Thursday 24 October 2019



Reflections for the homily for 30th  Sunday in Ordinary Time (27-10-2019) by Fr. Wilson Gaikwad. 







सामान्य काळातील तिसावा रविवार


दिनांक:  २७-१०-२०१९
पहिले वाचन: बेनसिरा ३५:१२-१४ 
दुसरे वाचन: २ तीमथी ४:६-८८,१६-१८
शुभवर्तमान: लुक १८:९-१४ 

प्रस्तावना:

        आजच्या उपासनेतील तिन्ही वाचनावर आपण जर नजर टाकली तर आपणास नम्र प्रार्थना, अनांथाची प्रार्थना देवाला अधिक प्रसन्न करते याची अनुभूती येते.
          पहिल्या वाचनात बेनसिरा आम्हांस सांगतो प्रार्थनेला कृतीची जोड हवी आहे. प्रार्थनेचे आणि आपल्या दैनंदिन जीवनाचे अतूट नाते आहे. प्रार्थनेचा ढंग वेगळा आणि वागणूक वेगळी असे कधी होऊ शकत नाही. म्हणून आपली प्रार्थना न्यायप्रविष्ट असली पाहिजे. कारण देव न्याय्य आहे. दुसऱ्या वाचनात संत पौल आम्हांला सुयुद्ध केल्यावर मिळणाऱ्या मुकुटा विषयी सांगत आहे. तो सांगतो “मी सुयुद्ध केले व धाव संपवली आहे व विश्वास राखीला आहे”.
          तसेच आजच्या शुभवर्तमानात आम्हांला दोन व्यक्तीचे उदाहरण देऊन परुशी व जकातदार यांच्या प्रार्थनेचे स्वरूप नमूद केले आहे. परुशी देवापुढे त्याच्या सत्कार्याचा, मी पणाचा, दांभिगतेचा पाढा देवाला  वाचून दाखवत होता ह्यालाच तो प्रार्थना समजत होता. पण जकातदार त्याच्या अंतकरणातील तळमळतेची, नम्रतेची, काकळूतीची व पश्यातापी अंतकरणाची प्रार्थना करत होता. देवापुढे त्यानी ताट मान केली नाही देवाकडे आपल्या दुष्कृत्याबद्दल तो दूर उभाराहुन क्षमा मागत होता. खरेच देवाला नम्रतेची प्रार्थना आवडते. कारण “धनवानांची दुनिया आहे, गरीबाचा भगवान”.
          या पवित्र मिस्सामध्ये सहभागी होत असतांना, आपण सुद्धा जकातदारा सारखे नम्र होऊया व म्हणूया “देवा मला क्षमा करी आलो पापी तुझ्या दारी, तुझी अनंत करूणा  दयेने ऐक प्रार्थना”.  

साम्यक विवरण

पहिले वाचन: बेनसिरा ३५:१२-१४  

          आजतागायत या जगामध्ये पैसा, वैभव, उच्चपद याचंच  साम्राज्य पसरलेलं आहे. त्यामुळे न्याय व  प्रामाणिकपणाला जास्त जागाच उरलेली नाही. दिवसेंदिवस मनुष्य, स्वच्छंदी, स्वकेंद्रीत बनतो आहे. परंतु ईश्वर माणसाच्या श्रीमंतीला, उन्नतीला अधिक महत्व देत नाही तर विनम्रता, दया, लीनतेच्या व दायिकपणाच्या प्रार्थनेला अधिक महत्व देतो. म्हणूनच बेनसिरा लिनता नम्रता, दया व प्रामाणिकपणा या प्रार्थनेच्या पैलू विषयी बोध करतो आहे. 

दुसरे वाचन: २ तीमथी ४:६-८८,१६-१८

          दुसऱ्या वाचनात संत पौल जानिवपूर्वक सांगतो की त्याचा अंत जवळ आला आहे. तरीही मरण किंवा शत्रुत्व त्याला भयभीत करू शकत नाही. आणि तो कधीच निराश झाला नाही त्याने सदोदित देवाला धन्यवाद दिला त्याचा अटळ विश्वास होता. तसेच त्याला ठाऊक होते. ख्रिस्तात जरी तो मरण पावला तरी ख्रिस्ताबरोबर पुन्हा उठणार आहे, व सार्वकालीक जीवन त्याला प्राप्त होणार आहे. स्वर्गीय मुकुटाचा तो भागीदार होणार आहे. कारण ख्रिस्ती जनांस मरण हि शोकांतिका नाही तर परिपूर्ण जीवन आहे.

शुभवर्तमान: लुक १८:९-१४ 

          शुभवर्तमानात आपण बघतो की परुशी व जकातदार दोघेही मंदिरात प्रार्थना करत आहे. पण ह्यांच्या प्रार्थनेत फरक होता, विसंगती होती. ती अशी की, परुशी स्वत:च्या महत्कृत्याबद्दल वाहवा करत होता. त्याच्या चांगल्या कामाची जणू पावतीच तो देत होता, आपली गर्विष्ठ प्रवृत्ती सादर करत होता. या उलट जकातदार नम्रतेने आपल्या दुष्कृत्याविषयी परमेश्वराकडे दयेची भिक मांगत होता.    

मनन चिंतन:

          बंधूभगिनीनो ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी माणूस वेगवेगळ्या उपयोजना आखत असतो. कारण त्याची मनोमनी इच्छा असते की देवाने माझे गाऱ्हाणे ऐकावे, मला सदैव आनंदी ठेवावे, वैभव प्राप्त व्हावे. म्हणूनच तो आपल्या परीने प्रयत्न शील असतो. कधी कधी तर देवाशी सैदेबाजी देखील करतो. लाच देण्याचा, आमिष दाखवण्याचा प्रयत्न करतो पैसा व संपतीच्या जोरावर देवाला विकत घेऊ पाहतो व आपलसं करू पाहतो. मग त्याला वाटते की मी देवाला विकत घेतले आहे, व देव माझ्या खिशात आहे. पण म्हणतात ना “मनी नाही भाव, देवा मला पाव” परंतु “अरे वेडया माणसा देव बाजाराचा भाजीपाला नाही”. तो सर्वोच्च, सर्वसमर्थ व श्रेष्ठ आहे, प्रेमाचा अथांग सागर आहे. त्यानेच सर्वकाही निर्माण केले आहे. “हि सृष्टी सारी तुझीच किमया, विश्व निर्मिले परमपित्या”. किंबहुना जो पैसा, संपती आपण मिळवितो हे सर्व साध्य करण्यासाठी देवानेच आम्हांला ज्ञान, बुद्धी, व शरीर बहाल केले आहे म्हणूनच सर्व मानवजात हि देवाची कृती आहे, आपण सर्वजण देवाची प्रतिमा आहोत. म्हणून देवाला पैसा आडका, गर्व, अहंमपणा, वरवरचा विश्वास मान्य नाही. तर नम्रता, लिनता, प्रामाणिकपणा हवा आहे. तरच देव आपल्याला पावणार. त्यास भाव भक्ती हवी आहे. देवास रिक्तपनाची प्रार्थना आवडते. म्हणून प्रथम स्वत:ला जगीक गोष्टी पासून रिक्त, रिकामे केले पाहिजे.
          एकदा एक मनुष्य भगवान बुद्धाकडे आला, त्याच्या हातात फुले होती. आपल्याकडे येताना पाहून भगवान बुद्ध त्याला म्हणाले हातातील फुले खाली टाक. तो भांबावला, गडबडला, क्षणात विचार केला भगवान बुद्ध असे का सांगतात! मग त्याने त्याच्या फक्त डाव्याहातातील फुले खाली टाकली. कारण त्याला वाटले की डावा हात अशुभ आहे. पण भगवान बुद्ध त्याला पुन्हा म्हणाले की दुसऱ्या हातातली फुले सुद्धा खाली  टाक. मग त्या माणसाने दोन्ही हातातली फुले खाली टाकून दिली. नंतर भगवान बुद्ध त्याला म्हणतात, तुझ्यातील अहंमपणा, गर्व, श्रीमंती हे पण खाली टाकून मगच माझ्या समीप ये. खरच देवाकडे जाण्यासाठी काहीही लागत नाही. फक्त आपले निर्मळ हृदय, शुद्ध मन, अंतरिक भाव व श्रद्धा ह्याची नितांत गरज आहे. कसलेच मानसिक ओझे न घेता नितळ मनाने जावे लागते. तेव्हाच देव आमचे ऐकतो, आम्हांला स्वीकारतो व पावतो.  
          आजच्या परुशी व जकातदार ह्याच्या दाखल्यात आपण पाहतो की, परुशी त्याच्या सन्मानाचे, कार्याचे, अहंमपणाचे ओझे आणून देवावर भार टाकून देवाला खूश करू पाहतो. जकातदार तर स्वत:ला पूर्णपणे रिक्त करून देवाच्या चरणाशी येतो. दुरुनच देवाकडे मनोभावे प्रार्थना करतो व ईश्वर त्याची प्रार्थना स्विकारतो. चलातर आपल्या जिवनातील परुशाला बाहेर काढूया व जाकातदारा सारखे नम्रतेचे जिवन स्विकारुया व परमेश्वराला आपलेसे करूया त्याचा अनुग्रह घेऊया व म्हणूया “स्वीकारिले मी आज तुम्हाला मित्र म्हणुनी माझे.”  जययेशू.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: “हे प्रभू आमची प्रार्थना एक”

१.    ख्रिस्त प्रेमाचा संदेश जगाला देण्यास झटणारे आपले पोप फ्रान्सीस कार्डीनल्स, बिशप्स, फादर्स, सिस्टर्स व सर्व व्रतस्त बंधूभगिनींवर परमेश्वराचा वरदहस्त असावा व ह्या प्रेमाचा अनुभव अधिकाधिक लोकांना यावा म्हणून लागणारी कृपा शक्ती त्यांना प्राप्त व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
२.    आज संपूर्ण जगात वेगवेगळ्या ठिकाणी अशांतता पसरली आहे ह्या अशांततेचे कारण समजून घेऊन त्याजागी शांती प्रस्तापित करण्यास राजकीय व धर्मिक नेत्यांनी पुढाकार घ्यावा म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
३.    नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक लोकांची घरे व निवारा उद्वस्थ झालेली आहेत ह्या सर्व लोकांना परमेश्वराचा आश्रय मिळावा व त्यांचे निवास पुन्हा उभे करण्यास अनेक मदतीचे हाथ पुढे यावेत म्हणून आपण प्रार्थना करूया.
४.    आज शिक्षण हि मानवाची मुलभूत गरज निर्माण झाली आहे. ज्यांना शिक्षांना पासून वंचित रहावे लागत आहे अशा सर्वांना चांगले शिक्षण मिळावे व त्याद्वारे त्यांनी समाजातील वाईट गोष्टींचा समूळ नाश करावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
५.  आपण प्रत्येकाने परुशासारखे स्वत:च्या महत्कृत्याबद्दल वाहवा न करता आपली गर्विष्ठ प्रवृत्ती सादर न करता जकातदारा प्रमाणे  नम्रतेने आपल्या दुष्कृत्याविषयी परमेश्वराकडे दयेची याचना करावयास आपणाला कृपा व सामर्थ मिळावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
६.    आता थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक गरजा प्रभूकडे मांडूया.     



No comments:

Post a Comment