Thursday 28 December 2017

 Reflections for the Solemnity of Mary the Mother of God     (01-01-2018) by Br Robby Fernandes.





देव मातेचा सोहळा


दिनांक: १-१-२०१८
पहिले वाचन: गणना ६:२२-२७
दुसरे वाचन: गलतीकरांस ४:४-७
शुभवर्तमान: लुक २:१६-२१








प्रस्तावना:

आज आपण नवीन वर्षात पदार्पण करीत असताना वर्षाच्या पहिल्याच दिवशी ख्रिस्तसभा आपल्याला “देव मातेचा” सोहळा साजरा करण्यासाठी बोलावत आहे.
आज आपण मरिया मातेच्या जीवनावर मनन चिंतन करणार आहोत. मरीयेचे जीवन हे कृपापूर्ण आहे, म्हणजे कृपेने भरलेले आहे. मरीयेच्या हृदयामध्ये खरी नम्रता आहे, कारण ती देवाच्या शब्दापुढे लीन झाली. ती जरी साधी, भोळी स्त्री असली तरी ख्रिस्तसभेने तिला महत्वाचे स्थान दिले आहे. ज्या प्रमाणे ती देवाच्या शब्दापुढे लीन होती, त्याच प्रमाणे मरीयेने सर्व गोष्टीचे मनन करून त्या स्वत:च्या अंत:करणात ठेवल्या असे संत लुक आपल्याला सागतो. तिचा आदर्श आपण आपल्या नजरेपुढे ठेऊन नवीन वर्षात चांगले जीवन जगण्यासाठी ह्या पवित्र मिस्सा बलिदानात देवमातेचे सहाय्य मागुया.

सम्यक विवरण

पहिले वाचन: गणना ६:२२-२७

आजच्या पहिल्या वाचनात परमेश्वराच्या सांगण्यावरून आशीर्वादाची प्रार्थना अहरोन आणि त्याचे पुत्र लोकांना देतात. कारण ती प्रजा देवाने निवडीलेली आहे. म्हणून परमेश्वर असे म्हणतो, “त्यांनी इस्त्रायल लोकावर माझे नाव मुद्रित करावे म्हणजे मी त्यांना आशीर्वाद देईन. 

दुसरे वाचन: गलतीकरांस ४:४-७

संत पौल स्पष्ट करतो की, आपल्या सर्वांना नवजीवन मिळाले आहे. म्हणूनच  आता पासून आपण गुलाम नाही, देवाचे नुसते पुत्र नाही तर देवाद्वारे वारस ही आहोत. म्हणून देवाने आब्बा, बापा अशी हाक मारणाऱ्यांना आपल्या पुत्राच्या आत्म्याला तुमच्या आमच्या अंत:करणात पाठवले आहे.

शुभवर्तमान: लुक २:१६-२१

लुक आपल्याला सागत आहे की, मेंढपाळ येशू ख्रिस्ताला भेटायला आले. तसेच मरीयेने या सर्व गोष्टीचे मनन करून, त्या आपल्या अंत:करणात ठेवल्या. या सर्वावरून असे समजते की, मरीयेचा देवावरील अतूट असा विश्वास आणि या विश्वासामुळे मरीयेला त्याच्या कार्यासाठी देवाने निवडले.

बोधकथा

एक नवीन जोडप होत. त्यांच आताच लग्न झाल होत. त्यांचा सुखाचा संसार चालला होता. पण बायकोला त्याची आई आवडत नसे. म्हणून ती सतत त्याच्या आईवर आरोप करत असे. आणि नवरा सतत तिला तिच्या मर्यादेत राहण्यास सांगत असे. एकदा असे झाले की, बायको काही गप्प बसण्यास नावच घेत नव्हती, ती जोरजोराने ओरडून सांगत होती, “मी सोन्याची अंगठी टेबलावरच ठेवली होती, आणि तुमच्या आई शिवाय खोलीत कुणीच आलेल नव्हत.” अंगठी असो वा नसो ती आईनेच उचलली. ही गोष्ट जेव्हा पतीच्या सहनशिलतेच्या बाहेर गेली तेव्हा त्याने बायकोच्या जोरदार कानाखाली दिली. पत्नीला ती चापट सहन झाली नाही. म्हणून ती घर सोडूनच चालली होती, पण जाता जाता पतीला एक प्रश्न विचारला की तुम्हाला तुमच्या आईवर इतका विश्वास का? तेव्हा पतीने उत्तर दिले. ‘जेव्हा मी छोटा होतो, तेव्हा वडील वारले, आई आजूबाजूच्या परिसरात झाडू मारून थोडे पैसे आणायची, ज्यात एक वेळच पोट भरायचं. आई एका ताटात भाकर वाढायची आणि रिकाम्या डब्याला झाकून ठेवायची आणि म्हणायची, “बाळा तू खा”, माझ्या भाकऱ्या या डब्यात आहेत. मी पण नेहमी अर्धी भाकर खावून म्हणायचो, आई माझं पोट भरलंय आता मला नाही खायचं. आईने माझी उष्टी अर्धी भाकर खावून माझं पालन पोषण केलं आणि मोठं केलं. आज मी तीन भाकरी कमवायचा लायकीचा झालो. पण हे कस विसरू की आईने त्या वेळेस तिच्या भुकेला मारलं. ती आई या स्थितीला अशा अंगठीसाठी भुकेलेली असेल, हा मी विचारही सुद्धा करू शकत नाही. तू तर तीन महिन्यापासून माझ्या सोबत आहे. पण मी तर आईच्या तपश्चर्याला २५ वर्षापासून बघितले आहे. हे एकून दवाज्यामागे उभ्या असलेल्या आईच्या डोळ्यात अश्रू आले. ती समजूच शक
त नव्हती की, मुलगा तिच्या अर्ध्या भाकरीच कर्ज फेडतोय की, ती मुलाच्या अर्ध्या भाकरीचं कर्ज....

मनन चिंतन

माझ्या प्रिय मित्रांनो फ.मु.शिंदे. हे गाजलेले कवी आहेत. ते त्याच्या “आई” या कवितेमध्ये असे लिहितात,
“आई घरात नाही मग कुणाशी बोलतात गोठ्यात हबरणाऱ्या गाई?”
आई खरंच काय असते!
लंगड्याचा पाय असते, वासराची गाय असते.
दुधावरची साय असते, लेकराची माय असते.”
अशा प्रकारे फ.मु.शिंदे यांनी आईचे वर्णन केलेले आहे.
प्रत्येकाने, प्रत्येकाच्या जीवनामध्ये आईला ईश्वराचे स्थान दिले आहे. आईची माया व वात्सल्य वेगळ्या प्रकारचे असते जे आपल्याला तिच्याकडे आकर्षित करते. कवी फ.मु.शिंदेने सुद्धा “आई” विषयीचे प्रेम ह्या कवितेमध्ये रंगविलेले आहे. त्यांनी त्यांच्या भावना, विचार ह्या कवितेद्वारे मांडलेले आहेत. ज्या प्रमाणे समुद्राचे पाणी कमी होत नाही, नदी समुद्राला भेटल्याशिवाय राहत नाही, त्याच प्रमाणे आईचे प्रेम कधीही कमी पडत नाही, तिची ओढ कधीही विसरली जात नाही.
येशू ख्रिस्ताने सुद्धा आपल्या आईचे प्रेम, माया अनुभवली होती. तिची ओढ त्याने पाहिली होती. म्हणून ती येशू ख्रिस्ताबरोबर त्याच्या सुख-दु:खात राहिली. म्हणजे ती जन्मापासून तर मृत्युपर्यंत त्याच्या सोबत राहिली. “From womb to tomb.”
परमेश्वराने तिची निवड केली कारण ती सर्व स्त्रियामध्ये धन्य गणली होती हे लुकचे शुभवर्तमान सांगते आहे (लूक १:४२). परमेश्वराने पुरुषाला न निवडता स्त्रीची निवड केली. कारण प्रभू येशूला मरीयेच्या उदरी पाठवून, परमेश्वराने स्त्रीद्वारे संपूर्ण विश्वाचे तारण केले. म्हणूनच अलीशेबा उच्च स्वरामध्ये बोलली, “स्त्रियामध्ये तू धन्य व तुझ्या पोटचे फळ धन्य.” देवपित्याने आपल्या एकुलत्या पुत्राला ह्या जगात पाठविण्यासाठी एका कुमारिकेची निवड केली. तिच्या गर्भसंभवापासून देव पित्याने तिचा सांभाळ केला व तिला पवित्र ठेवले, जेणेकरून तिला “देवाची माता” म्हणतील’. लुक १:४३ आपल्याला सांगते की, ती खरोखरच “देवाची आई” आहे, म्हणूनच अलीशेबा अशी उद्गारते की, “माझ्या प्रभूच्या मातेने माझ्याकडे यावे, हा मान मला कोठून?”
आजची तिन्ही वाचने आपल्याला पवित्र मरीयेमध्ये असलेली आईची प्रतिमा दर्शविते. पहिल्या वाचनात असे दिसून येते की, परमेश्वर त्याच्या प्रजेला आशीर्वादित करत आहे. मरीयेच्या जीवनामध्ये सुद्धा प्रभू येशुद्वारे हाच आशीर्वाद परमेश्वराने सर्व विश्वाला बहाल केला. पौल आपल्याला सुचवत आहे की, आपण सर्वजण देवाचे पुत्र नसून वारस आहोत. मरिया माता ही खरोखर देवाची वारस झाली आणि आपणा सर्वाना तिच्याकडून देवाची मुले होण्याचा वारसा लाभलेला आहे. लुकलिखित शुभवर्तमान आपल्या समोर मेंढपाळांचे उदाहरण ठेवत आहे. मेंढपाळ हे अशिक्षित, समाजामध्ये मान-सम्मान नसलेली माणसे होती. पण परमेश्वराच्या नजरेत अशीच माणसे सर्वश्रेष्ठ होती, म्हणूनच गाब्रीयेल देवदूताने परमेश्वराचा पहिला संदेश मेंढपाळाला दिला. तुमचा तारणारा जन्मलेला आहे. या वरून असे दिसून येते की, परमेश्वरासमोर सर्वजण समान दर्जाचे आहेत. त्याच्या नजरेत आपण सर्व त्याची मुले आहोत. म्हणूनच परमेश्वर वाकड्या रेषेवर सरळ लिहू शकतो. म्हणजे परमेश्वराचा निर्णय हा आपल्या निर्णयाहून आगळा-वेगळा असतो. त्याच्याजवळ जात-पात, राग-मत्सर काहीही आढळत नाही.
आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये आई ही महत्वाची भूमिका बजावते. ज्या प्रमाणे माशाला पाण्यापासून, फांदीला झाडापासून व नाकाला सुगंधापासून विभक्त करू शकत नाही, त्याच प्रमाणे, आईला तिच्या प्रेमापासून कधीही विभक्त करू शकत नाही. आपल्या जीवनात सर्व काही असलं पण आईच प्रेम नसलं तर काय लाभ! म्हणूनच असे म्हणतात, “स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी” तात्पर्य हेच की, आपल्या जवळ कितीही अमाप धन-दौलत, पैसा-अडका असला तरी आईच्या प्रेमा बरोबर केव्हाच तुलना करू शकत नाही. खुद्द परमेश्वराला सुद्धा या जगती येण्यासाठी एका आईची गरज भासली. असे नाही कि, परमेश्वर आई शिवाय अवतरू शकत नाही, पण त्याने आईची निवड केली कारण ती “जन्माची शिदोरी” आहे. म्हणूनच फ.मु.शिंदे असे म्हणतात की, “आई असते, जन्माची शिदोरी, सरतही नाही आणि उरतही नाही.”  

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: पवित्र माते आम्हासाठी विनंती कर.

१. ख्रिस्तसभेचे अधिकारी पोप महाशय, सर्व बिशप, धर्मगुरू व व्रतस्त बंधू- भगिनी, जे ख्रिस्ताच्या मळ्यात कार्य करतात त्यांची श्रद्धा बळकट व्हावी व इतरांची श्रद्धा त्यांनी बळकट करावी म्हणून आपण मरिया मातेसह प्रभूकडे प्रार्थना करूया.
२. हे नवीन वर्ष आपल्या सर्वाना सुख-समाधानाचे, आनंदाचे, भरभराटीचे व चांगल्या आरोग्याचे जावो म्हणून आपण मरिया मातेसह प्रभूकडे प्रार्थना करूया.
३. सर्व क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांसाठी प्रार्थना करूया. सर्व क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. खाजगी व सार्वजनिक क्षेत्रात प्रामाणिकपणे त्या कार्यरत आहेत. त्याची छळणूक होऊ नये म्हणून पवित्र मातेच्या मध्यस्थीने परमेश्वर पित्याजवळ प्रार्थना करूया.
४. पाचारणासाठी प्रार्थना करूया. अनेक तरुण-तरुणीनी चांगल्या प्रकारचे शिक्षण घेतले आहे. त्या सर्वाना पवित्र मातेने विशेष आशीर्वाद द्यावा, त्यांनी प्रभूच्या हाकेला साथ द्यावी. तरुणांनी येशूच्या मळ्यात काम करण्यास होकार द्यावा म्हणून पवित्र मातेच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया.
५. आता, थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक गरजा प्रभूचरणी  ठेऊया. 




  



No comments:

Post a Comment