेश्वराने
येरुसलेमेत पवित्र केले होते ते त्यांनी भ्रष्ट केले होते. ह्या कारणास्तव
परमेश्वराचा कोप त्यांच्यावर भडकला आणि देवाने त्यांना सिदकीयाच्या कारकिर्दीत
गुलामगिरीत सत्तर वर्षे ठेवले.
दुसरे वाचन: इफिसकरांस पत्र २:४-१०
ख्रिस्ती लोक ख्रिस्ताच्या पुनरुत्थानात सहभागी झालेले आहेत,
हे संत पौल ह्या पत्रातून स्पष्ट करतो. देव द्यासंपन्न आहे, सर्व कृपेचा देव आहे
आणि तारण हे सर्वस्वी त्याच्या कृपेने आहे. कारण कृपेनेच इफिसिकरांचे तारण झाले
आहे (इफिस.२:८). ‘परमेश्वराची कृपा’ आपल्याला येशूच्या तारणाचा स्वीकार करण्यास
तयार करते. आपल्या तारणाचा आरंभ कृपेकडून होतो, कृपाच ते राखते व कृपाच ते पूर्ण
करते.
शुभवर्तमान: योहान ३:१४-२१
देवाने जगावर इतकी प्रीती केली की,
त्याने आपला एकुलता एक पुत्र जगाच्या तारणासाठी दिला, अशासाठी की, जो कोणी
त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त
व्हावे. प्रीती हा देवाचा स्वभाव आहे (इतिहास: ४:८,१६); हा एक सर्वात मोठा
ख्रिस्ती सद्गुण होय(१करिथ: १३:१३). प्रीतीचे गुणधर्म सांगून प्रीतीची व्याख्या
केली आहे (१करिथ:१३:४-७). देव व मानव यांच्याशी मानवाच्या संबंधात ‘प्रिती’ आवश्यक
असते, त्यामुळे ‘प्रीती’ ही ख्रिस्ती धर्माचे केंद्रस्थान बनली आहे (मत्तय:२२:३७-४०;
मार्क:१२:२८-३१). योहान: १३:३४-३५; रोम:१३:८-१०).
कालवरीवरील आत्मबलिदानात प्रितीचा
सर्वोच्च अविष्कार झाला (१योहन:४:१०). मानवी प्रेमाचा उगम देवामधुनच आहे. व आपली
आपल्या बांधवांवर असलेली प्रीती आपल्या सेवेतून दिसून येते(गलती: ५:१३). माणसाने
सर्वतोपरी देवावर प्रीती केली पाहिजे (मत्तय:२२:३७-३९) आपली प्रीती सरळ असावी
त्यात ढोंगबाजी नसावी. प्रीती सत्याने व कृतीने करावी (रोम:२२:९; योहान:३:१८).
योहानाचे शुभवर्तमान हे एक उत्तम
प्रकारचे साहित्य आहे. योहानाचे बाह्यांगापेक्षा अंतरात्मा पाहतो. तसेच या प्रकारे
पापाचा परिणाम नष्ट करण्यासाठी ख्रिस्त वधस्तंभावर खिळला जाणार होता (१४). यासाठी
की, जो पापी, सार्वकालिक जीवनासाठी ख्रिस्ताकडे येईल व त्याच्यावर विश्वास ठेवील
त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे व तुमचा नवा जन्म व्हावा ही देवाच्या
प्रितीची योजना आहे. यासाठी स्वत:ची गरज ओळखून, पश्चातापाणे तारणासाठी देवाकडे
धावा करणे या विश्वासाच्या कृतीमुळे तारण होते.(१६,१७).
बोधकथा:
१.
संत मोनिकाचा विश्वास दृढ होता.
संत मोनिका ही संत
अगुस्तीनची आई; आपला मुलगा अगुस्तीन व आपला पती ह्यांच्यासाठी सतत ३० वर्षे
प्रार्थना करत होती. अनेक वर्षे लोटून गेली तरी आपला मुलगा व पती सुधारत नाही, म्हणून ती खचून गेली नाही; तर
ती संत आंब्रोस (तेव्हाचे बिशप). ह्यांच्याकडे गेली व आपली व्यथा त्यांना
सांगितली. बिशप आंब्रोस यांनी सांगितले की ‘तुम्ही तुमच्या प्रार्थनेमधील सातत्य
चालूच असुद्या’. देव तिच्या प्रश्नांना उत्तर देणार असा तिचा दृढ विश्वास होता. ३०
वर्षाचा कालावधी लोटल्यानंतर संत अगुस्तीन मध्ये परिवर्तन घडले तो एक नवीन माणूस
बनला, व तो ख्रिस्तसभेचा महान संत झाला. मोनिका सुद्धा संत झाली. आपणसुद्धा संत
मोनिका प्रमाणे विश्वासात दृढ व्हावे व सार्वकालिक जीवनास पात्र व्हावे.
२. विश्वासाचे फळ:
एक विधवा बाईला दोन मुले
होती. ती गरीब होती. आपल्या गरीब परिस्थितीतही ती देवाला दान देण्यास विसरत नसे.
ह्या गरीब बाईचे दानशूर हृद्य पाहून देवाने तिच्या एका मुलाला चांगली नोकरी दिली.
त्यांमुळे त्यांचे उत्पन्न वाढले. आपले देवाने उत्पन्न वाढवले आहे म्हणून विधवेने
पूर्वीपेक्षा अधिक दान देण्यास सुरुवात केली. देवाने तिला अधिक आशीर्वादित केले.
देवाने दुसऱ्या मुलाला नोकरी दिली. त्याचे उत्पन्न अधिकच वाढले तसे तिने देवाला
दान देण्याचे वाढविले. ती जशी देवाला दान देत गेली तसे देवाने तिला व तिच्या
मुलांना आशीर्वादित करीत राहिला. समाजात त्या विधवेचे एक चांगले कुटुंब गणले गेले,
कारण तिचा देवावर फारच विश्वास होता.
मनन चिंतन:
जो कोणी विश्वास ठेवतो त्याला त्याच्याठायी सार्वकालिक जीवन
प्राप्त होईल. विश्वास म्हणजे केवळ ईश्वर भक्ती नव्हे तर विश्व प्रेम आणि मानव
सेवा ही त्या विश्वासाचे अविभाज्य घटक आहेत. प्रभू परमेश्वराने मानवाच्या तारणाची
योजना पूर्णत्वास नेण्यासाठी आपल्या पुत्राचा बळी समर्पित केला. दुख:सहन व
क्रूसावरील मरणाद्वारे येशूने आपल्या
सर्वांचा देवाबरोबर समेट घडवून आणला आहे. प्रभू येशु ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे आपल्याला
सार्वकालिक जीवन मिळते. ख्रिस्त प्रभू आपल्या सर्वांच्या पापासाठी स्वत: ‘यज्ञबळी’
बनला. आज आपणासाठी तारणाचा मार्ग वधस्तंभावरील प्रभू येशूच्या मृत्युद्वारे मोकळा
झाला आहे. म्हणूनच प्रभू येशूने म्हटले आहे, ‘जर कोणी माझ्यामागे येऊ पाहतो तर
त्याने आत्मत्याग करावा व दररोज स्वत:चा वधस्तंभ उचलून मला अनुसरावे(लूक:९:२३); कारण
माझ्यावर विश्वास ठेवणारा मनुष्य कधीही मरण अनुभवणार नाही. प्रभू येशूवर विश्वास
ठेऊन त्याला शरण येणाऱ्या श्रद्धावंतासाठी येशु चमत्कार व अदभूत कृत्ये करण्यास
तयार असतो.
आज आपण प्रभू येशु बरोबर त्याच्या विश्वासात एकरूप झालो
आहोत का? आज प्रभू येशु ख्रिस्ताने आपली निवड केली आहे. ख्रिस्ताठायी बाप्तिस्मा
स्वीकारलेल्या प्रत्येकाला ख्रिस्ताची सुवार्ता अंधारातून प्रकाशकडे पसरविण्यासाठी
पाचारण करण्यात आले आहे. विश्वासाचा पाया, शरणगती, त्याग, समर्पण, प्रार्थना व
उपवास ह्यावर उभारलेला आहे. आज आपण ह्या सर्व गोष्टींबद्दल आपल्या जीवनावर चिंतन
करू या. आपला विश्वास पडताळून पाहू या आणि मी देवावरील विश्वासास पात्र आहे का?
ह्याचा विचार करु या. असे म्हणतात की: ‘जो विश्वासात(*प्रकाशात ) जगेल तो,
स्वर्गीय नंदनवनास पात्र होईल व जो अविश्वासात (अंधारात) जगेल तो नरकाच्या
अंधकारास पात्र होईल. येशूचा स्वीकार करणे म्हणजे जीवन होय. जो येशूचा मार्ग स्वीकारतो
तो मृत्यूतून सर्वकालिक जीवनाकडे धाव घेत असतो.
एक आधुनिक कादंबरीकार म्हणतो, जीवन म्हणजे काय हे मला मुळीच
माहीत नव्हते, परंतु जेव्हा मी येशूच्या डोळ्यात पाहिले तेव्हा खरे जीवन काय आहे,
हे मला कळाले.
१) सार्वकालिक जीवन येशूवर विश्वास ठेवण्यात आहे. २) सार्वकालिक
जीवन येशूच्या कृपेत आहे. ३) सार्वकालिक जीवन येशूच्या डोळ्यात आहे. ४) सार्वकालिक
जीवन ख्रिस्ताच्या आज्ञेत आहे. ५) सार्वकालिक जीवन देवाचा (वचनांचा) महिमा
वर्णविण्यात आहे. ६) सार्वकालिक जीवन येशूच्याद्वारेच आहे. ७) सार्वकालिक
जीवन पापमुक्तीमध्ये आहे. ८) सार्वकालिक जीवन जो आत्म्यासाठी पेरतो
त्याच्यात आहे. ९) सार्वकालिक जीवन सात्विकपणे चालण्यात आहे. १०)
सार्वकालिक जीवन प्रभूयेशू ख्रिस्ताला परिधान करण्यात आहे. १२)
सार्वकालिक जीवन ख्रिस्ताची सेवा करण्यात आहे.
श्रद्धावतांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: सुखी ठेव तू सर्वांना, देवा आमुची हीच
प्रार्थना.
- आज आपण ख्रिस्ताच्या मळ्यात कार्य करीत असणाऱ्यांना देवाचा वरदहस्त, आशीर्वाद लाभावा आणि त्यांच्याद्वारे ख्रिस्ताचा संदेश जगात स्विकारला जाऊन शांती प्रस्थापित व्हावी म्हणून प्रार्थना करूया.
- देशाच्या कानाकोपऱ्यात कार्य करणाऱ्या मिशनरी धर्मगुरू, धर्मभागिनी व धर्मबंधू ह्यांच्यावर प्रभूचा आशीर्वाद सदा असावा तसेच ख्रिस्ताच्या मळ्यात कार्य करण्यासाठी आपल्या धर्मग्रामातील अनेक तरुण तरुणींना पुढे येण्यास प्रेरणा मिळावी म्हणून प्रार्थना करूया.
- संपूर्ण जगात गरिबांवर होणारे अत्याचार, अन्याय थांबून त्यांना माणूस म्हणून सन्मानाने जगता यावे म्हणून प्रार्थना करूया.
- विविधतेने नटलेल्या आपल्या भारत देशातील विविधतेतील ऐकता टिकून राहून जातीय वादाला आळा बसावा म्हणून प्रार्थना करूया.
- आता आपण थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक गरजा प्रभूचरणी मांडूया.
No comments:
Post a Comment