Reflection for the Homily of 'Easter Vigil' (31-03-2018)
पुनरुत्थान रविवार
जागरण विधी
दिनांक: ३१/०३/२०१८
पहिले वाचन: उत्पत्ती १:१-२,२
दुसरे वाचन: उत्पत्ती २२:१-१८
तिसरे वाचन: निर्गम १४:१५-१५:१अ
चौथे वाचन: यशया ५४:५-१४
पाचवे वाचन: यशया ५५:१-११
सहावे वाचन: बारुख ३:९-१५.३२-४:४
सातवे वाचन: यहेज्केल ३६:१६-२८
आठवे वाचन: रोमकरांस पत्र ६:३-११
शुभवर्तमान: मार्क १६:१-७
आजच्या ह्या विधीचे चार मुख्य भाग आहेत.
पहिला भाग:
· प्रकाश विधी- ह्या विधीमध्ये पुनरुत्थित येशू जगाचा प्रकाश
आहे हे आपण घोषीत करतो.
दुसरा भाग:
· प्रभुशब्द विधी- ह्या विधीमध्ये जुन्या व
नवीन करारातील निवडक वाचने वाचली जाणार आहेत. ह्या सर्व वाचनांतून देवाचे
मानवावरील अपार प्रेम आहे हे दिसून येते.
तिसरा भाग:
· पाण्याला आशीर्वाद- ह्या विधीमध्ये बाप्तिस्म्या संस्कारासाठी लागणा-या पाण्याला
आशीर्वाद दिला जातो. बाप्तिस्मा संस्काराने आपण देवाची मुलं होतो. पुनरुत्थानाचे
पहिले गोड फळ म्हणजे बाप्तिस्मा. ख्रिस्तामध्ये आपला बाप्तिस्मा होणे हा देवाचा
अनन्यसाधारण आशीर्वाद आहे.
चौथा भाग:
· ख्रिस्तप्रसाद विधी- ह्या विधीमध्ये आपण
सर्वजण पवित्र ख्रिस्त शरीर स्वीकारणार आहोत. पुनरुत्थित येशूला आपण आपल्या जीवनात
नव्याने स्वीकारणार आहोत.
प्रस्तावना:
तो उठला आहे
ख्रिस्ताठायी जमलेल्या प्रिय भाविकांनो आज ह्या पवित्र
रात्री प्रभू येशू ख्रिस्ताने मृत्यूवर विजय मिळविला आहे. त्याने दु:ख सोसले,
त्याला क्रुसावर खिळण्यात आले आणि तिसऱ्या दिवशी म्हणजे आज तो मरणावर विजय मिळवून
पुनरुत्थित झाला आहे. येशू मरणातून उठलेला आहे हा आपला दृढ विश्वास आहे आणि ह्या
विश्वासाच्या बळावर आज अखिल ख्रिस्तसभा बांधण्यात आली आहे. आपल्या पापांचे ओझे
येशूने स्वत:च्या खांद्यावर घेऊन आम्हाला विसावा दिला. आमच्या पापांसाठी तो
क्रुसावर मेला. येशू पुनरुत्थित होऊन आम्हा सर्वांना शाश्वत जीवनात सामील केले
आहे. येशूच्या जीवनात प्रामाणिकपणा, ध्येय आणि विश्वास होता. जन्मापासून ते
पुनरुत्थित होई पर्यंत त्याने प्रामाणिकपणे आपल्या स्वर्गीय पित्याची इच्छा पूर्ण
केली. शेवटी त्याने आपल्या जीवनाचे सार्थक केले.
ह्या पवित्र मिस्साबलिदानात सहभागी होत असताना पुनरुत्थित येशूचा
प्रकाश, कृपा आणि शांती आम्हावर सदैव रहावी आणि आम्ही सुद्धा आमचे ख्रिस्ती जीवन
आणि कार्य, प्रामाणिकपणा आणि विश्वास ह्या मुल्यांनी भरावे म्हणून प्रभूकडे याचना
करूया.
सम्यक विवरण:
आजचा विधी हा ‘पास्काचा
जागरण विधी’ म्हणून ओळखला जातो. ख्रिस्ती धर्माने हे नाव व
दिवस यहुद्यांच्या पास्काच्या सणावरून घेतलेले आहे. इजिप्त देशात देवाचा दूत
यहुद्यांची घरे ओलांडून गेला व इजिप्त वासियांच्या प्रथम जन्मलेल्या बालकांचा वध
केला; हे सर्व यहुद्यांची फारोच्या गुलामगिरीतून सुटका व्हावी म्हणून करण्यात आले.
ख्रिस्ती धर्माने हा सण प्रभूच्या ‘पुनरुत्थानाचा सण’
म्हणून घोषित केला. प्रभूने आपले मरण व पुनरुत्थानाने पापांवर विजय
मिळविला. मरणातून सार्वकालिक जीवनाकडे प्रभूने केलेले हे ओलांडण यहुद्यांनी
ज्याप्रमाणे गुलामगिरीतून सुटका झाल्यानंतर परमेश्वराठायी एका नव्या जीवनाला
सुरुवात केली; त्याचप्रमाणे प्रभूच्या पुनरुत्थित
जीवनाद्वारे आपणास एका नव्या जीवनाला प्रारंभ करण्यास मुभा मिळते. म्हणूनच आजच्या
दिवशी स्नानसंस्कार दिला जातो व स्नानसंस्काराच्या वचनांचे नुतनीकरण केले जाते.
म्हणूनच प्रभूच्या जीवन, मरण व पुनरुत्थानाला ‘paschal
mystery’ ‘पास्काचे रहस्य’ म्हणून संबोधित
केले जाते व ख्रिस्ती श्रद्धेत महत्वाचे स्थान दिले जाते.
अ) जुन्या करारातील सात
वाचने आपणास परमेश्वराच्या दैवी नियोजनाची पुर्तता मानवी जीवनात कशी होते याची
प्रचीती देते. देव शून्यातून विश्वाची निर्मिती करतो, आपल्याच
प्रतिरुपाप्रमाणे तो मानवास निर्माण करतो व त्यास सा-या निर्मितजणांचा अधिपिता
करतो. मानवाचे वर्चस्व त्यांस देवापासून दूर घेऊन जाते व तो पापांच्या खाईत पडतो.
परंतु देव मानवाच्या तारणासाठी आपल्या निवडलेल्या लोकांद्वारे, संदेष्ट्यांद्वारे मानवास आपल्या जवळ आणतो. पाप व मुक्तता याची
पुन्हा-पुन्हा होणारी पुनरावृत्ती याचे दर्शन आपणास ह्या वाचनात घडते.
ब) संत पौल रोमकरांस
लिहिलेल्या पत्रात ख्रिस्ती बांधवांना प्रभूमध्ये जीवन जगण्यास प्रवृत्त करत आहे.
पौल म्हणतो, “स्नानसंस्काराद्वारे प्रत्येक ख्रिस्ती हा ख्रिस्तामध्ये मरतो व
ख्रिस्तामध्ये पुनरुत्थित होतो”. त्याचे सर्व जीवन हे
ख्रिस्ताद्वारे सुरु होते व ख्रिस्तामध्येच संपते. संत पौल हा खिस्ती लोकांविषयी
फार चिंतित होता, कारण त्यांनी आपले ख्रिस्ती जीवन
चांगल्याप्रकारे सुरू केले होते, परंतु अनेक वेळा ते
कुमार्गाला जात होते. त्यामुळेच पौल त्यांस ख्रिस्ती जीवनाचा मार्ग कसा क्रमण
करावा ह्याचे धडे देतो. तो म्हणतो, स्नानसंस्काराद्वारे
मानवाने आपला पूर्वीचा कुमार्ग सोडावा व तो अशाप्रकारे सोडावा की त्याने जणू
म्हणावे मी पापासाठी मेलो आहे. मृत व्यक्ती चोरी करत नाही, व्यभिचार
करत नाही, खुण करत नाही म्हणजेच तो आपल्या पापी जीवनाला मरतो
व ख्रिस्तामध्ये नवजिवीत होऊन जगतो. अशाप्रकारे स्नानसंस्काराद्वारे प्रत्येक
व्यक्ती देवाचे लेकरु होते. जोपर्यंत ख्रिस्त माझ्यात नाही व मी ख्रिस्तात नाही,
तोपर्यंत मी प्रभूच्या सानिध्यात जीवन जगू शकत नाही.
क) मार्कलिखित शुभवर्तमानात
आपण प्रभू येशूच्या पुनरुत्थानाविषयी ऐकतो. यहुदी लोक मृत व्यक्तीस काळजीपूर्वक
दफन करीत असत. विविध गंधरस लावून ते प्रेतास जपत असत. शब्बाथ दिवस आड आल्याने
प्रभू येशूचा मृतदेह घाईत दफन केला गेला होता. त्यामुळे स्त्रियांना यहुदी
रीतीप्रमाणे गंधरस लावता आले नव्हते. ह्यासाठीच त्या भल्या पहाटे ही उत्तरक्रिया पूर्ण
करण्यासाठी थडग्यापाशी गेल्या होत्या. त्यांनी हे कृत्य येशुठायी असलेल्या
प्रेमापोटी व श्रद्धेपायी केले.
प्रभू येशूच्या पुनरुत्थानाची प्रचिती आपणास खालील मुद्द्यावरून
येते:
१. कबरेचा धोंडा बाजूला
सारला होता.
२. कबरेत
दूताने दिलेला संदेश
३. रिकामी
कबर
४. प्रभूला
ज्या वस्त्रात गुंडाळून ठेवले होते ते वस्त्र येशुविरहित तेथे पडलेले होते.
हे सर्व दृश्य पाहून स्त्रिया भयभीत झाल्या होत्या. त्या शिष्यांना
काय जाब देणार? म्हणूनच दूत त्यांना म्हणतो, ‘भिऊ नका प्रभू मरणातून
उठला आहे.’ स्त्रिया आश्चर्यचकित झाल्या; कारण हे असले अजब कधीच घडले नव्हते व ऐकलेही नव्हते. फक्त मार्कच्या
शुभवर्तमानातच दूताचा आदेश आपणास आढळतो: ‘जा, व त्याच्या शिष्यांना व पेत्रास सांगा.’ दूत
स्त्रियांस ही शुभवार्ता घोषीत करण्याचे आदेश देतो. शुभवर्तमानाच्या शेवटी आपण
ऐकतो की, ह्या स्त्रिया भीतीपोटी हा संदेश कुणालाच सांगत
नाहीत.
खरे पाहता, संदेश किंवा शुभवर्तमान प्रसारण करण्याचे कार्य हे
देवाचे आहे. जोपर्यंत देव आदेश देत नाही तोपर्यंत त्या संदेशाचा प्रसार कुणीच करू
शकत नाही. दूताने पेत्राचे नाव विशेष घेतले कारण जे काही प्रभूने भाकीत केले होते
त्याची पूर्तता झाली आहे ह्याची खात्री पेत्राला व्हावी. पेत्र जरी बेईमान ठरला
तरी त्याने पश्चातापाद्वारे प्रभूच्या दयेची प्राप्ती केली. त्यामुळे आपल्या
पुनरूत्थानाचा संदेश पेत्राला नक्कीच संतोष देईल ही प्रभूला खात्री होती. प्रभू
पापी माणसासाठी क्रुसावर मरण पावला व मरणातून उठला. पश्चातापी लोकांस आपल्याजवळ घेणे प्रभूला नक्कीच संतुष्टकारक ठरेल.
बोधकथा:
आपल्या
राज्याचा भावी राजा ठरवण्यासाठी वृद्ध राजाने एक परीक्षा घेण्याचं ठरवलं. आपल्या
चारही पुत्रांना बोलावून त्याने प्रत्येकाला एक ‘बी’ दिली आणि सांगितलं, ही बी
नेऊन तिची लागवड करा. आलेल्या झाडाची उत्तम जोपासना करा. एक वर्षानंतर तुमच्या
झाडांची मी पाहाणी करेन. त्यातून उत्तम ठरलेल्या तुमच्यापैकी एकाची मी राजा म्हणून
निवड करेन.
एका वर्षानंतर
राजाने चौघांनाही बोलावलं. धाकटा जायला तयार नव्हता. कारण त्याच्याकडचं बी रुजलचं
नव्हतं. पण जे घडलं ते सरळ सांगावं या इराद्याने तोही पोहोचला. राजाने आपल्या
पुत्रांनी जोपासलेली झाडं पाहिली आणि त्यांचं कौतुक केलं. धाकटा मात्र शांत उभा
होता. राजाने त्याच्या झाडाबद्दल विचारलं तेव्हा त्याने जे घडलं ते सांगितलं. आपले
प्रयत्न अयशस्वी ठरल्याबद्दल राजाची क्षमा मागितली. तसा राजा झटकन पुढे झाला आणि
स्वत:च्या डोक्यावरचा राजमुकुट त्याने धाकट्याच्या डोक्यावर ठेवला.
राजाची ही
कृती पाहून बाकीचे पुत्र चकित झाले. धाकट्याचे झाड उगवलं नसताना त्याची निवड का ? असा
प्रश्न त्यांनी राजाला केला. तेव्हा राजा म्हणाला, ‘मी तुम्हा सर्वांना उकडलेल्या
बिया दिल्या होत्या. त्यातून झाड उगवणे शक्यच नव्हतं. तुम्ही तिघांनी
अप्रामाणिकपणा केला. दुसरंच बी रुजवून झाड उगवलंत. धाकट्याने मात्र प्रामाणिकपणे
प्रयत्न केले. तो सत्याशी प्रामाणिक आणि प्रामाणिकतेशी वचनबद्ध राहिला. मला
राज्यासाठी असा राजा हवा, जो आपल्या प्रजाहिताच्या ध्येयासाठी आणि त्यासाठी
कराव्या लागणाऱ्या कार्याशी वचनबद्ध राहील. कारण वचनबद्धता राखणारा माणूसच यशस्वी
ठरतो.
( ‘ध्येयाशी व्हा वचनबद्ध’ हे आपल्याला येशू ख्रिस्ताच्या
जीवनात देखील पाहता येते. येशू जन्मापासून ते पुनरुत्थित होईपर्यंत आपल्या
पित्याशी आणि शिष्यांशी प्रामाणिक राहिला. येशूचे हे प्रामाणिकपणाचे जीवन आम्हा
सर्वांचा विश्वास दृढ करते.)
मनन
चिंतन:
प्रत्येक माणसाचे ध्येय असते. प्रत्येकाला महत्वकांशी व्हायचे
असते. म्हणून एखादे विशिष्ट प्रकारचे ध्येय गाठण्यासाठी श्रमाची, विश्वासाची,
प्रामाणिकपणाची आणि सातत्याची गरज असते. आपल्या स्वप्नांना चिकटून रहा, कारण जर
स्वप्नेच मेली तर जीवन पंख तुटलेल्या पक्षासारखे होईल. ह्या गोष्टींचा जर अभाव
असेल तर आपले जीवन समुद्रात नावाडी नसलेल्या होडी प्रमाणे होईल, होडी वाऱ्याच्या
प्रभावामुळे कुठेही जाईल.
आज आपण मोठ्या उल्लासाने ‘आलेलूया’ गातो. गोड सुराने देवाची महिमा
गातो. का? कारण आज ध्येयाला वचनबद्ध असलेला येशू पुनरुत्थित झाला आहे. देवाचे वचन
सांगते, ‘असे लिहिले आहे की, ख्रिस्ताने दु:ख सोसावे, तिसऱ्या दिवशी मेलेल्यांतून
उठावे (लूक २४:४६). जर आपण बारकाईने येशूच्या जीवनावर मनन चिंतन केले तर आपल्याला
असे आढळून येईल की येशूच्या शब्दाला व कृतीला प्रतिबिंब आहे; म्हणजेच येशूचे जीवन
परिणामकारक आहे. उत्पती पुस्तकात जेव्हा सृष्टीची निर्मिती करण्यात आली तेव्हा देव
बोलला, तेथे प्रकाश होवो आणि तेथे प्रकाश झाला. अशाप्रक्राचे येशूचे जीवन आहे.
येशू म्हणतो, मी जीवनाचा प्रकाश आहे आणि खरोखर तो प्रकाश झाला. येशू इतर लोकांना
विविधप्रकारे प्रकाश झाला ह्याची ग्वाही किंवा साक्ष पवित्र शास्त्र देते. हेच
वचनबद्ध येशूचे जीवन त्याच्या पुनरुत्थित कृतीला शोभा देते.
गुलाबाच्या फुलाला ज्याप्रमाणे काट्यांच्या मार्गातून वाट काढावी
लागते, त्याप्रमाणे येशूचे पुनरुत्थित जीवन संकटानी, दु:खानी आणि मोहाने भरलेले होते.
पण ह्या सर्वांवर मात करत येशू पुनरुत्थित झाला. देवाने आपणा सर्वांसाठी तारणारा
पाठवला. शिष्यांच्या मते हा तारणारा तलवार घेऊन सर्वांचा नाश करेल. त्यांच्यामते
तारणारा हा मोठा राजा असेल. परंतू तारणारा कसा आला? तो गाढवावर बसून आला. हातात
तलवार नव्हती. तर त्याचे जीवन फक्त शांतीने, क्षमेने आणि प्रेमाने भरलेले होते. आयुष्यभर
येशूने हिंसक गोष्टी नाही केल्या तर शांतीचा झेंडा हातात घेऊन गर्विष्ठ लोकांची
मान लाजेने खाली झुकवली. आज आपण ह्याच येशू ख्रिस्ताला शांतीचा, प्रेमाचा राजा
संबोधतो.
येशूने बहुतेक वेळा पवित्र शास्त्रात म्हटले आहे की, मला जीवे
मारले जाईल, परंतू मी तिसऱ्या दिवशी मरणातून उठेन. आज खरोखर डोळ्यातून अश्रू खाली
पडत आहेत. का ? कारण निष्पाप येशूला यहुद्यांनी क्रुसावर जीवेशी मारले. माझ्या, तुमच्या
आणि सर्वांच्या पापांसाठी येशूने क्रूस वाहिला. पण आज डोळ्यातून आनंदाचे अश्रू
बाहेर यायला पाहिजे. कारण येशूने जे सांगितले होते त्याची आज पूर्तता झाली आहे. आज
तिसरा दिवस. ह्या तिसऱ्या दिवशी येशू पुनरुत्थित झाला आहे. शुभवर्तमानात आपण ऐकले
की मग्दालीया मरिया, योकोबाची आई मरिया व त्या सलोमे ह्यांनी येशूला सुगंधद्रव्ये
लावण्यासाठी कबरेजवळ आल्या. परंतु त्यांना कबर उघडी दिसली. कबरेच्या आत गेल्या
तेव्हा पांढरा झगा घातलेल्या एका तरुणाला उजव्या बाजूस बसलेले पाहून त्या चकित
झाल्या. तो त्यांना म्हणाला, चकित होऊ नका; वधस्तंभावर खिळलेल्या येशू नासरेथकराचा
शोध तुम्ही करीत आहा. तो उठला आहे, तो येथे नाही.
तो उठला आहे याचा अर्थ येशू पुनरुत्थित झाला आहे. त्याने मरणावर विजय
मिळवला आहे. आपण नव्या करारामध्ये पाहतो: विशेषकरून;
·
मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दु:खे भोगावी, वडीलमंडळ, मुख्य याजक व
शास्त्री ह्यांच्याकडून नाकारले जावे, जीवे मारले जावे आणि त्याने तीन दिवसानंतर
पुन्हा उठावे (मार्क ८:३१).
·
मनुष्याच्या पुत्राला पापी जणांच्या हाती धरून देण्यात यावे, त्याला
वधस्तंभावर खिळण्यात यावे व तिसऱ्या दिवशी त्याने पुन्हा उठावे, ह्याचे अगत्य आहे
(लूक २४:७).
·
आणि तुम्ही जीवनाच्या अधिपतीला जिवे मारिले; पण देवाने त्याला
मेलेल्यांतून उठविले ह्याचे आम्ही साक्षी आहो (प्रेषितांची कृत्ये ३:१५).
पुनरुत्थित होऊन येशूने आपल्या पित्याची इच्छा पूर्ण केली. सर्व
मानवजातीस पापमुक्त करणे हे येशूचे ध्येय होते. ते त्याने पूर्ण केले. येशूने
स्वत:चा प्राण गमावला. स्वत: निस्वार्थी जीवन जगून इतरांना प्रभूकडे आणले. त्याची महत्वकांक्षा
ही प्रेमाने, शांतीने आणि समेटाने व्यापून गेली होती. सदैव तो आपल्या जीवनात
प्रामाणिक राहिला. जेव्हा शिष्यांनी येशूची बिकट हालअपेष्टा बघितली तेव्हा त्यांनी
कदाचित विचार केला असेल की हा येशू आमचा तारणारा स्वत:ला वाचवू शकत नाहीत मग
आम्हाला कस काय वाचवू शकेल? शिष्यांच्या शंकेचे निरासन येशूने पुनरुत्थित होऊन
केले. पुन्हा एकदा शिष्यांचा विश्वास दृढ झाला. कित्येक शिष्य येशूची सुवार्ता
घोषविण्यासाठी तप्तर झाले. जगाच्या काना कोपऱ्यात जाऊन येशूचा मार्ग प्रगट केला.
त्यांनी देवराज्याची घोषणा केली. काहींनी आपला प्राण गमावला. हीच आहे पुनरुत्थित
येशूची घोषणा.
आपल्या जीवनातील ध्येय काय आहे ? पैसा, मालमत्ता, नाव-लौकिकता, बंगला,
गाडी हे सर्व आहे का? ह्याच्या व्यतिरिक्त येशू आणि येशूची शिकवण असली पाहिजे.
देवाचे वचन सांगते, ‘तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळविण्यास
झटा म्हणजे त्यांच्याबरोबर ह्याहि सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील (मत्तय ६:३३). आजचा
हा पुनरुत्थित येशूचा दिवस आपणा सर्वांना त्याच्या ध्येयाने भरून जावो अशी
प्रभूकडे विनवणी करूया. ज्याप्रमाणे येशू जन्मापासून ते पुनरुत्थित होई पर्यंत आपल्या
पित्याशी विश्वासू राहिला, प्रामाणिकपणाने जगाला; त्याप्रमाणे आपण ख्रिस्ती बांधव
सुद्धा आपल्या ख्रिस्ती जीवनात प्रामाणिक राहावे व आपल्या विश्वासाला चिकटून
राहावे म्हणून प्रार्थना करूया.
विश्वासू लोकांच्या
प्रार्थना
प्रतिसाद: प्रभो आंम्हास कृपेचे
नवजीवन दे.
१. आपले
परमगुरु, महागुरू, धर्मगुरू आणि
धर्मबंधूभगिनींना पुनरुत्थित प्रभूचा आनंद व आशा त्यांच्या प्रेषितीय कार्यात सतत
मिळावी म्हणून आपण प्रार्थना करुया.
२. आपला ख्रिस्ती समुह
पापांच्या दरीतून मुक्त होऊन, परस्पर प्रेम व सौख्यभावनेने रहावा म्हणून आपण
प्रार्थना करुया.
३. आज ज्यांनी नव्याने
स्नानसंस्कार स्वीकारला आहे अश्यांनी प्रभूठायी विश्वासू राहून एक चांगले ख्रिस्ती
जीवन जगावे म्हणून आपण प्रार्थना करुया.
४. ज्या लोकांना
ख्रिस्ताची अजूनही ओळख पटलेली नाही अशांना प्रभूच्या प्रेमाची ओळख त्याच्या
निवडलेल्या लोकांद्वारे व्हावी म्हणून आपण प्रार्थना करुया.
५. आपण सर्वांनी
विश्वासात घेतलेला पुनरुत्थित प्रभूचा अनुभव सदाकाळ आपल्या मनी बाळगून त्या
सार्वकालिक जीवनात सहभाग घेता यावा म्हणून आपण प्रार्थना करुया.
No comments:
Post a Comment