Wednesday 4 March 2015

Reflection for the Homily By: Valerian Patil.





उपवास काळातील तिसरा रविवार


दिनांक: ०८/०३/२०१५
पहिले वाचन: निर्गम २०:१-१७.
दुसरे वाचन: १ करिंथकरांस १:२२-२५.
शुभवर्तमान: योहान २: १३-२५.

प्रस्तावना:
          आज आपण प्रायश्चितकाळातील तिसरा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना आपल्याला पवित्र मंदिराचे महत्व पटवून देत आहे. देवाने मोशेला दिलेल्या दहा आज्ञांविषयी आपण पहिल्या वाचनात ऐकतो. तर आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल करिंथकरास लिहिलेल्या पहिल्या पत्राद्वारे येशूच्या सामर्थ्याविषयी ज्ञान देतो. आजच्या शुभवर्तमानात येशू मंदिरातून व्यापाऱ्यांना बाहेर काढून आपल्या पित्याच्या मंदिराची पावित्रता राखतो.
    मंदिर हे देवाचे पवित्र वस्तीस्थान आहे व ह्याच पवित्र मंदिराचे पावित्र्य आपण सदैव राखावे म्हणून आपण ह्या मिस्साबलीदानात विशेष प्रार्थना करूया.

पहिले वाचन: निर्गम २०:१-१७.

     लोक विस्मयाने भयभीत होऊन पर्वतासमोर उभे असताना त्यांनी खुद्द देवाची वाणी ऐकली. ज्याने तुला इजिप्त देशातून दास्यगृहातून आणिले तो मीच तुझा देव आहे या शब्दाने देवाने स्वत:ची ओळख दिली. त्यानंतर त्याने काही अटी घातल्या. ह्या अटी इस्रायलच्या देवाबरोबर कराराच्या नात्याचा मूळ आधार होत्या, यालाच पुढे दहा वचने असे म्हटले आहे. ‘दहा आज्ञा’ या नावाने ही वचने आपल्या परिचयाची आहेत. देवाने ही वचने दोन पाट्यांवर लिहून त्याचे महत्व अधिकच दृढ केले. ह्या दहा आज्ञांपैकी पहिल्या तीन आज्ञा देवासबंधी आहेत तर इतर सात आज्ञा आपले शेजाऱ्यांशी असलेले संबंधयाविषयी निगडीत आहेत.

दुसरे वाचन: करिंथकरास पहिले पत्र १:२२-२५.

    संत पौलाने ख्रिस्ताची सुवार्ता करिंथकरांना सांगितली होती. त्या सुवार्तेमध्ये तो येशूच्या वधस्तंभाविषयी लोकांना माहिती देतो. वधस्तंभावर केवळ अत्यंत दृष्ट गुन्हेगारालाच मरण्यासाठी खिळले जात असे. येशू ख्रिस्तालासुद्धा असेच वधस्तंभावरील मरण सहन करावे लागले. परंतु ह्याच वधस्तंभाद्वारे ख्रिस्ताने ते दु:ख सहन करून, स्वर्गीय पिता हा पापक्षमाशील आहे हे आपणास पटवून दिलेले आहे. यहुदी लोकांना हे म्हणणे अडथळ्याचे वाटे व जे यहुदी नव्हते त्यांना येशूच्या मरणाने पापक्षमा मिळते ही घोषणासुद्धा मूर्खपणाची वाटे. परंतु संत पौल या प्रतिक्रियेमुळे निराश झाला नाही तर सुवार्तेवर विश्वास ठेवणाऱ्यांचे प्रभू आपल्या सामर्थ्याने व ज्ञानाने तारण करील व ज्या गोष्टीला माणसे देवाचे मुर्खपणा व देवाची दुर्बलता म्हणतील, तीच मानवी ज्ञानाहून व बलाहून कितीतरी श्रेष्ठ ठरेल. ह्याची माहिती संत पौल आपणास दुस-या वाचनात सांगत आहे.    

शुभवर्तमान : योहान: २: १३-२५.

    देवाच्या मंदिरात जेथे यहुदी उपासक आराधना करण्यास जमत तेथेच बाजाराचा गोंगाट चालू होता. येशूने गुरांना तेथून हाकलून दिले व व्यापाऱ्यांना येशूने तेथून जाण्यास भाग पाडले. मंदिराच्या आवारातून पशु बाहेर हाकलून लावणे हे प्रतीकात्मक कृत्य होते. हे पशु मंदिरामध्ये असण्याची काहीच गरज नव्हती उलट देवपित्याचा केवढा अपमान होत होता हे या कृतीतून सूचित होते. सर्वच यहुदी लोकांना मंदिराचा कर द्यावा लागत असे म्हणूनच तेथे दुसऱ्या देशाचे नाणी बदलून देणारे व्यापारी होते. यहुदी मंदिरातील गैर प्रकार बाहेर काढून टाकणे, शुद्ध करणे हाच येशूचा येथे मुख्य हेतू होता.
    यहुदी लोकांनी येशूच्या अधिकाराचे चिन्ह मागितले आणि देवाने तुम्हाला हा अधिकार दिला आहे हे दाखविण्यासाठी एखादा मोठा चमत्कार करा असे ते म्हणत होते. येशूने त्यांना म्हटले, ‘हे माझे शरीररूपी मंदिर तुम्ही मोडा, मी तीन दिवसात ते उभारीन(जिवंत होईन). येशूने मंदिर असा स्वत:च्याच शरीराचा उल्लेख केला हे स्पष्ट आहे. हे नव्या प्रकारचे मंदिर होते. येथे शरीर म्हणजे त्याचा देह असे मानले तर तेथे पुनरुत्थानाचा संदर्भ त्यास संलग्न असलेला आपणांस जाणवतो. येशूला मरणानंतर तीन दिवसांनी उठवण्यात आले यावरून या संदर्भाचा अर्थ होतो.
  
बोधकथा:

    एक शेतकरी गावकुशीबाहेर राहत होता. त्याच्या घराच्या बाजूलाच साधारणत: ३० ते ३५ फुट उंचीचे एक निंबोणीचे अवाढव्य झाड होते. ते झाड जुने असल्या कारणाने कमकुवत झाले होते, म्हणून त्या शेतकऱ्याला ते झाड पडण्याची भीती वाटत होती. ही भीती कायमची नष्ट करावी म्हणून त्याने ते कापले. त्याला वाटले गावकरी याबद्दल त्याची स्तुती करतील, कारण त्याने त्यांचीही झाड पडण्याची भीती नष्ट केली होती, परंतु सर्व काही त्याच्या विचारांविरुद्धच झाले. त्या गावकऱ्यांपैकी एक रागाने म्हणाला, ‘अहो पाटील बुवा तुम्ही इतके मोठे झाड कापण्यापूर्वी गावकऱ्यांचा विचार घ्यायला हवा होता. तर दुसरा, त्याला विटंबनात्मकपणे बोलला. कारण ते झाड सर्वांना त्यांच्या पूर्वजांची, विशेषतः ज्याने ते झाड लावले होते त्याची आठवण करून देत होते.
    बऱ्याचदा आपण आपल्या स्वार्थीपणात इतरांचे हित लक्षात घेत नाही. आजच्या शुभवर्तमानात येशु स्वत:हून रागावला नाही, तर त्याच्या क्रोधाद्वारे त्याचे देवावरील आणि त्याच्या लोकांवरील प्रेम सहज दिसून येते. त्याचा राग हा त्या मंदिरात बाजारीकरण करणाऱ्या लोकांविरुद्ध होता, व ज्यांना मंदिरात प्रवेश नव्हता अश्या लोकांना सहानभूतीपर होता. 
मनन चिंतन:

     आज आपण शुभवर्तमानात पाहतो कि, येशू ख्रिस्त रागात येऊन सर्वांना मंदिरातुन बाहेर काढत आहे. मंदिर हे देवाचे घर आहे, ते साफ व सुंदर असाव, परंतु इथे आपण पाहतो मंदिराच्या नावावर व्यापार चालू होता व ते येशूला आवडले नाही. त्यामुळे तो सर्वांना बाहेर काढतो. मंदिर हे शांतीचे, प्रेमाचे, प्रार्थनेचे प्रतिक किंवा घर मानले जाते. अनेक देशातून लोक त्या मंदिरात येत होते. लोकांचा हेतू होता तो म्हणजे प्रार्थनेचा व मंदिरात येण्याचा परंतु ते रिकाम्या हाती येऊ शकत नव्हते, ते लहान मोठी दानं घेऊन येत असत. येशू सर्व पाहतो व आता त्याला कळून चुकते की, मंदिरामध्ये व्यापाराला फार मोठे महत्व आहे. कधी कधी आपण सुद्धा देवाच्या मंदिराची शान राखण्याऐवजी, बोलत असतो व प्रार्थना करत नाही. संत पौल म्हणतो, ‘आपले शरीर सुद्धा एक देवाचे मंदिर आहे व देव त्यामध्ये राहतो’. तो देव आपण आपल्या वागण्याने, कृतीने दुसऱ्यांना दिला पाहीजे. हे सर्व आपण करु शकतो जेव्हा आपण देवाच्या वचनांवर विश्वास ठेऊ व देवाच्या दहा आज्ञांचे पालन करु. आपण जुन्या करारात पाहतो देव मोशेला दहा आज्ञा देतो व त्या दहा आज्ञा मोशे इस्रायल लोकांना देतो. तसेच नव्या करारात येशू ख्रिस्त सर्व मानवजातीला दोन महत्वाच्या आज्ञा देतो. जर आपण देवावर प्रीती केली परंतु शेजाऱ्यावर प्रीती केली नाही तर आपल्याला त्याच्या काहीच लाभ नाही. जशी आपण देवावर प्रीती करतो तशी आपण शेजाऱ्यांवर प्रीती करायला हवी. परंतु जेव्हा आपणा ह्या आज्ञा पाळतो, तेव्हा संपूर्ण हृदयाने व विश्वासाने त्या पाळाव्यात, नाहीतर शुभवर्तमानात एक माणूस येऊन येशूला विचारतो, ‘गुरुजी, अनंत जीवन मिळवायला मी कोणते सत्कार्य करायला हवं? सत्कार्य हे तू मला कशाला विचारतोस? येशू म्हणाला, ‘तुला जीवन हवं तर आज्ञा पाळ!’ ‘कुठल्या’ त्याने येशुला विचारले ‘खून करु नको, व्यभिचार करून नको, चोरी करु नको, खोटी साक्ष देऊ नको आपल्या बापाचा नि आईचा मान राख आणि स्वत: सारखं शेजाऱ्यावरही प्रेम कर! येशूने सांगितले, त्यावर तो तरुण म्हणाला, ‘मी ह्या सर्व पाळीत आलो आहे. आता आणखी कसले उणीव आहे येशू त्यास म्हणाला, ‘तुला सर्वांग परिपूर्ण व्हायचं असेल तर तुझे असेल नसेल ते विकून टाक, त्यातून मिळालेले पैसे गोरगरिबांना वाटून दे म्हणजे स्वर्गात तुला संपत्ती मिळेल नंतर माझ्याकडे ये आणि माझा अनुयायी हो. हे ऐकताच तो तरुण दु:खा ने चालता झाला. कारण त्याची मालमत्ता अमाप होते.
      आपण सुद्धा आपल्या जीवनात त्या तरुणाप्रमाणे वागतो. देवाच्या आज्ञा व त्याच्या मंदिरावर प्रेम करून त्या पाळण्याऐवजी आपण दुसऱ्या गोष्टी करतो. व त्यांना जास्त महत्व देतो. आज आपण सर्वजण आपल्या जीवनाची सुरुवात नव्याने करूया व आपल्या अश्या करण्याने दुसऱ्याच्या जीवनात बदल आणूया.

श्रद्धावंतांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे प्रभू आमची प्रार्थना ऐक.
  1. ख्रिस्तसभेचे कार्य पाहणारे आपले पोप फ्रान्सिस, कार्डीनल्स, बिशप्स, धर्मगुरू, धर्मबंधू, धर्मभागिनी ह्या सर्वांना देवाची सुवार्ता पसरविण्यासाठी देवाने मदत करावी. तसेच सर्व मानवजातीला देवाची ओळख जास्तीत जास्त प्रमाणात व्हावी, म्हणून आपण प्रार्थना करूया.
  2. देवाने आपल्याला दहा आज्ञा दिल्या आहेत, ह्या आज्ञाचे आपण पालन करावे, व आपले जीवन जास्तीत जास्त सुखमय बनावे ह्यासाठी प्रार्थना करूया.
  3. आपल्या देशात शांतीचे वातावरण पसरावे. जे लोक अशांतीस कारणीभूत आहेत अश्यांना देवाचा स्पर्श होऊन  त्यांचे जीवन शांतीमय बनावे, व ते शांतीदूत बनावेत, म्हणून आपण प्रार्थना करूया.
  4. ह्या प्रायश्चितकाळात आपण विशेष करून जे लोक देवापासून दूर गेले आहेत, त्यांना देवाचा स्पर्श होऊन त्यांच्या जीवनात देवाची गोडी लागावी म्हणून प्रार्थना करूया.
  5. आता थोडावेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक गरजा प्रभूचरणी मांडूया.




No comments:

Post a Comment