Reflections for Palm Sunday (29/03/2015) By: Xavier Patil
झावळ्यांचा रविवार
दिनांक: २९/०३/२०१५
पहिले वाचन: यशया ५०:४-७
दुसरे वाचन: फिलिप्पैकरांस २:६-११
शुभवर्तमान: मार्क १४:१-१५:४७
प्रस्तावना:
आज देऊळमाता झावळ्यांचा किंवा येशूच्या दु:ख
सहनाचा रविवार साजरा करीत आहे. आजपासून पवित्र आठवड्यास सुरूवात होते. येशू ख्रिस्त
हा राज्यांचा राजा होता; म्हणून २००० वर्षापुर्वी येरूशलेमेतील लोकांनी त्याचे
झावळ्यांच्या मिरवणूकीने स्वागत केले होते त्याचेच स्मरण आपण आज करत आहोत.
आजच्या पहिल्या वाचनात देवाने, यशया
संदेष्ट्याद्वारे, येशू आपल्या पापांसाठी नम्रपने, तोंडातून ब्र शब्ददेखील न काढता
सर्व दु:ख सहन करील असे आपणांस सांगत आहे. दुस-या वाचनात संत पौल आपणास सांगतो की,
ख्रिस्ताने नम्रपणा व आज्ञाधारकपणा ह्याचे उत्तम उदाहरण आपल्यासमोर ठेवले आहे. तर शुभर्वतमानामध्ये
देवाने मानवाच्या तारणाकरीता रचलेला मार्ग म्हणजे येशू ‘ख्रिस्ताचे दु:खसहन व
क्रुसावरील मरण’, ह्याचा सविस्तर वृत्तांत आपणास आज ऐकावयास मिळतो.
ह्या पवित्र आठवड्याच्या सुरूवातीलाच देऊळमाता
आपणा सर्वांना येशू ख्रिस्ताच्या दु:खसहनात भक्तीभावाने सहभागी होण्यास तसेच ख्रिस्ताच्या
दु:ख, मरण
व पुनरूत्थानावर मनन चिंतन करण्यास पाचारण करत आहे. ह्यास्तव आपण ह्या
मिस्साबलीदानात विशेष कृपा मागुया.
सम्यक विवरण:
पहिले वाचन: यशया ५०:४-७
यशयाच्या ह्या वाचनात आपल्याला येशुच्या
दु:खसहनाची पूर्वकल्पना मिळते. दु:ख सहन करणारा सेवक हा येशुचीच प्रतिकृती आहे अशी
ख्रिस्ती धर्मीयांची समजूत आहे.
येथे सेवकाला दृष्टतेला तोंड द्यावे लागत आहे. तो
स्वत:ला पूर्णत: त्याच्या वैऱ्यांच्या हातात सोपवतो असे येथे पहावयास मिळते. त्याचे
दु:ख सहन याचा उध्याप उलगडा केला नसला तरी तो सफल होत आहे. देवाला त्याने
आज्ञापालनाचे अर्पण वाहिले आहे (५०:५). स्वत:ची निंदा, हेटाळणी, एकाकीपणा यांच्यायोगे त्याने
देवावरील त्याचा देवावर असलेला दृढ विश्वास आणि भरवसा स्पष्ट केला आहे.
दुसरे वाचन: फिलिप्पैकरांस २:६-११
फिलिप्पै येथील ख्रिस्ती लोकांनी नम्रपणे
जीवनक्रम चालवावा आणि ख-या सहभागितेत ऐक्याने रहावे असा बोध करताना पौलाने त्यांना
ख्रिस्ताने घालून दिलेल्या आदर्शाचे स्मरण पुन्हा करून देत आहे. येशूने
स्विकारलेली नम्रता, मानदानी आणि ‘सर्वांचा प्रभू’ म्हणून
त्याला श्रेष्टपदी बसवणे हे स्पष्ट करून सांगितले आहे.
(२:७,8) येशूने स्वतःला रिक्त केले
म्हणजे त्याने स्वतःला ‘शून्य’ (निकामी) असे केले. त्याने आपले देवत्वही बाजूस
ठेवले. (२:९-११) येशूने पराकोटीची मारहानी सोसून आत्मसमर्पण केले. परिणामी,
देवपित्याने त्याला सर्वांपेक्षा श्रेष्ठ असे नाव दिले.
पित्याने ख्रिस्ताला नेमुन दिलेला मार्ग हा मान-सन्मान, मोठेपणा
मिळवण्याचा नव्हे तर स्वतःला नम्र करण्याचा होता. त्यात आपल्या पदाचा पुरेपूर लाभ
उठवण्याचे नव्हे तर अर्पण, यज्ञार्पण आणि अपमान, नम्रता यांचे महत्व होते.
शुभवर्तमान: मार्क १४:१-१५:४७
येरुशलेममध्ये प्रवेश:
जे प्रवक्त्यांमार्फत सांगितलेले होते ते पूर्ण करण्यासाठी येशू
येरुसलेमला आला होता (लूक ९:५१). येरुशलेम हे इस्रायलच्या राजधानीचे शहर होते. गालीलातून यात्रेकरूंचे थवेच्या थवे वल्हांडण सणासाठी पायी प्रवास करून येरुशलेममध्ये येत असत.
प्रभू येशूने यहुदी लोकांच्या वल्हांडण सणाआधी जेव्हा येरुशलेम नगरात प्रवेश केला, तेव्हा लोकांनी आपली वस्त्रे काढून आणि झाडांच्या डहाळ्या(फांद्या) तोडून येशूच्या वाटेवर पसरविल्या, लोकांनी उत्स्फूर्तपणे येशूचे स्वागत करीत ‘दाविदाच्या पुत्राला ‘होसान्ना’ प्रभूच्या नावाने येणारा तो धन्यवादित! ऊर्ध्वलोकी होसान्ना!’ अश्या शब्दांत त्याचा जयघोष करत म्हटले (मत्तय२१:१-११). ‘होसान्ना’ या शब्दाचा अर्थ ‘आमचे तारण कर’ असा आहे.
पवित्र
शास्त्रात आपण वाचतो की, यरुशलेमातल्या
त्या जयोत्सवानंतर येशू स्वस्थ न बसता आपल्या
पित्याचे कार्य केले.
येरूशलेमचे मंदिरः
येरूशलेमचे मंदिर
संपूर्ण पॅलेस्टाईनचे भूषण होते. त्या देवळामध्ये देश-परदेशातून लोक येत असत. यहुदी लोकांचे सगळ्यात मोठे असे
हे तीर्थक्षेत्र होते. शलमोन
राजाने देवाचे मंदिर बांधण्यासाठी
त्याकाळी लाखो रूपये खर्च केले होते. शलमोनाला हे देऊळ बांधण्यासाठी सुमारे ७ वर्षे लागली होती. अशा
ह्या मंदिराचे रूपांतर बाजारात झाल्याबद्दल ख्रिस्त ह्या देवापुत्रालाच नव्हे तर
सर्वसामान्य माणसाला देखील सहन होणे शक्य नव्हते.
त्याकाळी अशी
परिस्थिती होती की, धर्माधिका-यांनी स्वतःच्या
फायद्यासाठी मंदिरात अवतीभवती व्यापार सुरू केला होता. भाविकांनी अर्पणाच्या सर्व
वस्तू आपल्याकडून विकत घ्याव्यात म्हणून त्यांनी मेंढरे, कबूतरे ह्यासारख्या प्राण्यांचा व वस्तूंचा बाजार भरविला होता. ख्रिस्ताने
त्या सर्वांना तेथून हाकलून दिले व ते मंदिर शुध्द केले. “माझ्या घराला प्रार्थनेचे घर म्हणतील” (यशया ५६:७), असे शास्त्रलेखात लिहिलेले आहे
ह्याची येशूने लोकांना आठवण करून दिली आणि त्याने आणखी एका शास्त्रलेखाच्या
शब्दांत त्यांच्यावर आरोप ठेवला की, “तुम्ही त्याची
लुटारूंची गुहा केली आहे” (यिर्मया ७:११).
येरूशलेम नगरीचे शुध्दीकरणः
मंदिराचे शुध्दीकरण जितके प्रात्यक्षिक आहे तितकेच प्रतिकात्मक आहे. येरूशलेमला पवित्र नगरी म्हटले जाई. येरूशलेम हेच जणू परमेश्वराचे वस्तीस्थान होते. देवाची निवडलेली व आशीर्वादित केलेली प्रजा तेथे रहात होती. कराराचा कोश येरूशलेमला होता. अशा या येरूशलेममध्ये गुलामगिरी, भ्रष्टाचार व अत्याचार, व्यभिचार ह्यांचा व्यापार भरला होता. लोकांच्या अशा पातकामुळे संपूर्ण येरूशलेममध्ये पापांची धुके पसरलेली होती. मंदिराचे शुध्दीकरण म्हणजे येरूशलेमचे शुध्दीकरण, त्यासाठी येशूने खंबीर भूमिका घेतली. लोकांना त्याने आपल्या कणखर वाणीने झोडून काढले व तारणाचा संदेश दिला. येरूशलेमची प्रजा ही पवित्र प्रजा आहे आणि त्यांनी पापांचा बाजार आपल्या नगरात भरवून आपल्या ख-या देवाला टाकू नये असे येशूचे मत असावे. मंदिराच्या शुद्धीकरणाद्वारे
प्रभू येशू येरुशलेम जनतेची शुध्दीकरण करत आहे.
वल्हांडणाचा सण व प्रभूभोजन:
इजिप्त देशामधून
इस्त्राएल लोकांची गुलामगिरीतून सुटका आणि मरणापासून त्यांचे रक्षण व्हावे म्हणून
वल्हांडण सणात एक कोंकरू घेऊन ते अर्पण करावे अशी आज्ञा केली होती(निर्गम
१२:१-३०). नंतर राजाने सर्व लोकांस आज्ञा दिली की, या 'कराराच्या ग्रंथांत लिहिले आहे
त्याप्रमाणे तुम्ही आपला देव परमेश्वर याच्या प्रित्यर्थ वल्हांडण सण पाळा’. असा वल्हांडण सण इस्त्राएलाचे शास्ते शासन करीत होते
त्यांच्या काळापासून व इस्त्राएलाचे राजे व यहुदाचे राजे यांच्या कारकिर्दीत कधी
पाळण्यात आला नव्हता; योशीच्या
राजाच्या कारकीर्दीच्या अठराव्या वर्षी परमेश्वराप्रित्यर्थ येरुशलेमेंत वल्हांडण सण पाळण्यात आला”(२ राजे २३:२१-२३). या महत्वपूर्ण घटनांचे स्मरण म्हणून
वल्हांडण सण प्रतिवर्षी साजरा केला जात असे.
२६:१७-३० शेवटले
भोजन हे सर्व ऐतिहासिक संदर्भ व प्रतीके यांची पार्श्वभूमी असलेले हे वल्हांडणाचे
भोजन होते. येशूच्या मरणाद्वारे या भोजनाला आता नवा अर्थ दिला जाणार होता.
त्यामुळे पुढे हे भोजन ख्रिस्ती उपासनेतील प्रमुख कृतीचा आदर्श ठरणार होते.
आपल्या भावी
मरणाचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी वल्हांडणाच्या भोजनातील भाकरी व द्राक्षारस ही
दुश्य साधने वापरली आहेत. मोडलेली भाकरी हे त्याच्या शरीराचे प्रतिक आहे तर
त्यातून त्याच्या भावी मरणाची वस्तुस्थिती नि:संशयास्पद स्पष्ट होते. “हे माझे शरीर आहे’ ह्याचा अर्थ हा
प्रतीकात्मक आहे. आपले शरीर आपल्या शिष्यांसाठी मरणातून दिले जाणार हेच प्रभू येशू
सूचित करत आहे आणि पुढे त्याचे स्मरण करण्यासाठी त्याच्या स्मरणार्थ हा विधी
पुन्हा पुन्हा करण्यास सांगितले आहे. याद्वारे प्रभूच्या राज्याचे आगमन झाल्याचे
प्रभू सांगत आहे. ‘प्याला’ देताना तो जे बोलला त्यातून हा मुद्दा अधिक स्पष्ट झाला. पापांची क्षमा
होण्यासाठी त्याचे रक्त पुष्कळांकरिता ओतले जाणार होते. ह्याद्वारे यज्ञार्पणाने नव्या
कराराची प्रस्थापना प्रभू येशू करत आहे.
येशूचे कार्य:
देवाने
ख्रिस्ताला ह्या जगात लोकांचा उद्धार करण्यासाठी पाठवले होते. इब्री, इस्त्रायल किंवा यहुदी लोक देवाची निवडलेली प्रजा होती. प्रमुख्त: संपूर्ण जुनाकरार आपल्याला देवाने ह्याच प्रजेची
इजिप्तमधील गुलामगिरीतून सुटका आणि मरणापासून त्यांचे रक्षण कसे केले हे सांगते.
देवाची योजना होती की, दुरावलेल्या यहुदियांचे तारण व्हावे व यहुदियांच्या आदर्शांद्वारे संपूर्ण जगाचे तारण करावे म्हणून त्याने येशूला
ह्या जगात पाठवले.
येशू शांतीचा राजा:
बायबलमध्ये गाढवांचा उल्लेख जुन्याकरारापासून
नव्याकरारापर्यंत केलेला आपणास आढळतो. गाढव ह्या प्राण्याचा उपयोग कामासाठी, शेती
व्यवसायासाठी, वाहतुकीसाठी आणि जड ओझे वाहण्यासाठी करत असत. तर घोड्यांचा वापर
युद्धासाठी किंवा रथ ओडण्यासाठी करत असत. जुन्याकरारात आपला जीव वाचविण्यासाठी
अॅब्सलोमने गाढवाचा वापर केला होता. जुन्याकरारात गणना ह्या पुस्तकात इस्त्रायली मुलांना श्राप
देण्यासाठी संदेष्टा बलाम ह्याने गाढवाचा उपयोग केला होता, ह्या ठिकाणी गाढव
तलवार घेऊन उभ्या असलेल्या देवदूताला पाहून बोलला होता(गणना २२:२१-३०). सॅमसनाने गाढवाच्या
जाभाड्याचा उपयोग करून एक हजार लोक ठार मारले होते (शास्ते १५:१६). सौलाचा राज्याभिषेक करण्यापूर्वी
सौल आपल्या पित्याच्या हरवलेल्या गाढवांच्या शोधात होता(१ शमुवेल ९:३).
गाढव हे शांतीच चिन्ह होते. गाढवाचा वापर शांती प्रस्तापित
करण्याकरिता होत असे तर घोडा हे युद्धाचे प्रतिक मानले जात असे. राजा शलामोनाच्या
काळापासून हे सर्व सत्य होते. “सीयोनकन्ये, जोराने आनंदाचा गजर कर; येरुसलेमकन्ये,
गजर कर; पाहा, तुझा राजा तुजकडे येत आहे; तो न्यायी व यशस्वी आहे; तो लीन आहे;
गाढवावर, गाढवीच्या पिलावर म्हणजे शिंगरावर बसून येत आहे. एफ्राइमांतलेरथ, यरुशलेमेतले घोडे मी नष्ट करीन; युद्ध धनुष्य तोडून टाकण्यात येतील, तो राष्ट्रांबरोबर शांतीच्या गोष्टी बोलेल; त्याचे अधिपत्य प्रत्येक समुद्रावर व फरात नदापासून तो पृथ्वीच्या दिगंतापर्यंत चालेल” (जख-या ९:९-१०). इथे येशू शिंगराचा वापर करून तो शांतीचा राजा आणि ह्या जगात शांती प्रस्तापित करण्यासाठी तो आला होता हे दर्शवितो. येशू
जेव्हा येरुशलेमला येतो तेव्हा तो एका गाढवीच्या पिलावर म्हणजे शिंगरावर बसून येतो; तो राजासारखा घोड्यावरून स्वारी करीत येत नाही. घोड्यावर स्वारी करून येणे म्हणजे दुस-या
राजाला युद्धाचे आव्हान देणे असे मानले जात असे. परंतु गाढवीच्या पिलावर म्हणजे शिंगरावर बसून येणे म्हणजे दोन राजांतील समेट करणे किंवा शांती प्रस्तापित करणे हे दर्शविते. “सीयोनकन्ये, जोराने आनंदाचा गरज कर; यरुशलेमकन्ये, गजर कर; पाहा, तुझा राजा तुजकडे येत आहे; तो न्यायी व यशस्वी आहे, तो लीन आहे; खेचरावर, म्हणजे शिंगरावर बसून येत आहे.
बोधकथा:
एका कुंभाराजवळ दोन मटके होते. एक चांगले होते, तर दुस-या
मटक्यास छिद्र पडलेले होते. तो कुंभार त्या दोन्ही मटक्यांचा तलावातून पाणी
काढण्यासाठी उपयोग करायचा. ती दोन्ही मटकी पाण्याने भरून तो घरी घेऊन येत असे,
छिद्र असलेल्या मटक्यात घरी पोहचेपर्यंत काहीच पाणी शिल्लक राहत नसे तर दुसऱ्या
मटक्यात तलावातून काठोकाठ भरलेले पाणी पूर्णत: घरापर्यंत येत असे. काही दिवसांनी
त्या छिद्रे असलेल्या मटक्याने धन्याला विचारले, मी तर एक निरुपयोगी मटका! ‘तुम्ही
माझा उपयोग का करता? तुम्ही माझ्यात पाणी साचवून ठेऊ शकत नाही. माझ्यात तुम्ही
पाणी वाहू शकत नाही, त्यापेक्षा मला फेकून का देत नाही? तुम्ही चांगले कुंभार
आहात. चांगली मडकी तयार करु शकता. त्यावर कुंभार उत्तरला, ‘मी तुझा वापर दरदिवशी
करतो. मला माहीत आहे कि मी तुझ्यात पाणी साचवून ठेऊ शकत नाही. तुला पडलेल्या
छिद्रांमुळे तुझ्यात भरलेले पाणी घरापर्यंत पोहचू शकत नाही. याची मला जाणीव होती
म्हणूनच मी ज्या वाटेवरून मी तुला आणत होतो त्या वाटेवर मी फुलझाडांचे बी पेरले
आणि आज बघ तिथे सुंदर अशी फुले उमललेली आहेत. तर दुसऱ्या बाजूला काहीच नाही. मी
तुझा वापर ती फुलझाडे शिंपण्यासाठी केला म्हणूनच तर आज सुंदर असे फुले त्यावर
उमललेली तू पाहत आहेस.
परमेश्वरदेखील आपण स्वत:च्या नजरेत जरी
निरुपयोगी असलो तरी आपला उपयोग तो त्याचे
कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी करत असतो; म्हणून तो आपणास फेकून देत नाही, तर आपणास
तो सुंदर आणि परिपूर्ण असे बनवत
असतो.
मनन चिंतन:
प्रिय बंधू-भगिनींनो येशू ख्रिस्त हा राज्यांचा
राजा आहे असा आपला ठाम ख्रिस्ती विश्वास आहे आणि म्हणूनच वर्षाच्या तीन वेगवेगळ्या
रविवारी देऊळमाता येशू हा राजा असल्याचा सण साजरा करत असते.
१. सर्व प्रथम प्रकटीकरण म्हणजे तीन राज्यांच्या सणाच्या
दिवशी येशू हा राजा आहे असे आपण मानतो. कारण राजा कधीच प्रजेला भेटण्यासाठी जात
नाही उलट प्रजा (माणसे) राज्याला भेटण्यासाठी येतात. अशाचप्रकारे प्रकटीकरणाच्या
सणाच्या दिवशी तीन राजे येशूला भेटण्यास व वंदन करण्यास येतात. ह्यामधून आपणाला समजते
कि येशू ख्रिस्त हा राजांचा राजा आहे.
२. ख्रिस्त राजाचा सण आपण येशू हा सा-या विश्वाचा राजा आहे
म्हणून साजरा करतो. देवाने येशू ख्रिस्ताला सर्व मानवजातीवर, प्राणीमात्रांवर
व जगातील सर्व गोष्टींवर अधिकार दिला आहे.
३. आज आपण ‘झावळ्यांचा रविवार’ साजरा करीत आहोत. आजच्या
सणाच्या दिवशी येशू ख्रिस्ताचे येरूशलेमेतील लोकांनी झावळ्यांनी स्वागत केले व
मोठमोठ्यांनी ओरडून म्हणाले, ''होस्सान्ना, प्रभूच्या
नावाने येणारा धन्य, दाविदाच्या पुत्राचा गौरव असो. ''
खरोखर, येशू ख्रिस्त हा राजा होता; पण त्याचे राजेपद, त्याची
कारकीर्द इतर राजांपेक्षा वेगळीच होती. जर आपण इतिहास पडताळून पाहिला तर
येशूख्रिस्त आणि इतर राजे ह्यांच्यामधील असलेला जमीन-अस्मानचा फरक आपणाला आढळून
येईल.
राजे राजवाड्यात राहतात पण येशू ख्रिस्त गाईच्या
गोठ्यात जन्मला, साध्या घराण्यात राहिला आणि शेवटी क्रूसावरती मरण पावला. राजे
पैसा, संपत्ती, धन-दौलत साठवतात तर
येशू ख्रिस्त द्या, शांती आणि प्रेम इतरांना वाटून देतो. राजांकडे त्यांची सेवा
करण्यासाठी नोकर-चाकर असतात पण येशू त्याच्या शिष्यांना ‘नोकर-चाकर’ म्हणत नाही तर
त्याचे ‘मित्र’, ‘भाऊ-बहिण’ म्हणून संबोधितो व स्व:ता
दुस-यांची सेवा करतो.
प्रत्येक राजा इतर राजांवर शस्त्राने आक्रमण व
लढाई करून स्वत:चे राज्य किंवा प्रांत पसरवण्यास झटत असतो पण येशू ख्रिस्त पापी
जनांस तारावयास, व्यसनाधिन लोकांस मुक्तता देण्यास, जे
लोक आजारी, भूकेले, अनाथ व अडचणीत होते
त्यांना साहाय्य करण्यास आणि देवाचे राज्य ह्या धरतीवर पसरवण्यास आला होता. असे
अनेक प्रकारचे फरक आपणाला येशू ख्रिस्त आणि इतर राजांमध्ये दिसून येतात.
आजच्या शुभर्वतमानामध्ये येशू ख्रिस्त घोड्यावर
किंवा उंटावर बसून येत नाही तर एका गाढवाच्या पाठीवर बसून येरूशलेमेमध्ये नम्र राजासारखा
प्रवेश करतो.
''गाढव'' हा शब्द ऐकताच आपण नकारात्मक हावभाव दर्शवितो. समाजाच्या
दृष्टिकोनातून पाहिले तर गाढव हा अपात्र, अयोग्य व गबाळा असा प्राणी
मानला जातो; म्हणून गाढवाच्या अंगालादेखील हात लावण्यास किंवा त्याच्या बाजूला उभे
राहण्याचे आपण सहसा टाळतो. अशाच नको असलेल्या गाढवाचा वापर आज येशू ख्रिस्त स्वार
होण्यासाठी करतो.
येशूने गाढवाचाच वापर का केला असावा? हा
प्रश्न आपणा प्रत्येकाच्या मनाला बोचत असणारच. येशू ख्रिस्त गाढवाच्या वापराद्वारे
आपणास संदेश देऊ इच्छितो कि ''मी सज्जनांस नव्हे तर पापी लोकांच्या
तारणासाठी ह्या धरतीवर आलो आहे.'' ज्यांना समाजाने तूच्छ,
कमी, अशिषीत, कमजोर,
भिकारी, गरीब मानले व समाजामध्ये नको असलेल्या
लोकांसाठी येशू ख्रिस्त ह्या धरतीवर आला होता. पवित्र मरिया स्वतःला ‘प्रभूची दासी’
म्हणून संबोधते, योहान बाप्तिष्टा स्वतःला येशू ख्रिस्ता पेक्षा
तुच्छ लेखतो. मदर तेरेजा स्वतःला ‘देवाच्या हातातली पेन्सिल’ म्हणून संबोधते आणि संत
पौल देखील स्वतःला ‘ख्रिस्त-वेडा’ म्हणून जाहीर करतो.
ह्यावरून आपणाला समजते कि देवाने त्याच्या तारण
कार्यासाठी श्रीमंत, बुध्दिवान, सुशिक्षित
किंवा ज्ञानी लोकांची निवड केली नाही तर जे स्वतःला कमजोर, नम्र,
तुच्छ मानत असत. इंग्रजीमध्ये एक सुंदर म्हण आहे, ''God does
not call the qualified, but he qualifies the one he has called.'' ह्याचा अर्थ असा की, ‘देव गुणवंत किंवा ज्ञानी लोकांना बोलवत नाही तर
ज्यांना तो बोलावतो त्या सर्वांना तो ज्ञानी असे बनवतो’.
आज येशू ख्रिस्ताला आपल्या मनाचा, हृदयाचा
व आपल्या जीवनाचा राजा बनण्यास अधिक आनंद वाटेल, कारण येशू ख्रिस्त जरी सा-या
विश्वाचा राजा असला पण आपल्या जीवनाचा राजा नसेल तर त्याला काहीच अर्थ राहणार
नाही. जरी आपण शब्दांनी येशूला राजा मानले तरी मनाने त्याचा स्विकार करत नाहीत. आज
माणसे पैशाचे, धनाचे गुलाम बनले आहेत. आज कित्येकजण वाईट
गोष्टींचे, सैतानी कृत्यांचे व व्यसनांचे गुलाम झाले आहेत.
आज येशूला आपणाकडून पैशाची गरज नाही तर येशूला
आपल्यामधील त्या गाढवाची गरज आहे. जो गाढव आपणामध्ये सतत वस्ती करत असतो. उदा.
आपला अहंकार, मीपणा, उच्चपणा, गैरव्यवहार,
राग, मत्सर, क्रोध,
अशूध्द वाचा, द्वेष.
अशा सर्व सर्व गाढवांनी आपण भरलेले आहोत आणि
ह्याच गाढवाची आज येशू ख्रिस्ताला गरज आहे. ज्याप्रमाणे क्रुस हा अपमानाचे प्रतिक
होते पण येशू ख्रिस्त स्वतः क्रुसावर मरून त्या क्रुसाला ‘तारणाचे प्रतिक’ बनवले.
ज्याप्रमाणे समाजात गाढवाला काही किंमत नव्हती पण येशू त्या गाढवावर बसला आणि त्या
गाढवाला मानाचे स्थान दिले. ज्याप्रकारे गाईच्या गोठ्यामध्ये राहण्यास आपणाला
नकोसे वाटते पण येशू ख्रिस्त खुद्द गाईच्या गोठ्यामध्ये जन्म घेऊन त्या गोठ्याला
नविन स्थान प्राप्त करून दिले.
प्रिय बंधू-भगिनींनो, जर
आपण स्वतःच्या जीवनाकडे लक्ष दिले तर आपणाला कळून चुकेल कि ज्या समाजामध्ये आपण
राहत आहोत, त्या समाजाच्या दृष्टिकोनातून आपण कदाचीत गरीब, भिकारी,
कमी किंवा खालच्या दर्जाचा असणार. कदाचित कुणीतरी आपणाला अपराधी,
लूटारू, चोर मानत असेल परंतु अशाच लोकांची
येशूला आज गरज आहे. येशू म्हणतो. अहो! दु:खी, कष्टी आणि
भाराक्रांत जनहो तूम्ही मजकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन.
ख्रिस्तामध्ये आपणाला नविन बनवण्याची शक्ती व
सामर्थ्य आहे पण आज प्रभूला आपले जीवन अर्पण करण्यास आपण तयार आहोत का? आपण
थोडा वेळ शांत राहून ह्यावर मनन-चिंतन करूया. आमेन.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे प्रभू आमची प्रार्थना ऐक.
1. ख्रिस्तसभेची धूरा वाहणारे पोप महाशय, सर्व
बिशप्स, धर्मगुरू, व
धर्मबंधू-धर्मभगिनी ह्या सर्वांना ख्रिस्ताचा प्रकाश व त्याची सुवार्ता इतरापर्यंत
पोहचवण्यास शक्ती व सामर्थ्य लाभावे म्हणून
आपण प्रार्थना करूया.
२. आजच्या समाजातील कित्येकजण व्यसनाच्या आहारी जाऊन
देवापासून दुरावले जात आहेत, तसेच ज्यांना जीवन नकोसे वाटत आहे अशा सर्वांना
प्रभूने त्याच्या पवित्र आत्म्याचा स्पर्श करून योग्य तो मार्ग दाखवावा व पुन्हा
एकदा धार्मिक जीवन जगण्यास त्यांना मदत करावी, म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. जे लोक गरीब, दीन व गरजवंत आहेत, तसेच
ज्यांच्या दैनंदिनाच्या मुलभूत गरजादेखील भागवल्या जात नाहीत अशा सर्वांना आर्थिक
साहाय्य करण्यासाठी अनेक दानशूरांनी उदार हस्ते दानधर्म करून मदतीचा हात पुढे
करावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. आपल्या धर्मग्रामातील प्रत्येक कुटुंबावर व कुटुंबातील
प्रत्येक व्यक्तीवर प्रभू येशूचा विशेष आर्शिवाद यावा आणि आपल्या कुटूंबामध्ये
शांती, प्रेम,
ऐक्य सतत नांदावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. थोडावेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक
आणि सामाजिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.
No comments:
Post a Comment