आज्ञा गुरुवार
दिनांक: ०२/०४/२०१५.
पहिले वाचन: निर्गम १२:१-८, ११-१४
दुसरे वाचन: १ करिंथ ११:२३-२६
शुभवर्तमान: योहान १३:१-१५
“मी सेवा करून घेण्यासाठी
नव्हे, तर सेवा करावयास आलो आहे.’
प्रस्तावना :
आज पवित्र देऊळमाता आज्ञा गुरुवार
साजरा करीत आहे. दोन हजार वर्षापूर्वी अश्याच एका संध्याकाळी प्रभू येशूने आपल्या शिष्यांसोबत
भोजन घेतले. प्रभू येशूने भोजनप्रसंगी द्राक्षरस व भाकर घेऊन पवित्र मिस्साबलीची
स्थापना केली. भाकर मोडून त्याने दुसऱ्या दिवशी कालवरी डोंगरावर घडणाऱ्या चित्त
थरारक नाट्याची कल्पना आपल्या शिष्यांना दिली.
क्रुसावर घळघळ वाहणाऱ्या रक्ताचे थेंब त्याने
द्राक्षरस रूपाने प्रेषितांपुढे सादर केले. प्रत्येकवेळी जेव्हा आपण मिस्साबली
अर्पण करितो, त्यावेळी कालवरीच्या घटनेचे आणि शेवटच्या भोजनाचे स्मरण करत असतो.
ह्या पवित्र मिस्साबलीत भाग घेत असतांना आज आपण
सर्व धर्मगुरुंसाठी विशेष प्रार्थना करूया ज्यांनी येशूचे कार्य आजही अविरत चालू
ठेवले आहे, त्यांना ते कार्य अधिक जोमाने करण्यासाठी परमेश्वराचा आशीर्वाद मिळावा
म्हणून ह्या मिस्साबलीत प्रार्थना करूया.
पहिले वाचन: निर्गम १२:१-८, ११-१४
आजच्या पहिल्या वाचनात आपण पाहतो की, मोशेने देवाच्या
मदतीने चमत्कार घडवून आणला. परमेश्वराने मोशेला इस्रायल लोकांना फारो राजाच्या
गुलामगिरीतून मुक्त करण्यास पाठविले होते, परंतु फारोने ते मान्य केले नाही, म्हणून
परमेश्वराने मोशेला प्रत्येक इस्रायल लोकांच्या, घराच्या दारावर कोंकराचे रक्त शिंपडण्याची
युक्ती दिली. त्यामुळे जेव्हा फारोचे सैन्य प्रथम जन्मलेल्यांची कत्तल करण्यासाठी
आले तेव्हा ते इस्रायल लोकांच्या घरात न शिरता, मिसरी लोकांच्या घरात जाऊन
मिसऱ्यांच्या घरातील प्रथम जन्मलेल्यांना त्यांनी मारले. अशाप्रकारे इस्रायल
लोकांचा बचाव झाला. ह्या दिवसाची आठवण ठेवण्यासाठी देवाने इस्रायल लोकांना
वल्हांडण सण साजरा करण्यास सांगितले. ह्या सणाच्या दिवशी प्रत्येक इस्रायल लोकांच्या
घरात प्रत्येक कुटुंब कोंकरू मारून ते विस्तवावर भाजून बेखमीर भाकर व कडवट
भाजीसोबत खातात.
दुसरे वाचन: १ करिंथ ११:२३-२६
आजच्या दुसऱ्या वाचनात आपण पाहतो की, पूर्वीपासून ख्रिस्ती
लोकांनी पवित्र मिस्साबलीदानाला केंद्रबिंदू बनवले होते. आपण प्रेषितांच्या कृत्ये
ह्या पुस्तकात वाचतो की, पुष्कळ ख्रिस्ती लोक यहुद्यांच्या गुलामगिरीला न जुमानता
पवित्र भोजन करण्यासाठी एकत्र येत असत. ते एका घरामध्ये एकत्र जमून प्रभू-भोजनाचा
आनंद घेत असत. हेच करिंथ गावातील ख्रिस्ती मंडळी नित्यनियमाने करीत असत. ते एखादया
घरात एकत्र जमत कारण त्यावेळी ख्रिस्त-मंदिरे नव्हती. भोजनाच्यावेळी त्यांच्यातील
प्रमुख आपल्या हातात भाकर व द्राक्षरस घेऊन ख्रिस्ताने म्हटलेले शब्द, “हे माझे
शरीर व हे माझे रक्त” उच्चारत आणि उपस्थित जणांना ते ख्रिस्तासमवेत घेतलेल्या
शेवटच्या भोजनाची आठवण करून देत असत.
शुभवर्तमान: योहान १३:१-१५
‘सेवाभाव’ व ‘पवित्र मिस्साबलीदानाची स्थापना’ हा आजच्या
शुभवर्तमानाचा मुख्य गाभा आहे. ख्रिस्त आपल्या शिष्यांना नवीन आज्ञा देऊन म्हणत
आहे, “तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी; जशी मी तुम्हांवर प्रीती केली तशी तुम्हीही
एकमेकांवर प्रीती करावी”(योहान १३:३४). आपल्या शिष्यांवरील असलेली प्रीती
ख्रिस्ताने त्यांचे पाय धुवून दर्शविली. आपल्या प्रमुख अतिथींचे पाय धुवून स्वागत
करणे ही यहुदी समाजाची परंपरा होती. हे काम घराचा मालक नव्हे तर फक्त चाकर व गुलाम
करत असत. त्यामुळेच पेत्राने ख्रिस्ताला आपले पाय धुण्यास नकार दिला. ख्रिस्त
राजांचा राजा असूनही त्याने एका चाकराचे काम का करावे? ते केवळ आपल्या शिष्यांना
सेवेचे व लीनतेचे उदाहरण घालून देण्यासाठी. योहानच्या मतानुसार त्याच्या ख्रिस्ती
मंडळीनी ह्यावरून धडा शिकावा की, प्रत्येक मिस्साबलीदान अर्पण करताना, त्यांना
ख्रिस्ताने दिलेल्या आज्ञेची आठवण व्हावी व ती आज्ञा आपल्या जीवनात अंगीकारावी.
ह्या उताऱ्यात शुभवर्तमानकार योहानने, ख्रिस्ताने शिष्यांचे पाय धुवून एक नवीन
महामंत्र जगाला दिला आहे असे म्हणतो. इतर कोणताही शुभवर्तमानकार आपल्या शुभवर्तमानात
ह्या उताऱ्याचा उल्लेख करीत नाही.
बोधकथा:
एकदा एका
देवळामध्ये सणाची मोठी मिस्सा चालू होती. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने सणाच्या
मिस्सामध्ये तन्मयतेने सहभागी झाला होता. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर सणाचा आनंद आणि
मिस्सामधील भक्तीभाव ओसंडून वाहत होता. थाँमस आणि पिटर हे संपूर्ण भान विसरून
मिस्सा ऐकत होते. एकमेकांना शांती देण्याची
वेळ आली तेव्हा थाँमस आणि पिटर एकमेकांकडे वळले आणि दोघे एकमेकाकंकडे पाहून
आश्चर्याने स्तब्ध झाले. वर्षानुवर्षे एकमेकांचे कट्टर शत्रू असलेले दोघेही चुकून
देवळात आज एकमेकांच्या शेजारी बसले होते. दोघांना गेली कित्येक वर्षे एकत्र यावेसे
वाटत होते. समेटाची मंद भावना दोघांच्याही हृदयात तेवत होती. मात्र पुढाकार कोणी
घ्यावा हे सुचत नव्हते. आता
आयतीच संधी चालून आली होती. काही कळायच्या आत थाँमसने पिटरचा हात हातात घेतला.
दोघांच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्या अश्रू पुरात त्यांचे शत्रुत्व वाहून गेले.
त्या दिवशी दोघांच्या जीवनातील मिस्साबली खऱ्या अर्थाने साजरा झाला होता.
आपणांपैकी पुष्कळांवर कधी ना कधी
इस्पितळामध्ये जाण्याचा प्रसंग आला असेलच इस्पितळ म्हणजेच इंजेक्शन, शत्रक्रिया,
दु:ख, वेदना, किंकाळ्या, रडणे, डॉक्टर, नर्सेस ह्यांची धावपळ, स्ट्रेचरवर
रुग्णांना घेऊन जाणारा कर्मचारी वर्ग, औषधांचा वास आणि रुग्णाजवळ बसलेले चिंताग्रस्त
नातेवाईक असे चित्र आपल्याला आपण पाहिलेच
असेल. ही झाली इस्पितळाची एक बाजू परंतु ह्या बाह्यस्वरूपापेक्षा इस्पितळाचं जीवनदायी
असे रूप असते. वेदनांनी विव्हळत असलेला मनुष्य इथून थोड्याच दिवसांनी अगदी ताजा
टवटवीत होऊन हसत-खेळत घरी जातांना आपल्याला दिसतो. बालके जीवनाचा पहिला श्वास
घेतात तो ह्या इस्पितळातच घेतात. (शाळा हे जसे मानवतेचे विद्यामंदिर, तसेच
इस्पितळ हे मानवी जीवनाचे आरोग्यमंदिर समजले जाते). मृत्युच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्यांना
जीवन जगण्याची नवी उमेद देते, तेच खरे इस्पितळ.
इस्पितळाची ही बाजू लक्षात न घेतल्यामुळेच कित्येकदा इस्पितळाचे
नाव काढताच आपल्या अंगावर एकदम काटा उभारतो. पवित्र मिस्साबलीतही अनेकदा अशीच फसगत
होते. आपल्याला कोणती मिस्सा आवडते? असे कोणी विचारले, तर आपण सहज बोलून जातो;
ज्या मिस्सामध्ये चांगले खणखणीत प्रवचन असते, सुमधुर गायन असते, काहीतरी नाविन्य
असते ती मिस्सा. हे झाले मिस्साचे बाह्य स्वरूप! मिस्साचा खरा अर्थ, गाभा, आत्मा
कळला नसल्यामुळे बहुधा आपण इतरांना भिऊन, घरून पाठवलं म्हणून किंवा एक परंपरा
म्हणून आपण ख्रिस्त-मंदिरात येत असतो. आपण फक्त ठराविक मिस्सालाच येतो आणि ठराविक
जागेवरच बसतो. पुष्कळ वेळा तीच मिस्सा एकसारखी ऐकूनही आपल्याला खऱ्या मिस्साचा
अर्थ समजलेला नसतो.
मिस्सामध्ये आपण ख्रिस्ताला
स्वीकारत असतो. तोच ख्रिस्त आपल्या अंतकरणात ख्रिस्त-प्रसादाद्वारे किंवा कम्युनियनद्वारे
वास करतो. कम्युनियन ह्या शब्दांत ‘कम’ आणि ‘युनियन’ अशा दोन शब्दांचा समावेश आहे.
त्याचा अर्थ ‘एकत्र येणे’ असा आहे; म्हणजेच हे ‘कम्युनियन’ मिस्साबलीत ख्रिस्ती ऐक्याचे
प्रतिक आहे. जर देवळाबाहेर आपण आपापसात भांडत असू तर ह्या ‘एकत्र येण्याला’ अजिबात
अर्थ राहणार नाही. (मत्तय:५:२३) मध्ये स्वत: येशू म्हणतो, “तू आपले दान अर्पिण्यास
वेदीजवळ आणले असता तुझ्या मनात आपल्या भावाविरुद्ध काही वैर-भाव आहे असे तेथे तुला
स्मरण झाले, तर तेथेच वेदिपुढे आपले दान ठेव आणि जा, प्रथम आपल्या भावाबरोबर समेट
कर मगच आपले दान अर्पण कर”. पवित्र मिस्साबलीदान हे ऐक्याचे चिन्ह आहे, म्हणून आपण
सतत ख्रिस्तामध्ये एक असावे म्हणून देऊळमाता आज आपल्याला आवाहन करीत आहे.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
१. ज्या प्रमाणे ख्रिस्ताने आपल्या शिष्यांचे पाय धुवून एक
आदर्श सेवेचा महामंत्र दिला, त्याचप्रमाणे पोप सर्व महागुरू व धर्मगुरू
ख्रिस्तसभेची सेवा करुन आपल्या समोर सेवामय जीवन जगुन एक आदर्श ठेवत आहेत.
ख्रिस्ताप्रमाणे त्यांनी ख्रिस्तसभेची सेवा अखंडित करत असता आपणास त्यांच्यात
ख्रिस्त दिसावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. सर्व जगातील ख्रिस्ती व विविध पंथातील लोकांनी जरी आपण
वेगवेगळ्या पंथाचे असलो तरी ख्रिस्ताने दिलेला सेवेचा मूलमंत्र अंगीकारून तो
आपल्या दैनंदिन जीवनात आत्मसात करावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. आपल्या सर्व भारत देशवासीयांनी ख्रिस्ताप्रमाणे बंधू-प्रेमाची
भावना जोपासून आपापसातील असलेले वाद, गैरसमज विसरून शांती व सलोख्याने एकत्रीत जीवन
जगावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. आपल्या मुलांना ख्रिस्ताने केलेल्या सेवेची ओळख व्हावी व
त्यांनीही प्रभूसेवेसाठी देवाच्या हाकेला प्रतिसाद देऊन त्याच्या लोकांची सेवा करण्यासाठी
स्वखुशीने पुढे यावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. थोडा वेळ शांत राहून आता आपण आपल्या सामाजिक, कौटुंबिक व
वैयक्तिक गरजांसाठी प्रार्थना करूया.
No comments:
Post a Comment