प्रायश्चित काळातील तिसरा रविवार
दिनांक : ४/३/२०१८
पहिले वाचन : निर्गम २०:१-१७
दुसरे वाचन : करिंथकरांस पहिले पत्र १:२२-२५
शुभवर्तमान : योहान २:१३-२५
प्रस्तावना :
आज आपण प्रायश्चित काळातील तिसरा
रविवार साजरा करीत आहोत. आज देऊळमाता आपल्याला देवाच्या पवित्र
मंदिराची पावित्रता
पाळण्यासाठी आमंत्रित करीत आहे.
आजच्या पहिल्या वाचनात आपण पाहतो
की देव इस्राएल लोकांना दहा आज्ञा देतो व त्यांना
एकनिष्ठ राहण्यास बोलावीत आहे. करिंथकरांस लिहिलेल्या पहिल्या पत्रात संत
पौल सांगतो की ज्या येशूने वधस्तंभावर आपला प्राण दिला, त्याच वधस्तंभावर खिळलेल्या
ख्रिस्ताची आम्ही साक्ष देतो. तसेच योहानलिखित शुभवर्तमानात येशू मंदिराचे
शुद्धीकरण करून, मंदिराची पावित्रता जपत आहे असे आपल्या निदर्शनास येते.
देवाचे मंदिर हे पावित्र्याचे मंदिर आहे. आपला
मंदिरातील सहभाग हा पावित्र्याने भरून जावा म्हणून आपण पूर्ण अंत:करणाने ह्या
पवित्र मिस्साबलीदानात सहभाग घेत असताना ईश्वरचरणी प्रार्थना करूया.
सम्यक विवरण :
पहिले वाचन: निर्गम २०:१-१७
इस्राएल लोक ही देवाने निवडलेली
प्रजा होती. ह्या निवडलेल्या प्रजेला परमेश्वर देवाने ‘दहा आज्ञा’ दिलेल्या
होत्या; ह्याचे वर्णन निर्गम ह्या पुस्तकात करण्यात आले आहे. परमेश्वराची अशी
इच्छा होती की लोकांनी दहा आज्ञा पाळाव्यात व सदैव त्यांनी त्याच्या सानिध्यात
राहून पवित्र जीवन जगावे. जेव्हा परमश्वराने इस्राएल लोकांची इजिप्तच्या
गुलामगिरीतून सुटका केली तेव्हा त्याने इस्राएल लोकांना वचन भूमी बहाल करणार असे
घोषित केले होते. जो पर्यंत परमेश्वराची निवडलेली लोक परमेश्वराने निवडलेल्या
जागेवर पोहचत नाहीत तो पर्यंत ह्या लोकांनी परमेश्वराशी एकनिष्ठ व विश्वासू राहावे
हे फार गरजेचे होते. त्यासाठी दहा आज्ञा देवाने लोकांना दिल्या होत्या.
दुसरे वाचन: करिंथकरांस पहिले पत्र १:२२-२५
संत पौल करिंथकरांस
ख्रिस्ताविषयी सुवार्ता सांगत आहे. ह्या सुवार्तेत तो म्हणतो की ख्रिस्ताला
वधस्तंभावर खिळण्यात आले होते. यहुदी
लोकांच्या रीतीरिवाजानुसार दृष्ट गुन्हेगाराला वधस्तंभावर खिळतात. म्हणून
येशूचे वधस्तंभावर मरणे हे एका गुन्हेगारासारखे होते, असा यहुदी लोकांचा समज होता.
संत पौल म्हणतो की येशूने वधस्तंभावर आपला प्राण देवून सर्व मानवजातीचे पाप नष्ट
केले व त्यांना क्षमा केली. हे यहुदी लोकांना पटत नाही. येशूच्या मरणाने पापक्षमा
मिळते ही घोषणा यहुदी लोकांना मूर्खपणाची वाटते. परंतु ज्या लोकांनी येशूच्या
सुवार्तेवर विश्वास ठेवला त्यांचे तारण झाले आहे.
शुभवर्तमान: योहान
२:१३-२५
देवाच्या मंदिरात जेथे यहुदी
उपवास करण्यासाठी जमत तेथेच बाजार उघडला होता व खूप गोंगाट चालू होता. येशूला ह्याचा राग
आला. म्हणून गुरांना
तेथून हाकलून दिले व व्यापाऱ्यांना तेथून जाण्यास भाग पाडले. देव
पित्याचा केवळ अपमान होत आहे हे पाहून येशूने आपला दैवी अधिकार प्रगट केला. यहुदी लोकांनी
येशूच्या अधिकाराचे चिन्ह मागितले. देवाने हा अधिकार तुम्हांला दिला आहे हे
दाखविण्यासाठी एखादा मोठा चमत्कार करा असे ते म्हणत होते. येशूने त्यांना म्हटले
हे मंदिर तुम्ही मोडा व मी ते तीन दिवसात उभारीन. यहुद्यांनी ह्याचा वेगळा अर्थ
लावला. प्रत्यक्षात येशू आपल्या देहरूपी मंदिराविषयी बोलत होता.
बोधकथा:
एकदा एका गावात एक राजा होता. त्याला त्याच्या राजकारणात एक खूप मोठ व
आकर्षिक मंदिर बांधायचे होते. त्याने व्यवसाहिक व तज्ञ यांची मदत घेऊन त्यांच्या विचारानुसार
मंदिर बांधण्यासाठी सुरुवात केली. या कामासाठी भरपूर पैसा लागणार होता, त्यामुळे
त्याने आपल्या प्रजेवर भारी कर लावला. शेजारच्या राज्यामधून कर्ज घेतले. त्याने
त्याच्या प्रजेला लुबाडून हे मंदिर बांधलं. तो जवळ जवळ त्याच्या ह्या प्रकल्पामुळे
दिवाळखोर बनला होता.
हे मंदिर बांधून झाल्या नंतर तो खूप प्रसिद्ध
झाला. मंदिराला भेट द्यायला आलेला प्रत्येकजण बांधकाम पाहून आचर्यचकित झाला आणि त्यांनी
राजाची प्रंशसा केली. यामुळे राजा खूप
आनंदी व समाधानी होता.
एक दिवशी त्याला त्याच्या दासांनी बातमी आणली
की आपल्या राज्याच्या बाहेरील छावणीत असलेल्या ऋषीनी या प्रसिध्द मंदिरास दर्शन
दिले नाही. त्यामुळे राज्याला अपमान झाल्या सारख वाटलं. राज्याने त्या ऋषीला
त्याच्या राजवाड्यात आणण्याचा हुकुम दिला. तो ऋषी आला. राज्याने त्या ऋषीला म्हटले
की संपूर्ण जग माझ्या मंदिराच वाहवा करत आहे आणि तू माझ्या मंदिराला भेटही दिली नाहीस.
त्यावर ऋषीने राज्याला उत्तर दिले की हे मंदिर बांधण्यासाठी तुम्ही खूप लोकांची
हत्या केली आहे. आपण त्यांच्यावर असहाय्य असहाय कर आकारला. लोकांनी उपासमार करून पैसे
भरले. लोकांच्या रक्ताने हे मंदिर आपण बांधलं आहे. ज्या देवासाठी आपण हे मंदिर
बांधलं आहे तो देव ह्या मंदिरात नाही. अशा घरात राहणे म्हणजे देवाचा जणू अपमानच
होईल; कारण आपलं खरं जिवंत घर हे आपली प्रेमळ प्रजा असते.
मनन चिंतन:
स्तोत्रसंहिता ६:९-९ मध्ये सांगितले आहे की “तुझ्या
मंदिराच्या आवेशाने मला ग्रासून टाकले आहे”. हे वचन आपण आजच्या शुभवर्तमानात
येशुमध्ये पूर्ण होताना पाहत आहोत. कारण वल्हांडणाच्या सणाच्या वेळी
प्रार्थना आणि मंदिराची पावित्रता न सांभाळता बाजार आणि गोंधळ मांडलेला दिसत होता.
व्यापारी लोक परमेश्वराला विसरून फक्त पैशाने स्व:ताचे खिसे भरत होते. दुसरे लोक
खरा धर्म सोडून खरेदी कशी होईल ह्या चिंतेत गुंतून गेले होते. तसेच मंदिरात गुरे,
मेंढरे व कबुतरे विकणारे बसलेले होते. देवाच्या मंदिरात गोंधळ व फसवणूक पाहून
येशूला राग येतो. तेव्हा त्याने दोऱ्यांचा एक कोरडा करून मेंढरे व गुरे ह्या
सर्वांस मंदिरातून घालवून दिले. देवाच्या मंदिरात देवाचा गौरव व्हावा या आवेशाने
येशू भरलेला होता. तेव्हा यहुदी लोकांनी येशूच्या अधिकाराचे चिन्ह मागितले. देवाने
तुम्हाला हा अधिकार दिला आहे हे दाखविण्यासाठी एखादा मोठा चमत्कार करा असे ते
म्हणत होते. येशूने त्यांना म्हटले हे मंदिर तुम्ही मोडा व मी ते तीन दिवसात
उभारीन. ह्यावरून यहुदी म्हणाले, “हे मंदिर बांधावयास सेहेचालीस वर्षे लागली आणि
तुम्ही हे तीन दिवसात उभारणार काय? (योहान २:२०). प्रत्यक्षात, येशू आपल्या देहरूपी
मंदिराविषयी बोलत होता. हे यहुद्यांना समजले नाही. येशूच्या ह्या कृत्याने
मंदिराचे शुद्धीकरण झाले. मंदिराला नवे स्वरूप प्राप्त झाले.
मंदिर बोललं तर प्रार्थनेसाठी
भरपूर लोक एकत्र जमत असतात. ते एकत्र प्रार्थना करीत असल्यामुळे मंदिर हे ऐकीचे
प्रतिक आहे. आपण मंदिरात आल्यानंतर आपली वागणूक कशी असते. आपण आपल्यालाच हा प्रश्न
विचारूया. आपण मंदिरात आलो आहोत ह्याचे भान आपल्याला राहत नाही. आपल्या मनात
घराचा, जेवणाचा व नोकरीचा विचार येत असतो. प्रार्थनेत आपल्या संपूर्ण लक्ष नसते.
कधी-कधी मोबाईलवर लक्ष असते. आजची तरुण पिढी मिस्साबलीदानाकडे लक्ष न
देता मोबाईलकडे जास्त लक्ष देतात. ह्याचे कारण काय? कारण ऐकच, ते म्हणजे
मिस्साबलिदानासाठी त्यांची अपुरी तयारी. ह्या कारणामुळे आपल्या मनात विचारांची
बाजारपेठ तयार होते व आपले लक्ष विचलित होते. खरा मंदिराचा हेतू विसरून जर आपण
अशाप्रकारे बाजारपेठ चालू ठेवली तर आपण मिस्साबलिदानात घेत असलेल्या सहभागाला
मुळीच अर्थ प्राप्त होणार नाही. धर्मगुरूंच्या उपदेशाला व देवाच्या पवित्र शब्दाला
अर्थ राहणार नाही.
आपण उपवास काळात आहोत. ह्या उपवास काळात भरपूर
ख्रिस्ती भाविक मोठ्या संख्येने प्रभूचा आशीर्वाद घेण्यासाठी पवित्र मंदिरात
येतात. मिस्साबलीदानात सहभाग घेतात. देवाचे मंदिर हे पवित्र मंदिर आहे. म्हणून आपण
मंदिराची पावित्रता पाळली पाहिजे. मंदिरात आपला सहभाग कसा आहे ह्यावर जास्त लक्ष
केंद्रित केले पाहिजे. ज्या प्रमाणे येशूने मंदिराचे शुद्धीकरण करून परमेश्वर
पित्याच्या मंदिराची पावित्रता पाळली त्याप्रमाणे आपला मंदिरातील सहभाग हा
पावित्र्याने भरून गेला पाहिजे. आपले मन, तन आणि धन हे देवाच्या सानिध्याने
व्यापून गेले पाहिजे. जेव्हा ह्या गोष्टींची पूर्तता होईल तेव्हाच आपल्याला
परमेश्वराचा अनुभव घेता येईल.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे प्रेमळ पित्या आमची प्रार्थना ऐकून घे.
१. आपले परमगुरु पोप फ्रान्सिस व इतर सर्व देऊळमातेचे सदस्य ह्यांना प्रभूने
शारिरीक, मानसिक व आध्यात्मिक आरोग्य द्यावे व योग्य निर्णय घेण्यासाठी त्यांना
पवित्र आत्म्याची शक्ती मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. आपण सर्व पापी आहोत, ह्याची जाणीव आपणा प्रत्येकाला व्हावी व या प्रायश्चित
काळात आपण आपल्या पापांचा पश्चाताप करून धार्मिक जीवन जगावे म्हणून आपण प्रार्थना
करूया.
३. जे लोक देवापासून दुरावलेले आहेत त्यांना प्रभूच्या दयेचा, क्षमेचा व
करुणेचा स्पर्श व्हावा व त्यांनी पुन्हा एकदा प्रभू ख्रिस्तामध्ये आनंदाचे जीवन
जगावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. जे बेरोगजार आहेत अश्या लोकांना त्यांच्या कला-कौशल्यावर आधारित योग्य ती नोकरी
मिळावी जेणेकरून त्यांना त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करता येईल म्हणून आपण
प्रार्थना करूया.
५. आता
आपण थोडा वेळ शांत
राहून आपल्या वैयक्तिक गरजांसाठी प्रभूचरणी प्रार्थना करुया.
No comments:
Post a Comment