Tuesday, 17 March 2015



Reflections for Homily By: Nevil Govind









उपवास काळातील पाचवा रविवार

दिनांक: २२/०३/२०१५
पहिले वाचन: यिर्मया ३१:३१-३४
दुसरे वाचन: इब्री लोकांस पत्र ५:७-९
शुभवर्तमान: योहान १२:२०-३३


प्रस्तावना:

आज आपण उपवास काळातील पाचवा रविवार साजरा करीत आहोत. आजची तीनही वाचने आपणास येशू ख्रिस्त आपल्या पित्याशी जीवनाच्या अंतःपर्यंत आज्ञाधारक असल्याचे स्पष्टीकरण देतात. आजचे पहिले वाचन आपणास सांगते, ‘ख्रिस्ताच्या बलिदानाने देव इस्त्रायली लोकांत नवीन हृद्य तयार करील जे पापापासून अलिप्त राहील आणि देवाचे नियम मनाने आणि हृदयाने स्वीकारण्यास तयार असेल’. दुस-या वाचनात आपण ऐकतो की, ‘ख्रिस्त आपल्या पित्याशी आज्ञाधारक राहिल्यामुळे देवाने त्याला परिपूर्ण करून सर्व विश्वाचा तारणारकर्ता केला आहे’.
तर शुभवर्तमानात येशू म्हणतो, ‘ज्याप्रमाणे गव्हाचा दाणा जमिनीत पडून मरतो आणि पुष्कळ पीक देतो, त्याचप्रमाणे जे कोणी दुस-यांसाठी मरतात त्यांना सार्वकालिक जीवन प्राप्त होईल’. आज ख्रिस्त आपणास गव्हाचा दाणा बनून स्वार्थीपणा, गर्व आणि खोटेपणास मरून आपल्या आध्यात्मिक जीवनात नाविन्य फुलविण्यास प्रोत्साहान करीत आहे. आपणास आपल्या आध्यात्मिक जीवनात नाविन्य फुलविण्यासाठी देवाची कृपा मिळावी म्हणून आपण ह्या पवित्र मिस्साबलीदानात विशेष प्रार्थना करूया.

सम्यक विवरण:
पहिले वाचन: यिर्मया ३१:३१-३४.

यिर्मया भविष्यवादी बाबिलोनच्या ह्द्द्पारीतील लोकांचे सांत्वन करतो. देव त्यांच्यावर खूप प्रेम करतो आणि त्यांच्या तारणासाठी ‘मसिहाचे’ (इस्रायलचा तारणारा राजा) युग येत आहे अशी भविष्यवाणी करतो. देव आपल्या निवडलेल्या लोकांशी नवा करार करणार आहे, हा नवा करार जुन्या करारासारखा नसणार तर ख्रिस्ताच्या बलिदानाने हा नवा करार प्रस्थापित होईल. करार मोडने’ हे शब्द आपणास स्पष्ट करतात की, या अगोदरही अनेक करार केलेले होते. त्यातील पहिला करार नोहाबरोबर केलेला होता (उत्पत्ती ९:१-१७), दुसरा करार अब्राहामाबरोबर केलेला होता (उत्पत्ती १५:१-२१), तर तिसरा करार मोशे आणि इजिप्तच्या गुलामगीरीतून बाहेर पडलेल्या लोकांबरोबर सिनाई पर्वतावर केलेला होता (निर्गम ३१:१८-३२:१६). पूर्वी झालेल्या सर्व करारांपेक्षा हा नवा करार एकदमच वेगळा असणार. हा करार मानवाच्या हृदयातच कोरला जाणार. देवाने हा करार मानवाच्या मनावर कोरला असता परंतु मन हे चंचल असल्यामुळे आणि त्याची स्मरणशक्ती कमी असल्यामुळे देव हा करार त्यांच्या मनावर नव्हे तर हृदयावर कोरणार आहे. हा करार प्रेमाचा किंवा प्रीतीचा आणि क्षमेचा करार आहे. 

दुसरे वाचन: इब्री लोकांस पत्र ५:७-९.

अ) त्याने आपल्या देहावस्थेच्या दिवसांत, मोठा आक्रोश करीत व अश्रू गाळीत प्रार्थना विनवणी केली‘आपल्या देहावस्थेच्या दिवसांत’ हे शब्द आपणास येशू ख्रिस्ताच्या पृथ्वीवरील देहावस्थेच्या दिवसांची आठवण करून देते. ‘मोठा आक्रोश करत’ गेथशेमान बागेत घडणा-या वेदना आणि छळ ह्यांच्या विचाराने ख्रिस्ताचे मन भांबावून गेले म्हणून ख्रिस्त ‘मोठा आक्रोश करीत व अश्रू गाळीत प्रार्थना व विनवणी करीत होता’. ख्रिस्त आपल्या पित्याजवळ प्रार्थना करतो, ‘जो त्याला मृत्यूतून वाचवण्यास समर्थ होता’. ही प्रार्थना, योहानाच्या शुभवर्तमानातून (योहान १२:२७-३२; १७:५; प्रेषितांची कृत्ये २:२५-३१) आणि आजच्या वाचनाच्या संदर्भातून (ऐकण्यात आली) जशी स्पष्ट केली आहे, ह्यावरून आपणास कळते की, ही प्रार्थना/ विनवणी निष्ठूर मरणापासून सुटका व्हावी म्हणून नव्हे, तर दीर्घकाळ टिकणा-या मृत्युच्या तावडीतून आपली सुटका व्हावी म्हणून करितो.
आ) तो सर्वांचा युगानुयुगीच्या तारणकर्ता झाला: ‘ख्रिस्त देवाचा पुत्र असूनही त्याने लोकांच्या पापांसाठी दु:ख भोगले व त्या दु:खसहनात ख्रिस्त आज्ञाधारकपणा शिकला’(इब्री५:८). ख्रिस्त, आपल्या मानवी स्वभावात, आपल्या पित्याच्या योजनेत आज्ञाधारक राहिला. ख्रिस्त आपल्या पित्याशी त्याच्या दु:खसहनात आज्ञाधारक राहिल्यामुळे पित्याने त्याला परिपूर्ण केले आणि ख्रिस्ताला गौरवून पित्याने ख्रिस्ताला संपूर्ण जगाचा/ युगाचा युगानुयुगीच्या तारणकर्ता आहे असे संबोधलेले आहे.

शुभवर्तमान: योहान १२:२०-३३. 

     योहान सुवार्तिक येशूची येरुसलेमेत येण्याची शेवटची वेळ होती ह्याचे वर्णन करतो. येरुसलेमेत येशू ख्रिस्ताचा हा जयोत्सव प्रवेश होता. मेदितेरीयन प्रदेशातून येरुसलेमला वल्हांडण सण साजरा करण्यासाठी आलेल्या पुष्कळ स्थानिक लोकांना व इतर यात्रेकरूंना ख्रिस्त भेटला होता. त्यांनी ख्रिस्त हा ‘मसिहा’-इस्त्रायलचा राजा आहे अशा त्याचा आदरसत्कार करत होते. त्यांनी अगोदर जसे ख्रिस्ताला राजा करण्याकरिता घोषणा केल्या होत्या (योहान ६:१५) ह्या घोषणा ते इथे करत नाहीत. ख्रिस्ताने मृत लाजरासाला कबरेतून उठविले होते ह्या बातमीने स्थानिक रहिवाशी आणि परदेशीय यात्रेकरू प्रभावित झाले होते. ते सर्व ख्रिस्ताला मृत्यूवर मात करणारा म्हणून संबोधतात.
काही हेल्लेणी: हे ग्रीक भाषा बोलणारे यहुदी नव्हते तर हेल्लेणी जे यहुदीयांच्या ख-या देवाविषयी जाणून होते. ख्रिस्ताने लाजरसाला मृत्यूतून उठविले हे ते जाणून होते. ख्रिस्ताविषयी माहिती करण्यासाठी आणि त्याला पाहण्यासाठी ते उत्सुक होते. हेल्लेणी यात्रेकरूंनी येशूला पाहण्याची केलेली विनंती हे स्पष्ट करते की, ‘त्यांना खुद ख्रिस्ताकडूनच त्याच्याविषयी पुष्कळ काही माहित करून घ्यायचे होते. हेल्लेणी यात्रेकरू ख्रिस्ताशी संवाद करतात की नाही हे सुवार्तिक आपणास सांगत नाही. ग्रीक भाषेत ‘to see’ ‘पाहणे’ म्हणजे ‘to believe’ ‘विश्वास ठेवणे’ होय. ह्यावरून आपणास स्पष्ट होते की त्या हेल्लेणी यात्रेकरूंचा येशू ख्रिस्तावर विश्वास होता आणि तो विश्वास निश्चित / दृढ करण्यासाठी ते ख्रिस्ताला भेटण्यास आलेले होते.
माझी वेळ जवळ आली आहे: ह्यावरून आपल्या लक्ष्यात येते की, ‘ख्रिस्त आपल्या पित्याच्या तारणाची योजना पूर्णत्वास नेण्यास येरुसलेमेत आला होता. आपल्या शत्रूंच्या हातून आपण जिवे मारले जाऊ हे ख्रिस्तास ठाऊक होते आणि येरुसलेमेतच हे सर्व काही पूर्ण होणार होते हे तो जाणून होता म्हणून वरील शब्द उच्चारुन ख्रिस्त आपली वेळ जवळ आल्याचे सिद्ध करतो.
गव्हाचा दाणा: गव्हाचा दाणा हे रूपक आपणास स्पष्ट करते की, ‘येशूचा सभोवताली जमलेल्या जमावात शेती व्यवसाय करणारे लोक सुद्धा होते. ह्या जमाव्यात विविध प्रकारचे व्यवसाय करणारे लोकही असू शकतात किंवा संपूर्ण जमाव शेती व्यवसाय करणारा असावा. शेतका-यांना गव्हाच्या दाण्याचे महत्त्व काय हे माहित आहे आणि त्याचे पीक किती प्रमाणात मिळते हे त्यांना ठाऊक आहे. ख्रिस्ताने आपल्या संदेशात वापरलेल्या गव्हाच्या दाण्याचे रूपक आपणास स्पष्ट करते की, ‘ख्रिस्त त्यांच्या दैनंदिन जीवनातील घडामोडींची उदाहरणे देऊन आपला संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवत असतो’.
     ख्रिस्त आपली तुलना इथे एका गव्हाच्या दाण्याशी करतो. जशी गव्हाच्या दाण्याची जमिनीत पेरणी केली जाते त्याचप्रमाणे येशू ख्रिस्ताचा मृत देह जमिनीत(थडग्यात) ठेवला जाईल. जमिनीत पेरलेला गव्हाचा दाणा जसा मृत्यू पावतो तसाच ख्रिस्त देखील मृत्यू पावेल आणि जसा मृत्यू पावलेल्या एका गव्हाच्या दाण्याला अंकुर फुटून त्याचे भरपूर प्रमाणात पीक येते तसाच ख्रिस्त मृत्यूतून उठून ख्रिस्तसभा प्रस्थापित करील. जमिनीत पडलेला गव्हाचा दाणा स्वतः आपले नवीन जीवत्वाचे कार्य करत नाही किंवा जमिनीत पडलेल्या गव्हाच्या दाण्याला स्वतःहून अंकुर फुटत नाही तर तो दुस-यावर अवलंबून असतो. जमिनीत पुरलेल्या ख्रिस्ताचे सुद्धा तेच आहे. ख्रिस्ताला पुनरुत्थित करणारा आणि गव्हाच्या दाण्याला जीवनत्व देणारा एकच देव आहे.
   
बोधकथा:

१. एका खेडेगावात एक गरीब कुटुंब राहत होते. त्या कुटुंबात आई आणि तिच्या दोन लहान मुली राहत होत्या. ऐके दिवशी एका अपरिचित व्यक्तीने त्यांना भेट दिली आणि त्या कुटुंबाला ४ किलो तांदूळ भेट म्हणून दिले. त्या घरातील आईने पटकन त्या तांदळाचे दोन वाटे केले, त्यातला एक स्वतःसाठी ठेवला व दुसरा आपल्या शेजारी असलेल्या कुटुंबात नेऊन दिला. आई घरी आल्यावर तिला तिच्या मुलींने विचारले, ‘आई आपल्याला दिलेले तांदूळ तू त्यांना का दिले?’ तेव्हा ती म्हणाली, ‘दोन दिवसापासून आपण जसे उपाशीपोटी आहोत तसेच ते देखील उपाशी आहेत’. आई पुढे म्हणाली, ‘ज्याप्रमाणे आपल्यावर कोणी दया दाखवली व आपल्या अडचणीच्यावेळी आपल्याला मदत केली, त्याप्रमाणे आपणदेखील आपल्याजवळ जे आहे त्यातून इतरांना मदत केली पाहिजे’.

२. एक ब्रदर त्याच्या धर्मगुरूपदाचे शिक्षण पूर्ण करत होता. हे शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्याला लागणारा सर्व खर्च एक कुटुंब करत होते. ह्या ब्रदराने आपले धर्मगुरूपदाचे शिक्षण पूर्ण करून धर्मगुरूपद स्वीकारले. त्याला माहित होते की त्याच्या शिक्षणासाठी कोणीतरी मदत केली होती. काही दिवसानंतर हा धर्मगुरू त्या कुटुंबाचा पत्ता मिळवतो आणि लवकरच त्यांस भेटणार असल्याचे कळवतो. ते कुटुंब त्याच्या येण्याचे आणि जाण्याचे तिकीट बुक करून ठेवतात.
     हा धर्मगुरू आपला प्रवास करून त्या ठिकाणी पोहोचतो. व ते घर पाहून त्याला आश्चर्याचा धक्का बसतो, कारण एवढी वर्ष त्याला वाटत होते की जे कुटुंब माझ्या शिक्षणासाठी आर्थिक मदत करतात ते नक्कीच श्रीमंत घराण्यातले असणार परंतु येथेतर त्यांचे छोटेसे घर होते. व घराबाजूला काही डुक्कर पाळून जे काही थोडे कमावत होते त्यातून त्याला शिक्षणाला मदत करत होते. त्याच्यासाठी केलेला हा निस्वार्थी त्याग पाहून त्याच्या डोळ्यात पाणी आले.

मनन चिंतन:

     आपण सर्वजण आपल्या स्वत:वर खूप प्रेम करतो. आपणास जेवढे अधिक जीवन जगता येईल, तेवढे जगण्याचा आपण प्रयत्न करत असतो. आपले जीवन सार्थक व यशस्वी आपण पुरेसा प्रयत्न करत असतो. परंतु त्याचबरोबर दु:ख, आजारपण आणि मरण ह्यांसारख्या कटू अनुभवांनी आपले जीवन ग्रासले जाते. अडचणी, समस्या आणि यातना आपणाला जीवन नकोसे करून सोडतात. तरीही कोणत्याही परिस्थितीत किंवा कितीही केले तरी आपण आपल्या जीवाशी चिकटून असतो. आधुनिक विज्ञान आपणास आरामदायी आणि सुखकारक जीवनाचे मार्ग दाखवतात आणि माणूस त्या मोह्दायक मार्गाला बळी पडतो. परंतु शेवटी होते काय? मानव हताश होउन जातो. मानवाच्या मर्यादा, रिकाम-टेकडेपण अतिसंतुष्ट कधीच होऊ देत नाही. जीवनाला हताश होऊन पुन्हा आपण आपले जीवन संतोषजनक करण्याची साधने तो शोधत असतो.
     आजच्या शुभवर्तमानात ख्रिस्त आपणास सांगतो, ‘जो आपल्या जीवावर प्रीती करितो तो त्याला मुकेल आणि जो ह्या जगात आपल्या जीवाचा द्वेष करितो तो त्याचे सार्वकालिक जीवनासाठी रक्षण करील’. अर्थात ख्रिस्त आपणास त्यागमय जीवन जगण्यास सांगत आहे. त्याग करावा! पण कशाचा? ख्रिस्ताने त्याग केला तो त्याच्या इच्छेचा; “मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे, तर ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे म्हणून स्वर्गातून उतरलो आहे”(योहान ६:३८). ख्रिस्ताने पित्याच्या इच्छेस प्राधान्य दिले. इतकेच नव्हे तर ख्रिस्ताने पित्याच्या इच्छेसाठी आपल्या प्राणाची आहुती दिली; “अब्बा, (बापा), तुला सर्व काही शक्य आहे; हा प्याला माझ्यापासून दूर कर; परंतु माझ्या इच्छेप्रमाणे नको, तर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो”(मार्क १४:३६), म्हणूनच देवाने ख्रिस्तास उंच केले, त्यास गौरविले.
     शौलाला जे काही योग्य वाटले आणि त्याला जे काही करण्याची इच्छा झाली त्याने ते केले परंतु शेवटी काय झाले! ख्रिस्ताने त्याला शौलाचे पौल केले. शौल सर्वकाही स्वत:च्या इच्छेप्रमाणे करत होता, परंतु त्याचा कायापालटझाल्यानंतर ख्रिस्ताने शौलाला आपल्या इच्छेप्रमाणे करण्यास भाग पाडले. आणि तो आज ख्रिस्तसभेचा एक महत्वाचा संत म्हणून गणला जातो. तेराव्या शतकातील असिसिकर संत फ्रान्सिस, मौजमजा करत होता, आपल्या बापाच्या पैशाची उधळपट्टी करत होता. त्याला आपल्या जीवनात सरदार व्हायची खूप इच्छा होती आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी फ्रान्सिस आपल्या इच्छेप्रमाणे जगत होता. त्याला जे काही योग्य वाटत होते तो ते करत होता. परंतु ख्रिस्ताने संत फ्रान्सिसला जगाचा सरदार न बनवता आपला सरदार बनवला. मदर तेरेसाने आपल्या स्व:इच्छेला प्राधान्य न देता तिने ख्रिस्ताच्या शब्दांना, ‘मनुष्याचा पुत्र सेवा करून घ्यावयास आला नाही तर सेवा करावयास आला आहे’(मार्क १०:४५) प्राधान्य दिले. म्हणूनच ख्रिस्त म्हणतो, “जो आपणाला नमवितो तो उंच केला जाईल”(लूक १४:११).
     आज ख्रिस्त आपणास आपल्या स्व:इच्छेला, गर्वाला आणि खोटेपणाला बळी देण्यास सांगत आहे. जे कोणी आपल्या स्व:इच्छेला प्राधान्य देतात ते जणू जमिनीत पडून न मेलेल्या गव्हाच्या दाण्यासारखे आहे आणि जे खिस्ताच्या इच्छेला प्राधान्य देतात ते जणू जमिनीत पडून मेलेल्या गव्हाच्या दाण्यासारखा आहे, जे मेल्यानंतरच अधिकाधिक फळ देऊ शकते. जे ख्रिस्ताच्या वचनांना किंवा शब्दांना प्राधान्य देतात ते मुबलक पीक उत्पन्न करत असतात. जे कोणी आपल्या शेजा-यांची सेवा करतात त्यांच्यासाठी स्वत:च्या इच्छेचात्याग करतात तेच खरे ख्रिस्ताचे अनुयायी होय. अशांना ख्रिस्त म्हणतो, “जेथे मी आहे तेथे माझा सेवकही असेल; जर कोणी माझी सेवा करतो तर पिता त्याचा मान करील”(योहान १२:२६ब).
              
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसादः हे प्रभो, तुझ्याकडे वळण्यास आम्हाला साहाय्य कर.

१.     आपले परमाचार्य पोप फ्रान्सिस, कार्डिनल्स, बिशप्स, धर्मगुरू, धर्मबंधू-भगिनी व सर्व प्रापंचिक  त्यांच्या कार्याद्वारे आणि शुभसंदेशाने येशू ख्रिस्ताची खरी ओळख संपूर्ण जगाला मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
२.     जे लोक मिशन भागात काम करीत आहेत त्यांची आज आपण विशेष आठवण करूया. त्यांना देवाची विशेष कृपा मिळावी व त्यांची श्रध्दा बळकट होऊन त्यांनी इतरांचीही श्रध्दा बळकट करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
३.     ज्या विश्वासू लोकांनी कॅथोलिक संस्कार स्वीकारून देवाच्या कराराशी अतुट नाते जोडले आहे, अशांना त्यांच्या देवावरील प्रेमात अढळ राहण्यासाठी देवाची कृपा आणि सामर्थ्य मिळावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
४.     जसे ख्रिस्ताने आपल्या स्व:इच्छेचा त्याग करून पित्याचा इच्छेला प्राधान्य दिले तसे आपणही आपल्या स्व:इच्छेला मरावे आणि ख्रिस्तात नवजीवीत व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

५.     आपण आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक गरजांसाठी प्रार्थना करूया. 


No comments:

Post a Comment