Monday, 30 March 2015

Reflection for the Homily of  'Easter Vigil' (04/04/15)
By Ashley D'monty.





पुनरुत्थान रविवार



दिनांक: ०४/०४/२०१५
पहिले वाचन: उत्पत्ती १:१-२,२
दुसरे वाचन: उत्पत्ती २२:१-१८
तिसरे वाचन: निर्गम १४:१५-१५:१अ
चौथे वाचन: यशया ५४:५-१४
पाचवे वाचन: यशया ५५:१-११
सहावे वाचन: बारुख ३:९-१५.३२-४:४
सातवे वाचन: यहेज्केल ३६:१६-२८
आठवे वाचन: रोमकरांस पत्र ६:३-११
शुभवर्तमान: मार्क १६:१-७ 




आजच्या ह्या विधीचे चार मुख्य भाग आहेत:   

पहिला भाग: प्रकाश विधी- पुनरुत्थित येशू जगाचा प्रकाश आहे हे आपण घोषीत करतो.
दुसरा भाग: प्रभुशब्दविधी- येथे जुन्या व नवीन करारातील निवडक वाचनांमधून देवाने जगाच्या सुरूवातीपासून मानवावर केलेल्या प्रेमाच्या वर्षावाची आपणाला आठवण करून देतात.
तिसरा भाग: पाण्याला आशीर्वाद- येथे बाप्तिस्म्यासाठी लागणा-या पाण्याला आशीर्वाद दिला जातो. पुनरुत्थानाचे पहिले गोड फळ म्हणजे बाप्तिस्मा. ख्रिस्तामध्ये आपला बाप्तिस्मा होणे हा देवाचा अनन्यसाधारण आशीर्वाद आहे.
चौथा भाग: ख्रिस्तप्रसादविधी- येथे आपण ख्रिस्तशरीर स्विकारविधी साजरा करतो. स्वर्गीय भोजनाची चव ह्या ठिकाणी आपण घेत असतो.   
       
प्रास्ताविक:

प्रिय ख्रिस्ती भाविकांनो या पवित्र रात्री आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने मृत्यूवर विजय मिळविला. या शुभप्रसंगी ख्रिस्तसभा सा-या विश्वातील तिच्या मुलांना जागरण व प्रार्थना करण्यासाठी एकत्र बोलावित आहे. हा प्रभूच्या वल्हांडणाचा दिवस आहे. प्रभूचे शब्द ऐकून व त्याची दिव्य रहस्ये साजरे करून त्याच्या मृत्यूचे व पुनरुत्थानाचे आपण पुण्यस्मरण केले, तर त्याच्या मरणावरील विजयात आपणाला खात्रीपूर्वक सहभाग मिळेल व त्याच्याबरोबर शाश्वत जीवन जगता येईल. 
 
सम्यक विवरण:

     आजचा विधी हा ‘पास्काचा जागरण विधी’ म्हणून ओळखला जातो. ख्रिस्तीजणांनी हे नाव व दिवस यहुद्यांच्या पास्काच्या सणावरून घेतलेले आहे. इजिप्त देशात देवाचा दूत यहुद्यांची घरे ओलांडून गेला व इजिप्तवासियांच्या प्रथम जन्मलेल्या बालकांचा वध केला. हे सर्व यहुद्यांची फारोच्या गुलामगिरीतून सुटका व्हावी म्हणून करण्यात आले. ख्रिस्तीजणांनी हा सण प्रभूच्या ‘पुनरुत्थानाचा सण’ म्हणून घोषित केला. प्रभूने आपल्या मरण व पुनरुत्थानाने पापांवर विजय मिळविला. मरणातून सार्वकालिक जीवनाकडे प्रभूने केलेले हे ओलांडण यहुद्यांनी ज्याप्रमाणे गुलामगिरीतून सुटका झाल्यानंतर परमेश्वराठायी एका नव्या जीवनाला सुरुवात केली; त्याचप्रमाणे प्रभूच्या पुनरुत्थित जीवनाद्वारे आपणास एका नव्या जीवनाला प्रारंभ करण्यास मुभा मिळते. म्हणूनच आजच्या दिवशी स्नानसंस्कार दिला जातो व स्नानसंस्काराच्या वचनांचे नुतनीकरण केले जाते. म्हणूनच प्रभूच्या जीवन, मरण व पुनरुत्थानाला ‘paschal mystery’ ‘पास्काचे रहस्य’ म्हणून संबोधित केले जाते व ख्रिस्ती श्रद्धेत महत्वाचे स्थान दिले जाते.
अ) जुन्या करारातील सात वाचने आपणास परमेश्वराच्या दैवी नियोजनाची पुर्तता मानवी जीवनात कशी होते याची प्रचीती देते. देव शून्यातून विश्वाची निर्मिती करतो, आपल्याच प्रतिरुपाप्रमाणे तो मानवास निर्माण करतो व त्यास सा-या निर्मितजणांचा अधिपिता करतो. मानवाचे वर्चस्व त्यांस देवापासून दूर घेऊन जाते व तो पापांच्या खाईत पडतो. परंतु देव मानवाच्या तारणासाठी आपल्या निवडलेल्या लोकांद्वारे, संदेष्ट्यांद्वारे मानवास आपल्या जवळ आणतो. पाप व मुक्तता याची पुन्हा-पुन्हा होणारी पुनरावृत्ती याचे दर्शन आपणास ह्या वाचनात घडते.
ब) संत पौल रोमकरांस लिहिलेल्या पत्रात ख्रिस्ती बांधवांना प्रभूमध्ये जीवन जगण्यास प्रवृत्त करत आहे. पौल म्हणतो, “स्नानसंस्काराद्वारे, प्रत्येक ख्रिस्ती हा ख्रिस्तामध्ये मरतो व ख्रिस्तामध्ये पुनरुत्थित होतो”. त्याचे सर्व जीवन हे ख्रिस्ताद्वारे सुरु होते व ख्रिस्तामध्येच संपते. संत पौल हा खिस्ती लोकांविषयी फार चिंतित होता, कारण त्यांनी आपले ख्रिस्ती जीवन चांगल्याप्रकारे सुरू केले होते, परंतु अनेक वेळा ते कुमार्गाला जात होते. त्यामुळेच पौल त्यांस ख्रिस्ती जीवनाचा मार्ग कसा क्रमण करावा ह्याचे धडे देतो. तो म्हणतो, स्नानसंस्काराद्वारे मानवाने आपला पूर्वीचा कुमार्ग सोडावा व तो अशाप्रकारे सोडावा की त्याने जणू म्हणावे मी पापासाठी मेलो आहे. मृत व्यक्ती चोरी करत नाही, व्यभिचार करत नाही, खुण करत नाही म्हणजेच तो आपल्या पापी जीवनाला मरतो व ख्रिस्तामध्ये नवजिवीत होऊन जगतो. अशाप्रकारे स्नानसंस्काराद्वारे प्रत्येक व्यक्ती देवाचे लेकरु होते. जोपर्यंत ख्रिस्त माझ्यात नाही व मी ख्रिस्तात नाही, तोपर्यंत मी प्रभूच्या सानिध्यात जीवन जगू शकत नाही.
क) मार्कलिखित शुभवर्तमानात आपण प्रभू येशूच्या पुनरुत्थानाविषयी ऐकतो. यहुदी लोक मृत व्यक्तीस काळजीपूर्वक दफन करीत असत. विविध गंधरस लावून ते प्रेतास जपत असत. शब्बाथ दिवस आड आल्याने प्रभू येशूचा मृतदेह घाईत दफन केला गेला होता. त्यामुळे स्त्रियांना यहुदी रीतीप्रमाणे गंधरस लावता आले नव्हते. ह्यासाठीच त्या भल्या पहाटे ही उत्तरक्रिया पूर्ण करण्यासाठी थडग्यापाशी गेल्या होत्या. त्यांनी हे कृत्य येशुठायी असलेल्या प्रेमापोटी व श्रद्धेपायी केले.
     प्रभू येशूच्या पुनरुत्थानाची प्रचिती आपणास खालील मुद्द्यावरून येते:
१. कबरेचा धोंडा बाजूला सारला होता.
२. कबरेत दूताने दिलेला संदेश
३. रिकामी कबर 
४. प्रभूला ज्या वस्त्रात गुंडाळून ठेवले होते ते वस्त्र येशुविरहित तेथे पडलेले होते.
हे सर्व दृश्य पाहून स्त्रिया भयभीत झाल्या होत्या. त्या शिष्यांना काय जाब देणार? म्हणूनच दूत त्यांना म्हणतो, ‘भिऊ नका प्रभू मरणातून उठला आहे.’ स्त्रिया आश्चर्यचकित झाल्या; कारण हे असले अजब कधीच घडले नव्हते व ऐकलेही नव्हते. फक्त मार्कच्या शुभवर्तमानातच दूताचा आदेश आपणास आढळतो: ‘जा, व त्याच्या शिष्यांना व पेत्रास सांगा.’ दूत स्त्रियांस ही शुभवार्ता घोषीत करण्याचे आदेश देतो. शुभवर्तमानाच्या शेवटी आपण ऐकतो की, ह्या स्त्रिया भीतीपोटी हा संदेश कुणालाच सांगत नाहीत.
खरे पाहता, संदेश किंवा शुभवर्तमान प्रसारण करण्याचे कार्य हे देवाचे आहे. जोपर्यंत देव आदेश देत नाही तोपर्यंत त्या संदेशाचा प्रसार कुणीच करू शकत नाही. दूताने पेत्राचे नाव विशेष घेतले कारण जे काही प्रभूने भाकीत केले होते त्याची पूर्तता झाली आहे ह्याची खात्री पेत्राला व्हावी. पेत्र जरी बेईमान ठरला तरी त्याने पश्चातापाद्वारे प्रभूच्या दयेची प्राप्ती केली. त्यामुळे आपल्या पुनरूत्थानाचा संदेश पेत्राला नक्कीच संतोष देईल ही प्रभूला खात्री होती. प्रभू पापी माणसासाठी क्रुसावर मरण पावला व मरणातून उठला. पश्चातापी  लोकांस आपल्याजवळ घेणे प्रभूला नक्कीच संतुष्टकारक ठरेल.  
       
बोधकथा:

१.     एका नदीकाठी एक राक्षस राहत होता. हा राक्षस गावातील लोकांना खूप त्रास देई; कित्येक वेळेस त्यांना ठारही मारीत असे. या त्याच्या दहशतीमुळे गावातील एकही व्यक्ती त्या नदीकाठी जात नसे. तिथे गेलेली एकही व्यक्ती आजवर परतलेली नव्हती. एके दिवशी एक तरुण त्या वाटेने गेला. लोकांच्या विरोधाला न जुमानता तो त्या राक्षसाची भेट घेण्यास गेला. राक्षस व तो समोरासमोर भिडले. राक्षसाने त्याला घाबरविण्याचा प्रयत्न केला परंतु हा तरुण मात्र खंबीर होता. राक्षसाने त्या व्यक्तीला एक प्रश्न विचारला, ‘मला सांग असा कोणता प्राणी आहे की, जो सकाळी चार पायांवर, दुपारी दोन पायांवर, व संध्याकाळी तीन पायांवर चालतो? जर ह्या प्रश्नाचे तू अचूक उत्तर दिलेस, तर मी तुला काहीच करणार नाही उलट मीच तुला शरण येईन. पण तू जर चुकलास तर मी तुला नष्ट करीन’. त्या तरुणाने थोडा विचार केला व तो म्हणाला, हा प्राणी ‘माणूस’ आहे. आयुष्याच्या प्रारंभी म्हणजे सकाळी तो जन्मास येतो तेव्हा तो हातापायांवर रेंगाळत चालतो. आयुष्याच्या दुपारी म्हणजे तरुणावस्थेत तो दोन पायांवर सरळ चालतो व शेवटी आयुष्याच्या संध्याकाळी वृद्धावस्थेत तो काठीच्या आधाराने तीन पायांवर चालतो’. तरुणाच्या त्या उत्तरावर राक्षस प्रसन्न होतो व तरूणाला शरण येतो त्यावर राक्षसाला तेथून निघून जाण्यास व कोणालाही त्रास न देण्यास बजावतो.
ज्याप्रमाणे लोकांच्या मनात असलेली भीती त्या तरुणाने आपल्या कुशल  बुद्धीमत्तेद्वारे दूर केली. त्याचप्रमाणे आपल्याही मनात मरणाची भीती आहे व ही भीती खुद्द प्रभू येशूने आपल्या पुनरुत्थानाद्वारे दूर केली आहे. मानवी मरणाला एक नविन सार्वकालिक जीवनाकडे जाण्याचा एक मार्ग आहे. हा मार्ग प्रभूने आपणास मोकळा केला आहे.  
  
. एके दिवशी एक अन्य धर्मीय व्यक्ती एका ख्रिस्ती माणसाला म्हणाली, शवपेटीवरून आपणास माहित पडते की इतिहासामध्ये एखादी महान व्यक्ती होऊन गेली कारण तिचे शरीर त्या शवपेटीत आहे. पण जेव्हा तुम्ही ख्रिस्ती येरुशलेमला जाता तेव्हा तेथे तुम्हाला फक्त रिकाम्या कबरेशिवाय काहीच सापडत नाही.
आभारी, ख्रिस्ती व्यक्ती उदगारली, जे काही तू म्हणतोस ते एकदम सत्य आहे. ही रिकामी कबर जी आपणास बघावयास मिळते त्यावरून स्पष्ट होते की आम्ही जीवंत झालेल्या येशूची सेवा व आराधना करतो व त्याला मृतांमध्ये शोधीत नाहीत. 

मनन चिंतन:

रात्र आणि दिवस ह्यांच जसं नातं आहे तसं गुडफ्रायडे आणि इस्टर ह्या दोन दिवसांचं नातं आहे. रात्रीनंतर निश्चितपणे पहाट होत असते तशीच गुडफ्रायडेच्या अंधारानंतर इस्टरची मंगल पहाट फुटत असते. किंबहुना इस्टरची सुंदर पहाट होण्यासाठी गुडफ्रायडेच्या रात्रीची आवश्यकता आहे. आपल्या श्रद्धेनुसार सत्य हे कधीच कबरेत राहू शकत नाही. असत्याची सर्व बंधने तोडून सत्य हे आज प्रभू येशू ख्रिस्ताच्या रुपात पुनरुत्थित झाले आहे. आपल्या पुनरुत्थानाद्वारे प्रभू ह्या जगाच्या स्थल-काल मर्यादेपलीकडे जातो. एकाच वेळी तो अनेक ठिकाणी, अनेक लोकांना दृष्टीस पडतो व आम्हासाठी जीवनदायक आत्मा होतो. हा पवित्र आत्मा आपणांस ख्रिस्ताप्रमाणे देवपित्याची लेकरे करतो. पूर्ण अर्थाने आपणास 'ख्रिस्ती' करतो.
आपले ख्रिस्ती जीवन हे गुडफ्रायडेला थांबत नाही. मृत्यू हा ख्रिस्ती जीवनाचा पूर्णविराम नसुन तो एका ख-या नवजीवनाचा प्रारंभ आहे. तेंव्हा गुडफ्रायडेला अर्थ आहे तो इस्टरच्या प्रकाशात, पुनरुत्थित प्रभूच्या प्रकाशात, म्हणूनच पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्त हा आदि आणि अंत आहे, प्रारंभ आणि शेवट आहे. आपल्या जीवनाचा पाया आणि कळस आहे. आजचा दिवस हा आम्हा सर्व श्रद्धावंतासाठी एक आनंदाचा दिवस आहे.
अनेक वेळा जीवनातील दु:खभोग, वेदना, अरिष्टे, संकटे, एकाकीपणा यामुळे आम्ही निराश आणि हतबल होतो. सर्व आशा गमावून बसतो. हे चित्र बदलण्याची किमया प्रभू येशूने केली. आपल्या पुनरुत्थानाने त्याने वधस्तंभालाच अर्थपूर्ण केले आहे; म्हणूनच ख्रिस्ताच्या पुनरुत्थानावर श्रद्धा ठेवणा-यांना निश्चितच भविष्यात आशा आहे. ह्या आशेच्या किरणामुळेच निराशेतून आशेकडे, अपयशातून यशाकडे, दु:खातून सुखाकडे, असत्याकडून सत्याकडे मार्गक्रमण करण्यास सामर्थ्य प्राप्त होते. पराभूत दृष्टीने जीवनाकडे बघण्यापासून व वैफल्यग्रस्त होण्यापासून आपला बचाव करते. कारण ख्रिस्ताने पुनरुत्थित होऊन जगावर, मृत्यूवर आणि सैतानावर संपूर्णपणे विजय मिळविलेला आहे.    
पण खरोखरच येशू ख्रिस्त मरणातून उठला आहे का? इतिहास आपणाला शिकवतो की येशू ख्रिस्त नावाचा एक व्यक्ती इतिहासामध्ये होऊन गेला, विज्ञानही संशोधनपूर्वक ते सिद्ध करते, परंतु तो मरणातून खरोखरच उठला का? हा मोठा प्रश्न अनेकांना पडतो. काही वेळेला आपल्याला विचार देखील आला असेल की जर ख्रिस्त थडग्यावरील पहारेकऱ्यांच्या उपस्थितीत किंवा त्याला पहावयास गेलेल्या स्त्रीयांसमोर पुनरुत्थित झाला असता तर किती प्रश्न सुटले असते! परंतु रिकामे थडगे, येशूने दिलेली दर्शने आणि शिष्यांना आलेल्या नवजीवनाच्या अनुभवावरून ख्रिस्ताचे पुनरुत्थान सिद्ध होते. येशूच्या पुनरुत्थानानंतर येशूने वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या लोकांना दर्शन दिले हे बायबलमधील प्रसंगच येशू जिवंत झाल्याची आपणाला साक्ष देतात:
१. मग्दालीया मरीया (मार्क १६:९, योहान २०:१४) 
२.अम्माऊस वाटेवर दोन शिष्य (मार्क १६:१२, लूक २४:१३-१५)
३.पेत्र (लूक २४:३४, १करिंथ १५:५)
४.दहा शिष्य वरच्या खोलीत असताना: थोमा गैरहजर (योहान २०:१९)
५.  अकरा शिष्य वरच्या खोलीत असताना: थोमा हजर (योहान २०:२६, लूक २४:३६, मार्क १६:१४)
६. तिबिर्याच्या समुद्राजवळ शिष्यांस दर्शन (योहान २१:१)
७.अकरा शिष्यांस डोंगरावर दर्शन (गालील) (मत्तय २८:१६-२०)
८.पाचशेपेक्षा अधिक जणांस दर्शन ( १करिंथ १५:६)
९. याकोब ( १करिंथ १५:७)
१०. सर्व प्रेषितांना दर्शन ( १करिंथ १५:७)
११.स्वर्गरोहणावेळी (मार्क १६:१९, लूक २४:५०, प्रे. कृत्ये १:३)
१२.सौल (पौल) दिमिष्काच्या वाटेवर असताना (प्रे. कृत्ये ९:३-८, १करिंथ १५:८, १करिंथ ९:१)
ख्रिस्त मेलेल्यातून उठला आणि आजही तो आपल्यामध्ये जिवंत असून कार्यरत आहे. ज्यांना ह्या जिवंत ख्रिस्ताचा अनुभव झालेला आहे, त्यांनी देव अनुभवलेला आहे. मी त्या पुनरुत्थित ख्रिस्ताचा अनुभव घेतला आहे का? की मी अजूनपर्यंत अविश्वासाच्या अंधारात रेंगाळत आहे? जीवनातील दु:खामुळे, संकटांमुळे आणि अडी-अडचणीमुळे अजूनही पुनरुत्थित येशूवर विश्वास ठेवायला संकोच दाखवत आहे का? येशू ख्रिस्ताचे दर्शन ज्याप्रमाणे वेगवेगळ्या व्यक्तींना लाभले त्याप्रमाणे आपल्यालादेखील हुबेहूब प्रत्यक्षात होईल असे नाही, परंतु खचून न जाता पुनरुत्थित येशूवर विश्वास ठेवूया; कारण आपण जरी चुकलो असलो, तरी येशू आपणाला माफ करतो, आम्ही पाप जरी केले असले तरी तो आपणाला क्षमा करतो.
शुभवर्तमान आपणाला सांगते: की ‘ज्या शिष्यांनी येशूला सोडून दिले, पेत्र ज्याला येशूने खडक म्हटले त्याने येशूला तीन वेळा नाकारले, त्या सर्वांना येशू सोडत नाही किंवा नाकारातही नाही उलट त्यांना बंधू असे संबोधून आनंदाची शुभवार्ता देण्यासाठी स्रियांना घाईने पाठवतो’ (मत्तय २८:१०). ज्याप्रमाणे येशूने मरणावर विजय मिळविला त्याचप्रमाणे आपणदेखील आपल्या दररोजच्या जीवनात येणा-या मरणावर विजय मिळवूया म्हणजेच ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाची व आनंदाची शुभवार्ता संपूर्ण जगाला घोषीत करू शकू.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: प्रभो आंम्हास कृपेचे नवजीवन दे.
. आपले परमगुरु, महागुरू, धर्मगुरू आणि धर्मबंधूभगिनींना पुनरुत्थित प्रभूचा आनंद व आशा त्यांच्या प्रेषितीय कार्यात सतत मिळावी म्हणून आपण प्रार्थना करुया.
२. आपला ख्रिस्ती समुह पापांच्या दरीतून मुक्त होऊन, परस्पर प्रेम व सौख्यभावनेने रहावा म्हणून आपण प्रार्थना करुया.
३. आज ज्यांनी नव्याने स्नानसंस्कार स्वीकारला आहे अश्यांनी प्रभूठायी विश्वासू राहून एक चांगले ख्रिस्ती जीवन जगावे म्हणून आपण प्रार्थना करुया.
४. ज्या लोकांना ख्रिस्ताची अजूनही ओळख पटलेली नाही अशांना प्रभूच्या प्रेमाची ओळख त्याच्या निवडलेल्या लोकांद्वारे व्हावी म्हणून आपण प्रार्थना करुया.
५. आपण सर्वांनी विश्वासात घेतलेला पुनरुत्थित प्रभूचा अनुभव सदाकाळ आपल्या मनी बाळगून त्या सार्वकालिक जीवनात सहभाग घेता यावा म्हणून आपण प्रार्थना करुया.



“तुम्हा सर्वांना पास्काच्या सणाच्या हार्दीक शुभेच्या”.

पुनरुत्थित प्रभू ख्रिस्ताची शांती तुम्हांबरोबर सदैव असो.




No comments:

Post a Comment